Halloween Costume ideas 2015
May 2019

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत  अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मुहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश..

इस्लामचा अभ्यास धर्म म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अभावानेच केली. मक्का शहरातल्या उत्पादन व्यवस्थेत  इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय अभावानेच धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करु शकला. त्यामुळे इस्लामच्या पूर्वीही प्रेषितांनी ‘हिल्फुल फुदुल’ कराराच्या माध्यमातून आर्थिक  शोषणाच्या विरोधात दिलेला लढा हा इस्लामी इतिहासातून दुर्लक्षित राहिलाय.

मक्का शहरातली इस्लामी अर्थक्रांती
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जन्मापूर्वी आर्थिक  विषमतेने समाजव्यवस्थेला पोखरुन काढलं होतं. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे ‘अज्ञानाचा काळ’ संबोधून पुढे  सरकतात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रध्दा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. शहरातल्या आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसतं. फिलीप के हित्ती सारख्या  आधुनिक इतिहासकारांनी मक्का शहराचा प्रेषितपूर्व इतिहास मांडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांचा ‘हिस्ट्री ऑफ अरब’ हा ग्रंथ सामाजिक कारणांचा शोध घेऊन तिथे घडलेल्या  ‘मोहम्मदी परिवर्तनाची’ व्याख्या करतो. मॅक्झिम रॅडीन्सन ‘कॅपिटलिझम अँड इस्लाम’मधे इस्लामी अर्थक्रांतीच्या मुळाशी असणारी परिस्थिती कथन करतानाही हित्ती यांच्यासारखी  सुरवात करतात. मात्र त्यांच्या मांडणीचा हेतू, आशय आणि सूत्रं वेगळी असल्याने ते लिखाण ‘इस्लामी इकॉनॉमिक सोशिओ रिव्हेल्युशन’ला अधोरेखित करतं.

स्वातत्र्याचं स्वैराचारात रुपांतर झालं
मक्का शहर कधीच कोणत्याही राजाच्या अधिपत्याखाली राहिलं नाही. समाजाच्या सर्व घटकांवर नियंत्रण मिळवणारी दंडव्यवस्था तिथे कधीच  नव्हती. मक्का शहर बेदुईन या अरबस्तानातल्या मूळनिवासी नागरिकांचं शहर. स्वातंत्र्य हा बेदुईनांचा श्वास होता. या स्वातंत्र्याला कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे त्याची जागा  स्वैराचाराने घेणं साहजिक होतं. स्वैराचारातून शोषण अशा क्रमाने मक्केतल्या उत्पादनव्यवस्थेत अराजकता शिरली.
मक्का शहरात झालेल्या इस्लामी आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची ही पार्श्वभूमी होती. या मोहम्मदी क्रांतीला कारणीभूत ठरलेल्या घटकांची माहिती इब्ने खल्दून यांनी दिलीय. ते  लिहितात, ‘कायद्यात, लोकांना वाईट कृत्यापासून रोखण्यात, इतरांकडून होणारे दुर्बलांवरील अन्याय रोखण्यात त्यांना कोणताही रस नव्हता. त्यांना फक्त नफा हवा होता. त्यासाठी ते  लूटमार आणि धोकेबाजी करत.’

मजुरांचं आर्थिक शोषण झालं
इस्लामच्या अभ्यासकांना मक्का शहराच्या इतिहासाचीही माहिती घ्यावी लागते. इतिहासाची संपूर्ण व्याख्या त्याच्या पार्श्वभूमीच्या आकलनाशिवाय करता येत नाही. मक्का हे शहर व्यापारी केंद्र होतं. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेलं हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखलं जातं. व्यापारासाठी भटकणाऱ्या मक्कावासीयांना भटकंतीमुळे  आणि शहरात येणाऱ्या अन्य रोमन व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात होत्या.
मक्केतल्या काही व्यापाऱ्यांकडे भांडवलाचं केंद्रीकरण झालं होतं. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरून जन्माला घालत. त्यामुळे कित्येक व्यापारी भिकेला लागले.  शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली. व्यापारी मार्गावरचं शहर म्हणून बाहेरचे अनेक उद्योजक मक्केत यायचे. नव्या उद्योगांची सुरवात करायचे. तिथल्या कनिष्ठ  वर्गीय मजुरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापाऱ्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती.

तरुणांचा शोषणाविरुद्ध एल्गार
व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. आर्थिक शोषणातून मजुरांची स्थिती दयनीय होती. त्यात व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या व्याजखोर सावकरांनी आर्थिक  शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचं हे चक्र मक्का शहराच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरत होतं. आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देतं. त्यातून अरबांच्या प्राचीन धर्मक्षेत्र  असणाऱ्या ‘काबा’ला मूर्तिकेंद्राचं स्वरुप प्राप्त झालं.
अर्थकारणाने अनेक देवता जन्माला घातल्या. काबागृहातील देवता धर्मप्रेरीत अर्थव्यवस्थेचा आधार होत्या. धर्मप्रेरीत भांडवली अधिसत्ता मक्का शहरावर निर्माण झाली. अरबांना प्रिय  असणाऱ्या मक्का शहरात ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हिल्फुल फुदुल’सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्या विरोधात  एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातले एक महत्त्वाचा दुवा होते.
प्रेषित्वाची घोषणा केल्यानंतरही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आयुष्यात कधीही ‘हिल्फुल फुदुल’सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द  असल्याचं अनेकवेळा सांगितलं.

इस्लामचं अर्थकारण आकर्षित करणारं
इस्लामच्या मुळाशी प्रेषितांच्या आर्थिक बदलाची भावना होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना अर्थव्यवस्थेविरोधातलं आव्हान नको होते. एच. आर. गिब या मताची पुष्टी  करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना इस्लामने आव्हान दिलं म्हणून नव्हता किंवा त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळेदेखील तो विरोध नव्हता. मात्र त्यांच्या मुळाशी  आर्थिक आणि राजकीय कारणं होती.
त्यांना भीती होती की, मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृद्धीला प्रभावित करण्याची शक्यता अधिक होती. त्यांच्या मंदिरप्रणित अर्थव्यवस्थेला प्रेषितप्रणित  एकेश्वरवाद उद्ध्वस्त करू पाहत होते. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते. ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या  हितसंबंधांना जपण्याचं तत्त्व सांगत होते. ज्या व्यापारी गटाचे हितसंबंध उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे दुखावले, त्यांना मात्र इस्लामी अर्थव्यवस्थेची नवी  तत्त्वं आकर्षक वाटत होती.

नवस्थापित इस्लाम, हे तरुणांचं आंदोलन
धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेलं आव्हान मक्का शहरातल्या कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होतं. त्यातही युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या  बाजूला वळवलं. असगर अली इंजिनियर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना म्हणातात, सुरवातीच्या काळात इस्लामी आंदोलनं समाजातल्या दुर्बल आणि पीडित व्यक्तींच्या  विचारांना अभिव्यक्त करत. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल की, इस्लामचे आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी  संशोधन केलंय.
ते म्हणतात, 'नवस्थापित इस्लाम मुळात तरुणांचं आंदोलन होतं. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते. त्यामधे हिजरतच्या वेळी मक्केतून मदीनेत स्थलांतर करणाऱ्यांत ४० पेक्षा कमी  वयाच्या व्यक्तींची मोठी संख्या होती. त्यांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतल्या भांडवलदारांना इशारा दिला की, त्यांनी साठेबाजी  करू नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना आधिक आकर्षक वाटत होतं.’

प्रेषितांकडून इस्लामी धर्मक्रांतीचं नेतृत्व
कारण इस्लामच्या तत्त्वज्ञानाने मक्का शहरातल्या सामाजिक तणावांच्या पार्श्वभूमीवर श्रीमंताच्या संपत्तीत गरीबांचा अधिकार सांगितला होता. जकात हा कर संपत्तीवर आकारला.   त्यातून गरीबांना हातभार देण्याची सामाजिक आर्थिक समतेची भूमिका मांडण्यात आली. मक्का शहरात दोन टोकाचे विचार एकमेकांना भिडले. एक धर्मप्रेरीत अर्थव्यवस्था ज्यामधे  भांडवली वर्गाचे हितसंबंध गुंतले होते. तर दुसरीकडे गरीबांकडे लक्ष देण्यासाठी श्रीमंतांना इशारा देणारी विचारधारा अशा दोन टोकाच्या भूमिका होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) फक्त  अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्थेतल्या हितसंबंधांना आव्हान देऊन थांबले नाहीत.
त्यांनी सावकारी अर्थकारणाला धुडकावलं. आर्थिक शोषणाचे आणि श्रीमंताना मिळणाऱ्या लाभाच्या प्रमुख स्रोतावर आघात केला. व्याज निषिद्ध ठरवण्यात आलं. कनिष्ठ वर्गीयांविषयीची  सामाजिक संहिता ठरवण्यात आली. गरीबांना साहाय्य करण्याला फक्त सामाजिक नाही तर मूलभूत धार्मिक कर्तव्यात स्थान देण्यात आलं. प्रेषित क्रांतीची ही सामाजिक फलश्रुती होती.  त्यामुळेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानंतर इस्लामने युनानी तत्त्वज्ञानानेच आव्हान स्वीकारलं.

प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ
प्रख्यात इस्लामी विचारवंत इब्ने रश्द यांनी इस्लामच्या भौतिक विचारधारेची आध्यात्मिक वस्तुनिष्ठ मांडणी केली. त्यांनी युनानी तत्त्वज्ञानाच्या मुलाधाराला आव्हान देऊन भौतिकाला  आध्यात्मिक समीक्षेच्या कक्षेत आणलं. इस्लामी भौतिकवाद नावाची संकल्पना आकाराला आली. कालांतराने इब्ने खल्दून सारखा समाजशास्त्राचा जनक मुसलमानांमधे निर्माण झाला.  खल्दून यांचा मुकद्दीमा त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अनेक अंगावर इस्लामी मुल्यांच्या परिप्रेक्ष्यात भाष्य केलं.
इस्लामी तत्त्वज्ञानावर कोणत्या अंगाने चर्चा करावी याचा पाठच त्यांनी घालून दिला. इस्लामने जी धर्मक्रांती केली त्याच्या मुळाशी आर्थिक कारणं होती. अर्थव्यवस्थेला धर्ममूल्यांच्या  कक्षेत बांधलं. निषिद्ध, अनिषिद्ध ही संकल्पना प्रथमच अरबी समाजात अवतरली. अन्यथा स्वैराचाराने सारे अनिषिध्द ठरवलं होतं. सामाजिक नैतिकतेची संकल्पना देखील अरबांमधे  नव्हती. मुहम्मदी सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्रांतीने या सर्व संकल्पना अरबांच्या गळी उतरवल्या. गरीबांच्या हक्कांसाठीचा हा लढा प्रेषितांच्या नेतृत्त्वाखाली लढला गेला. कोणत्याही  तत्त्वज्ञापेक्षा प्रेषित मुहम्मद (स.) यांना मिळालेले यश आधिक आहे. त्यामुळे प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ ठरतात.

लातूर (शोधन सेवा)
 शहरातील नर्गीस उर्दू शाळेतील तीसऱ्या वर्गातील सफा खमरोद्दीन मोमीन ही अस्खलित कुरआन पठणामुळे सध्या चर्चेत आहे. 8 वेळेस कुरआनचे संपूर्ण पठण (दौर)करून ती आता  रमजानमध्ये 9 व्यांदा कुरआन पठण करीत असून कुरआनचे अरबीत लिखानही करीत आहे. सफा महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या कलमुगळी गावातील. आई- वडिल मराठी  माध्यमातून शिकलेले. काही वर्षापूर्वी हे कुटुंब शिक्षण व नोकरीसाठी लातुरात आले. शहरातील आलमपुरा भागात येऊन स्थायीक झाले. आई- वडिलांना मुलांच्या शिक्षणात अधिक रस.  त्यामुळे सफाच्या मागे शाळा व मक्तबचा दट्या असल्यामुळे तिचा अभ्यास अधिकच सरस. उर्दूही फर्राटेदार. मक्तबसाठी त्यांनी आलेमा फातेमा यांच्याकडे शिकवणी लावली. सफाचा  बुध्यांक एवढा तल्लख की ती शाळेतही अव्वल. फारच कमी कालावधीत तिने कुरआनचे पठण करण्यास सुरूवात केली. कुरआनमधील मोठमोठी आयात तिला मुखोद्गत आहेत. शिवाय,  सफाने अरबी लिपीतून कुरआन लिखानाचे कामही हाती घेतले असून, 8 अध्याय लिहून पूर्ण केले आहेत. तिचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. तिचे वाचन आणि अरबी लिखान पाहून  प्रत्येकजण आश्चर्यचकीत होत आहे. मोहल्ल्यात ती सध्या चर्चेचा विषय बनली असून, सफा विद्यार्थ्यांची शैक्षणिक आयकॉन बनू पाहत आहे. ग्रामीण भागातून येवून कमी वयात अरबीतून अचूक लिखान आणि अचूक वाचन सफा करीत असल्याने शहरातील इतर विद्यार्थ्यांचे पालक अचंबित होत आहेत.

इस्लामने ’नातेवाईकांशी सदाचाराने वागा’ अशी सूचना केली आहे. पवित्र कुरआनमध्ये ’’नातेवाईकांचे हक्क अदा करा’’ असा आदेश दिला आहे. याचाच अर्थ घरातील स्त्रीवर ही  जबाबदारी अप्रत्यक्षपणे सोपविली आहे. नातेवाईकांशी सद्व्यवहार, सहानुभूती, शुभचिंतनाचा व्यवहार, प्रेम, माया, सुख, दुःखात सहभाग या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अपेक्षित आहे. परिवाराबरोबर नातेवाईकदेखील जोडले जाणे आवश्यक आहे. हा जोड इतका घट्ट असावा की जर एका नातेवाईकाच्या पायात काटा रूतला तर त्याची कळ दुसऱ्या नातेवाईकाला जाणवावी  आणि तिसऱ्या आप्तेष्ठाच्या डोळ्यांतून अश्रु वहावेत. पवित्र कुरआनमध्ये निवेदन आहे, ’’ ते जोडतात त्या संबंधाना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे. आणि  आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगा’’ (दिव्य कुरआन).
अल्लाहने प्रत्येकाला नाते जोडण्याचा आदेश दिला आहे. नाते जोडणे हे सद्वर्तन समजले आहे. हे सद्वर्तन प्रत्येक स्त्री-पुरूषाने करावे, पण निर्माण झालेले, जोडलेले नाते तुटणार नाही  किंवा त्यात फारकत निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण नाते तोडणे हे इस्लाम अमान्य करतो. नातेसंबंध संपविणे म्हणजे पाप करणे होय आणि यासाठी अल्लाहची भीती  बाळगली जाते. या नातेसंबंधामध्ये रक्ताची नाती आणि मानलेली नाती या दोघांचाही समावेश होतो.
’’ जी पत्नी आपल्या नवऱ्याबद्दल कृतज्ञ नसेल तिला अल्लाहचा आशीर्वाद लाभणार नाहीत.’’
’’उत्तम स्त्री दात्याचे (देणाऱ्याचे) नेहमीचे आभार मानते. कोणत्याही कठीण प्रसंगात धीर दाखविणारी, सांभाळ करणारी, आज्ञाचे पालन करणारी असते.’’
ज्या महिलेला उत्तम स्त्रीत्व प्राप्त करावयाचे आहे तिने नेहमी आपणास मदत करणाराचे, घरात आणून देणाराचे, आपला उदरनिर्वाह चालवणाराचे (पतीचे) आभार मानले पाहिजेत. तसेच त्याच्या ऋणात राहायला पाहिजे. जी स्त्री दात्याचे आभार मानते, त्याच्या ऋणात राहते ती कितीही भयावह प्रसंग आला तरी डगमगत नाही. तिचा निश्चय डळमळीत नसतो. ती  आपल्या निर्णयावर कठीण प्रसंगीही ठाम राहते. ती प्रतिकूल परिस्थितीत इतरांचा सांभाळ करते व आज्ञांचेही पालन करते.
बहुतेक धर्मामध्ये आईची थोरवी गायली आहे. कोणताही धर्म आईशी अवमानकारक वागण्यास प्रवृत्त करीत नाही. सर्वच धर्मात आई अत्यंत आदरणीय, व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानात आईची अवहेलना किंवा कुचंबना अपेक्षित केलेली नाही. तसेच इस्लाम तत्त्वज्ञाने किंवा धर्माने आईचा (स्त्री) सन्मान केलेला आहे. ’’आईच्या पायात  (चरणात) स्वर्ग आहे.’’ ही शिकवण इस्लामचीच आहे. ’’आईची सेवा हे पुण्यकर्म आहे. इस्लामने आपल्या आईविषयी कृतज्ञ राहण्यास सांगितले आहे. आपल्या आईवडिलांचे हक्क  ओळखण्याची ताकीद केली आहे. कारण आईने मरणयातना सहन करून आपल्याला जन्मास घातले आहे. तसेच तिने आपल्यासाठी अन्न त्यागले आहे. (बाळ दूध पित असताना आई  खारट, तिखट, आंबट, खात नाही, कारण त्याचा परिणाम दुधावर होतो व त्यामुळे बाळाला त्रास होईल यासाठी ती अन्न त्यागते.) बाळ आजारी असल्यास आई रात्ररात्र जागते. बाळाच्या  जन्मानंतर सर्वात पहिला गुरू आई होते. आई ज्ञानपीठ आणि न्यायपीठ या दोन्ही व्यवस्था बाळासाठी स्वतः होते. लहान मुलाच्या मेंदूवर संस्कार करते. जगातील सर्वात आदरणीय  सर्वसमावेशक व्यक्ती म्हणजे आई होय. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ थोडोर रिक त्यांच्या पुस्तकात म्हणतात, (द इमोशनल जिस्पराईट्स) ’प्रत्येक स्त्रीला तिच्या मातृत्वाचा अभिमान  वाटतो.’ तसेच त्यांनी असेही म्हटले आहे, ’स्त्री पुरूषाला अनेक सरस (उत्कृष्ठ) बाबींबद्दल मोठेपणा देते.’
ईश्वराने स्त्रीला बहाल केलेली देणगी म्हणजे तिचे मातृत्व. मातृत्वाच्या देणगीनेच स्त्रीचे प्रतिष्ठा पराकोटीला पाहोचली. कारण मानवाची निर्मिती स्त्री आणि पुरूष यांच्यातून झाली  असली तरी स्त्री जन्मदात्री आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत वंशसातत्याचे काम करते व तिला कायम वाटते की आपण आदर्श माता व्हावे. ’आई’ ही प्रचंड मौल्यवान देणगी आहे.  म्हणूनच  अनेक कवी, साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते आईचे महत्त्व अनेक शब्दांत सांगतात. जसे ’आईविना माणूस भिकारी’, आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही’ ’प्रेमसिंधू आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू आता कोणत्या उपायी’, अशा अनेक प्रसिद्ध रचना आपणांस ऐकावयास  मिळतात. आज संपूर्ण भारतभर गावागावात आईची थोरवी गाणारी आणि सांगणारी माणसे भेटतात. यावरून आपल्या लक्षात येते की कितीही गडगंज श्रीमंत व्यक्ती असली आणि  तिच्याकडे असंख्य भौतिक सुविधा असल्या आणि त्या व्यक्तीस आई नसली तर तो आईसाठी भिकारी आहे. आई म्हणजे आयुष्यभर पुरणारा एक असा मोठा ठेवा आहे तो पुरतही नाही  आणि संपतही नाही. जगात कोणत्याही व्यक्तीची आई नसेल तो सर्वांत जास्त पोरका आहे. ज्याला आई नाही त्याला काही नाही. तसेच एखाद्याला आई नसली तरी त्याला आई नाही  असेही म्हणवत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका इसमाने विचारले, ’’ मी कोणाची अधिक सेवा करावी.’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ पुन्हा तो म्हणाला, ’’त्यानंतर  दूसरे कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ तो माणूस पुन्हा म्हणाला,’’ आणखी कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’ तुमची आई.’’ त्या माणसाने चौथ्यांदा विचारले, ’’यानंतर कोण?’’  पैगंबरानी सांगितले, ’’तुमचे वडील.’’
वरील विवरणावरून आपणास सहज लक्षात येते की इस्लामने प्रथम दर्जा आईला म्हणजेच स्त्रीला दिला आहे, कारण स्त्री आदरणीय आहे. तिचा आदर जेव्हा तीन वेळा होईल तेव्हा  वडिलांचा आदर एक वेळा केला आहे. म्हणजेच पुरूष (वडील) तर आदरणीय आहेच पण त्यापेक्षा आई (स्त्री) तीनपट अधिक आदरणीय आहे. याचा अर्थ स्पष्ट करताना खालील वाक्याचे  पुनर्लेखन करतो, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ मानव ज्या स्वर्गाच्या अपेक्षेसाठी जीवनभर सद्वर्तन करतो, स्वर्गप्राप्तीसाठी अनेक पुण्यमार्ग अवलंबितो, इस्लामने सांगितले की  आपणास सृष्टी दाखवणारी आपल्या मृत्यूपश्चात स्वर्ग-प्राप्तीची संधी देणारी वात्सल्यसिंधू आहे. त्यामुळे आईचे उपकार स्वतःच्या शरीराची कातडी काढून जरी त्याचे बूट करून आईला  घातले तरी ते कमीच आहे. आई हे असे न्यायालय आहे जिच्यापुढे मुलाचे हजारो अपराध माफ होतात. क्षमा मिळते.
मुलाची तब्बेत (शारीरिक स्वास्थ्य) कितीही उत्तम असले तरी आईच्या नजरेत आपले बाळ हे तब्बेतीने कमकुवत आहे, असे वाटते. कारण तिची माया विलक्षण आहे. मराठीमध्ये एक  म्हण आहे, ’’शेजारणीने भरवला भात आणि आईने फिरवला हात दोन्ही सारखेच.’’ आई एक आदरातिथ्य आहे आणि तिच्या चरणाच्या खालीच स्वर्ग आहे. म्हणजे आपण स्वर्गाच्या  अपेक्षेणे वनवन भटकतो आणि खरा आईच्या पायाखालचा स्वर्ग आपणास दिसत नाही. तिची आपल्या मुलावर अलौकिक माया असते, या मायेला जगात तोड नाही.
पवित्र कुरआनमधील आईचा सन्मानच केला गेला आहे. म्हणून आज मातृप्रेम व सन्मान यासाठी स्त्री पात्रच आहे. ज्ञानी, सुसंस्कृत व्यक्ती कधीच स्वतःच्या आईचा मोठेपणा नाकारू शकत नाही. आई ही संपूर्ण जगाची निर्माती आहे. ती बाळाला जन्म देते आणि रिकामी होते असे नाही. तर ती आपल्या बाळाचे लालनपालन, संगोपन करते. उदरात अर्भक  असल्यापासून ते तिच्या अंतापर्यंत आपल्या बाळावर कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. बाळाच्या नुसत्या रडण्याच्या आवाजाने आईचा पान्हा फुटतो. इस्लामने स्पष्ट  ताकीद केली आहे, ’’आपल्या आई-वडिलांचे अधिकार जाणा.’’
अर्थात आपल्या सुखात, ऐश्वर्यात, समृद्धीत त्यांचा अधिकार आहे, तो म्हणजे केवळ त्यांना सुखात सांभाळण्याचा. त्यांना सांभाळावे, त्यांची परवड होऊ नये याची काळजी घ्यावी.  आपल्या आईवडिलांशी चांगले वर्तन ठेवावे. कारण आईने आपल्या रक्ताचे दूध करून बाळाला पाजलेले असते आणि त्या दुधाचे कर्ज कोणीही आणि कधीही फेडू शकत नाही आणि तसा  हिशोबही करू नये. फक्त त्यांच्याशी सद्वर्तन करावे. आई जेव्हा आपल्या बाळाला छातीशी कवळाटून दूध पाजते तेव्हा ती व ते बाळ यांच्यात अतूट नाते निर्माण होते. म्हणून जितके  महत्त्व बाळाला जन्म देण्याला आहे, त्यापेक्षा नक्कीच अधिक महत्व स्तनपाला आहे.
आज समाजामध्ये स्तनपान करण्यास मातेला वेळ मिळत नाही. (नोकरी, व्यवसाय करणाऱ्या माता) तसेच काही स्त्रिया स्तनपान करण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवतात. त्यांच्यासाठी  किंवा अशा स्त्रिया या गरोदर आहेत व बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान नाकारण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी सांगणे आहे की, आईचे दूध हा बाळाचा अधिकार आहे, तो स्वतः  आईदेखील त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. इस्लामने बाळाला जन्म देणारी जन्मदात्री जितकी महत्त्वाची तितकीच बाळाला स्तनपान करणारी दूध आई आहे, असे सांगितले  आहे. याचे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे ते खालीलप्रमाणे.
छत्रपती शिवरायांच्या पत्नीने (सईबाई) 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका मुलास जन्म दिला (संभाजीराजे) पण त्या या बाळंतपणात आजारी पडल्या व त्यांना बाळंतपणाचा रोग जडला व त्यात त्यांचे दूध आटले (दूध आले नाही). तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी पुरंदरजवळच्या कापूरहोळच्या गाडे-पाटील यांच्या घरातील बाळंतीण (जिची मुलगी दगावली होती)  ’’धाराऊ गाडेपाटील’’ हिला गडावर बोलावून घेऊन तान्ह्या संभाजीच्या दुधाची सोय केली. पुढे बाळंतपणाच्या आजारातच 5 सप्टेंबर 1659 रोजी सईचे निधन झाले.
संभाजीच्या जीवनात जेवढे महत्त्वाचे स्थान सईबाईंना होते तेवढेच ’’दुधआई’’ धाराऊ यांना होते. सईबाईंच्या पश्चातसुद्धा धाराऊ अगदी शेवटपर्यंत संभाजीची दूधआई असल्याने त्यांच्या  मृत्यूपर्यंत गडावरच राहिल्या आणि संभाजीला दूध पाजल्याच्या त्यांच्या आयुष्यभर त्यांना मोबदला दिला. स्त्रीला काही कर्तव्ये सांगितली त्यात आपल्या बाळास स्तनपान करणे हे  देखील आहे. पण आज धावत्या युगात स्त्रिया (माता) सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कला, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्यासमोर स्तनपानाची आज समस्या निर्माण झाली आहे. काही स्त्रिया अशा आहेत की ज्या बाळाला स्तनपानास स्पष्ट नकार देतात. कारण त्याने त्यांचे सौंदर्य कमी होईल याची  त्यांना भीती वाटते. स्तनपान न करणे म्हणजे आपल्या बाळाचा हक्क काढून घेणे व एक पाप करणे आहे, याची जाणीव स्त्रियां (माता) मध्ये निर्माण करावी लागेल. आज जगभरात  बाळांसाठी स्तनपानाची जागृतीची मोहिम चालू असलेली पहावयास मिळते व त्यासाठी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जात आहे. पवित्र कुरआनमध्ये इस्लामच्या अवतरणाच्या वेळीच  स्तनपानाविषयी जागृती केलेली दिसून येते. याचाच अर्थ स्त्री आणि तिच्यापासून जन्मास आलेले अर्भक या दोघांच्या अधिकारांच्या बाबतीत इस्लामी तत्वज्ञान संतर्क होते, सतर्क आहे.

(सदरचा लेख : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री यामधील आहे. प्रकाशक : इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई.)

आधुनिक जगात राष्ट्रांमधील परस्परसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आले आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा अस्ताची परिणीती नव्या राजकीय-भौगोलिक समीकरणात आणि तद्वत नव्या  संघर्षांमध्ये झाली. येणाऱ्या काळात मध्यपूर्व आशिया महत्त्वाच्या जागतिक संघर्षांचे केंद्र होणार याची चिन्हे खूप अगोदरपासूनच दिसू लागली होती. मध्यपूर्वेचा राजकीय पडदा कितीही  भरकटत गेलेला असला तरी त्यातले रंग मात्र कधी बदललेच नाहीत. गेल्या तीन दशकांत अमेरिका आणि इराण संबंधातील कडवटपणा असण्याला आणि तो तसा राहण्यात बरेच घटक  आणि घटना कारणीभूत आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष  निर्माण झाला आहे आणि यांच्यामध्ये आपला देश चांगलाच भरडून निघणार असे आज तरी चित्र दिसत आहे. आपल्या देशावर आलेल्या  तेलसंकटाचे मुख्य कारण आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. आता अमेरिकेने आपणास इराणकडून तेल खरेदी करण्याची सवलत १ मेपासून संपुष्टात आली आहे. अर्थातच  आपल्यासाठी हा मोठा फटका आहे आणि याचे गंभीर परिणाम आता हळूहळू दिसू लागणार आहेत. इराणकडून आपल्याला कमी दरात इंधन पुरवठा होत होता. आता हा पुरवठा  इराणकडून बंदच होणार आहे. त्यामुळे पेट्रोलडिझेल दरवाढ होण्याचे संकेत आहेत. लोकसभा निवडणूक सुरू होती म्हणून गत सरकारने ही दरवाढ रोखून ठेवली होती. अमेरिकेने इराणवर  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर अमेरिकेने भारत व अन्य आठ देशांना इराणकडून होणारी ही इंधन खरेदी सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने बंद करण्याची सूचना  दिली होती. आपण इराणकडून सुमारे ३० टक्के तेल घेतो. इराणने आपल्याला उधारीची पण सवलत दिली आहे, म्हणजे हे तेलाचे पैसे लगेच न देता १२० दिवसांची सवलत दिली आहे,  त्याचप्रमाणे कमी दरात सुद्धा आपल्याला इंधन पुरवठा होत होता. आपल्या देशाची तेलाची गरज बघता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. एप्रिलमध्ये आयातीचे प्रमाण ५७ टक्क्यांनी कमी  झाले. इराण भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे. अमेरिका इराण आण्विक करारातून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी इराणच्या तेल  निर्यातीवर कठोर प्रतिबंध लादायची सुरूवात केली. पण भारताचे अमेरिकन अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचे स्थान असल्याने सुरूवातीचे काही महिने भारताला इराणी तेल आयात करताना  अमेरिकेने आडकाठी केली नाही. आता ती सूट संपली आहे. इराणी तेलाच्या बदल्यात सौदी-अमिरात भारताला तेल पुरवठ्यात दराची सवलत देणार आहेत अशी चर्चा आहे. एकेकाळी अमेरिका मध्य-पूर्वेतील तेलावर अवलंबून होती. पण शेल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज अमेरिका स्वत:ची इंधन गरज भागवून तेलाचा निर्यातदार झाला आहे. त्यामुळे आता मध्य-पूर्व  पेटली तरी आपले काय गेले? या मस्तीत अमेरिकन्स आहेत. शिवाय तेल उत्पादक इस्लामी जगत पेटल्यास भडकणाऱ्या तेल दरांचा फायदा उठवून अमेरिका स्वत:च्या तेलाचे दामदुप्पट  पैसे करेल यात शंकाच नाही.
अमेरिकन विदेश नीती ‘आप मेला आणि जग बुडाला’ याच एका तत्त्वावर चालते, बाकी जागतिक शांतता, दहशतवादाचा बिमोड, मानवाधिकारांचं रक्षण वगैरे बुरखे हे सामान्य  अमेरिकन माणसाला आणि जगाला मूर्ख बनवण्यासाठी वापरले जातात. येमेनचे हौथी बंडखोर आणि सौदी समर्थित सरकार यांच्यात गेली कित्येक वर्षे भीषण सैनिकी संघर्ष सुरू आहे.  दुबळ्या सरकारला सौदी नेतृत्वाखालील इस्लामिक मिलिटरी कॉअलिशन मदत करते. अमेरिका आणि ब्रिटन या आघाडीला अत्याधुनिक, विनाशकारी शस्त्रे आणि मिलिटरी अ‍ॅडवायझर  पुरवतात. दुसऱ्या बाजुला हौथी बंडखोरांना इराण शस्त्रे आणि प्रशिक्षण पुरवते. या भयानक संघर्षात आजपर्यंत कित्येक लाख निर्दोष लोक मारले गेले आहेत आणि लाखो लोक  कुपोषणामुळे मरणाच्या दारात उभे आहेत. सौदी हवाई हल्ल्यात गेल्यावर्षी हजारच्या आसपास लहान मुले मारली गेली आहेत आणि गेल्या आठवड्यात परत एकदा कित्येक निरपराध  महिला आणि मुले मारली गेली. सुरुवातीला सौदी-यु.ए.ई. अवघ्या काही महिन्यात हौथी बंडखोरांना ठेचू अशा भ्रमात होती, पण हौथींचा तिखट संघर्ष आणि इराणची सक्रिय मदत यामुळे   सौदी आणि पर्यायाने अमेरिकेचे नाक येमेनमध्ये पुरते कापले गेले आहे. याचा बदला घेणेही अमेरिका आणि तिच्या अरब मित्र देशांना साधायचे आहे. अमेरिकेचा दबाव सरसकट  फेटाळून लावणे भारतासाठी अडचणीचे ठरत आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळेच भारतात येऊ घातलेल्या नव्या सरकारसाठी ‘इराणी तेल’ : सर्वात मोठे कूटनैतिक आव्हान असेल यात  शंका नाही. एका बाजुला अमेरिकेसोबतचे संबंध, दुसऱ्या बाजुला भारताची स्वस्त इंधन शाश्वती सांभाळणे आणि तिसऱ्या बाजुला इराणच्या छाबहार बंदरात भारताने केलेली गुंतवणूक  वाचवून अफगाणिस्तानला छाबहारमार्गे वस्तूंचा पुरवठा कायम ठेवणे अशी बहुविध आव्हाने भारताच्या नवीन सरकारसमोर असतील आणि ती भारत यशस्वीपणे पेलेल अशी आशा आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘नि:संशय सर्वश्रेष्ठ अल्लाहने लोकावर जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरविले आहे. जो त्यांच्या श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल व त्यास  त्यांच्या गरजवंत गरीब लोकांना परतविला जाईल. (हदीस : मुत्तफिक अलैय्)

भावार्थ

सदका हा शब्द जकातसाठीही वापरला जातो, ज्याचे अदा करणे इस्लामी कायद्यानुसार आवश्यक आहे आणि इथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. अशा प्रत्येक धनसंपत्तीस लागू पडते, जो मनुष्य आपल्या राजीखुषीने अल्लाहच्या मार्गात खर्च करतो. उपरोक्त हदीस वचनातील शब्द ‘परतविला जाईल’ स्पष्ट दर्शवितो की जकात जी धनवानाकडून वसूल केली जाईल, ती  वस्तुत: समाजातील गरीब आणि गरजवंतांचा हक्क आहे, जो त्यांना मिळवून दिला जाईल. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की ज्या माणसाला सर्वश्रेष्ठ अल्लाहने धन दिले  आणि मग त्याने त्याची जकात अदा केली नाही, त्याचे हे धन कयामतच्या दिवशी अतिशय विषारी सापाचे रूप धारीण करील, ज्याच्या डोक्यावर दोन काळे ठिपके असतील (हे अती  विषारी असण्याचे लक्षण आहे.) आणि तो त्याच्या गळ्याचा हार बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना पकडून हा साप म्हणेल, मी तुझे धन आहे, मी तुझा खजीना आहे. त्यानंतर प्रेषित  (स.) यांनी पवित्र कुरआनातील आयतीचे पठन केले जिचा अर्थ असा, ‘‘ते लोक जे आपले धन खर्च करण्यात कंजूसी करतात, त्यांनी असे समजु नये की त्यांचा हा कंजूसपणा  त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरेल. या उलट तो अधिक वाईट ठरेल. त्यांचे हे धन कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्याचा हार बनेल. अर्थात ते त्यांच्यासाठी भयंकर विनाशकारक ठरेल.  (हदीस- बुखारी)

माननीय आयशा (रजी.) सांगतात की, मी प्रेषित (स.) यांचे असे निवेदन ऐकले की, ‘‘ज्या धन-संपत्तीतून जकात न काढली जाईल, त्यातच ती मिसळलेली राहील तर ती त्या  धनसंपत्ती नाश केल्याशिवाय राहात नाही.’’ (हदीस - मिश्कात)

भावार्थ
नाश करण्याशी अभिप्रेत हे नव्हे की, जो मनुष्य जकात देत नसेल आणि स्वत:च खाईल तर अपरिहार्यत: कोणत्याही स्थितीत त्याची सर्व मालमत्ता नाश पावेल. ते धन ज्याचा लाभ घेण्याचा त्याला हक्क नव्हता आणि जो फक्त गरीबांचा हिस्सा होता, तो त्याने गिळंकृत करून आपल्या ईमानाचा सर्वनाश ओढवून घेतला. इमाम अहमद बिन हंबल यांच्याद्वारे हाच खुलासा उल्लेखित आहे, आणि असेही पाहण्यात आले आहे की जकात हडप करून घेणाऱ्याची संपूर्ण मालमत्ता बघता बघता नष्ट झाली आहे.

जकात : दिनदुबळ्यांचे अधिकार
मा. अनस बिन मालिक (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याकडे एक माणूस आला व म्हणाला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! मी खूप श्रीमंत आहे मुलेबाळेही  आहेत, तसेच गुरेढोरेही आहेत. तेव्हा मी आल्या संपत्तीचा व्यय (खर्च) कसा करावा?’’ प्रेषितांनी (स.) उत्तर दिले की, ‘‘तुम्ही आपल्या संपत्तीची जकात द्यावी कारण जकात तुमच्या   आत्म्यास शुद्ध करते.आपल्या नातलगांशी संबंध जोडा व त्यांचे अधिकार पूर्ण करा. याचक, शेजारी आणि दिनदुबळ्यांचे अधिकार त्यांना द्या. (हदीस - मसनद अहमद)

नमाज, रोजा, जकात चा आदेश पूर्ण करणारे आदरणीय आयेशा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘तीन प्रकारच्या लोकांसमोर, तीन प्रकारच्या  अडचणी अजिबात येत नाहीत. १) जे लोक नमाज, रोजा आणि जकात अदा करतात, त्यांच्याशी ईश्वर नमाज, रोजा, जकातची पूर्ती न करणाऱ्याबरोबर होणारा (प्रकोपीय) व्यवहार  करणार नाही. २) ज्या दासाला ईश्वराने त्याच्या भल्या पुण्य कर्मास्तव आपल्या छत्रछायेत व सुरक्षेत घेतले आहे, त्यास कयामतच्या दिवशी इतरांकडे स्वाधीन करणार नाही. ३) जो  माणूस एखाद्या समाजाशी स्नेह ठेवतो, ईश्वर त्याला त्याच्या स्वाधीन करतो. (हदीस - मसनद अहमद)

(१०४) या गटाचा१३८ पाठलाग करण्यात दुबळेपणा दाखवू नका, जर तुम्ही त्रास सहन करीत आहात तर तुमच्याप्रमाणे तेदेखील त्रास सहन करीत आहेत. आणि तुम्ही अल्लाहकडून त्या   गोष्टीची आशा बाळगता ज्याचीआशा ते बाळगीत नाहीत.१३९ अल्लाह सर्व काही जाणतो आणि तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
(१०५) हे नबी (स.)!१४० आम्ही हा ग्रंथ सत्यानिशी तुमच्याकडे उतरविला आहे की जो सरळमार्ग अल्लाहने तुम्हाला दाखविला आहे त्यानुसार लोकांमध्ये न्यायनिवाडा करा. तुम्ही अपहार  करणारांचे समर्थक बनू नका.
(१०६) अल्लाहजवळ क्षमेची याचना करा, तो मोठा क्षमा करणारा व दयावंत आहे.
(१०७) जे लोक स्वत:शी विश्वासघात करतात, तुम्ही१४१ त्यांचे समर्थन करू नका अल्लाहला असा मनुष्य पसंत नाही जो अप्रामाणिक व दुराचरणी गुन्हेगार आहे.
(१०८) हे लोक माणसापासून आपल्या कारवाया लपवू शकतात परंतु अल्लाहपासून लपवू शकत नाहीत. तो तर त्या वेळेसदेखील यांच्याबरोबर असतो जेव्हा हे रात्री गुप्तपणे त्याच्या  मर्जीविरूद्ध सल्लामसलत करतात. यांच्या सर्व कृत्यांना अल्लाहने घेरले आहे.
(१०९) बरे तर तुम्ही लोकांनी या अपराध्यांतर्फे लौकिक जीवनात तर युक्तिवाद केलेत परंतु कयामत (पुनरुत्थानाच्या) दिवशी त्यांच्यासाठी कोण युक्तिवाद करील? शेवटी त्यांचा तेथे  कोण बरे वकील असेल?
(११०) जर एखाद्या व्यक्तीकडून वाईट कृत्य घडले अथवा आपल्या स्वत:वर अत्याचार केले आणि त्यानंतर अल्लाहजवळ माफीची विनंती केली तर अल्लाह त्याला क्षमा करणारा व  कृपा करणारा आढळून येईल.
(१११) जो वाईट कर्म करील तर त्याची ही कमाई त्याच्याकरिता संकट ठरेल. अल्लाहला सर्व गोष्टीची खबर आहे व तो विवेकशील व बुद्धिमान आहे.
(११२) मग जो एखादी चूक वा अपराध करून त्याचा आरोप इतर निरपराध व्यक्तींवर लादेल, त्याने तर मोठे कुभांड व उघड पापाचे ओझे शिरावर घेतले.



१३८) म्हणजे शत्रूंचा एक गट जो त्या काळी इस्लामी आवाहन आणि इस्लामी जीवनपद्धतीला प्रस्थापित करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करीत होता.
१३९) म्हणजे आश्चर्य आहे की ईमानधारक (श्रद्धावंत) सत्यासाठी तितके कष्ट झेलण्याससुद्धा तयार होऊ नयेत; जितके कष्ट शत्रू असत्यासाठी सहन करीत आहे. शत्रूसमोर फक्त नश्वर  भौतिकता आहे व हे जग आहे. याविरुद्ध ईमानधारक सृष्टीनिर्मात्याची प्रसन्नता, त्याचे सान्निध्य आणि पुरस्काराचे उमेदवार आहेत.
१४०) या आयतपासून आयत नं. ११३ पर्यंत एका महत्त्वपूर्ण घटनेवर चर्चा करण्यात आली आहे. ही घटना त्याच काळात घडलेली आहे. अन्सारच्या बनीजफर टोळीतील एक मनुष्य  तामा किंवा बशीर बिन उबेरिक नामक होता. त्याने एका अन्सारीचे चिलखत चोरले होते आणि जेव्हा त्याचा तपास सुरु झाला तर चोरी गेलेल्या मालास एका यहुदीच्या येथे ठेवले.  चिलखतच्या मालकाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे फिर्याद केली आणि तामावर आपला संशय व्यक्त केला. परंतु तामा आणि त्याच्या नातेवाईकांनी बनीजफरच्या अनेक लोकांशी  साठगाठ करून त्या यहुदीवर पूर्ण आरोप ठेवला. यहुदीला विचारण्यात आले तर त्याने जबाबदारी घेतली नाही. परंतु या लोकांनी तामाची बाजू भक्कम लावून धरली होती. ते सांगू लागले की हा यहुदी दुष्ट आहे; तसेच सत्याचा इन्कार करणारा आणि अल्लाह व त्याच्या पैगंबरांना न मानणारा आहे. याच्यावर भरोसा केला जाऊच शकत नाही. आमचेच म्हणणे मान्य केले पाहिजे कारण आम्ही मुस्लिम आहोत. शक्य होते की पैगंबर मुहम्मद (स.) बाह्य रूपातील या सूचनेवरून प्रभावित होऊन यहुदीविरुद्ध निर्णय देतील. इतक्यात दिव्य प्रकटन   झाले आणि सत्य समोर आले. एका काझीच्या रूपात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत विवरणानुसार निर्णय देणे चुकीचे नव्हते. अशी परिस्थिती काझीसमोर येत असते. त्यांच्यासमोर  चुकीची साक्ष आणि रिपोर्ट करून चुकीचा निर्णय जज (काझी)कडून घेतला जातो. परंतु त्या वेळी जेव्हा इस्लाम आणि कुफ्रमध्ये संघर्ष जोरात होता; अशा वेळी साक्ष आणि समोर  आलेल्या रिपोर्टनुसार पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्णय दिला असता तर इस्लाम विरोधकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विरोधात आणि इस्लामी समुदाय आणि इस्लामी संदेशा  विरुद्ध एक सशक्त नैतिक हत्यार मिळाले असते. विरोधकांनी जोरात प्रचार केला असता की येथे सत्य आणि न्याय आहेच कुठे? येथे तर पक्षपात आहे. याच संकटातून वाचविण्यासाठी  येथे स्वत: अल्लाहने हस्तक्षेप केला आहे. या आयतींमध्ये (१०५ ते ११३) त्या मुस्लिमांवर टीका केली ज्यांनी खानदान, कबिल्याची बाजू घेऊन पक्षपात केला आणि अपराधीचे समर्थन  केले. दुसरीकडे सर्व मुस्लिमांना शिकवण दिली गेली की न्यायासाठी पक्षपातीने काम घेऊ नका. हा न्याय मुळीच नाही की आपल्या गटाच्या अपराधीचे अनुचित समर्थन केले जावे आणि  दुसऱ्या गटाचा मनुष्य सत्याधिष्ठित असेल तरी त्याच्याशी अन्याय केला जावा.
१४१) जो कोणी दुसऱ्याशी विश्वासघात करतो तो सर्वप्रथम खरेतर स्वत:शी विश्वासघात करतो कारण मन आणि बुद्धीची शक्ती त्याच्याजवळ ठेव म्हणून आहेत. त्यांचा दुरुपयोग करून  तो त्यांना मजबूर करतो की विश्वासघात करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला साथ द्यावी. अल्लाहने त्याच्या अंतरात्म्याला त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा रक्षक बनविला. त्यास या  सीमेपर्यंत दाबून ठेवतो की तो अंतरात्मा या विश्वासघात कृत्यात अडथळा बनत नाही. जेव्हा मनुष्य आपल्या आत या अन्यायपूर्ण भ्रष्टाचाराला पूर्ण करतो तेव्हाच कोठे बाहेर त्याच्या हातून पाप व विश्वासघात घडतो.

गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्थानमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. सैनिके आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करून होत असलेल्या या हल्ल्यामुळे अफगाणी धास्तावले आहेत.  हे केवळ अतिरेकी हल्ले नसून एका मोठ्या धोक्याची चाहूल आहे. कारण अफगाणिस्थानची सत्ता पदच्युत तालिबानी संघटना सत्तेसाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी करीत आहे. याचा अर्थ  येत्या काही दिवसांत तालिबान पुन्हा अफगाणमध्ये सत्ता प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. जुलमी तालिबानी सत्तेच्या भीतीमुळे स्थानिक नागरिक हवालदिल झालेले आहेत. धर्माच्या  नावाने जनतेवर पुन्हा अतिरिक्त बंधने लादली जातील, या भीतीतून अफगानी एकवटले आहेत. यातून ‘माय रेड लाईन’ नावाचं अभियान आकाराला आलं.
अफगाणमध्ये तालिबानी शासनाच्या काळात महिला व मुलींसाठी विशिष्ट प्रकारची नियमावली तयार करण्यात आली होती. एक प्रकारे सीमारेखा आखून त्यात महिलांनी राहावं असं  सूचवण्यात आलं होतं. त्या सीमेला झुगारण्यासाठी ‘माय रेड लाईन’ आंदोलन सुरू झालं. लाल कलर धोक्याचा रंग मानला जातो. ‘माझ्यासाठी आखलेली लाल रेषा मीच झुगारते’ अशा  स्वरूपाचा संदेश या आंदोलनातून दिला जात आहे. महिलांनीच मूलभूत अधिकारांचा त्याग का करावा? असा प्रश्न या अभियानातून विचारण्यात येत आहे. देशात महिलांसाठी शांततेचं  वातावरण हवंय, अशी मागणीही या कॅम्पेनच्या माध्यमातून केली जात आहे.
अफगाण मुली व महिलांच्या विद्रोहाचं प्रतीक झालेलं ‘माय रेड लाईन’ आंदोलन जगभरात चर्चेचा विषय झालेला आहे. या अभियानाला अफगाणिस्थानातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.  सोशल मीडियावर अफगाण मुलींकडून सुरू झालेल्या या कॅम्पेनला आता तरुण मुले व पुरुषांचीदेखील मोठी साथ मिळतेय. अमेरिका व तालिबानी शासकांचा प्रतीकात्मक निषेध म्हणून  हजारोंच्या संख्येनं अफगाण मुलींनी सोशल मीडियावर मूलभूत स्वातंत्र्य व शांततेसंबधी बाजू मांडायला सुरुवात केली आहे.
विविध वयोगटातील मुली व महिलांनी व्हीडिओ मॅसेजमधून मूलभूत अधिकारांबद्दल जागरूकता अभियान सुरू केलं आहे. याशिवाय चाकोरीबाहेरच्या अ‍ॅक्टिव्हिटी करून मुली निषेध  नोंदवत आहेत. अनेक अफगाण मुलींनी ट्विटर व फेसबुकवरून सायकलिंग, हॉटेलिंग, केटरिंग, शुटिंग, कबड्डी, बॉक्सिंग करतानाचे फोटो अपलोड केले आहेत. अशा प्रकारच्या फोटोतून  तालिबानी धोरणाविरोधात मुलींनी बंड पुकारले आहे.
फरहानाझ फोरोटन नावाच्या पत्रकार व सामाजिक कार्यकत्र्या महिलेच्या प्रयत्नामुळे ‘हॅशटॅग माय रेड लाइन’ हे आंदोलन सुरू झालंय. ‘माझी लेखनी आणि माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’  अशी थीम घेऊन हे आंदोलन सुरू झालं. संयुक्त राष्ट्राच्या अफगाण महिला विंगच्या मदतीने ‘हॅशटॅग माय रेड लाईन’ कॅम्पेन जगभरात पोहोचलं.
मुक्तपणे जगण्याचा अधिकाराच्या मागणीसाठी अनेक महिला व मुली या अभियानाशी जोडल्या गेल्या. असंख्य मुलींनी तालिबान शासक परत आल्यास आमच्यावर बंधने लादतील अशी  भीती व्यक्त केली. व्हिडिओ संदेशातून काही मुलींनी आम्हाला घराबाहेर निघण्यास बंदी करण्यात येईल, अशीही प्रतिक्रिया दिली. अनेक मुलींचे म्हणणे होते की, ‘आम्ही आमच्या  परंपरा, संस्कृती आणि इस्लामिक मूल्यांचा आदर करतो, पण त्यांनी धर्मात नसलेली अतिरिक्त बंधने आमच्यावर का लादावी?’
फरहानाझसोबत कोब्रा शमीम नावाची अ‍ॅथलिट या अभियानात सामील झाली. शमीम एक प्रसिद्ध अफगाण सायकलपटू आहे. तिने प्रतीकात्मक निषेध म्हणून मुलींनी सायकलिंग करून  त्याचे फोटो अपलोड करावे, अशा संदेश आपल्या ट्विटरवरून प्रसारित केला. बघताबघता अनेक अफगाण मुलींनी सायकलिंग करतानाचे हजारो फोटो अपलोड केले. एवढेच नव्हे तर  हळूहळू करत ज्या अ‍ॅक्टिव्हिटीजना तालिबानच्या काळात मुलींसाठी बंदी होती, त्या अक्टिव्हीटीज करून मुलींनी फोटो अपलोड करायची स्पर्धा सुरू झाली.
एवढ्यावरच न थांबता अमेरिका व तालिबान यांच्यामध्ये होत असलेल्या वाटाघाटीच्या बैठकीत मुलींना स्थान मिळावे अशी मागणी पुढे आली. सुडानच्या राजकीय सत्तांतरानंतर ‘हॅशटॅग  माय रेड लाईन’ हे अभियान अधिक गतीमान झालं.
सुडान राज्यक्रांतीची नेतृत्व ‘इआला सलाह’ या तरुण मुलीनं केलं. सरकारविरोधात तीव्र झालेल्या या आंदोलनानंतर तीन दशकापासून सत्तेला चिकटून बसलेले राष्ट्रपती उमर अल बशीर  यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या प्रेरणेतून जगभरातील अनेकजण ‘माय रेड लाईन’ या अभियानाशी जोडले गेले. फरहानाझनं सुरू केलेल्या या कॅम्पेनेला राष्ट्रपती  अशरफ गणी यांचादेखील पाठिंबा मिळाला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष दूत अंजेलिना जोलीनेदेखील या अभियानाशी स्वत;ला जोडून घेतलं आहे. तिने जगप्रसिद्ध ‘टाइम’  मासिकात लेख लिहून सेलिब्रिटी महिलांना या अभियानात सामील होण्याची अपील केले. अशा प्रकारे सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी या कॅम्पेनशी जोडले गेले. अभियानाचा उद्देश  सरकार, तालिबान आणि अमेरिकेवर दबाव निर्माण करावा असा आहे, जेणेकरून महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल हमी दिली जाईल आणि शांतता करारात घाईघाईत कुठलाही अप्रिय  निर्णय घेतला जाणार नाही.
‘हॅशटॅग माय रेड लाईन’ या कॅम्पेनने अमेरिका आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या पुढच्या वाटाघाटीत संयोजकांना बोलवावे असा दबाव तयार करीत आहे. जर अफगाण महिलाना या  परिषदेत निमंत्रित केलं गेलं नाही तर त्यांच्या मूलभूत अधिकारांना डावलण्याची शंका उपस्थित केली जात आहे. अफगाणच्या राजकीय नेत्या फर्खुंदा जहरा नादेरी यांनी ट्वीट करून  सांगितलं आहे की, ‘महिला नेतृत्वाच्या भूमिकेला बेदखल करणे योग्य होणार नाही.’ माजी मंत्री समीरा हमीदी यांनीही मागणी केली आहे की, ‘शांतता परिषदेच्या बैठकीत महिलांना  स्थान देण्यात यावं.’
अफगाण सरकार, तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये होणाऱ्या शांतता परिषदेचा एक प्रकारे या अभियानाने विरोध दर्शवला आहे. एकतर्फी होणारी ही चर्चा लोकशाही व्यवस्थेला बाधक असून ग्रामीण, शेतकरी, आदिवासी, मानवी हक्क संघटना, सामान्य माणसांच्या हक्काचे उल्लंघन आहे, असं मत अभियानातून मांडण्यात येत आहे. महिला हक्काच्या अधिकारांचं संरक्षण करणे, त्यांना सुरक्षित करणे, त्याच्या मानवी अधिकाराचे जतन व्हावं, अशी मागणी या आंदोलनातून केली जात आहे. २००१ साली ९/११च्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या  हल्ल्यानंतर दहशतवादी ओसामाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्थानवर हल्ला केला. हजारो निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतर तालिबान सरकार पदच्युत झाले. त्यानंतर   अमेरिकेनं आपल्या नियंत्रणातील सरकार तिथे स्थापन केलं. तालिबानचा पतन झाल्यानंतर लोकांनी अतिरिक्त बंधनाच्या जोखडातून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला.
तालिबानी सरकारने महिलांना बंदिस्त वातावरणात ठेवलं होतं. त्यांना शिक्षणाची दारे पूर्णपणे बंद केली होती. नियमांचं उल्लंघन केल्यास क्रूर पद्धतीची शिक्षा दिली जाऊ लागली. या क्रूर  शासन पद्धतीचा अफगाणी लोकांत विरोध सुरू झाला होता. तेवढ्यात अमेरिकेने हल्ला करून तालिबान सरकार पदच्युत केलं. तालिबानी गेल्यावर अफगाणी नागरिकांची क्रूर नियमातून सुटका झाली.
२००१पासून अमेरिकेने आपली सैन्य छावणी म्हणून अफगाणचा वापर केला. १३ वर्षांनंतर म्हणजे २०१४ साली अमेरिकेने सैन्य कमी केले. सैन्यबळ कमी होताच आपली गेलेली सत्ता  पुन्हा मिळवण्यासाठी तालिबानी सक्रिय झाले. त्यांनी अमेरिकन सैन्य व अफगाण सरकारवर हल्ले सुरू केले. आता १८ वर्षांनंतर तालिबान पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन  महिन्यापासून तालिबानच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात तालिबानी अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला त्यात ४० सैनिकांचा मृत्यू झाला होता.
चालू महिन्यात २३ एप्रिलला संयुक्त राष्ट्राने एक अहवाल जारी केला. त्यात तालिबान व अफगाण सरकार यांच्याशिवाय झालेल्या हल्ल्यात सर्वांधिक नागरिक मारले गेल्याचं म्हटलं  आहे. २०१९च्या पहिल्या तीन महिन्यात ३०५ नागरिक मारले गेले. या हत्येला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय आणि सरकार समर्थक सैन्याला जबाबदार मानलं.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार देशाच्या अर्ध्या भागावर तालिबानचा ताबा झालेला आहे.
गेल्या वर्षी सरकार आणि तालिबानमध्ये झालेल्या संघर्षात ३ हजार ८०४ लोकं मारली गेली आहेत. युद्ध टाळण्यासाठी वाटाघाटी व शांतता बैठक घेण्याचे निश्चित झाले. पण अमेरिकेच्या  टाळाटाळीच्या भूमिकेमुळे चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोहा येथे होणारी बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित झाली.
दोहामध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी ‘माय रेड लाईन’ कॅम्पेनचे प्रतिनिधी उत्सुक होते. बैठक अनिश्चित काळासाठी रद्द झाल्यामुळे काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. परंतु अभियानाचे सर्व सदस्य सजगरित्या लक्ष ठेवून आहेत. तालिबानी संघटनाकडून होणाऱ्या हल्ल्याचा व लादू पाहणाऱ्या इस्लामविरोधी शासनाचा ते विरोध करीत आहेत. दिवसेदिवस ‘माय  रेड लाईन’ अभियानाची व्याप्ती वाढत आहे.

सध्या राज्यभरात पाणीटंचाईचे जोराचे चटके बसत आहेत. त्यातल्या त्यात मराठवाडा तर होरपळून निघत आहे. एकीककडून ऊन आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई. त्यामुळे नागरिकांना  एकाच वेळी दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी कुठल्या एका व्यवस्थेला दोष देणेही चुकीचे ठरणार आहे. परिस्थिती बिकट असली तरी त्याला  सामुहिकपणे सामोरे जाणे हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी नागरिकांनी सकारात्मकरित्या पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पाणी ही मुलभूत गरज असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने मोठ्या उपाययोजना करायला हव्यात मात्र त्या होताना दिसत नाहीत. अशात शासन व्यवस्थेवर अवलंबून  रहाणेही परवडणारे नाही. या संकटाला सामुहिकपणे सामोरे जायचे असेल तर प्रत्येक नागरिकांने आपल्या मनात दुसऱ्यांविषयी दयेचा भाव आणणे आवश्यक आहे. कमीत कमी  पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तरी अधिक दयाभावाची गरज आहे. गली, मोहल्ला,गाव, शहरातील नागरिकांनी आपल्या भागात एखादी समिती स्थापन करावी. त्या समितीने शासनाची  मदत घेत पाणी घरोघरी निरपेक्ष भावनेने पोहचेल याची काळजी करावी. पैशाची अडचण येत असेल तर सामुहिकरित्या लोकवर्गणी करावी अन् पाणी गावकुसाबाहेरून वाहनाने आणून  गावात वाटप करावे. जेणेकरून लहान मुलं, महिला, वृद्ध यांची पायपीट थांबेल. जे गरीब आर्थिक खर्च उचलू शकत नाहीत त्यांच्यासाठी गाव पुढाऱ्यांनी एकत्र येवून त्यांचा खर्च उचलावा.  असा प्रयत्न एकत्रितपणे केला तर निश्चितच पाणीटंचाईचे अवघड वाटणारे काम सोपे होईल. टँकरलॉबीने मराठवाड्यात लूटीचा डाव सुरू केला आहे. 200 रूपयांचे दोन हजार लिटरचे  टँकर ते आता 400 ते 500 रूपयाला देत आहेत. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन आणि श्रीमंत नागरिकांनी यात आपला आर्थिक सहभाग नोंदविणे  मानवतेच्या दृष्टीकोणातून आवश्यक आहे.

- बशीर शेख

हिरवळीचा रोप वाढायला हवा..!

दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्रातील सगळ्याच परिवर्तनाच्या विचारधारेतल्या चळवळींना  बनारसी घाटांवर नदीत बुचकळून काढावे असे हल्ली वाटायला लागलयं.
सातत्याने बदलत जाणाऱ्या राष्ट्रवादाच्या सत्ताधिशी संकल्पना आणि अधिक सतर्कतेने उतरंडीच्या पार तळाशी पददलीतत्व आपलेसे करणारा मराठी मुस्लिम समाज, संघी सामुहिक  मानसिकतेत दबून भयाच्या काठावर उभ्या असणाऱ्या समुहाला आपल्याशा वाटणाऱ्या सगळ्या बहुजन चळवळींची छुपीलाईन पुन्हा ’मुसलमानाला’ अधिक आश्रित अवस्थेपर्यंत घेऊन  जाते. या सामाजिक कोलाहलात समाजाभिमुख असणाऱ्या मुस्लिमांसाठीच्या जाणकारांच्या चळवळीचे हेतू मधेच ढासळताहेत. व्यक्तीस्तोमाचा, संसर्ग वाढीस लागून खरा स्वार्थी मुखौटा  सामान्यांसमोर येतोय.

पुन्हा हताशा हाती.
रमजानच्या मुबारक महिन्यातल्या उत्साही धावपळीत अठ्ठावीसाव्या रोजावेळी मॉबलिंचिंगमधल्या मोहसीन शेख च्या हत्येला पाचेक वर्ष पूर्ण होतायत. न्यायाच्या नावाने उदोउदो चांगभलच्या प्रतीक्षेत कित्येकांची होरपळ सुरूच आहे. आरक्षणरक्षणाच्या मुद्द्यावरून उसळी मारलेले समाजचिंतक प्रेमी आता सध्या कुठे गायब आहेत कळत नाही. धार्मिकतेच्या अंगानी  सुरू असणाऱ्या सकारात्मक कामातून काही ठोस घडत असतांना विचारवंताचे सामान्य मुस्लिमांपासून तुटणे सुरूच आहे. राजकीय अप्रगल्भतेच्या जाणीवांचा ठपका ठेऊन सरळ मतांची  किमतच शुन्यवत करण्याची चळवळींची खेळी कळायला मार्ग नाही. सामान्य मुस्लिमाच्या जगण्याच्या एकूण वाटांची कोंडी करून त्याला जखडण्याचे सगळे उजवे-डावे प्रयत्न यशस्वी  होतायत. अशा शोषितावर बोलण-लिहिणं, विचार करणं देखील आता बहुजनी समाजपदराशी बाजूला होण्यासारखं आहे. समन्वयाच्या सगळ्या चांगल्या मुद्यांवर केवळ जातीय चर्चा  होताना धर्म आणि त्याहूनही मुस्लिमांच्या प्रादेशिक जाणीवांचा खरा विचार कुठेच आढळत नाही.
समाज कधीही कुणाला प्रबोधन करायला या म्हणून हाका मारीत नसतो. स्वतः ची अस्वस्थता समाजाप्रत आपल्याला खेचून नेते. आपल्या अस्वस्थतेला स्वस्थता देताना लगेचच  समाजाकडून सहकार, सहमती अथवा सकारात्मकतेची अपेक्षा करणे चुकीचेच! केवळ भावनिक तात्पुरते उसने प्रबोधन अवसानघातकी उरेल. प्रादेशिक प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या  पर्यायासकट समाजाशी मिसळत सांस्कृतिक सामाजिक जाण निर्माण करायला हवी. नव्याने येणारे तरूण, जुन्यांच्या यशापयशाचे अनुभव. बदलत्या भिती सॉफ्टवेअरचे नॉलेज.  व्यक्तीस्तोमापलिकडे सामुहिक समाजनिष्ठा बाळगणाऱ्या धडपड्या कृतीशिल कार्यकर्ताग्रुपची जिल्हानिहाय बांधणी व्हायला हवी.
तुकड्यातुकड्यांनी का होईना पण शिक्षण, अर्थकारण, सामाजिक सुरक्षितता या मुद्यांवर भरीव ठोस ऊर्जा निर्माण करणे गरजेचे. असे प्रयत्न होताहेत सर्वत्र पण पुन्हा तेच  व्यक्तीस्तोम, स्वंयअहंकार यामुळे प्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी नाहीच पडतं. अशा समुहसंस्था, सामाजिक-सांस्कृतिक ग्रुप्स, विचारवंताच्या वैचारिकता. शिक्षण, धर्म, रोजगार  यातील योग्य समन्वय साधणाऱ्याचा संवाद महत्त्वाचा पर्याय असेल. लोकशाहीचे कित्येक खांब ढासळण्याची सगळी तयारी केलीय फॅसिस्टांनी, सत्ता कुणाचीही असली तरी ’नंबरदोन’चा  छुपा शिक्का मुस्लिम मानसिकतेवर गडदच असणार आहे.

’मुफलीसी मुसलमानाचा’ अधोरेखितपणा त्रासदायक.
स्वतःला गाडून घेण्याची ताकद मिळत राहो..
हिरवळीचा रोप वाढायला हवा.. आता ’ईद’ला हीच दुवा.
उगीच काय कालच्या पिढ्या तशाच संपल्या?
उगीच काय ही फुले आम्ही जपून ठेवली?
पराभवापलीकडे अजून युद्ध चालले, अजून माणसेच ही खरीखुरी न पेटली! (भेटली)


- साहिल शेख
8668691105

मुंबई (मजहर फारूकी)
रमजान महिन्याच्या प्रारंभीच जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रकडून समाजातील गरीब, मिस्कीन नागरिकांसाठी महिनाभराचे राशन भरून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे  महाराष्ट्रातील 44 ठिकाणच्या 9 हजार 351 गरीब कुटुंबांना 1 कोटी 15 लाख 77 हजार 300 रूपयांचे रमजानचे महिनाभराचे राशन किट मोफत पोहोचविण्यात आले. ज्यामध्ये गहू,  तांदूळ, तूर दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, गोडतेल, साखर, चहापत्ती, मसाला पावडर, खजूर आणि रूह अफजा आदीचा समावेश आहे.
जमाअते इस्लामी हिंद समाजसेवा विभागाकडून प्रत्येक वर्षी रमजानच्या प्रारंभी गरीब कुटुंबांसाठी राशन किट वितरित केले जाते. गतवर्षी 9 हजार 760 कुटुंबांना राशनचे महिनाभराचे  किट वितरित करण्यात आले होते. यंदाचा आकडा वाढला असून, अजून काही जिल्ह्यांची आकडेवारी येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. तसेच ईदच्या समोर शिरखुर्मा किटचेही  वितरण करण्यात येते. गतवर्षी 3 हजार 201 गरीब कुटुंबापर्यंत शिरखुर्मा किटचे वितरण करण्यात आले होते. त्याची किमत 14 लाख 41 हजार 500 रूपये होती. जमाअत नेहमी  समाजातील सर्व घटकांतील गरीब कुटुंबापर्यंत होईल तेवढा प्रयत्न करीत त्यापर्यंत पोहोचते. त्याचे सर्वेक्षण केले जाते. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते. त्यांची इत्यंभूत  चौकशी करून राशन किट, शिरखुर्मा कीट दिली जाते. ज्या नागरिकांना हे कीट दिले जाते त्यांचे प्रत्येकवर्षी ओळखपत्रही जमात जमा करून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे खऱ्या  गरजवंतांपर्यंत राशन किट पोहोचविण्यात यश मिळते. विशेषतः रमजानमधील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जकातीचा या निधीमध्ये मोठा भाग असतो. जमाअते इस्लामी हिंद ही धार्मिक  सद्भाव वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. दावते इफ्तार, ईद मिलन, मस्जिद परिचय, बिनव्याजी वित्तीय संस्था, मुल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, गरीबांचा अत्यल्प दरामध्ये उपचार करणारे वेगवेगळे रूग्णालये आणि मॅटर्निटी होम इत्यादींच्या मार्फतीने व्यापक प्रमाणात समाजसेवेचे काम जमातद्वारे अखंडपणे केले जाते. तसेच प्राकृतीक  आपदा आल्यास जातीधर्माच्या पलीकडे जावून सर्वांची मदत करण्याकडे जमाअतचा कटाक्ष असतो.

जवाल-ए-कौम की तो इब्तदा वो थी के जब
तिजारत आपने की तर्क, नोकरी कर ली


जागतिक व्यापाराचा पाया हा व्याजाधारित भांडवलावर उभा आहे. व्याजदरात वाढ होईल या भीतीने सतत मालाचे दर चढे ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. म्हणून बाजारात वस्तू  चढ्या किमतीने विकल्या जातात. नाईलाजाने लोकांना त्या घ्याव्या लागतात. व्याजाला नफा समजण्याची सामुहिक चूक केल्यामुळे हा भुर्दंड सामान्य माणसांना बसतो.

इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था असल्याकारणाने व्यापारसुद्धा इस्लामी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की मुस्लिम मार्केटमध्ये  वस्तू ह्या स्वस्त मिळतात. याच आठवड्यात लोकसत्ताच्या दोन प्रतिनिधींनी मुंबईच्या मुहम्मदअली रोडला रमजाननिमित्त भेट देउन रूचकर आणि पौष्टिक अन्न अवघ्या पाचशे रूपयात दोन माणसाचे कसे मिळते? यावर फेसबुक लाईव्ह केला होता. मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त मिळण्याचे कारण म्हणजे व्याज विरहित भांडवलावर व्यापार करण्याकडे  मुस्लिम व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यामुळे त्याला व्याजदर वाढतील याची भीती नसते. शिवाय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी व्यापारामध्ये कमी नफा घेण्याबद्दल जी सक्तीने ताकीद  दिलेली आहे त्याचेही मुस्लिम व्यापारी पालन करतात. या दोन कारणांमुळे मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त असतात.

इस्लामी व्यापाराची तत्वे
इस्लामी व्यापाराचा उद्देश भांडवलशाही व्यवस्थेमधील व्यापाराप्रमाणे केवळ नफा कमविणे नाही. नफ्याबरोबर ग्राहकांची सेवा करणे हा सुद्धा इस्लामी व्यापाराच्या संकल्पनेचा अत्यावश्यक  भाग आहे. म्हणून श्रद्धावंत मुस्लिम जेव्हा व्यापार करतो तेव्हा कमी नफा व कमी भाव ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष असतो. इस्लामी व्यापार हा नैतिकतेवर आधारित व्यापार असतो. या  संबंधी प्रेषित सल्ल. यांचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे -
1. ’’ तुम पर तिजारत (व्यापार) को इख्तीयार (अंगीकार)करना लाजीम (अनिवार्य) है. क्यूंके, रिज्क (उपजिविका) के दस में नौ हिस्से फकत इसमे हैं.’’(संदर्भ : अहयाउल उलूम-इमाम  गजाली, भाग वल-नश्र-व-तौज़ी बैरूत, पान क्र. 504). याचा अर्थ उपजिविकेच्या 10 दारांपैकी 9 दार हे व्यापारातून उघडतात. त्यामुळे मुस्लिमांनी व्यापाराला प्राथामिकता देतात हे ओघाणे आले.
2. ’’आदमी का अपने हाथ से कोई काम करना और हर वो तिजारत जो पाकिजगी के साथ हो ’’(मस्नद अहेमद). या हदीसमध्ये पाकिजगी अर्थात पावित्र्याने तिजारत अर्थात व्यापार  करण्याची सूचना प्रेषित सल्ल. यांनी दिलेली आहे.
3. ’’सच्चा और अमानतदार (विश्वासपात्र) ताजीर (व्यापारी) कयामत के दिन अंबिया (प्रेषित), सिद्दीकीन (खरे लोक) और शोहदा (शहीद लोक) के साथ उठाया जाएगा.’’ (संदर्भ : तिर्मिजी).
वरील मार्गदर्शनावरून इस्लामी व्यापारामध्ये खरेपणा आणि पावित्र्याला अतिशय महत्व दिलेले आहे. येथे इतर व्यापारांप्रमाणे जनहिताच्या विरोधात जाऊन त्यांना चढ्या भावाने माल  विकता येत नाही. साधारणपणे सुरूवातीच्या काळापासूनच मुस्लिमांचा कल व्यापाराकडे असल्याचे दिसून येते. भारतातही मलबार येथे सातव्या शतकात मुस्लिम व्यापारी आले होते  याची नोंद इतिहासात नमूद आहे. त्यांनी बांधलेली पहिली मस्जिद जिचे नाव ’चिरामन जामा मस्जिद’ आजही केरळच्या मलबारमध्ये उभी आहे. चीनमध्ये सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांनी  व्यापारानिमित्त प्रवेश केला होता. याचीही नोंद चीनच्या इतिहासामध्ये आहे. एका रिवायतीप्रमाणे चीनमध्ये 8 व्यापाऱ्यांचा एक जत्था माल घेऊन गेला होता व तेथेच स्थायीक झाला.  त्यांच्या सचोटीच्या व्यापाराला चीनच्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ते आठही मुस्लिम व्यापारी त्याच ठिकाणी स्थायीक झाले. आज चीनमध्ये जी आठ कोटींपेक्षा जास्त  मुस्लिम जनसंख्या आहे ती त्या आठ व्यापाऱ्यांचाच विस्तार असल्याची आख्यायिका चीनमध्ये प्रसिद्ध आहे. चीनवर कधीच कुठल्या मुस्लिम राजाने आक्रमण केल्याचे चीनी इतिहासात  नमूद नाही. त्यामुळे चीनमध्ये इस्लामचा प्रचार मुस्लिम व्यापाऱ्यांकडूनच झाला यावर विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही.

श्रेष्ठ व्यापारी अब्दुरहेमान बिन औफ रजि.
हजरत अब्दुरहेमान बिन औफ हे आशरा-ए- मुब्बशरा (ते दहा साहबी रजि. ज्यांना जीवंतपणीच जन्नतमध्ये प्रवेश देण्यात आल्याची आनंदवार्ता देण्यात आली होती.) मध्ये सामील   असलेले प्रेषितांचे सोबती होते. ते जेव्हा हिजरत करून मदिनामध्ये गेले तेव्हा त्यांची जोडी मदिनाच्या एका अन्सारी व्यक्तीबरोबर प्रेषितांनी लावून दिली. तेव्हा ते अन्सारी साहबी अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांची मदत करू इच्छित होते. तेव्हा त्यांनी मदत घेण्यास साफ इन्कार केला व त्यांना फक्त दोन प्रश्न विचारले. 1. मार्केट कुठे आहे 2. मार्केटमध्ये  कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे. या दोन्ही प्रश्नाची उत्तरे मिळाल्याबरोबर अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी उंटांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या घंट्यांचा व्यापार सुरू केला व  पाहता-पाहता त्याच्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यापाराचा विस्तार केला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामधून यहूदी व्यापाऱ्यांना जवळ-जवळ हुसकावून  लावले. यहूदी व्यापारी हे चढ्या दराने वस्तू विकत व त्यांचा व्यापार सर्व चक्रवाढ व्याजावर आधारित पतपुरवठ्यावर अवलंबून होता. म्हणून मार्केटमध्ये वस्तू अतिशय महाग होत्या.  यहूदींची त्यावेळेस व्यापाराच्या सर्वच विभागांमध्ये एकाधिकारशाही होती. ती अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी मोडून काढली. ते छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी आणि अत्यल्प नफा  या दोन तत्वावर माल देऊ लागले. त्यामुळे त्यांच्याकडून माल खरेदी करण्याची स्पर्धाच जणू किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये लागली आणि पाहता-पाहता त्यांचा व्यापार इतका वाढला की,  जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या चारही पत्नींना इतकी संपत्ती मिळाली की त्या मदिना शहरातील श्रीमंत महिलांमध्ये गणल्या जाऊ लागल्या.
प्रेषित सल्ल. यांच्या काळापासूनच मुस्लिमांच्या कमर्शियल सेन्सचा अनुभव जगाला येऊ लागला होता. प्रेषित सल्ल. यांच्या नंतर शंभर वर्षात मुस्लिमांचा व्यापार जगातील तीन खंडामध्ये विस्तारीत झालेला होता. तिन्ही खंडातील  लोक मुस्लिम व्यापाऱ्याकडूनच माल घेण्यासाठी दुकान उघडण्यापूर्वी रांग लावून उभे राहत.’’ इस्लामी तिजारत’’ हा एक ब्रँड नेम त्याकाळी झालेला होता. मुस्लिम व्यापाऱ्याकडून वस्तू  घेणे म्हणजे ती उत्कृष्ट दर्जाची आणि रास्त दराची असेल याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता. मुस्लिम व्यापारी ज्या वस्तू विकत तेव्हा त्या वस्तूं संबंधी इत्यंभूत  माहिती ग्राहकांना सांगत. पावसामुळे ओला झालेला गहू ओला आहे म्हणून कमी दरात देत आहोत हे सांगून विकत. दुसरे व्यापारी ओल्या गव्हावर सुके गहू टाकून न सांगता विकत.  एखाद्या कपड्यामध्ये दोष असेल तर मुस्लिम व्यापारी तो दोष स्वतःहून ग्राहकांना दाखवून देत आणि कमी किमतीत विकत. घेतलेली वस्तू ग्राहकांनी परत आणली तर आनंदाने ती  परत घेत व त्याची संपूर्ण किमत त्याला परत देत. ते कधीही शपथा घेऊन माल विकत नसत. या छोट्या-छोट्या नितीमान गोष्टींची भूरळ ग्राहकांवर पडत असे व मुस्लिम लोकांच्या  दुकानावर ग्राहकांच्या उड्या पडत.
पूर्वीसारखे व्यापार तज्ज्ञ मुखलीस (प्रामाणिक) मुस्लिम व्यापाऱ्यांची संख्या आज त्यामानाने कमी झालेली आहे. तरी अल्लाहची कृपा आहे श्रद्धावान मुस्लिम व्यापारी आजही लाखोंच्या  संख्येत देशाच्या प्रत्येक शहरात विखुरलेले आहेत. मात्र इस्लामी व्यापार संहितेची जाण नसलेले, अप्रामाणिक, अश्रद्धावान, फक्त नावापुरत्या मुस्लिम व्यापाऱ्यांचा सुद्धा मार्केटमध्ये  बऱ्यापैकी सुळसुळाट झालेला आहे. त्यांच्यामुळे इस्लामी व्यापाराच्या नाममुद्रेला मोठा फटका बसत आहे.

इस्लामी व्यापाराची मूलतत्वे
1. कुठलाही व्यापार सुरू करण्यापूर्वी त्या व्यापारासंबंधीच्या बारीक-सारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती करून घेणे, शक्य झाल्यास संबंधित वस्तूंच्या व्यापाऱ्याकडे काही दिवस काम करून त्या व्यापारासंबंधी प्रशिक्षण घेणे.
2. ज्या वस्तू आपल्या मालकीच्या नाहीत किंवा ताब्यात नाहीत, त्यांचा सौदा कधीच करू नये.
3. ग्राहकाला वस्तू देण्यापूर्वी वस्तू संबंधी इत्यंभूत माहिती ग्राहकाला देऊन त्याचे समाधान करणे व त्यानंतरच ती वस्तू त्याला विकणे. विशेषतः वस्तूमध्ये काही वैगुण्य असेल तर ते ठळकपणे ग्राहकाला समजेल अशा पद्धतीने समजून सांगणे.
4. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करण्याचा प्रामाणिक सल्ला देणे. अनेक व्यापारी ग्राहकाला गरज नसतांना अनेक वस्तू गोडबोलून विकून टाकतात. असे करण्यापासून मुस्लिम व्यापाऱ्याला प्रेषित सल्ल. यांनी सक्तीने मनाई केलेली आहे.
5. ग्राहकाला वस्तूची किंमत स्पष्टपणे सांगणे. अनेक व्यापारी वस्तू विकतांना, ’’साहेब तुम्ही घ्या तर खरं! तुमच्याकडून आम्ही काय जास्त घेणार का?’’ सारखी वाक्य बोलून  साखरपेरणी करतात व ग्राहकाला फसवतात. सकृतदर्शनी मान देऊन त्याची मान कापतात.
6. जर कोणाला उधार माल द्यायचाच असेल तर तो व्यवहार लिहून घ्यावा. ज्यामुळे दोघांच्याही मनामध्ये किंतू राहणार नाही.
वरील तत्वांवर आधारित व्यापार केला गेला तर कोणत्याही मार्केटमध्ये व्यापारामध्ये जम बसविता येतो. मात्र वरील तत्वांवर विश्वास ठेऊन त्यांच्यावर अंमलबजावणी करणे यासाठी  मजबूत इमान आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहण्याची क्षमता लागते. आजकालच्या मार्केटमध्ये अशा लोकांची प्रचंड कमतरता आहे. रातोरात श्रीमंत होण्याकडे लोकांचा कल आहे. प्रत्येकाला वाटते की अल्पावधीतच आपण मोठी संपत्ती कमवावी. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाण्याकडे आजच्या व्यापाऱ्यांचा कल दिसून येतो. निवडणुकांमध्ये राजकीय  पक्षांना मोठी रक्कम ’निधी’ म्हणून व्यापारी देतात आणि ज्यांना निधी दिला ते निवडून आले की, त्यांच्याकडून आपल्या व्यापारास अनुकूल अशा योजना आणि कायदे त्यांच्याकडून  करून घेतात. या व्यवहारामध्ये व्यापारी आणि राजकीय नेते यांचाच लाभ केंद्रस्थानी असतो. या प्रक्रियेमध्ये सामान्य ग्राहकाला कुठलेच स्थान नसते. म्हणून आज अव्वाच्या सव्वा  दरामध्ये लोकांना वस्तू खरेदी कराव्या लागतात. या महागाईला तोंड देण्यासाठी मग ज्याला जसे जमेल, जेथे जमेल तसे व तेथे लोक भ्रष्टाचार करून वरकमई करून महागाईला तोंड  देण्याचा प्रयत्न करत असतात. यात मरण होते ते सामान्य कष्टकऱ्याचे, शेतकऱ्याचे. कारण शेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही. समाजाच्या अंतिम माणसाला, जो की भ्रष्टाचार करू  शकत नाही, चढ्या दराने वस्तू घ्याव्या लागतात. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिकच रूंद होत जाते.
इस्लामी व्यापारांच्या नीतिनियमांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून आपल्या तरूणांना व्यापाराकडे वळविण्याची मोठी जबाबदारी मुस्लिम समाजावर आहे. या संदर्भात थ्री टीज अर्थात तालीम (भौतिक शिक्षण), तरबियत (इस्लामी संस्कार) आणि तिजारत (मुल्याधिष्ठीत व्यापार) कडे तरूणांना वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेवटी  अल्लाहकडे दुआ करतो की, मुल्याधिष्ठीत इस्लामी व्यापाराच्या फायद्यांची आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव निर्माण व्हावी आमच्यावर कृपा कर. (आमीन).

- एम.आय.शेख
9764000737

आजच्या न्यायालयात होणारे नोंदणीकृत विवाहाचा पाया इस्लामने अनेक शतकांपूर्वी घातलेला आहे. आजच्या नोंदणीकृत विवाहाप्रसंगी विधिज्ञ आणि काही साक्षीदार यांच्या  न्यायाधीशासमोर रीतसर विवाह होतो. इस्लाममध्ये विवाह तर होतोच पण त्या विवाहाची घोषणादेखील होते.

’’इस्लाम हे इच्छितो की विवाहाची घोषणा व्हावी आणि ती सर्वांसमोर व्हावी. कारण समाज या गोष्टींपासून परिचित व्हावा की अमुक पुरूष आणि स्त्री दाम्पत्यासंबंधात बांधले आहेत. ते एकमेकांचे जीवनसाथी बनून गेले आहेत आणि याच्या नैतिक आणि संवैधानिक उत्तरदायित्वांना उचलण्याचे वचन आणि प्रतिज्ञा करून घेतली आहे, जेणेकरून आवश्यकता पडल्यावर  स्वयं समाजसुद्धा त्यांच्या उत्तरदायित्वांना निभवण्यात त्यांना सहायता करू शकेल. या विषयात त्यांच्याकडून कमतरता झाली तर पकड करू शकेल. यासाठी विवाहाच्या प्रमाणासाठी  कमीतकमी दोन साक्षीदार असणे जरूरी ठरविले गेले आहे. याशिवाय हा विवाह होऊ शकत नाही.
या ठिकाणी साक्षीदाराची संकल्पना आपण जी एकोणीसाव्या शतकात (भारतात) अस्तित्वात आली. ती अगदी प्राचीन काळापासून इस्लामने स्वीकारली आहे. म्हणून इस्लामने स्त्रीला  प्रतिष्ठेच्या उंच शिखरावर ठेवले आहे. कारण आपण विटा, सिमेंट, चुना, लोखंड, लाकूड यापासून बांधलेल्या इमारतीला बाह्यरूप, आकार बहाल होतो, पण त्या इमारतीला घराचा दर्जा,  घरपण निर्माण करू देते ती एक स्त्री! मानवाची निर्मिती आई-वडील यांच्यापासून होते खरे, पण त्याचा सर्वात प्रथम संबंध आईशी येतो. नंतर त्याच्या समीप सर्व परिवार असल्याने तो  त्याच्याशी समरस होतो. या परिवारातून त्याला सामाजिकतेचा धडा मिळतो. या जगात आल्यावर मानवाला सर्वप्रथम ज्या सहाय्यतेची आवश्यकता असते, ती त्याच्या आईपासून  मिळते. त्याचबरोबर कुटुंबव्यवस्थेचे अस्तित्व फक्त घरातील स्त्रीवरच अवलंबून आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची इच्छापूर्ण करण्याची जबाबदारी घरातील स्त्रीवर असते. परिवारातील   सर्वांची मर्जी राखत-राखत ती तारेवरील कसरत करीत असते. त्यातून ती प्रत्येकाला समाधानी करण्याचा प्रयत्न करते. ती प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास करून त्यांच्याशी वर्तन  करते. परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी ती हिरहिरीने सहभागी होते. ’परिवार’ हा समाजव्यवस्थेचा कणा आहे. कुटुंब लहान मोठे असू शकते. कुटुंब मजबूत असेल तर समाज  मजबूत आणि कुटुंब कमजोर तर समाज कमजोर. साहजिकच या अशक्त कुटुंबाने समाजात शिथिलता निर्माण होते आणि या कुटुंबाला दणकट बनविण्याचे काम फक्त घरातीलच स्त्रीच  करते. घरात अनेक मतभेद असतात. या मतभेदातून स्त्री मार्गही काढू शकते आणि त्या समस्या गहनही करू शकते. म्हणून स्त्री आणि कुटुंब याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व  दिले आहे. कारण कुटुंब केवळ सामाजिक संस्थाच नाही तर त्याला धार्मिक आधार आहे. जी व्यक्ती कौटुंबिक पद्धतीने (इस्लाम) जीवन जगते ती जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेते.  मृत्यूपश्चात जीवनासाठी नैतिकतेने आचरण करते. यालाही स्त्रीचे फार मोठे सहकार्य असल्याशिवाय होत नाही. स्त्री-पुरूष एकत्र कुटुंबात जीवन व्यतीत करीत असताना दोघांमध्ये  मतभेद, विवाद निर्माण होतच असतात. हे मतभेद स्वतः पती - पत्नीनेच सोडविले पाहिजेत. त्यात पुरूषाने स्त्रीच्याप्रती सहानुभूती दाखवावी. तसेच मोठ्या अंतःकरणाने स्त्रीला समजून  घ्यावे. एखाद्या बाबतीत आपली पत्नी चुकत असेल तर तिला सहनशीलतेने समजावून सांगावे. निर्माण झालेल्या मतभेदांना विशिष्ट सीमा असते, त्या सीमेपार जाऊ नये. या  मतभेदावर काही मार्ग निघत नसेल तर दोघांचे पंच एकत्र बोलावून दोघांना समजावून सांगून पुन्हा आहे त्याच परिवारात मतभेदाशिवाय राहावयास त्या दोघांमध्ये समेट निर्माण करावा.

देशाचा नागरिक म्हणून, लोकशाहीची निष्ठा अढळ राखत आपल्या जाणिवांना सजग ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीची जाणीव ही त्याच्या आसपास परिसरातील  सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीतून तयार होत असते. या जाणिवेला अधिक सक्षम करण्याचे कार्य ’वाचन’ करत असते. हळूहळू विकसित किंवा पक्क्या होत  जाणाऱ्या जाणिवा या गाव-शहर संस्कृतीशी निगडीत राहतात. पण अलिकडच्या दशकभरात सगळ्यांनाच सत्ताधिशांच्या जाणीवांचे ’ओझे वाहक’ मारूनमुकटून बनविण्यात आलं आहे. या  दशकभरात अनेक संज्ञा किंवा टर्मस सर्वसामान्यांच्या माथी मारल्या गेल्या. सामान्यांच्या जगण्यासाठीच्या, धडपडीच्या ज्या जाणीवा बुद्धीकुवतनुसार विकसित असतात त्या जाणिवा,  विचारांना आपल्या फ्रेममध्ये बसविण्याचा आग्रही खटाटोप अतिरेकी झाला. त्यातूनच लोकसंस्कृती म्हणजे रोजच्या जगण्याच्या गोष्टी व धर्मसंस्कृती यात गोंधळसंघर्ष सुरू झाला. याच  गोंधळाच्या पेरणीचा फायदा काही तकलादू धर्ममार्तंडानी राजकीय पक्ष पार्ट्यांना करून दिला.
उदार पूर्वीच्या शुभेच्छांना, कोणत्याही प्रकारचा वास येत नव्हता. आज सदिच्छा, शुभेच्छा, सण-सणवार, जयंती पुण्यतिथी सोहळ्यांना जातीय अस्मितेचा रंग, द्वेष खोडसाळपणाचा वास  येतो. सोशल ते कॉमन मीडियातून बोकाळलेला हा गडदभाव सौहार्द निर्माण करण्यापेक्षा अनेक भिंती पक्कं बांधतो आणि भीती नक्की होते. देशाची राजसत्ता सांगेन, पसरवेल तीच  राष्ट्रवादी भूमिका किंवा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वंकष भूमिकांच्या पदराआड लपवून पद्धतशीर तीव्र केलेल्या तुकड्यांच्या जात अस्मिता, या एकूण भितीस पोषक, भय निर्माण
करणाऱ्या ठरल्या आहेत.
’लोकशाही’ची व्याख्याच भयग्रस्त असेल तर जातीपल्याड ’धर्म’ म्हणवून वेगळेपण अधोरेखित केल्या गेलेल्या मुस्लिम समाजाचे जाणीवप्रश्न पुन्हा उपरे परके किंवा बाजूलाच फेकले  जाताहेत. दिवंगत झालेल्या, शहिदलेल्या विचारवंताला मोठं करून वर्तमानसमस्या विनाआकलनात सोडवू पाहणाऱ्या बावळट विचारवंताचा सूळसूळाट माजलाय. यावर ज्या पद्धतीने काम  किमान सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे, त्यात योग्य ’मुस्लिम जाणीवा’ विकसित झाल्याचे आशादायी चित्र आज दिसत असले तरी ’एकोपा’ नाहीसा होईल अशा भितीचे संकेत ही  खुणावतायत.
आरक्षणाच्या चळवळीचा बोलबाला असताना त्यांची कार्यशैली, कार्यान्वितता यावर मुस्लिम म्हणून कुणी चिकित्सा करताना दिसत नाही. आरक्षणाच्या बरोबरीने ’रक्षणाच्या’ गोष्टीचा  उहापोह कितीसा घेतला. साहित्य सौंदर्य सांस्कृतिकतेला नव्याने ऊर्जा देणारी किती मेहनत कुणी घेतली! केवळ धर्मसंस्था विकसित करताना सामान्यांच्या भिती-गाव मर्यादाची समज  झाली का? अशांमध्ये आण्णा, बाबा, रामदेव, साध्वी सारखे येतात नि जातात. गुरूजी त्याचा प्रभाव मात्र द्वेषफैलावात अग्रेसर राहतो. आजच्या घडीला ’मुस्लिम समुहाचे’ आम्हीच भले  करू शकतो असे म्हणणाऱ्यांची वर्गवारी करायला पाहिजे. देशभरचा मुस्लिम त्याची एकूण मानसिकता, प्रदेशनिहाय गावगाड्याचा एकरूप असणारा मुस्लिम त्याच्या समस्या, त्याची  राजकीय अडचण, बौद्धिक प्रगल्भता, धार्मिक मांडणीतल्या त्याला जाणवणाऱ्या मर्यादा, त्याची साहित्य सांस्कृतिक ओळख यावर काम करणाऱ्यांनी अधिक सजग काम करायला हवे.  अन्यथा धबधब्याच्या कोसळण्याचे हंगामीपण अंगी बाळगून पुन्हा धर्म / राजस्तेच्या भांडवली आमिषाला बळी जाऊन अख्खा समाज वेठीसच धरला जाईल. प्रश्न दशदिशांनी आपल्यावर   आदळत असताना,’आम्ही म्हणतो तेच खरं’ असं न मानता... जीथून जसे जे-जे पोषक करता येईल ते-ते करायला हवे. रमजानच्या मुबारक महिन्यात त्यागाच्या जाणिवांची सर्वव्यापी  सजग वाढो.. समाजाची समज विकसित होत मानवकल्याणाच्या भूमिकेचा जोमदार उच्चार होवो इतकेच.

’हंगामा बडा करना मेरा मक्सद नहीं...
हम सबके सीने में आग लगनी चाहिए.’

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
9923030668

लोकशाही समाजव्यवस्था स्विकारली की, ठराविक कालावधीनंतर घटनेतील तरतुदीनुसार निवडणूका ह्या घ्यायलाच लागतात. निवडणूक म्हंटले की, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे  आलेच.शिवाय प्रचाराचे रणकंदनच जणू माजलेले असते.२०१४ नंतर यंदा २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आरोप प्रत्यारोप सुरू  झाले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजेच राहूल गांधी यांच्या वर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे नेते राहूल गांधी यांना पप्पू म्हणून हिणवत होते, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीठ चौकीदार चोर है असे म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राफेलचा घोटाळा, फसलेली नोटा बंदी,जी.एस.टी., मल्ल्या,आदाणी, अंबानी,धीरज मोदी यांचा  कर्जबुडवेपणा, महागाई, बेकारी हे मुद्दे काँग्रेसकडून चर्चेत आले, तर काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना झालेल्या घोटाळ्यांची चर्चा व ६० वर्षे सत्तेवर राहून ही देश पिछाडीवर नेला, तसेच काँग्रेसमधील घराणेशाही याविषयी भाजपने अक्षरश: रणकंदनच माजविले. हे सर्व होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील मागच्या सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे ३५  शेतकऱ्यांनी कंटाळून अखेर आत्महत्यां केल्या आहेत, याबद्दल कुठल्याही राजकीय पक्षांनी गंभीर दखल घेतलेली दिसली नाही. निवडणूक प्रचारात आणि धामधुमीत शेतकरी आणि शेतमजूर, तसेच त्यांच्या आत्महत्यां दुर्लक्षित राहिल्या आहेत.
शासकीय पातळीवर अधिकारी व इतर कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असल्याने व कडक आचारसंहिता असल्याने आत्महत्या करणारे शेतकरी पात्र-अपात्र ठरविण्यासाठी  शासकीय अधिकारी यांची बैठकच मार्च व एप्रिल महिन्यात झाली नाही, असे समजते.त्यामुळे आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब मदतीपासून वंचित राहिल्याचे दिसून येते आहे. निवडणुकीच्या पूर्वी विरोधी पक्ष नेते आत्महत्यां केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देत होते. सत्ताधारी पक्षांवर तुटून पडण्यासाठी या शेतकरी आत्महत्यांचे  मोठे भांडवल करून सत्ताधारी पक्षाला नामोहरम केले जायचे. सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी व नेते डोळ्यात उसने अश्रू आणून आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना भेटून आपणच  शेतकर-यांचे तारणहार आहोत असे दाखवायचे.मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात या आत्महत्यांग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विरोधी व सत्ताधारी पक्षाचे  कोणीही गेले नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पहापळ या गावातील धनराज बळिराम नव्हते या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून भाजप सरकारचा धिक्कार करीत  काँग्रेस सरकार चांगले होते असे लिहून ठेवले आहे.पण असे असले तरीही सत्ताधारी भाजप चे नेते दूरच राहिले, पण सातत्याने किमान शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बाजूने गळे  काढणारे काँग्रेसचे नेते सुध्दा त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी फिरकले ही नाहीत. ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीच्या काळात गुढीपाडव्याच्या रात्री राळेगाव तालुक्यातील वडगाव येथील श्रीजित हाते या तरुण शेतकऱ्यांने झाडाला फास लावून आत्महत्या केली.तर याच तालुक्यातील किन्ही  जवादे या गावातील मधुकर तातू निगुरे या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.शेतात काम नसल्याने तो गावाजवळ असलेल्या कालव्याच्या कामावर गेला होता,त्याच ठिकाणी  त्याने आत्महत्या केली.घाटंजी तालुक्यातील मानोली येथील सुभाष नामदेव लेनगुरे या शेतकऱ्याने निवडणूक प्रचाराच्या रणधुमातच आत्महत्या केली,मात्र या आत्महत्यांकडे ना सरकारने  लक्ष दिले,ना विरोधी पक्षांनी.ह्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दबून गेल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने भाजपशी युती केली आहे असे  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराच्या भाषणात सातत्याने सांगत होते. यवतमाळ जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी आत्महत्या  केलेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला,मात्र गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे, यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील  २ हजार ४८ गावातील खरीपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ टक्के असल्याने या गावातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत मदत मिळाली पाहिजे,नव्हे नव्हे ती आवश्यक ही आहे,पण  प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत, आचारसंहिता असल्याने याचा विचार करायला वेळ नाही, आणि राजकीय नेते मतदानाची आकडेवारी करण्यात  गुंतलेले दिसत आहेत.त्यामुळे आज तरी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कडे पहायला कुणाला ही वेळ नाही, निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकरी राजा खरोखरच दुर्लक्षित राहिला  आहे,असे दिसुन येते आहे. हा देश कृषीप्रधान देश आहे, शेतकरी राजाला बळीराजा म्हणतात, शेतकरी टीकला तर देश टिकणार आहे, असे असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीच  मनापासून प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाहीत.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२

(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील दारूचे प्रमाण 2025 पर्यंत 10 टक्क्याने कमी करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. परंतु, या ध्येयाला हरताळ फासण्याचे काम आपल्या देशात सुरू  आहे. जगप्रसिद्ध लान्सेट मासिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 1990 ते 2017 या 27 वर्षाच्या कालावधीत भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या 38 टक्क्यांनी वाढली आहे. 1990 मध्ये एक माणूस वर्षाला सरासरी 4.3 लिटर दारू पीत होता. तर 2017 मध्ये त्याचे प्रमाण वाढून 5.9 लिटरवर पोहोचले आहे. 2017 ते 2019 मध्ये यात आणखीन वाढ  झाली असेल, यात शंका नाही.
जगामध्ये उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशामध्ये पूर्वी मद्यपानाचे प्रमाण वाढलेले होते. मात्र मागच्या काही काळामध्ये या देशामध्ये मद्यमापानचे प्रमाण एक तर स्थिर आहे किंवा  कमी झालेले आहे. मात्र मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांच्या देशात वाढ झालेली आहे. या अहवालात असाही अदांज व्यक्त करण्यात आलेला आहे की, 2030 पर्यंत जगातील 50 टक्के  लोक मद्यपान करतील.
मद्यपान हे आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहित आहे. दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभर अनेक उपक्रम राबवित आहेत. तरी परंतु,  मद्यपींच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

मद्यपान आणि इस्लाम
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मद्याला वाईट गोष्टींची जननी म्हटली आहे. दारूच्या सेवनानंतर माणसामध्ये कृत्रिम ऊर्जा निर्माण झाल्याचा भास होतो, मात्र हा केवळ भासच असतो  वास्तविकता वेगळी असते. माणसाची जी नैसर्गिक शक्ती असते त्यालाच मद्यपानाने मोठी हानी पोहोचते व दारूचा अंमल उतरताच माणसाला ग्लानी आल्याचा अनुभव येतो. दारूच्या  सेवनामुळे फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक हानी सुद्धा होते. अनेक मनोविकार दारूच्या आहारी गेल्यामुळे उत्पन्न होतात. दारू सारखी वाईट सवय दूसरी नाही. नशा मग दारूचा  असो का ड्रग्जचा माणसाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. अल्लाहची कृपा आहे की, दारू पिणाऱ्यांच्या या वाढत्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांचे प्रमाण कमी आहे. ते आणखीन कमी   करून शुन्यावर आणण्यासाठी अनेक मिल्ली संघटना प्रयत्नशील आहेत. कुरआन आणि हदीसचा जेवढा प्रभाव वाढेल, तेवढे मद्यसेवनाचे प्रमाण कमी होईल, यात शंका नाही.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अगोदर अरबस्थानामध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण फार जास्त होते. अरबी लोकांसारखे दारूचे शौकीन त्याकाळी जगात इतर लोक फार कमी होते. जुनी दारू  बाळगण्यामध्ये त्यांचा हतखंडा होता. त्याच्यावर ते गर्व करीत असत. साहजिकच मद्यपानानंतर माणसामध्ये जे नकारात्मक बदल होतात त्यामुळे समाजामध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढते  आणि अरबांच्या कबिल्यावर आधारित समाजरचनेमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. मात्र कुरआनमध्ये ज्या दिवशी नशाबंदीची आयत अवतरित झाली त्या दिवसापासून आजतागायत  1440 वर्षे झाली अरबस्थानामध्ये विशेषतः सऊदी अरबमध्ये दारू बंद करण्यात आली. विशेष म्हणजे ही दारूबंदी कुठलाही कायदा करून बंद करण्यात आलेली नाही. जगात सऊदी अरब  एक असा देश आहे ज्या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने झालेली दारूबंदी टिकलेली आहे. हे समीकरणच आता रूढ होऊ पाहत आहे. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर नशा  करणाऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. हे अल्लाह सुबहानहूतआलाचे उपकार आहेत.

- बशीर शेख, उपसंपादक

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन  सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते.  मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये द्यावा लागतो. मग  एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागाणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते.  ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.

जकात कोणाला देते येते?
सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत  आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात  आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.’’
1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत  नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम  मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी -  यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना  घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या  माना  काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना  मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे  त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही  आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने  जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व  गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही  निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक  वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो  गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत  जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक  गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच  आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या  द्वारे स्वतःच्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत.
खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे. रमजानपूर्वी वर्षभर या संदर्भात लोकांचे प्रबोधन करून, रमजानपूर्वी प्रत्येक शहरात जकात गोळा करणारी समिती स्थापन करून  जकात एकत्रित करून त्याचे वितरण केल्यास अनेक गरीब कुटुंबांना त्याचा आधार मिळेल व मोठमोठी कामे लिलया होतील.
जकात एक ईश्वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात.  या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले  आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5  टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम  स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही संतोषजनक बाब आहे.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

जिंदा रहेना है तो हालात से डरना कैसा
जंग लाजिम हो तो लष्कर नहीं देखे जाते
इस्लाम हा समतावादी धर्म असल्या कारणाने पृथ्वीवर जेथे कोठेही त्याचा नावाचा उच्चार केला जातो तेथे प्रस्थापितांमधून त्याचा विरोध सुरू होतो तर सामान्य जनतेतून त्याचे स्वागत  केले जाते. गार-ए-हिरामधून प्रेषित्व बहाल झाल्यावर हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांनी इस्लामची घोषणा करताच ज्या मक्का शहरामध्ये त्यांना अमीन (विश्वासपात्र) आणि  सादीक (खरा) म्हणून ओळखले जात होते त्याच शहरात त्यांचा विरोध सुरू झाला. हा विरोध शोषित समाजाकडून नव्हे तर प्रस्थापितांकडून झाला.
मक्का शहर त्यावेळी अरबास्थानाची आर्थिक राजधानी होती. तेथील काबागृहामध्ये 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक मुर्ती ही अनेक कबिल्यांची कुलदैवत होती. त्या काळातील  टोळ्यांवर आधारित समाजरचनेमध्ये कुलदैवतेचे अनन्यसाधारण महत्व होते. प्रत्येक टोळीमध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत होत्या त्या मक्केमधून येऊन आपल्या कुलदैवतेसोबत  साजऱ्या केल्या जात होत्या. वर्षातील 360 दिवस अखंडपणे विविध टोळया मक्का शहरात येत आणि बकरे, ऊंट व पूजेचे इतर साहित्य खरेदी करत. तेथे काही दिवस मुक्काम करत आणि परत जात. त्यामुळे मक्का शहरात चारही बाजूंनी पैशाचा ओघ सातत्याने येत होता. 360 दिवसांचा हा अखंड रतीब तर राहिलेले पाच दिवस हजचा उत्सव, त्यात तर लोकांच्या उत्साहाला उधान येई व पैशांच्या राशी मक्का शहराच्या व्यापाऱ्यांसमोर पडत. थोडक्यात मक्का हे अरबस्थानाचे एकमेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र झाले होते. त्यामुळे साहजिकच तेथे राहणारे सर्व कबिले खासकरून ’कुरैश’ कबिला सर्वार्थाने संपन्न झालेला होता. स्पष्ट आहे जेव्हा प्रेषितांनी 360 मुर्त्यांना नाकारून एका ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला तेव्हा  त्या सर्व कबिल्यांचा डोळ्यासमोर त्यांचा आर्थिक मृत्यू दिसायला लागला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा संदेश याच कारणाने त्यांनी नाकारला. त्यांना  स्वतः आपल्या हाताने आपल्या अर्थव्यवस्थेची मान आवळने शक्य झाली नाही. त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा विरोध सुरू केला. मात्र त्याचवेळेस त्याच शहरातील  प्रस्थापितांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या शोषित लोकांना प्रेषित सल्ल. यांचा संदेश आवडला व तो त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारला देखील. मुठभर शोषितांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची साथ देण्यास सुरूवात केली तेव्हा प्रस्थापितांना ही गोष्ट रूचली असती तरच नवल. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या गरीबांना त्रास देण्यात सुरूवात केली. इतका त्रास की त्यांना  मक्का शहरात राहणे अशक्य झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना तत्कालीन शेजारील राष्ट्र हबशमध्ये हिजरत (स्थलांतर) करण्याचा आदेश दिला. सातत्याने 13  वर्षे प्रयत्न करूनही मक्का शहरातील प्रस्थापितांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. याउलट मक्का शहराच्या आजूबाजूच्या इलाख्यामध्ये मात्र इस्लामचा स्विकार करणाऱ्यांची संख्या  सातत्याने वाढत गेली. कारण ते लोक मक्काच्या रहिवाशांसारखे संपन्न नव्हते. विशेषतः मक्क्यापासून जवळ असलेल्या मदिना शहरातील लोकांना प्रेषितांचा संदेश खूप भावला. मक्का  पेक्षा मदिनामध्ये इस्लामचा स्विकार करण्याची संख्या वाढत गेली. मदिनातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत (प्रेषितांच्या हातात हात  देऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे) करत. याला बैत-ए-उक्बा असे म्हटले जाते. एकूण तीन वेळा बैत-ए-उक्बा झाल्या. तिसरी बैत-एउ क्बा प्रेषित्वाच्या बाराव्या वर्षी झाली. झाले  असे की, मदिनाच्या 75 सन्माननीय व्यक्तींचे एक शिष्टमंडळ हजसाठी आले होते. हज झाल्यानंतर त्या शिष्टमंडळाने एका रात्री प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत  केली व मदिनाला येण्याचे निमंत्रण देऊन सर्वार्थाने साथ देण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर थोड्याच दिवसात अल्लाहच्या आदेशाने स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे  हिजरत केली. प्रेषितांच्या आगमनाने मदिनाचे एकूण वातावरणच ढवळून निघाले. त्या वातावरणाचे वर्णन ’शोधन’चे माजी संपादक आणि प्रेषितांचे चरित्रकार सय्यद इफ्तखार अहेमद  यांनी खालीलप्रमाणे केलेले आहे. ’’प्रेषितांनी आणलेला धर्म स्विकारणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःविरूद्ध जाणे आणि सर्व लोकसमुहांनी स्वतः अंगीकारलेल्या वृत्ती, प्रवृत्ती, उद्दिष्टे अशा सर्व  गोष्टींना तिलांजली देऊन नव्या संकल्पना, नवी विचारधारा, जीवनाचा नवा अर्थ, ईश्वराच्या एकत्वाची संकल्पना स्विकारावी लागणार होती. लोक सहजासहजी हे करण्यास तयार नव्हते.’’(संदर्भ : मुहम्मद सल्ल. नवयुगाचे प्रणेते पान क्र. 289- 290).
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या यशस्वी हिजरती व त्यांना मदिना शहरात मिळालेल्या आश्रयामुळे मक्कावासियांचा नुसता जळफळाट झाला. यावर कडी तेव्हा झाली जेव्हा मदिनेहून औस या प्रतिष्ठित कबिल्याचे सरदार सअद बिन मआज रजि. उमराह (काबागृहाच्या दर्शना) साठी मक्का शहरात आले व आपले स्नेही उमैय्या यांचेकडे थांबले. एका दिवशी ते दोघे उमराह  करण्यासाठी काबागृहाकडे निघाले असता कुरैशचा सरदार अबु जहल त्यांना भेटला आणि उमय्या यांना विचारले की, ’’तुमच्या बरोबर हे गृहस्थ कोण?’’ उमैय्या यांनी सआद बिन  मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत  सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे  जातात ते?’’ तेव्हा अबु जहलचे डोळे उघडले व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मदिना शहरात हिजरत करण्यामागचा अर्थ त्याला समजला. मक्का शहराचा जवळ-जवळ सर्व व्यापार  यमन आणि सीरियाशी होत होता व व्यापारी काफिले मदिनालगतच्या मार्गानेच जात होते. हजरत सआद रजि. यांनी तो मार्गच तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे कुरैश  हादरले व सर्व व्यापाऱ्यांची तातडीने एक बैठक बोलाविण्यात आली व या विषयावर विचार करण्यात आला. शेवटी असे ठरले की, मदिना शहरामध्ये राहणारा एक सरदार ज्याचे नाव   अब्दुल्लाह बिन उबई होते व ज्याची मदिना शहराचा प्रमुख म्हणून निवड जवळ-जवळ निश्चित झाली होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. मदिना शहरात आल्यामुळे त्याचे प्रमुखपद  आपोआपच रद्द झाले होते. प्रेषित सल्ल. यांचा अघोषितपणे मदिनाच्या बहुसंख्य लोकांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकार केला होता. म्हणून अब्दुल्ला बिन उबई चिडून होता. याची  माहिती मक्कावासियांना होती. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहून प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली व त्यासाठी आवश्यक ती मदद देण्यासाठी तयार असल्याचे पत्रामध्ये नमूद केले.
ही गोष्ट जेव्हा प्रेषित सल्ल. यांना समजली तेव्हा त्यांनी अब्दुल्ला बिन उबईची भेट घेऊन त्याची समजूत काढली व त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की आमच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या नादात त्याला स्वतःच्या नातेवाईकांशीच संघर्ष करावा लागेल व त्यात सर्वांची अतोनात हानी होईल. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्याने दोन पत्रे मिळूनही  अब्दुल्ला बिन उबई गप्प बसला. तो काही करत नाहीये हे लक्षात आल्यावर मक्कावासियांनी मदिनावासियांच्या खोडी काढण्यास सुरूवात केली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या बकऱ्या  आणि उंट चोरण्याचा सपाटा लावला. काहीही करून एक मोठी शक्ती बनण्यापूर्वी प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांना नामोहरम करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यांना स्वतःच्या  लष्करी शक्तीचा फार अभिमान होता. दरम्यान, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना शहरात येताच तेथील अनेक कबिल्यांशी विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन कबिल्यांशी वाटाघाटी करून  मदिना शहर सुरक्षित करून घेतले होते. इतिहासामध्ये याला मदिना करार म्हणतात. मक्कावासियांचे आक्रमण मदिनावर होणार याची खुनगाठ बांधून त्यांनी सर्व कबिल्यांची एकजूट  केली होती. त्यानंतर त्यांनी कुरैशच्या कुरापतींचे उत्तर कसे द्यावे? यासाठीची योजना आखण्यास सुरूवात केली. त्यांनी मदिना शहरातील सर्व कबिल्यांची बैठक घेऊन मक्कावासियांच्या  संभावित आक्रमणाविरूद्ध कशी रणनिती आखावी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मदिना वासियांनी विशेषतः अन्सार लोकांनी प्रेषित सल्ल. यांना सर्वाधिकार देऊन निर्णय घेण्याची विनंती  केली व त्यांच्या निर्णयावर जीव ओवाळून टाकण्याचा निश्चय व्यक्त केला.
प्रेषित सल्ल. नेहमी सावध राहत. लवकरच त्यांना एक बातमी समजली की अबु सुफियानच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यापारी काफला, व्यापार करून, साधन संपत्ती घेऊन, सीरियाकडून मक्का शहराकडे येत आहे. त्या काफिल्यासोबत 40-50 पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक नाहीत. तेव्हा मदिनातील बहुतेक लोकांना वाटत होते की, प्रेषित सल्ल. यांनी या काफिल्याला लूटण्याची परवानगी द्यावी. काफिल्याचा प्रमुख अबु सुफियान स्वतः एक अत्यंत हुशार सरदार होता. त्यालाही या गोष्टीचा अंदाज आला होता म्हणून त्याने मदिना  शहराजवळ येण्याअगोदरच एक उंटस्वार मक्का येथे पाठवून लष्करी मदद मागीतली होती. अबु सुफियानचा निरोप मिळाल्याबरोबर कुरेशचे लोक चौताळले व त्यांनी एक हजार लोकांचे  लष्कर घेऊन मदिनाकडे कूच केले.

- प्रत्यक्ष युद्ध -
इकडे अल्लाहने प्रेषित सल्ल. यांना सूचना केली की, दोन पैकी कुठल्याही एकाशी सामना केल्यास त्यांची निश्चितपणे मदद केली जाईल. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी मदिन्यातील सर्व सरदारांची बैठक बोलाविली व त्यांच्यासमोर परिस्थिती विशद केली. काही लोकांचा विचार होता की, काफिल्याला लुटावे. कारण त्यांच्याकडे लोक कमी आणि संपत्ती जास्त आहे. परंतु,  प्रेषित सल्ल. यांना मक्काकडून येणाऱ्या लष्कराशी दोन हात करण्याची इच्छा झाली. कारण जोपर्यंत मक्कावासियांचा निर्णायक पराभव केला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यातली खुमखुमी  कमी होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणून पुरेशी तयारी नसतांनासुद्धा अल्लाहच्या भरोश्यावर त्यांनी मक्काकडून येणाऱ्या कुरैशच्या लष्काराशी दोन हात करण्याचा निर्णय  घेतला. प्रेषित सल्ल. यांच्या या निर्णयाचे मुठभर युवक सोडले तर सर्वांनी समर्थन केले. जेव्हा युद्धाची जुळवाजुळव केली गेली तेव्हा 300 पेक्षा थोडे जास्त लोक उपलब्ध झाले.  ज्यांच्यापैकी फक्त दोन, तीन लोकांकडे घोडे होते. 70 लोकांकडे उंट होते, हत्यारसुद्धा पुरेशे नव्हते. फक्त 60 लोकांकडे चिलखत होते. अशाही परिस्थितीत या 313 लोकांनी आपले शीर  हातावरून घेऊन एक हजार लोकांच्या कुरैशच्या बलाढ्य लष्कराशी युद्ध करण्याची तयारी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर विश्वास ठेऊन दर्शविली. या 313 लोकांना घेऊन 17  रमजान 2 हिजरी, (13 मार्च 624) मंगळवारी प्रेषित सल्ल. यांनी मक्काकडे कूच केले. शत्रूला मदिना शहरापासून 200 किलोमीटर दूर बदरच्या ठिकाणी थोपवून युद्ध करण्याची  प्रेषितांची इच्छा होती. त्याप्रमाणे बदर या गावाजवळ उंच टेकडीवर इस्लामी लष्कराने पाडाव टाकला. पाडाव टाकताच पावसाला सुरूवात झाली. लष्कराने तात्काळ श्रमदान करून  तात्पुरता खड्डा (हौद) बांधून पाणी गोळा केले. इकडे कुरैशचे लष्कर टेकडीखाली येवून ठेपले. पावसामुळे टेकडीचा वरचा भाग पाण्याने अधिक घट्ट झाला होता तर खाली पायथ्याशी चिखल झाला होता. प्रेषितांनी प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी अल्लाहशी दुआ केली आणि युद्धाला आणि युद्धाला तोंड फुटले. या 313 च्या लष्कराने परिस्थितीचा लाभ उठवत हजार लोकांच्या कुरेशच्या लष्कराची दानादान उडविली. या युद्धामध्ये मुस्लिमांचे 14 यौद्धे तर कुरैशचे 70 यौद्धे कामाला आले. मुस्लिम सैनिकांनी कुरेशच्या अनेक लोकांना युद्धबंदी बनविले व  पुढे हजरत अबुबकर रजि. यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी कुरेशकडून काही रक्कम घेऊन युद्धकैद्यांना सोडून दिले. बदरचे युद्ध प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांसाठी प्रेरणादायी  युद्ध ठरले आहे. आजही आपण अनेक मुस्लिम तरूणांच्या मोटारबाईकवर 313 चा अंक लिहिलेला पाहिलेला असेल. अनेक कवी आणि शायर लोकांनी या 313 लष्कराचे गुणगाण  गायलेले आहे. विषम परिस्थितील हे युद्ध जिंकल्याचे दोन परिणाम झाले. एक तर मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढला दोन कुरेशच नव्हे तर समग्र अरबस्थानामध्ये मुस्लिमांच्या लष्करी  ताकदीचा धाक बसला.
बदरच्या युद्धामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, युद्ध हे साधन सामुग्री किंवा सैनिकांच्या संख्या बळावर नव्हे तर धैर्य, साहस आणि अल्लाहवरील दृढ विश्वासाच्या साह्याने जिंकता येते.

- एम.आय.शेख
9764000737

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget