शाश्वत जल व्यवस्थापन
पावसाळा आला की सर्वत्र तारांबळ उडते. एक तर मुलांच्या शाळा सुरू होतात, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतात, वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पर्यटकांच्या सहली निघतात. या सर्वात केंद्रस्थानी असतो पाऊस. उन्हाळा भर सुट्ट्यांचा आनंद घेणारे विद्यार्थी पावसाळ्यात आपल्या वह्या-पुस्तकांबरोबरच छत्र्या आणि रेनकोटच्या बाजारांची शोभा बनतात. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या तयारीसाठी कृषी केंद्रे आणि शेत-अवजारांची दुकाने गजबजून जातात; कारण पहिला पाऊसच पेरणीच्या तयारीची सूचना देत असतो. आषाढी एकादशी आणि मृग नक्षत्राच्या सरी वारकऱ्यांच्या पायी जाणाऱ्या दिंड्यांना भिजवून त्यांचा आनंद द्विगुणित करत असतो. दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा ओंढा वाहत नदी-नाल्यांचे पात्र भरायला वेळ लागत नाही आणि त्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पाणथळ्यांच्या दिशेने गर्दी जमवत असतात.
या पावसाच्या आनंदात आणि उल्हासात लोक हे अगदी विसरून जातात की या सुखद पावसाळ्यापूर्वी एक कडक उन्हाळा आपण असा अनुभवलाय की एखाद्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे वांधे तर कधी बिना आंघोळीचा एखादा दिवस आपण घालवलाय. पावसाळ्यात जेव्हा या दिवसांची आठवण होते तेव्हा ’गेले ते दिवस’ म्हणून आपण सुटकेचा श्वास घेतो. मात्र तेच दिवस परत पुढच्या उन्हाळ्यात येतील आणि आपल्याला आज पडणाऱ्या पावसाचे व्यवस्थापन करावे हा विचार फार कमी लोकांच्या मनात येतो. यासाठी योग्य विचार आणि चिरकाल तोडगा काढण्यासाठी शाश्वत जल व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली.
शाश्वत जल व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक समता सुनिश्चित करत, वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंपत्तीचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करणे. शाश्वत जल व्यवस्थापन करण्यासाठी पहिला पैलू म्हणजे जलसंवर्धन; यामध्ये आपण कार्यक्षम पद्धतींद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून आणि वापर कमी करून पाण्याचे संवर्धन म्हणजे बचत करू शकतो. दुसरा पैलू वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकतो ज्यामध्ये आपण पिण्यायोग्य वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करून साठवून ठेवतो. पाण्याचा पुनर्वापर हा तिसरा पैलू आहे. कृषी किंवा औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणखी एक पैलू म्हणजे पाणलोट व्यवस्थापन. यात नैसर्गिक जलचक्र आणि वेगवेगळ्या अधिवासांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्संचयन केल्यास पाण्याचे व्यवस्थापन होते. पाणी आणि उर्जेचा वापर यांच्यातील परस्परावलंबन सुद्धा जल व्यवस्थापनात मदत करू शकते. कृषी जल व्यवस्थापन हा पैलूही उल्लेखनीय आहे; कार्यक्षम सिंचन प्रणाली आणि पद्धतींची अंमलबजावणी केल्यास फायदेशीर ठरेल. जल-कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि पद्धतींसह शहरांची रचना करून देखील शाश्वत जल व्यवस्थापनास हातभार लागेल. विविध जल धोरणे आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम यात उपयोगी ठरतील. जलशिक्षण आणि जागरूकता; वापरकर्त्यांना पाणी टंचाई आणि संवर्धनाबद्दल वेळीच जागरूक केले जावे. जल तंत्रज्ञान आणि नवकल्पना हाही एक पैलू होऊ शकतो ज्यामध्ये शाश्वत जल व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे आणि लागू करणे जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची बचत होईल. शाश्वत जल व्यवस्थापन केल्यास जीवन अधिक सुखकर होईल यात शंका नाही. याशिवाय अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल, आर्थिक पाठिंबा, परिसंस्थांचे संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम कमी होतील, सामाजिक समता आणि न्याय यांना प्रोत्साहन मिळेल. शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो ज्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, वारकरी आणि पर्यटक तितक्याच उल्हासात पावसाळ्याची सुरूवात करतील.
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. : 7507153106