Halloween Costume ideas 2015

“मेरे यार की शादी है”


नुकतेच जामनगर येथे एक विवाह समारंभ नव्हे विवाहपूर्व समारंभ म्हणजे ‘मंगनी की रसम’ वा साखरपुडा, काय म्हणावं या सोहळ्याला कळत नाही. कळत नसल्याचं दुसरंही एक कारण एका उद्योगपतीने आपल्या मुलाच्या ज्या विवाहपूर्व कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च केले, तर प्रत्यक्ष विवाह कार्यक्रमावर किती खर्च करणार! कोविडची साथ सुरु असताना जेव्हा सामान्य नागरिक आपला जीव मिठीत घेऊन फिरत होते, आपले प्राण वाचविण्यासाठी धडपडत होते, त्या काळात आपल्या देशाच्या उद्योगपतींनी गगनातच उडी घेतली. साधारण काळात जितकी कमाई होत नाही त्याहून कित्येक पटींनी ह्या उद्योगपतींनी कमाई केली ती कशी केली हे आजवर रहस्यच आहे. त्यापैकीच एका उद्योगपतीच्या मुलाचा विवाहपूर्व समारंभ नुकताच जामनगर येथे झाला. यात जगभरातील उद्योगपती, कलाकार, राजकारणी, इतर देशांचे सत्ताधारीवर्गाच्या प्रतिनिधींसह बादशाह, राजे-महाराजे सर्वांची उपस्थिती होती. राजकारण आणि भांडवलदारांचे एकमेकांचे इतके जवळचे संबंध झालेले या काळात दिसतात की कोण सत्ताधारी आणि कोण उद्योगपती हे वेगळे सांगणे कठीण आहे. आणि दोन वर्गांतले सामायिक मित्र, कलाकार क्षेत्रातील नाचगाणे, तमाशा सर्वकाही. जगभरातील ह्या तीन्ही वर्गांची संख्या एकीकडे आणि बाकी लोकसंख्या दुसरीकडे. या दोहोंत एकच नातं ते म्हणजे जगभरातील सामान्य नागरिकांनी अहोरात्र मेहनत करून कमवलेल्या कमाईवर निरनिराळ्या प्रकारे हात साफ करण्याचा. जामनगरमधील सोहळा आयोजित करण्यासाठी शासन पुढे सरसावले ते त्यांच्या यार-मित्रपरिवारातीलच म्हणून त्यांची हरप्रकारे सोय करून देण्याची जबाबदारी मंत्री-संत्री वगैरेंनी निभावली. जगभरातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची तात्काळ सोय केली गेली. जरा याद करा कोव्हिड काळात काही तासांचीही नागरिकांना सवलत न देता कसे सबंध देशात लॉकडाऊन करण्यात आले होते, कोट्यवधी नागरिकांचे हालहाल आपल्या शहरा-गावापासून हजारो किमी दूर कामाच्या ठिकाणी अडकले, कुणी कसलीच व्यवस्था करत नसल्याचे पाहून शेवटी कोट्यवधी लोक हजारो किमी घरच्या प्रवासावर रिकाम्याहाती, उपाशीपोटी पायीच निघाले तेव्हा या देशाचे उद्योगपती त्यांच्या मदतीला पुढे सरसावले नव्हते की आपल्या मित्राच्या मुलाच्या विवाहापूर्वीच्या कार्यक्रमाची व्यवस्था करणारे पुढे आले होते. कारण दोघांनी एकमेकांना बांधून ठेवले होते. याची कारणे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चार्लस अॅडम स्मिथ याने दिलीत. त्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा लोकांना हे समजू लागते की जगातील साऱ्या सोयीसुविधा जगातील सारे लोक आपसात वाटून घेऊन त्यांचा वापर करू शकतात, तेव्हा समाजाच्या नैतिकतेची घडण बदलू शकते. पण ही गोष्ट ज्या वेळी चार्लस अॅडम्स यांनी सांगितली होती त्या वेळी नैतिकता आणि शोषण या वेगवेगळ्या व एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना होत्या. सध्याच्या जगात शोषण म्हणजेच नैतिकता असे भांडवलदारांनी, राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी शिकवले आहे आणि भांड़वलदारांच्या आदेशापलीकडे हा वर्ग जाऊ शकत नाही. एकमेकांशी इतके घनिष्ट लागेबांधे आहेत की कोणत्या वेळी कोणता वर्ग व्यवस्था चालवतो आणि कोणता वर्ग राज्यव्यवस्था चालवतो हे वगळे सांगणे अवघड वाटते. या दोघांचे मनोरंजन करणारा तिसरा वर्ग दोघांची लाचारी करत राहतो. आपला आत्मसन्मान, नैतिकता वगैरे सर्वांचा त्याग करतो. यातल्या कोणत्याही वर्गाला हा तिसरा वर्ग ज्याला प्रशासन म्हणतात तो काहीही सांगत नाही. त्या दोघांची हरप्रकारे व्यवस्था हाच एकमेव त्याचा ध्यास आणि त्या वर्गाच्या ह्या सेवेच्या बदल्यात अर्थातच भ्रष्टाचाराच्या अफाट संधी. तर झाले चार्लस अॅडम यांच्या एका काल्पनिक सिद्धान्ताचे काळानुरुप विश्लेषण. ज्या देशाच्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणालाही परिवहनाची व्यवस्था केली गेली नव्हती, त्या देशाच्या एका मित्रपरिवारातील मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्यात जगभरातून येणाऱ्यांची सोय याच देशाच्या गोरगरीब नागरिकांच्या खिशातून केली गेली. याचा हिशोब कधी ना कधी, कुठे ना कुठे द्यावाच लागेल, ह्याची नोंद मित्रपरिवाराने घ्यावी!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget