आज आम्ही विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात श्वास घेत प्रगतीच्या शिखरावर पोहचत आहोत. एका सेकंदाचा विलंब न लावता हजारो मैलांवर दूर संपर्क साधू शकतो. जगाला खूप जवळ केले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर इंटरनेट, दूरदर्शन, मोबाइल, रेडिओसारख्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा प्रिंट मीडियासारखा वापर सर्रास केला जात आहे. तरी पण आजचा मानव मानवतेपासून आपल्या संस्कृतीपासून का बरे दूर जात आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
प्रसारमाध्यमे म्हणजे समाजमनाचा आरसा. प्रसारमाध्यमे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. दूरध्वनी, मोबाइल, दूरदर्शनने तरुण पिढीला एखाद्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जखडून ठेवले आहे, हे आज अनेक उदाहरणांतून दिसून येत आहे. कोणत्याही घटकाचा उपयोग चांगला केला तर चांगलाच होतो, पण त्याचा जर का अयोग्य वापर केला तर पिढीच काय समाज, देशसुद्धा अधोगतीला जातो. सुसंस्कृत सभ्यतेचा लोप झाला की नैतिकता संपुष्टात येते व नैतिकता गेली की सर्व काही संपतेच!
आज आमच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यांपैकी प्रथम क्रमांकाचे आव्हान प्रसारमाध्यमे होत. चुकीचा प्रोपगंडा, चुकीच्या माहितीचा महापूर, कौटुंबिक व सांस्कृतिक अशी अनेक आव्हाने आहेत. गैरसमज व पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे, पाश्चात्यांच्या जाळ्यात अडकणे, मोहमाया जाळ्यात अडकणे होय.
समाजात स्त्री-पुरुष म्हणजे आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याचे दोन पंखच! दोघांचे महत्त्व तेवढेच आहे. अर्धविश्व स्त्रीला मानले गेले आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशी विविध नाती असणाऱ्या महान स्रीचा प्रसारमाध्यमांनी वापर करून तिला अनेक रुपांत विश्वासमोर ठेवले आहे. याचा आज विचार करण्याची नितांत गरज आहे. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे लज्जा नावालाच दूर लोटले व पाश्चिमात्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे सरसावून समाजाला तळागाळापर्यंत घेऊन जात आहे. मीडियाने फॅशनच्या, आधुनिकतेच्या नावावर स्त्री-शीलाचा, अश्लीलतेचा मापूर आणला जात आहे. पाश्चिमात्य संस्कृती आधुनिकता व स्वातंत्र्याच्या नावाखाली मोहमाया जाळ्यात अडकवत आहे. तरुण पिढीला भ्रष्ट करण्याचे पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्वपूर्ण मैदानच आहे.
स्त्रीची महानता समजून घेणे गरजेचे आहे. समाज, कुटुंब संस्कारित करणारी सासर-माहेरची ज्योत स्त्री. संस्काराची खाण, घराची स्वामिनी. स्त्रीशिवाय समाजच पूर्ण होऊ शकत नाही. समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य हे स्त्रीच्या अंगीच असते. समाजवृक्षाचा मुलाधार स्त्रीच! झाडाचे बहरणे, फुलणे हे झाडांना अन्न-पाणी देणाऱ्या मुळांवर अवलंबू असते. तसेच समाज निकोप व सुसंस्कृत होण्यासाठी यासमाजवृक्षाला स्थिर करण्यात स्त्रीची महत्त्वाची भूमिका आहे. झाडाखालील मुळाचे जे कार्य असते तेच कार्य समाजासाठी स्त्रियांचे आहे.
ज्या समाजात स्त्रियांना सन्मानाने, आदराने, समान दर्जाने वागविले जाते, तिचे अधिकार देऊन तिला सुरक्षित केले जाते, तोच समाज प्रगत म्हणवून घेण्यास पात्र असतो. समाजाला घडविण्याचे सामर्थ्य स्त्रियांच्या अंगीच असते. याज त्या महान स्त्रीला अत्यंत नाजूक अशा स्थितीतून जीवनप्रवास करावा लागत आहे. पाश्चात्य मीडिया प्रचाराने फॅशनच्या नावावर, आधुनिकतेच्या नावावर स्त्रीचे वस्त्रहरणच केले आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी तिला मायाजालात अडकविले आहे. स्त्रीला पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यासाठीच स्पर्धेत उतरविले जात आहे. एका स्त्रीला आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता पाश्चिमात्यांच्या अश्लीलतेच्या महापुरात ओढले आहे. आज तिला आपल्या जीवनाच्या उद्देशाचा विसर पडला आहे. पाश्चिमात्यांच्या भूलथापांना ती बळी पडत आहे. याला अनेक कारणे आहेत.
कोणत्याही वस्तूच्या जाहिरातीसाठी मग ते पुरुषांचे कपडे असोत की अन्य तिला अल्पवस्त्रांतच दाखविले जाते. तिचे शरीराचे विकृत प्रदर्शन केले जाते. जाहिरातींच्या माध्यमातून तिचे विडंबन मग एका साबनाची असो की शॅम्पूची, निरंतर होतच राहते.
भांडवलशाहीने आपले बस्तान बसविण्यासाठी फॅशनच्या नावाखाली स्त्री-शरीर प्रदर्शन सर्रास होत आहे. भांडवलदारांच्या चंगळवादी जीवनशैलीमुळे सामाज-क समस्या विक्राळ रूप धारण करत आहेत. स्त्री-शरीराचे प्रदर्शन, उत्पादन-विक्रीसाठी स्त्रियांचे आर्थिक, शारीरिक शोषण केले जात आहे. विवाहबाह्य लैंगिक जीवनाला प्रोत्साहन देऊन स्त्रीने सेवेसाठी तत्पर राहावे हा हेतू. मोठमोठ्या कंपन्या, कॉल सेंटर्स, रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना रात्री उशिरापर्यंत काम करणे भाग पडते. ‘एशियन एज्’च्या रिपोर्टनुसार, ७० हजार स्त्रिया देहविक्री करता. मग त्या पंचतारांकित डान्सबार, क्लबमध्ये, श्रीमंत उच्च वस्तीत हे घृणित कार्य महिला करतात आणि तसे करण्यास त्यांना बळी पाडले जाते. मुलींचा तरुणवर्ग वस्त्रहीन, अल्पवस्त्रात मासिकांच्या किंवा एखाद्या जाहिरातीसाठी उभ्या राहताना दिसून येतो. अशी अनेक उदाहरणे स्त्री-शोषणाची पाहवयास मिळतात. बिअरबार, नशा, जुगार, क्लबसारख्या ठिकाणी काम करताना या तरुणी दिसतात. हे अमानवी कृत्य समाजाला लागलेली कीड आहे.
पुरुषी पोषाख, पेहराव, शरीरप्रदर्शन, नवीन App चा वापर स्त्री-विक्री, लिलाव ह्या गोष्टी लाजिरवाण्या आहेत.
विवाहासारख्या पवित्र बंधनाला निरर्थक ठरवून ‘विवाहबाह्य संबंध’ स्त्री-पुरुष मुक्तसंचारामुळे गंभीर समस्या बनली आहे. "DINK" अर्थात "Double Income, No Kids" or "Dual Income, No Kids" ही वृत्ती फोफावत आहे. हेच आहे पाश्चात्यांचे अंधानुकरण. एकतर्फी प्रेम, हत्या, अॅसिड हल्ले, बलात्कार, अशा घटनांतून तिला जावे लागते. स्त्रीला मार्केटिंगचे साधन समजले जाते. व्यापाराचा आलेख उंचावण्यासाठी अधिकाधिक वस्त्रहरण करुन तिची प्रतिमा पुढे येत आहे. त्याशिवाय जाहिरातच पूर्ण होत नाही. स्त्रियांच्या शरीराला वस्तूच्या स्वरुपात उपयोग करण्याचे घृणास्पद कर्म अश्लील व्हिडिओ, चित्रपट, अश्लील साहित्य, नग्न चित्रे, सौंदर्य वाढविणारी उत्पादने आज स्त्री-शरीर प्रदर्शनाद्वारे प्रसारमाध्यमांत मॉडेलच्या शरीरावर टॅटू गोंदण्याची फॅशन त्रासदायक शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रियांसाठी स्टुडिओ आहेत. स्त्रीला एक खेळणे केले जात आहे. विनाशाच्या खोल दरीत तिची रवानगी का होत आहे? पाश्चात्य संस्कृती मानवतेचा नाश करत आहे. स्त्रीला एका मुक्या जनावराप्रमाणे राजमुकुटासाठी, सौंदर्यस्पर्धेत भांडवलशाही आदेशांचे पालन करावे लागते.
नैतिकतेच्या ऱ्हासामुळे नाती दुरावली जात आहेत. माणसाला पैश्याच्या लोभापुढे माणुसकीचा विसर पडत आहे. या सर्वांना वेळीच थांबविले पाहिजे. स्त्री-मुक्तीचा विचार करावा लागेल. समाजातील अश्लीलतेची वाढती नशा दूर करण्यासाठी आम्हा स्त्रियांनाच पुढे यावे लागेल. १४५० वर्षांपूर्वी स्त्रीला मान-सन्मान, आदर दिला, अधिकार देऊन उपकृत केले याची जाणीव करून द्यावी लागेल. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागेल. स्त्री काळाची गरज आहे. न्यायव्यवस्था आणि कायद्याचे ज्ञान तिला असणे गरजेचे आहे. सुशिक्षिततेबरोबरच सुरक्षित स्त्री समाज सुसंस्कृत बनवू शकते. शिकलेल्या स्त्रीचे घर एखाद्या विद्यापीठापेक्षा कमी नाही. आर्थिक जबाबदारीचे ओझे टाकण्यापेक्षा आपल्या मुलांना- भावी पिढीला तयार करण्याचे आद्यकर्तव्य स्त्रीचे आहे. चांगल्या-वाईटाची जाण असावी, मनात ईशभय सदैव असावे तरच स्त्रीमुक्ती होईल.
- डॉ. आयेशा पठाण
नांदेड (९६६५३६६४८९)
Post a Comment