प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एकूण जीवनप्रवासात “भूके को खाना खिलाव” हे ब्रीदवाक्य आजपर्यंत सर्वत्र पाळले जात आहे. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे कोरोना महामारीतील लॉकडाऊन काळ! त्या जागतिक समस्येसमोर संपूर्ण जग एकवटले गेले. अन्न आणि औषधे हीच त्या काळातील आवश्यक बाब होती. सर्वधर्मसद्भाव ह्याचे सजीव उदाहरण म्हणजे कोविड काळ होय! सेहरी आणि इफ्तार या कालावधीत रोजा राखला जातो. म्हणजेच उपवास हा जगण्याचा एक सन्मार्ग होय.
रमजानचे एकूण २९ किंवा ३० रोजे पाळण्याचे कारण त्यामुळे रोजेदार आत्मविश्वास मिळवण्यासाठी म्हणून जे चिंतन करतो ज्यामुळे जीवन जगण्याचा मार्ग सुकर कसा असावा? त्यासाठी प्रयत्न करतो. जे-जे कुणी त्रस्त असतील, निर्धन असतील, शारीरिक व्याधीमुळे निराश असतील अशा दुःखी लोकांना जगण्याची एक उमेद देण्याची शक्ती ह्याच मुबारक महिन्यात मिळवली जाते. द्वेष नको, क्रोध नको, घृणा नको, अहंकार नको, स्वस्तुती तर नकोच नको... जी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष अल्लाहसमोर नतमस्तक होते, तिला विधात्याने निर्माण केलेल्या ब्रह्मांडात असलेल्या सुखसोयी सहज प्राप्त होतात. जे प्राप्त झाले त्याचे मनस्वी आभार व्यक्त करणे आणि ज्याची अपेक्षा असेल त्यासाठी अल्लाहकडे दुआ मागणे, ही एक प्रकारची सहज शक्य होऊ शकेल अशी मागणी आहे. पूर्ण विश्वास त्यामुळे जगणे सहज शक्य होते.
ईमान हा मानवी जीवनातील संस्कारित भाव होय! जन्म झाला त्या पालकांच्या पंखा खाली जगण्याची उमेद मिळते. जन्म अमुकच एका धर्मात का झाला असावा? याला उत्तर काय असावे? मात्र संस्कारित जीवन जगण्यासाठी म्हणून जे धर्मपंडित, मौलवी, पाद्री व इतर धर्मगुरू अभ्यासक मार्गदर्शन करतात त्यात माणूस जगतो. जगात अनेक धर्म अवतरले. त्यासोबत धार्मिक पवित्र ग्रंथ सुद्धा आले. धर्मगुरूंनी ज्यांना जसजशी शिकवण दिली, तसतसा त्या व्यक्तीचा वैचारिक विकास शक्य होऊ लागला. व्यक्ती कितीही धार्मिक उपासक असो, त्याने इतर धर्मियांचा मान राखणे आवश्यक आहे. अशा कितीतरी हदीस किंवा हिकायती आहेत ज्यामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कदापि कुणालाही आग्रही केले नाही. प्रेषितांना माणूस प्रिय असे. जगण्याची त्यांची प्रथा किंवा पद्धत याचे त्यांच्या अनुयायी जाणकारांनी कायम नीट निरीक्षण केले. असेच का? त्याची माहिती घेतली. नबुवत म्हणजेच प्रेषित त्यांचीच अल्लाहने निवड का केली असावी? कारण माणूस म्हणून समाजात कसे जगावे ? ह्याचे पालन ते स्वतः जबाबदार म्हणून करत असत. वेळेवर नमाज अदा करणे, खोटे बोलू नये. त्रास होईल असे आचरणात येता कामा नये.
इस्लाम धर्म गोरगरीब लोकांच्या मदतीस कायम पुढे राहणारा असा धर्म होय. गरिबांसाठी अन्नदान करणे, कपडे परिधान करून त्यांनाही ईदच्या खुशीमध्ये सामावून घेणे. ही महत्त्वाची माहिती सर्वांना आहे. शरीर कितीही सशक्त असू दे, मनाचा सशक्तपणा हीच खरी दिव्य शक्ती होय. आत्मविश्वास मिळवण्यासाठी म्हणून माणूस श्रद्धेकडे वळतो. भरकटलेल्या विचारांना सन्मार्गावर आणायचे असेल तर माणसाने आध्यत्मिक शक्तीकडे वळणे आवश्यक आहे. अध्यात्म एक अस्त्र आहे स्वतःच्या गुणावगुणावर अंकुश ठेवण्यासाठी!
जगात अनेक धर्म आहेत. त्या सर्वांची शक्ती आहे ती अध्यात्म! प्रथम स्वतःशी बोला नंतर जगाचे ऐका. “ज्यांस स्वच्छता राखायची असेल त्याच्या मनी घाणीविषयी तिटकारा असता कामा नये,” असे गांधीजी म्हणायचे. अपराध, अश्लीलता, अहंकार, द्वेष असे अनेक मानवी वैचारिक विकार आहेत ज्यांवर एकमात्र उपाय म्हणजे अध्यात्म होय. धर्म ही एक संकल्पना आहे. शरीर धर्म, मानसिक धर्म, कुटुंब धर्म अशा या व्याख्या आहेत धर्माच्या. इस्लाम हा एक परिपूर्ण धर्म होय, ज्याची स्थापना साडेचौदाशे वर्षांपूर्वी आखाती वाळवंटात झाली. नबुवत मिळणे हा अल्लाहचा आदेश होय.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे अनुभवले त्यांत ईश्वरी संदेश होता तो म्हणजे सिजदा! एकेश्वराचा आग्रही संकेत! होय स्वतःविषयीचा फसवा अहंकार. या जगी कुणीही पूजक नाही. जो जन्मला त्यास कर्म हाच एक मार्ग होय. स्वपूजक स्वस्तुती हे मानसिक रोग आहेत त्यावर अंकुश मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती. त्याच भावनेतून रोजा ही एक उपासना ठरली. माहे रमजान हा उपवासाच्या माध्यमातून दिव्यतेकडे नेणारा पवित्र महिना होय. तकवा, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामी आज्ञेतील रोजा यांस पर्याय नाही. सशक्त स्त्री-पुरुष आणि मुले या सर्वांनी माहे रमजानमध्ये रोजा पाळणे अत्यावश्यक आहे. अन्न तर नाहीच, पाण्याचा थेंबही न घेता पूर्णपणे उपाशी राहणे आवश्यक आहे. प्रेषितांनी ते प्रथम स्वतः केले व नंतर इतरांनी त्याचे अनुकरण केले. आजही ते सुरू आहे.
इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टच्या वतीने प्रकाशित मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी लिखित एका पुस्तकातील परिच्छेद येथे देऊ इच्छितो... “प्रेषित असे सांगताहेत, “मी एक मनुष्य आहे. तुमच्यासारखाच मनुष्य. माझ्याजवळ माझे स्वतःचे असे काहीच नाही. सर्व अल्लाहचे आहे व अल्लाहनेच दिले आहे. या वाणीसारखी दुसरी वाणी नाही. ही माझ्या बुद्धीची उपज सुद्धा नाही. या वाणीचा शब्दन् शब्द अल्लाहकडून माझ्याकडे आला आहे. जे अवतरित होते अल्लाहकडून, तेच मी तुम्हांस सांगतो. “
रोजा (उपवास) अल्लाहने सर्व मुस्लिमांसाठी अनिवार्य केला आहे. हा एक आदेश आहे. जेणेकरून सर्वांनी एकत्रितपणे रोजा करावा. स्वेछेनुसार त्यांत कदापि कसलाही बदल होऊ शकत नाही. ही आग्रही भूमिका एवढ्यासाठीच की प्रत्येक रोजेदाराचे ईमान म्हणजेच श्रद्धा एकाच ईश्वरी शक्तीवर असावे. त्यात मनसोक्त बदल होऊ नयेत, हीच खरी शिकवण आहे.
संपूर्ण रमजान महिन्यांत घरचे तसेच सामाजिक वातावरण पवित्र असावे, भक्तिमय असावे तसेच एकाच वेळेस अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे! मनाचे पावित्र्य जपणे तसेच प्रलोभनांपासून अलिप्त राहणे, मालमत्ता, दागदागिन्यांच्या अहंकारातून मुक्त होणे. असे अनेक आध्यत्मिक फायदे एका रोजामुळे होत आहेत. ईमान आणि त्याची जाणीव तसेच वैर आणि दोषमुक्त जगण्याची संधी माहे रमजान देऊ शकतो, अशा या पवित्र मासाचे आपण सर्वांनी स्वागत करू या.
इकबाल शर्फ मुकादम
(मो.नं.: 99206 94112)
Post a Comment