Halloween Costume ideas 2015

सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत


२०२२ या सरत्या वर्षाला आपण निरोप देत असतांनाच २०२३ या नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली आहे.‌ ३१ डिसेंबर हा मावळत्या वर्षाचा अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण आतुरलेले असतात. त्याकरिता अनेक जण जय्यत तयारी ही करतात. ३१ डिसेंबरची मध्यरात्र म्हणजे जणू काय आपला तो सणच आहे आणि तो धुमधडाक्यात साजरा केलाच पाहिजे, असे वातावरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. ३१ डिसेंबर हा दिवस  खाण्यापिण्याचा आणि नाचगाणी करण्याचा दिवस असे सर्वांनाच वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरातील हमरस्त्यावर डोळे दिपवून टाकणारी रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई पहायला मिळते. रात्रीच्या अंधाराला पिटाळून लावणारी आणि आसमंत उजळून टाकणारी नयनरम्य आतषबाजी ही यानिमित्ताने पहायला मिळते आहे. या सर्व बाबींचा फायदा घेण्यासाठी लहानमोठी हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, क्लब, धाबे  तयारीत असतात. जणू लगीनघाई सुरू झाली आहे व येणारे ग्राहक आपले पाहुणे आहेत, त्यांना जास्तीतजास्त सुखकर कसे वाटेल या दृष्टीने त्यांची जय्यत तयारी असते.

आधुनिकतेचे वारे प्यालेल्या  तरुणाईने तर आनंद आणि हर्षोल्लास यांच्या मर्यादेचे कुंपण कधीच काढून फेकून दिलेले आहे. शुभेच्छा देण्यासाठी धर्माच्या, जातीच्या भिंती जमिनदोस्त झाल्याचे अलिकडच्या काळात प्रकर्षाने दिसून येते आहे. हल्ली सगळ्याच गोष्टींचा इव्हेंट होत चालला आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीत मनस्वी आनंद घेत रहायचं असंच सर्वांना वाटू लागले आहे.‌ यातही दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेभरवशाच्या दैनंदिन जीवनात  सामान्यांच्या वाट्याला आनंद येतोच कुठे, असा प्रश्न आमच्या सारख्या अनेकांना आता वाटू लागला आहे. आनंदाचे क्षणच हल्ली दूर्मिळ झाले आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या तडाख्याने आधीच पिचलेल्या जनतेचा सर्वच पातळ्यांवर  विश्र्वासघात झाला आहे, आर्थिक आघाडीवर सर्वच बाबतीत सामान्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. त्यातच महागाई आणि बेरोजगारी यांसह दैनंदिन जीवनात असंख्य प्रश्नांना सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागत आहे. देशाची अर्थव्यवस्था मरणासन्न अवस्थेत गेली आहे, असा अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षितता सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जनतेची अक्षरशः कुतरओढ चालली आहे. महागाई तर गगनाला भिडली आहे.भ्रष्टाचार आणि त्यातून वाढत जाणारा काळापैसा यांचे काळेकभिन्न भूत सर्वसामान्यांच्या डोक्यावर बसलेलंच आहे. गुंड, मवाली, खंडणीबहाद्दर, मटका बुकी, लूटमार करणारे, भुमाफिया, दरोडेखोराकडून दिवसाढवळ्या सामान्यांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत, सरकारच्या दररोज बदलणाऱ्या नवनवीन धोरणांचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नोटाबंदीच्या काळात सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले. एक ही बडा‌ भांडवलदार अथवा राजकीय नेता नोटा बदलण्यासाठी बॅंकेच्या दारात दिसला नाही.सामान्यांचे मात्र उन्हातान्हात नोटा बदलून घेण्यासाठी खूपच हाल झाले.

२०२२मध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपच्या सहकार्याने‌ शिवसेनेचा गड नेस्तनाबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ४०आमदार फोडून लिलया आपली सत्ता स्थापन केली, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या घडामोडींत सिंहाचा वाटा असुनही त्यांना अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पडले. अर्थात सर्वोच्च न्यायालयात या सतांतराचे पुढे काय होणार, हे सिध्द व्हायचे आहे.मात्र संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असल्याने आणखी काय काय वाढून ठेवले आहे,असा प्रश्न ही सामान्यांच्या मनात उत्पन्न झाला आहे.

आज राज्यासमोर बेरोजगारीचे संकट ही भयावह आहे.तरूण पिढीला व त्यांच्या हाताला काम दिले नाही,तर ही शक्ति विघातक कृत्य करण्यास धजावेल, ही सुद्धा भिती मनात वाटत आहेच. चंगळवादी आणि भोगवादी संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस द्रूत गतीने वाढत आहे.त्यामुळे संपूर्ण सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे.

या सर्व अंतर्गत व बाह्य वातावरणात प्रत्येक जण तात्पुरता का असेना, पण आनंद शोधतो आहे. सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत ही सामान्यांसह सर्वांनाच आता आनंदाची पर्वणी वाटू लागली आहे.आधीच आपल्या देशातील जनता उत्सवप्रिय आहे. त्यामुळेच ३१ डिसेंबर हा दिवस वेगळ्या अर्थाने साजरा केला जातो आहे. तो एक "इव्हेंट"झाला आहे.

वास्तविक जीवनात अखंड चैतन्य निर्माण व्हावे, असा आशावाद निर्माण व्हावा यासाठी असे इव्हेंट साजरे करायला ही आपल्याला हरकत असायचं कारण नाही. मात्र जगातील विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशाची सर्वच क्षेत्रातली पिछेहाट बघितली तर असे चंगळवादी- भोगवादी इव्हेंट साजरे करावेत का,असा प्रश्न उपस्थित होतो.असे इव्हेंट साजरे करणे आपल्याला परवडणारे आहे का, याचा सर्वांनी एकत्र येऊन विचार करायला हवा.

माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन ए.पी.जे.अब्दूल कलाम यांनी १९९८ साली लिहिलेल्या "इंडिया २०२०: व्हिजन फाॅर द न्यू मिलेनियम" या पुस्तकात देशात आगामी २० वर्षात कोणते बदल होणे आवश्यक आहे याचा लेखाजोखा मांडला होता, २०२०ला भारत महासत्ता होणार, असा आशावाद ही व्यक्त केला होता. मात्र गेल्या २० वर्षांपासून कलामांनी "व्हिजन डॉक्युमेंट"मध्ये पाहिलेला स्वप्नातील भारत आपण घडवू शकलेलो नाही, हे वास्तव आपल्याला स्विकारावेच लागते आहे. तरीही असले इव्हेंट साजरे कसे काय करू शकतो?, असा प्रश्न ही सर्वसामान्यांच्या मनात येत नसेल का,? याचे राहुन राहुन आश्र्चर्य वाटते.

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीने हाहाकार माजवला, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,काहींचे जीवन तर पावसाच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले, या अस्मानी संकटामुळे अनेकांचे होत्याचं नव्हतं झालं.आज ही समाजातील फार मोठा वर्ग या पूरपरिस्थितीने इतक्या गाळात रुतला आहे की त्याला अजून बाहेर पडता येईना, त्यातच कोरोनामुळे अनेक देशांबरोबर आपली ही कशी भयावह अवस्था झाली ते आपण पाहतोच आहे. मायबाप सरकारने धार्मिक मेणबत्त्या लावून थाळ्या वाजवून जो इव्हेंट केला, त्याचे पुरते हासे झाले आहे ते ही आपण पाहीले आहे, वास्तविक जनतेला अशा इव्हेंटमधून खरोखरच आधार देण्याचं काम झालं का? आरोग्य राखण्यासाठी प्राधान्य देताना या संकटग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले आहेत का? असे प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे लक्ष न देता 'अच्छे दिन' आणि 'शायनिंग इंडिया' सारख्या फसलेल्या इव्हेंटमधून सर्वसामान्य जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही, हे वास्तव भारतीय जनतेच्या समोर असतांनाच येणा-या नव्या वर्षात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे, हे खरेखोटे चित्र पसरविले जात असतानाच आणखी सर्वसामान्य जनतेच्या समोर काय काय वाढून ठेवले आहे,अशी शंका मनात घेऊनच नव्या वर्षाचं स्वागत करायला लागणार आहे, हे खरंच...!

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील करवीर काशी साप्ताहिकाचे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget