ये इल्म ये हिक्मत ये तद्दबुर ये हुकूमत
पीते हैं लहू देते हैं तालीम-ए-मसावात
कब डुबेगा सरमाया परस्ती का सफिना
दुनिया है तेरी मुंत़जर-ए-रो़ज-ए-म़का़फात
सध्या जगातील सुपर पॉवर अमेरिका आहे. त्यापुर्वी ब्रिटिन होते. त्यापूर्वी मुस्लिम होते. औद्योगिक क्रांतीनंतर मुस्लिम हे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे पडले. तेव्हापासून त्यांची पिछेहाट सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. रोहिंग्या मुस्लिमांवर गेल्या महिन्यांपासून सुरू झालेल्या ताज्या अत्याचाराच्या व्हिडीओ क्लिप्स आणि छायाचित्रे पाहून संपूर्ण जग हळहळ करीत आहे. जगभरातील मुस्लिम समाज बेचैन झालेला आहे. तुर्की, ईरान, मालदीव वगळता कोणीही म्यानमारशी डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत केलेली नाही. जगात एकूण ५६ मुस्लिम देश असून त्यापैकी कोणीही या दुर्देवी रोहिंग्यांच्या मदतीसाठी पुढे आलेला नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या डायपरच्या आकाराचा व कायम दरिद्री म्यानमार देश, ठरवून आपल्या रख्यान प्रांतातील मुस्लिमांवर अत्याचार करतो. त्यांच्यासाठी विशेष छळ छावण्या तयार करतो. त्यांच्यावर शब्दांतून वर्णन न करता येण्यासारखे अत्याचार करतो. परत त्याचे छायाचित्रण करतो आणि समाज माध्यमांवर टाकतो. त्याला मुस्लिम देशांची जरासुद्धा भिती वाटत नसेल का? या प्रश्नाचे उत्तर आहे होय! त्याला या मुस्लिम देशांची भिती वाटत नाही. का? आज याच प्रश्नावर चर्चा करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे.
मुस्लिम समाज हा एक जागतिक समाज आहे. ज्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, त्या ठिकाणीही तो प्रभावी नाही व ज्या ठिकाणी अल्पसंख्येत आहे त्या ठिकाणीही तो प्रभावी नाही. याचे कारण असे की हा एक निलंबित समाज आहे. याचे निलंबन साक्षात सर्वश्रेष्ठ अल्लाहने केलेले आहे. ते कसे? याचे उत्तर जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी ३० डिसेंबर १९४६ साली मुरादपूर (सियालकोट) येथे भाषण करतांना दिले होते. यासंबंधी आपण अधिक जाणून घेऊया.
हम तो माईल ब-करम हैं, कोई साईल ही नहीं
राह दिखलाए किसे रह रवे मंज़िल ही नहीं
मौलानांनी एका महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधताना सांगितले होते की, मुस्लिम समाजाला सर्वश्रेष्ठ अल्लाहने जगाचे नेतृत्व करण्यासाठी जन्माला घातले आहे. त्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याद्वारे सत्यमार्गही ठरवून दिला आहे. मात्र मुस्लिम समाज कालौघात प्रेषित सल्ल. यांनी घालून दिलेल्या मार्गापासून दूर झाला. राज्यकर्ता समाज म्हणून ज्या नेतृत्वगुणांची जोपासना करणे अपेक्षित होते ते नेतृत्वगुण आपल्यामध्ये निर्माण करण्यात हा समाज कमी पडला. म्हणून सर्वश्रेष्ठ अल्लाहने या समाजाला निलंबित करून टाकलेले आहे. ज्याप्रमाणे सरकारी अधिकारी निलंबित अवस्थेमध्ये अधिकारी असतो मात्र त्याला कुठलेच अधिकार नसतात. त्याचा कोणी सन्मान करीत नाही. ठीक अशीच अवस्था मुस्लिम समाजाची झालेली आहे. या संदर्भात मौलानांचे विचार अत्यंत मोलाचे आहेत. हे विचार लक्षपूर्वक वाचून आत्मसात केल्यास कोणामध्येही नेतृत्वगुण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला खात्री आहे. चला तर पाहूया! मौलाना काय म्हणतात?
ङ्गङ्घआपल्याकडे असलेला ईश्वरीय संदेश जगातील ईतर समाजापर्यंत पोहोचविण्यामध्ये मुस्लिम कमी पडल्यामुळे एक मोठा समाज आपल्यापासून दूर गेलेला आहे. जोपर्यंत आम्ही त्यांना आपल्याजवळ बोलावून किंवा स्वतः त्यांच्याकडे जावून, तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविणार नाही तोपर्यंत आपले कार्य पूर्ण झाले असे मानता येणार नाही. हे काम एवढे महत्त्वाचे आहे की, हेच करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने जगामध्ये प्रेषितांना पाठविले होते. मुस्लिम समाजाला जमाअते इस्लामीच्या माध्यमातनू आम्ही ज्या गोष्टीकडे बोलवित आहोत, ती गोष्ट म्हणजे मुस्लिम होण्याच्या नात्याने त्यांची जबाबदारी काय आहे, याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. ही जबाबदारी मुस्लिमांनी पार पाडली नाही तर ते जगातही सुटू शकणार नाहीत व आखिरत(मरणोत्तर जीवन)मध्येही सुटू शकणार नाहीत. त्यांची जबाबदारी फक्त एवढीच नाही की त्यांनी नमाज पढावी, रोजे ठेवावे, जकात द्यावी, हजला जावे किंवा निकाह, तलाक, विरासतीच्या मामल्यात इस्लामी पद्धतीने आचरण करावे. या जबाबदार्यांसोबतच एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर ही आहे की, त्यांनी त्या गोष्टीची साक्ष द्यावी, ज्या गोष्टीसाठी त्यांना साक्षीदार म्हणून जन्माला घालण्यात आलेले आहे. ती साक्ष खालीलप्रमाणे आहे -
अ) और इसी तरह हमने तुम्हे एक बेहतरीन गिरोह बनाया ता की तुम लोगों पर गवाह बनो और रसूल तुम पर (सुरे बकरा आयत नं.१४५).
ब) ऐ लोगों जो ईमान लाए हो खुदा के लिए उठनेवाले और ठीक-ठीक ह़क की गवाही देनेवाले बनो (सुरे मायदा आयत नं.६).
क) उस शख्स से बढकर ़जालीम और कौन होगा जिसके पास अल्लाह की ओर से एक गवाही हो और वो उसे छुपाए (सुरे बकरा आयत नं.१४०).
खर्याची साक्ष देण्याबाबत एवढी ताकीद केल्यानंतर सर्वश्रेष्ठ अल्लाहने ही साक्ष न दिल्यास त्याचे काय परिणाम होतील, हे ही स्पष्ट केलेले आहे. त्यासाठी यहूदी समाजाचे उदाहरण दिलेले आहे व कुरआनमध्ये आदेश दिलेला आहे कि, तो ज़िल्लत (अपमान आणि तिरस्कार) और मोहताजी उनपर डाल दी गई और उन्होंने अपने सिर (डोके) अल्लाह का गजब ले लिया. (सुरे बकरा आयत नं.६१).
मग ही साक्ष काय आहे? माणसाला या जगात यशस्वी होण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी फक्त एक मार्ग आहे जो तुम्हाला दाखविण्यात आलेला आहे. तुम्ही जगाला हा मार्ग दाखवा. हाच मार्ग खरा असल्याची साक्ष द्या कारण उद्या जगातील इतर समाज आखिरतमध्ये हा तर्क देवू शकणार नाही की मुस्लिमांनी आम्हाला या सत्यमार्गाबद्दल माहितीच दिलेली नव्हती. या साक्षीचे महत्व या गोष्टीवरून लक्षात येईल की, मानवजातीला मोक्ष मिळेल किंवा त्यांना शिक्षा देण्यात येईल, याचा निर्णय या एका साक्षीवरूनच ठरणार आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह इतका निष्ठूर नाही की त्याने यासाठी मानवांना शिक्षा करावी ज्याची माहितीच त्यांना देण्यात आलेली नव्हती. ज्या लोकांना सत्यमार्गाची माहितीच देण्यात आली नाही त्या लोकांना त्या मार्गावर का चालले नाही म्हणून कशी शिक्षा देता येईल? म्हणून अल्लाहने जगाची सुरवातच त्या मानवापासून केली की जो प्रेषित होता. मग वेळोवेळी अनेक प्रेषित पाठवून लोकांना सत्यमार्ग दाखविला. जीवन जगण्याची पद्धत सांगितली. अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम नंतर मुस्लिम समाजावर ही जबाबदारी टाकण्यात आली की त्यांनी ती जीवन जगण्याची पद्धत लोकांना सांगावी जी सर्वश्रेष्ठ अल्लाहला पसंत आहे. हे काम दोन प्रकारे करण्याची ताकीद दिली. एक तर ही जीवनव्यवस्था त्यांनी काटेकोरपणे आपल्या जीवन व समाजात प्रथम लागू करावी व नंतर दूसर्या समाजाला ती सांगावी. हे काम करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर प्रेषित सल्ल. यांचा संदेश लोकांपर्यंत तोंडी, लेखी, साहित्य व मीडियाच्या माध्यमाने पोहोचवावा. दूसरे हे की, प्रत्यक्षत्यात इस्लामी जीवन पद्धतीवर स्वतः आचरण करून लोकांसमोर आदर्श ठेवावा.
आता आपण हे पाहू की पहिल्या पद्धतीने किती मुस्लिम हा संदेश ईतर लोकांपर्यंत पोहचवत आहेत? आपल्याला दिसेल की फार कमी लोक हे काम करीत आहेत. आणि उत्कृष्टपणे काम करणार्यांची संख्या तर आणखीन कमी आहे. आता पाहू दुसर्या पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष आपल्या जीवनात इस्लामी जीवनपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करून किती लोकांनी जगासमोर आदर्श ठेवलेला आहे? त्यातही अत्यंत कमी लोक आपल्याला असे आढळून येतील की, ज्यांनी आपल्या जीवनात शुद्ध इस्लामी जीवन पद्धती अवलंबविलेली आहे. सामुहिक स्तरावर तर कोठेच शुद्ध इस्लामी जीवन पद्धती लागू नाही. याची चिंता सुद्धा बहुतेक मुस्लिमांना नाही. इस्लामला हे अपेक्षित होते व आहे की, जी चांगली जीवन पद्धती मुस्लिमांना देण्यात आलेली आहे त्याची साक्ष त्यांच्याकडे पाहताचा लोकांना पटावी. इस्लामी जीवन पद्धतीचे गोडवे फक्त तोंडानेच गायल्या जाऊ नयेत.
आदमी नही सुनता आदमी की बातों को
पैकरे अमल बनकर गैब की सदा बन जा
प्रत्यक्षा लोकांना चांगल्या जीवन पद्धतीचा अनुभव तुमच्याकडे पाहून यावा. तुमच्या व्यवहारातून ती गोडी त्यांना चाखता यावी, जी उच्च नैतिकमुल्यामुळे जीवनात उत्पन्न होते. तुम्हाला पाहून, तुमच्याशी व्यवहारकरून त्यांची खात्री व्हावी की इस्लामच्या मार्गदर्शनामुळे किती चांगले लोक निपजतात, किती न्यायप्रिय समाज तयार होतो, किती आदर्श समाज बनू शकतो, किती स्वच्छ, सुंदर आणि पवित्र संस्कृती उदयास येते, किती सुंदर पद्धतीने ज्ञान, विज्ञान, कला आणि साहित्याची प्रगती होते, परस्परांना सहकार्य करणारा किती सुंदर समाज उदयास येतो, किती चांगला तंटामुक्त समाज तयार होतो, गरीबांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तयार असणारी किती सुंदर अर्थव्यवस्था आकारास येते, व्यक्तीगत आणि सामुहिक जीवन किती सुंदर बणून जाते, किती विश्वासू माणसे निपजतात, किती कल्याणकारी समाज निर्माण होतो. हे सर्व तेंव्हाच शक्य होईल जेव्हा मुस्लिम समाज व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवर आदर्श आचरण करून इस्लामी जीवन पद्धती आदर्श आहे याची साक्ष आपल्या वाणी आणि वर्तनातून जगाला पटवून देईल. मुस्लिमांचे आचरण नैतिकतेच्या मापदंडावर किती खरे उतरते, यावर सर्व काही अवलंबून आहे. जेव्हा मुस्लिमांच्या घरा-घरातून नैतिकतेचा सुगंध दरवळेल, जेव्हा आमची दुकाने, आमचे कारखाने नैतिकतेच्या उजेडाने उजळून निघतील, जेव्हा आमच्या सर्व संस्था, संघटना, शाळा, मदरसे या प्रकाशाने प्रकाशमान होतील, जेव्हा आमचे साहित्य, आमची माध्यमे ही गुणवत्तेची सनद ठरतील. जेव्हा आमच्या सामाजिक योजना आणि आमचे सामुहिक प्रयत्न हे सत्य असल्याची साक्ष देतील. जेव्हा ज्यांचाही आमच्याशी संपर्क होईल तेंव्हा त्यांना या गोष्टीची साक्ष पटेल की, हां! हे लोक तसेच आहेत जसे की यांचा धर्म सांगतो, तेंव्हाच आपण सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे समाजात सुधारणा होऊ शकेल. हे जरी सत्य असले तरी या मार्गावर चालणारा एखादा देश जोपर्यंत अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत आपली साक्ष खर्या अर्थाने जगापर्यंत जाणार नाही. अश्या एका आदर्श राष्ट्राचे मॉडेल जगासमोर असावयास हवे, जो की इस्लामी तत्वावर उभा राहिलेला असेल. ज्या ठिकाणी सर्वांशी न्याय होत असेल, सामाजिक सुधारणेचे कार्यक्रम लागू असतील, स्वच्छ शासन, पारदर्शक प्रशासन असेल, शांतता नांदत असेल, जनतेच्या कल्याणाचे कार्यक्रम राबविले जात असतील, सामाजिक सुधारणा कुठल्याही भेदभावाशिवाय लागू असतील, सरकारी अधिकारी-कर्मचारी सभ्य असतील, आपल्या चांगल्या अंतर्गत राजकारणाने, न्यायशील विदेश नीतिने, आपल्या सभ्य युद्धाने, आपल्या न्यायप्रीय तहाने हे राष्ट्र या गोष्टींची साक्ष जगाला पटवेल की इस्लामने या सुंदर राष्ट्राला जन्म दिलेला आहे. इस्लाम मानवकल्याण आणि त्याच्या यशस्वीतेसाठीच्या सर्व गरजा पूर्ण करतो.
म्हणून उत्कृष्ट वैयक्तिक आयुष्याची व उत्कृष्ट इस्लामी राष्ट्राची साक्ष मुस्लिमांनी आपल्या वाणी व वर्तनातून द्यावयास पाहिजे होती. परंतु दुर्देवाने 1438 पैकी प्रेषित सल्ल. व खुलफा-ए-राशेदीन यांचा काळ वगळता आपल्या उर्वरित राजकीय इतिहासात खर्या अर्थाने आपण अशी साक्ष देऊ शकलेलो नाही. थोडे बोटावर मोजण्याइतके लोक अशी साक्ष देतही आहेत. मात्र जगाचा आकार व लोकसंख्या पाहता त्यांची साक्ष फारसा प्रभाव पाडू शकलेली नाही. या उलट बहुसंख्य मुस्लिम समाज ही साक्ष कशी देतो हे आपण पाहू.
तर्बीयत आम है जौहर-ए-काबिल ही नहीं, जिस से तामीर आदम की हो ये वो गुलही नही, कोई काबिल हो तो हम शान कई देते हैं, ढूंडनेवालों को दुनिया भी नई देते हैं.
कित्येक मुस्लिम लोक खोटे बोलतात, विश्वासघात, अत्याचार करतात, धोका देतात, बोलतात त्या प्रमाणे वागत नाहीत, कित्येक लोक चोरी करू शकतात, डाके घालू शकतात, दंगेही करू शकतात, अश्लील वर्तनही करू शकतात, वाईट गोष्टींमध्ये ते मुस्लिमइतरांपेक्षा कुठेही कमी नाहीत उलट काकनभर सरस आहेत. मुस्लिम समाज म्हणून आमचे राहणीमान, आमचे रितीरिवाज, आमचे उत्सव, आमच्या सभा, आमचे जुलूस, कशातही शुद्ध इस्लामचे प्रतिनिधीत्व दिसून येत नाहीत. बहुतेक मुस्लिम आपल्या वर्तनातून इस्लाम विरूद्धच साक्ष देतात. ज्या पद्धतीने आम्ही सत्य लपवित आहोत आणि खोटी साक्ष देत आहोत त्याची जबरदस्त शिक्षाही ईश्वरी कायद्यात दिलेली आहे आणि तीच आपण भोगत आहोत. जेव्हा एखादा समाज सर्वश्रेष्ठ अल्लाहने दिलेल्या नेमतींची (पुरस्कारांची) अवहेलना करतो, आपल्या मालकाशी गद्दारी करतो तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाह ही त्या समाजाला जगात आणि आखिरत दोन्ही ठिकाणी भारी शिक्षा देतो. यहुदी समाजाच्या बाबतीत अल्लाहचा हा शिक्षेसंबंधीचा आदेश पूर्ण झालेला आहे. त्यांच्यानंतर आरोपीच्या पिंजर्यात आपण उभे आहोत. अल्लाहला यहुदी लोकांशी कुठली व्यक्तिगत दुश्मनी नव्हती आणि आपल्याशी त्याचे कुठले व्यक्तिगत नाते नाही की, आम्ही गुन्हा करू आणि शिक्षेपासून सुरक्षित राहू. सत्य हे आहे कि, सत्याची साक्ष देण्यामध्ये आपण जेवढी दिरंगाई केली तेवढ्याच गतीने आपण असत्याची साक्ष देत गेलो. म्हणूनच मागच्या दीड शतकामध्ये मोरोक्को ते पश्चिमी आशियातील अनेक देश आपल्या हातातून निघून गेले. मुस्लिम समाज पराजित होत गेला. या समाजाचे नाव गर्वाने घ्यावे असे काही आमच्या हातून घडलेले नाही. आमची बेईज्जती झाली. एवढेच नव्हे तर मुस्लिम हे नाव अपमान, दारिद्रय आणि मागासलेपणाचे प्रतिक बनले. जगात आमची कुठेही इज्जत राहिलेली नाही. कुठे आमचा वंशविच्छेद करण्यात आला तर कुठे आम्हाला आमच्याच घरातून काढण्यात आले, कुठे आमच्यावर अत्याचार केले गेले तर कुठे आमच्याकडून सेवा आणि चाकरी घेण्यासाठी आम्हाला जीवंत ठेवण्यात आले.
ज्या ठिकाणी मुस्लिम देश शिल्लक राहिले त्या ठिकाणीसुद्धा त्यांना पराजित व्हावे लागले. स्वतंत्र राष्ट्र असूनही विदेश शक्तींपुढे ते थरथर करत आहेत. खरे पाहिले असता त्यांनी इस्लामची तोंडी आणि लेखी साक्ष दिली असती तर जगातील असत्य शक्ती त्यांच्याकडे पाहून थरथरल्या असत्या. प्रेषित सल्ल. यांच्या काळात लाखोंच्या संख्येत असलेल्या मुस्लिमेत्तर अरबांमध्ये 1 लाख लोकांमागे 1 मुस्लिम असे व्यस्त प्रमाण होते. तरीपण ते लोक ठामपणे इस्लामच्या साक्ष देण्यासाठी उभे राहिले आणि म्हणून त्यांच्या या ठामपणामुळेच बघता-बघता काही वर्षांतरच सगळा बिगरमुस्लिम अरबी समाज मुस्लिम झाला. जेव्हा हेच अरब अरबास्थानच्या बाहेर निघाले तेव्हा 25 वर्षात तुरकस्तानपासून मोरक्कोपर्यंतचे मुस्लिमेत्तर लोक त्यांच्यात सामील झाले. आणि ज्या ठिकाणी शंभर टक्के अग्निपूजक, मुर्तीपूजक आणि ख्रिश्चन राहत होते त्या ठिकाणी शंभर टक्के समाज मुस्लिम बनला. कुठलाच पक्षपात आणि कुठलीही धार्मिक संकीर्णता अरबांच्या मार्गात बाधा ठरू शकली नाही, कारण की ते सत्याची साक्ष देत होते. मात्र आज आपण प्रत्येक ठिकाणी पराजित होत आहोत. हे फक्त सत्याची साक्ष लपवून असत्य साक्ष दिल्यामुळे होत आहे. ही तर आपल्याला मिळणारी जगातील शिक्षा आहे. आखिरतची शिक्षा यापेक्षा भयानक असेल. जोपर्यंत आपण सत्याची साक्ष देण्याचे आपले कर्तव्य निभावणार नाही तोपर्यंत जगात असत्याची लागण होत राहील, अत्याचार-दंगे होत राहतील. जगात ज्या-ज्या काही वाईट गोष्टी वाढतील त्या-त्या ठिकाणी त्याला जन्माला घालण्यासाठी जरी आपण जबाबदार नसलो तरी त्यांना नष्ट करण्यासाठी कुठलेच प्रयत्न न करण्यासाठी आपण जरूर जबाबदार ठरू. मुस्लिमांनी भारतात आणि जगात ज्या समस्यांना आपल्या खर्या समस्या समजलेल्या आहेत वास्तविक पाहता त्या त्यांच्या खर्या समस्याच नाहीत. आपला असा समज झालेला आहे की, अल्पसंख्यांक म्हणून बहुसंख्यांकांच्या मध्ये राहून स्वतःचे कसे अस्तित्व राखू शकू ही खरी आपली समस्या आहे. आपले हित, आपले नागरी अधिकार कसे सुरक्षित राहतील? ही आपली खरी समस्या आहे. मुस्लिम उलेमा आणि राजकीय नेतृत्व ही आपल्याला हेच समजाविण्याचा प्रयत्न करीत आहे की, आपली मूळ समस्या अल्पसंख्यांक म्हणून कसे जगावे हीच आहे व त्यासाठी ते त्याच उपायांकडे मुस्लिमांना घेवून जातात जे उपाय कधीच त्यांना यशस्वी करू शकणार नाहीत. मुस्लिमांना मग ते अल्पसंख्यांक असो की बहुसंख्यांक यशस्वी होण्यासाठी फक्त सत्याची साक्ष देणेच गरजेचे आहे. जर आम्ही ईश्वरीय हिदायती (मार्गदर्शन) ची साक्ष व्यवस्थित आणि ठामपणे देऊ शकू तरच आपण यशस्वी होवू. आपण दिलेली साक्ष इतकी कल्याणकारी आहे की, ती जर का प्रामाणिकपणे दिली गेली तर ती आपोआप इतर समाजांना मोहित करून टाकेल. त्याचा परिणाम सगळ्या जगावर होईल. इतर समाज तुमच्याकडे आशेने पाहू लागेल. लोक तुमच्यावर भरोसा ठेवतील, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाईल, तुमचाच शब्द अंतिम समजण्यात येईल, कल्याणाची आशा तुमच्याकडूनच ठेवली जाईल, अधर्मी नेत्यांची प्रतिष्ठा तुमच्यासमोर धुळीला मिळेल, त्यांचे सर्व तत्वज्ञान तुमच्या सत्य आणि न्याय पद्धतीसमोर खोटे ठरतील आणि मग जे लोक आज त्यांच्या कॅम्पमध्ये दिसत आहेत त्यांच्यापासून तुटून तुमच्या कँपमध्ये येवू लागतील. इथपर्यंत की एक वेळ अशी येईल की, साम्यवाद स्वतः मास्कोमध्ये आपल्या संरक्षणासाठी परेशान होवून जाईल, भांडवलशाही खुद्द वाँश्गिंटन आणि न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या रक्षणासाठी बेचैन होवून जाईल. भौतिकवादी नास्तीक लोक लंडन आणि पॅरिसमधील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी असमर्थ ठरतील. वंशवादी आणि राष्ट्रीवादी ब्राह्मण आणि जर्मन लोकांना समर्थक मिळणे अवघड होवून जाईल आणि हा काळ इतिहासामध्ये फक्त एक गोष्ट म्हणून शिल्लक राहील. आम्ही तर स्वतःला मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी समजतो मात्र साक्ष त्याउलट देतो. म्हणून जगात सगळीकडे आपली पिछेहाट होत आहे.
यावर उपाय काय?
है जो हंगामा बपा युरिश-ए-यलगारी का, गाफिलों के लिए पैगाम है बेदारी का, तू समझता है ये सामान है दिल आजारी का,
इम्तेहां है तेरे इसार का खुद्दारी का
यावर उपाय एकच आहे की, आपल्यावर सत्याची जी साक्ष देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे ती जबाबदारी समर्थपणे पेलावी. आपल्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनामधून, आपल्या घरांमधून, आपल्या कुटुंबामधून, आपल्या सोसायट्यांमधून, आपल्या शाळांमधून, आपल्या महाविद्यालयांमधून, आपल्या साहित्यामधून, आपल्या पत्रकारितेमधून, आपल्या व्यवहारामधून, आपल्या आर्थिक अस्थापनांमधून, आपल्या संघटनांमधून इस्लामच्या मार्गदर्शनाची साक्ष द्यावी.जर आपण सत्याची ग्वाही देण्याचे हे कठीण काम करू शकलो तर आपण अल्पसंख्यांक आहोत याची काळजी करण्याची गरज नाही. कारण सत्य आणि नैतिकता ज्या लोकांमध्ये असेल ते लोक अल्पसंख्यांक जरी असले तरी त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. म्हणून सत्याची ग्वाही देणे हेच मुस्लिमांचे आद्य आणि अंतिम उद्देश्य असावे. हे उद्देश्य ज्या दिवशी मुस्लिम समाज गाठेल त्या दिवशी तो निलंबनातून बाहेर पडेल आणि त्याला आपले गतवैभव प्राप्त होईल.
अंदाज गरचे बहोत शूख नहीं है शायद
के उतर जाए तेरे दिल में मेरी बात