निसर्गकर्त्याने मानवाला हात, पाय, डोळे, कान, नाक ही सर्व इंद्रिये दिलीत. याद्वारे तो काम करू शकतो, ज्ञान मिळवू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक मेंदू दिला, जो सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेऊ शकतो. पण अनेक वेळा हा मेंदू काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या सैतानी षडविकारांच्या आहारी जाऊन गाफील होतो. या गफलतीतून मानवाला बाहेर काढून योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता निसर्गकर्त्याने माणसांपैकीच काही माणसं निवडलीत आणि त्यांच्यावर आपल्या संदेशाचे दिव्य अवतरण करून हाच अवतरीत संदेश पुढे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अशा महापुरूषांना प्रेषित म्हणतात. काही प्रेषितांना मिळालेले संदेश हे तात्कालिक होते, त्यांचा उद्देश त्याच काळापुरता मर्यादित होता. पण काही संदेश हे ग्रंथरूपाने संकलित करण्यासाठी होते. त्याच ग्रंथांची शिकवण पुढे येणारे काही प्रेषितही त्यांच्या समाजाला देत होते. अशाप्रकारे काही प्रेषितांना असे ग्रंथ दिले गेले तर काहींना ग्रंथ दिले गेले नाहीत. आता हे ग्रंथ दिले गेले किंवा ग्रंथांचे अवतरण झाले म्हणजे नेमकं काय झालं, ते आपण पाहू या. ...
सृष्टीकर्ता अल्लाह (ईश्वर/निर्मिक) हा मानवाच्या मार्गदर्शनासाठी आपला संदेश विविध श्लोकांचा समूह असलेल्या अध्यायांच्या स्वरूपात फरिश्ते (ईशदूत) मार्फत प्रेषितांपर्यंत पोहोचवितो. आता या फरिश्त्यांचं नेमकं स्वरूप कसं आहे, त्याचं ज्ञान अल्लाहलाच आहे, त्याविषयी फार कमी माहिती देण्यात आली आहे. पण समजून घेण्यासाठी एवढं पुरेसं आहे की, इतकी अद्भूूत सृष्टी निर्माण करणाऱ्या निर्मिकाने त्याच्या आणि प्रेषितांदरम्यान एक संपर्कयंत्रणा निर्माण केली आहे. ती यंत्रणा म्हणजे फरिश्त्यांद्वारे संदेशांचे हे दिव्य प्रगटन होय. वेगवेगळ्याप्रसंगी निसर्गकर्ता वेगवेगळ्या पद्धतीने ग्रंथाचं अवतरण करतो. कधी फरिश्ते मानवांच्या स्वरूपात येऊन प्रेषितांना अध्याय ऐकवतात तर कधी थेट अल्लाहकडून एखादा अध्याय प्रेषिताच्या मनावर अवतरित होतो. ही पद्धत प्रेषितासाठी फार यातनादायी ठरते. अशा वेळी एखादी अवजड गोष्ट आकाशातून आपल्यावर येऊन कोसळत असल्याची जाणीव प्रेषितांना होत होती. त्या वेळी प्रेषितांचा चेहरा लालसर होत होता, शरीराला घाम येत होता, कानात घंटानादासारखा आवाज जाणवत असे. अशा पद्धतीने एकूण 23 वर्षांमध्ये विविधप्रसंगी विविध अध्याय अवतरित होत गेले. या अध्यायांचा संग्रह म्हणजेच क़ुरआन. (संदर्भ: मौलाना मौदुदी यांनी लिहिलेल्या दिव्य क़ुरआनाच्या उर्दू भाषांतराच्या प्रस्तावनेत उद्धृत करण्यात आलेली माहिती.)
यावरून स्पष्ट होते की, क़ुरआनाचे लेखक पैगंबर सल्लम नसून स्वत: अल्लाह आहे. कारण अल्लाहने जे अध्याय प्रेषितांना सांगितले तेच त्यांनी लोकांना सांगितले आणि आपल्या सहकाऱ्यांकडून लिपिबद्ध करवून घेतले. प्रेषितांनी क़ुरआन स्वतःच्या मनानं लिहिलेले नाही. कारण प्रेषित तर उम्मी (म्हणजे लिहिता वाचता न येणारे) होते. ते कधीही कोणत्या शाळेत गेले नाहीत की कोणाकडूनही त्यांनी लिहिणं वाचणं शिकले नाही की क़ुरआन अवतरणापूर्वी त्यांनी कोणतेही पुस्तक किंवा कोणतेही लिहिलेले वाक्य वाचलेले नव्हते. त्यांचा कोणताही माणूस गुरू किंवा शिक्षक नव्हता. तरीही त्यांच्या तोंडून क़ुरआनाच्या स्वरूपात असे अगाध ज्ञान लोकं ऐकत होते की, ज्यात असे अनेक वैज्ञानिक व ऐतिहासिक तथ्ये बाहेर पडत होती की, जी तथ्ये एकोणीसाव्या, विसाव्या शतकात माणसाने शोधली. उदाहरणार्थ - पृथ्वी गोल असणे, ग्रहांचं त्यांच्या कक्षेतील भ्रमण, सूर्याचं स्वयं प्रकाशित तर चंद्राचं परप्रकाशित असणे, स्त्रीच्या पोटातील गर्भाच्या विविध अवस्था, प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेले प्रेषित मूसा यांच्या काळापासून इजिप्तचा राजा फेरो (फिरऔन)चे अज्ञात असलेलं प्रेत (जे 10 डिसेंबर 1911 रोजी सापडलं) याची माहिती, अशा अनेक गोष्टी क़ुरआनाच्या स्वरूपात एका अशा व्यक्तीच्या तोंडातून निघतात की, जी व्यक्ती ग्रंथ अवतरणापूर्वी एक सीरियाचा अपवाद वगळता कोणत्याच देशात मक्का सोडून गेलेली नव्हती, याचा अर्थ नक्कीच ते ज्ञान त्याचे स्वतःचे नसून निसर्गकर्त्याकडून अवतरित झालेले आहे हे सिद्ध होते. म्हणजे क़ुरआनाचे लेखक प्रेषित नसून ती अल्लाहची वाणी आहे.
जगात अनेक प्रेषित येऊन गेले. प्रेषित मुहम्मद सल्लम् हे इस्लामचे संस्थापक नसून अंतिम प्रेषित आहेत. इस्लामचे पहिले प्रेषित होते भूतलावरील पहिले मानव हजरत आदम! त्यांची पत्नीी हव्वा यांची कबर आजही सौदी अरबमधील जेद्दाह शहरात आहे. इस्लामचे जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित जगाच्या प्रत्येक देशात, प्रत्येक युगात आले आहेत. यासंदर्भात अल्लाह क़ुरआनात सांगतो -
‘प्रत्येक जनसमुदाय (उम्मत) साठी एक प्रेषित आहे’ - क़ुरआन (10:47)
प्रत्येक प्रेषित हा प्रादेशिक भाषाच बोलायचा. याचा संदर्भ क़ुरआनात सापडतो -
‘आम्ही (अल्लाहने) आपला संदेश देण्यासाठी जेंव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे.’ - क़ुरआन (14:4)
सर्व प्रेषितांनी एकच शिकवण दिली. पण त्यांची भाषा वेगवेगळी होती. म्हणून असं होऊ शकते की, धर्माशी संबंधित अनेक शब्द वेगळे असू शकतात. त्यावरून काहींचा असा गैरसमज होऊ शकतो की, त्यांचा धर्मही वेगळा असावा.
म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम् यांनी कोणताही नवीन धर्म सांगितलेला नसून प्रेषित आदमपासून प्रेषित येशूपर्यंतचा हाच त्यांचा धर्म आहे ज्याला अरबीत इस्लाम म्हणतात आणि त्याच्या अनुयायींना मुस्लिम म्हटले जाते.
याचं एक उदाहरण म्हणून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जवळपास अडिच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेले त्यांचे इराकमधील पूर्वज प्रेषित इब्राहिम यांचं उदाहरण देता येईल.
याचा पुरावा म्हणून प्रेषित मुहम्मद सल्लम् यांच्यापूर्वीपासून असलेल्या मस्जिद ए हरम (मक्का), अक्सा मस्जिद (यरूशलम), कुब्बत अल सखरा (यरूशलम) या धर्मस्थळांची उदाहरणं देता येतील. इतके प्रेषित येऊनही पुन्हा लोकांत गट तट, वादावादी, कलह का निर्माण झाला? याच्या उत्तराकरिता आपल्याला मानवी इतिहासात निसर्गकर्त्याकडून मानवाच्या मार्गदर्शनाकरिता जे जे प्रेषित नियुक्त करण्यात आले, त्यांच्या इतिहासाचे अवलोकन करावे लागेल.
इस्लामचे पहिले प्रेषित आदम. हेच भूतलावरील पहिले मानवदेखील होते. त्यांच्या पत्नीचे नाव हव्वा. प्रेषित आदम यांच्यानंतर त्यांची लेकरं, लेकरांची लेकरं ही जगभर पसरत गेली. तो एकच मानवी परिवार आज जवळपास सातशे कोटी लोकांचा झाला आहे. या परिवारात प्रत्येक युगात, प्रत्येक देशात किमान एक प्रेषित आलेला आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशावर मुस्लिम प्रेम करत असतो. कारण प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या प्रेषिताची पुण्यभूमी राहिलेला आहे.
प्रेषित आदम यांच्यानंतर त्यांचे तिसरे पुत्र प्रेषित इद्रिस यांना प्रेषित्व बहाल करण्यात आले. त्यांच्यानंतर प्रेषित नुह आले. अशाप्रकारे एक एक प्रेषित येत गेले. ते काही कोणती वेगळी नवीन शिकवण सांगायचा नाही. तर प्रत्येक प्रेषित पूर्वीच्या प्रेषितांचीच शिकवण स्थानिक भाषेत सांगायचे. काही लोकं मानायचे तर काही नाकारत होते. ते प्रेषित गेल्यानंतर पुन्हा त्यांचे अनुयायी त्यांची शिकवण विसरायचे किंवा काही जण त्यात हेतुपुरस्सर भेसळ करायचे. अशाने मूळ धर्माला ग्लानी व्हायची. ग्लानी झालेल्या मूळ धर्माचेच सृजन करण्यासाठी पुन्हा एक दुसरा प्रेषित येत गेला. असं करता करता लोकांनी जगभरात अनेक वेगवेगळे गट तट, संंप्रदाय तयार करून टाकले. प्रेषित आदम यांची मूळ शिकवण मात्र एकच आहे. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत एकूण जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित येऊन गेल्याचा इतिहास हदीस ग्रंथात सापडतो. (संदर्भ: इब्ने हिब्बान, उद्धृत: इब्ने कसीर). यापैकी काही प्रेषितांची नावं क़ुरआनात आलेली आहेत, तर काहींची नावे आलेली नाहीत. खरं म्हणजे ईश्वरी ग्रंथ हे मानवाच्या मार्गदर्शनासाठी असतात. म्हणून त्यात नीतीमूल्ये सांगितली जातात, काही इतिहास सांगितला जातो की, बघा त्या नीतीमूल्यांवर आचरण करणारे कसे यशस्वी झाले अन् नाकारणाऱ्यांचे कसे हाल झाले ते दाखविण्याकरिता, याव्यतिरिक्त सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी आणखी काही ज्ञान सांगितलेले असते. आता ग्रंथात जर लाखो प्रेषितांची नुसती नावंच सांगितली गेली असती तर ते ग्रंथ कुणी वाचले असते का? अशा प्रकारे कोणतेही ग्रंथ म्हणजे काय कुणाच्याही नावांची जंत्री (डिरेक्टरी) नसते, तर ते मार्गदर्शनपर ग्रंथ असतात. अन् सर्वच प्रेषितांच्या शिकवणीची गाभा एकच असल्यामुळे त्यांची ती मूळ शिकवण सांगणे गरजेचं होतं, त्यांची फक्त नावं नव्हे, असो.
उपरोक्त सांगितल्याप्रमाणे काही प्रेषितांना ग्रंथ दिली गेली होती, तर काहींना नाही. जसे आदरणीय प्रेषित इब्राहिम यांच्यावर सृष्टिकर्त्याकडून ज्या संदेशांचे अवतरण झाले, त्यांना ‘सुहुफ ए इब्राहिम’ म्हटलं जातं. तो ग्रंथ आज कोणत्याही स्वरूपात अस्तित्वातच नाही. म्हणून अनेक इस्लामी विचारवंत चार मुख्य अस्मानी (ईश्वरी) ग्रंथांचा उल्लेख करतांना त्या ग्रंथाचा उल्लेख करत नसतात. प्रामुख्याने या अस्मानी ग्रंथांचा उल्लेख केला जातो -
1) सुहुफ ए इब्राहिमी - आदरणीय प्रेषित इब्राहिम यांच्यावर हा ग्रंथ अवतरित झाला होता.
2) तौरात - आदरणीय प्रेषित मुसा यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.
3) ज़बुर - आदरणीय प्रेषित दाऊद यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.
4) इंजील - आदरणीय प्रेषित इसा (येशू) मसीह यांच्यावर हा ग्रंथ अवतरित झाला होता.
5) क़ुरआन - आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.
क़ुरआनाच्या अवतरणाविषयी सृष्टिकर्ता सांगतो की -
‘‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’’ - क़ुरआन (2:185)
अशा प्रकारे रमज़ानमध्ये क़ुरआनाचे अवतरित झाल्याची माहिती स्वत: क़ुरआनाचा अवतरणकर्ता सृष्टिकर्ताच देतोय. पण फक्त क़ुरआनच नव्हे तर सृष्टिकर्त्याचे इतर अस्मानी ग्रंथही याच महिन्यात अवतरीत झाल्याची माहिती आपल्याला इतिहासात पुढीलप्रमाणे मिळते -
‘‘‘सुहुफ ए इब्राहिम’ हा (ग्रंथ) रमज़ानच्या पहिल्या रात्रीत अवतरित झाले होते, ‘तौरात’ रमज़ानच्या सहाव्या रात्रीत अवतरित झाले होते, ‘इंजिल’ हे रमजानच्या तेराव्या रात्रीत अवतरीत झाले होते आणि अल्लाहने क़ुरआनला रमज़ानच्या चोवीसाव्या रात्रीत अवतरीत केले.’’
संदर्भ: हदीस (प्रेषितवचन) ग्रंथ - ‘अहमद’, प्रकरण क्र. 4, वचन क्र. 107 ; हदीसग्रंथ - ‘मुसनद’, वचन क्र. 177025)
क़ुरआन रमज़ानच्या नेमक्या कोणत्या रात्रीत अवतरीत झाले, याबाबतीत इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते-मतांतरे आहेत. उपरोक्त हदीस काही विचारवंत अनधिकृत असल्याचेही सांगतात. बहुसंख्य इतिहासकार क़ुरआन रमज़ानच्या शेवटच्या दहा दिवसांपैकी एका दिवसाच्या रात्री अवतरित झाल्याचं मान्य करतात. पण क़ुरआन हे रमज़ानमध्येच अवतरित झालं, यावर सर्वांचं मतैक्य आहे. क़ुरआन हाच एकमेव ईश्वरी ग्रंथ आहे, जो अवतरण काळापासून जसाच्या तसा आहे, त्यात कोणताही प्रक्षेप झालेला नाहीये. इतर ग्रंथ हे त्यांच्या अवतरणकाळानंतर शेकडो वर्षांनी लिपिबद्ध झाल्यामुळे आणि फक्त मौखिक स्वरूपातच अनेक वर्षे राहिल्याने कालौघात लोकांनी त्यात प्रक्षेप केले. त्यामुळे ते ग्रंथ आता मूळ स्वरूपात राहिलेले नाहीयेत. पण क़ुरआन याला अपवाद आहे. कारण तो ग्रंथ त्याच्या अवतरणकाळातच लिपिबद्ध करण्यात आला होता, त्यानंतर त्याच लिपीबद्ध क़ुरआनाच्या प्रतीच्या अनेक प्रती बनवून जगभरात पाठविल्या गेल्या होत्या. त्यामुळे तो आजही शुद्ध स्वरूपात आहे. त्याच ईश्वरी ग्रंथांच्या अवतरणामुळे रमज़ान या रमज़ान-उल-मुबारक बनला, त्याला एवढं मांगल्य प्राप्त झालं आहे. अशा या मंगलमयी रमज़ानच्या सर्वांना सदिच्छा!
- नौशाद उस्मान
औरंगाबाद 9029429489
Post a Comment