Halloween Costume ideas 2015
April 2023


प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की एक माणूस नमाज, रोजा, जकात, हज असे सर्व पुण्यकर्म करीत असतो पण त्याला मोबदला मात्र त्याच्या आकलनशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या हिशेबाने दिला जाईल. (अबी उमर (र.), मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, एका ज्ञानीला चुकांचाही सामना करावा लागतो आणि बुद्धिमत्तेला मागील अनुभवांपासून देखील शिकावे लागते. (अबी सईद (र.), मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की बाथरुममध्ये लघवी आणि अंघोळ करू नये. अंघोळीसाठी बाथरुम आणि लघवीसाठी शौच्यालयाची वेगळी सोय असावी. (अब्दुल्लाह बिन मुफज्जल, मिश्कात)

ह. आयशा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना असे म्हणताना ऐकले आहे की जर जेवणाची वेळ झाली असेल आणि सोय केली गेली असेल आणि नमाजचीही वेळ झाली असेल तर अगोदर जेवण करावे आणि नंतर नमाज अदा करावी. (मुस्लिम, मिश्कात)

अबू उसैद म्हणतात की आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होतो. एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, मातापिता यांचे निधन झाल्यावर आम्ही त्यांच्यासाठी कोणते कार्य करावे? प्रेषितांनी उत्तर दिले, चार गोष्टी करू शकता, (१) त्यांच्यासाठी दुआ करावी, (२) त्यांनी लोकांना जे वचन दिले असेल त्याची पूर्तता करावी, (३) त्यांच्या मित्रमंडळींशी आदरभावाने वागावे आणि (४) त्यांचा ज्या ज्या लोकांशी नातेसंबंध असतील त्यांचा आदरसन्मान करावा. म्हणजे काका, आत्या, मावशी, मामा वगैरे नातेवाईक. (अदबुल मुफर्रद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की कोणत्याही श्रद्धावंत व्यक्तीने दुसऱ्या श्रद्धावंत व्यक्तीशी शत्रुत्व ठेवू नये. असे होऊ शकते की त्याची / तिची एकादी वागणूक तुम्हाला पसंत नसेल तर असे होऊ शकते की त्यांचे दुसरे गुण तुम्हाला आवडतील. (ह. अबू हुरैरा (र.), मिश्कात, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की चांगला दानधर्म तो आहे ज्याच्यानंतर सुद्धा (तुमची) समृद्धी तशीच राहावी आणि अशा लोकांसाठी आधी खर्च करा ज्यांचे पालनपोषण करणे तुमच्यावर बंधनकारक असेल. (ह. अबू हुरैरा (र.), हकीम बिन हजम, बुखारी, मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की जेव्हा कुणाच्या घरी मुलगी जन्म घेते तेव्हा अल्लाह त्याच्याकडे आपले दूत पाठवतो. ते म्हणतात, या घरच्या लोकांनो, तुम्हाला अल्लाहची कृपा लाभो. मग त्या जन्मलेल्या मुलीला आपल्या पंखांवर घेतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात की एका दुर्बलापासून जन्मलेली दुर्बल मुलगी आहे. जो त्या मुलीचे संगोपन करील, कयामतपर्यंत अल्लाहची मदत त्याला लाभत राहील. (तिबरानी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``अगदी मनापासून कलमा `लाइलाहा इल्लल्लाहु' म्हटलेला मनुष्यालाच अंतिम निवाड्याच्या दिवशी माझी शिफारस प्राप्त होईल.'' (हदीस : बुखारी)

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे हे वक्तव्य आपल्या शब्दांच्या हिशोबाने खूपच तोकडे आहे, परंतु आपल्या अर्थाच्या हिशोबाने खूपच मोठे आहे. अर्थात एकेश्वरवाद नाकारणाऱ्या, इस्लामला अमान्य करणाऱ्या, अनेकेश्वरत्वाच्या गलिच्छतेत अडकलेल्या मनुष्याला पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिफारस लाभणार नाही. अशाप्रकारे तोंडाने `कलमा' उच्चारून इस्लाममध्ये दाखल होऊन मनापासून त्यास खोटे ठरविणारादेखील पैगंबरांची शिफारस प्राप्त करू शकणार नाही. पैगंबर फक्त त्याच लोकांची शिफारस करतील ज्यांनी मनापासून ईमान धारण केले, जे एकेश्वरत्व सत्य असण्यावर विश्वास ठेवतात, जसे- दुसऱ्या हदीसमध्ये `मुस्तैक़ीनन बिहा कल्बुहू' हे शब्द आले आहेत. मग ही गोष्टदेखील स्पष्ट आहे की कर्मामुळे विश्वासात वृद्धी होते. मनुष्याला आपले मूल विहिरीत पडल्याची बातमी कळते तेव्हा ज्याप्रकारे त्याला त्या बातमीवर विश्वास बसतो त्या वेळी दु:खी होऊन त्याचे प्राण वाचविण्यासाठी धावत जातो; हीच स्थिती मनापासून ईमान स्वीकारणाऱ्याची आहे, हेच मनुष्याच्या अंतर्गत मुक्तीची काळजी निर्माण करते आणि आचरणात सुधारणा घडविते.

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(१८) ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी कुफ्र (इन्कार) केला आहे, त्यांच्या कृत्याचे उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीने उडविले असावे. त्यांनी केलेल्या कृत्यांचे त्यांना काहीही फळ मिळू शकणार नाही,२५ हेच परकोटीची मार्गभ्रष्टता होय.

(१९) तुम्ही पाहात नाही काय अल्लाहने आकाशांची व पृथ्वीची निर्मिती सत्याधिष्ठित केली आहे?२६ त्याने इच्छिले तर तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि तुमच्या जागी नवनिर्मिती करील.

(२०) असे करणे त्याच्यासाठी काहीच कठीण नाही.२७


२५) म्हणजे ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी नमकहरामी, अवज्ञा, उदंडता व शिरजोरी धोकाधडी केली आणि आज्ञापालन व उपासना पद्धतीला स्वीकारण्यास अमान्य केले जी पद्धत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सर्वांसाठी घेऊन आले आहेत. त्या लोकांचे संपूर्ण जीवनव्यवहार आणि जीवनभराच्या कर्मांची सर्व पुंजी अंतत: निरर्थक आणि बेकार होईल. जसे एक राखेचा ढीग होता जो काही काळानंतर मोठी टेकडी बनला, परंतु एकाच दिवसाच्या सोसाट्याच्या वाऱ्याने त्याला उडवून नेले आणि एक एक कण त्याचा विखुरला गेला. नजरेला धोका देणारी त्यांची सभ्यता, त्यांची शानदार संस्कृती, त्यांचे आश्चर्यकारक उद्योग, त्यांचे जबरदस्त हक्क, त्यांची अलिशान विद्यापीठे, त्यांचे कला, विज्ञान, त्यांचे प्रभावशाली व प्रभावहीन साहित्याचे अपार भांडार तसेच त्यांची उपासना आणि त्यांचे दाखविण्यासाठीचे सदाचार, मोठमोठे धर्मार्थ आणि जनहिताचे कारनामे या सर्वांवर ते जगात घमेंड व गर्व करतात; सर्वच्या सर्व एक राखेचे ढीग शेवटी सिद्ध होणार आहे, ज्याला कयामतच्या वेळी पूर्णत: साफ होणे आहे. परलोकात एक कणसुद्धा त्यांच्याजवळ या योग्यतेचा राहणार नाही की ज्याला अल्लाहच्या तराजूमध्ये ठेवून काही वजन करावे.

२६) हा तर्क आहे त्या दाव्याचा ज्याला वर नमूद केले गेले होते. हा संदेश ऐकून तुम्हाला आश्चर्य का होते? काय तुम्ही पाहात नाही की ही धरती व आकाश निर्माण करण्याचा शानदार कारखाना सत्यावर स्थापित झाला आहे, असत्यावर मुळीच नाही. वास्तविकतेवर जे आधारित नाही तर केवळ एक निराधार अनुमान आणि मनोकामनांवर आधारित असेल तर त्यास दृढता प्राप्त् होत नाही. त्याच्यासाठी स्थिरतेची शक्यता बाकी राहात नाही. त्याच्या भरोशावर काम करणारा कधीही आपल्या भरोशावर सफल होत नाही. जो मनुष्य पाण्यावर निशान बनवितो आणि वाळुवर महाल बनवितो त्याला जर वाटत असेल की त्याचे निशान बाकी राहावे आणि वाळूचा महाल टिकावा तर त्याची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कारण पाण्याची ही वास्तविकता नाही की त्याने निशान (चिन्ह) टिकवून ठेवावे  आणि वाळुची ही वास्तविकता नाही की महालासाठी ती मजबूत पाया बनेल. म्हणून सत्यतेला आणि वास्तविकतेला दृष्टीआड करून जो मनुष्य खोट्या आशा-आकांक्षावर आपल्या कर्माचा पाया उभारतो, त्याला विफल होणे आहे. हे सत्य तुम्हाला समजत असेल तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य का होते की अल्लाहच्या सृष्टीत जो मनुष्य अल्लाहच्या आज्ञापालन व उपासनेशी निरपेक्ष होऊन जीवनयापन करीत असेल तर त्याचे जीवनभराचे कर्मफळ बरबाद होईल? तसेच माणसाने अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचे प्रभुत्व मान्य करून (खरे तर त्याचे प्रभुत्व मुळात नसतेच) जीवन जगत राहील त्याचे जीवनकर्म बरबाद होईल? मनुष्य जगात स्वावलंबी नाही, हे एक उघड सत्य आहे की मनुष्य अल्लाहशिवाय इतर दुसऱ्यांचा दास बनून राहील तर असत्याच्या आधारावर व वास्तविकतेविरुद्धच्या कल्पनेवर आपल्या जीवनपद्धतीचा पाया रचणारा हा मनुष्य पाण्यावर चिन्ह ओढणाऱ्या मूर्खासारखा परिणाम पाहणार नाही? या मूर्खासाठी तुम्ही कोणत्या दुसऱ्या परिणामाची आशा बाळगता?

२७) दाव्यासाठीचा तर्क दिल्यानंतर त्वरित उपदेश करण्यासाठी हे वाक्य आले आहे. येथे एका शंकेचे निरसन करण्यात आले आहे. वरील स्पष्टोक्ती ऐकल्यानंतर मनुष्याच्या मनात ही शंका उद्भवते व एखादा विचारू शकतो की जर हे असे असेल ज्याला वरील आयतींमध्ये सांगितले गेले आहे तर मग जगात प्रत्येक असत्यवादी आणि दुराचारी नष्ट का होत नाही? याचे उत्तर म्हणजे, ``हे माणसा, काय तुला वाटते की त्यांना नष्ट करणे अल्लाहसाठी कठीण काम आहे? किंवा अल्लाहशी त्यांचे काही संबंध आहे? काय अल्लाहने त्यांच्या दुष्टव्यानंतर आणि असत्यवादी असूनसुद्धा त्यांना आप्तेष्ट व नातेवाईक संबंध असल्यामुळे सूट दिली आहे?'' असे नाही आणि तू स्वत: जाणतो की असे काही नाही. यावर तुला समजले पाहिजे की एक असत्यवादी आणि दुष्ट समाज प्रत्येक क्षणी असुरक्षित व अस्थायी बनून राहिलेला आहे. त्या समाजाला सततची भीती आहे की आपल्याला हटवून आपल्या जागी दुसऱ्या समाजाला काम करण्याची संधी दिली जाईल. या धोक्याला व्यावहारिक रुपात समोर येण्यास विलंब लागत आहे तर ही एक त्यांच्यासाठी संधी आहे (स्वत:ला लवकरात लवकर सुधरून घेण्यासाठीची)



काल मी जमाअते इस्लामी हिंदच्या इज्तमा (शिबिरा)मध्ये सामील झालो होतो. हे संमेलन फकीरांचे संमेलन होते. त्या फकीरांचे नाही जे भीक मागतात. हे त्या फकीरांचे संमेलन होते जे समाजात नेकी (पुण्य) पसरवतात. मानवतेची सेवा करतात. ’मी’ आणि ’तू’ यातील अंतर मिटवितात. ते लोकांना म्हणतात, ’’तुम्ही सर्व ईश्वराचे बंदे (पायीक) आहात. म्हणून ईश्राचे आज्ञाकारीही व्हा.’’ त्यांच्या संमेलनामध्ये सामील झाल्याचा मला कुठलाही पश्चाताप नाही. उलट आनंद आहे. जर या लोकांनी मला पुन्हा बोलावले तर मी पायी चालत त्यांच्या संमेलनात जाईन.’’ - महात्मा गांधी. (संदर्भ : त्रिदिवसीय उर्दू वर्तमानपत्र 4 जुलै 1970).


इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें (गुप्त चळवळ) चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन््नलाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज (परिणाम) के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन््नलाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.’’ (जमाअतच्या कार्यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांनी मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतांनाच्या भाषणातील अंश).


30  मे 1866 रोजी दारूल उलूम देवबंदची स्थापना झाली. 19 नोव्हेंबर 1919 रोजी जमियत उलेमा-ए-हिंदची स्थापना झाली. 1925 साली तबलिगी जमाअतची स्थापना झाली. येणेप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाच या तीन मोठ्या धार्मिक संस्था अस्तित्वात आल्या आणि आजतागायत अत्यंत प्रभावशालीपणे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत 26 ऑगस्ट 1941 साली लाहोरमध्ये जमाअते इस्लामी हिंदची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता? हे समजून घेतल्याशिवाय जमाअते इस्लामी संबंधी परिपूर्ण माहिती कोणालाही समजू शकणार नाही.

मुस्लिमांची सामाजिक पार्श्वभूमी

त्या काळात मुस्लिम समाजामध्ये इस्लामसोबत इतर धार्मिक रितीरिवाज देखील मोठ्या प्रमाणात प्रचलित झाले होते. स्वामी श्रद्धानंद यांच्या ’शुद्धी चळवळ’चा परिणामही दिसू लागला होता. दारूल उलूम देवबंद मधून शिकून बाहेर पडलेले उलेमा यांनी मुस्लिमांमध्ये इस्लामसंबंधीची जाणीव निर्माण करण्यासाठी देशभरात मस्जिद आणि मदरशांच्या मदतीने एक नेटवर्क उभारून प्रयत्न सुरू केले होते. जमियते उलेमा-ए-हिंद ने काँग्रेसच्या सोबत स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेण्याबरोबरच मुस्लिमांमध्ये इस्लामसंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तबलिगी जमाअतने अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने गावागावात जावून लोकांना नमाजचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या मनामध्ये इबादतींसंबंधी गोडी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम बजावले होते. 

जमाअते इस्लामीच्या स्थापनेचा रोचक इतिहास

या तिन्ही संस्थांचे काम आपल्याजागी महत्त्वपूर्ण होते आणि आजही आहे. परंतु हे काम पुरेसे नाही. इस्लाम यापेक्षा जास्त आहे, म्हणून इस्लाम विषयी लोकांमध्ये व्यापक जाणीव निर्माण करण्याची गरज त्यावेळेसचे एक इस्लामिक विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी प्रतिपादित केली. त्यांचे म्हणणे होते की, 1. इस्लाम एक समग्र जीवन पद्धती आहे. तो केवळ इबादतींपुरता मर्यादित नाही. 2. कुरआन समजून वाचणे अत्यंत आवश्यक आहे व हे काम मुस्लिम समाजामध्ये होत नाहीये. 3. इस्लामचा संदेश इतर देशबांधवांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविण्याचे काम या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून होत नाहीये. म्हणून हे काम करण्याचे आव्हान ’तर्जुमानुल कुरआन’ या हैदराबादहून निघणाऱ्या उर्दू नियतकालीकातून सय्यद अबुल आला मौदूदी यांनी केले. त्यांच्या या आवाहनाने प्रभावित होऊन देशभरातून अशी मागणी पुढे आली की सय्यद अबुल आला मौदुदी यांनी या संबंधी पुढाकार घ्यावा. तेव्हा अखंड भारतातून या विचाराशी सहमत असणारे लोक बोलावण्यात आले. 26 ऑगस्ट 1941 रोजी 75 लोक लाहोर येथे गोळा झाले. त्या सर्वांनी एकमताने कुरआनचा संदेश समस्त देशबांधवांपर्यंत पोहोचवावा आणि इस्लामवर आधारित जीवन व्यवस्थेला व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनात स्थापित करण्यात यावे या उद्देशाने एका संघटनेची स्थापना केली. जिचे नाव ’जमाअते इस्लामी’ ठेवण्यात आले.आणि या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून सय्यद अबुल आला मौदूदी यांची निवड करण्यात आली. दुर्दैवाने 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाची फाळणी झाली आणि लाहोर  पाकिस्तानमध्ये गेले. त्यावेळेस जमाअतच्या सदस्यांची संख्या 300 होती. त्यातील बहुतेक लोक फाळणीमुळे पाकिस्तानमध्येच गेले. उरलेल्या सदस्यांनी भारतामध्ये जमाअते इस्लामीची पुनर्स्थापना करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल 1948 दरम्यान, इलाहाबाद येथे एक बैठक केली. या बैठकीस देशभरातून 42 सदस्य गोळा झाले होते. या सदस्यांनी सर्व संमतीने ’जमाअते इस्लामी हिंद’ ची स्थापना केली या  संघटनेने आपल्या नावातच ’हिंद’ हा शब्द सामल करून आपण भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ आहोत याचा सुतेवाच केला. बैठकीनंतर सर्वसंमतीने मौलाना अबुल लैस इस्लाही नदवी यांना आमीर (राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले). त्याचबरोबर मोहम्मद युसूफ यांना महासचिव नेमण्यात आले आणि संघटनेचे काम एकमेकांच्या सल्ल्याने करण्यासाठी केंद्रीय सल्लागार समितीचेही गठन करण्यात आले. जमाअते इस्लामी हिंदची स्थापना स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. 

जमाअते इस्लामीचे अध्यक्ष

आजपावेतो जमाअते इस्लामी हिंदचे पाच अध्यक्ष झाले असून, सहाव्या अध्यक्षांची मुदत मार्च अखेर संपली असून, रमजाननंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल.

1. जमाअते इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष मौलाना अबुलैस इस्लाही नदवी. (1948 ते 1972). त्यानंतर पुन्हा अबुलैस इस्लाही यांनाच अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ते 1990 पर्यंत अध्यक्ष राहिले.

2. त्यानंतर दूसरे अध्यक्ष म्हणून मौलाना मुहम्मद युसूफ यांची निवड झाली. (1972 ते 1979) 

3. त्यानंतर तीसरे अध्यक्ष म्हणून मौलाना सिराजुल हसन यांची निवड करण्यात आली. (1990 ते 2003). 

4. डॉ.मुहम्मद अब्दुल हक अन्सारी यांनी 2003 ते 2006 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 

5. त्यानंतर मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी 2007 ते मार्च 2019 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 

6. 2019 पासून आजतागायत जमाअते इस्लामीचे अध्यक्ष म्हणून सय्यद सआदतुल्लाह हुसैनी हे काम पाहत आहेत. 

जमाअतची निवडणूक प्रक्रिया

जमाअते इस्लामी हिंदची निवडणूक प्रक्रिया देशातील सर्वोत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया आहे. जमाअतमध्ये कोणालाच कोणत्याच पदाच्या निवडीसाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरता येत नाही. येथे पदाची इच्छा म्हणजे लालसा माणन्यात येते आणि त्याला ते पद कधीच मिळत नाही. मुळात कोणी कुठल्याही पदासाठी इच्छाच व्यक्त करू शकत नाही आणि प्रत्यक्षात करतही नाही. जमाअतचे सदस्य स्वतःच्या विवेकाने आपल्यातील योग्य व्यक्तीची निवड स्थानिक शहराध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत करतात. मतदान गोपनीय पद्धतीने घेतले जाते. निवडून आलेल्या पदाची अदलाबदली अत्यंत शांतपणे कुठलाही खळखळाट न करता केली जाते. वर नमूद सहा राष्ट्रीय अध्यक्ष वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे व्यक्ती असून, त्यांचा एकमेकांशी कुठलाच संबंध नाही. जमाअते इस्लामी हिंदमध्ये घराणेशाहीला स्थान नाही. ही एकमेव अशी मुस्लिम संघटना आहे जिच्यामध्ये पदावरून कधीही आपसात तक्रार झालेली नाही किंवा व्यक्तीगत महत्त्वकांक्षेवरून  संघटनेची शकले देखील झालेली नाहीत. 

जमात-ए-इस्लामी हिंदची नियमावली

1948 साली झालेल्या स्थापनेनंतर जमाअते इस्लामी हिंदने 13 एप्रिल 1956 रोजी स्वतःचे संविधान अर्थात नियमावलीचा लिखित स्वरूपात स्विकार केला. या नियमावलीमध्ये एकूण 75 कलमांचा समावेश केलेला आहे.

1. कलम 3 मध्ये जमाअते इस्लामीच्या मूळ श्रद्धेचा उल्लेख केलेला आहे. या कलमाप्रमाणे जमाअतची श्रद्धा,’’लाईलाहा इल्लललाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह’’ अशी आहे. याचा अर्थ पूजनीय फक्त अल्लाहाच आहे आणि हजरत मुहम्मद (सल्लम.) त्याचे प्रेषित आहेत. 

2. कलम 4 मध्ये जमातचा ’नस्बुलऐन’ अर्थात उद्देश जाहीर करण्यात आलेला आहे. तो म्हणजे, ’’अकामत-ए-दीन’’ ज्याचा अर्थ या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये विस्ताराने नमूद करण्यात आलेला आहे.  जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, इस्लाम, जो की पृथ्वी तलावर अवतरित झालेल्या पहिल्या दोन व्यक्तीपासून (ह.आदम आणि हजरत हव्वा अलै.) ते प्रेषित मुहम्मद सल्ल. पर्यंत चालत आलेला आहे. मध्यंतरी यात अनेकदा भेसळ करण्यात आली पण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर पृथ्वीतलावर  शुद्ध स्वरूपात असलेला एकमेव दीन म्हणजेच आजचा इस्लाम आहे. ज्याला की अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पसंत केलेला आहे.  ज्याची घोषणा खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. 

’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.’’ (आले इमरान 3: आयत नं.19)

हा दीन (इस्लाम) माणसाच्या व्यक्तीगत, सामुहिक आणि सार्वजनिक जीवनावर सारखेपणेच लागू होतो. घरात एक, बाहेर एक, पोटात एक, ओठात एक अशी दुटप्पी भूमिका जमाअते इस्लामी हिंदला मान्य नाही. जमाअतची अशी धारणा आहे की, इस्लाम ही जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. एवढेच नव्हे तर या पद्धतीचा स्वीकार न केल्यास माणसाचे जीवन तणावग्रस्त, विकारग्रस्त होवून जाते. शिवाय, जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व समस्यांचे समाधान केवळ इस्लामच देवू शकतो. याचा पुरावा म्हणून मी एका सत्याकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. ते सत्य म्हणजे अनेक मुस्लिम देशांमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा जीवनपद्धती म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या ठिकाणी एक तर मनोरूग्ण व मनोरूग्णालय तथा वृद्धाश्रम नाहीत किंवा अत्यल्प संख्येत आहेत. 

3. कलम 5 मध्ये कलम 4 मधील उद्देशाला हस्तगत करण्याची पद्धती दिलेली आहे. त्यात म्हटलेले आहे की, 

अ) कुरआन आणि हदिस हाच जमाअते इस्लामीचा पाया आहे. बाकी इतर गोष्टींना तेवढीच मान्यता दिली जाईल जेवढी की कुरआन आणि हदिसच्या प्रकाशात देणे शक्य आहे. 

ब) जमाअत आपले उद्देश्य गाठण्यासाठी अख्लाक (नैतिकता)ची पाबंद राहील. कधीच त्या मार्गाचा अवलंब करणार नाही जो वाकडा, अप्रमाणिक किंवा बेकायदेशीर असेल. ज्यामुळे जातीय घृणा पसरू शकेल किंवा आपसात गटतट पडतील व अशांती माजेल. 

क) जमात आपल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी सकारात्मक व शांतीपूर्ण मार्गाचाच अवलंब करेल. म्हणून जमाअत-ए-इस्लामी  हिंद इस्लामी मुल्यांचा प्रचार व प्रसार करूनच लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि त्याच दिशेने लोकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करेल.  

अशा पद्धतीने जमाते इस्लामी हिंदचे कार्य लिखित संहितेनुसार चालते. कोणताही हिंसक मार्ग, भूमिगत चळवळ यावर जमाअतचा विश्वास नाही. सामाजिक क्रांती ही वैचारिक परिवर्तनानेच शक्य आहे, अशी जमातची धारणा आहे. यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांचे विचार खालीलप्रमाणे, ’’ इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें (भूमिगत चळवळ) चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन््नलाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन््नलाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.’’ (मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतानांच्या मौलानांच्या भाषणातील अंश).

जमाअत-ए-इस्लामी हिंदची रचना

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्य कार्यालय डी-321, दावत नगर, अबुल फजल एन््नलेव्ह, जामिया नगर, नवी दिल्ली. 110025. येथे आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्य करण्यासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. 1. केंद्रीय कार्यालय दिल्ली, 2. राज्यस्तरीय कार्यालय. भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक राजाच्या राजधानीत जमाअतचे राज्यस्तरीय मुख्य कार्यालय आहे. 3. जिल्हास्तरीय कार्यालय. 

आजपर्यंत जमाअते इस्लामी हिंदमध्ये कधीही नेतृत्वासाठी भांडणे झालेली नाहीत. जमाअतचे कार्य शुराई निजाम म्हणजे सल्लागार मंडळाद्वारे चालते. त्यात अत्युच्च पारदर्शकता असते. नैतिकतेला जमाअतच्या कार्यात अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. नियम 11 अनुसार जमाअतचे अध्यक्ष, प्रतिनिधीसभा, सल्लागार मंडळ व सचिव निवडले जातात. नियम 6 प्रमाणे जमाअतचा सदस्य होण्यासाठी भारताच्या कोणत्याही नागरिकाला चार अटींची पूर्तता करावी लागते. अ) कलमा लाईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह ला चांगल्याप्रकारे समजून घेवून या सत्याचा स्विकार करणे की, हीच माझी धर्मश्रद्धा आहे. (संदर्भ : कलम- 3). ब) - जमाअतचा उद्देश्य चांगल्या प्रकारे समजून त्याचा स्विकार करणे की हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. (संदर्भ : कलम -4). क) जमाअतची कार्यपद्धती (संदर्भ : कलम 5) चा स्वीकार करण्याचा निर्णय करणे. ड) - जमाअतच्या नियमावलीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर हा प्रण करने की, या नियमावलीच्या आधीन राहून मी शिस्तबद्ध पद्धतीने काम करीन. वर नमूद शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकास जमाअते इस्लामीचा सदस्य होता येते. त्यसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडे विहित नमून्यात अर्ज करावे लागतो. त्यानंतर त्याला जमाअतच्या उपक्रमांमध्ये सामील करून घेतले जाते. साधारणतः वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच्या कामाचे व जीवन पद्धतीचे बारकाइने निरिक्षण केले जाते व तो जमाअतला पाहिजे असलेल्या नैतिक पातळीच्या स्तरापर्यंत पोहोचत असेल तर त्याला सदस्यता प्रदान केली जाते. सदस्य झाल्यानंतर त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या येतात त्याचा उल्लेख कलम 8 मध्ये केलेला आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होण्यासाठी नैतिकतेचा जो स्तर आवश्यक आहेत त्याचा उल्लेख कलम 9 मध्ये केलेला आहे. 

जमाअत-ए-इस्लामी हिंदची एकंदरित अशी रचना आहे. थोडक्यात इस्लाम एक दीन (व्यवस्था) आहे. हा फक्त इबादतीपुरता सिमित नाही तर मुस्लिमांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनासाठी ही आवश्यक आहे. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होणाऱ्या लोकांनी आधी स्वतःमध्ये शुद्ध इस्लामी आचरणाचा अंगीकार करावा व तद्नंतर इतरांना त्या संबंधीचे मार्गदर्शन करावे अशी जमाअतची भूमिका अगदी सुरूवातीपासूनच राहिलेली आहे. म्हणूनच या जमाअतमध्ये प्रवेश देण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराला शुद्ध इस्लामचे प्रशिक्षण दिले जाते. त्याला वर्ष-दोन वर्षे प्रबोशनवर ठेवले जाते. त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो व तो खरोखरच जमाअतच्या मतलुबा मेआर (अपेक्षित स्तरावर खरा उतरत असेल तरच त्याला प्रवेश दिला जातो. ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या फार कमी असते म्हणून जमाअतच्या सदस्यांची संख्याही कमी आहे.) 2022 च्या आकडेवारीनुसार जमाअते इस्लामीच्या सदस्यांची संख्या 3 हजार 589 एवढी आहे. 

काँग्रेसच्या कारकिर्दीत जमाअतवर तीन वेळेस प्रतिबंध (इतर संस्थांवर बंदी लादताना संतुलन साधण्यासाठी) लादण्यात आले होते. मात्र तिन्ही वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ते प्रतिबंध रद्द केले. आज देशभरात जमाअतचे काम अनेक क्षेत्रामध्ये चालू आहे. जमाअतच्या कार्याची विभागणी 6 विभागामध्ये केलेली असून, त्याचे कार्य जमाअतच्या सदस्यांनी दिलेल्या निधीतून व देशभरातून गोळा केलेल्या जकात आणि देणग्यांच्या माध्यमातून केले जाते. गोळा झालेल्या सगळ्या निधीच्या पाईपाईचा हिशेब ठेवला जातो. नियमितपणे सीए कडून त्याचे ऑडिट केले जाते. जकातचा पैसा सुरे तौबा आयत क्र. 60 मधील दिलेल्या आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे खर्च केला जातो. कुठेही अनावश्यक खर्च केला जात नाही. विशेषतः दंगलग्रस्त भागातील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक शैक्षणिक संस्था जमाअत तर्फे देशभरात चालविल्या जातात. अनेक रूग्णालये चालविली जातात. प्राकृतिक आपदांच्या वेळेस जमाअतचे लोक देशातील इतर संस्था, संघटनांच्या खांद्याला खांदा लावून रिलीफ वर्क करीत असतात. जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशीही धारणा आहे की, देशातील विषमतेमुळे जे लोक आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचे मुख्य कारण व्याज आहे. व्याजामुळे गरीबाची प्रगतीच होवू शकत नाही. हफ्ते फेडण्यामध्येच त्याचे आयुष्य निघून जाते. त्यातूनच आत्महत्या होतात. म्हणून जमाअतने देशभरात बिनव्याजी पतसंस्थांचे जाळे विनलेले आहे. त्यातून हिंदू, मुस्लिमांसह सर्व जाती धर्मातील गरजू लोकांना बिनव्याजी अल्प स्वरूपाचे कर्ज दिले जाते. एकट्या महाराष्ट्रामध्ये 17 पेक्षा जास्त बिनव्याजी पतसंस्थांमधून कोट्यावधींची आर्थिक उलाढाल झालेली आहे. 

- एम. आय. शेख



महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरुच आहे. या पावसामुळे पुरती दाणादाण उडवली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे घरांसह पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीचे तडाखे आणि अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. कश्मीर वा हिमाचलमध्ये हिमवर्षावानंतर जशी बर्फाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसते, तशी अवस्था उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसली.

बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी संकट, तर कधी सांप्रदायिक तणावाला सामोरा जात आहे. गेल्या महिन्यापासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम, उत्तर, दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकणचा काही भाग या सर्व भागांतील अनेक जिल्ह्यांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या अवकाळी पावसाने काही लोकांचे बळी घेतले. मुकी जनावरे दगावली.

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा 14 जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार 40 ते 45 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करीत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या दौऱ्यावर विरोधकांनी टोमणे मारल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनुक्रमे नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा केला. आणि मग मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने 10 एप्रिल रोजी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले आणि तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले.

अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, तूर आदी प्रमुख पिकांसह आंबा, केळी, पपई आणि द्राक्षे अशा प्रकारच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्यासारख्या महत्त्वाच्या पिकावर बुरशीजन्य रोगाची लागण होण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कृषी मालाला चांगले दिवस आले असताना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी  पावसाने अवकळा आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. ज्याची आशा होती, त्याचीच पूर्ण माती झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांत गहू, हरभरा, तूर, ऊस, कांदा अशी पिके घेतली जातात. जळगावात केळी, नाशिक, सांगली जिल्ह्यांत द्राक्षे, कोकणात आंबा, काजू, विदर्भात संत्रे, कापूस, सोयाबीन अशी प्रत्येक भागात अनेक पिके घेतली जातात, परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण नुकसान केले आहे. अर्थात राज्य सरकार आणि नोकरशाहीला त्याचे गांभीर्य नाही. यात काही नवीन नाही. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले, तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सरकारला सांगावे लागले. खरे तर सरकारने अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तातडीने करणे आवश्यक होते. तसेच मंत्र्यांनी बांधावर जाणे गरजेचे होते. सरकारने आश्वासन दिले असले तरी सरकारी मदत पदरात पडेपर्यंत काही खरे नसते हा आजवरचा अनुभव आहे.

एकीकडे नैसर्गिक संकट, तर दुसरीकडे कांदा, सोयाबीन, तुरीला भाव नाही. टोमॅटो, कोथिंबीर व इतर भाजीपाल्याचे भाव अचानक कोसळले. शेतकरी कांदा विकण्यासाठी बाजारपेठेत गेला तेव्हा त्याच्या हातात सर्व खर्च वजा करून केवळ दोन रुपयांचा चेक हातात दिला गेला, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून उलट पैसे वसूल केले गेले. हा कोणता न्याय आहे? नाशिक जिह्यातील शेतकऱ्यांना मेथी आणि कोथिंबीर फुकट  वाटण्याची वेळ आली. प्रत्येक पिकाचा आढावा घेतला तर अत्यंत विदारक चित्र दिसेल. तेव्हा शेतकऱ्याच्या मेहनतीची हीच किंमत? महाराष्ट्रात 2001 पासून नोव्हेंबर 2022 पर्यंत 4 हजार 484 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही सरकारी आकडेवारी असून त्यातील जास्त आत्महत्या केवळ कांदा पिकाशी संबंधित आहेत. सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले, पण या अनुदानाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही.

गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला तर अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. गेली चार वर्षे सतत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जाणे हे शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेलेच आहे. संपूर्ण देशभरात 1 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत जेवढा अवकाळी पाऊस झाला, त्यापैकी 80 टक्के पाऊस एकट्या महाराष्ट्रात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे, त्यातही मराठवाड्यात अवकाळीचे प्रमाण जास्त आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली असून एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानीचा अजून अंदाजच आलेला नाही.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गारपिटीने उच्छाद मांडला. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले. दोन्ही हंगाम हातचे गेले. आता खायचे काय अन् जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मार्चमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे अजूनही अनेक ठिकाणी झालेले नाहीत. त्यात एप्रिलच्या गारपिटीचे अस्मानी संकट ओढवले आहे. गारपिटीचे पंचनामे करणार कधी, मदत मिळणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. मार्च महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठेच नुकसान केले. या संकटातून शेतकरी वर्ग सावरत नाही, तोच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही वादळी पाऊस आणि गारपिटीच्या भयंकर तडाख्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतमालाचे, फळबागांचे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान केले. हजारो रुपये खर्चून घेतलेली पिके, लाखो रुपये खर्च करून कष्टाने फुलवलेल्या बागा डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो आहे. 

लागोपाठ दुसऱ्या महिन्यात कोसळलेल्या अवकाळीच्या संकटामुळे बळीराजाला नैराश्याच्या गर्तेतच ढकलले आहे. त्यांना धीर देण्याचे, आधार देण्याचे व प्रत्यक्ष नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने करायला हवे, नव्हे सरकारचे ते कर्तव्यच आहे. तथापि, राजकीय उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात सरकारचा निम्म्याहून अधिक वेळ जाताना दिसत आहे. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी नियम व फायलींच्या प्रवासात कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात बळावते आहे.

महाराष्ट्र शेती क्षेत्रातील देशातील एक पुढारलेले राज्य आहे, तेव्हा सरकारने शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांनाही दिलासा देणारी व्यवस्था उभारली गेली पाहिजे. तसेच अवकाळी पावसापासून शेतीला कसे वाचवता येईल याचा विचार झाला पाहिजे. विकसित होणारे तंत्रज्ञान त्यासाठी उपयोगात आणले पाहिजे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढून शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. वारंवार होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली तर देशापुढे संकट उभे राहील.


- शाहजहान मगदुम

मुंबई 

8976533404



दरवर्षी रमजानचा महिना हाच संदेश घेऊन येतो की, ’देते व्हा’ देण्यातला आनंद लुटा! होय रमजान महिना हा एकमेकांना देण्याचा, एकमेकांच्या गरजा भागवण्याचा आणि एकमेकांसाठी त्याग  व बलिदान करण्याची शिकवण देणारा महिना आहे. सहरी असो की इफ्तारी मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. सायंकाळी इफ्तारची वेळ होताच, शेजारी-पाजारी, गल्लीत राहणारे लोक एकमेकांकडे इफ्तारी पाठवितात.

एकमेकांना इफ्तारी देण्या घेण्यावरून त्या घरची परिस्थिती कळते. शेजाऱ्यांकडे इफ्तारीची व्यवस्था नसेल तर त्याची आपोआप मदत होते. प्रवाशांसाठी स्थानकांवर, रेल्वेमध्ये, दवाखान्यात असलेल्या आजारांच्या नातेवाईकांसाठी फलाहार व जेवणाची व्यवस्था केली जाते. अशा परिस्थितीत रोजा नसलेले परंतु गरजूवंत असलेले लोक देखील लाभान्वीत होतात. त्यांचीही मदत होते.

रमजान महिन्यात लहान-लहान मुले देखील रोजा धरतात. पाच सहा वर्षांची ही चिमुकली मुलं, एरवी खाण्यापिण्यासाठी हट्ट धरणारी, रोजा ठेवला असता अगदी एकांतवासातही काही खात-पीत नाहीत! त्यांना हा संयम मिळतो कुठून! निश्चितच तो अल्लाह त्यांना हा संयम देतो. रोजामुळे, त्यांना भूक-तहान याची जाणीव होते. त्यांच्यातील हट्टीपणा कमी होतो. त्यांच्या हस्ते शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये इफ्तरी वाटली जाते. यातून तेही ’देते होतात, देण्यातला आनंद लुटतात.’

या महिन्याला ’मवासात’चा महिना म्हटले जाते. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी फर्माविले रमजान हा मवासातचा महिना आहे. ’मवासात’ या शब्दाचा अर्थ होतो गरीब आणि गरजू लोकांविषयी दया, कृपा दाखविणे. त्यांची आर्थिक मदत करणे. मृदू शब्दात बोलणे, नम्रपणाने वागणे, आपल्या अखत्यारीत असलेल्या लोकांना व सेवकांना थोडी मुभा (सवलत) देणे, त्यांना आर्थिक सहाय्य करणे, या सर्व बाबींचा  ’मवासात’ मध्ये समावेश होतो.

वर्षभरात जेवढे दान केले जात असेल, त्यापेक्षाही अनेक पटीने जास्त दान या महिन्यात केले जाते. विशेष म्हणजे हे दान, दान पेटीत  -(उर्वरित आतील पान 7 वर)

टाकले जात नाही तर प्रत्यक्ष गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविले जाते. दान पेटीत टाकण्यात आलेल्या रकमेचा काही विशिष्ट वर्गालाच लाभ भेटत असतो. विशेष म्हणजे  

त्या वर्गाला अशा दानाची आवश्यकतही नसते. ते अगोदरच श्रीमंत असतात. दानपेटीतील दानाचा गोरगरिबांना आणि गरजू लोकांना काहीच लाभ मिळत नाही, परंतु अशा प्रकारे घरपोच देण्यात येणारी मदत ही खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचते.

या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जकात अदा केली जाते. ’जकात’ या अरबी शब्दाचा अर्थ, पाक (पवित्र) करणे/ वाढवणे असा होतो. इस्लामच्या अनिवार्य कर्तव्यांपैकी हे एक कर्तव्य आहे. कुरआन मध्ये नमाज बरोबरच सुमारे 82 ठिकाणी जकातचा उल्लेख आहे. जकात हे अनिवार्य दान आहे तर, सदक़ा हे ऐच्छिक दान आहे. ज्या व्यक्तीजवळ साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी किंवा तेवढी रक्कम किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असेल व त्यावर एक वर्ष उलटला असेल अशा व्यक्तीवर, एकूण रकमेच्या अडीच टक्के रक्कम वर्षातून एकदा दान करणे अनिवार्य आहे.

गरजू, गरीब, कर्जबाजारी, निष्पाप कैदी, प्रवासी, जे लोक जकात वसुलीच्या कामात नेमले आहेत, तसेच असे लोक, जे आपल्या दैनंदिन गरजा सहजरीत्या पूर्ण करू शकत नाहीत इत्यादी लोकांना जकात द्यावी. आई वडील, मुले-मुली व त्यांची संतती यांना जकात देवू नये. त्यांच्यावर मूळ संपत्तीतून खर्च करावे. जकात अनिवार्य झाली असतांनाही जो जकात अदा करत नाही, त्याची नमाज, रोजा, हज सर्व काही व्यर्थ आहे.

जो लोकसमुह जकात अदा करत नाही तो दुष्काळग्रस्त होतो. जकातचा इन्कार करणे, हे इनकार करणाऱ्या व्यक्तीसाठी विनाशकारी आहे. या शिकवणीमुळे कोणी जकात रोखून धरत नाही. स्वतः होऊन आपल्या संपत्तीतून जकात काढली जाते व ती गरजू लोकांना दिली जाते. 

जकातचे नियोजन

इस्लामी शासन पद्धतीत जकात वसुलीसाठी विशेष अधिकारी नियुक्त केले जात. सर्व जकात एकत्र जमा करून गरजू लोकांपर्यंत पोहचवली जाई. ज्या ठिकाणी इस्लामी शासन पद्धती नाही, तेथे बरेचसे लोक व्यक्तिशः गरजूंना आपली जकात देतात तसेच, काही सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थाही जकात जमा करून गरजुंपर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात.

मदरशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोरगरीब लोकांची मुले शिक्षण घेत असतात. तसेच काही अनाथ मुलेही शिक्षणासाठी दाखल झालेली असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदरशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर जकात खर्च केली जाते. विशेष म्हणजे, जकात श्रीमंतांना गरीब करत नाही, गरिबांची गरिबी मात्र दूर करते. गरीब-श्रीमंत ही दरी कमी करण्यास जकात मदत करत असते. सामुहिकरित्या जकात अदा केल्यास त्याचे अधिक लाभ होतात. गरजू व्यक्तीला इतकी जकात मिळावी की, त्याने आत्मनिर्भर होऊन पुढील वर्षी स्वतः जकात अदा करावी. अशी अपेक्षा असते, परंतु जकात विखुरलेल्या स्वरुपात आपापल्या परीने वाटली जात असल्याने तेच ते लोक दर वर्षी जकात मागताना दिसून येतात.

फितरा

फितरा हे एक प्रकारचे दान आहे, जे सधन व्यक्तींकडून, गोरगरीब, गरजू लोकांना दिले जाते. जेणेकरून त्यांनाही ईदच्या आनंदात सामील होता यावे.

रमजान ईदला ईद-उल-फित्र असे म्हटले जाते. अर्थात फितरा देण्याची ईद. हे दान अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू किंवा पैशाच्या रुपातही दिले जाऊ शकते. ईदच्या नमाज पूर्वी फितरा अदा करणे अनिवार्य आहे. ईदच्या दिवशी शेजारीपाजारी, नातेवाईक तसेच मित्र,  यांना आपल्या घरी बोलावले जाते, गोड शीरखुर्मा पाजला जातो आणि त्यांना आपल्या आनंदात सामील केले जाते. यातून प्रेमाची आपुलकीची देवाण-घेवाण होते. एकतेची भावना निर्माण होते. अशाप्रकारे ’ देते व्हा, देण्यातला आनंद लुटा.’ हा संदेश देत रमजानचा महिना येतो. गोर गरीब व गरजू लोकांना आनंद तर धनिकांना भरपूर पुण्य देऊन जातो.


- सय्यद झाकीर अली

परभणी

9028065881 



मुंबई (प्रतिनिधी) 

स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) ने आज मुंबईत जन आक्रोश नाही तर जनसद्भाव मोहिमेला सुरुवात केली.एसआयओ पदाधिकारी आणि आमदार अबू असीम आझमी तसेच शहरातील प्रमुख नेत्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना द्वेषाच्या अजेंड्याला विरोध करण्यावर भर दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यभर ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ या नावाने मोर्चांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या रॅलींनी ’लव्ह जिहाद’ ’लँड जिहाद’, ’जबरदस्तीचे धर्मांतर’ इत्यादी मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. आणि मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या रॅलींमध्ये  द्वेषपूर्ण भाषणे देण्यात आली आहेत. हे वेगळे सांगायची गरज नाही.

या रॅलींमुळे समाजावर होणारा परिणाम कमी करता येणार नाही. अशा प्रकारचे रॅलीमुळे जातीय सलोख्याला तडा जाऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. हे कृत्य संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक बंधुत्वाच्या विरोधात आहेत. तसेच ’लव्ह जिहाद’चा मुद्दा जो उजव्या विचारसरणीच्या गटांकडून सातत्याने उपस्थित केला 

जात आहे. तो मुस्लिमांविरुद्ध द्वेष भडकवण्याकरीता वापरला जातो. सर्वोच्च न्यायालय आणि अनेक उच्च न्यायालयांनी अनेक प्रसंगी निरीक्षण नोंदविले आहे की ’लव्ह जिहाद’ हे काल्पनिक आहे आणि ’लव्ह जिहाद’च्या दाव्यांचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही. मात्र तरीही या गटांकडून त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि समाजात फूट निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.

जन आक्रोश नव्हे जनसद्भाव हा एसआयओचा उपक्रम ही काळाची गरज आहे. मी सर्व विद्यार्थी आणि युवा संघटनांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि सद्भावाच्या या संदेशाचा प्रचार करावा असे आवाहन करतो, असे  कामगार युनियनचे नेते श्री विश्वास उटगी यांनी सांगितले.

अशा फुटीरतावादी आणि द्वेषपूर्ण मोहिमांमुळे दीर्घकाळात देशाचे नुकसान होईल. फुटीरता आणि द्वेषाच्या या मोहिमेला तोंड देण्यासाठी एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्र झोन तर्फे एक विचार मंथन करण्यासाठी जन आक्रोश नव्हे जन सद्भाव नावाच्या या मोहिमेद्वारे विविध समुदायांमधील दरी भरून काढणे आणि विविध समाजात विश्वासाचे आणि सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रेम आणि एकतेच्या या संदेशाला प्रोत्साहन देण्यासाठी एस. आई. ओ विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा, इफ्तार पार्टी आणि इतर उपक्रमांची मालिका आयोजित करीत आहे.

आमची अशी धारणा आहे की, द्वेष आणि फुटीरतेच्या अशा आक्रमणासमोर आपले मौन केवळ अनैतिक नाही तर अपवित्र देखील आहे. या फुटीर मोहिमेद्वारे एका समाजाला आवाहन केले जात आहे. जे किंबहुना सर्व धार्मिक आदर्शांच्या विरोधात आहे. आपल्या समाजात धर्माची खूप रचनात्मक भूमिका असते. सामाजिक एकोपा कोणत्याही देशाचा पाया असतो. तो निर्माण करण्यासाठी आणि सौहार्द वाढविण्यासाठी विधायक संवाद होणे गरजेचे आहे, द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार याला पर्याय असू शकत नाही. असे मत एस.आय.ओ.चे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष एहतेसाम हामी खान यांनी नोंदविले.



गुलामगिरी, जातिभेद, वर्णभेद या सारख्या समाजविघातक प्रवृत्तीचा मुळापासून बीमोड करण्यासाठी, तसेच हरिजन, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता स्त्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले आयुष्याच्या अंतापर्यंत प्रखरपणे निकराने लढले. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर त्यांनी कृतीशील बंड केले. बहुजनांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणाअभावी या देशातील फार मोठा वर्ग आडला, नाडला व शोषला जातो आहे, हे त्यांच्या चाणाक्षबुद्धीने हेरले होते, यावर जालीम उपाय म्हणजे बहुजन समाज शिकून शहाणा झाला पाहिजे, आपले हित अहित त्यालाच स्वतःला समजले पाहिजे, शेटजी आणि भटजी त्याची फसवणूक व पिळवणूक तसेच नाडवणूक करीत होते, त्यामुळे बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अंधारात पुरता बुडला होता. अठरा विश्व दारिद्र्याच्या फेऱ्यात तो गुरफटलेला होता.हे सर्व वास्तव पाहून  शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या अर्थपूर्ण अशा रचनेत मांडले. ती रचना बहुजनांच्या उध्दाराचा आता संपूर्ण जगभरात महामंत्र झाली आहे. ती म्हणजे...

विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेलीं !

नीती विना गती गेली, गतीविना वित्त गेले !

वित्ताविना शूद्र खचले,!!

इतके सारे अनर्थ... एका अविद्येने केले....

ज्योतिराव फुले यांनी पुण्यासारख्या अत्यंत कर्मठ आणि सनातन विचारांचे प्राबल्य असलेल्या शहरात पहीली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले. पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू केलेली ही शाळा भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून ती गणली जाते. बारा वर्षांखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावें अशी आग्रही मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यांनी स्वत:च्या पत्नीला, सावित्रीबाईना सर्वप्रथम शिक्षित केले. आपले मित्र उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख यांनीही सावित्रीबाई फुले यांच्यासोबत अहमदनगर येथील मिशनरी शाळेत शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले होते. फातिमा शेख आणि सावित्रीबाई यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना आपल्या मुलींना शिकवण्याची प्रेरणा दिली. फातिमा शेख यांनी फुले दाम्पत्याकडून होत असलेल्या बहुतांश कामांना पाठिंबा दिला. "जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उध्दारी" या शब्दात स्त्रीवर्गाचा गौरव केला. समाजातील तळागाळातील लोकांच्यामध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी 'गुलामगिरी' हे पुस्तक लिहिले. बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक विकास घडविण्यासाठी जनजागृती केली, शिक्षणाच्या प्रसारासाठी संस्था काढल्या. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ-कनिष्ठ नसून तो आपल्या कर्तृत्वाने लहान-मोठा ठरत असतो, हा विचार त्यांनी सर्वश्रृत केला. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी, या मुख्य उद्देशाने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुले हे लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. लोकशाही ही जीवनप्रणाली व्हावी, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, मालक-मजूर ही मांडणी केवळ लोकशाही प्रणालीच बदलू शकते, यांवर त्यांचा विश्वास होता. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा, समाज परिवर्तन, न्यायाधिष्ठित समाजनिर्मिती या गोष्टी लोकशाहीतच घडू शकतात,यात कोणालाही अमर्याद स्वातंत्र्य नसते, सर्व स्त्री-पुरूष, नागरिक कायद्यापुढे समान असतात, असे ते म्हणत.

शेतकऱ्यांना दिलासा व त्यांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्या मुला-मुलींना सक्तीचे शिक्षण यांवर त्यांनी लिहिलेले 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक आजही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे. शेतमालाला योग्य भाव न दिल्याने शेतकऱ्यांचे कसे आर्थिक शोषण होते, हे त्यांनी सरकारला दाखवून दिले. तसेच शेतकरी सावकाराच्या तावडीतून मुक्त व्हावा यासाठी त्यांनी सावकाराच्या विरोधात आवाज उठवला. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ लागलेल्या होत्या, यासाठी त्यांनी सरकारला 'ॲग्रीकल्चरल रिलीफ ॲक्ट' संमत करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते.

कामगारांच्या अस्मितेला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. मूठभर भांडवलदारांच्या विरोधात संघटीत लढा देण्यासाठी व मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर केले. जोतीराव फुले हे आद्य महात्मा होत. ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत. तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत. भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या नवयुगाचे प्रणेते असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाज शास्त्रज्ञांनी केला आहे, तो सार्थच आहे. 

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)



बागायती शेती वाटते तेव्हढी सोपी नसते. लहान लहान रोपे सावलीत रांगेने ठेऊन त्यांची जोपासना करावी लागते. वर्षभर अशा रोपाना वेळच्या वेळी जलसिंचन करून त्यांची तहान-भूक शमवावी लागते. वर्षाची रोपे एकतर मे महिन्यांत किंवा दिवाळीत त्याची कृषिजन्य शास्त्रयुक्त लागवड करावी लागते. 

सुपारीला फुले आणि फळे वर्षभर येत असतात. वर्षारंभास आलेली फुले कालांतराने फळात रूपांतरित होऊन सुमारे नऊ महिन्यांत फळे काढणीला तयार होतात. पुढे अशा तयार फळांचा विक्रीसाठी उपयोग होण्याआधी बरिच खिटपिट असते. गडद केशरी रंगाच्या फळावरील पातळ आवरण असलेली साल तीन भागात काढून फळं कडक उन्हात वाळवण्यासाठी म्हणून घरामागील खळ्यात पसरवून ठेवली जातात. एक ते तीन वर्षीय रोपांची बागेत लागवड करण्यासाठी म्हणून घरा शेजारील जागेची निवड एवढ्या साठी करायची की त्याच बागेत केळी, नारळ, पेरू, पपई इत्यादी फळझाडांची सावली असते. बागेत पुरेसे दमट आणि थंड वातावरण मिळते.जे सुपारी रोपांना पूरक असते.

प्रथम एक बाय एक बाय दोन फुट खोल असा खड्डा मारणे आवश्यक आहे. त्यांस आतून निर्जंतुकीकरण करून झाले की मग त्या खड्डयात लगतच्या कुंपणास असलेले  ग्लि रीसीडीया नामक खताचे झाडाचा पाला-पाचोळा टाकून त्यावर महिनाभर जुने गोशेणाचा चुरा आछादित करून त्यावर एक थर स्वच्छ वाळलेली माती पसरवून त्यांत सुपारी रोप  उभा करायचा. एक ग्रामीण अनुभव असा की शक्य झाल्यास रोपाची दक्षिण दिशा शक्यतो रोप रिप्लान्ट करतांना बदलू नये. ती जपता अली पाहिले.  या क्रियेस ग्रामीण भागत लिखित असे काही नसेल पण अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की जो रोप आपण नवीन खड्ड्यात लावतो त्या रोपाची जर दक्षिण दिशा जपली तर कालांतराने रोपवाढीस जास्त वेळ लागत नाही. शिवाय रोपवाढ सशक्त होते. प्रत्यक्ष   एक शेतकरी म्हणून मी स्वतः तसा प्रयोग करून पाहिला आहे. शेडमध्ये  पिशवीत ज्या दिशेने रोप वाढतात, तिच दिशा रोप स्थलांतर करताना जपली गेली पाहिजे. हा अलिखित नियम आहे. आग्रह नाही.

कोळथर-पंचनदी गावांत एस. एम. प्रचुरकर यांची पेपर एजन्सी होती. त्यावेळी एस.एम. यांचे वडील शहरातून निवृत्त होऊन गांवी परतले होते. ते घरोघरी पेपर वितरित करायचे. मुळात ते शेतकरी नव्हते पण दिशाशास्त्र अभ्यासाची आवड त्यांना होती. ज्यामध्ये दक्षिण दिशा मार्ग विषयीचा अनुभव त्यांनी वाचला होता जो पुढे त्यांनी माझ्याशी शेर केला. पांच-दहा रोपावर तसा प्रयोग करून पाहिला जो साक्षात खरा ठरला. म्हणूनच आजही मला दिशा शास्त्रा विषयीं आदर आहे.

पंचनदी येथील एक उच्चशिक्षित बागायती शेतकरी होऊन गेले. श्री. दादा मोडक असे त्यांचे नांव.  स्वाभाविक innovative वृत्तीचे होते. शेती विषयीं त्यांचे अनुभव कथन खूप आवडायचे. मुळात ते शिक्षकी पेशातले मुरब्बी अभ्यासक असल्याने त्यांचा विषय समजावून सांगण्याचा होरा तसाच होता.  तत्कालीन राज्य शासनाने सुपारीवर कर आकारणी जाहीर केली  होती. त्यांनी रीतसर पत्रव्यवहार करून त्या खात्याचे जे मंत्री होते त्यांना वस्तुस्थिती कळवली. तोवर कर वसूलीस आलेल्या शासकीय अधिकाऱ्यास सुपारी संघटनेच्या वतीने विनम्र नकार कळविण्यात आला. दादा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. शासनाचा कृषी कर माफ करण्यांत आला.

सुपारीचे झाड खूप उंच असते, त्यावर चढून पिकलेल्या (तयार) सुपारीचा पाडा करणे कठीण जात होते. शिवाय निपुण मजूराची उणीव भासत असे. त्यांना कुणीतरी सांगितले की कर्नाटकात तेथील बागायतदार सुपारी-नारळ पाडा ट्रेंड माकडाकडून करून घेतात. हा प्रयोग कोकणात शक्य होईल का? त्याकरिता ते स्वतः स्वखर्चाने तिकडे जाऊन आले. मात्र त्यात यश मिळू शकले नाही, कारण केव्हातरी सूर्य पश्चिमेकडून उगवेल कदाचित पण सहकार हा शब्द कोकणातील शब्दकोषात नाही सापडू शकत. ही वस्तुस्थिती आहे.

एकेदिवशी दादा मोडक यांनी मला प्रत्यक्ष फोन (लॅन्ड लाईन)  करून त्यांच्या बागेत बोलावून घेतले. मला खात्री होती यावेळीं दादा काहितरी नवीन प्रयोगा विषयीं चर्चा करणार. तसे ते वयोमानानुसार मला पिता समान होते पण "विद्वान मित्र" असं मला म्हणायचे. असो.

त्यांच्या बागेतच वीजेवर चालणारी एक मशीन सुरू होती. पिठाची चक्की जशी असायची तसाच आवाज येत होता. वरच्या मुखातून एक-एक झावळ त्यांत सोडत होते आणि समोरून त्याचा भुगा बनून बाहेर येत होता.जो भुगा बाहेर पडला, तेच खरे कृषिखत! मी चकित झालो. बागेतील उन्हाळ्यात खाली पडणाऱ्या झावळा आम्ही एकतर घराच्या पडवीस शेड बनविण्यासाठी म्हणून उपयोग करायचो किंवा शेतातील भाजावणीत त्यांस पेटवून द्यायचो. तीच झावळ प्रत्यक्ष खताचे काम करते हे दादांनी सिद्ध केले! कोकणात वीज लोडशेडिंगमुळे तो प्रयोग विशेष पूढे नाही जाऊ शकला.

झावळीच्या एक टोकाशी चार-पांच स्तरांचा पुठ्ठ्यागत दिसणार भाग असतो, त्यांस कोकणात विरी असे म्हणतात. कोळथरे गावचे उद्योजक श्री. भाऊ बिवलकर यांनी त्या विरी पासुन पत्रावळी तयार करण्याची मशीन आणली आहे. सौ आणि श्री बिवलकर यशस्वीरीत्या त्या प्रयोगाने समाधानी आहेत. कोविडमुळे त्याची मागणी थांबली होती, त्याला पर्याय काहीच नव्हता. पण आता पुन्हा त्याचा खप वाढणार यात शंका नाही.

पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सुपारीचे संपूर्ण झाड हे उपयोगी पडणारे आहे. अगदी झावळांपासून ते सुपारीच्या टरफलांपर्यंत आणि उभ्या खोडापासून बागेला कुंपण-कवाडी बनविण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग  होतो. नारळ झाडास आपण कल्पवृक्ष असे म्हणतो. अगदी तसेच सुपारीच्या(पोफळ) झावळा विषयींची ही माहिती कृषिक्षेत्रातील मित्रांना कशी वाटली जरूर लिहावे. 

...बु क वा ला

- इकबाल मुकादम

कोळथरे-पंचनदी 

ता. दापोली 

मो.: 9420105985



बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सर्व प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय हक्कांपासून वंचित असलेल्या अस्पृश्य कुटुंबात झाला. असे असूनही त्यांची गणना जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्तींमध्ये होते. त्यांनी अमेरिका, इंग्लंड व जर्मनी येथे उच्च पदव्या मिळवल्या होत्या. इतके सुशिक्षित असूनही बडोद्याचे महाराज यांच्या दरबारात लष्करी सल्लागार असताना त्यांना समाजात प्रचंड अपमान सहन करावा लागला. जेव्हा त्यांची उच्च पदावर नियुक्ती झाली तेव्हा त्यांना इतके अपमानित व्हावे लागले की त्यांना ही नोकरी सोडावी लागली. जातीच्या अपमानाला कंटाळून त्यांनी कधीही नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडमधून कायद्याची डिग्री घेऊन मुंबईत स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू केली.

डॉ. आंबेडकर आपल्या लोकांना जागे होण्यासाठी, संघटित  होण्यासाठी, त्यांच्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी आणि सन्मानाने त्यांचे अधिकार  वापरण्याची प्रेरणा देत होते आणि दलितांना "शिक्षित करा, लढा आणि संघटित व्हा" असा नारा देऊन मुक्तीचा मार्ग दाखवत होते.

डॉ. बाबासाहेबांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीबद्दल मेकॉले यांच्या इंग्रजी शिक्षणावर टीका केली नाही किंवा नवे सिद्धांत मांडण्यातही ते गुंतले नाहीत. शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी  "पीपल्स एज्युकेशन सोसायटी"च्या माध्यमातून मुंबईत महाविद्यालये स्थापन केली, ज्यात कोणताही भेदभाव न करता सर्वांना शिक्षण उपलब्ध करून दिले आणि सर्वसामान्यांच्या समस्यांसमोर सकाळ-संध्याकाळ शिक्षणाची व्यवस्था केली. बाबासाहेबांनी मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक वर्गाप्रमाणे दलित वर्गातील सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी लावून धरली.

डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी लढा तर दिलाच, पण राष्ट्रउभारणीत आणि भारतीय समाजाच्या पुनर्बांधणीतही त्यांनी अनेक प्रकारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी आपल्या देशातील लोकांवर खूप प्रेम केले आणि त्यांच्या मुक्ती आणि समृद्धीसाठी खूप काम केले.

१९३० आणि १९३२ मध्ये भारताच्या भावी राज्यघटनेच्या निर्मितीसंदर्भात इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात त्यांना शोषित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, ज्याला गांधीजींनी खूप विरोध केला होता. आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी इंग्रज सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, "इंग्रज सरकारने आमच्या उद्धारासाठी काहीच केले नाही. याआधी आम्ही अस्पृश्य होतो आणि अजूनही अस्पृश्य आहोत. हे सरकार दलितहिताच्या विरोधात आहे आणि त्यांच्या मुक्ती आणि अपेक्षांबाबत उदासीन आहे. हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे. जनतेचे सरकार स्थापन केले तरच त्यांना फायदा होऊ शकतो. या थोडक्यात उद्गारावरून डॉ. बाबासाहेबांचे देशप्रेम आणि स्वातंत्र्याची इच्छा याचा अंदाज बांधता येतो.

डॉ. बाबासाहेब हे केवळ दलित हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि शिक्षणाला चालना देण्यासाठीच नव्हे, तर राष्ट्र उभारणीत आणि आधुनिकीकरणात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठीही स्मरणात ठेवले जातात.

प्रांतांत विधानसभेची स्थापना करून स्वराज्यव्यवस्था राबवण्याचा निर्णय झाला तेव्हा बाबासाहेबांनी दलितांना राजकीय क्षेत्रात सामावून घेण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्याच्या झेंड्याखाली १९३७ ची पहिली निवडणूक लढवली. कार्यकर्त्यांनी केवळ चांगल्या कामाच्या परिस्थितीवर समाधान मानावे असे नाही, तर त्यांनी राजकारणात सहभागी होऊन राजकीय सत्तेत वाटा मिळवावा, अशी डॉ. बाबासाहेबांची इच्छा होती.

सन १९३२ मध्ये सांप्रदायिक न्यायाधिकरणानुसार दलितांना सरकारी नोकऱ्या आणि विधानसभेत आरक्षणाची सुविधा मिळाली, ज्याला म. गांधींनी आमरण उपोषण करून विरोध केला होता. शेवटी डॉ. बाबासाहेबांना गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी दलितांच्या राजकीय हक्कांचा त्याग करावा लागला आणि स्वत:चे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सोडावा लागला, जो दलितवर्ग आजही भोगत आहे.

सन १९४२ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्ष बरखास्त करून "अनुसूचित जाती महासंघ" या पक्षाची स्थापना केली आणि दलित वर्गाची अखिल भारतीय स्तरावरील परिषद आयोजित केली. महिलांनी स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कांसाठी लढावे अशी त्यांची इच्छा होती. दारूबंदीसाठी महिलांनी संघर्ष करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दारू पिऊन घरी आल्यास पतीला जेवण देऊ नका, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. यावरून बाबासाहेबांच्या स्त्रीमुक्तीविषयीच्या चिंतेचा प्रत्यय येतो.

डॉ. बाबासाहेबांनी दलित तरुणांचा 'समता सैनिक दल' स्थापन केला. १९४२ मध्ये त्यांनी एक मोठी परिषदही घेतली होती. या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना दलित तरुणांमध्ये शिस्त, स्वसंरक्षणाची भावना रुजवायची होती आणि आपल्या नेत्यांचे रक्षण करायचे होते आणि अत्याचारांना विरोध करायचा होता.

स्वतंत्र भारताची राज्यघटना घडवण्यात बाबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे हे सर्वश्रुत आहे. पण तरीही काही लोक त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आज भारतात लोकशाही जिवंत असेल तर ती याच राज्यघटनेमुळे आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. भारतात संसदीय लोकशाही आणि सरकारी समाजवाद प्रस्थापित करण्यात डॉ. बाबासाहेबांचे अनन्यसाधारण योगदान आहे.

अस्पृश्यांच्या तसेच स्त्रियांच्या दुरवस्थेमुळे आणि अधःपतनाने डॉ. बाबासाहेबांना अत्यंत दु:ख झाले. त्यामुळे त्यांना स्त्रियांनाही कायदेशीर अधिकार द्यायचे होते. १९५२ मध्ये ते भारताचे कायदामंत्री झाले तेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि ते संसदेत मंजुरीसाठी सादर केले.

याखेरीज भारतातील औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणाचा पाया रचणे हे डॉ. आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. दुर्दैवाने त्यांचे या क्षेत्रातील योगदान लोकांसमोर उलगडले गेले नाही. कामगारवर्गाच्या कल्याणाशी संबंधित योजना तयार करणे, पूर नियंत्रण, वीजनिर्मिती, कृषी सिंचन आणि जलवाहतूक, ज्यामुळे पुढे भारतात औद्योगीकरण आणि बहुउद्देशीय नदी पाणी योजना निर्माण झाल्या हे या क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान होते.

सन १९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीचे सदस्य झाले तेव्हा त्यांच्याकडे कामगार विभाग होता, ज्यात कामगार, कामगार कायदे, कोळसा खाणी, प्रकाशने आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचा समावेश होता.

कामगारमंत्री या नात्याने त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केले. त्यात प्रमुख भारतीय कामगार संघटना कायदा, औद्योगिक विवाद कायदा, मोबदला, कामाचे तास व मातृत्व लाभ यांचा समावेश होता. इंग्रजांचा विरोध असूनही त्यांनी महिलांना खोल खाणीत काम करण्यास बंदी घातली. कामगारांना राजकीय सत्तेत वाटा मिळावा यासाठी त्यांनी प्रेरित केले. किंबहुना सध्याचे सर्व कामगार कायदे अस्तित्वात आहेत, त्यातील बहुतेक डॉ. बाबासाहेबांनी बनवले आहेत, ज्यांचा भारतातील कामगारवर्ग त्यांचा सदैव ऋणी राहील.

डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना संघटित करून त्यांची कामगार संघटना स्थापन केली. यावरून सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर कामगार संघटनांच्या धर्तीवर त्यांना संघटित करण्यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील होते, हे स्पष्ट होते.

भारतातील दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार इ. समस्यांबाबत बाबासाहेबांना खूप काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांना शेतीला अधिक उन्नत करायचे होते. किंबहुना त्याला उद्योगाचा दर्जा द्यायचा होता. त्यासाठी त्यांना नदी सिंचनाच्या योजना राबवायच्या होत्या. नद्यांवर बंधारे बांधून त्यातून कालवे काढून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यांनी भारतातील पहिली 'दामोदर रिव्हर व्हॅली' आखली. त्याचप्रमाणे भारतातील इतर नद्यांचे पाणी वापरण्याचे नियोजनही त्यांनी केले. डॉ. बाबासाहेबांना शेतीची छोटी-मोठी जमीन काढून ती फायदेशीर करायची होती. त्यांना शेतीतील मजुरांचे रूपांतर अधिक औद्योगिकीकरण आणि उत्पादक मजुरीत करायचे होते.

डॉ. बाबासाहेबांनी नदी वाहतुकीसाठी सेंट्रल वॉटरवेज, इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशनची (सीडब्ल्यूआयएनसी) स्थापनाही केली. सध्याचे मोदी सरकार त्याचेच अनुकरण करीत आहे. बाबासाहेबही नद्या भरल्यामुळे येणारे पूर अधिक खोल करण्यासाठी छोट्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या बाजूने होते. भारतातील बेरोजगारी, दारिद्र्य आणि उपभोग्य वस्तूंचा तुटवडा औद्योगिकीकरणाशिवाय दूर होऊ शकत नाही, असे शेती, बाबासाहेबांचे ठाम मत होते. विजेशिवाय औद्योगिकीकरण शक्य नाही हे डॉ. बाबासाहेबांनी दामोदर खोरे योजना तयार केली व केंद्रीय जलमार्ग, सिंचन व नेव्हिगेशन आयोगाची स्थापना केली. खरे तर डॉ. बाबासाहेबांनी  वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, कृषी सिंचन आणि बहुउद्देशीय नदी योजना तयार करून भारताच्या औद्योगीकरणाचा पाया घातला.

वरील संक्षिप्त वर्णनावरून हे स्पष्ट होते की, बाबासाहेब भारताचे नवे बांधकाम, औद्योगीकरण, कृषी विकास व सिंचन, पूर नियंत्रण, नदी वाहतूक आणि वीजनिर्मिती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नशील होते, त्यातूनच त्यांनी भारताच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला.

- शाहजहान मगदुम

8976533404



रमजान महिना आला की मनात आनंद निर्माण होतो आपण रमजानच्या तयारीला रमजान अगोदरपासूनच लागलेले असतो रमजान म्हटले की एक चित्र समोर येते ते म्हणजे भक्ती  भावाचे जिकडे पहा तिकडे भक्तीने रंगलेला समाज आपल्याला दिसतो या महिन्यात लोक आवर्जून ईश्वराची उपासना करतात नमाज पठण करतात रोज ठेवतात, जकात देतात आणि पुष्कळ काही उपासना करतात.

हा महिना सर्व मानव जातीसाठी आहे परंतु काहीच लोक या महिन्याचा लाभ घेतात दिव्य कुराण अवतरणाचा सोहळा या महिन्यात साजरा होतो दिव्य कुराण हा पृथ्वीवरील अखिल मानव जाती करिता मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. अल्लाहने मानवाला कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता हा पवित्र ग्रंथ अवतरविला आहे. रमजान महिना ही अल्लाहने दिलेली एक परीक्षा आहे व्यक्तीत आपल्या इच्छा वासनांना काबूत ठेवण्याचा बळ निर्माण होतो रमजान महिन्यात दिवसा उपवास करणे हे सर्व निरोगी प्रौढ मुस्लिमांचे अनिवार्य कर्तव्य आहे धार्मिक उपवासातून त्रास निर्माण करण्याचा उद्देश नाही रोजा मुळे जीवनाला योग्य वळण लागतो संयमशीलता, जिभेवर नियंत्रण ठेवणे हे मनुष्य शिकतो.

इस्लामचे पाच स्तंभ आहेत. यामध्ये एक रोजा हा एक स्तंभ आहे. रमजानमध्ये आपण अल्लाच्या  उपासना तर मोठ्या उत्साहात पार पाडतो, परंतु रमजान गेल्यावर आपण ह्या उपासना विसरत जातो. एकेक करून आपण उपासना कमी करत जातो. रमजाननंतर आपल्याला आपले आत्ममूल्यांकन करणे गरजेचे आहे. आपण ह्या रमजान महिन्यात काय मिळवलं? रमजान महिन्याच्या आपल्याला काय फायदा झाला? किंबहुना आपल्याला यापासून काय प्राप्त झाले तर काय? आपण फक्त उपाशीपोटीच राहिलो का? रोजा ठेवण्याचे व उपासना करण्याचे आपल्याला काय फायदे झाले व आपण त्यापासून पुढच्या जीवनासाठी काय बोध घेतला? आपले जीवन आपण आता त्यानुसार कसं चालवणार? यावर आपल्याला आता विचार मंथन करावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला आपले जीवन व्यतीत करावे लागेल.

हा संपूर्ण मानव जातीसाठी एक ट्रेनिंगचा महिना आहे. या सर्व प्रकारची ट्रेनिंग आपल्याला मिळते, त्यानुसार आपण आपले पुढचे ११ महिने व्यतीत करू शकतो व आपले जीवन इस्लामच्या दृष्टिकोनाप्रमाणे जगू शकतो. आपण आपल्या आत्म मूल्यांकनामध्ये हे बघावे की आपल्या मनाची स्वच्छता झाली का मनात राग, क्रोध, छल, कपट राहिला नाही ना? कारण ह्यापासून आपल्याला दूर राहावयाचे आहे. आपल्यात सत्कर्म आले का, कारण ईश्वराला सत्कर्म फार प्रिय आहे. क्षमा करण्याची शक्ती आपल्यात आली पाहिजे कारण रोजा सब्र शिकवितो. प्रत्येकाचे हक्क आपण बरोबर दिले की नाही याची जाच ही करायला हवी, कारण याची विचारणा अल्लाहकडे आहे आणि त्यामुळे ऐहीक आणि पारलौकिकरित्या माणूस यशस्वी होतो.

रमजानचा खरा उद्देश माणसात तकवा म्हणजे ईशभय निर्माण होणे हे आहे. तर हे आपल्याला निर्माण झाले की नाही याची पण पडताळणी आपल्याला करावी लागेल. आपण कुराण तर वाचले पण ते आपल्याला कळले का? आपण त्यात भाषांतराद्वारे समजण्याचा प्रयत्न केला का? कारण ईश्वराप्रमाणे आपल्याला त्याच्यावरही प्रेम करायचे आहे. तो ईश्वराने आपल्या फायद्यासाठी पाठविलेल्या ग्रंथ आहे. या महिन्यात सर्वाधिक महत्त्व जेवढे उपासनेला आहे तेवढेच दान देण्याला आहे. त्यामुळे हा महिना दानत्व प्रदान करणारा आहे. तरीही दान देण्याची सवय आपल्याला पुढेही चालू ठेवायची आहे न की रमजानपुरतीच. लोक रमजानमध्ये सत्तर पटीने जास्त पुण्य प्राप्त होते. म्हणून फक्त रमजानमध्येच दान करतात, परंतु आपल्याला ही सवय आयुष्यभर सोडायचे नाही. आपल्या प्रेषितांजवळ (सल्ल.) खायला नसायचे पण ते नेहमी दानपुण्य  करायचे. त्यांच्या पत्नीपण  त्यांच्याजवळ आले ते लवकरात लवकर दान करीत असे. आपल्याला रमजानद्वारे सर्वात प्रथम आपली आत्मशुद्धी करावयाची आहे आणि ईश्वराने दाखविलेल्याच मार्गावर आपल्याला चालावयाचे आहे. या समाजाला एक उत्कृष्ट व्यक्तित्व घडवून दाखविण्याचा प्रयत्न करायचा आहे.

- परवीन खान

पुसद



एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील इतिहासाच्या सेन्सॉरशिपचा वाद तीन दशकांपूर्वी पहिल्यांदा निर्माण झाला होता. वातावरणात वादविवादाचा आणि मतभेदाचा वास येत होता. दुर्दैवाने जेव्हा पुन्हा वाद निर्माण होतात, तेव्हा त्यांना वैशिष्ट्यहीनतेचा स्पर्श होतो. एनसीईआरटीच्या संचालकांनी आपल्या निर्णयाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे 'तर्कसंगतीकरण'. हे एका नव्या वादाचे उद्घाटन नसून मोपिंग-अप ऑपरेशन असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ असा की मूलभूत काम झाले आहे आणि थोडी छाटणी आवश्यक आहे. आधीच २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाणारे भाजप सरकार आपले भवितव्य लाजिरवाणे होऊ नये याची काळजी घेत आहे. राजकीय स्मरणशक्तीची पुनर्रचना करत आहे. हे स्पष्ट आहे की टिकून राहण्यासाठी बहुसंख्याकवादी आठवणींना इतिहासाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. आता इतिहासाच्या अधिकृत जगाला आव्हान देणारा कोणीही सरकारविरोधी आणि देशद्रोही ठरत आहे. शासनासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांवरील सेन्सॉरशिप हा भविष्याचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न आहे. संस्कृतीच्या पातळीवर काहीतरी खोलवर घडत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आम्ही केवळ इतिहासाच्या सुधारणेला सत्तासंघर्षाचे लक्षण म्हणून संबोधत नाही. कॅनव्हास मोठा आहे: आपण स्मृतीद्वारे प्रशासनाच्या नियंत्रणाकडे जात आहोत. शक्तिशाली पर्यायी चौकट म्हणून मौखिकता आणि लोकसाहित्याचे महत्त्व शासनाला कळते. स्मृती म्हणून मौखिकता आणि लोककथांना नियम आणि कर्मकांडांचे जग आवश्यक आहे. मौखिकता नेहमी कल्पक असते आणि ऐतिहासिक पुनर्लेखनापेक्षा स्मृतीचा कारभार अधिक व्यापक असावा लागतो, याची जाणीव भाजपला झाली आहे. ही व्यवस्था आता माहितीच्या नियंत्रणात मेमरीच्या देखरेखीची भर घालते. निरर्थकतेत जे जाणवते ते म्हणजे विरोधक आणि अभ्यासकांचे मौन. कर्मकांडातील नकारात्मकतेत उत्स्फूर्त असे फारसे काही नसते. एकेकाळी या घडामोडींना सतावणारे वादविवाद आणि विचार यांची प्रगल्भता आता अस्तित्वात नाही. मुघल संस्कृतीच्या जिवंतपणाबद्दल बोलण्यासाठी आपण जास्तीत जास्त काही परदेशी विद्वानांना बोलावतो. दुरुस्ती हे आता नव्या नागरी संस्कृतीचे निकष आहेत. भाजप किती युगात गुंतलेला आहे, याची यादी पाहिली तर हे प्रकर्षाने जाणवते. पहिली गोष्ट म्हणजे भाजपला गांधीहत्येचा कलंक काढून टाकावा लागेल. त्याचबरोबर गुजरात दंगलीचे पुनर्लेखन करून ते नरसंहाराचा निर्देशांक म्हणून पुसून टाकावे लागेल. मुघल सहिष्णुतेची किंवा समन्वयाची भावना पुसून टाकावी लागेल. प्रत्येक कृतीला जोडलेले असताना विचार करण्याची आणि नियंत्रणाची वेगळी शैली आवश्यक असते. १९८४ ची दिल्ली दंगल आणि २००२ ची गुजरात दंगल ही एका वेगळ्या प्रकारची हिंसा होती. पण या दोन्ही दंगलींकडे आता अधूनमधून आणि यादृच्छिक म्हणून न बघता लोकांचा संहार करण्याचे पद्धतशीर कृत्य म्हणून पाहिले जात होते. नरसंहार या कृत्याच्या रचनेत विणला गेला आणि बलात्कार उघडपणे पद्धतशीर होता. गुन्हेगार स्वत:ला इतिहासात सामावून घेत आपण पीडित असल्याचे भासवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बलात्कारही न्यायाची पुनर्स्थापना ठरतो. उदाहरणार्थ, बलात्कार म्हणजे पद्मिनीचा सन्मान परत मिळवण्याचा प्रयत्न आहे, असे अनेक बलात्कारींना वाटत होते. क्रूर बलात्काराची घटना गंभीर बनते. बहुसंख्याकवादी हिंसेची शक्ती आणि बहुसंख्याकवादी सरकारांची निर्दयी कार्यक्षमता यांच्यातील दुवा निवडणुकांमुळे सिद्ध होतो. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून गुजरात दंगलीचा विदारक इतिहास गायब झाला आहे. अल्पसंख्य-मुस्लिम असहायपणे पाहत असताना स्मरणशक्ती नष्ट करणे हे एक स्वधर्मी कार्य बनते. सम्राट अकबरसारख्या मुघलांना सहिष्णुता किंवा समन्वयाची भावना नाकारली जाते. त्यांना केवळ बाहेरचे म्हणून ब्रँडिंग केले जाते. अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या असंतोषाला बहुसंख्याकांच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांना हुकूमशाही करायची आहे. माध्यमे आणि सेन्सॉरशिपची ताकद असूनही एक संस्कृती म्हणून भारत खूप कल्पक आहे. गुजरात दंगलीची अफवा दडवून ठेवणे कधीच पूर्णपणे शक्य होणार नाही. या घटना आठवणीसाठी खूप मोहक आहेत. पाठ्यपुस्तक हॅक करण्यापलीकडे शासन फारसे काही करू शकत नाही. उत्तर-सत्य जितके घातक आहे, तितकेच आपले मिथक, लोककथा आणि गॉसिप हे जग आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एक पद्धत आणि अधिकृत विचारसरणी म्हणून इतिहासाने त्यांच्याकडून धडा घेऊन आख्यानांच्या बहुविधतेकडे वाटचाल करण्याची गरज आहे. लोकशाही तेव्हा लोकशाही राहते जेव्हा ती सतत बहुलतावादी आत्म्याचे पुनरुज्जीवन करते. याचीच नोंद इतिहासाने करणे गरजेचे आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.: ८९७६५३३४०४


जातीय दंगली आणि मुस्लिमांची भूमिका


आजही बहुसंख्य हिंदू समाज सहिष्णू व राष्ट्रवादी समाज आहे. सांप्रदायिकतेतून होत असलेली देशाची हानी तो फारकाळ सहन करणार नाही. संविधान हेच भारताला एकत्र ठेवण्याचे एकमात्र डाक्युमेंट आहे हे लवकरच सर्वांच्या लक्षात येईल आणि हा उन्मादाचा अंधार सुद्धा इन शा अल्लाह लवकरच संपेल आणि एकात्मतेचा सूर्य लवकरच उगवेल यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.

’’आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.’’(सुरे इब्राहीम 14: आयत नं. 42)

980 च्या दशकात महाराष्ट्रात शिवजयंतीच्या दिवशी ठरवून मुस्लिमांविरूद्ध हिंसा केली जात होती. परंतु मराठा सेवा संघाद्वारे प्रबोधन केल्यामुळे व शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या स्थापनेमध्ये महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांची कर्तबगारी समोर आणल्यामुळे ती हिंसा बंद झाली.

अलिकडे काही वर्षांपासून उत्तर भारतात राम नवमीच्या दिवशी त्याचप्रकारे ठरवून हिंसा करण्याचा एक नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. त्याच पॅटर्नच्या अंतर्गत गेल्या आठवड्यात 30 मार्च गुरूवारी रामनवमीच्या दिवशी उत्तर आणि मध्य भारतात तब्बल 24 ठिकाणी हिंसा करण्यात आली. ज्यात मुस्लिमांच्या मस्जीद, मदरसे, घरे आणि दुकानांवर हल्ला करण्यात आला, जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे ही जाळपोळ भाजपाशासित राज्यांपेक्षा जास्त त्या राज्यांमध्ये करण्यात आली ज्या राज्यात भाजपाचे शासन नाही. त्यात विशेषकरून पश्चिम बंगाल आणि बिहारचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

बिहारमधील हिंसा तर अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल ज्यात शेकडो वर्षांपूर्वीचा अजीजीया मदरसा जो की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृहजिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये आहे जाळून टाकण्यात आला. हा मदरसा ऐतिहासिक मदरसा आहे. शोभायात्रेच्या नावाखाली तलवारी आणि पेट्रोल घेऊन तथाकथित रामभक्तांनी मदरशाला वेढा घातला आणि त्याला उभा आडवा जाळून टाकला. या मदरशाबरोबर शंभर वर्षापूर्वीची दुर्मिळ अशी पुस्तके विशेषकरून युनानी वैद्यकीय मेडिसीनची पुस्तके, शेकडो कुरआनच्या प्रती पूर्णपणे जळून भस्म झाल्या. मदरशामध्ये जुने शिसम आणि सागवानचे ऐतिहासिक फर्निचरसुद्धा जळून राख झाले. मदरशाचे प्राचार्य मौलाना कासीम यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितले की, 4 हजार 500 पेक्षा दुर्मिळ पुस्तके जळून राख झाली. हा मदरसा अतिशय सुसज्ज असा मदरसा होता. याचा स्वतःचा असा सोनेरी इतिहास होता. याची स्वतःची संपत्ती आहे. म्हणून हा मदरसा कुठल्याही लोकांच्या चंद्यावर चालत नाही. या मदरशाला बीबी सुगरा वक्फ स्टेट द्वारे संचलित केले जाते. एक दानशूर महिला बीबी सुगरा यांनी आपले पती अब्दुल अजीज यांच्या स्मरणार्थ हा मदरसा सुरू केला होता. 1896 मध्ये बीबी सुगरांनी आपली सर्व संपत्ती ज्याचे त्यावेळेस वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार होते. त्यांनी मदरशाला दान केली. आजही  बीबी सुगरा वक्फ स्टेट नालंदा द्वारे हा मदरसा संचलित केला जातो. 

महाराष्ट्रातसुद्धा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) च्या किराडपुरा भागामध्ये रामनवमीनिमित्त राममंदिरासमोर ठरवून हिंसा करण्यात आली. यात एक व्यक्ती ठार तर अनेक वाहनांची आणि इतर संपत्तीची जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे या वेळेस बिहारमधील रामनवमीच्या हिंसेचा वनवा पहिल्यांदा नेपाळमध्ये सुद्धा पोहोचला आणि त्या ठिकाणी अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना हानी पोहोचविण्यात आली. 

सर्वच ठिकाणच्या दंगलीचा आढावा या लेखामध्ये घेता येणे शक्य नाही. वाचकांना इतर ठिकाणचा तपशील बातम्यांमधून कळालेलाच आहे. आता आपण हे दंगे का घडविले जातात याबद्दल उहापोह करूया.

हिंसा का घडविली जाते?

भारतात मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या हिंसेचा इतिहास जूना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशी हिंसा होत आलेली आहे. परंतु फाळणीनंतर दंगलींची तिव्रता अधिक वाढली आहे. दंगल झाली म्हणजे मुस्लिमांची हानी झाली ही ठरलेली बाब आहे. याचे प्रमुख कारण एकच आहे ते म्हणजे हिंदू-मुस्लिमांमधील वैरभाव. 

सनातन हिंदूधर्म अनेकवेळेस विभाजित झालेला आहे. त्यातून जैन आणि लिंगायत धर्मासारखे धर्म उदयास आलेले आहेत. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्विकार केल्याची ऐतिहासिक घटना फार जुनी नाही. शिखही हिंदू धर्मातून वेगळे होऊन एक नवीन धर्म घेऊन पुढे आलेले आहेत. या सर्वांप्रमाणेच बहुसंख्य बहुजनहिंदूही हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाममध्ये सामील झालेले आहेत. ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नाही. शेकडो वर्षांचा यामागे इतिहास आहे. बरे ! हे सर्व घटक जे हिंदू धर्मापासून वेगळे झाले आहेत त्या साठी  सनातन धर्मियांची वर्णव्यवस्थाच कारणीभूत आहे. वर्णव्यवस्थेएवढी माणसामाणसामध्ये भेद करणारी दूसरी व्यवस्था जगाच्या पाठीवर दिसून येत नाही. उच्च वर्णीयांना केवळ जन्माच्या आधारे अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक लाभ मिळतात. तर निम्न वर्णियांसाठी प्रयत्न करूनही हे लाभ मिळू शकत नाहीत, अशी भूतकाळात स्थिती होती. त्यांना मंदिरात जावू दिले जात नव्हते. म्हणून ते मस्जिदीमध्ये गेले. पुरोहित त्यांना स्पर्श करत नव्हते म्हणून ते मुस्लिम सुफी संतांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या सर्वाचे स्वागत केले. स्वतःच्या दस्तरखानवर सोबत घेऊन जेवण केले. खांद्याला खांदा लावून नमाज अदा करण्याची संधी दिली. त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार केला. त्यामुळे साहजिकच क्षुद्र आणि बहुजन या सुफी संतांच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममय झाले. यात दोष त्यांचा नाही तर सनातन पुरोहितांचा आहे. ही गोष्ट आज 21 व्या शतकात संघाच्या लक्षात आलेली आहे व सरसंघचालक यांनी यासाठी ’पंडित’ जबाबदार असल्याची नुकतीच खंत व्यक्त केलेली आहे. व्यापक हिंदुत्त्वाच्या नावाखाली जरी बहुजणांनी एका झेंड्याखाली संघाने आणण्यामध्ये यश मिळविले असले तरी ग्राऊंड रिअ‍ॅलिटी पूर्वीसारखीच आहे. आजही खेड्यापाड्यात मागासवर्गीयांशी भेदभाव केला जातो. याची तीव्रता भूतकाळातील भेदभावाएवढी तीव्र जरी नसली तरी काही प्रमाणात का असेना ती आजही अस्तित्वात आहे. आजही यांच्यामध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाही. सुशिक्षित हिंदू तरूणींनी दलित तरूणाशी विवाह केलाच तर त्याचे काय परिणाम होतात हे पहायचे असेल तर नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट वाचकांनी आवर्जुन पहावा. 

सनातन धर्मावलंबियांच्या मानसिकतेमध्ये आजही तीळमात्र फरक पडलेला नाही. याचा पुरावा रामनवमीची हिंसा आहे. दोष स्वतःचा असतांना हे लोक धर्म सोडून मुसलमान का झाले? हा राग त्यांना स्वस्थ बसू देत नाही. परिणामी, त्यांचा तो राग दंगलींच्या मार्गाने अधूनमधून व्यक्त होत असतो. पण हा त्यांचा राग केवळ मुसलमानांची हानी करणारा नाही तर राष्ट्राची हानी करणारा आहे. एवढी साधी बाबही त्वेषाची बाधा झालेल्या त्यांच्या या तरूणांच्या लक्षात येत नाही. 

गेल्या 75 वर्षांमध्ये झालेल्या एकूण जातीय दंगलींमध्ये झालेल्या एकूण राष्ट्रीय संपत्तीची हानी किती झाली याचा अंदाज जरी केला तरी शालेय स्तराच्या बुद्धिमत्ता असणार्या व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येईल की, महासत्ता होण्याची पात्रता असतांनासुद्धा आपला देश महासत्ता का होऊ शकला नाही? जोपर्यंत जातीय दंगली बंद होणार नाहीत, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांवर अत्याचार बंद होणार नाहीत आणि त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कामामध्ये योग्य भूमिका दिली जाणार नाही, स्पष्ट आहे तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पण हे सनातनी सवर्ण वर्गाच्या लक्षात येईल तो सू दिन. 

जातीय दंगली आणि मुस्लिमांची भूमिका 

मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि गरीब लोकांचा भरणा आहे. हे लोक दैववादी आहेत. त्यांच्यात जातीयदंगली का होत आहेत? याची चिकित्सा करण्याइतपत क्षमता नाही. दुर्दैवाने ज्या उलेमांचा हा समाज ऐकतो त्यांनीही कधी अशी चिकित्सा करण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. इतर मुस्लिम बुद्धीजीवींचे म्हणणे हा वर्ग ऐकत नाही. परंतु समाज माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे अलिकडे परिस्थितीमध्ये बदल घडत आहे. अनेक मुस्लिम तरूण आणि बुद्धीजीवी यांच्यात जातीय दंगली, युएपीएचा दुरूपयोग आणि मुस्लिमांविषयी सर्वपक्षीय राजकारण्यांची दुटप्पी भूमिका इत्यादींबद्दल समज निर्माण होत आहे आणि ते व्यक्तही होत आहेत. 

हिंसेवर उपाय

याबद्दल माझे मत दोन मुद्यांवर आधारीत आहे. पहिला मुद्दा असा की मुस्लिमांनी ज्यू समाजाचा अभ्यास करावा. ज्या ज्यू समाजाने प्रेषित येशू ख्रिस्त (अलै.) यांना सुळावर चढविले. त्यांच्याबद्दल बहुसंख्य ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र घृणा असायला पाहिजे हवी होती. सुरूवातीच्या काळात ती होतीही. परंतु ज्यू समाजाने आपल्या बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर ख्रिश्चनांच्या घृणेवर विजय मिळविला आणि आज ज्यू समाज युरोप आणि अमेरिकेमध्ये एवढा शक्तीशाली झालेला आहे की, जो बायडन यांच्या वक्तव्याला सपशेल उडवून लावण्याचे धाडस बेंजामिन नेतनयाहू यांनी मागच्याच आठवड्यात केले आहे. हिटलरच्या अभूतपूर्व अशा छळानंतर ज्युंनी स्वतःला कसे सावरले? 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोबल पारितोषिके कशी पटकावली? नवनवीन हत्यारांची निर्मिती कशी केली? नवनवीन वैज्ञानिक शोध कसे लावले? आणि या सर्वांचा उपयोग सर्वांसाठी कसा खुला केला? त्यांच्या कडे सिनेमा उद्योग का नाही? याचा अभ्यास मुस्लिमांनी करावा व आपल्याला ज्यूंनी जसे स्वतःला ख्रिश्चनांसाठी उपयुक्त समूह म्हणून सिद्ध केले तसेच मुस्लिमांना हिंदूंसाठी ते उपयुक्त समूह आहेत हे सिद्ध करावे लागेल. 

दूसरा मुद्दा असा की, मुस्लिम समाज हा एक मिशनरी समाज आहे. याचाच विसर या समाजाला पडलेला आहे. या समाजाला जोपर्यंत कुरआनने त्यांना दिलेल्या उद्देशाची जाणीव होणार नाही व ते स्वतःला वैचारिक व शैक्षणिकरित्या प्रत्यक्ष कृतीसाठी व्यवहारिकरित्या तयार करणार नाहीत तोपर्यंत हा समाज न स्वतःच्या उपयोगाचा आहे ना देशाच्या. 

कारणे काहीही असोत मुस्लिमांची ही स्थिती यासाठी झालेली आहे की, मुस्लिमांनी कुरआनच्या शिकवणी पासून स्वतःला विलग करून घेतलेले आहे. जोपर्यंत हा समाज स्वतःला कुरआनच्या मार्गदर्शनाशी पूर्णपणे जोडून घेणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध होणारी हिंसा, त्यातून होणारी हानी का होत आहे व तीला कसे सामोरे जावे हे त्यांच्या लक्षात येणार नाही. घृणेचे रूपांतर प्रेमामध्ये, शत्रुत्वाचे रूपांतर मित्रत्वामध्ये करण्याची कला त्यांना कुरआनी मार्गदर्शन आत्मसात केल्याशिवाय अवगत होणार नाही. कुरआनमधून केवळ एका आयातीचा दाखला देतो. 

’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. ’’ (सूरे हाम मीम सज़दा क्र. 41: आयत क्र. 34)

आपल्याविरूद्ध होत असलेल्या हिंसेमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु शांत डोक्याने मुस्लिमांनी या सर्व परिस्थितीचे विश्लेषण प्रेषितांच्या जीवनाच्या परिस्थितीशी जोडून करावे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना अशाच घृणेचा सामना मक्का शहरातील मूर्तीपूजकांकडून करावा लागला होता. त्यांच्या सोबत्यांची आज होत आहे तशीच मॉबलिंचिंग झाली होती. आज जसे मुस्लिमांवर अत्याचार होत आहे तसेच अत्याचार मक्का शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होत होते. त्या परिस्थितीवर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कशी मात केली याचा अभ्यास मुस्लिमांनी करावा आणि कुरआनच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आपली भविष्यातील योजना करावी. सुलह हुदैबियामध्ये ज्याप्रकारे एकतर्फी संयम राखण्यात आला होता अगदी तसाच संयम राखून या देशाच्या निर्मितीमध्ये स्वतःला झोकून द्यावे. 

लक्षात ठेवा मित्रानों! आजही बहुसंख्य हिंदू समाज सहिष्णू व राष्ट्रवादी समाज आहे. सांप्रदायिकतेतून होत असलेली देशाची हानी तो फारकाळ सहन करणार नाही. संविधान हेच भारताला एकत्र ठेवण्याचे एकमात्र डाक्युमेंट आहे हे लवकरच सर्वांच्या लक्षात येईल आणि हा उन्मादाचा अंधार सुद्धा इन शा अल्लाह लवकरच संपेल आणि एकात्मतेचा सूर्य लवकरच उगवेल यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. 

शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, हे अल्लाह माझ्या या प्रिय देशबांधवांपैकी जे घृणेच्या मार्गावर चालून राष्ट्रीय संपत्तीची हानी करीत आहेत त्यांना चांगली समज आणि शक्ती प्रदान कर. आमीन.

- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget