Halloween Costume ideas 2015

पवित्र कुरआन : काही ठळक वैशिष्ट्ये


कयामतचा दिवस म्हणजे बऱ्या-वाईट कर्मांचे प्रतिफळ मिळण्याचा दिवस होय. ज्या लोकांनी अविश्वासामुळे त्या दिवसाला नाकारले आणि चुकीची कामे केलीत, त्यांच्या अपेक्षेविरुद्ध जेव्हा तो दिवस येईल तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. जगात जे काही अन्याय व अत्याचार केलेत, हक्क व कर्तव्यांकडे दुर्लक्ष केलेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे त्यांना कळून चुकेल, किंबहुना ते प्रकर्षाने जाणवू लागेल. त्या दिवशी तोंडे बंद होतील आणि माना झुकलेल्या असतील. खेद व पश्चातापाने मन कितीही तडफडत असले तरी तेव्हा ते काहीही उपयोगाचे नाही. ज्या लोकांनी क्षणभंगुर जीवनासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, अनुमान व शंकेच्या आधारावर आपल्या हितचिंतकाचे म्हणणे मान्य केले नाही, ते दिवाळखोर झाल्यानंतर स्वतःशिवाय कुणाला दोष देणार? कयामतच्या दिवशी माणसाची ही दुर्दशा का होईल? आणि विविध प्रकारच्या शिक्षा का भोगाव्या लागतील? कारण अविश्वास, मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष, त्यामुळे निर्माण होणारी पाषाणहृदयता व मनाला जडणारे विविध रोग इत्यादींमुळे त्यांचे जीवन भरकटलेले होते. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा आणि कयामतच्या दिवशी मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवताना कुरआनने म्हटले आहे,

‘‘याअय्युहन्नासु क-द जा-अत्कुम्-मव्-इजतुम्-मिर्-रब्बिकुम व शिफा-उल्-लिमा फिस्-सुदूरि व हुदंव्-व रह्-मतुल्-लिल्मुअ्-मिनीन’’

अनुवाद :- लोकहो! तुमच्या निर्मात्याकडून तुमच्याकडे उपदेश, मनातील रोगांवर उपाय आणि श्रध्दा ठेवणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि कृपा आली आहे.( 10 यूनुस : 57 )

या आयतीमध्ये कुरआनसाठी ’मव्-इजतुन’  हा शब्द वापरला गेला आहे, ज्याचा अर्थ सामान्यतः उपदेश असा होतो; म्हणजे ज्या गोष्टी मानवासाठी धोकादायक आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या टाळणे गरजेचे आहे, त्यांपासून हा ग्रंथ सतर्क करतो. तसेच ज्या गोष्टी चांगल्या आहेत पण सामान्यतः मन त्यांकडे वळत नाही अशा गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करतो आणि मनाला आकर्षित करतो. दुस-या शब्दांत सांगायचे तर माणसामध्ये दुराचाराची जाणीव जागृत करतो आणि सदाचार प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहन देतो. पवित्र कुरआन असा उपदेश आहे ज्यामुळे माणसात नम्रता येऊन तो आपल्या निर्मात्यासमोर नतमस्तक होतो. वाईट गोष्टींपासून असलेली निष्काळजी दूर होते आणि मनात मरणोत्तर जीवनाची चिंता निर्माण होते. कुरआनचे शब्द इतके प्रभावी व आपुलकीने भरलेले आहेत की त्याचा माणसावर नक्कीच परिणाम होतो. पवित्र कुरआन वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यातील प्रत्येक वाक्य कल्याण आणि भलाईचा स्त्रोत असल्याचे दिसून येते. याची शैली इतकी आकर्षक आहे की जिथे सदाचरणावर काही वचन दिले गेले तिथे दुराचारावर चेतावणीही आहे. बक्षीसांबरोबर शिक्षेचाही उल्लेख आहे. सांसारिक आणि मरणोत्तर जीवनातील यशासोबतच अपयश आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टींकडे संकेतही आहेत. याच शैलीमुळे अरबांसारखे पाषाणहृदयी लोक या उपदेशासमोर नम्र बनले आणि अज्ञानात पडलेली राष्ट्रे जागृतीचे संदेशवाहक म्हणून उदयास आली.

या आयतीमध्ये पवित्र कुरआनचे दुसरे वैशिष्ट्य सांगताना म्हटले गेले आहे की हा ग्रंथ मनातील रोगांवर उपाय आहे. सर्वसाधारणपणे मानवी आचरण हे भावनेच्या अधीन असते आणि भावनांचा स्रोत हृदय म्हणजे मन आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या भावना उत्पन्न होत असतात आणि त्यांच्या प्रभावातून बऱ्या वाईट कृती घडून येतात. या मनामुळेच माणूस चांगला किंवा वाईट बनतो, म्हणून पवित्र कुरआन थेट माणसाच्या मनावर उपचार करून तिथे निर्माण होणारे रोग बरे करतो. मनात अनेक दुष्ट भावना निर्माण होत असतात, जसे अहंकार, मत्सर, द्वेष, वासना, किर्ती व प्रसिद्धीचा लोभ, सत्तेची हाव, सांसारिक गोष्टींचे अत्याधिक प्रेम इत्यादी हे सर्व ’हृदय रोग’ आहेत. वैद्यकीय भाषेत ज्याला हृदय रोग म्हणतात त्यासंबंधी माणूस काळजी घेतो पण उल्लेखित रोगांकडे दुर्लक्ष करतो. पवित्र कुरआन या सर्व रोगांवर इलाज आहे. ज्या लोकांनी स्वतःला पवित्र कुरआनशी जोडले ते रोगमुक्त झाले, याचा सर्वात मोठा पुरावा इस्लामच्या प्रारंभिक कालखंडात पाहायला मिळतो. ज्यामध्ये मनातील हे सर्व रोग अत्यल्प प्रमाणात होते.

कुरआनचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे तो मानवजातीसाठी एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. ज्याने माणसाला वैयक्तिक आणि सामूहिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम मार्गदर्शन केले. ज्याने मानवजातीसमोर सर्वप्रथम शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले, ज्याद्वारे मानवजातीला समाजसुधारणा व सुव्यवस्थेची तत्त्वे मिळाली, ज्याने आर्थिक उन्नतीसाठी अर्थव्यवस्था उपलब्ध करून दिली, यामध्ये शासन पध्दत व राजकारण सुधारण्यासाठी सूचना आहेत, ईश्वराच्या आज्ञेनुसार चालणाऱ्या समाजासाठी संविधान व कायदे आहेत, अल्लाह आणि भक्त यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी श्रद्धा, विश्वास आणि उपासनेची व्यवस्था आहे व उच्च नैतिक मूल्ये आहेत. थोडक्यात हा ग्रंथ एका व्यक्तीपासून ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उद्भवू शकणाऱ्या सर्व समस्या व गरजांसाठी संपूर्णपणे मार्गदर्शन आहे.

पवित्र कुरआनचा चौथा गुण दया-कृपा आहे. जगात पवित्र कुरआनचे अस्तित्व, त्यातील प्रत्येक आयत, आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) व त्यांचे प्रेषितत्व, ईश्वराच्या आज्ञाधारक भक्तांचे अस्तित्व या मोठ्या कृपा आहेत. विशेषत: पवित्र कुरआन आणि त्यानुसार आचरण असलेले आदरणीय पैगंबर (स) यांचे पवित्र जीवन हे अल्लाहने मानवजातीला बहाल केलेल्या महाकृपा आहेत. पवित्र कुरआनच्या पठणापासून ते त्याची संपूर्णपणे अंमलबजावणी होईपर्यंत मधल्या काळात अनेक टप्पे आहेत, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर अल्लाहची दया-कृपा समाविष्ट असते. जसजशी ही जीवन प्रणाली मानव समाजात प्रस्थापित होऊ लागते तसतशी अल्लाहच्या कृपांची व्याप्ती विस्तारत जाते. सर्वांसाठी आर्थिक विपुलता येते. स्वर्गाची मजा या सांसारिक जगातही येऊ लागते. एकाच ईश्वराची भक्ती स्वीकारणारा समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन त्याला सुरक्षा व शांतता लाभते. या समाजाचा प्रत्येक सदस्य जगातील प्रत्येकासाठी कृपा बनतो. असा समाज पृथ्वीवर एक पुरावा ठरतो ज्याच्या दारातून इतरांनाही कृपा वाटली जाते. एक वेळ अशीही येते जेव्हा इतर लोक या कृपा आपल्यालाही मिळाव्यात अशी इच्छा ठेवतात. कुरआन अवतरित झाल्यानंतर पहिल्या कालखंडाचा इतिहास याचा पुरावा आहे. ज्यात तो पूर्ण प्रामाणिकपणे स्वीकारला गेला आणि अंमलात आणला गेला. विश्वगुरू बनण्याचा हाच एकमेव मार्ग आहे कारण तो विश्व निर्मात्याने दिलेला मार्ग आहे. निर्मात्याने आपल्या निर्मितीसाठी जो मार्ग ठरवून दिला तो सोडून विविध मार्गांनी विश्वगुरू बनण्याची इच्छा बाळगणे म्हणजे एक विनोदच होय.

....................... क्रमशः

अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget