Halloween Costume ideas 2015
2022


2030 सालाच्या विश्वचषकाचे आयोजन सऊदी अरेबिया करणार आहे. म्हणजे कतारने आशिया, अरबी राष्ट्रांना एक वाट दाखवून दिली आणि जी मिथके मुस्लिम आणि अरब राष्ट्रांविषयी जगप्रसिद्ध केली गेली होती ती कतारने खोडून काढली आहेत. 

ज्यावेळी कत्तर सारख्या एका लहानशा देशाने ज्याची एकूण लोकसंख्या 30 लाख आहे आणि त्यातले 28 लाखांपेक्षा इतर देशाचे नागरिक असून तिथे रोजगारासाठी आलेले. कतरची स्वतःची लोकसंख्या केवळ 12 लाख. फीफा वर्ल्ड कप आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्याने पहिला इतिहास रचला. एक लहान देश वर्ल्डकप सारख्या खेळाचे आयोजन करण्याची हिम्मत दाखवू शकतो, दुसरा इतिहास एक अरब आणि मुस्लिम देश. मुस्लिमां विषयीची जागतिक धारणा म्हणजे आतंकवादीची. फीफा संघटनेच्या सदस्यांना हे रुचणारे नव्हते आणि इतर पाश्चात्त्य देशांनाही हे नको होते. फिफासारख्या एका भव्य दिव्य वर्ल्ड कपचे आयोजन करणे युरोपियन फार तर रशिया सारख्या देशांचे आहे. कारण मोठे प्रकल्प हाती घेणे आणि त्याचे संयोजन करणे ही त्यांचीच मक्तेदारी. कतरला समजावण्याचे प्रयत्न झाले, धमकावले गेले, त्यांनी आपला हट्ट द्यावा यासाठी त्यांची नाही ती बदनामी करण्यात आली. मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याचे आरोप त्यांच्यावर  लावण्यात आले. ज्यांनी मानवाधिकारांचे उल्लंघनच नव्हे तर त्याची सर्रास हत्या करणाऱ्या, निरपराधावर बाबिंग करण्याचा करण्याचा इतिहास आहे अशांनी कतरवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप करणे किती दुष्टपणाचे. याचा अर्थ असा नाही की कतरणे हे उल्लंघन केले नसेल पण जर वर्ल्ड कपसारख्या आयोजनाचा निर्णय करतने घेतला नसता तर या देशांनी तिथल्या मानवांबद्दल मानवी अधिकाराबद्दल काही बोलले असते का हा प्रश्न आहे.

कतरने दुसरा इतिहास रचला. या स्पर्धेचे आयोजन करायला फिफाने शेवटी त्याला अनुमती दिली. फक्त दहा वर्षांनी हे आयोजन करायचे एकही स्टेडियम नाही की वर्ल्डकप सारखा भव्यदिव्य स्पर्धेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा नाहीत तरी देखील कतरणे वेळेवर मात दिली. दहा वर्षात असे स्टेडियम, अशा सोयीसुविधा उभारल्या जे जगात इतर देशांत नव्हत्या. यासाठी त्यांनी मोजक्या वर्षामध्ये मेट्रो रेल्वे सुद्धा चालू केली. ही सर्व तयारी करत असताना देखील युरोपियन देश गप्प बसले नव्हते. काहींनी कतरवर हे आरोप लावले की त्यांनी फीफा सदस्यांना कोट्यावधी डॉलर लाच म्हणून दिले.

सर्वात मोठा इतिहास म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापुढे करतनेही सूचना सर्व संबंधितांना दिली की कुणी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार नाही. समलैंगिकतेचा प्रचार प्रसार होणार नाही. महिलांना अंगभर वस्त्रे परिधान करावी लागतील. ह्या तर अशा अटी होत्या की युरोपियन देशांना तिथल्या व्यापारी वर्गाला जणू संपवूनच टाकले. जिथे कुठे कोणत्या खेळाचे आंतरराष्ट्रीय आयोजन होत असतात तिथे खेळ एकीकडेच राहतो. दारू विक्री, जुगाराचे अड्डेे आणि वेश्या व्यवसायासारख्या हजारोंच्या संख्येने आपले व्यवसाय करू करत असतात. फिफाच्या अध्यक्ष अँटोनिआशी व कतरचे अधिकारी यांची बोलणी झाली. त्यावेळी त्यांनी अध्यक्षांना हे स्पष्टपणे सांगितले की कतरमध्ये येणाऱ्या प्रेक्षक, खेळाडू आणि अन्य लोकांनी कतरच्या संस्कृतीचा आदर करावा. जसा ते त्या देशाच्या संस्कृती आणि तिथल्या कायदे, नियमांचे पालन करत असतात. तसेच कतरच्या कायदे आणि नियमांचे पालन करावे लागणार. आम्ही 28 दिवसांसाठी आमचा धर्म संस्कृती बदलणार नाही. नैतिकता जपणे सर्वांवर बंधनकारक असणार. त्यावर फिफाच्या अध्यक्षांनी जे उत्तर दिले ते बरेच काही सांगून जाते. ते म्हणाले की, इतर लोकांना नैतिकीचे धडे देण्यापूर्वी युरोपियन राष्ट्रानी गेली 3000 वर्षे जगात जे अत्याचार केले आहेत त्याची माफी येत्या 3000 वर्षापर्यं त्यांना मानवजातीशी मागावी लागणार. याचा अर्थ असा की, वर्ल्ड कपच्या आयोजनापूर्वीच कतरने जागतिक स्तरावर आपला इतिहास रचला.

कतरच्या लोसेल स्टेडियममध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्सध्ये अंतिम सामना झाला. यात जरी अर्जेंटिनाने सामना जिंकला असला तरी हा सामना बराच रोमांचक ठरला. जो जिंकतो तोच सर्वोत्तम ठरतो. पण फ्रान्सच्या एमबाप्पेने सामना पलटला होता. पेनाल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराजय पत्कारावा लागला, ही गोष्ट वेगळी. 

अ‍ॅन्टोनियो लोपेझ म्हणतात, ’’ मी 62 वर्षांचा आहे. मॅराडोना आणि मारिओ केम्पस यांना खेळतांना पाहिलय. पण हा सामना सर्वात ग्रेट होता. मी कधीही असा खेळ पाहिला नाही की भविष्यात पाहू शकेन मला माहित नाही. मी स्वतःला व्यक्त करू शकत नाही. जे प्रेक्षक खेळ पाहायला आले होते ते म्हणाले, आम्ही या देशाच्या प्रेमात पडलो. फक्त दारू मिळत नसेल पण कतरच्या देशवासियांनी आमचा जसा पाहुणचार केला ते आम्ही विसरणार नाही. बऱ्याच प्रेक्षकांनी स्पर्धांच्या अधून-मधून कतारची संस्कृती, त्यांचा धर्म पाहण्यासाठी सर्वत्र फिरत होते. तिथले पक्वान्न आणि संस्कृती पाहून ते भारावून गेले. एका प्रेक्षकाने असे सांगितले की, ह्या प्रवासाने माझे डोळे उघडले. आम्हाला इथे येण्याआधी बरेच लोक भीती घालत होते. पोलिसांची भीती,  सीआयडीची भीती पण इथे तसे काहीच घाबरण्याचे कारण दिसले नाही. त्यांनी जसा विचार केला होता तसा कतरमध्ये काहीही नव्हते. सर्वच आनंददायी वातावरण होते. एक प्रेक्षक म्हणतात की, कतरवासियांचा शालीन पोशाख या उत्सवाचा अविभाज्य अंग होते. एक मुस्लिम बहुल असलेल्या अरबी भाषिक देशात इतकी मोठी स्पर्धा होण्याची ही पहिलीच वेळ होती.यात अरब आणि आफ्रिका अस्मितांचे गौरवास्पद प्रदर्शन झाले. ट्युनिशिया, सऊदी अरेबिया आणि मोरोक्कोच्या विजयात हा गौरव झळकला. मोरोक्को तर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला.

मोरक्को एक आफ्रिकन अरेबियन देशाने वेगळाच इतिहास रचला. तो उपांत्य फेरीत पोहोचला आणि थोडक्यातच त्याला जिंकण्यापासून मुकावे लागले. कदाचित अंतिम सामन्यापर्यंत तो पोहोचला असता. कतरने केलेल्या या आयोजनाने युरोपियन देशांचा गैरसमज कायमचा दूर झाला तो म्हणजे मुस्लिम लोक इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करू शकत नाही. त्यांना खात्री होती की शेवटी तरी कतार स्वतःच माघार घेईल पण तसे काही घडले नाही. याचे इंग्लडला इतके दुःख झाले की बीबीसीने ज्याची जगभर विश्वार्हता आहे त्याने या स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुद्धा केले नाही. 

सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाची मनाई केल्यानंतर देखील लाखोंच्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांनी कतारबद्दल काहीही टिका केली नाही. याचे कारण त्या देशाच्या नागरिकांनी केलेला पाहुणचार. अत्याधुनिक सोयीसुविधा, वाहतुकीची सर्वोत्तम व्यवस्था, त्याचबरोबर प्रवासाच्या विविध सवलती, कतरमध्ये झालेल्या आयोजनात युरोपियन संघाच्या तुलनेत कमी दर्जाच्या ज्या देशांनी यात भाग घेतला होता, ही एक यावेळी जमेची बाजू होती. 

असे म्हटले जाते की, 2030 सालाच्या विश्वचषकाचे आयोजन सऊदी अरेबिया करणार आहे. म्हणजे कतारने आशिया, अरबी राष्ट्रांना एक वाट दाखवून दिली आणि जी मिथके मुस्लिम आणि अरब राष्ट्रांविषयी जगप्रसिद्ध केली गेली होती ती कतारने खोडून काढली आहेत. 


- सय्यद इफ्तेखार अहमद


भारत-चीन सीमाविवादाचे नेमके कारण काय? 


50 कोटीपेक्षा जास्त रूपये पी.एम.केअर फंडामध्ये विविध चीनी कंपन्यांच्या मार्फत दान घेतल्याचा आरोप भाजपवर होत आहेत व हे दान जून 2020 च्या गलवान घटनेनंतर घेतल्या गेल्याचेही आरोप होत आहेत, ही अत्यंत गंभीरबाब आहे. 

कोई आया है न कोई आया था’ पंतप्रधानांच्या या वाक्याला खोटे ठरवत भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी या आठवड्यात एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी पंतप्रधान आणि भाजपा या दोहोंवरही निशाना साधला. झी न्यूजशी बोलताना स्वामींनी या दोघांवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी अरूणाचल प्रदेशाच्या सीमेवर चीनच्या होणाऱ्या आक्रमक हालचालींविरूद्ध निषेध म्हणून सरकारने चीनशी राजनीतिक संबंध तोडून त्यांच्याकडून होणारी आयात बंद करण्याची मागणी केली. 

तवांग से्नटरच्या यांगस्ते भागामध्ये 9 डिसेंबर 2022 रोजी चीनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या घुसखोरीला प्रतिबंध करताना उडालेल्या चकमकीत आपल्या काही सैनिकांना इजा झाली. त्यामुळे त्यांना गुवाहाटीच्या सैनिक रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी घटनेच्या चार दिवसांनी देशाला कळाली. त्यामुळे एकच गदारोळ झाला. हा विषय राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फ्रन्समध्ये उचलला. मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत उचलला आणि या संबंधी सविस्तर चर्चेची मागणी केली.    

परंतु संरक्षण मंत्र्यांच्या या संबंधी दिलेल्या निवेदनाशिवाय अधिक चर्चा करण्यास सरकारने नकार दिल्याने संसदेबाहेर यावर भरपूर चर्चा झाली व अद्यापही सुरू आहे. अशा परिस्थितीत भारत-चीन सीमा विवाद न्नकी काय आहे, या संबंधी चर्चा करणे अप्रस्तुत ठरणार नाही. 

आपल्यापैकी बहुतेकांचा असा समज असण्याची शक्यता आहे की, आपली सर्वात मोठी जमीनी सीमा पाकिस्तानबरोबर असावी. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. आपली सर्वात मोठी जमीनी सीमा (4096 कि.मी.) बांग्लादेशाशी आहे. त्यानंतर दूसरा क्रमांक चीनचा लागतो. त्यांची व आपली जमीनी सीमा 3 हजार 488 किलोमीटर एवढी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. ज्याची आपली जमीनी सीमा 3 हजार 310 किलोमीटर एवढी आहे. 

सीमला करार

भारत-चीन सीमावादाचे मूळ सीमला करारामध्ये आहे. हा करार जुलै 1914 मध्ये ब्रिटिश इंडिया-तिबेट आणि चीन यांच्यात झाला होता. ब्रिटिश इंडियातर्फे मॅकमोहन यांनी या करारावर सही केली होती. म्हणून या कराराद्वारे जन्माला आलेल्या सीमारेषेला ’मॅकमोहन लाईन’ असे म्हटले जाते. तेव्हा तिबेट हा स्वतंत्र देश होता. हा करार झाल्यानंतर चीन सरकारने या कराराला मान्यता दिली नाही. चीनी प्रतिनिधींनी करारावर केलेल्या सह्या अमान्य केल्या. म्हणून हा करार प्रत्यक्षात ब्रिटिश इंडिया आणि तिबेट यांच्यामध्येच झाला, असे समजण्यात येते. त्यावेळेस चँग-काय-शेक हे चीनचे सर्वेसर्वा होते. तेव्हा चीनला ’रिपब्लिक ऑफ चायना’ म्हटले जायचे. मात्र अनेक वर्षे चीनमध्ये गृहयुद्ध चालले आणि शेवटी कम्युनिस्ट पार्टीने सत्ता काबीज केली व देशाचे नाव ’पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ असे ठेवले गेले. 1959 पर्यंत सीमला करार अमान्य करूनही चीनने मॅकमोहन रेषेचे कधी उल्लंघन केलेले नाही. दरम्यान, चीनने तिबेट गिळंकृत करून टाकले. ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाची फाळणी झाली व त्यानंतर पाकिस्तानकडून आफ्रिदी टोळ्यांनी केलेल्या आगळिकीमध्ये कश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. ज्याला पीओके म्हणून ओळखले जाते. त्यातील चीन सीमेलगतचा काही भाग पाकिस्तानने चीनला देऊन टाकला. याच घडामोडींच्या काळात तेव्हाच्या चीनचे राष्ट्रप्रमुख चाउ-एन-लाय यांनी नेहरूंना एक पत्र लिहून कळविले होते की, पीओकेमधील अक्साई चीन आणि लद्दाख या क्षेत्राला आमचा भाग म्हणून तुम्ही मान्यता द्या. बदल्यात आम्ही तुम्हाला नेफा (आताचा अरूणाचल प्रदेश) च्या मॅकमोहन रेषेला मान्यता देऊ. नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला. तरी सुद्धा आपले संबंध चीनशी चांगलेच राहिले. दोन्ही देशांनी पंचशील करार मान्य केला. हिंदी-चीनी भाईभाईच्या घोषणा झाल्या. पण चीनच्या मनात अरूणाचल प्रदेश बळकावण्याचे मन्सुबे सुरूच होते. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले. तेव्हा दोन्ही देशातील संबंध बिघडले. दोघांनी एकमेकांचे राजदूत परत बोलावले. दुतावास बंद पडले. ते 1976 साली पुन्हा सुरळीत झाले. 1988 मध्ये भारतीय पंतप्रधान चीनला गेले व 1993 मध्ये दोन्ही देशात एक करार झाला. त्यात आजची ’एलओएसी’ किंवा ’एलएसी’ दोन्ही देशांनी सीमा म्हणून स्विकारली. 

दरम्यानच्या काळात एक महत्त्वपूर्ण घटना घडली होती जिचा उल्लेख सर्वसाधारणपणे केला जात नाही. त्याचे झाले असे की, 1967 साली सुद्धा भारत-चीनमध्ये एक मोठी झडप झाली. या छोट्या युद्धाला लष्करी अधिकारी, ’बॅटल ऑफ चोला’ किंवा ’बॅटल ऑफ नथुला’ म्हणून ओळखतात. या छोटेखानी युद्धामध्ये भारताचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल सगट यांच्या अभूतपूर्व शौर्यामुळे चीनला जबर मार खावे लागले. त्यांची मोठी हानी झाली. आकडेवारीमध्ये सांगावयाचे झाल्यास या युद्धात भारताचे 88 सैनिक शहीद तर 163 जखमी झाले होते. तर चीनचे 340 सैनिक ठार व 450 जखमी झाले होते. या युद्धात भारताने चीनची जमीन जरी हस्तगत केली नव्हती तरी मार मात्र जबर दिला होता. त्याची दहशत 2020 पर्यंत कायम होती. या युद्धानंतर चीनने भारताच्या सीमेवर खोड्या करणे तर सोडून द्या 1971 च्या बांग्लादेश युद्धातही भारताविरूद्ध उतरण्याचे धाडस केले नव्हते. पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री घनिष्ठ होती. पाकिस्तानने वारंवार विनंती करून आणि अमेरिकेने पुन्हा-पुन्हा आवाहन करून ही चीन-भारताविरूद्ध उतरला नव्हता. 1967 ते 2020 हा काळ भारत-चीन सीमेवरील शांततेचा काळ मानला जातो. इतका शांततेचा की या दरम्यान, दोन्हीकडून एकदाही गोळीबार झाला नाही. जून 2020 मध्ये मात्र गलवान घाटीत चीनने आक्रमण केले होते, हा इतिहास ताजा आहे जो वाचकांना माहितच आहे. 

देशहित सर्वोपरी असावे

आता तवांग येथील ताजा घटनेसंबंधी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्न विचारताच भाजपावाले त्यांच्यावर तुटुन पडले. सेनेचे मनोबल कमी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप लावला. काँग्रेसने चीनकडून निधी घेतल्याचाही आरोप लावला. वास्तविक पाहता देशहित सर्वोतोपरी समजून या आरोप-प्रत्यारोपाच्या मानसिकतेतून भाजपने बाहेर पडायला हवे. कारण काँग्रेसने जो निधी घेतला तो 18 वर्षीपूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनसाठी घेतला तो 1 कोटी पेक्षा थोडासा अधिक होता, असे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. तो जर बेकायदेशीर होता तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही, हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे. मात्र 50 कोटीपेक्षा जास्त रूपये पी.एम.केअर फंडामध्ये विविध चीनी कंपन्यांच्या मार्फत दान घेतल्याचे आरोप भाजपवर होत आहेत व हे दान जून 2020 च्या गलवान घटनेनंतर घेतल्या गेल्याचेही आरोप होत आहेत, ही अत्यंत गंभीरबाब आहे. जर हा आरोप खरा असेल तर हा प्रश्न फक्त देशाच्या सुरक्षिततेचाच नाही तर देशाच्या स्वाभीमानाचाही आहे, हे भाजपासहीत भाजपच्या सर्व समर्थकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

जय हिंद !


क्विंट, द प्रिंट, सत्य हिंदी.कॉम, नॅशनल दस्तक, प्रज्ञा का पन्ना, मीडिया टुमारो, न्यूज लाँड्री, अल्ट न्यूज सारखे न्यूज पोर्टल आणि साक्षी जोशी, अजित अंजुम, रविश कुमार, एम.के. सिंग, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून बाजपाई सारखे अनेक लोक जनहिताचे मुद्दे उचलत आहेत.

आज जगामध्ये आपण कोणाला शिकवू शकत नाही. पण विचार करण्यास न्नकीच भाग पाडू शकतो. हे सत्य लक्षात घेऊन उत्तोमत्तम कंटेंट तयार करून त्याची मांडणी आकर्षक पद्धतीने केल्यास भविष्यात नक्कीच फरक पडेल, अशी आशा करण्यासाठी भरपूर वाव आहे.


दुर्दैवाने मागील काही वर्षांपासून संवादाचे वर्तूळ संकीर्ण होत आहे. मतभेदांना आता पूर्वीसारखे स्थान राहिलेले नाही. राष्ट्रीय म्हणविल्या जाणाऱ्या मीडियामध्ये तेच मुद्दे उचलले जात आहेत जे बहुसंख्य समाजाला आकर्षित करतात व सरकारचे ज्याला अनुमोदन प्राप्त आहे. मात्र उद्याच्या भारताच्या जडणघडणीत सहाय्यक ठरतील असे मुद्दे कोणीच उचलत नाही. स्वाभाविकरित्या मग ही जबाबदारी वैकल्पिक मीडियाकडे आलेली आहे. उद्याच्या भारताच्या निर्माणासाठी आज कष्ट करावे लागणार आहेत. त्यासाठी सत्य आणि अहिंसेवर आधारित एका संवेदनशील समाजाची गरज आहे आणि असा समाज निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय मीडिया अजिबात करत नाहीये. नव्हे त्याला या जबाबदारीचे भानसुद्धा नाहीये. ईश्वरकृपेने हे भान वैकल्पिक मीडिया बाळगून आहे. आज क्विंट, द प्रिंट, सत्य हिंदी.कॉम, नॅशनल दस्तक, प्रज्ञा का पन्ना, मीडिया टुमारो, न्यूज लाँड्री, अल्ट न्यूज सारखे न्यूज पोर्टल आणि साक्षी जोशी, अजित अंजुम, रविश कुमार, एम.के. सिंग, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून बाजपाई सारखे अनेक लोक जनहिताचे मुद्दे उचलत आहेत. सरकारला प्रश्न विचारत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा यथाशक्ती विरोध करत आहेत. सरकारच्या चुका दाखवून देण्याचे काम फक्त वैकल्पिक मीडियाकडून होत आहे. ही आपल्या लोकशाहीसाठी घातक बाब आहे. खरे सांगावयाचे झाल्यास लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वैकल्पिक मीडियाने वाचविले आहे. हे उमाकांत लाखेडा (अध्यक्ष प्रेस्नलब ऑफ इंडिया) यांचे म्हणणे संयुक्तिक वाटते. उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’जब किसी वजह से सियासी कयादत (राजकीय नेतृत्व) नाकाम हो जाती है तो उस मुल्क की सहाफत (मीडिया) को कयादत (नेतृत्व) और सहाफत दोनों का रोल अदा करना पडता है. अर्थात काही कारणाने जर का एखाद्या देशात राजकीय नेतृत्व देशाला योग्य दिशा देण्यात कमी पडत असेल तर मीडियाला आपल्या जबाबदारीसोबत देशाला नेेतृत्व देण्याचे काम देखील करावे लागते. 

पत्रकारितेचे क्षेत्र सोपे क्षेत्र नाही. त्यासाठी कायम धोखा पत्करावा लागतो. या क्षेत्राला जरी सत्याचा भक्कम आधार असला तरी असत्याच्या पायावर ज्या समाजाची रचना झालेली असेल त्या समाजात सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणे किती कठीण असते, याचा अनुभव आज देश घेत आहे. आजकाल न्यायाधिशांना सुद्धा हे जमेनासे झाले आहे. तेही तेव्हा, जेव्हा त्यांना पोलीस संरक्षण प्राप्त असते. पत्रकारांना तर संरक्षणाशिवाय, रोजच आपला जीव धोक्यात घालावा लागतो. सांप्रदायिकतेने आज प्रत्येक क्षेत्राचा ताबा घेतला आहे. त्यामुळे देशाच्या भविष्यावर दुरगामी परिणाम करणाऱ्या मुद्दयांपेक्षा उथळ मुद्यांना राष्ट्रीय मुद्दे म्हणून सादर केले जात आहे. जनतेलाही तेच आवडत आहे. उदा. चीनने अरूणाचल सीमेवर पुन्हा आगळीक केली. हा मुद्दा राष्ट्रीय मीडियाला कमी महत्त्वाचा वाटतो. पण दीपिकाने   आगामी चित्रपटात कोणत्या रंगाचे अंतरवस्त्र घातले हा मुद्दा मात्र महत्त्वाचा वाटतो. म्हणून जास्त चर्चा याच विषयाची केली जात आहे. भोपाळच्या खासदार व आतंकवादाच्या गुन्ह्यामधील चार्जशिटेड आरोपी प्रज्ञा ठाकूर आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा सारख्या उथळ पण जबाबदार पदावर आसीन लोकांनी जेव्हा दीपिकाच्या अंतरवस्त्राच्या रंगाचा मुद्दा उचलला तेव्हा राष्ट्रीय मीडियाने त्यांच्या वक्तव्याला भरघोस प्रसिद्धी दिली. मात्र हा वैकल्पिक मीडियाच होता ज्याने राजेश खन्ना- मुमताजपासून अक्षयकुमार, खा. नवनीत राणा, स्मृती इरानी, मनोज तिवारी आणि निरूहा पर्यंतच्या भगव्या रंगातील कपड्यातील जुन्या आक्षेपार्ह्निलप्स चालवून चोख प्रत्युत्तर दिले. 

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय मीडिया आपल्या एकतर्फी बातम्या देण्याच्या धोरणामुळे स्वतःची प्रतिष्ठा आणि विश्वासर्हता दोन्ही घालवून बसला आहे. याउलट सत्याची कास धरल्या कारणाने वैकल्पिक मीडियाची प्रतिष्ठा आणि विश्वासर्हता दोन्ही कायमच नसून तर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मेनस्ट्रिम मीडियामध्ये दिल्या गेलेल्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी लोक वैकल्पिक मीडियाचा आधार घेत आहेत. वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांक समुदायातील लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या समाज घटकांना वैकल्पिक मीडियाच्या माध्यमातून आपले म्हणणे जनतेसमोर मांडण्याची व जनमताला प्रभावित करण्याच्या चालून आलेल्या या संधीचे सोने करण्यासाठी पुढे येण्याची व कष्ट करण्याची गरज आहे. 

आता ते दिवस संपले जेव्हा वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांना राष्ट्रीय मीडियामध्ये डावलले जात होते.  आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो  लेखक आहे, पत्रकार आहे, उपसंपादक आहे आणि संपादकही आहे. विशेष म्हणजे त्याला आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्काय इज द लिमिट. 

जनमताला मोठ्या प्रभावित करण्याची वैकल्पिक मीडिया ही एका प्रकारची ईश्वरीय देणगीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज वंचित, बहुजन आणि अल्पसंख्यांकांना आपली कल्पकता, कार्यक्षमता आणि रचनाशीलता याचे दर्शन घडविण्याची आयती संधी चालून आलेली आहे. याचा लाभ उठविण्याची गरज आहे. या संबंधी आपापल्या समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाचा जिथपर्यंत संबंध आहे तिथपर्यंत आपण पाहतो साधारणपणे वैकल्पिक मीडियाचा उपयोग हा समाज वाढदिवसाच्या शुभेच्छा, फालतू शायरी, व्यर्थ फॉरवर्डस्, स्वतःचे विविध अँगलने घेतलेले बटबटीत फोटो आणि उलेमांच्या्निलप्स याच्या पुढे जाताना दिसत नाहीत. फार कमी मुस्लिम लोक आहेत जे वैकल्पिक मीडियाचा प्रभावशाली वापर करतांना दिसून येतात. हे दुर्दैवी चित्र पालटण्यासाठी ज्यांना वैकल्पिक मीडियाच्या महत्त्वाची जाणीव आहे अशा लोकांना अहोरात्र विविध मार्गाने जनमतास प्रभावित करण्यासाठी कष्ट घेण्याची गरज आहे. आज जगामध्ये आपण कोणाला शिकवू शकत नाही. पण विचार करण्यास न्नकीच भाग पाडू शकतो. हे सत्य लक्षात घेऊन उत्तोमत्तम कंटेंट तयार करून त्याची मांडणी आकर्षक पद्धतीने केल्यास भविष्यात नक्कीच फरक पडेल, अशी आशा करण्यासाठी भरपूर वाव आहे. 

इंडिया टुमारोद्वारे शिबिराचे आयोजन

याच गोष्टीची जाणीव ठेऊन, ’’कल के भारत के निर्माण में वैकल्पिक मीडिया की भूमिका’’ या विषयावर 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीच्या कॉन्स्टीट्युशनल्नलबमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन इंडिया टुमारो न्यूज पोर्टलद्वारे करण्यात आले होते. ज्यात उमाकांत लाखेडा (अध्यक्ष प्रेस्नलब ऑफ इंडिया), प्रा. प्रदीप माथूर आणि एमआयटी जयपूरचे प्रा.सलीम इंजिनियर हे हजर होते. 

याप्रसंगी वैकल्पिक मीडियामध्ये महत्त्वाची भूमीका बजावणाऱ्या ज्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला त्यात मूकनायकच्या मीना कोतवाल, वसीम अक्रम त्यागी, मिल्लत टाईम्सचे शम्स तबरेज कास्मी, एशिया टाईम्सचे अश्रफ बस्तवी, स्वतंत्र पत्रकार अभय कुमार, मकतूब मीडिया, दी जनता लाईव्हच्या पूजा पांडेय, छात्र आणि कॅम्पस पत्रिका ’दी कम्पेनियन’ द हिन्दुस्थान गॅझेट, पल-पल न्यूजच्या खुशबू अख्तर - नदीम अख्तर आणि जनमानस राजस्थानचे रहीम खान इत्यादींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडिया टुमारोचे संपादक सय्यद खालीक अहेमद यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन इंडिया टुमारोचे वरिष्ठ पत्रकार अर्शद शेख यांनी केले. 


- एम. आय. शेख



हजरत अब्दुल्लाह इब्ने अब्बास (र.) म्हणतात की एके दिवशी मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मागे चालत होतो तेव्हा ते म्हणाले,

"मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, अल्लाहच्या मर्यादा पाळा (म्हणजे अल्लाहचे अधिकार, त्याने जे वैध केले त्या आणि जे निषिद्ध केले त्या गोष्टी) अल्लाह तुमचे संरक्षण करील. त्याला तुम्ही समोर पाहू शकाल. मागायचे असल्यास अल्लाहकडेच मागा, मदत हवी असेल तर त्याचीच मागा. तेव्हा हे लक्षात ठेवा की जर सर्व लोकांनी तुम्हाला मदत करायचे ठरवले तरी अल्लाहने तुमच्यासाठी जे ठरवले असेल त्या व्यतिरिक्त ते तुम्हाला कोणताही लाभ पोहचवू शकत नाहीत आणि जर सर्व लोकांनी तुम्हाला हानी पोहोचवण्याचे ठरवले असेल तरी अल्लाहने तुमच्यासाठी जे ठरवले आहे त्या व्यतिरिक्त ते तुमची कसलीही हानी करू शकत नाहीत."                                                          (तिर्मिजी)

"दुसऱ्या ठिकाणी असे म्हटले आहे की तुमची परिस्थिती चांगली असताना तुम्ही अल्लाहशी जवळीक साधली असेल तर तो तुमच्या संकटाच्या वेळीही तुमची साथ देईल. हे जाणून घ्या की जे काही तुम्हाला मिळाले नसेल ते तुम्हाला मिळणारच नव्हते आणि जे काही तुम्हाला मिळाले हे ते कसल्याही परिस्थितीत तुम्हाला मिळणारच होते. हेही लक्षात ठेवा की संयमाने वागला तरच तुम्हाला यश लाभेल आणि कठीण स्थितीतनंतर पुन्हा तुम्हाला सहजताही लाभणार."           (गंजीन ए हिकमत)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात,

"अल्लाहचे विधान आहे की माझ्या भक्तांमध्ये काही लोक असे असतात ज्यांची श्रद्धा गरीब परिस्थितीतच टिकून राहते. मी त्यांना विपुलता दिली तर ते त्यांच्यासाठी समस्या ठरेल. काही लोक असे असतात जे संपन्नावस्थेतच आपल्या श्रद्धेची रक्षा करतात. जर त्यांना गरिबी दिली तर त्यांच्यासमोर ती समस्या उभी राहील. काही लोक आजारपणात श्रद्धा टिकून ठेवतात, त्यांना स्वास्थ्य दिले तर त्यांच्यासाठी समस्या होईल, काही लोक निरोगी अवस्थेत श्रद्धेवर ठाम राहतात, त्यांना आजार दिला तर ते अस्वस्थ होतात. काही लोक असे असतात जे उपासनेचा एखादा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, मी त्यांना रोखतो जेणेकरून ते अहंकारी होऊ नयेत म्हणून. माझ्या भक्तांच्या मनात जे जे काही असते त्यानुसारच मी त्यांच्याशी व्यवहार करत असतो. कारण मी सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे."      (ह. अनस र., तिर्मिजी)

संकलन :

- सय्यद इफ्तिखार अहमद



(५) आता जर तुम्हाला आश्चर्य करावयाचे असेल तर आश्चर्य करण्यास योग्य लोकांचे हे कथन आहे, ‘‘जेव्हा आम्ही मरून माती होऊ तेव्हा काय आम्ही नव्याने निर्माण केले जाऊ?’’ हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकत्र्याशी द्रोह केला आहे.१२ हे ते लोक आहेत ज्यांच्या मानेत जोखड अडकलेले आहेत.१३ हे नरकवासी (जहन्नमी) आहेत आणि जहन्नममध्ये (नरकामध्ये) सदैव राहतील. 

(६) हे लोक भल्यापूर्वी वाईटाकरिता घाई करीत आहेत१४ वस्तुत: यांच्यापूर्वी (ज्या लोकांचे असे वर्तन राहिले आहे त्यांच्यावर अल्लाहच्या प्रकोपाची) धडा शिकविणारी उदाहरणे घडलेली आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा पालनकर्ता लोकांचा अत्याचार असतानादेखील त्यांच्या बाबतीत डोळेझांक करतो, आणि हेही सत्य आहे की तुझा पालनकर्ता कठोर शिक्षाही देणारा आहे.

(७) हे लोक ज्यांनी तुमचे म्हणणे ऐकण्यास इन्कार केला आहे, म्हणतात, ‘‘या व्यक्तीवर याच्या पालनकत्र्याकडून एखादी निशाणी का अवतरली नाही?’’१५ तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात, आणि प्रत्येक जनसमूहासाठी एक मार्गदर्शक आहे.१६


१२) म्हणजे त्यांचे परलोकाला नाकारणे खरे तर अल्लाह आणि त्याची शक्ती व तत्त्वदर्शितेला नाकारणे आहे. ते केवळ इतकेच सांगत नाही की आम्ही मातीत मिसळल्यानंतर पुन्हा जन्माला येणे असंभव आहे परंतु त्यांच्या याच कथनात हा विचार आढळतो की (अल्लाहचा आश्रय) तो खुदा असे करण्यास विवश आहे ज्याने त्यांना निर्माण केले आहे.

१३) मानेवर जोखड असणे म्हणजे कैदी होण्याची निशाणी आहे. या लोकांच्या मानेवर जोखड असण्याचा अर्थ असा आहे की हे लोक आपल्या अज्ञानतेचे, आपल्या दुराग्रहाचे, आपल्या मनोकामनांचे आणि आपल्या पूर्वजांच्या अंधानुकरणाचे कैदी बनलेले आहेत. हे स्वतंत्रतापूर्वक विचार करू शकत नाहीत. यांना यांच्या मतभेदांनी इतके जखडून ठेवले आहे की हे परलोक जीवन मानत नाहीत. परलोक जीवन मान्य करणे तर बुद्धीसंगत आणि उचित आहे तरी ते परलोक नाकारण्यावर ठाम आहेत जे सर्वथा अनुचित आहे.

१४) मक्का येथील इस्लाम विरोधक पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणत असत, `तुम्ही खरे पैगंबर असाल तर आणि तुम्ही पाहाता की आम्ही तुम्हाला खोटे लेखत आहोत तर तो कोप आमच्यावर का कोसळत नाही ज्याची धमकी तुम्ही आम्हाला देता? तो प्रकोप होण्यास विनाकारण विलंब का होत आहे? लोक (विरोधक) कधी आव्हान देतात, `हे आमच्या पालनकर्त्या! तू आमचा हिशेब आताच करून टाक. कयामतपर्यंत लांबवू नकोस.' (सूरह साद, आयत १६) आणि कधी सांगत, ``हे अल्लाह, या गोष्टी ज्या पैगंबर मुहम्मद (स.) सांगत आहेत, ते सर्व तुझ्याकडून असतील आणि सत्य असतील तर आमच्यावर आकाशातून दगडांचा वर्षाव कर किंवा भयंकर वेदनादायी प्रकोप पाठव.''  (सूरह   अल्अन्फाल,

आयत ३२) या आयतमध्ये विरोधकांच्या याच गोष्टींचे  उत्तर  दिले  आहे  की  हे  नादान  लोक  भलाईपूर्वीच  वाईटाची  मागणी  करीत आहेत. अल्लाहकडून  यांना  सरळमार्गांवर येण्याची जी संधी दिली जात आहे त्याचा लाभ उठविण्याऐवजी ते मागणी करतात की या संधीला त्वरित समाप्त् करून त्यांच्या विद्रोहाबद्दल त्यांची पकड त्वरित व्हावी. 

१५) निशाणीने त्यांना अभिप्रेत अशी निशाणी होती जिला पाहून त्यांचा दृढ विश्वास व्हावा की  मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत. ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीला तिच्या सत्यतेच्या प्रमाणांशी समजून घेण्यास तयार नव्हते. ते लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र आचरणापासून बोध घेण्यास तयार नव्हते. तसेच सहाबा (रजि.) यांच्या जीवनात जी महान नैतिक क्रांती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीच्या प्रभावाने घडली होती, त्यापासूनसुद्धा ते बोध घेत नव्हते. विरोधक त्या तर्कसंगत प्रमाणांवरसुद्धा विचार करण्यास तयार नव्हते ज्याकडे त्यांच्या अनेकेश्वरवादी धर्माच्या आणि अज्ञानतापूर्ण अंधविश्वासाच्या चुका दाखविण्यासाठी कुरआन संकेत करत आहे. त्यांना वाटत होते की याऐवजी त्यांना एखादा चमत्कार दाखविला जावा ज्याच्या कसोटीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाला पारखले जावे.

१६) हे त्यांच्या मागणीचे संक्षिप्त् उत्तर आहे. हे उत्तर सरळसरळ त्यांना देण्याऐवजी अल्लाहने आपल्या पैगंबर मुहम्मद (स.) यांना संबोधन करून दिले आहे. म्हणजे हे पैगंबर मुहम्मद (स.)!  तुम्ही या चिंतेत पडू नका की यांना संतुष्ट करण्यासाठी शेवटी कोणता चमत्कार दाखवावा. तुमचे काम प्रत्येकाला संतुष्ट करणे नाही. तुमचे काम तर केवळ गफलतीत पडलेल्या लोकांना सावध करणे आहे आणि त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून त्यांना सावधान करणे आहे. ही सेवा आम्ही प्रत्येक काळात प्रत्येक लोकसमुदायात एकेक मार्गदर्शकाची नियुक्ती करून घेतली आहे, आता हीच सेवा तुमच्याकडून घेत आहोत. ज्याला वाटेल त्याने आपले डोळे उघडे ठेवावे आणि ज्याला वाटेल त्याने गफलतीत राहावे. हे संक्षिप्त् उत्तर देऊन अल्लाह त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतो. त्या विरोधकांना अल्लाह सचेत करतो की तुम्ही एखाद्या अंधेरनगरीमध्ये राहात नाही, तुमचा संबंध अशा ईश्वराशी आहे जो तुमच्यापैकी एकएक माणसाला त्यावेळेपासून ओळखतो जेव्हा तुम्ही आईच्या पोटात होता. तो तर तुमच्या प्रत्येक कृत्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्याजवळ तुमच्या भाग्याचा न्यायाधिष्ठित निर्णय तुमच्या गुणांनुसार होतो. जमीन व आकाशांत अशी दुसरी शक्ती नाही की अल्लाहच्या निर्णयावर प्रभाव टाकेल.



पत्रकारिता हे एक लोकसेवेचे व्रत म्हणून राहिले आहे. थोर समाजसेवकांनी हे ब्रीद ओळखून लोकसेवेसाठी पत्रकारिता हे शस्त्र म्हणून वापरले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात ब्राह्मणेत्तर चळवळीने फार मोठी सामाजिक क्रांती केली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राम्हणेत्तरांची वृत्तपत्रे निघत, चार-सहा महिने कशीबशी चालत आणि आर्थिक अडचणीमुळे ती बंद पडत असत. सुशिक्षित, सुजाण ब्राम्हणवर्गाकडून अशा पत्रांना आश्रय मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. तसेच सुशिक्षित बहुजन समाजातील तरुणांकडे विकत घेवून वृतपत्र वाचण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे वृतपत्र चालवण्यासाठी आवश्यक असलेला वाचक वर्ग व वर्गणीदार मिळत नसल्याने ही पत्रे अल्पायुषी ठरत. अशा कठीण परिस्थितीत ब्राम्हणेतर चळवळीतील कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने व तळमळीने वृत्तपत्र सुरू करून सनातन्यांसमोर आव्हान उभे केले.

महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर चळवळ व पत्रकारिता:

भारतातील निरनिराळ्या प्रांतात एकोणिसाव्या शतकात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक व्यक्ती व संस्था यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने राजाराम मोहनरॉय, महर्षी दयानंद यांचा ‘ब्राम्हो समाज’ व ‘आर्य समाज’ या संघटनांचा समावेश होतो. त्यांनी त्या काळात भारतात अंधश्रद्धेच्या व वाईट चालीरिती च्या विरोधात चळवळ चालवली होती. महाराष्ट्रातील त्या शतकातील सामाजिक स्थिती अत्यंत बिकट अशीच होती. पेशवाईच्या काळातील ब्राह्मणांचे वर्चस्व इंग्रजांच्या राज्यात ही कायम होते. त्यामुळे बहुजन समाजातील जनता त्यांच्या पिळवणुकीस कंटाळली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेला प्रस्थापित समाज आपली सर्व क्षेत्रातील सत्ता सहजासहजी न सोडता आपल्या न्याय मागणीसाठी संघटीत होत चाललेल्या चळवळी मोडून काढण्याचे प्रयत्न करीत होता. म. फुले हे जाणून होते. त्यामुळे धार्मिक व सामाजिक पातळीवर वैचारिक भूमिका मांडण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणारा समाज स्थापन करण्याकरिता एका व्यासपीठाची गरज भासू लागली. महात्मा जोतीराव फुले यांनी दि. 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे ‘सत्यशोधक समाज’ नावाची संस्था निर्माण केली. काबाडकष्ट करणार्‍या कामकरी वर्गात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण व्हावा, दारिद्रय, जुलमी समाजव्यवस्था व त्यातून उत्पन्न होणारे सामाजिक अन्यायाविरूद्ध दंड थोपटण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे. अन्याय व अत्याचारविरूद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्याठायी निर्माण व्हावी यासाठी कार्य करण्याचे उद्दीष्ट सत्यशोधक समाजाचे होते.

सत्यशोधक समाजाला बहुजन समाजापासून फार मोठा पाठींबा मिळाला.गावोगावी त्याच्या शाखा चालू झाल्या, तरी फार मोठ्या बुद्धीमंतांचा पाठींबा नव्हता. राजनिष्ठेने वागण्याच्या शपथेमुळे तर ती संस्था ब्रिटिश धार्जिणी  समजली गेली. तथापि तिची निर्मिती ही ऐतिहासिकदृष्ट्या एक फार महत्वाची गोष्ट होती. कारण या संस्थेचा संस्थापक हा एक साधा प्रामाणिक शेतकरी तत्वज्ञानी होता. त्याच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान ह्रदय होते. भाषा सर्वसामान्य जनतेची होती. अडाणी जनतेला चांगले शिक्षण मिळावे आणि त्यायोगे धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, सत्य-असत्य काय हे त्यांचे त्यांनाच समजावे. अशी त्यांची अंत:प्रेरणा होती. त्याचे पांडित्य फार नव्हते. पण कार्यशक्ती व तळमळ फार मोठी होती.

कोल्हापूर येथील सत्यशोधक चळवळ :

पुण्यात म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची सुरवात केली पण या चळवळीस प्रामुख्याने नंतरच्या काळात कोल्हापुरात आश्रय मिळाला,  वेदोक्त प्रकरणातून राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. 1900 ते 1901 या दरम्यान वर्णवर्चस्वाच्या ब्राम्हणी अहंकाराचा जबरदस्त तडाखा शाहू छत्रपतींना वर्मी लागल्यावर 26 जुलै 1902 रोजी त्यानी आपल्या संस्थानात मागासलेल्या जातीसाठी नोकरीमध्ये 50 टक्के जागा राखून ठेवल्याचा आदेश काढून प्रथमच समाजाच्या आर्थिक क्षेत्रात पूर्ण वर्चस्व असणा-या वर्गाविरुध्द जोरदार आवाज उठवला. आणि इथूनच छत्रपती शाहुंच्या बहुजन समाजाच्या कार्यास सुरवात झाली. ख-या अर्थाने 1911 नंतरच कोल्हापूरात सत्यशोधक चळवळ अधिक जोरदारपणे  सुरु झाली. प्रत्यक्ष कोल्हापूरात 1913 मध्ये भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. शाहू छत्रपतींनी वेदोक्त प्रकरणानंतर सत्यशोधक चळवळीला अधिक प्रोत्साहन आणि पाठींबा देण्यास सुरवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी जोतीरावांच्या तत्वांचा पुरस्कार केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाजाचा हा हा म्हणता प्रसार होवून तो ब्राम्हणांची खुदद पाळेमुळे खणून काढण्या इतका खंबीर बनू लागला. सत्यशोधक मतांची पत्रे निघू लागली. सत्यशोधक समाजाच्या प्रगतीचा इतिहास जर पहिला तर सत्यशोधक समाजाची खरी प्रगती, वाढ किंवा जनतेत त्याचा प्रसार हा त्याला शाहू महाराजांचा आश्रय मिळाल्यानंतरच झाल्याचे दिसून येते.

ब्राम्हणेत्तर चळवळ :

महाराष्ट्रात पूर्वापार स्थायिक झालेल्या जमातीचे आर्थिक व शैक्षणिक प्रगतीनुसार ब्राह्मण, प्रभू इत्यादी पुढारलेल्या ब्राम्हणेत्तर जाती मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी इ. ब्राम्हणेत्तर जाती आणि अस्पृश्य व इतर मागासलेल्या जमाती असे तीन विभाग पाडावे लागतात.  पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांकडून काही प्रमाणात राजकीय हक्क मिळतील या आशेने हिंदू लोकांच्या निरनिराळ्या जातीत स्पर्धा सुरु झाली. महाराष्ट्रात मराठे बहुसंख्य असल्याने राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यासाठी मराठ्यांना प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वगैरे पुढार्‍यांनी ‘मराठा राष्ट्रीय संघ’ या संस्थेची स्थापना केली. मात्र ब्राम्हणेतर व अस्पृश्य समाजाला एकत्र आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले नाही. त्यामुळे ब्राम्हणेतराच्यां स्वतंत्र राजकीय पक्षाची उभारणी ही कल्पना पुढे आली. राष्ट्रीय चळवळीचा वाढता प्रभाव व पहिल्या महायुद्धामध्ये बदललेली परिस्थिती लक्षात घेवून दि. 20 ऑगस्ट 1917 रोजी भारतमंत्री माँटेग्यू यांनी ब्रिटीश सरकारचे हिंदुस्थान विषयक धोरण जाहीर केले. ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक असलेल्या प्रातिनिधिक स्वायत सरकार स्थापन करण्याचा हेतू माँटेग्यू यांनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय हालचालींना सुरवात झाली. यानंतर  सत्यशोधक चळवळीचे राजकीय चळवळीत रुपांतर होवून सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी 1918 साली ‘ऑल इंडिया मराठा लीग’  व  ‘डेक्कन रयत सभा’ या संघटनांची स्थापना केली. या संघटनांनी मराठा व मागासवर्गीयासांठी राखीव जागा ठेवण्याची मागणी केली.  सत्यशोधक चळवळी सारख्या मुलतः धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या चळवळीचे शाहू महाराजांच्या प्रेरणेने व पुढाकाराने ब्राम्हणेत्तर या मुख्यत: राजकीय चळवळीत रुपांतर झाल्यानंतर सर्व सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीत सामील झाले आणि 12 डिसेंबर 1920 रोजी पुणे येथील ‘जेधे मॅन्शन’ येथे ब्राम्हणेत्तर संघाची स्थापना करण्यात आली. 

ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रे आणि राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य :

कोल्हापुरात  ‘ज्ञानसागर’ नावाचे पत्र 1870 मध्ये निघाले. परंतु या पत्राचा मवाळपणा व सरकारी अधिकार्‍यांची मनधरणी यामुळे हे पत्र अल्पावधीतच बंद पडले. त्यामुळे आबासाहेब पारसनीस व शंकरशास्त्री गोखले यांनी ‘दक्षिण वृत्त’  नावाचे पत्र 1883 मध्ये सुरु केले. परंतु शंकरशास्त्री यांचे पारसनीस यांच्याशी जमेनासे झाले. त्यामुळे 1886 मध्ये ‘विद्याविलास’ हे मासिक सुरु करून नंतर ते दैनिक स्वरुपात चालू केले. प्रोफेसर विजापूरकरांच्या प्रभावाखालचे ‘समर्थ’ साप्ताहिक व शंकरशास्त्री गोखल्यांचे ‘विद्याविलास’ ही साप्ताहिके त्यांच्या वतीने छत्रपतींवर हल्ला चढवीत होती. सत्यशोधक समाजाचे मूळ ‘दीनबंधू’  पत्र बंद पडल्यावर वर्तमान पत्राशिवाय लोकजागृती होत नाही हे ओळखून भास्करराव जाधव यांनी 1901 मध्ये ‘मराठा दीनबंधू’  हे पत्र सुरु केले. याच साचातले भुजंगराव तु. गायकवाड यांनी 1907 मध्ये ‘विजयी मराठा’ हे पत्र काढले. शाहू महाराजांविरुद्ध होणाऱ्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काही सुशिक्षित ब्राम्हणेत्तर तरुणांनी नियतकालिके काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बळवंत कृष्णाजी पिसाळ यांचे ‘विश्वबंधु’ व सुदर्शन यांचा उल्लेख करावा लागेल.

त्याचप्रमाणे शाहू विजय  (1898) लक्ष्मीकटाश (1899)  प्रगती  (1908) व ब्रह्मोदय (1902) इत्यादी पत्रांनी ही शाहू महाराजांच्या कार्यास उचलून धरले. म. फुल्यांना शुद्रातिशूद्रांच्या अन्यायाला वाचा फोडणारे वर्तमानपत्र असावे असे वाटत होते. तरी प्रत्यक्षात त्यांची हि कल्पना मूर्त स्वरुपात आणण्यात अनंत अडचणी होत्या. परंतु या अनंत अडचणीवर मात करून त्यांचे एक सहकारी कृष्णराव भालेकर यांनी जानेवारी 1877 पासून ‘दिनबंधू’ हे ब्राह्मणेत्तरांचे पहिले वर्तमानपत्र सुरु केले.

महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर वृतपत्रे :

शाहू छत्रपती संस्थानिक असल्याने उघड उघड राजकीय चळवळ करणे आणि राजकारणात भाग घेणे त्यांना शक्य नव्हते. सत्तेमध्ये योग्य तो वाटा मिळावा म्हणून सुरु झालेल्या ब्राम्हणेतर चळवळीसारख्या राजकीय चळवळीची सूत्रे पडद्याआडून हलविण्याचे काम ते करीत होते. महाराष्ट्रातील वृतपत्रे तेंव्हा ब्राम्हणांच्या मालकीची होती. छत्रपतींच्या कारभारावर ब्राम्हणी वृतपत्रे तुटून पडत असत. अशा परिस्थितीत ब्राम्हणेत्तरांच्या मालकीची आणि संपादकत्वाखाली चालणारी वृतपत्रे ठिकठिकाणी निघणे ही काळाची गरज होती. ब्राम्हणेत्तर चळवळीचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोचवण्यासाठी वृत्तपत्रासारख्या माध्यमाचा उपयोग करणे आवश्यक आहे हे जाणून शाहू छत्रपतीनी 1917 पासून 1922 पर्यतच्या काळात ठिकठिकाणी काढण्यात व चालवण्यात येणार्‍या ब्राम्हणेत्तर वृत्तपत्रांना आधार दिला असल्याचे दिसते. टिळकांवर टीका करणार्‍या ‘सुधारक’  किंवा ‘संदेश’ सारख्या ब्राम्हणी वृत्तपत्रांनाही आर्थिक सहाय्य करण्याची त्यांची तयारी असे.

प्रामुख्याने राजर्षी शाहूंच्या काळात ब्राम्हणेतरांना वृत्तपत्र चालवणे अवघड असे, कारण ब्राम्हणेतरांमध्ये शिक्षणाचा प्रसार फार कमी होता. त्यावेळी अशा पत्रांना म्हणावा तेवढा वर्गणीदार मिळत नसल्यामुळे त्यांचा खप कमी असे. त्यामुळे पदरमोड करून प्रसंगी कर्ज काढून वृत्तपत्र चालवावे लागत होते. तरी सुद्धा काही धडाडीच्या ब्राम्हणेतर कार्यकर्त्यांनी बहुजन समाजाचे कार्य नेटाने चालवण्याकरिता काही वृत्तपत्रे चालवली होती. 1910 च्या अखेरीस मुकुंदराव पाटलांनी सोमठाणे या खेड्यात सुरु केलेले ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक 1917 पर्यंत सत्यशोधक चळवळीची बाजू एकाकीपणाने मांडत होते. 19 जुलै, 1917 रोजी पुण्यात वालचंद रामचंद्र कोठारींनी ‘जागरूक’ हे पत्र ब्राम्हणेतर चळवळीच्या प्रचारासाठी सुरु केले. ऑक्टोंबर 1917 मध्ये बडोद्याला भगवंत पाळेकरांनी कोणाही संस्थानिकाचा आधार न घेता आणि पैशाचे पाठबळ नसताना स्वतःच्या हिमतीवर ‘जागृती’ हे साप्ताहिक सुरु केले. 3 ऑक्टोंबर 1918 पासून पुण्यात लठठे व कोठारी यांनी ‘डेक्कन रयत’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक सुरु केले. (ते फक्त एक वर्षभरच चालले.) कोल्हापुरातील बळवंत कृष्णा पिसाळ यांचे ‘विद्याबंधू’, दत्ताजीराव यशवंत कुरण्यांचे  ‘भगवा झेंडा’, दिनकरराव जवळकरांचे ‘तरुण मराठा’ आणि बाबुराव हैबतराव यादवांचे ‘गरीबांचा कैवारी’ ही वृत्तपत्रे शाहू छत्रपतींची कड घेवून जुन्या ब्राम्हणी वृत्तपत्रांशी टक्कर देत असत.

दत्तात्रय भिकाजी रणदिव्यांचे ‘संजीवन’, तासगांव येथून नारायण रामचंद्र विभूते चालवीत असलेल्या ‘सत्यप्रकाश’  9 मे 1921 रोजी बेळगावातून निघू लागलेले शामराव देसाई यांचे  ‘राष्ट्रवीर’  बेळगावचेच  ‘प्रगती  व  जनविजय’,  16 ऑक्टोंबर 1921 पासून केशवराव ठाकरे काढीत असलेले ‘प्रबोधन’ आणि केशवराव बागडे व कीर्तिवानराव निंबाळकरांचे ‘शिवछत्रपती’ ही सारी वृत्तपत्रे शाहू छत्रपतींची आणि ब्राम्हणेतर चळवळीची बाजू घेत असत. याखेरीज 31 जानेवारी 1920 ला मुंबईत सुरु झालेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग नंदराम भटकर व ज्ञानदेव ध्रुवनाक घोलप यांनी संपादित केलेले ‘मूकनायक’ आणि गणेश आकाजी गवईचे नागपूरहून निघणारे  ‘बहिष्कृत भारत’ या अस्पृश मानल्या गेलेल्या लोकांच्या वृत्तपत्रांनाही शाहू छत्रपतींनी सहाय्य केले नसते तर ती निघालीही नसती.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.) 



MANF शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक आहे. भारतीय मुस्लिमांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे, हे अनेक सरकारी अहवालांद्वारे आणि धोरणांतून बऱ्याच काळापासून दिसून आले आहे; पण असे असूनही सध्याच्या किंवा आधीच्या सरकारांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. म्हणूनच केंद्र सरकारचे हे ताजे पाऊल म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याकांच्या हक्कांकडे साफ दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या शिक्षणाच्या संविधानिक मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

भारतातील मुसलमानांसाठीचे दुःस्वप्न लवकर संपताना दिसत नाही. येथील मुसलमानांवर दररोज होणारे शारीरिक आणि आभासी हल्ले पुरेसे नव्हते की काय भारत सरकारने मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप (MANF) रद्द करून मुस्लिम समाजाला आणखी यातना देण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ साली सच्चर समितीच्या अहवालानंतर युपीए-१ सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी अशा अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत म्हणून ही शिष्यवृत्ती सुरू केली होती. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सहा अधिसूचित धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणारी ही भारताची एकमेव पूर्ण अनुदानित फेलोशिप होती.

२०१४-१५ ते २०२०-२१ या  शैक्षणिक वर्षात ६,७२२ संशोधन अभ्यासकांना 'MANF'ची शिष्यवृत्ती देण्यात आली असून त्यासाठी ७३८.८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,९३९ विद्यार्थ्यांना एनएनएफ देण्यात आली होती, तर २०२१-२२ मध्ये ती २,३४८ पर्यंत खाली आली आहे.

मात्र अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण जास्त असल्यामुळे MANF प्राप्तकर्त्यांपैकी बहुतेक मुस्लिम विद्यार्थी होते. त्यामुळे सर्व अल्पसंख्याकांना मदत झाली असली तरी शिष्यवृत्ती बंद झाल्याचा सर्वाधिक फटका मुस्लिम विद्यार्थ्यांना बसणार होता. विद्यमान सरकारची अल्पसंख्याकविरोधी भूमिका आणि या शिष्यवृत्तीला एक प्रमुख मुस्लिम नेते आणि स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नाव देण्यात आले आहे आणि विद्वत्ता प्राप्त करणारे बहुसंख्य मुस्लिम होते, हे लक्षात घेता या निर्णयाचे लक्ष्य मुस्लिम समाज आहे, असे मानणे चुकीचे ठरणार नाही. सरकारला याची आठवण करून द्यायला हवी की, 'MANF' बंद करण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वच अल्पसंख्याकांना बसणार आहे. ते आपली मुस्लिमविरोधी भूमिका दुसऱ्या आखाड्याकडे वळवू शकते ज्याचा परिणाम केवळ मुस्लिमांवर होतो.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने नमूद केले की MANF योजनेची आता आवश्यकता नाही कारण ती इतर शिष्यवृत्ती कार्यक्रमांसह एकाच वेळी चालविली गेली. हे खरे आहे कारण सर्व अल्पसंख्याक विद्यार्थी कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) कडून मदत घेण्यास पात्र असतात आणि बऱ्याच जणांना 'नॅशनल फेलोशिप फॉर ओबीसी' कडून मदत मिळते आणि काहींना 'नॅशनल फेलोशिप फॉर एसटी' कडून मदत मिळते. मात्र ही शिष्यवृत्ती एकाच वेळी नव्हे, तर स्वतंत्रपणे दिली जाते. याचा अर्थ असा की जर विद्यार्थी अ ला जेआरएफ किंवा इतर समांतर सरकारी योजनेतून शिष्यवृत्ती मिळाली, तर तो किंवा ती इतर सर्व योजनांसाठी अपात्र असेल.

या निर्णयामुळे सरकारने समाजातील उपेक्षित घटकांसाठी न्याय आणि समानतेच्या घटनात्मक आदेशाशी तडजोड केली आहे हे लक्षात येते. अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिमांना केवळ सामान्य किंवा गट शिष्यवृत्ती योजनांमध्ये चढाओढ करावी लागेल जिथे एसआरसीसह सर्वांची एकत्रित शैक्षणिक पातळी मुस्लिमांपेक्षा चांगली असेल. या अन्याय्य स्पर्धेत मुस्लिमांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे.

शेवटी MANF रद्द करण्याचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायावर विविध प्रकारे पद्धतशीरपणे अप्रत्यक्ष हल्ले करताना दिसत आहे. 'राष्ट्रउभारणी' आणि 'राष्ट्रीय सुरक्षा' या नावाखाली अत्याचार केल्याचा आणि अनेकांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखी (सीएए) मुस्लिमविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप शासनावर ठेवण्यात आला आहे. MANF बंद करणे हा मुस्लिम समुदायाला त्रास देण्याचा आणि वंचित करण्याचा सरकारचा आणखी एक प्रयत्न आहे.

हा निर्णय सरकारच्या स्वत:च्या "सबका साथ, सबका विकास" या घोषणेच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. मात्र मुस्लिमांना सर्व स्तरांतून वगळण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या अघोषित वैचारिक भूमिकेशी ते अगदी सुसंगत आहे. सरकारला अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणाची पर्वा नाही आणि त्याऐवजी त्यांना शिक्षा करण्याचा त्यांचा हेतू आहे, याची क्रूर आठवण करून देणारी ही ताजी चाल आहे. MANF बंद करण्याच्या निर्णयामुळे त्यांना एका मौल्यवान शैक्षणिक संधीपासून वंचित ठेवले जाते. मुस्लिम समाजात शिक्षणाला चालना देण्यात सरकारला रस नाही, असा स्पष्ट संदेशही यातून दिसून येतो.

MANF शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक आहे ज्यांचे सर्व सामाजिक-धार्मिक श्रेणींमध्ये (एसआरसी) सर्वात कमी शैक्षणिक प्राप्तीचे प्रमाण आहे. भारतीय मुस्लिमांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे, हे अनेक सरकारी अहवालांद्वारे आणि धोरणांतून बऱ्याच काळापासून दिसून आले आहे; पण असे असूनही सध्याच्या किंवा आधीच्या सरकारांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. म्हणूनच भारत सरकारचे हे ताजे पाऊल म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याकांच्या हक्कांकडे साफ दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या शिक्षणाच्या संविधानिक मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त ९ जानेवारी २०२२ रोजी 'मुस्लिम उच्च शिक्षणात कुठे मागे आहेत?: धोरणांसाठी धडे' या व्याख्यानात बोलताना सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंटचे प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) चे माजी अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात म्हणाले की "आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुस्लिमांना शिष्यवृत्तीद्वारे मदत केल्यास ते उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतात. देशातील सर्व समुदायांमध्ये उच्च शिक्षणामध्ये मुस्लिमांचे सकल नोंदणी प्रमाण (GER) सर्वात कमी १६.६% आहे (राष्ट्रीय सरासरी २६.३%). मुस्लिम विद्यार्थी इतर समुदायांच्या तुलनेत (५४.१%) सरकारी संस्थांवर जास्त अवलंबून असतात (राष्ट्रीय सरासरी ४५.२%) आणि अनुक्रमे २४.४% आणि ३०.१% च्या राष्ट्रीय सरासरीच्या विपरित केवळ १८.२% मुस्लिम विद्यार्थी खाजगी अनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातात आणि २७.४% खाजगी विनाअनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातात. (TOI, 10 Jan. 2022)

उच्च शिक्षणात मुस्लिम नोंदणीचा वाढीचा दर २०१०-११ ते २०१४-१५ दरम्यान १२०.०९% वरून २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत केवळ ३६.९६% खाली आला आहे. मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण देणाऱ्या मुख्य प्रवाहातील संस्थांमध्ये मुस्लिमांची नोंदणी ४.२३-६.०१% दरम्यान आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये, जसे की IIT, IIIT, IISER, NIT आणि IIM, मुस्लिम फक्त 1.92% आहेत. परिणामी, २०१९-२० पर्यंत केवळ २१ लाख मुस्लिमांनी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली होती. यापैकी ७७.६३% महाविद्यालये आहेत, त्यापैकी बहुतेक त्यांच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध नाहीत. (DH, 5 Oct. 2021)

उच्च शिक्षणाच्या केंद्रांमध्ये अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचा मोठ्या प्रमाणावर आधार असलेल्या जामिया मिलिया इस्लामिया, जेएनयू, अलिगड, हमदर्द आणि मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी हैदराबाद यासारख्या विद्यापीठांना पुरेसा निधी दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. सुविधांचा विकासाचाही विद्यार्थ्यांवर बोझा पडतो, अशी सध्याची परिस्थिती आहे. सामान्य आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याचे कारण अनियंत्रित वाढणारे फीचे दर ठरत आहेत. फीवाढीचा मुद्दा हा अस्वस्थतेचा विषय असून, सध्या देशातील बहुतांश बड्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हा विषय गाजत आहे. आता नेट जेआरएफच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने रद्द करण्याच्या हालचालीही होऊ शकतात.

लोकसभेत एमएनएफचा मुद्दा उपस्थित करणारे टी.एन.प्रथापन आणि इम्रान प्रतापगढी राज्यसभेतील मुस्लिम लीगचे ई टी मोहम्मद बशीर आणि काँग्रेसचे कोडिकुनिल सुरेश यांनी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला, तर संसदेत आणखी खासदार या विषयांवर बोलण्याची अपेक्षा आहे. विद्यापीठांमध्ये केंद्रित विद्यार्थी संघटनांकडूनही विरोध सुरू झाला आहे.

या संदर्भात धोरणात्मक हस्तक्षेप करण्यास आणि गरज पडल्यास तीव्र लोकशाही आंदोलने मुस्लिम आणि ख्रिश्चन संघटनांनी केली पाहिजेत. जोपर्यंत केंद्र सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि MANF रद्द करण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत ते करत राहिले पाहिजे. आपल्या डोळ्यांदेखत हक्क हिरावून घेतले जात आहेत हे पाहूनही गप्प राहणे कधीही फायद्याचे ठरणार नाही.

MANF संपुष्टात आणण्याचा निर्णय निर्विवादपणे एक प्रतिगामी पाऊल आहे ज्याचा एसआरएसीमधील भारतीय मुस्लिमांवर असमान परिणाम होईल. यामुळे उच्च शिक्षणातील मुस्लिमांची आधीच अंधकारमय स्थिती आणखी धूसर होईल. या निर्णयामुळे मुस्लिम तरुणांमधील निराशेची आणि परकेपणाची भावना अधिकच गडद होईल. सरकारने पुनर्विचार करून आपला निर्णय रद्द केला पाहिजे.

- emhOhmZ ‘JXþ‘

8976533404


'शोधन' या आपल्या साप्ताहिकाचा 52 वा अंक वाचण्यात आला. त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यावाचून राहवत नव्हते... सुंदर लेखांनी आणि विचारांनी सजलेलं आपलं साप्ताहिक हे प्राध्यापक झाकीर सर यांनी मला पाठवले होते त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे... विविध महत्त्वपूर्ण विषयाला हात घालणारे उत्कृष्ट लेख व मला माझ्या मनाचा पुन्हा एकदा शोध घेण्यास भाग पाडणारे असेच हे साप्ताहिक ठरले...

बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देश संबंधाबद्दल एक महत्त्वाची घटना म्हणजे चीन व सऊदी अरब देशातील नाविन्यपूर्ण मैत्री हा माझ्यासारख्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यासाठीचा काळजीचा विषय... चीनची जागतिक व्यापारावर अंकुश ठेवण्याची भयंकर भूक व त्यासाठी जमेल तो मार्ग वापरण्याची वृत्ती ही काही अंशी घातक अशी आहे. खरं तर शेजारच्या राष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध ही भारताची खरी गरजच म्हणावी लागेल परंतु त्यात आपण दिवसेंदिवस अपयशी ठरलो आहोत. प्रत्येक राष्ट्राला आपले हितसंबंध जोपासण्याचा हक्क आहे परंतु चीन व अरब देशांच्या या नव्या मैत्रीमुळे भारत खऱ्या अर्थाने जागतिक संबंधांच्या बाबतीत मागे पडला हे सिद्धच होत आहे.

अमेरिकेसारख्या स्वार्थ, अहंकार व दंबयुक्त देशाची खुशामत करण्याच्या नादात भारताने अगोदरच कधीही भरून न येणारे असे आपल्या देशाचे नुकसान करून ठेवले आहे. ज्याची सुरुवात ही भारतीय जनतेला अंधारात ठेवून 95 साली केलेला हा GATT (General Agreement on Tariff and Trade) करार त्यामुळे भारतीय जनता व संसद यांचे निर्णय स्वातंत्र्य ही मोडीत निघत आहेत... GATT कराराबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल पारतंत्र्याचा नवा सापळा, गुलामीच्या नव्या श्रृंखला... बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताची बाजारपेठ उद्योग आणि जंगले, समुद्र इत्यादी संपदा लुटण्याचा मुक्त परवाना देणारा हा करार... सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांच्याच श्रमावर व पैशावर उभी राहिलेली व वाढलेली वीज, विमा, बँक, टेलिफोन अशी सार्वजनिक क्षेत्रीय कवडी मोलाने नफेकोर कंपन्यांना विकून जनतेच्या सुविधा हिरावून घेणारा हा करार... भारतीय उद्योगधंदे बंद पाडणारा लाखो कामगार कर्मचाऱ्यांना बेकार करणारा हा करार...  आपली जंगले परक्यांच्या हवाली करून आदिवासींना देशोधडीला लावणारा हा करार... आपले समुद्रकिनारे बळकावून अजस्त्र यांत्रिक बोटीद्वारे मच्छीमारांना उसकावून लावणारा हा करार... भारतीय शेती बड्या कंपन्यांच्या घशात घालून सामान्य शेतकऱ्याला देशात देशोधडीला लावणारा हा करार...  नव्या पेटंट कायद्याद्वारे आपल्याच बियाणावरचा हक्क नष्ट करून लुटरुंच्या घशात घालणारा हा करार... नव्या पेटंट कायद्याद्वारे औषधांच्या किमती दहा-वीस पट वाढवून कोट्यावधी गरीब जनतेच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकणारा हा करार...

देशातील महागाईचा डोंगर पाहता आपल्या लक्षात येईल की आपण अशा आंतरराष्ट्रीय करारामुळे आपल्या देशाचे किती नुकसान करून घेतलेले आहे त्यातल्या त्यात चीन व अरब देशातील हे करार म्हणजे पेट्रोलियम पदार्थावर आता अमेरिका रशियाच्या नंतर चीनची पकड आणि भारताचे पेट्रोलियमसंबंधी इतर देशांवरचे परावलंबित्व ज्यामुळे की अनियंत्रित अशी महागाई ही भविष्यात आणखीन गडद झालेली दिसेल...

व्यापार व सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारत हा अरब राष्ट्रांचा जुना मित्रच. या राष्ट्रांसोबत आपली मैत्री ही व्यापार वृद्धीच्या दृष्टिकोनातून व स्थिर असे संबंध आपण आजघडीला अरब देशांसोबत म्हणावे त्या प्रमाणात ठेवू शकलो नाहीत. त्यातच सध्याचे संकुचित व घातकी मनोवृत्तीचे केंद्र सरकार भारताचे भवितव्य याबद्दल भीती वाटते...

परंतु म्हणतात ना प्रेम, करूना, संस्कृती, मानवता, आत्मा म्हणजेच आपले अध्यात्म व मानव धर्म यांच्या मजबूत पायाने उभा राहिलेला आपला भारत देश अशा बहुअंगी संकटातून मात करत आलेला आहे व आजचे भांडवलदारीचे व तिरसकाराचे आपल्या देशावरचे संकट आपण संपवूत यात शंका नाही.

साप्ताहिकातील अध्यात्मविषयीचे लेख हे खरे आपल्याला ताकद विश्वास देण्यासाठीचे इथेच महत्त्वपूर्ण ठरतात... ज्यामुळे की आपली सामाजिक बांधिलकी मानवता यासाठीचा आपल्या मनावर व बुद्धीवर साचलेला दुबळेपणा हा दूर होऊ शकतो... आत्मा मानसातील दोन शक्तीचा संघर्ष, पैगंबर वाणी (हदीस) वर आलेले साप्ताहिकातील लेख.

वरील दोन्ही लेखांमधील गोष्टही मला स्वतःला परत माझ्यामध्ये डोकावून पाहण्यासाठी आग्रहकारक ठरली. मनामधला संघर्ष हा नेहमी मला प्रत्येक ठिकाणी जाणवलेला आहे ही गोष्ट चांगली ही गोष्ट वाईट आपण चांगली गोष्ट कशी निवडायची व त्यानुसार पुढील पाऊल कसे ठेवायचे नक्कीच आधीच मधील तर्कादारावर आपण ज्या गोष्टी स्वीकारू शकतो ते आपण स्वीकारून पुढे चला व ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटली परंतु तर्काचा आधार काय असला पाहिजे हे आपल्याला आत्मा काय आहे हे समजल्यावरच लक्षात येते की नक्कीच ईश्वराने आपल्या मनामध्ये अशा गोष्टी जन्मताच रुजवून ठेवलेल्या आहेत व आपलं मन की कुठली गोष्ट करायला हवी कुठली गोष्ट नाही त्या मुळे ईश्वराचा अंश म्हणून 'आत्मा' आपण ओळखतो तो नेहमीच आपल्याला योग्य असाच मार्ग दाखवतो आणि अंतर्मनाच्या ह्या युद्धामध्ये आपण योग्य व चांगल्या मार्गाची निवड करतो.. व आपण स्वतःसाठी ज्या गोष्टी मागतो त्याच पद्धतीत इतरांसाठीही आपण प्रार्थना करायला हवी यामुळे की आपोआपच मनातील नकारात्मकता हीसुद्धा कमी व्हायला लागते व आपण एक चांगली मनुष्य म्हणून स्वतःच भविष्य साकारत पुढे जात असतो.

साप्ताहिकेतील इतरही लेख हे खूप महत्त्वाचे वाटले, ज्यामध्ये की सध्या देशातील नवनवे राजकीय पक्ष ज्यांचे की यश अपयशाची वाटचाल चालू होताना आपणास दिसते व भारत जोडो यात्रेसंदर्भातील ही एक लेख बघितला नक्कीच ह्या दोन्ही लेखांमध्ये आपणाला आणखीन तर्कशुद्ध तटस्थपणे बाजू मांडू शकून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेऊ शकतो...

या लेखांची प्रतिक्रिया देत असताना आपल्याशी खूप काही गोष्टीवर चर्चा करावीशी वाटते, परंतु मला यात कुठल्याही शंका नाही की आपली भेट लवकरच होईल. जिथे की मला इतर गोष्टीवर चर्चा करता येईल व आपल्याकडून मार्गदर्शन घेता येईल...

परत एकदा आपले धन्यवाद म्हणून मी परत झाकीर सरांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढे सुंदर लेख असलेले साप्ताहिक मला वाचण्यासाठी दिले... धन्यवाद!

आपला ऋणी,

- गोविंद उत्तमराव गिरी

जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया, परभणी.

9767700940



भारतात जेव्हा इंग्रज साम्राज्यानं आपले पाय पसरणे सुरू केले त्या वेळी भारतीयांना याचा थांगपत्तादेखील नव्हता की एक वेळ अशी येईल जेव्हा भारतावर इंग्रज भांडवलदारी व्यवस्था काबिज होणार आहे. इस्ट इंडिया कंपनीद्वारे इंग्रज आणि भारतीय बाजारपेठेत व्यापार वाढत गेला, पण यासाठी भारतीयांनी इंग्लंडहून माल आयात करावा त्यांनीच तो विकण्याची सोय करावी. इंग्रज फक्त त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचे मालक होते. सर्व संपत्ती हळूहळू इंग्रजांकडे एकवटली गेली. भारताचे लोक कंगाल झाले आणि इंग्रजांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत गेली. त्या वेळचे एक उर्दू कवी मसहफी यांनी आपल्या एका कवितेत असे महटले होते की- भारताची जी संपत्ती आणि वैभव होते ते सर्वचे सर्व इंग्रजांनी निरनिराळ्या युक्त्या करून खेचून घेतली.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी आपल्या एका पुस्तकात असे म्हटले आहे की इंग्रजांनी त्या वेळी तीन ट्रिलियन डॉलर संपत्ती लुटली आणि याच संपत्ती-साधनांच्या जोरावर इंग्लंडमदील औद्योगिक क्रांती पूर्णत्वास गेली. पुढे जाऊन इंग्लंडमधूनच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उद्गम झाला, ही १९व्या शतकातील गोष्ट आहे. पण त्यापूर्वीच कम्युनिस्ट विचारवंत मार्क्स आणि एन्जेल यांनी भाकित केले होते की ही व्यवस्था जगभर शिरकाव करणार आहे ही १८४८ ची गोष्ट आहे. आणि सध्या त्यांचे भाकित खरे ठरले. भांडवलवादाने जगभर वेढा घातला आहे. 

पण इंग्रजांनी आपले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बराच खटाटोप केला. त्यांनी ख्रिस्ती धर्मियांना हे पटवून दिले होते की ख्रिस्ती देव (ईश्वर) आणि ख्रिस्ती सभ्यता मिळून एका नव्या युगाची, विचारधारेची, संस्कृतीची आणि आधुनिकतेची स्थापना करतील. यासाठी त्यांना जगावर आपले अधिराज्य गाजवायचे होते, हे वेगळे सांगलण्याची गरज नाही. भारतीय संपत्ती लुटत असताना त्यांनी इथल्या नागरिकांना, मानवी कल्याण, न्यायपूर्ण व्यवस्था, सामाजिक समतेकडे आकर्षित करण्याचा मोहीम हाती घेतली. त्यांच्या या विचारांना आधुनिक विचार म्हणून त्या वेळच्या प्रतिष्ठित नागरिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रातल्या लोकांनी साथ दिली. यात प्रामुख्याने कवी गालिब, सर सय्यद अहमद खान, राजाराम मोहन राय आणि द्वारकादास टागोर यांचा समावेश होता. ज्या समतावादी समाजाचा प्रचार इंग्रज करत होते ते स्वतः आपल्या समाजात स्थापन करत नव्हते. कारण प्रतिष्ठित आणि उच्च-नीच असा भेदभाव त्यांच्या संस्कृतीचा भाग होता.

ज्यात भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा पाया घालण्यासाठी त्यांनी एक सूत्र विकसित केले. त्यांच्या मते जगात केवळ युरोपियन लोकच प्रतिष्ठित आहेत, म्हणून संपत्तीवर त्यांचाच ताबा हवा. इतर देशांनी प्रगती करू नये. ते आहेत तसेच राहावेत. यामागे त्यांना जगात वसाहतवादाची स्थापना करायची होती ती त्यांनी अचूकपणे केली. त्यांनी आपही विचारधारा आणि संस्कृतीचा मापदंड बिगर युरोपियन देशांच्या आंतरात्म्यात प्रविष्ट केला. त्यांना मानसिक गुलाम बनविले आणि मग त्यांच्या साधनसंपत्तीवर ताबा मिळवला. जगभर आपला वसाहतवाद स्थापन करून जगातल्या इतर राष्ट्रांची संपत्ती एकवटून आणली. इतकी आर्थिक प्रगती केली त्याला सीमा नाही. भांडवलदारी अर्थव्यवस्थेचे अंतिम ध्येय जगाच्या एक टक्का लोकांकडे जगाची सर्व संपत्ती एकवटली जावी हे त्यांचे लक्ष्य आहे.

भारतात भांडवलदारी अर्थव्यवस्था आता पूर्णपणे काही मोजक्या उद्योगपतींकडे एकवटली आहे. देशाच्या गोरगरीब जनतेची सगळी संपत्ती म्हणजे ५० कोटी लोकांकडील संपत्तीइतकी संपत्ती सध्या १० टक्के उद्योगपतींकडे गोळा झाली आहे. जसे इंग्रजांनी इथल्या नागरिकांना आधुनिक विचारांद्वारे त्यांच्या प्रगतीची स्वप्ने दाखवली आणि ख्रिस्ती ईश्वराने जशी त्यांची साध दिली तशीच अवस्था भारतीय नागरिकांची झाली आहे. उद्योगपतींचे १० लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातात आणि ८० कोटी लोकांना महिन्याकाठी ५ किलो अन्नधान्याचे मोफत वाटप करून त्यांना गप्प केले जाते. ख्रिस्ती धर्माने या इंग्रजांना वाट दाखवली आपल्या देशात ती वाट कोण दाखवतात?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७



हजरत हसन इब्ने अली (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांचं हे म्हणणे पाठ करून ठेवले आहे की....

"ज्या वस्तू किंवा गोष्टीविषयी तुमच्या मनात शंका असेल ती खटकत असेल ती सोडून द्या आणि ज्या गोष्टी तुमच्या मनात शंका निर्माण करत नसतील त्यानुसार आचरण करा, कारण सत्यता मनात समाधान निर्माण करते आणि खोट्या गोष्टी मनाला खटकत असतात."

(तिर्मिजी, गंजीन ए हिकमत)

हजरत अबू हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका व्यक्तीस सांगितले,

"मनाला खटकत असणारी गोष्ट सोडून द्या आणि जी खटकत नसेल ती ग्रहण करा."

त्या व्यक्तीने विचारले, "मला हे कसे कळणार?"

प्रेषितांनी उत्तर दिले, "तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार कराल तेव्हा आपल्या छातीवर हात ठेवा, मन निषिद्ध गोष्टीपासून विचलित होते आणि वैध गोष्टीमुळे त्याला शांतता मिळते."

हजरत मआज (र.) यांनी प्रेषितांना विचराले, "कोणती श्रद्धा सर्वश्रेष्ठ आहे?"

प्रेषितांनी उत्तर दिले, "सर्वश्रेष्ठ श्रद्धा ही की तुम्ही अल्लाहसाठी लोकांशी स्नेह करा आणि त्याच्यासाठीच लोकांशी घृणा करा. आपल्या जिभेने अल्लाहचै स्मरण करत राहा."

यावर मआज (र.) यांनी विचरले, "आणखीन काय?"

प्रेषित (स.) म्हणाले, "तुम्ही इतर होकांसाठी देखील तेच पसंत करा जे स्वतःसाठी पसंत करता आणि ज्या गोष्टी तुम्हाला पसंत नसतील त्या इतर लोकांसाठी देखील नापसंत करा."

(इमाम अहमद र.)

प्रेषितांनी विचारलं, "तुम्हाला स्वर्ग पसंत असेल तर आपल्या बंधुंसाठीदेखील तेच पसंतर करा जे तुम्हाला पसंत असेल."

(ह. यझीद बिन असद)

ह. अबू जर (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले,

"पाहा, तुम्ही कमजोर आहात आणि मी मला जे पसंत आहे तेच तुमच्यासाठीही तेच पसंत करतो तुम्ही कधीही दोन माणसांची जबाबदारी स्वीकारू नका आणि कधी अनाथाच्या मालाची जबाबदारी देखील स्वीकारू नका."

(मुस्लिम)

हजरत अबू हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले,

"जो कुणी अल्लाह आणि परलोकावर श्रद्धा ठेवतो त्याने भली गोष्ट सांगावी अन्यथा गप्प राहावे. तसेच जो अल्लाह आणि शेवटच्या दिनावर विश्वास ठेवतो त्याने आपल्या शेजाऱ्याचा सन्मान करावा. तसेच आपल्या पाहुण्यांसाठी सन्मान करावा."

(बुखारी, मुस्लिम)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(३) आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तुंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.

(४) आणि पाहा! पृथ्वीवर वेगवेगळे भू-भाग आढळतात जे एकमेकांशी संलग्न असलेले आहेत. द्राक्षांच्या बागा आहेत, शेते आहेत खजुरींची झाडे आहेत ज्यांच्यापैकी काही एकेरी आहेत आणि काही दुहेरी.१० सर्वांना एकच पाणी सिंचित करतो, परंतु चवीत आम्ही काहींना उत्तम बनवितो तर काहींना कनिष्ठ. या सर्व वस्तूंमध्ये पुष्कळशा निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे बुद्धीचा उपयोग करतात.११



८) आकाशीय ग्रहांनंतर या पृथ्वीकडे लक्ष केंद्रित केले जाते आणि येथेसुद्धा अल्लाहची शक्ती आणि तत्त्वदर्शीतेच्या निशाण्यांनी या दोन सत्यतेवरील (एकेश्वरत्व आणि परलोक जीवन) साक्षी एकत्रित केल्या आहेत. या प्रकृती जगताची एकूण रचना स्पष्ट करत आहे की या तर्काचा सार खालीलप्रमाणे आहे,

१) आकाशीय ग्रहांबरोबर पृथ्वीचा संबंध, पृथ्वीबरोबर सूर्य, चंद्र यांचा संबंध, पृथ्वीच्या अगणित सजींवाच्या गरजेशी पर्वत आणि समुद्राचा, नद्यांच्या संबंध इ. सर्व गोष्टी स्पष्ट साक्ष देत आहेत की यांना न तर अनेकानेक ईश्वरांनी बनविले आहे आणि न अनेकानेक अधिकारी ईश्वर त्यांची व्यवस्था करत आहेत. असे जर असते तर या सर्वात इतके ताळमेळ, अनुकूलता आणि समन्वय निर्माण झाला नसता आणि तो कायम राहिलाही नसता. वेगवेगळया ईश्वरांसाठी हे कसे संभव आहे की त्या सर्वांनी मिळून सृष्टी निर्माण करावी की त्यात सुसंगत निर्वेधता असावी आणि त्यांच्यात कुठलाही टकराव नसावा.

२) पृथ्वीरूपी या विशाल ग्रहाचे विस्तृत अंतरिक्षात अधांतरित होणे, त्यात विशाल पर्वतांचे उभे राहाणे, पृथ्वीच्या भूपृष्ठावर विशाल नद्या प्रवाहित होणे. पृथ्वीवर अनेकानेक प्रकारची झाडे असणे, तसेच रात्रंदिवसाचे चकित करणारे हे चक्र इ. सर्व अल्लाहच्या सामर्थ्याची साक्ष देतात ज्याने या सर्वांना निर्माण केले आहे. अशा सर्वशक्तिमान अल्लाहविषयी असा विचार करणे की तो मनुष्याच्या मृत्यूनंतर पुन्हा त्याला जन्माला घालू शकत नाही, हे बुद्धीविवेकाचे लक्षण नसून ते मूर्खपणाचे आणि अज्ञानाचे लक्षण आहे.

३) पृथ्वीच्या बनावटीत, तिच्यावरील पर्वतराईच्या उत्पत्तीमध्ये, पर्वतातून नद्या प्रवाहीत करण्यात, निरनिराळया फळांच्या जातीत दोन-दोन प्रकारचे फळ तयार करण्यात तसेच रात्रीनंतर दिवस व दिवसानंतर रात्रीच्या येण्याजाण्यात अगणित निशाण्या आणि तत्त्वदर्शिता आहे. ते सर्व सुस्पष्टपणे साक्ष देत आहेत की ज्या उत्तम तत्त्वदर्शी अल्लाहने ही सर्व संरचना केली आहे तो श्रेष्ठतम तत्त्वदर्शी आहे. हे या सर्व गोष्टींमुळे सिद्ध होते की हे एखाद्या संकल्पहीन शक्तीचे कार्य नाही की खेळ-तमाशासुद्धा नाही. या प्रत्येकात एका तत्त्वदर्शीची अति परिपक्व तत्त्वदर्शिता काम करत आहे. हे सर्व जाणून घेतल्यावर केवळ एक मूर्खच विचार करील की पृथ्वीवर मनुष्याला जन्माला घालून आणि त्याला कर्म करण्याची संधी देऊन शेवटी तो त्याला असेच मातीत मिसळून देईन?

९) म्हणजे पूर्ण पृथ्वीला त्याने एकसारखे बनविले नाही तर तिच्यात अनेक भूभाग निर्माण केले. ते एकमेकात मिसळलेले असूनसुद्धा ते रुप, रंगात, समायोजन तत्त्वात, गुणात, क्षमतेत, शक्तीत, उत्पन्नात, रासायनिक खनिज भंडार यात वेगवेगळे आहेत. या वेगवेगळया भूभागांची उत्पन्नक्षमता आणि त्यांच्यातील वेगवेगळया विभिन्नतांमध्ये विवेकशीलता, कार्यकारणभाव व तत्त्वदर्शिता विपुल प्रमाणात आहेत की त्याचे आपण मोजमापही करू शकत नाही. दुसऱ्या संरचना (निर्मिती) ऐवजी केवळ मनुष्याचे हित डोळयांपुढे ठेवून अनुमान केले जाऊ शकते की मनुष्याचे वेगवेगळे उद्देश आणि हित आणि पृथ्वीच्या भूखंडांच्या विभिन्नतेत समानता आणि अनुकूलता दिसून येते. यामुळे मानवी संस्कृतीला व सभ्यतेला प्रगती करण्याच्या संधी उपलब्ध होत गेल्या. हे सर्व तत्त्वदर्शीच्या चिंतनाचा आणि विचारपूर्वक योजनेचा आणि त्याच्या विवेकपूर्ण संकल्पाचा परिणाम आहे. याला केवळ एक आकस्मित घटना ठरविणे म्हणजे मोठा दुराग्रह आहे.

१०)  खजुरीच्या झाडांपैकी काही असे असतात ज्याच्या मुळातून एकच खोड निघते आणि काही मध्ये एकापेक्षा जास्त खोड निघतात.

११)  या आयतमध्ये अल्लाहच्या तौहिद (एकेश्वरत्व), त्याची शक्ती आणि तत्त्वदर्शितेच्या निशाण्या दाखविण्याव्यतिरिक्त एका तथ्याकडे सूक्ष्म संकेत केला आहे, तो म्हणजे अल्लाहने सृष्टीत कोठेच समरूपता ठेवली नाही. जमीन एकच आहे परंतु हिचे भाग आपापल्या रंग, रुप आणि गुणांत वेगवेगळे आहेत. जमीन एकच आणि पाणीसुद्धा एकच परंतु यांच्यापासून वेगवेगळया प्रकारचे धान्य व फळे तयार होत आहेत. एकच झाड परंतु त्याचे प्रत्येक फळ दुसऱ्या फळापासून रंग-रुपात एक असूनसुद्धा आकार, प्रकार व दुसऱ्या गुणात वेगळा आहे. मूळ एकच परंतु त्यापासून दोन वेगळे खोड निघतात व ते आपले वेगळे गुण ठेवून असतात. या गोष्टींवर माणूस विचार करील तेव्हा तो कधीही गोंधळात पडणार नाही की मनुष्यस्वभाव, कल व रीत वेगवेगळे आहेत. पुढे याच सूरहमध्ये सांगितले गेले आहे, ``अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना एकसारखे बनविले असते. परंतु ज्या तत्त्वदर्शितेच्या आधारावर अल्लाहने या सृष्टीला निर्माण केले आहे, ती एकरंगी नव्हे तर विविधतापूर्ण आणि बहुरंगांची निकड ठेवते.

सर्वांना एकरुप बनविल्यानंतर तर जगातील हा सर्व हंगामा व्यर्थ ठरला असता.''



जमाअते इस्लामी हिंदने नेहमीच समविचारी लोक, नागरी समाज आणि मानवाधिकार गट, एनजीओ आणि शांतता व जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने न्यायासाठी काम केले आहे. जमात सामाजिक आणि आर्थिक न्याय, समाजातील दुर्बल घटक आणि उपेक्षित लोकांना समानता देण्यासाठी देखील कार्यरत आहे आणि त्यासाठी जमातने विविध संघटना स्थापन केल्या आहेत.

नवी दिल्ली :  भारतातील प्रमुख मुस्लिम धार्मिक-सामाजिक संघटना जमात-ए-इस्लामी हिंद आपल्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरात सतत चार महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जमातच्या धार्मिक-सामाजिक योगदानाचा संदेश देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.  या संदर्भात रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लब येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी सांगितले की, ’’जमाअतचा संदेश हा एका ईश्वराचे पालन करणे असून त्याच्या शिकवणींवर आधारित मूल्याधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आहे.  गेल्या 75 वर्षांपासून जमात हे दोन मुद्दे घेऊन काम करत आहे.  या 75 वर्षांत जमातने अनेक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’’ जमातने रविवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात देशातील प्रतिष्ठित नागरिक, विचारवंत, प्राध्यापक, सामाजिक संस्था आणि इतर क्षेत्रातील लोकांना आमंत्रित केले होते. यावेळी गेल्या 75 वर्षात देशासाठी विविध क्षेत्रात जमातने दिलेले योगदानासंबंधी माहिती तपशीलवार सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमात -ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.मोहम्मद सलीम इंजिनियर म्हणाले की, जमात 75 वर्षांपासून मूल्यांच्या आधारे एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. या 75 वर्षात, आम्ही तरुण, सामाजिक संस्थांमधील महिला आणि विविध धर्माच्या लोकांसोबत काम करून मूल्याधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत राहू.’’

सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी या 75 वर्षांच्या मुल्यांकन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले की, ’’जमातची मुख्य भूमिका धर्माला सकारात्मक परिमाण देण्याची आहे. धर्म आणि राजकारण हे समाजासाठी घातक आहेत अशी एक संकल्पना कायम आहे. हे सहसा संघर्ष आणि हिंसाचाराचे कारण बनते. आज आपण ज्या समस्या पाहत आहोत ते केवळ धर्माचे शोषण आणि निहित स्वार्थासाठी धर्माचा वापर आणि दुरुपयोग यामुळेच आहेत. जे लोक हे करतात त्यांचा धर्म आणि अध्यात्माशी काहीही संबंध नाही.  जमातने धर्माचा सकारात्मक हेतूसाठी वापर करून मूल्याधारित समाज निर्माण केला पाहिजे, जिथे सहिष्णुता आणि इतर समुदायांच्या हक्कांचा आदर केला गेला पाहिजे असा संदेश दिला आहे.  मूल्याधारित समाज निर्माण करण्यात धर्म महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. समाजाची जडण-घडण आणि सुधारणा धर्मावर आधारित असावी. न्याय्य समाजासाठी धर्म हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. या संदर्भात जमातने एक उदाहरण ठेवले आहे आणि त्याचा मुख्य संदेश धार्मिक आहे परंतु त्याच वेळी जमातने समुदाया- समुदायातील  दरी कमी करण्यात आणि त्यांच्याशी संवाद आणि चर्चेसाठी व्यासपीठ तयार करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. आम्हाला समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे.’’  ते पुढे म्हणाले की, ’’हे केवळ संवाद आणि चर्चेद्वारेच शक्य आहे. आपल्या देशात शांततेसाठी विभिन्न समुदायांमध्ये अधिक चांगले समन्वय स्थापित करून केले जाऊ शकते. जमातकडे एक मॉडेल आहे ज्याद्वारे आपल्या देशाचे प्रश्न आणि समस्या सोडवता येतात.  समाजाच्या भल्यासाठी यावर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी जमातची इच्छा आहे. देशात आंतरधर्मीय संवाद आणि चर्चेला चळवळीचे स्वरूप दिले हे जमातचे योगदान आहे. जमातने नेहमीच समविचारी लोक, नागरी समाज आणि मानवाधिकार गट, एनजीओ आणि शांतता व जातीय सलोख्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने न्यायासाठी काम केले आहे. जमात सामाजिक आणि आर्थिक न्याय, समाजातील दुर्बल घटक आणि उपेक्षित लोकांना समानता देण्यासाठी देखील कार्यरत आहे आणि त्यासाठी जमातने विविध संघटना स्थापन केल्या आहेत. भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध धार्मिक नेत्यांच्या मदतीने धार्मिक जन मोर्चा व्यासपीठ स्थापन केले आहे. जे सतत सद्भावना आणि जातीय सलोख्यासाठी कार्य करत आहे. धार्मिक जनमोर्चा ही चळवळ बनली आहे.  आणखी एक मंच, फोरम फॉर डेमोक्रसी अँड कम्युनल अ‍ॅमिटी शांतता आणि न्याय, जातीय सलोखा आणि लोकशाही मूल्यांसाठी काम करत आहे.’’

जमातच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात सामाजिक आघाडीवर काम करणाऱ्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी, वंचितांना आवाज देण्यासाठी, शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, कल्याणकारी कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. या क्षेत्रातील विविध संस्थांच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.  त्यांनी सांगितले की, ’’जमातने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लोकांसाठी काम केले आहे. या कामासाठी डझनभर संस्था कार्यरत असून देशातील विविध घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी अझउठ ची स्थापना करण्यात आली आहे, कथऋ सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे,  विद्यार्थी संघटना डखज हा विद्यार्थी आणि तरुणांचा एक मंच आहे आणि 40 वर्षांपासून कॉलेज आणि कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे, ॠखज ही विद्यार्थिनींची संस्था आहे जी सतत तरूण मुलींमध्ये काम करत आहे, जमात संशोधन क्षेत्रातही काम करत आहे आणि अनेक संस्थांसोबत सहकार्य करत आहे. अशा प्रकारे आम्ही चांगल्या भारतासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी सतत प्रयत्नशील आणि काम करत आहोत. जमातच्या संघर्षाची प्रासंगिकता सध्याच्या वातावरणात अनेक पटींनी वाढली आहे. अध्यात्माच्या सहाय्याने शांततामय व न्याय्य समाज घडविण्यासाठी धर्मगुरूंनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. जमात शांतता आणि मूल्यावर आधारित समाज स्थापन करण्यासाठी समाजाच्या पुनर्रचनेसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करते. जमात इस्लामी हिंदचे सहसचिव, जनसंपर्क विभाग, अख्लाख अहमद खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

अनुवाद - एम.आय.शेख

 

मोदी लाट गुजरातपुरतीच : दिल्लीत आप, हिमाचलमध्ये काँग्रेस


राहुल गांधी विषयी वारंवार सांगितले जाते की, त्यांना निवडणुकीत काहीच रस घेतला नाही तेव्हा भारत जोडो यात्रेचे खरे लक्ष्य काय आहे? लोकांनी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा. राहुल गांधींनी भारत जोडण्याचा संकल्प बांधलेला आहे. काँग्रेस जोडोचा नाही. 

असे सर्रासपणे बोलले जाते की, एमआयएम आणि आप हे पक्ष भाजपाची बी टीम आहेत. पण कोणताही नवा पक्ष उदयास येतो तेव्हा त्याच्याकडे कोणत्या न कोणत्या पक्षाचे लोक आकर्षित होणारच आणि त्या पक्षाला मते देणारच. तेव्हा किती नव्या पक्षांना लोक बी.सी.डी. टीम म्हणणार?

गुजरातमधील निवडणुुकीत भाजपा जिंकणार यात कुणाला शंका नव्हती, असण्याचे कारण नव्हते. तरी देखील बऱ्याच विश्लेषकांची इच्छा होती की भाजपानं गुजरातमधील निवडणूक जिंकू नये. ज्या राज्याने देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री दिले आहेत त्यानांच त्यांच्या गृहराज्यात निवडणुकीत भाजपाला पराभूत करावा हा विचारच चुकीचा होता. पण इच्छा असते आणि सत्यता असते. तसेच भाजपाला याची थोडी देखील शंका नव्हती की हिमाचल प्रदेश त्यांच्या हातून जाईल. पण हिमाचलमध्ये भाजपाच्या इच्छेप्रमाणे घडले नाही. भाजपाला गुजरातमधील निवडणूक जिंकण्याचा जितका आनंद झाला तेवढेच दुःख हिमाचलप्रदेशच्या पराभवाचे त्यांना झाले असेल. अशातच दिल्लीतील मनपा निवडणुकीतही भाजपाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे दोन गमावलं; एक जिंकलं, अशी स्थिती भाजपाची झाली. येणाऱ्या काळात मात्र अशीच परिस्थिती राहीली तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हातून सत्ता निसटलेली दिसली तर आश्चर्य नको.

गुजरातमध्ये आम आदमी पार्टी (आप) मुळे भाजपाला अधिक मते मिळाली आणि म्हणून त्याला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्याच बरोबर ओवेसी यांच्या एमआयएममुळे सुद्धा भाजपाची मदत झाली. असे सर्रासपणे बोलले जाते की, हे दोन्ही पक्ष भाजपाची बी टीम आहेत. पण कोणताही नवा पक्ष उदयास येतो तेव्हा त्याच्याकडे कोणत्या न कोणत्या पक्षाचे लोक आकर्षित होणारच आणि त्या पक्षाला मते देणारच. तेव्हा किती नव्या पक्षांना लोक बी.सी.डी. टीम म्हणणार? प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा आणि निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. खरे तर जुन्या पक्ष, संघटनांनी नव्या राजकीय पक्षांना बदनाम करण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाला तर असा अधिकारच नाही. 

भाजपा सत्तेत आल्यापासून एकही निवडणूक अशी नाही जी काँग्रेसनं गांभीर्याने लढविली असेल. स्वतःच निवडणूक रिंगणापासून दूर जात असताना त्यांना नव्या पक्षांवर आक्षेप घेण्याचे काय कारण. हिमाचल प्रदेश असो की इतर ठिकाणी काँग्रेसचे मतदार आजही टिकून आहेत. लोकांना असे वाटते की काँग्रेसने पुन्हा सत्तेत यावं पण स्वतः काँग्रेसला सत्तेत येण्याची इच्छा आहे की, नाही हा प्रश्न आहे. काँग्रेसकडे संगठण नावाची व्यवस्था नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत त्यांना सध्याच्या निवडणुकांमध्ये काहीच रस नव्हता. यात्रा सोडून एक दिवसासाठी गुजरातला गेले खरे पण पुन्हा तिकडे फिरकले नाहीत म्हणजे सध्या त्यांना निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही.

यात्रेनंतर कोणता निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा येत्या लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होईल हे काँग्रेस कार्यकर्त्यांनाच माहित नाही. लोकांची अशीही एक धारणा होती की भाजपा अजिंक्य पक्ष आहे. पंतप्रधानांचा करिश्मा आणि संगठण याला तोड नाही. पण सध्या झालेल्या हिमाचल दिल्ली महानगरपालिका आणि सात ठिकाणी झालेल्या बाय इले्नशन मध्ये हे तथ्य समोर आले की भाजपाला पराभूत करता येते. लोकांना बदल हवा आहे आणि यासाठी जर कोणत्याही राजकीय पक्षाने एक पर्याय लोकांसमोर ठेवला तर त्या पक्षाला निवडून आणतील. हिमाचलमध्ये भाजपाचे संगठण, रास्व संघाचे कार्यकर्ते आणि पंतप्रधानांचा करिश्मा भाजपाला काही कामी आला नाही. तिथल्या लोकांना बदल हवा होता ते त्यांनी करून दाखविला. प्रियंका गांधीमुळे काँग्रेस पक्ष जिंकला हे ही चुकीचे आहे. हिमाचल निवडणुकीत त्यांनी फक्त पाच सभा घेतल्या होत्या. यापेक्षा जास्त मेहनत त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकीत केली होती. तिथे त्यांना यश मिळाले नव्हते. वस्तुस्थिती अशी की प्रथमतः हिमाचल प्रदेशच्या लोकांना बदल करायचा होता. तशी तीथली परंपरासुद्धा आहे. आलटून पालटून ते भाजपा आणि काँग्रेस पक्षाला सत्तेत आणत असतात. दुसरी एक गोष्ट अशी म्हटली जाते हिमाचलच्या संदर्भात की तिथे कमीत कमी तीन नेते मुख्यमंत्री पदाचे इच्छुक होते आणि त्या तिघांनी आपापलं समर्थन वाढण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला त्याला बहुमत मिळाले. ज्याची त्यांना आशा नव्हती. भाजपामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. पंतप्रधानांनी देखील ती थांबवण्याचे प्रयत्न केले पण पक्षाला सावरू शकले नाही.

राहुल गांधी विषयी वारंवार सांगितले जाते की, त्यांना निवडणुकीत काहीच रस घेतला नाही तेव्हा भारत जोडो यात्रेचे खरे लक्ष्य काय आहे? लोकांनी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करावा. राहुल गांधींनी भारत जोडण्याचा संकल्प बांधलेला आहे. काँग्रेस जोडोचा नाही. 

राहुल गांधी समोर एक नवा भारत नव्या तरूण पिढीचे नेतृत्व साकार करायचे आहे. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा आदेशांवर ते चालायला तयार नाहीत. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना सत्ता हवी आहे ते अविरत 50-50 वर्षे सत्तेत राहिले आहेत. त्यांना स्वतः काही करायचे नाही जे काही करायचे आहे त्यांच्या आशा आकांक्षाच्या पूर्ततेला ते गांधी परिवाराने करावे त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सत्तेसाठी परिश्रम करायला ते तयार नाहीत. ही गोष्ट राहुल गांधी यांच्या लक्षात आल्याने ते एका नवीन तरूण पिढीला सोबत घेऊन भारत भ्रमण करायला निघाले. जेणेकरून जनतेची वास्तविक परिस्थिती त्यांचे प्रश्न त्यांच्या अडी अडचणीशी त्यांना थेट संवाद साधता यावा. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत देखील राहुल गांधी आणि त्यांचे तरूण सहकारी सक्रीय भाग घेणार की घेणार नाहीत याची सुद्धा खात्री नाही. त्याचे लक्ष्य 2029 निवडणुकीचे असणार की काय हे ही सांगता येणार नाही. राहूल गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमीका घेणार की महात्मा गांधींची, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सद्यपरिस्थितीत आणि त्यांची वेशभूषा आणि राजकीय मिजास पाहता ते बहुतेक महात्मा गांधींची भूमिका घेणार असे वाटते. सध्या ते राजकीय तपस्या ते करत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

गुजरातमधील निवडणुका तसे भाजपा जिंकरणारच होती. परंतु, त्यांना शंभर टक्के खात्री नव्हती की काय हा ही एक प्रश्न आहे. गुजरातमधील राजकारण हा केवळ हिंदू-मुस्लिम द्वेषाशी फारकत घेऊ शकत नाही म्हणून शेवटी गृहमंत्र्यांनी 2002 च्या दंगलींची आठवण करूनच दिली. याचा अर्थ गुजरातच्या जनतेच्या मानसिकतेवर सांप्रदायिक द्वेष बिंबवल्या शिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत की काय असा सवाल उपस्थित होतो. रोजगार, रस्ते, वीज, पाणी, गरीबी ह्या समस्या त्यांच्यासाठी निरर्थकच असणार काय? हा ही एक प्रश्न आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद 

9820121207



9 डिसेंबर 2022 रोजी सऊदी अरबची राजधानी रियादमध्ये दुपारी ’किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रा’मध्ये एक शिखर संमेलन आयोजित करण्यात आले. त्यात सऊदी अरब आणि 22 तेलउत्पादक खाडीच्या मुस्लिम देशांपैकी 21 देश सामिल झाले. यावरून अरब राष्ट्रे अमेरिकेच्या जोडखातून मुक्त होण्यासाठी किती आसुसलेली आहेत याचा अंदाज येतो. या शिखर संमेलनाची थीम ’नव्या युगात भविष्यातील भागीदारी’ ही होती.

सउदी अरबमध्ये पहिल्यांदा मार्च  1938 मध्ये एका अमेरिकन कंपनीद्वारे पेट्रोलियम पदार्थांचा शोध लावला गेला. सऊदीच्या  दहारन क्षेत्रात भरपूर पेट्रोलियम पदार्थ असल्याचा शोध लागल्यावर या भागाला जगातील सर्वात मोठा तेलाचा भंडार म्हणून घोषित केले गेले आणि आजही यालाच जगातील सर्वात मोठे तेलाचे स्त्रोत मानले जाते. या ठिकाणी अनेक तेलाच्या विहिरी असून, त्यातील सात क्रमांकाची विहिर ही सर्वाधिक तेलसमृद्ध मानली जाते. या शोधानंतर सऊदी अरबचे नशीबच पालटले. त्यापूर्वी सऊदी अरबची अर्थव्यवस्था मुख्यत्वे करून मक्का आणि मदीना या पवित्र ठिकाणी भेटीसाठी येणाऱ्या तीर्थयात्रींवर अवलंबून होती. त्यावेळेस अरबी लोक टोळ्याकरून राहत होते. मातीची कच्ची घरे मक्का आणि मदिना क्षेत्रात होती. इतरत्र तंबू मारून ते राहत. उंट आणि शेळ्यापालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. सऊदी अरबमधील खनीज तेलाच्या शोधानंतर खाडीच्या इतर देशांनाही आपल्या भूमीत तेल असेल असे वाटल्याने त्यांनीही अमेरिकन कंपन्यांद्वारे तेलाचा शोध सुरू केला. त्यामुळे कतर, इराण, इराक, बहेरीन इत्यादी सर्व खाडीच्या देशामध्ये हळूहळू तेलाचा शोध लागत गेला आणि हा सर्व भागच तेलसमृद्ध   झाला. 19 व्या शतकात अरबांच्या तुलनेत अमेरिकन समाज हा पुढारलेला होत. अनेक वर्षे त्यांनी या बेंदाड सदृश्य घाण वास येत असलेल्या पेट्रोलियमचा उपयोग काय होतो हेच अरबांना कळू दिले नाही. एक बॅरल प्रति डॉलर देऊन तेल कंपन्या अमाप तेल आपल्या देशात नेऊ लागल्या आणि अडाणी अरब त्या एक डॉलरमध्येही इतके खुश होत की ते तेल कंपन्याचे आभार मानत. तेलाचे खरे महत्त्व अरबांना तेव्हा लक्षात आले जेव्हा अमेरिकेबरोबर इतर युरोपियन देशही तेल उत्खननामध्ये स्पर्धा करू लागले आणि अरबांना तेलाची किमत जास्त देऊ लागले. त्यातून आलेल्या समृद्धीमुळे अरबी तरूण जेव्हा शिक्षणासाठी युरोपमध्ये गेले. तेव्हा तेथे त्यांनी पाहिले की आपल्या देशातून येणारे बेंदाड्यासारख्या दिसणाऱ्या पेट्रोलियम पदार्थाचे काय महत्त्व आहे आणि युरोप आणि अमेरिकेची प्रगती या पेट्रोलियम पदार्थामुळेच झाली. तेव्हा अरब लोकांनी तेलाच्या किमती वाढविल्या. आरामको या कंपनीची स्थापना केली. ओपेक नावाची संघटना तयार केली आणि खऱ्या अर्थाने तेलाचे लाभ उठविण्यास सुरूवात केली. बघता-बघता सऊदी अरबसह खाडीच्या देशांचा नूरच पालटला. अमेरिकेच्या जेव्हा लक्षात आलं की तेलावरची आपली पकड ढिली पडत आहे तेव्हा त्यांनी तत्कालीन अरबी नेतृत्वाला विश्वासात घेऊन ’तेलाच्या बदल्यात सुरक्षा’हा करार केला आणि अरबी तेल उद्योगावर नव्याने आपली पकड बसविली. दरम्यान, सऊदी अरबचे संरक्षण अंतर्गत आणि बाह्य शस्त्रुपासून करण्याच्या निमित्ताने अमेरिकेने तेथे आपले सैनिक तळ उभारले. सैनिकांची संख्या वाढविली. तेलाच्या व्यावसायाचा विस्तार केला. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्खनन केले. येणेप्रमाणे 1938 पासून आजपावेतो तेलाबरोबर सऊदी अरब शासनावरही अमेरिकेची घट्ट पकड तयार झाली. मध्यंतरी इराकने 2 ऑगस्ट 1990 रोजी सद्दाम हुसैन यांनी कुवैतवर आक्रमण केले तेव्हा सऊदी अरब प्रचंड घाबरले आणि सुरक्षेसाठी नव्याने अमेरिकेला शरण गेले. अमेरिकेला आयती संधी चालून आली आणि सैनिक अड्डयांची संख्या दुप्पट झाली. तेव्हापासून सऊदी अरब एका प्रकारे अमेरिकेच्या अदृश्य गुलामगिरीमध्येच मर्यादित स्वातंत्र्य उपभोगतो आहे, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. याचा पुरावा 2019 मध्ये ट्रम्पचे ते विधान आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ’’आम्ही जर सऊदी अरेबियाचे सुरक्षा कवच काढून घेतले तर सऊदी शासन स्वतःच्या बळावर 15 दिवस सुद्धा अस्तित्वात राहू शकणार नाही.’’ 

चीनचा खाडीमध्ये प्रवेश 

9 डिसेंबर 2022 रोजी सऊदी अरबची राजधानी रियादमध्ये दुपारी ’किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रा’मध्ये एक शिखर संमेलन आयोजित करण्यात आले. त्यात सऊदी अरब आणि 22 तेलउत्पादक खाडीच्या मुस्लिम देशांपैकी 21 देश सामिल झाले. यावरून अरब राष्ट्रे अमेरिकेच्या जोडखातून मुक्त होण्यासाठी किती आसुसलेली आहेत याचा अंदाज येतो. या शिखर संमेलनाची थीम ’नव्या युगात भविष्यातील भागीदारी’ ही होती. या शिखर संमेलनामध्ये चीनी राष्ट्रपती ’शी जिनिपिंग’ यांनी स्वतः एका उच्चस्तरीय चीनी मंडळाबरोबर आपला सहभाग नोंदविला. एवढेच नव्हे तर या संमेलनानंतर एक घोषणापत्र जारी करण्यात आले. ज्याला ’रियाद घोषणापत्र’ म्हटले जात आहे. त्यात चीन आणि खाडी देशांमध्ये जवळ-जवळ सर्वच क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याचे वचन एकमेकांना देण्यात आले. विशेष करून चीन आणि अरब एकाच सिद्धांताचे पालन करतात. आपले सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचे रक्षण करण्यामध्ये अरब देश चीनचे समर्थन करतात आणि तैवान चीनचाच एक भाग आहे असे मानतात असे म्हटले गेले. पुढे असेही नमूद केले की, सीरिया, लिबिया, यमन या ठिकाणी चालू असलेल्या उपद्रवाचे समाधान करण्यामध्ये चीन मदत करेल. युक्रेन संकटावरही आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे तोडगा काढण्याबद्दल संयुक्त समर्थन देण्यात आले. दोन्ही पक्षांनी आतंकवाद विरोधी कारवायांमध्ये’ ’दोहरे मापदंड’ चालणार नाहीत, यावर सहमती दर्शविली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इस्राईलची आजची जी स्थिती आहे ती कायम स्वरूपी नसून पॅलेस्टिनियनच्या प्रश्नावर तोडगा काढवाच लागेल यावरही संयुक्त सहमती दर्शविण्यात आली. 

या शिखर वार्तेचे संभाव्य परिणाम

ही शिखर वार्ता म्हणजे अरब राष्ट्रांचे एकमताने अमेरिकेच्या गोटातून चीनच्या गोटात प्रवेश करण्याच्या निर्धाराचे प्रकटीकरण असल्याचे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक समजत आहेत. अनेक ठिकाणी युद्धात सामील झाल्यामुळे जर्जर झालेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सऊदी अरबचे वयोवृद्ध राजे किंग सलमान हे नामधारी असून, सत्तेची खरी सुत्रे त्यांचे पुत्र मुहम्मद बिन सलमान यांच्याकडे आहेत. हा एक धाडसी शासक असून, त्याने अंतर्गत तीव्र विरोधाला तोंड देत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक शक्तीशाली व पुरोगामी नेता म्हणून वेगळीच प्रतीमा उभी केली आहे. जमाल खशोगी याच्या हत्येमध्ये स्पष्ट सहभाग असल्याचा ठपका ठेऊनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सऊदी अरबला जाऊन मोहम्मद बिन सलमान याच्याशी बोलणी केली. यावरूनच मोहम्मद बिन सलमान याच्या ताकदीचा अंदाज येतो. स्पष्ट आहे या संयुक्त शिखर संमेलनाचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसणार आहे व अमेरिका यातून होणारी आपली हानी कशी भरून काढतो व चीन-अरब लीग संबंध कुठपर्यंत जातात याची उत्तरे भविष्याच्या उदरातच लपलेली आहेत. भारतावर या शिखर संमेलनाचा रास्त असा परिणाम होणार नसला तरी भविष्यात चीन-अरब देशांशी संबंधांचा आपल्या तेल आयातीवर विपरित परिणाम होणार नाही यासंबंधी घ्यावी लागेल. 


- एम.आय.शेख



माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. त्याच्यामध्ये फरिश्त्याचे स्वभाव गुणही आहेत आणि त्याच्यामध्ये पशूतुल्य वर्तनही आढळतात, पण जेव्हा माणसातील पाशवी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील फरिश्त्याचे गुण दफन होतात, मातीपासून बनलेल्या या शरीरात दाबले जातात, तेव्हा जगात थैमान घालणारी माणसं दिसू लागतात.


माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते. माणसाला हे नेहमी जाणवत असते की त्याच्यात असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्तींमध्ये सतत संघर्ष होत आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाजवळ एकच भाकर आहे. त्याशिवाय खायला दुसरं काहीही नाही. तो जेवायला बसणार इतक्यात एखादा गरजू आला, ज्याच्याकडे खायला काहीच नाही, तर मग लगेच माणसाच्या आत एक संघर्ष सुरू होईल. एक शक्ती म्हणेल की ही भाकर तुझ्यासाठीच ठेव, ती तुझ्या गरजेपुरतीही नाही म्हणून दुसऱ्याबरोबर वाटून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण माणसातली दुसरी शक्ती याकडे आकर्षित करेल की त्याच्याकडे तर एकही नाही आणि तो भुकेला दिसतोय म्हणून ही भाकर दोघांनी वाटून घेतली पाहिजे, नाही तर समोरची व्यक्ती उपाशी राहील. प्रत्येक शक्तीची एक वैयक्तिक भावना असते, जी माणसाला स्वत: मध्ये जाणवते. एका शक्तीला केवळ स्वतःचे हित माहीत आहे. फक्त स्वतःचेच पोट भरण्याची चिंता आहे. दुसऱ्याचे पोट रिकामे असो वा भरलेले या विषयात त्याला रस नाही. दुसरे त्याला शारिरीक समाधान हवे असते. मग त्यासाठी कोणता मार्ग हलाल आहे आणि कोणता हराम याची त्याला पर्वा नसते. याशिवाय त्याच्यामध्ये आपले वर्चस्व गाजवण्याची तिव्र इच्छा असते. नेक नीतीने ही इच्छा पूर्ण होत नसेल तर कुटनीतीच्या नावावर प्रत्येक दुष्ट नीतीचा तो अवलंब करतो. ही आहे जैविक शक्ती.

याउलट दुसरी शक्ती आहे. ती दया, करूणा आणि कृपा यासारख्या गुणांनी भरलेली आहे. या शक्तीचा ओढा आपल्या निर्मात्याकडे असतो. त्यामध्ये आपल्या निर्मात्याची प्रेम ज्योत असते जी अखंडपणे तेवत ठेवणे अत्यावश्यक असते. अल्लाहची स्तुती, त्याच्या पावित्र्याचे गुणगान, तसेच आपल्या निर्मात्यासमोर प्रार्थना व क्षमायाचना करत राहिल्याने या शक्तीला शांती व समाधान मिळते. ही आहे आत्मिक शक्ती. 

कुरआनचा आत्म्याशी संबंध 

माणसाच्या जैविक अस्तित्वाचे पालन जमीनीतून होते तर आत्म्याला हवा असलेला पोषक आहार आकाशातून मिळतो जो अल्लाहने प्रत्येक काळात अवतरित केला. कुरआनचा आत्म्याशी घनिष्ठ संबंध आहे. सद्य काळात कुरआनद्वारेच दुःखी आत्मे सुखी होऊ शकतात. अल्लाहने कुरआनद्वारे मानवी आत्म्याशी संवाद साधला आहे. कुरआन हे आपल्या निर्मात्याने आपल्याशी केलेले संभाषण आहे, ज्याच्याशी मानवी आत्म्याला सर्वाधिक प्रेम आहे, कारण त्या निर्मात्याच्या आदेशानेच तो अस्तित्वात आला आणि त्याला अल्लाहकडेच परत जायचे आहे, म्हणून कुरआनवर दृढ विश्वास ठेवणे, ते शिकणे व शिकवणे, त्याचे वारंवार वाचन करणे, त्यामध्ये चिंतन व मनन करून त्याचा अर्थ समजून घेणे आणि इतरांनाही समजावून सांगणे आणि जीवनाच्या प्रत्येक बाबतीत त्याच्या कायद्यांना धरून आचरण केल्यास आत्मा हर्षित होतो. त्यामुळे आपल्या निर्मात्याशी असलेली प्रेम ज्योत तेवत असते, पण बहुतेक वेळा माणसाचे जैविक अस्तित्व हे आत्म्याला दडपून टाकते. माणूस आपल्या शारीरिक गरजा, इच्छा, आकांक्षा आपणहून अंगाअंगावर लादून घेतो, त्यांच्यासाठी तीव्रतेने धावपळ करतो, आपले सारे लक्ष त्यांच्यावरच इतके केंद्रित करतो की त्याचा आत्मा एक प्रकारे पूर्णपणे दुर्लक्षित होतो. गतिमान जीवनात बराच काळ जीवाबरोबर आत्माही धावत राहतो पण जीवाच्या गरजा, इच्छा-आकांक्षाच्या जड ओझ्याखाली तो सतत दु:खी असतो, अस्वस्थ होतो. शेवटी त्याची प्राणज्योत मावळते आणि माणसाचा आत्मा त्याच्या भौतिक अस्तित्वात गाडला जातो. माणूस खूप धावपळ करताना दिसतो पण आपल्या आत्म्यासाठी तो एक चालती फिरती कबर बनलेला असतो ज्यामध्ये त्याचा आत्मा दफन असतो. असा माणूस आध्यात्मिकतेच्या दृष्टीने मेलेला असतो.

मौलाना मुहियुद्दीन गाजी यांनी आपल्या पुस्तकात आत्म्याशी संबंधित कुरआनातील महत्त्वाच्या आयतींकडे लक्ष वेधतांना म्हटले आहे की, आत्म्याच्या संदर्भात पुढील आयती अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतात.’’साक्ष आहे मानवी आत्म्याची व त्या अस्तित्वाची ज्याने त्याला निटनेटके केले. मग त्याच्यातील दुष्टता व पापभिरूता त्यावर प्रकट केली. खचितच सफल झाला तो ज्याने अंतःकरणाची शुध्दी केली आणि विफल झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.(91-अश्शम्स: 7-10 )

या आयतीमध्ये ज्याला ’नफ्स’ असे म्हटले गेले आहे, वास्तविक पाहता तो शरीराच्या रूपाने अस्तित्वात असलेला माणसाचा आत्मा आहे.

(अनुवाद:-रूहानियत - पृष्ठ 12/13 ) म्हणजे अस्सल अस्तित्व माणसाचा आत्मा आहे जो भौतिक शरीरात फुंकला गेला आहे आणि हा विषय आपल्या समजण्या पलिकडचा आहे. एक साधे उदाहरण घ्या. आपल्याला आजपर्यंत हे सुद्धा माहित झाले नाही की आपल्या जीवाचा शरीराशी संबंध कसा जुळलेला आहे. शरीर विज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचून पहा. जीव  शरीराशी कसा संबंधित आहे आणि कोणत्या अवयवाशी आहे हे कळते का ते बघा. मेंदूच्या कोणत्या कोपऱ्यात ते बटन आहे जे चालू केल्यावर माणूस जागा होतो आणि बंद केल्यावर माणूस झोपी जातो हे कळत नाही. हे सर्व आपल्या आवाक्याबाहेर आहे. जेव्हा जीवाबद्दल आपल्याला माहिती नाही तेव्हा आत्मा तर त्यापेक्षा अधिक सूक्ष्म वास्तव आहे. वरील आयतीमध्ये शेवटी हे म्हटले गेले आहे की विफल झाला तो ज्याने आपल्या आत्म्याला मातीत पुरले, यासंबंधी कुरआनमध्ये स्पष्ट केलेला आणखी एक मुद्दा विचारात घ्या जो सातव्या अध्यायात आहे.

जिन्न आणि माणसांपैकी बहुसंख्य आम्ही नरकासाठीच निर्माण केले आहेत म्हणजे त्यांचा शेवट नरकच असेल. का असेल? कुरआनने पुढे स्पष्ट केले की, ज्यांना हृदये आहेत पण त्यांद्वारे त्यांना सत्याचे आकलन होत नाही. त्यांना डोळे आहेत पण त्यांद्वारे ते पाहत नाहीत. त्यांना कान आहेत पण त्यांद्वारे ते ऐकत नाहीत. ते गुराढोरांसारखे आहेत किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक भरकटलेले. हेच लोक गाफील आहेत. ( 7 अल्-आअराफ : 179 ). या आयतीमध्ये असे कोणते ऐकणे आहे जे नाकारले जात आहे? कोणते पाहणे आहे जे नाकारले जात आहे? 

जगभरात हाहाकार माजवणारे असे कित्येक येऊन गेलेत जे अपंग नव्हते. धडधाकट होते. दिसायला सुंदर होते. वरवर पाहता खूप हुशार आणि ’विचारवंत’? समजले जायचे आणि आजही कित्येक समजले जातात, पण कुरआनने अशाच लोकांच्या बाबतीत म्हटले आहे की ते आंधळे आहेत त्यांची दृष्टी हरवली आहे. ते बहिरे आहेत त्यांना ऐकू येत नाही. त्यांचे हृदये ठप्प झालेले आहेत. ही आहे आत्म्याच्या मृत होण्याची वास्तविकता जी या आयतीमध्ये वर्णन केली गेली आहे. हे लोक गुराढोरांसारखे आहेत. दिसायला माणसं आहेत पण मानव स्वरूपात दोन पायांवर चालणारे प्राणी आहेत आणि प्राणीही कोणकोणते? 

 एकदा एका महात्म्यांनी भऱ्या बाजारात एका व्यक्तीला प्रश्न केला  की मला एखाद्या ’माणसाला’ भेटण्याची खूप इच्छा आहे. आपण मला माणूस दाखवाल का? 

यावर समोरची व्यक्ती म्हणाली की, अहो महाशय! बाजार गच्च भरलेला आहे. दुकानदार आहेत, गिऱ्हाईक आहेत, इतकी माणसं तुम्हाला दिसत नाहीत का?  यावर ते महात्मा म्हणाले 

कुठं आहेत माणसं? हा प्रश्न विचारण्याचा अर्थ असा होता की इथे तर कोल्हे, लांडगे व कुत्रे दिसताहेत. या शब्दांमध्ये लबाडी, धुर्तपणा व कधीही न संपणारी पोट आणि वासनेची लालसा हे अर्थ दडलेले आहेत. अशा वृत्तीच्या लोकांसाठी कुरआनने मात्र सौम्य शब्द वापरले आहेत की ते गुराढोरांसारखे आहेत. प्राण्यांमध्ये या वृत्ती असण्यात काय वाईट आहे? ते तर याच स्तरावर जन्माला आलेले आहेत, पण माणूस ज्याला सर्वोच्च निर्मिती म्हटले गेले आहे, बऱ्या वाईटाचा फरक ओळखणारे गुण ज्याच्या अंगी आहेत, तोही प्राण्यांच्या पातळीवर घसरलेला असेल तर त्याच्यासाठी जरूर लाज व शरमेची बाब आहे. 

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन पैलू आहेत. त्याच्यामध्ये फरिश्त्याचे स्वभाव गुणही आहेत आणि त्याच्यामध्ये पशूतुल्य वर्तनही आढळतात, पण जेव्हा माणसातील पाशवी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील फरिश्त्याचे गुण दफन होतात, मातीपासून बनलेल्या या शरीरात दाबले जातात, तेव्हा जगात थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. यातून सुटका होण्याचा मार्ग कोणता?  अध्याय अत्-तीन मध्ये सांगितले गेले आहे की, ’’ज्यांनी श्रध्दा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले त्यांच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे.’’ ( 95 अत्-तीन - 6 ) ...........क्रमशः

- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget