मुंबई
ही लढाई जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे आता तुमचे (भाजपाचे) उठण्याचे दिवस आले आहेत. जनशक्तीपुढे तुमचे काय चालणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रश्नांवर आवाज हा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचतो. देशातील १३४ कोटी नागरिकांपैकी सुमारे २५ कोटींच्याकडे घरे आहेत. ५८ टक्क्यांकडे जन्मदाखले आहेत. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. केंद्र सरकारने देशात सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे कायदे आणले आहेत हे कायदे सरकार जनतेवर लादले जात आहेत. पण जनतेची ताकद सर्वात मोठी असते. कोणतीही शक्ती जनशक्ती पुढे टिकू शकत नाही, असे परखड मत ‘अलायन्स अगेन्स्ट सीएएएनआरसी एनपीआर’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील आझाद मैदानात शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी आघाडीच्या महामोर्चात ते बोलत होते. देशात भाजप सरकार येण्यापूर्वी सर्व काही ठीक होते. हिंदू, मुस्लिम बांधव एकोप्याने राहात होते. भाजप सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) माध्यमातून देशात दुही माजवली आहे. ब्रिटिशांप्रमाणे भाजपही हिंदू-मुस्लिमांना आपआपसात लढवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र देशभर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करून भाजपचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धार गेल्या शनिवारी मुंबईत ६५ संघटनांनी आयोजित केलेल्या महामोर्चात करण्यात आला. तर एक लाखाहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘संविधान बचाव, भारत बचाव’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, हिंदू-मुस्लिम एकता जिंदाबाद’, ‘सीएए, एनआरसी, एनपीआर मुर्दाबाद’ अशा घोषणांनी मैदान दुमदुमून गेले.
सीएए, एनआरसी आणि एनपीआर या तिन्ही कायद्याला गेल्या अनेक महिन्यांपासून विरोध केला जात आहे. गेल्या शनिवारीही या कायद्याला मुस्लिम समाजासह इतर अनेक जातीधर्माच्या सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात विरोध करत आझाद मैदानात आंदोलन केले. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या कायद्यासाठी घेतलेल्या निर्णयाला विरोध केला जात आहे. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात या कायद्याविरोधात आंदोलने केली जात आहेत.
मुंबईच्या नागपाडा परिसरातही या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर, तसेच काहीसे चित्र या वेळी आझाद मैदानात ही पाहायला मिळाले. मैदानात कार्यकर्त्यांची गर्दी आझाद मैदान येथे शनिवारी दुपारी १ पासून विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. मोर्चात आंदोलकांनी तिरंगा, भगवा, निळे झेंडे आणले होते. मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचे सदरे परिधान केले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती. चारच्या सुमारास मैदानात कार्यकत्र्यांची प्रचंड गर्दी झाली. पोलीस बंदोबस्त व स्वयंसेवकांमुळे शिस्त, शांततेत मोर्चा पार पडला. महाविकास आघाडीचे काही ज्येष्ठ नेतेही मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत यांसह राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा एकही नेता मोर्चात सहभागी झाला नाही.
या नरभक्षकांपासून हा देश वाचवायचा आहे – सुशांत सिंग राजपूत
बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंगने देशात सद्य परिस्थितीवर बोलताना चिंता व्यक्त केली. तसेच आपण भगतसिंग चित्रपटात क्रांतिकारी सुखदेवची भूमिका साकारताना तो चित्रपट ज्या क्रांतीवर (इन्कलाब) अवलंबून आहे ती या डोळ्यांनी इथे पाहायला मिळेल असे वाटले नव्हते, असे मत व्यक्त केले. सुशांत सिंग याने या वेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेवर सडकून टिका केली. तसेच गृहमंत्र्यांना जळणाऱ्या बसची काळजी आहे, मात्र मरणाऱ्या माणसांची काळजी नसल्याचा आरोप केला. बस जाळू नका, केवळ बत्ती जाळासी- सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. प्रत्येक नागरिकाला शांतीपूर्ण मार्गानेआंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण आंदोलनादरम्यान यापूर्वी बस जाळण्यात आली, ते चुकीचे आहे. बस जाळणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. आज निष्पापांचा बळी घेतला जात आहे. कित्येकांची डोकी फोडली जात आहेत, काही जणांना गोळ्या घातल्या जात आहेत. काहीही झाले, तरी हिंसक होऊ नका, बस जाळू नका. केवळ बत्ती जाळा. कारण माणसांची संख्या जास्त असून, बसची संख्या कमी आहे. या नरभक्षकांपासून हा देश वाचवायचा आहे. मी शेवटपर्यंत लढेन, असा निर्धार सुशांत सिंगने या वेळी व्यक्त केला.
भाजपला युपी, बिहारमधील सत्ता गमवावी लागेल- आझमी
सरकार म्हणजे देश नाही त्यामुळे सरकार बदलले तरी देश बदलणार नाही. सीएए, एनआरसी, एनपीआरमुळे भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेली आहे, त्यासोबत येत्या निवडणुकीत युपी, बिहार येथील सत्ता गमवावी लागेल असे सपाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले. दोन ठग लोकांना छळत असल्याची टीका अबू आझमी यांनी केली आहे. सीएए विरोधी मोर्चात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. या वेळी आझमी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी सहभाग घेतला नाही ते देशभक्ती शिकवत आहेत. आज देशात सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे कायदे आणले जात आहेत. परंतु दरवर्षी देशात जनगणना होत असताना आशा कायद्यांची गरज नाही. जर मोदी सरकारला हा कायदा लागू करायचा होता तर निवडणूकपूर्व करायला हवा होता. १२० कोटी लोकांचे मत घेऊन सत्तेत आले आणि आता हे कायदे आणले आहेत. तसेच मत घेण्यासाठी पॅन कार्ड, वोटिंग कार्ड,आधार कार्ड चालते पण तेच सीएएला का चालत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपने यापूर्वी, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राज्यस्थान ही राज्य गमावली आहेत. येत्या निवडणुकीत बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्रमध्ये महा विकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सीएए, एनआरसी, एनपीआरमुळे एकाही व्यक्तीचे नुकसान होऊ देणार नाही,असा शब्द दिला आहे. सर्व मिळून त्याचा विरोध करू असे सांगत कोणीही कागद दाखवू नका, असे आवाहन केले.
तिरस्काराचे उत्तर प्रेमाने देऊ – मौ. अब्दुल जलील
जमियत ए अहले हदीसचे प्रतिनिधी मौलाना अब्दुल जलील यांनी सांगितले की, सरकार देशात तिरस्काराची भावना वाढवत आहे. याचे उत्तर आम्हाला तिरस्काराने नाही तर प्रेमाने द्यायचे आहे. राज्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत, पण आमचा निर्धारही पक्का आहे. काहीही झाले तरी माघार घेणार नाही.
मागासवर्गीयांवरील अन्यायाचीच ही पुनरावृत्ती : अॅड. राकेश राठोड
मागासवर्गीयांवर काही वर्षांपूर्वी अन्याय होत होता, आज त्याची पुनरावृत्ती होत आहे. देशात नवे कायदे आणले जात असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, अशी खंत अॅड. राकेश राठोड यांनी व्यक्त केली.
महिला शक्तीचे काळ्या कायद्याविरुद्ध आव्हान – मुज्तबा फारुक
अलायन्सचे राष्ट्रीय संयोजक मुज्तबा फारुक म्हणाले की ११ डिसेंबर २०१९ रोजी सीएए हा कायदा पारित झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह हात हालवून क्रोनॉलॉजी सांगत होते तर त्यांचे सहकारी योगी महिलांची टिंगल उडवीत होते ते आज त्यांच्याशी बोलण्यास तयार झाले आहेत. या आमच्या आयाबहिणींचे आव्हान आज त्यांच्यासमोर उभे आहे. एनपीआर आणि एनआरसीद्वारे खरे तर मुस्लिम समाजाला लक्ष्य बनविण्याचे षङयंत्र आहे. परंतु मागासवर्गीय आणि दुर्बल घटक या कायद्याला मोठ्या प्रमाणात बळी पडणार आहेत.
आमचे ध्येय पाषाणापेक्षाही कणखर आहे – मौ. हलीमुल्लाह कासमी
मौ. हलीमुल्लाह कासमी सरकारचे आंदोलन चिरडण्याचे धोरण आणि शाहीन बाग येथील महिलांच्या आंदोलनाबाबत भाष्य करताना म्हणाले की सीएए, एनआरसीला विरोध करण्याचे आमचे ध्येय पाषाणापेक्षाही कणखर आहे,आम्हाला कोणीही मागे हटवू शकत नाही.
आम्ही राष्ट्रहितासाठी मैदानात उरतरलो आहोत – सुमय्या नोमानी
सरकारच्या बोटचेपी धोरणामुळे आणि काळा कायदा जनतेवर थोपण्याच्या कारस्थानामुळे राष्ट्राची स्थिती बिघडली आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी होत आहे. सरकार या कायद्याच्या आडून देशाला भेडसावणाऱ्या प्रमुख मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष्य हटवू पाहात आहे.
स्वातंत्र्याचा मार्गदर्शक शाहीन बाग – डॉ. सलीम खान
डॉ. सलीम खान म्हणाले की या आंदोलनाद्वारे आम्ही सर्वजण यशस्वी होऊ. सरकारच्या धोरणांचा विरोध करणे म्हणजे बंड पुकारणे नसल्याचे न्यायालयाने आपल्या निवाड्यात म्हटल्याचे त्यांनी सांगितल निश्चितच शाहीन बाग आम्हाला स्वातंत्र्याचा मार्गदर्शक ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारने एनपीआर राज्यात लागू करू नये – तिस्ता सेटलवाड
तिस्ता सेटलवाड म्हणाल्या की आज आझाद मैदानात मुंबईकरांनी एक इतिहास घडविला आहे. खरे तर आम्हाला आझाद मैदानात महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीविरूद्ध सरकारला प्रश्न विचारण्यासाठी यायला हवे होते मात्र सरकारने या काळ्या कायद्याविरद्ध मैदानात येण्यास विवश केले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली की एनपीआर राज्यात लागू करू नये. देशातील १३४ कोटी लोकांपैकी फक्त ५८ टक्के नागरिकांकडेदेखील जन्माचा दाखला नाही. फक्त २५ टक्के लोकांकडे एलआयसीची पॉलिसी आहे आणि २५ कोटी लोकांकडे स्वत:चे घर आहे. एकदा आमच्या देशाचे दुर्दैवाने विभाजन झाले होते, आता पुन्हा अशी स्थिती आम्ही येऊ देणार नाही.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या वेळी, निदर्शकांच्या हाती ‘हम सब एक है’, ‘आय लव्ह इंडिया’ असे लिहिलेले पोस्टर होते. याआधीही ऑगस्ट क्रांती मैदानात अशा प्रकारे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळेसही मुस्लिम बांधव, अभिनेते जावेद जाफरी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी देखील आक्रमक पवित्र घेतला. मोदी-शाह बहुमत मिळाल्याचा गैरफायदा उचलत आहेत. त्यांनी नसते उद्योग करण्यापेक्षा मूलभूत प्रश्न सोडवावेत. हा कायदा त्यांना मागे घ्यावाच लागेल, असा आक्रमक पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला. आंदोलनकर्त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल ठाकरे सरकारचे आभारही मानले. देशाची तिजोरी रिती करू पाहाणारा, जाती किंवा धर्म भेदाला वाव देणारा, अल्पसंख्यांकांसह बहुजन आणि गोरगरिबांना वंचित ठेवणारा आणि शेजारील राष्ट्रांमधील विस्थापितांना नाकारणारा कायदा रद्द करावा, ही मागणी महामोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. एनपीआर, एनआरसी रद्द करण्यात यावे, सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही या मंचावरून करण्यात आल्या.
विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी राष्ट्रीय आघाडी’ने आझाद मैदान येथे महामोर्चा काढला होता. आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नायर, प्रदेशाध्यक्ष निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, अभिनेता सुशातसिंग राजपूत, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अॅड. राकेश राठोड, जमियत ए अहले हदीसचे अब्दुल जलील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अझिमुद्दीन, विद्यार्थी संघटनेचे शहरयार अन्सारी, जमियत उलमा ए हिंद महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी, एकता फोरम महिला विभागाच्या अध्यक्ष सुमय्या नोमानी, जमियत अहले सुन्नतचे अध्यक्ष मौलाना एजाज अहमद काश्मिरी, जमाअत ए इस्लामी हिंदचे केद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. सलीम खान, आझादनगर गणेश मंडळाचे अध्यक्ष नरसिंह तिवारी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या महिला प्रतिनिधी अॅड. फरहाना शाह व अॅड. रुबिया पटेल, खिश्चन मिशनरीचे प्रतिनिधी फादर डॉ. फ्रीजर, हरियाणाचे सामाजिक कार्यकर्ते अश्वीनी चौधरी, जमाअत ए इस्लामी हिंद मुंबई मेट्रोच्या महिला विभागाच्या अध्यक्ष मुमताज नजीर, जमियत उलेमा हिंद महाराष्ट्रचे मुफ्ती हुजैफा कासमी, मौलाना हलीमुल्लाह कासमी, वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कासिम रसूल इलियास, मुजतम ए उलेमा ओ खुतबाचे अध्यक्ष मौलाना पैâय्याज बाकीर, जमाअत ए इस्लामी हिंद मुंबई मेट्रोचे अध्यक्ष हसीब भाटकर, पंजाबी संघी सभाचे अध्यक्ष चरणजीत गोरा, मुंबई अमन कमिटीचे फरीद शेख, माहीम, हाजीअली दर्गाह ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खांडवानी, बौद्ध संघटनेचे अध्यक्ष भन्ते श्रीबोधी, पुनित शर्मा, मौ. खालिद अशरफ जिलानी आदी मान्यवरांनी परखड मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑल इंडिया उलेमा काउन्सिलचे सेव्रेâटरी जनरल मौलाना महमूद दर्याबादी आणि पर्सनल लॉ, मिल्ली काऊन्सिलचे मौलाना अथहर यांनी अत्यंत सूत्रबद्धरित्या पार पाडले.
मोर्चामध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत. मात्र या मोर्चामधील महिलांची संख्या लक्षणीय होती. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) महाराष्ट्रात एक मेपासून लागू करू नका, अशी मागणी या वेळी करण्यात आली. देशभरात सीएए कायदा, एनआरसी व एनपीआरविरोधात वातावरण आहे.
- शाहजहन मगदुम