भूकंपांचे विश्लेषण इस्लामी दृष्टिकोणातून
जरासी भी नेकी को वो जाया नहीं करता
और बेसब जलजला आया नहीं करता
जब-जब भी गुनाहों से भर जाती है धरती
करता है सफाई वो सफाया नहीं करता
फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कीयेमध्ये आलेल्या महाप्रचंड भूकंपावर अनेक दृष्टीने विचारमंथन होत आहे. परंतु इस्लामी दृष्टिने मंथन झाल्याचे वाचणात आलेले नाही. म्हणून त्या दृष्टिने मंथन करण्यासाठी हा लेखन प्रपंच.
दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचे कण एकत्र येताच पाणी तयार होते, हे विज्ञान सांगते. पण ते का तयार होते? हे विज्ञान सांगत नाही. ठीक याच प्रकारे तुर्कीयेमध्ये ज्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू होता त्या ठिकाणी भूगर्भात 18 किलोमीटर खाली असलेल्या शिळा सरकल्यामुळे हा भूकंप झाला आणि तुर्कीये दहा फूट युरोपकडे सरकला, अशी माहिती भूगर्भशास्त्रज्ञांनी दिली. पण त्या शिळा का सरकल्या याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. याचे उत्तर कुरआनकडे आहे.
कुरआनमध्ये भूकंपासंबंधी एक संपूर्ण सुरा (अध्याय) अवतरित झालेला असून, त्याचा क्र.99 तर नाव सुरे ’जिलजाल’ आहे. याशिवाय, भूकंपाविषयी अनेक आयाती कुरआनमध्ये इतरत्र आलेल्या आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून भूकंपाविषयी इस्लामी दृष्टिकोण काय आहे हे स्पष्ट केल्यास भूकंपाबद्दल आपले मत तयार करण्यामध्ये वाचकांना मदत होईल.
भूकंपासंबंधाचा अध्याय सुरे ज़िलज़ाल क्र. 99
आ.क्र. 1. जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल
स्पष्टीकरण : जेव्हा पृथ्वी आपल्या आवेशासहित हलवून सोडली जाईल याचा अर्थ असा की, आज जसे कधी किल्लारीला तर कधी तुर्कीयेच्या काही भागांना थोडेसे हलविले जात आहे, (ही प्रलयाची पूर्वसूचना आहे) प्रलयाच्या दिवशी मात्र असे छोटेमोठे झटके दिले जाणार नाहीत. त्या दिवशी तर पृथ्वीचा पूर्ण गोल पूर्ण आवेशानिशी हलवला जाईल. त्या दिवशी अंतिम निवाड्यासाठी ईश्वरीय न्यायालय भरविले जाईल. अरबी भाषेमध्ये ’जलजला’ या शब्दाचा अर्थ ’एकसारखे जोरजोरात हलविणे’ असा होतो आणि, ’’अर्ज’ चा अर्थ जमीन होतो. येणेप्रमाणे जमीनीचा एखादा भाग हलविला जाणार नाही तर पृथ्वीरूपी गोळाच संपूर्णपणे पूर्ण ताकदिनिशी हलविला जाईल. तो इतक्या जोरात हलविला जाईल की येथूनच प्रलयाच्या प्रक्रियेच्या पहिल्या चरणाला सुरूवात होईल. या झटक्याने काय होईल तर हा झटका इतका जबरदस्त असेल की पृथ्वीवरचे सर्व सजीव प्राणी मरून जातील. ही पृथ्वी तशीच छिन्नविछिन्न होऊन जाईल जशी आज तुर्कीयेच्या त्या भागात झालेली आहे ज्या भागात भूकंपाचे झटके आलेले आहेत. पक्के रस्तेे उलथून पडतील. पृथ्वीला मोठमोठ्या भेगा पडतील. मोठाली झाडे उन्मळून पडतील. पर्वत ढासळून पडतील. मोठमोठ्या इमारती पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळतील.
2. आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील (99:2)
स्पष्टीकरण : जेव्हा दूसरा झटका येईल तेव्हा पृथ्वी आपल्या गर्भातील सर्व ओझेे बाहेर टाकून देईल. प्रलयाच्या प्रक्रियेचे हे दूसरे चरण असल्याची खबर ही आयत देत आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आलेल्या पहिल्या मानवापासून शेवटच्या मानवापर्यंत, जे पृथ्वीवर आले आणि मरण पावले आणि पृथ्वीच्या आत हजारो वर्षांपासून गाडले गेलेले आहेत त्या सर्वांना पुन्हा जिवित केले जाईल.
मरूण माती/राख झालेली माणसं कसे बरे जीवंत केले जाऊ शकतील? असा प्रश्न ज्यांच्या मनात उठत असेल त्यांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर कुरआन दुसऱ्या ठिकाणी स्वतःच देतो की, ’’ज्या ईश्वराने तुम्हाला शुन्यातून जन्माला घातले त्याला तुमच्या राख, माती आणि विखुरलेल्या हाडांना पुन्हा जोडून जीवंत करणे फारसे कठीण काम नाही.’’ (संदर्भ सुरे यासीन आयत क्र. 78-79)
पृथ्वी फक्त आपल्या गर्भातून माणसांनाच बाहेर फेकणार नाही तर सोने, चांदी, हिरे अर्थात सर्वच प्रकारची खनीज संपत्ती देखील बाहेर फेकून देईल. माणसे त्या संपत्तीकडे पाहून विचार करतील की, ह्याच का त्या गोष्टी होत्या ज्यासाठी आम्ही आयुष्यभर तळमळत होतो. एकमेकांचा विश्वासघात करत होतो, खोटे बोलत होतो, युद्ध करत होतो आणि एकमेकांचे मुडदे पाडत होतो.
3. आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे? (99:3)
स्पष्टीकरण : पृथ्वीच्या या विध्वंसक हालचालींकडे पाहून ज्यांचा अंतिम निवाड्याच्या दिवसावर विश्वास नव्हता ते नखशिकांत हादरून जातील. त्यांना आश्चर्य वाटेल की हे सर्व काय घडत आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, थोड्याच वेळात ईश्वराच्या न्यायालयाला सुरूवात होतील. ते भांबाहून जातील. या परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे त्यांच्या लक्षातच येणार नाही. राहिला प्रश्न मुस्लिमांचा तर जे सश्रद्ध मुस्लिम आहेत त्यांना हे पाहून अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण जे काही होत आहे ते त्यांंच्या श्रद्धेबर हुकूम होत आहे हे पाहून ते आनंदित होतील. कारण या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच्या आयुष्यात केलेली असेल.
4. त्या दिवशी ती आपले (वरील घडलेले) अहवाल निवेदन करील (99:4)
स्पष्टीकरण : प्रलयाचा पुढचा भाग ईश्वरीय न्यायालयाची स्थापना होईल. मग प्रत्येकाच्या हातात त्याच्या कर्माचा अहवाल दिला जाईल. त्यात त्याने आयुष्यभर जे जे चांगले केले व जे जे वाईट केले त्याचा सर्व तपशील लिहिलेला असेल. असे कसे शक्य आहे? असा प्रश्न ज्या कोणाला पडेल त्यांनी रेडिओ, टि.व्ही. पासून मोबाईल फोन पर्यंतच्या सर्व वैज्ञानिक शोधांवर एक नजर टाकावी. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की लंडनमध्ये बीबीसीच्या स्टुडिओमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला भारताच्या सुदूर पूर्वेच्या कोणत्याही शहरात बसलेला एक व्यक्ती जसेच्या तसे आज एचडीमध्ये कसा पाहतो?. फक्त पाहूच शकत नाही तर स्टुडिओमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीचे म्हणणे रेकॉर्ड करून ठेवता येते, लिंक सेव्ह करून ठेवता येते व मनाला येईल तेव्हा ते पाहता येते. आजमितीला हे माणसाला शक्य आहे तर ईश्वराला का शक्य होणार नाही?
5. कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला (असे करण्याची) आज्ञा दिलेली असेल (99:5)
स्पष्टीकरण : पृथ्वीवरच्या या विध्वंसक हालचाली पृथ्वीच्या मर्जीने होणार नाहीत. तर ईश्वराने तिला तसा आदेश दिल्याने होईल.
6. त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. (99:6)
स्पष्टीकरण : त्या दिवशी आपल्या कृत्याची चित्रफितच त्यांना दाखविली जाईल. ईश्वर मानवी शरिराच्या सर्व अवयवांना बोलण्याची शक्ती प्रदान करेल व आपली अवयवे आपल्या विरूद्ध किंवा बाजूने साक्ष देतील. चांगले कर्म केले असेल तर चांगली साक्ष देतील अथवा वाईट केले असेल तर वाईट साक्ष देतील. पृथ्वीलाही बोलण्याची शक्ती प्रदान केली जाईल. पृथ्वीसुद्धा म्हणेल की, अमुक एका व्यक्तीने माझ्या पृष्ठभागावर अमुक ठिकाणी अमुक चांगले कृत्य केले होते. तर अमुक ठिकाणी पाप केले होते.
7. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील. (99:7)
8. आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील. (99:8)
स्पष्टीकरण : ही सर्व साक्ष आणि पुरावे इतके ठोस आणि सबळ असतील की त्यामुळे प्रत्येक माणसाची व्यक्तीगत कृत्य निर्विवादपणे ईश्वरासमोर शाबित होतील. यालाच कायद्याच्या भाषेत, ’’निरूत्तर शाबिती’’ असे म्हटले जाते. तेव्हा ईश्वरासमोर तिळमात्र पुण्य कर्म असो की पाप कर्म असो की इतक्या ठळकपणे दिसेल की त्याला स्वीकारण्याशिवाय माणसाला गत्यंतर उरणार नाही.
प्रलयासंबंधी या अध्यायामध्ये जरी वर्णन आलेले असले तरीही या वर्णनामागचा ईश्वरीय हेतू माणसाला त्याच्या मृत्यूपरांत जीवनाबद्दल संवेदनशील करणे हा आहे. कारण पृथ्वीवरील झगमगाटात आपले जीवन जगतांना माणसांना या गोष्टीचा संपूर्णपणे विसर पडतो की हजार वर्षे जरी जीवंत राहिलो तरी शेवटी एक दिवस आपल्याला मरायचेच आहे. मृत्यू संबंधी विसर पडल्यामुळे व मृत्यूपरांत सुद्धा एक जीवन आहे, तसेच त्या जीवनात या जीवनात केलेल्या कर्माचा हिशोब द्यावयाचा आहे. याचा संपूर्ण विसर पडल्यामुळे माणसं बेजबाबदारपणे वागतात व दूसऱ्यावर अन्याय, अत्याचार करण्यास प्रवृत्त होतात. पराकोटीचा भ्रष्टाचार करतात. याउलट ज्या लोकांना पारलौकिक जीवनाबद्दल जाणीव आहे ते या जन्मात नेकीने वागतात. भ्रष्टाचार करत नाहीत. संधी असूनही कोणावर अत्याचार करत नाहीत. पापभिरू असतात. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची ज्या वाचकांची इच्छा असेल त्यांनी कुरआनमधील सुरे क्र. 50 काफ आयत नं. 17-18, सुरे क्रमांक 82 इन्फीतार आयत क्र.10-12, सुरे क्रमांक 17 बनी इस्राईल आणि सुरे क्र. 18 अलकहफ आयत न.ं 18-19 चा अभ्यास करावा म्हणजे त्यांना मरणोत्तर जीवनाबद्दलची संपूर्ण कल्पना येईल.
चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे ईश्वर देईल हे जरी न्नकी असले तरी चांगल्या आणि वाईट कृत्यांचा विचार एकत्रितपणे करून चांगली कृत्ये जास्त आणि वाईट कृत्य कमी असतील अशा श्रद्धावान मुस्लिम व्यक्तीला स्वर्गात जागा मिळेल व ज्याची वाईट कृत्य जास्त असतील तो नरकात फेकला जाईल. तसेच आपल्या वाईट कृतीची शिक्षा भोगल्यानंतर त्याला जन्नतमध्ये प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे, असे कुरआनच्या अनेक अभ्यासकांचे मत आहे. राहता राहिला प्रश्न इन्कार करणाऱ्यांचा! तर त्यांच्या संदर्भात असे म्हणता येईल की ते कायम जहन्नममध्ये राहतील. त्यांच्यातील पुण्यवान लोकांना हलक्या स्वरूपाची शिक्षा दिली जाईल. कारण ईश्वराने सर्व मानवजातीसाठी एकच धर्म पसंत केलेला आहे तो म्हणजे इस्लाम. याचाच ज्यांनी इन्कार केला त्यांना त्याची शिक्षा मिळेल. ही बाब खालील आयातीवरून स्पष्ट होते.
’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.’’ (सुरे आलेइमरान 3: आयत क्र. 19)
हेच कारण आहे की प्रत्येक श्रद्धावान मुस्लिम हा प्रत्येक बिगर मुस्लिम व्यक्तीपर्यंत इस्लामचा संदेश पोटतिडकीने देण्याचा प्रयत्न करतो. त्याला प्रामाणिकपणे असे वाटते की, प्रत्येक माणसाने आपल्याबरोबर जन्नतमध्ये यावे.
या लेखावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील. काही लोक विचार करतील की हे केवळ अशक्य आहे. मरूण माती झाल्यावर पुन्हा जीवंत केले जाणे, त्यांचा हिशोब केला जाणे हे केवळ अशक्य आहे. दूसरे ज्यांच्यात अध्यात्माचा अंश शिल्लक आहे ते गांभीर्याने या लेखात मांडलेल्या मुद्यांवर विचार करतील आणि आपल्या वर्तनात सुधारणा करतील.
मित्रानों ! लक्षात ठेवा पहिल्या प्रकारच्या लोकांचे मत खरे ठरले तर तेही सुटतील आणि त्यांच्याबरोबर मुस्लिमही सुटतील. त्यांना कुठल्याच प्रकारचा पश्चाताप करण्याची गरज राहणार नाही. मात्र समजा मृत्यूनंतर वर नमूद केलेला घटनाक्रम सुरू झाला तर? यावेळेस मात्र मुस्लिमांना पश्चाताप करण्याची गरज राहणार नाही मात्र ज्यांनी मरणोपरांत जीवनाचा इन्कार केला त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून हा लेख पुन्हा एकदा वाचा, डोळे बंद करा, दोन-चार खोल श्वास घ्या, शांतपणे विचार करा आणि मृत्यू आणि मृत्यूपरांत जीवनासंबंधी निर्णय घ्या. ईश्वर तुम्हाला सहाय्य करो. आमीन.