Halloween Costume ideas 2015

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे घातक आजार आणि अकाली मृत्यूमध्ये मोठी वाढ


देशात झपाट्याने वाढत असलेले गंभीर आजार आणि अकाली मृत्यू यांनी चिंताजनक आकड्यांना पार केले आहे. आधुनिक जीवनशैली, यांत्रिक संसाधनांवर वाढते अवलंबित्व, प्रदूषण आणि खाण्यापिण्याचा बदलत्या सवयी यामुळे आपल्या जीवनात बरेच वाईट बदल देखील झाले आहेत. आरोग्यानुसार नव्हे तर चवीनुसार पदार्थ खाणे सर्वांनाच आवडते, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आता कोणालाही कोणत्याही वयात कोणतीही आरोग्य समस्या होत आहे. लोकांच्या वाढत्या मागणीनुसार आता फास्ट फूड, स्ट्रीट फूड, तेल, मैदा, मसाले, खारट, गोडयुक्त पदार्थ सर्वत्र मोठ्याप्रमाणात समृद्ध होत आहेत. जेव्हाकी हे पदार्थ गुणवत्तेत कमी दर्जाचे असून, वाईट कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. भारतीय सण, समारंभ, पार्टी आणि शुभ कार्यांमध्ये देखील अशाच प्रकारचे पदार्थ वाढले जातात. त्याचप्रमाणे अन्नपदार्थांमध्ये घातक रसायनांचा वापर, भेसळ आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शिवाय, हे कमी दर्जाचे खाद्यपदार्थ फक्त चवीसाठी असून त्यात जास्त कॅलरी असतात. बरेच लोक जेवताना किती कॅलरीज घेत आहेत याचा विचारही करत नाहीत. पोट पूर्ण भरेपर्यंत जेवतात, तसेच आपल्याकडे पाहुणचाराच्या नावाखाली होणारी आपुलकीची मेजवानी पण ह्या समस्याला वाढविते.

लठ्ठपणाच्या जोखमींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जागतिक लठ्ठपणाचे संकट संपवण्यासाठी दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरात “जागतिक लठ्ठपणा दिन” पाळला जातो. दीर्घकाळ धूम्रपान, अस्वस्थ आहार आणि शारीरिक निष्क्रियता यामुळे रोगाचा विकास होतो, विशेषतः हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी व इतर. भारतीय फास्ट-फूड मार्केट अंदाजे २७.५७ बिलियन डॉलर आहे. समोसे, कचोरी, ब्रेड पकोडा, पॅकबंद भुजिया, इन्स्टंट नूडल्स, मोमोज, टिक्की, भटुरे हे खाद्यपदार्थ भारतीय जंक फूडच्या यादीत अग्रस्थानी आहेत. जागतिक अन्न बाजारपेठेत भारताच्या सतत एकीकरणानंतर अस्वास्थ्यकर, प्रक्रिया केलेले अन्न अधिक सुलभ झाले आहे. हे, वाढत्या मध्यमवर्गीय उत्पन्नासह, मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये दरडोई सरासरी कॅलरी सेवन वाढवत आहे. एका विशेष अहवालानुसार, "देशातील मोठ्या शहरांमधील फास्ट फूड रेस्टॉरंट्सवरील मध्यमवर्गीय कुटुंबांचा वार्षिक खर्च २०२२ पर्यंत १०८ टक्क्यांनी वाढला आहे".

ओबेसिटी ऍटलस २०२३ ने स्थूलतेच्या बाबतीत १८३ देशांपैकी भारताला असंसर्गजन्य रोग म्हणून ९९व्या स्थानावर ठेवले आहे. नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे ५ च्या आकडेवारीनुसार, बीएमआई निकषांनुसार २३% महिला आणि २२ .१% पुरुषांचे वजन जास्त आहे. देशातील ४० टक्के महिला आणि १२ टक्के पुरुषांना पोटाच्या लठ्ठपणाचा त्रास आहे. भारतीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-४ नुसार, २००६ ते २०१६ या कालावधीत, १५ ते ४९ वयोगटातील महिलांमधील लठ्ठपणा १३% वरून २१% पर्यंत वाढला आहे आणि १५ ते ४९ वयोगटातील पुरुषांमधील लठ्ठपणा ९.३% वरून १९% पर्यंत वाढला. बहुतेक भारतीयांचा दरवर्षी हृदयविकारामुळे मृत्यू होतो आणि त्यापैकी सुमारे ६०% लोकांना मधुमेह आहे. असा अंदाज आहे की २०५० पर्यंत, १३० दशलक्षांपेक्षा जास्त रुग्णांसह भारत मधुमेहामध्ये जगात आघाडीवर असेल.

डब्ल्यूएचओच्या मते, १९७५ पासून जगभरात लठ्ठपणा जवळजवळ तिप्पट झाला आहे. २०१६ मध्ये, १८ आणि त्याहून अधिक वयाच्या १.९ अब्जाहून अधिक प्रौढांचे वजन जास्त होते, यापैकी ६५० दशलक्षाहून अधिक लोक लठ्ठ होते. जगातील बहुतेक लोकसंख्या अशा देशांमध्ये राहते जेथे जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे कमी वजन असलेल्या लोकांपेक्षा जास्त मृत्यू होतात. २०२० मध्ये, ५ वर्षांखालील ३९ दशलक्ष मुले जास्त वजन किंवा लठ्ठ होती. २०१६ मध्ये ५-१९ वयोगटातील ३४० दशलक्षाहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुलांचे वजन जास्त किंवा लठ्ठ होते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (फाओ) २०२३ च्या अहवालानुसार, अस्वास्थ्यकर आहारामुळे होणारे लठ्ठपणा आणि असंसर्गजन्य रोगांमुळे कामगार उत्पादकतेत शेकडो अब्ज डॉलर्स खर्च होत आहेत, आणि अस्वास्थ्यकर आहार पद्धतींशी संबंधित अंदाजे हानीच्या बाबतीत भारत १५४ देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, जे खूप चिंताजनक आहे. २०११ पासून भारतात वापरल्या जाणाऱ्या अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नाचे एकूण प्रमाण ९०% पेक्षा जास्त वाढले आहे. प्रौढ बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय इंडेक्सनुसार, जर तुमचा बीएमआय १८.५ ते २४.९ असेल तर ते निरोगी वजन श्रेणीत येते. जर तुमचा बीएमआय २५.० ते २९.९ असेल तर तो जास्त वजनाच्या श्रेणीत येतो. उंचीनुसार वजन असावे.                           

कर्बोदके, बटाटे, भात, मिठाई यासारखे पदार्थ वजन वाढण्यास जबाबदार असतात. म्हणून, फक्त तेच पदार्थ खा जे तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरी जोडणार नाहीत. कॅलरीजची आदर्श पातळी रोजच्या आहाराव्यतिरिक्त वय, चयापचय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. साधारणपणे, महिलांसाठी दररोज २००० कॅलरीज आणि पुरुषांसाठी 2२५०० कॅलरीजची शिफारस केली जाते. लठ्ठपणा टाळता येतो, योग्य दैनंदिन दिनचर्येतून आपण चांगले आरोग्य मिळवू शकतो. मीठ, साखर, मैदा यांसारख्या पदार्थांना स्लो व्हाईट पॉयझन म्हणतात, त्यांचे अतिसेवन टाळा. पॅकेज केलेले डबाबंद खाद्य, फास्ट फूड, जंक फूड, प्रक्रिया केलेले फॅटी मांस, स्नॅक फूड, फ्रोझन फूड, बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा. पोषक तत्वांनी भरपूर फळे, अंकुरलेले धान्य, हिरव्या भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये वापरा. रोजच्या आहारात खाद्यपदार्थांचा दर्जा आणि कॅलरीज वर लक्ष द्या. अस्वास्थ्यकर आहारात जिभेवर ताबा ठेवायला शिका, पोटाला कोठार समजून त्यात काहीही भरू नका, इच्छाशक्ती प्रबळ करा. शरीराला प्रत्येक वयात सर्व प्रकारच्या आवश्यक पोषक तत्वांची गरज असते, याची विशेष काळजी घ्या. शुद्ध ऑक्सिजन, पौष्टिक आहार, पुरेशी झोप, रोजचा व्यायाम, व्यसनापासून दूर राहणे हे उत्तम आरोग्याचे मार्ग आहेत. याच्या मदतीने आपण केवळ लठ्ठपणापासूनच नाही तर जीवघेण्या आजारांपासूनही दूर राहू आणि आनंदी, निरोगी जीवन जगू.


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget