Halloween Costume ideas 2015
March 2024

वनस्पतींमधील दानधर्माचा गुणविशेष


माणूस आज आपल्या धावपळीच्या युगात खूप स्वार्थी झाला आहे. आहे त्यात समाधान मानणे सोडून अधिकाधिक कमावण्याचे वेड त्याला लागले आहे. या स्वार्थीपणात तो दानधर्म करणे सुद्धा विसरून गेला आहे. आपल्याकडे जे आहे त्यात दुसऱ्याचाही वाटा आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. ही जाणीव आपल्याला वनस्पती करून देतात.

वनस्पतींच्या वर्गीकरणात सर्वात विकसित गट आवृत्तबीजी वनस्पतींचा आहे. बिया येणे हा त्यांचा सर्वात मूलभूत गुणधर्म आहे. वनस्पतीच्या खालच्या स्तरातील म्हणजे ज्यांना बीज येत नाहीत, अशा वनस्पती आपल्या मर्यादित क्षेत्रातच पसरतात. मात्र आवृत्तबीजी वनस्पतींनी फुला-फळांच्या विकासामुळे आपला बीजप्रसार झपाट्याने वाढण्याचे गुणधर्म अंगीकारले.

फळांचाही इतिहास फार मनोरंजक आहे. या बियांचा प्रसार व्हावा यासाठी हवा, पाणी यांसारख्या अजैविक घटकांसोबत प्राण्यांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे.  प्रकाश-संश्लेषणात तयार झालेले अन्न अधिकाधिक प्रमाणात साठवण्यासाठी आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये फळांची उत्क्रांती करण्यात आली. जेणेकरून या फळांच्या शोधात शाकाहारी प्राणी वनस्पतींपर्यंत पोहोचतील आणि त्यामध्ये लपलेली बीजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातील. कालांतराने या फळांचा आकार काही वनस्पतींमध्ये वाढत गेला तर काही वनस्पतींमध्ये कमी होत गेला.

आंबा, पपई, टरबूज यांसारख्या फळाचा आकार मोठा तर शेंगा, तेलबिया, मेवे आणि तृणधान्य पिकांची फळे हे छोट्या आकारात विकसित झाली. मोठ्या फळांचा गोड आणि मधाळ गर प्राण्यांना आकर्षित करतो तर ज्या फळांना गर नसतो त्यामध्ये बियांची संख्या अधिक प्रमाणात असते जेणेकरून या बियांचा वापर अन्न म्हणून केला जावा आणि त्यातील काही बिया पूणर्उत्पादनासाठी प्राण्यांमार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जाव्यात.

मानवी विकासात जेव्हा शेतीचा समावेश झाला तेव्हा नैसर्गिकरित्या बियाणांचा होणारा प्रसार मानव करू लागला आणि अशा पिकांची लागवड होत होती ज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन व्हावे. माणूस जेव्हा एक बी पेरतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की त्याच्या एका बीपासून जास्तीत जास्त उत्पादन व्हावे आणि या बीयांमध्येही जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता निसर्गनिर्मात्याकडून ठेवलेली आहे.

वनस्पती आपल्या बियांच्या प्रसारासाठी अधिकाधिक उत्पादन देऊन आपले कार्य पूर्ण करतात. एका श्रद्धावंताला आपल्या श्रद्धेची ग्वाही देताना आपल्या जवळील संपत्ती सत्कार्यात खर्च करावी लागते. पेरलेल्या बियांच्या ७०० पटीने जसे धान्य परत मिळते तसेच सत्कार्यात खर्च केलेली मालमत्ता ७०० पटीने परत मिळण्याची खात्री कुरआनने अध्याय अल्-बकराच्या २६१ व्या आयतीमध्ये दिली आहे.

"जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, त्यांच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जसे एक बी पेरली जावी आणि तिच्यातून सात कणसे यावीत आणि प्रत्येक कणसात १०० दाणे असावेत. अशाच तऱ्हेने अल्लाह ज्याच्या कृतीला इच्छितो त्याला समृद्धी प्रदान करतो. तो उदारहस्त देखील आहे आणि जाणणारा सुद्धा."

जितकी निष्ठा आणि सखोल भावनेसह मनुष्य अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करेल तितका जास्त मोबदला त्याला अल्लाहकडून प्राप्त होत जाईल. जो अल्लाह एका बिजामध्ये इतकी समृद्धी देतो की ज्यामध्ये ७०० बीया तयार होतात त्या अल्लाहसाठी अशक्य नाही की तुमच्या दान देण्यालाही तितकेच जास्त मोबदल्यात वाढवावे. अट फक्त एवढी आहे की तुमची श्रद्धा आणि दान देण्याची भावना.

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६



रमजानमध्ये रोजे ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड असते पण जकात देणाऱ्यांची संख्या तेवढी नसते. जकात देण्याएवढी आर्थिक परिस्थिती भक्कम असूनही अनेक लोक एक तर जकात देत नाहीत किंवा दिली तरी तंतोतंत हिशेब करून देत नाहीत. हिशेब करून दिल्यास जास्त पैसा द्यावा लागेल याची त्यांना भीती वाटत असते. सर्वात मोठा त्याग आर्थिक त्याग असतो. हा त्याग करण्याचे धाडस सगळ्याच साहेब-ए-निसाब लोकांमध्ये असतेच असे नाही. जकात एक अनिवार्य आर्थिक इबादत आहे. 

कुरआनमध्ये किमान 32 ठिकाणी नमाज कायम करण्याबरोबर जकात देण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. यावरून ईश्वराच्या नजरेमध्ये ज़कात किती महत्त्वाची आहे याचा अंदाज वाचकांना येवू शकतो. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडित व साधु-संन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जे सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने आणि चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजू आणि पाठींना, डागले जाईल - हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.’’ (कुरआन : सूरह अत्तौबा 9: आयत नं. 34-35)

वरील आयत कुठल्याही श्रद्धावान व्यक्तीचा काळजाचा थरकाप उडविण्यासाठी पुरेशी आहे. संपत्तीचा मोह माणसाला सोडवत नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा फरमाविले होते की, संपत्तीची भूक माणूस जेव्हा थडग्यात जातो तेव्हाच शमते. माणसाला एका डोंगराएवढे सोने जरी प्राप्त झाले तरी तो दुसऱ्या डोंगराएवढ्या सोन्याची अपेक्षा करेल. आज आपण पाहतो की, अनैतिक मार्गाने अमाप संपत्ती गोळा करून देखील लोकांची पुन्हा संपत्ती गोळा करण्याची भूक काही केल्या कमी होत नाही. नुकताच अंबानी परिवारामध्ये अनंत अंबानी यांचा लग्नपूर्व सोहळा पार पडला. त्यात संपत्तीची किती विभत्सपणे लूट करण्यात आली हे जगाने पाहिले. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये काही लोकांकडे त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त संपत्ती जमा होते. तर बहुतेक लोकांकडे त्यांच्या गरजेपेक्षा खूपच कमी संपत्ती हातात येते. त्यामुळे जे सामाजिक असंतुलन निर्माण होते तेच अन्याय, अत्याचार आणि गुन्हेगारीला जन्म देत असते. जकात देणे किती जीवावर येते याचे सर्वात मोठे उदाहरण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या निधनानंतर समोर आले होते. अरबस्थानामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी जकात देण्यास नकार दिला होता. तेव्हा प्रथम खलीफा हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी त्यांच्याशी युद्ध करून जकात वसूल केली होती. 

जकातीचे महत्त्व

जकात सन 2 हिजरीमध्ये अनिवार्य करण्यात आली. जकात देण्यास इन्कार करणारी व्यक्ती मुस्लिम राहत नाही तर तिचा समावेश काफिरां (इन्कार करणाऱ्या) मध्ये होतो. जकात या शब्दाचा अर्थ वाढ तसेच स्वच्छ करणेे असा होतो.

’’ज्या लोकांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले आहे, आणि मग ते कंजूषपणाने वागतात तर त्यांनी या भ्रमात राहू नये की हा कंजूषपणा त्यांच्यासाठी चांगला आहे. नव्हे, हे त्यांच्याकरिता अत्यंत वाईट आहे. जे काही ते आपल्या कंजूषपणाने गोळा करीत आहेत तेच पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील जोखड बनतील. पृथ्वी व आकाशांचा वारसा अल्लाहकरिताच आहे, आणि तुम्ही जे काही करता अल्लाह त्याबाबत सर्वज्ञ आहे. ’’ (सूरह आलेइमरान 3: आयत नं. 180)

एकंदरित जकात ही अत्यंत महत्त्वाची आर्थिक इबादत आहे आणि यावरच समाजाचे आर्थिक स्वास्थ्य अवलंबून आहे. ज्यांचा अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर विश्वास आहे त्यांनी या गोष्टीची मूळीच चिंता करू नये की, जकात दिल्याने त्यांच्या संपत्तीमध्ये घट होईल. अल्लाहने स्वतः फरमाविले आहे की, मी तुमची अशा ठिकाणाहून मदत करेन ज्याची तुम्हाला कल्पनासुद्धा असणार नाही. रमजानमध्ये जकात काढण्याचा आपल्या सर्वांचा परिपाठ आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही. अल्लाहवर विश्वास ठेवून आपण सर्वजण अगदी काटेकोरपणे जकात काढूया. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, ’’ आम्हा सर्वांना वेळेवर जकात अदा करण्याची समज आणि धाडस दे, आमीन.’’


- एम. आय. शेख

लातूर



पॅलेस्टाईन आणि इजराईल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला, युद्ध म्हणणे हेच चुकीचे आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इजराईलच्या एका संगीत महोत्सवावर हल्ला केल्याने जे काही लोक मारले गेले त्याला निमित्त करून इजराईलने पॅलेस्टीनी लोकांचा जो नरसंहार सुरू केला आहे तो एकतर्फी आहे. 105 दिवस संपल्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये या आठवड्यात या संदर्भात एक वांझोटा का असेना युद्धबंदी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला अमेरिका वगळता बाकी 14 सुरक्षा परिषदेतील देशांनी पाठिंबा दर्शविला. अमेरिकेने अलिप्त राहणे पसंद केले. यापूर्वी तीन वेळा आलेले प्रस्ताव अमेरिकेने वेटो केले होते म्हणून प्रस्ताव मंजूर झालेले नव्हते. यावेळेस मात्र तो तटस्थ राहिल्यामुळे प्रस्ताव मंजूर झाला. अमेरिकेच्या या तटस्थतेच्या धोरणाकडे पाहून नेतनयाहू यांचा जो जळफळाट सुरू आहे ते पाहता अमेरिकन प्रशासनाने स्वतःहून घोषणा केली की हा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला तरी तो मान्य करण्यास इजराईल बाध्य नाही. यावरूनच या प्रस्तावाची किंमत काय हे सहज लक्षात येते. 

या प्रस्तावामुळे फक्त एका गोष्टीचा अंदाज येतो की, इजराईल विषयी जो बायडन यांचा संयम समाप्त होत आहे. जो बायडन यांचा संयम समाप्त होण्यामागे तीन कारणे आहेत. एक इजराईलचा अभूतपूर्व अत्याचार, ज्याकडे पाहून जागतिक जनमत अमेरिकेविरूद्ध होत आहे. दोन येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांच्या इजराईल समर्थनामुळे नाराज होवून मतदार त्यांच्या विरोधात जावू शकतील. तीन मध्यपुर्वेतील तेलसंपन्न जुन्या मित्रांमध्ये पसरत असलेली तीव्र नाराजी.

1948 साली स्थापना झाल्यानंतर इजराईल विरूद्ध संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये एखादा प्रस्ताव पारित होण्याची ही पहिलीच घटना आहे. फक्त एवढेच या युद्धबंदी प्रस्तावाचे महत्त्व आहे. गझा आणि वेस्ट बँकमध्ये जी कार्पेट बाँबिंग इजराईलने केलेली आहे ती पाहता गझा हे राहण्यासाठी योग्य ठिकाण राहिलेले नाही, एवढे मात्र नक्की. आंतरराष्ट्रीय मीडिया जरी 30 हजार पॅलेस्टीनियनचा मृत्यू झाल्याचे सांगत असला तरी या आकड्याला कुठलाच आधार नाही. रफा बॉर्डरवर आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक उभे असून, त्यापासून काही मीटर अंतरावर पॅलेस्टाईन मुले भुकेने तडफडून मरत आहेत तरी इजराईल मदत आत येवू देत नाही. एअर ड्रॉप केलेल्या मदतीचे कंटेनर अंगावर पडून अनेक पॅलेस्टीन लोक मरण पावलेले आहेत. या संबंधीचे जे व्हिडीओ एक्सवर येत आहेत ते पाहण्याचे धाडस होत नाहीये. या सर्व स्थितीला इजराईलपेक्षा अमेरिका जास्त जबाबदार आहेत एवढे मात्र नक्की.


जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील म्हणजेच आपल्या भारत देशातील लोकसभेच्या 2024 ला होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला आता  प्रसार माध्यमांतून सुरुवात झाली आहे, कधी नव्हे इतका यंदा  निवडणुकीचा माहोल सर्वत्र  दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून ही निवडणूकीच्या तोंडावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे, पक्षांतर बंदीचा कायदा असूनही कायद्याच्या पळवाटा शोधून आयाराम गयाराम संस्कृतीला ऊत आला आहे. निवडणुकीच्या काळात भरघोस आश्वासने देऊन निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांची घोर प्रतारणा केली आहे, सत्तेसाठी कायपण या वृत्तीने मतदारांची घोर फसवणूक झाली आहे. कोट्यवधी रुपयांची खोकी घेऊन एका रात्रीत पक्ष फोडून सत्तेत सहभागी होऊन बिनदिक्कतपणे आपणच कसे या देशाचे तारणहार आहोत हे दाखवण्याची अहमिका सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर खरी जबाबदारी ही ’मतदार राजा’वर आहे. लोकशाहीत संविधानाने प्रत्येकाला मताचा जो अधिकार दिला आहे,तो फारच मोलाचा आहे.   

मात्र सध्या इव्हिएम मशीन बद्दलच मोठ्या प्रमाणात शंका घेतल्या जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्य मतदार आपण दिलेल्या मताचे योग्य ते मुल्यमापन होणार की नाही, अशा द्विधा व शंकास्पद मनस्थितीत आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि संविधान पारीत करण्यात आले,  संविधानाने या देशात लोकशाही समाजव्यवस्था स्विकारली आहे, त्यामध्ये दर पाच वर्षाने निवडणूक ही प्रक्रीया अपरिहार्य झाली आहे, अर्थात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्या आवश्यक ही आहेत, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला ज्यांची वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बहाल केला आहे. मग तो गरीब असो, अगर श्रीमंत असो,स्त्री असो किंवा पुरुष असो, नोकरदार असो अथवा व्यावसायिक असो, सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित असो. दर 5 वर्षाने त्याला मतपेटीतून आपणांस हवा तो आणि तसा राज्यकर्ता निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.  मात्र अलीकडे या देशातील निवडणूका म्हणजे एक चिंतेचा व चिंतनाचा विषय झाला आहे. सामान्य पण सुसंस्कृत नागरिकांना या निवडणूका म्हणजे संकट वाटते आहे,  तर काहींना पैसे मिळवण्यासाठी संधी वाटते आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पासून ते देशातील लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम - दाम - दंड-भेद याचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे,या देशातील सामान्य माणूस भयग्रस्त झाला आहे, त्याला असुरक्षितता जाणवते, निवडणुका जवळ आल्या की, त्यातील काही अनिष्ट प्रकारामुळे सज्जन व सुज्ञ नागरिक निवडणुका पासून दूर राहणे पसंत करतात. राजकारणातील अनीती, दबंगगिरी,व भ्रष्टाचार इतका वाढला आहे की त्यामुळे सामान्य माणसाला जगणे दिवसेंदिवस कठीणच होतं चालले आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अर्थात संपूर्ण देशभरातून विविध माध्यमांतून ते आपल्या समोर येत आहे.

आपण ज्या विश्वासाने निवडून देतो ते बहुतांशी लोकप्रतिनिधी जनतेशी प्रतारणा करतात.ते निवडून येताच प्रामाणिक रहात नाहीत.ते मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून प्रचंड भ्रष्टाचार करतात. प्रशासनाला हाताशी धरून, गुंडांना अभय देऊन, लुच्चाना व बगलबच्चांना पाठीशी घालून ते भ्रष्टाचारातून मिळवलेल्या प्रचंड संपत्तीचे मालक बनतात.भूतकाळात तसेच वर्तमान काळातील अनेक आर्थिक घोटाळे याची साक्ष देतात. अलिकडच्या काळात ईडी, सीबीआय, आयटी या प्रशासकीय यंत्रणेने हे सर्व काळी कृत्ये सर्वसामान्य जनतेच्या समोर आणलेली आहेत.

गेल्या 74 वर्षातील वास्तव पाहीले असता संपूर्ण देशभरातून, बहुतांशी राज्यात दर 5 वर्षांनी ज्या निवडणुका होतात त्यामध्ये पुन्हा-पुन्हा तोच आणि तसाच अनुभव जनतेला येत आहे. स्वच्छ पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते, निरामय आरोग्य, आदर्श शिक्षण, यासारख्या मुलभूत सुविधा संपुर्णपणे उपलब्ध करुन देण्यात आजही अपयश आले आहे, कचरा उठाव, ड्रेनेज व्यवस्था, नद्या नाले, तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आलेली दिसते, पण हा पैसा योग्य त्याठिकाणी खर्च न होता लोकप्रतिनिधी आपल्या घशात घालतात, हे विदारक सत्य अनेकदा जनतेच्या डोळ्यासमोर आले आहे.पण या सत्ताधिशांसमोर कुणी ’ब्र,सुद्धा काढत नाहीत, हे वास्तव आहे.

         ते चोखतात आता, हाडे नव्या पिढीची ।

         अद्यापही दिलेला नाही, डकार त्यांनी ।।

या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. कारण आपण अशा खोट्या व भ्रष्ट उमेदवारांना निवडून देतो.या दैनंदिन जीवनातील वेदनांना व व्यथांना आपण मतदारच प्रथम जबाबदार आहोत.हे वास्तव नाकारता येणार नाही

या वेदनांना व व्यथांना संपविण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीना देशभरातून मतदानाचा अधिकार वापरून हकलून लावले पाहिजे. प्रामाणिक व चारित्र्यवान उमेदवारांना उभे करून निवडून आणले पाहिजे.अन्यथा आपले व आपल्या देशाचे आपणच नुकसान करणार आहोत, हे लक्षात ठेवा. खडतर प्रयासाने व परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य आणि भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संधी साधू,स्वार्थी व मतलबी, नैतिक अधःपतन झालेल्या व पाकीट संस्कृतीलाच महत्व देणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या बगलबच्चांना मतपेटीतून हक्क बजावून हकलून लावले पाहिजे. सेवाभावी, प्रामाणिक, नि:स्वार्थी व अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा व पाठबळ दिले पाहिजे. प्रचंड खर्चिक निवडणूकां हे देशापुढील संकट समजून निवडणूकीतील पावित्र्य जपले पाहिजे. चांगल्या व सज्जन लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपणच आपल्या जगातील आदर्श अशा लोकशाही समाजवाद मानणाऱ्या या देशाचे संरक्षण केले पाहिजे.खरं तर आपणच आपले पावित्र्य व नितीमुल्ये जपली पाहिजेत व हा देश वाचविला पाहिजे.अन्यथा रशिया, चीन या देशातील लोकशाहीचा गळा दाबून सत्ताधीश जसे हुकुमशाही राबवत आहेत, तशीच बिकट परिस्थिती आपल्या देशात यायला वेळ लागणार नाही. अत्यंत कष्टाने, असिम त्यागाने, आणि हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलीदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, ते टिकवण्यासाठी निवडणूकीतील नीतीमुल्ये व पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येकांनी कंबर कसण्याची गरज आहे. 


- सुनिलकुमार सरनाईक, कोल्हापूर

भ्रमणध्वनी : 9420351352, 

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)


सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी


मुंबई (शोधन प्रतिनिधी)

21 मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) या विद्यार्थी संघटनेने भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याण यांना प्रभावित करणाऱ्या गंभीर समस्यांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले.  यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. रोशन मोहिद्दीन आणि एस. आई. ओ. अध्यक्ष साऊथ महाराष्ट्र ऐहतेशाम हामी खान आणि सेक्रेटरी मुसद्दीक यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि जाहीरनाम्यातील मुद्द्यांचे विश्लेषण केले.

या जाहीरनाम्यामध्ये सकल विद्यार्थी समुदायाच्या अशा मागण्यांचा समावेश आहे ज्यांना एसआयओ 2024 च्या संसदीय निवडणुकीत मुख्य मुद्दे बनवू इच्छिते.  विद्यार्थ्यांचा जाहीरनामा खालील क्षेत्रांवर प्रकाश टाकतो:

1.न्याय्य आरक्षण: सर्वांना संधी सुनिश्चित करण्यासाठी योग्य आणि न्याय्य आरक्षण प्रणाली लागू करणे.

2.सामाजिक- आर्थिक मागास जिल्ह्यांकडे विशेष लक्ष: समतोल विकासासाठी उपेक्षित प्रदेशांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करणे.

3.रोहित कायद्याची अंमलबजावणी:  विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे.

4. MANF  पुनःस्थापित करा आणि अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती वाढवा. शिक्षणाच्या समान प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.

5. भेदभाव विरोधी कायदा: भेदभाव आणि पक्षपात मुक्त समाजासाठी प्रयत्न करणे.

6. कठोर वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा आणि      

7.गोपनीयता चार्टर : व्यक्तींची गोपनीयता आणि माहिती सुरक्षित करणे.

8.पर्यावरण आणि शाश्वत निधी - 1000 कोटी : पर्यावरणीय उपक्रम आणि शाश्वत पद्धतींसाठी समर्पित करणे. 

9.संपूर्ण भारतातील तरुणांसाठी आरोग्य आणि मानसिक आरोग्य केंद्रे : तरुणांच्या सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देणे. 

10.प्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करणे: सर्वांसाठी सुलभ शिक्षणाची वचनबद्धता. 

11.तरुणांसाठी रोजगार हमी कायदा: देशातील तरुणांसाठी नोकरीची सुरक्षितता आणि संधींचा मार्ग मोकळा करणे. आदी प्रमुख मागण्यांचा जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे. 

या पत्रकार परिषदेत, डखज चे प्रतिनिधि भारताच्या शैक्षणिक परिदृश्यातील चिंताजनक ट्रेंडबद्दल बोलताना म्हणाले की, एकूण साक्षरता दर 74.04% असूनही तो जागतिक सरासरी 86.3% च्या खाली आहे, अनेक राज्यांचे साक्षरता दर राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी आहेत.

केंद्राने धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक योजना बंद केल्या, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यक्रमांवरील खर्च कमी केले आणि अर्थसंकल्पातील शैक्षणिक वाटा जीडीपीच्या 2.9% पर्यंत कमी केले जो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे निर्धारित 6% दरापेक्षा खूप कमी आहे. याबद्दल राष्ट्रीय सचिव डॉ. रोशन मोहिद्दीन यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भारताच्या ॠऊझ वाटपाच्या 2.1% आणि जपान, कॅनडा आणि फ्रान्स सारख्या देशांमधील अंदाजे 10% वाटप यामधील स्पष्ट फरकाकडे लक्ष वेधले.

बेरोजगारी ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे.  संसदेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की 1 मार्च 2023 पर्यंत मंत्रालयांमध्ये सुमारे 10 लाख पदे रिक्त आहेत.  मात्र, विद्यापीठे आणि मंत्रालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत सरकार गंभीर नाही.  चाचण्या आणि निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुस्लीम विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गळतीचे भयावह प्रमाणाला संबोधित करताना, डॉ. रोशन मोहिद्दीन यांनी यावर जोर दिला की वस्तुनिष्ठ अभ्यास संस्थेने मुस्लिम विद्यार्थ्यांच्या गळती दर 23.1% इतका नोंदवला, जो राष्ट्रीय सरासरी 18.96% पेक्षा जास्त आहे.  मुस्लिम विद्यार्थ्यांचा प्रवेश दर 2019-20 मध्ये 5.5% वरून 2020-21 शैक्षणिक वर्षात 4.6% पर्यंत घसरला.  व्ही-डेम संस्थेने तयार केलेल्या शैक्षणिक स्वातंत्र्य निर्देशांकात 179 देशांमध्ये भारताच्या तळाच्या 30% मधील स्थानाचा उल्लेख करत डॉ. रोशनने शैक्षणिक स्वातंत्र्याच्या ऱ्हासावरही प्रकाश टाकला. त्यांनी मानसिक आरोग्याच्या संकटावरही गंभीर चिंता व्यक्त केली. 15 ते 30 वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आत्महत्त्या असल्याचा राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालात समोर आले आहे. दर 42 मिनिटांनी सरासरी 34 विद्यार्थी आपला जीव घेतात. अम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ऊजढज डेटाबेसचा हवाला देऊन, द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या वाढीकडे लक्ष वेधले, जीवांचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक भेदभावाचा सामना करण्यासाठी त्वरित लक्ष देण्याची विनंती केली.

विद्यार्थी आणि तरुण हा या देशातील सर्वात मोठा मतदारवर्ग असून राजकीय पक्षांनी मते मागताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची हमी दिली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.  ते पुढे म्हणाले की, हा जाहीरनामा राजकीय पक्षांना देशाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आहे. 

भारतीय विद्यार्थी आणि तरुण पोकळ आश्वासने किंवा फुटीरतावादी राजकीय अजेंडांमुळे विचलित होणार नाहीत त्याऐवजी ते दर्जेदार शिक्षण, रोजगार, शांतता आणि सुरक्षित वातावरणाची हमी देणाऱ्या ठोस निवडणूक जाहीरनाम्यांची जोरदार मागणी करतात.



बालपणी रमजान म्हणजे रोजांचा महिना एवढेच माहित होते. थोडं कळायला लागल्यावर रोजासोबत पाचवेळेसची नमाज अदा करणेही अनिवार्य आहे हे माहित झाले. पण रमजान महिन्याला एवढे महत्त्व का आहे? आणि रमजानमध्ये कुरआन का वाचले जाते हे कळायला खूप वेळ लागला. जमाते इस्लामी हिंद शी संलग्न झाल्यानंतर रमजानचे महत्त्व उलगडले गेले. भारतात जमात-ए- इस्लामी हिंद एक एकमेव अशी जमात आहे जी इस्लामची खरी संकल्पना कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात उलगडून दाखविते. काही कमी जास्त न करता अगदी अचूकपणे ही कल्पना स्पष्ट करते. माझी सगळ्यांना विनंती आहे की, या सामाजिक सुधारणेच्या संस्थेशी किंबहुना आंदोलनाशी स्वतःला जोडून घ्यावे. जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुरआन व हदीसच्या प्रकाशात मार्गदर्शन करते. रमजानचा शाब्दीक अर्थ आहे जाळणे (टू बर्न) रमजानमध्ये पाप जाळले जातात. अल्लाहची भक्ती करून व इच्छा, आकांक्षानाही जाळले जाते. वैज्ञानिक दृष्टीने बघितल्यास रोजामुळे कॅलरीज बर्न होतात. रमजानचे महत्त्व कुरआनमुळे आहे. याच महिन्यात शब-ए-कद्र येते. याच रात्री कुरआनच्या अवतरणास सुरूवात झाली व त्यानंतर 23 वर्षाच्या कालावधीत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हृदयावर कुरआनच्या आयाती हळूहळू अवतरित झाल्या व ह्या एकत्रित आयातींचेच नाव कुरआन आहे जे सर्व मानवजातीच्या प्रशिक्षण आणि कल्याणासाठी पुरेसे आहे. 

कुरआनमुळे शबे कद्रला श्रेष्ठत्व लाभले. व सूरह अलकद्र आयत नं. 3 मध्ये याला हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम अशी रात्र म्हटले गेले. एक रोमांचक बाब म्हणजे या रात्री फरिश्ते आपल्या पालकनर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. ती रात्र पूर्ण शांतीची आहे. पुढचे दहा दिवस रमजानचे शेवटचे दहा दिवस   -(उर्वरित पान 7 वर)

आहेत. त्याच्या विषम रात्रीत म्हणजे 21,23,25,27 आणि 29 यामध्ये जर जास्त इबादत (प्रार्थना) करून या रात्रीचा लाभ आपल्याला घेता येवू शकतो. 

कुरआनचा शाब्दीक अर्थ, ’शब्द व वचनांना अर्थपूर्ण क्रमात जोडून मुखाणे उच्चारणे’ असा आहे. सामान्यतः यालाच आपण पठण असे म्हणतो. कुरआन ह्या शब्दाचा अर्थ वारंवार वाचला जाणारा ग्रंथ असा सुद्धा आहे. हा शेवटचा दैवी ग्रंथ आहे. मानवाला सत्य मार्ग दाखविणारा दूसरा कोणताही ग्रंथ आता येणार नाही. 

1. कुरआन अल्लाहची मोठी निशाणी आहे. याला समजून वाचल्यास आपण प्रत्यक्ष आपल्या निर्मात्याशी संवाद करत आहोत, असा अनुभव येतो. 

2. असे म्हटले जाते की कुरआन अल्लाहचा दस्तरख्वान (जेवताना अंथरले जाणारे कापड) आहे. ज्यावर वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले जातात. कुरआनच्या दस्तरख्वानावर हजेरी लावल्याने आत्म्याला पोषण मिळते. आपण जसे शरीराला संतुलित आहार देतो, नियमित कुरआन पठणाने आत्म्याला सुद्धा संतुलित आहार मिळतो.

3. कुरआन अल्लाहची दोरी आहे. याचा उल्लेख सूरह आलेइमरान आयत नं. 103 मध्ये आलेला आहे. ज्यात म्हटलेले आहे की, सर्वांनी मिळून अल्लाहच्या दोरीला घट्ट धरा आणि आपसात फाटाफूट होवू देवू नका. 

4. कुरआन अरबी भाषेमध्ये असल्यामुळे काही लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अरब होते आणि कुरआन अरबी भाषेत आहे म्हणून तो अरबांसाठीच आहे. इतरांना त्याच्याशी काय देणेघेणे. पण कुरआनचे अवतरण संपूर्ण मानवजातीसाठी विशिष्ट जाती, संप्रदाय किंवा भौगोलिक क्षेत्रासाठी नाही. हा ग्रंथ पूर्ण मानवजातीसाठी जगण्याची एक आचारसंहिता (मॅन्युअल) आहे. सूरह अलअंबिया आयत क्र. 107 मध्ये म्हटले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल. आम्ही तर तुम्हाला समस्त जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ 

5. कुरआनवर श्रद्धा ठेवणे आणि कुरआनला नाकारणे यावरच मृत्यूनंतरच्या आपल्या सर्वांचे यश किंवा अपयश अवलंबून आहे. 

6. कुरआन हा एकमेव असा ग्रंथ आहे जो आजपर्यंत सुरक्षित आहे आणि याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अल्लाहने स्वतः घेतलेली आहे. 

7. कुरआनने आव्हान दिलेले आहे की, असा ग्रंथ तर सोडा या ग्रंथाची एक आयत सुद्धा कोणी रचू शकत नाही. या संदर्भात सूरह अलबकरा आयत नं. 23 मध्ये हे आव्हान सविस्तरपणे नमूद केलेले आहे. 

कुरआनची वैशिष्ट्ये

1. सूरह जुमर आयत नं. 23 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, ’’अल्लाहने उत्तम वाणी अवतरली आहे, एक असा ग्रंथ ज्याचे सर्वभाग त्यासारखेच उत्तम आहेत. ज्यात वरचेवर विषयांची पुनरावृत्ती केली गेलेली आहे. ज्याच्या श्रवणाने लोकांच्या अंगावर शहारे उभा राहतात. जे आपल्या पालनकर्त्यांचे भय बाळगणारे आहेत. मग त्यांचे शरीर आणि त्यांचे हृदय मृदू होवून अल्लाहकडे आकर्षित होतात. तो ज्याला इच्छितो सन्मार्गावर आणतो आणि ज्याला अल्लाहनेच मार्गदर्शन केले नाही तर मग कोणीही मार्गदर्शक नाही.

2. कुरआन महान आहे (संदर्भ अलहिज्र आयत नं.87)

3. कुरआन करीम (उच्चकोटीचे) आहे. (सं. सूरह अलअंबिया आयत नं.77-78)

4. कुरआन नूर (प्रकाश) आहे. (संदर्भ : सूरह अलतगाबुन आयत नं.4)

5. कुरआन मुबीन (स्पष्ट) बयान आहे. (संदर्भ : सूरह अलशुरा आयत नं.2)

6. कुरआन हकीम (विवेकशील) आहे (सं. सूरह यूनूस आ.क्र.1)

7. कुरआन मजीद (बुलंद, श्रेष्ठ) आहे. (सं. सूरह अलबुरूज आ.क्र.2)

8. कुरआन मुबारक (लाभदायक) आहे. (सं. सूरह सॉद आ.क्र.29)

9. कुरआन अजीज (जबदरस्त) आहे. (सं. सू. हामीम सज्दा आ.क्र. 41)

10. कुरआन रहमत (कृपा) आहे.(सं. सू. अलआराफ आ.क्र.203) 

11. कुरआन बसायर (डोळसपणा आणणारा प्रकाश) आहे. (सं. सू. अलआराफ आ.क्र.203) 

12. कुरआन हुदा (मार्गदर्शक) आहे. (सं. सू. अलबकरा आ.क्र.2)

13. कुरआन इल्म (ज्ञान) आहे. (सं. सू. अलबकरा आ.क्र. 120)

14. कुरआन फुरकान (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) आहे. (सं. सू. अलफुरकान आ.क्र.01)

15. कुरआन ज़िक्र (आठवण करून देणारा) आहे. (सं.सू. अबस आ.क्र.11)

16. कुरआन बुशरा (सुवार्ता) आहे. 

17. कुरआन नजीर (ताकीद) आहे. (सं.सू.नज्म, आ.क्र.56)

18. कुरआन मोएजा (उपदेश) आहे. (सं.सू. युनूस आ.क्र.57)

19. कुरआन शिफा (इलाज) आहे. (सं.सू. युनूस आ.क्र.57)

20. कुरआन रूह (आत्मा) आहे. (सं. सू. शुरा आ.क्र.57).

कुरआनचे माणवांवर हक्क

1. ईमान बिल कुरआन (कुरआनवर श्रद्धा ठेवणे) आहे. (सं.सू. निसा आ.क्र.136)

2. कुरआनचा सन्मान करणे.

3. तिलावतुल कुरआन (पठण करणे) (सं.सू.नमल आ.क्र.91-92)

4. इस्तमाअ इलल कुरआन (कुरआन ऐकणे) (सं.सू.आराफ आ.क्र.204)

5. फिकहल कुरआन (कुरआन समजणे) (सं.सू.अनआम आ.क्र.98)

6. तदब्बुरूल कुरआन (कुरआनवर चिंतन करणे) (सं.सू.सॉद आ.क्र.29)

7. तजकीर बिल कुरआन (कुरआनातील आयातींचा उपदेश देणे) (सं.सू. सॉद आ.क्र.29)

8. रूजू इलल कुरआन (कुरआनकडे वळणे) (सं.सू. निसा आ.क्र.59)

9. तजकिया बिल कुरआन (स्वतःला पवित्र करणे) (सं.सू.जुमा आ.क्र.2)

10. इताअत बराह कुरआन (अल्लाह आणि प्रेषितांच्या आदेशांचे पालन करणे)

11. तमसीक बिल कुरआन (कुरआनशी दृढतेने नाते जोडणे). (सू. अलआराफ आ.क्र.170)

12. दावत इलल कुरआन (कुरआनकडे बोलाविणे) (सू. आलेइमरान आ.क्र.23)

13. इकामते कुरआन (कुरआनच्या आदेशांची अंमलबजावणी करणे). (सू. मायदा आ.क्र. 66.)

कुरआन का वाचावे?

सूरह ताहा आ.क्र.124 मध्ये अल्लाह फरमावितो, जो माझ्या जिक्र (कुरआनपासून) तोंड फिरविल त्यासाठी त्याचे जीवन अडचणीचे होईल आणि पुनरूत्थानाच्या दिवशी आम्ही त्याला अंध उठवू. तो म्हणेल हे पालनकर्त्या जगात तर मी डोळस होतो येथे मला आंधळा म्हणून का उठविले. त्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाह फरमाविल, होय अशाच प्रकारे तर आमच्या वचनांना जेव्हा त्या तुझ्यापाशी आल्या होत्या तू विसरला होतास त्याच प्रकारे तू आज विसरला जात आहेस. 

मला या आयातींची खूप भीती वाटते व प्रत्येकाला विनंती करते की, मृत्यूनंतर आंधळे उठायचे नसेल तर कुरआन अवश्य समजून वाचा. अडचणीचे जीवन जगायचे नसेल तर कुरआन वाचा. स्वर्गात जायचे असेल तर कुरआन वाचा विशेषतः सूरह नहल वाचा. नरकात जायचे नसेल तर कुरआन वाचावे. अल्लाह सर्वांना कुरआन वाचण्याची व त्यातील उपदेशांवर चालण्याची सद्बुद्धी देओ. आमीन. 


- डॉ. सिमीन शहापुरे



माणसाने सृष्टीची रचना, व्यवस्था व त्यातील रहस्ये जाणून घेण्याचा सतत प्रयत्न केला आणि बरीच माहिती मिळवली. याविषयी त्याच्या मनात एक प्रश्न हाही निर्माण होत राहिला की सृष्टीची ही व्यवस्था कायमस्वरूपी आहे की तात्पुरती? म्हणजे सृष्टीचा हा गाडा पुढेही असाच निरंतर चालत राहणार की भविष्यात कधी बंद पडणार? आणि जर या सृष्टीचा अंत होणे निश्चित असेल तर त्याचे स्वरूप काय असेल? 

निसर्गकर्त्याने या संदर्भातही मानवजातीला पुर्णपणे मार्गदर्शन केले आहे. कुरआनमध्ये याविषयी सांगितले गेले आहे की या जगाचे अस्तित्व हे कायम टिकणारे नाही. एक वेळ येईल जेव्हा हे नष्ट होईल. ते कसे होईल? त्याचीही तपशीलवार माहिती देण्यात आली आहे आणि त्यानंतर पुढे काय काय होईल? यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. जगाचा अंत, ज्याला कयामत किंवा न्यायाचा दिवस म्हणतात, तो कसा असेल? त्याचे प्राथमिक चित्र समोर ठेवताना पवित्र कुरआनमध्ये म्हटले गेले आहे,

’या अय्युहन्नासुत्तकू रब्ब-कुम, इन्-न जल्-जलतस्-साअति शयउन अजीमुन.’

अनुवाद :- लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, निश्चितच कयामतचा भूकंप महाभयंकर गोष्ट आहे. (22 अल्-हज्ज : 1 )

या आयतीमध्ये कयामतच्या दिवशी सर्वाधिक तीव्रतेने येणाऱ्या भूकंपाचा उल्लेख आहे, जो कयामतच्या सुरुवातीचा एक टप्पा आहे. जेव्हा ती भयंकर वेळ येईल, तेव्हा त्याचे पहिले चिन्ह हे असेल की पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे ती दिशा उलट होईल आणि त्यामुळे लोकांना सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेकडून उगवताना दिसेल. पृथ्वी थरथरायला लागेल. त्यावेळी तीची अवस्था खवळलेल्या समुद्रातील जोरदार लाटा एखाद्या बोटीला धडकल्याने होते तशी होईल, किंवा वादळी वाऱ्यात हेलकावे खात असलेल्या कंदीलाप्रमाणे होईल. पवित्र कुरआनमध्ये अनेक ठिकाणी त्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे पृथ्वीचा फक्त काही भागच नाही किंवा एखादा देश-प्रदेशच नाही तर संपूर्ण पृथ्वी हादरून जाईल. पृथ्वी व पर्वतांना उचलून एकाच प्रहारात चक्काचूर केले जाईल. तो प्रसंग इतका भयावह असेल की जेव्हा तो भूकंप येईल तेव्हा आपल्या बाळांना दूध पाजणाऱ्या माता त्यांना सोडून पळायला लागतील. आपल्या बाळाचे काय होईल याची जाणीव कोणत्याही आईला राहणार नाही. 

साधारणपणे 6 ते 8 तीव्रतेच्या भूकंपांमुळे खूप विनाश होतो. किल्लारीचा भूकंप 6.4 इतक्या तीव्रतेचा असल्याची माहिती मिळते. ज्यामुळे होत्याचं नव्हतं झालं. अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की 10 रिश्टर स्केलचा भूकंप कधी येऊ शकतो का? असे कधी घडले तर काय होईल? कयामतच्या दिवशी होणारा भूकंप किती रिश्तर स्केलचा असेल? हे सांगण्यासाठी आज कोणतेही उदाहरण देता येणार नाही. एक मात्र नक्की की त्या भूकंपाची तीव्रता इतकी असेल की पृथ्वीच्या आत दडलेली सर्व मौल्यवान खनिजे, खजिने आणि साठे पृथ्वीबाहेर फेकले जातील. ज्यांना आज खूप महत्व आहे पण त्या वेळेस त्यांची किंमत कवडीचीही राहणार नाही. त्या वेळी ती सर्व संपत्ती व संसाधने निरुपयोगी ठरतील जी प्राप्त करण्यासाठी आज कमजोर देशांना उध्वस्त केले जात आहे आणि ज्यांवर कब्जा करण्यासाठी आपल्यासारख्याच माणसांचे रक्त निर्दयतेने सांडले जात आहे.

कयामतचा दिवस किती भयानक असेल हे वर्णन करताना कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की एक आईही आपल्या दुधपित्या बाळाला विसरून जाईल. ममता ही आईची सर्वात प्रबळ भावना आहे. ही भावना आपल्या मुलांवर असलेल्या प्रेमाचे दुसरे नाव आहे. आपण पाहतो की काही कामानिमित्त बाहेर पडणारी माता जेव्हा आपल्या मुलाला कुणाकडे सोडून जाते, तेव्हा आपल्या कामातून थोडासा वेळ मिळताच ती लगेच फोन करून आपल्या मुलाबद्दल विचारू लागते. तो उठला की अजून झोपलेला आहेस? त्याने काही खाल्ले का? तो खेळत आहे की रडत आहे? आई आपल्या कामादरम्यान सर्व काही विसरते पण आपल्या मुलाला विसरत नाही, परंतु कयामतच्या दिवसाची भयावहता वर्णन करताना म्हटले गेले आहे की त्या दिवशी इतकी भिती निर्माण होईल की मातांनाही आपल्या मुलांचा विसर पडेल.हाच तो न्यायाचा दिवस आहे ज्या दिवशी सर्व माणसांना दूबार जिवंत केले जाईल आणि जन्मभर त्यांनी केलेल्या बऱ्या वाईट कर्मांच्या फाईली निकाली काढण्यात येतील. ज्यामध्ये माणसाने जीवनातील प्रत्येक क्षणी केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांची नोंद असेल आणि त्यानूसार माणसाला एक तर बक्षीस मिळेल किंवा त्याला शिक्षा भोगावी लागेल, म्हणून लोकहो! कयामतच्या दिवसावर विश्वास ठेवा. त्याच्या भयानकतेचा विचार करा आणि हे समजून घ्या की त्यापासून आपले रक्षण करण्यासाठी एकमेव ईश्वराची भक्ती आणि त्याची आज्ञापालन याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, म्हणून अल्लाहचे भय बाळगा आणि त्याच्या आज्ञांचे पालन करा.

........................... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



ह. आयेशा (र.) म्हणतात की मी बोलाचालीमध्ये ह. फातिमा (र.) आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासारखे साम्य इतर कुणातही पाहिलेले नाही. ह. फातिमा (र.) जेव्हा प्रेषितांच्या सेवेत हजर होत असत तेव्हा प्रेषित (स.) उभे राहून त्यांचे स्वागत करीत. त्यांच्या दिशेने जात, त्यांचा हात आपल्या हातात घेत आणि मग त्यांना बसण्याची सोय करून देत. तसेच जेव्हा प्रेषित (स.) फातिमा (र.) यांच्या घरी जात असत तेव्हा ह. फातिमा (र.) उठून त्यांचे स्वागत करीत, त्यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांना बसण्याची व्यवस्था करीत. (ह. फातिमा (र.) प्रेषितांच्या कन्या आहेत.) (अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, एखाद्या माणसाच्या तोंडातून भलाई आणि पुण्याची कधी एखादी अशी गोष्ट निघते जिचे महत्त्व त्या माणसाला कळत नाही, पण अल्लाह त्याच्यासाठी त्याच्या अल्लाहशी भेटीच्या दिवसापर्यंत आपली प्रसन्नता व्यक्त करत असतो. त्याच वेळी कधी कुणाच्या तोंडातून वाईट आणि विकृत अशी गोष्ट निघते जिची तीव्रता त्यालासुद्धा माहीत नसते, पण अल्लाह त्या कारणाने त्या माणसाशी जेव्हा भेट घेईल त्या दिवसापर्यंत तो आपली नाराजी आणि राग व्यक्त करत असतो. (तिर्मिजी, इब्ने माजा)

अबू हुरैरा म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की जो कुणी अल्लाह आणि शेवटच्या दिवसावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो त्याने भल्या गोष्टीसाठीच तोंड उघडावे अन्यथा गप्प बसून राहावे. (बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “श्रद्धावंत (कुणाचा) धिक्कार करत नसतो.” दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, “एका श्रद्धावंताने कुणाचा धिक्कार करावा ही गोष्ट त्याला साजेशी नाही.” (ह. अब्दुल्लाह इब्ने उमर, तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, “जर कुणी कुणाला काही भेटवस्तू दिली असेल तर ज्याला ही भेटवस्तू दिली असेल त्यानेही त्याच्याकडे काही असेल तर त्याच्या बदल्यात ते द्यावे. जर कुणापाशी बदल्यात द्यायला काही नसेल तर त्याने त्या माणसाची प्रशंसा करावी. ज्याने असे केले त्याने त्या भेटवस्तूचा हक्क अदा केला आणि त्याची कृतज्ञता व्यक्त केली, पण जर कुणी तसे केले नसेल आणि भेट देणाऱ्या माणसाबद्दल कुणाला सांगितले नसेल तर त्याने त्याची कृतघ्नता केली.”

ह. आयेशा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताकीद केली की “एकमेकांना भेटवस्तू देत राहावे, कारण ह्या भेटवस्तूंमुळे मनामधील विकृती नष्ट होतात.” (तिर्मिजी) ह. आयेशा (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना कधी तोंड उघडून हसताना पाहिले नाही. त्यांचे हसणे म्हणजे स्मितहास्यासारखे होते. (बुखारी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(१६) जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीला नष्ट करण्याचा इरादा करतो तेव्हा तिच्या सुखवस्तू लोकांना हुकूम देतो आणि ते तिच्यात अवज्ञा करू लागतात. तेव्हा प्रकोपाचा निर्णय त्या वस्तीवर लागू होतो आणि आम्ही तिला उद्ध्वस्त करून टाकतो. 

(१७) पाहून घ्या, कित्येक अशा पिढ्या आहेत ज्या नूह (अ.) नंतर आमच्या आज्ञेने नष्ट झाल्या. तुझा पालनकर्ता आपल्या दासांच्या पापांची पुरेपूर खबर राखणारा आहे आणि सर्व काही पाहत आहे. 

(१८) जो कोणी (या जगात) झटपट लाभाचा इच्छुक असेल त्याला जे द्यायचे ते आम्ही येथेच देऊन टाकतो. मग त्यांच्या नशिबी जहन्नम लिहितो. ज्यात तो होरपळेल तिरस्कृत आणि कृपेला वंचित होऊन,



९) ज्या वस्तुस्थितीसंबंधी सदरहू आयतीत बजावले गेले आहे ती अशी की सरतेशेवटी समाजाला सव&नाश करणारी गोष्ट म्हणजे त्या समाजातील सुखवस्तू आणि उच्चवगी&यांचे बिघडणे होय. जेव्हा एखाद्या राष्ट्रावर अरिष्ट यावयाचे असते तेव्हा त्याचे श्रीमंत आणि सत्ताधारी लोक अवज्ञाकारी होऊ लागतात. जुलूम व अत्याचार आणि दुराचार व खोडसाळपणा करू लागतात, व सरतेशेवटी हाच उपद्रव संपूण& राष्ट्र बुडवून टाकतो. म्हणून जो समाज स्वत:च आपला शत्रू बनला नसेल त्याने सत्तासूत्रे आणि संपत्तीच्या किल्ल्या तुच्छ वृत्तीच्या आणि अनैतिक लोकांच्या हातात जाऊ देता कामा नये.

 


नवी जीवनातील मूलभूत आवश्यक घटकांशी खेळून इतर सुखसोयी मिळवणे हे आता उद्दिष्ट झाले आहे. मग या आधुनिक विकासाला माणसाचा सर्वांगीण विकास कशाच्या आधारावर म्हणायचे? शुद्ध ऑक्सिजन, स्वच्छ पाणी आणि सकस आहार हे मानवाच्या निरोगी आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, ज्याशिवाय जीवनाची कल्पनाही निरर्थक आहे. आज जगातील किती टक्के लोकांना हे जीवनावश्यक घटक शुद्ध स्वरूपात व योग्य प्रमाणात मिळत आहेत? मोठमोठ्या शहरात तर श्रीमंत असो की गरीब, कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकाला गुदमरणाऱ्या प्रदूषित वातावरणात जगावे लागत आहे, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपल्या ताटातील अन्न किती शुद्ध आहे हे आजच्या काळात कोणीही सांगू शकत नाही, आणि यामुळेच गरोदर मातांच्या पोटात वाढणाऱ्या बाळांपासून ते सर्व वयोगटातील लोकांपर्यंत घातक आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर यांसारखे आजार तर झपाट्याने वाढत आहेत. आज आपण ज्या वातावरणात जगतोय, त्यामुळे निश्चितच भविष्यात आणखी नवनवीन रोगांचे साम्राज्य वाढणार आहे. या परिस्थितीला फक्त माणूसच जबाबदार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाशी खेळणे, नियम-कायद्याची अवहेलना, भ्रष्टाचार स्वार्थीपणा यामुळे सर्वसामान्यांचे जीवन कमालीचे दुबळे झाले आहे.

वृक्ष हे सजीवांसाठी सर्वात मोठे जीवनदाता आहेत, झाडांशिवाय निसर्गाचे अस्तित्व नाही आणि निसर्गाशिवाय मानवांचे अस्तित्व नाही. झाडांमुळेच आपल्याला शुद्ध ऑक्सिजन, स्वच्छ पाणी आणि पोषक अन्न मिळते. निसर्ग माणसाची प्रत्येक गरज पूर्ण करू शकते, परंतु त्याचे लोभ नाही. दरवर्षी २१ मार्च रोजी वनांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात “आंतरराष्ट्रीय वन दिन” साजरा केला जातो. या वर्षी २०२४ ची थीम ‘फॉरेस्ट आणि इनोव्हेशन’ आहे. आपली जंगले कमी होत आहेत, वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या अलीकडील अहवालानुसार, २०२२ मध्ये ६.६ दशलक्ष हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे जास्त जमिनीची मागणी सतत वाढत आहे, ज्यामुळे गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक वनक्षेत्रांचा नाश आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर होतो. पृथ्वीचे तापमान वाढल्याने जंगलांचाही ऱ्हास होत आहे. डाउन टू अर्थनुसार, भारतातील जंगलतोड वर्ष १९९० ते २००० दरम्यान ३,८४,००० हेक्टरवरून वर्ष २०१५ ते २०२० दरम्यान ६,६८,४०० हेक्टरपर्यंत वाढली आहे. जेव्हा जंगले नाहीशी होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम पर्यावरणाच्या प्रत्येक घटकावर होतो आणि वन्यजीवांबरोबर मानवी जीवनावर देखील अतिशय विपरित परिणाम होतो. 

जागतिक रोगांच्या ओझ्यांपैकी १२% पर्यावरणीय जोखमीचा वाटा आहे, ज्यामध्ये वायू प्रदूषण प्रथम स्थानावर आहे. बीएमजे च्या मते, बारीक कण आणि ओझोन वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ८३.४ लाख लोक आपला जीव गमावतात. प्रदूषण आणि आरोग्यावरील लॅन्सेट आयोगाने २०१५ मध्ये ९ दशलक्ष अकाली मृत्यूंना प्रदूषण जबाबदार असल्याचा अहवाल दिला, याचा अर्थ जगभरात सहापैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होते आणि एकूण ४.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (जागतिक आर्थिक उत्पादनाच्या ६.२%) चे आर्थिक नुकसान होते, १४ लाख अकाली मृत्यूला जल प्रदूषण कारणीभूत होते, शिसे आणि इतर रसायने जागतिक स्तरावर दरवर्षी १८ लाख मृत्यूसाठी जबाबदार होते. ८.७ लाख मृत्यूंना विषारी व्यावसायिक धोके कारणीभूत आहेत. माती प्रदूषणाच्या मानवी संपर्कामुळे दरवर्षी जागतिक स्तरावर ५ लाखाहून अधिक अकाली मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. विकसनशील देशांमध्ये दर वर्षी चार ते दहा लाख लोक खराब व्यवस्थापित कचऱ्याशी संबंधित रोग आणि अपघातांमुळे मरतात. ९०% पेक्षा जास्त प्रदूषणामुळे होणारे मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. जीबीडी २०१९ च्या संशोधनानुसार, वायू प्रदूषण, शिसे प्रदूषण आणि व्यावसायिक प्रदूषणामुळे पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे, तर जलप्रदूषणामुळे महिला आणि लहान मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे. ओझोन आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारख्या वायु प्रदूषकांमुळे फुफ्फुस, हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्यांची तीव्रता वाढते. बीएमजे मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणारे वायू प्रदूषण जगभरात दरवर्षी ५१ लाख टाळता येण्याजोगे मृत्यूसाठी जबाबदार आहे.

देशात भेसळीची स्थिती अशी आहे की, एक रुपयाच्या फायद्यासाठी स्वार्थी लोक हानिकारक खाद्यपदार्थ स्लो पॉयझन च्या रूपात ग्राहकांना खाऊ घालतात. आता तर बनावट औषधांचे, नशेचे देखील अब्जावधींचे मार्केट आहे. खाद्यतेल, मसाले, दूध, मिठाई, फराळ, धान्य अशा प्रत्येक वस्तूतील शुद्धतेचे दावे खोटे ठरत आहेत. प्रत्येक तिसरा व्यक्ती भेसळयुक्त दुधाचे सेवन करत असल्याचे संशोधन सांगतो, खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त विष मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. देशातील बदलत्या खाण्याच्या सवयींचे आधीच विपरीत परिणाम झाले आहेत. आरोग्यदायी सकस अन्नाऐवजी तेलकट, मसालेदार, खारट, गोड आणि पचायला जड पदार्थांची मागणी सातत्याने वाढत आहे. शेतातल्या पिकापासून ते ताटात येईपर्यंत अन्नाला मोठ्या प्रमाणात अनेक हानिकारक रासायनिक प्रक्रियेतून जावे लागते. शेतात रासायनिक खतांची फवारणी, धान्य पॉलिश करणे, चमकदार कृत्रिम रंगांचा वापर, फळे पिकवण्यासाठी हानिकारक रसायनांचा वापर, कॅन केलेला खाद्यपदार्थ आणि पेये यांच्यातील रासायनिक प्रक्रिया यामुळे अन्न विषारी होते. याशिवाय बाहेरील खाद्यपदार्थांमध्ये अस्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे.

‘लॅन्सेट’ मॅगझिन २०१९ मध्ये जगभरातील आहार-संबंधित मृत्युदरावर प्रकाशित केलेल्या अभ्यासात खराब आहारामुळे होणाऱ्या १५,७३,५९५ मृत्यूंच्या बाबतीत चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले. तरुण स्वस्त आणि अस्वास्थ्यकर अन्न पर्यायांचा अवलंब करत आहेत ज्यात प्रामुख्याने स्नॅक्सचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील अंदाजे ६०० दशलक्ष लोक, सुमारे १० पैकी १ दूषित अन्नामुळे आजारी पडतात, परिणामी ३.३ कोटी निरोगी आयुष्याची वर्षे गमावली जातात. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असुरक्षित अन्नामुळे उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चात होणारे नुकसान दरवर्षी ८.६५ लाख कोटी रुपयांचे होते. ५ वर्षाखालील मुलांना अन्नजन्य रोगांचा ४०% भार सहन करावा लागतो, ज्यामुळे दरवर्षी १,२५,००० मृत्यू होतात. हानिकारक जिवाणू, विषाणू, परजीवी किंवा रसायने असलेल्या असुरक्षित अन्नामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत २०० हून अधिक आजार होतात. हे रोग आणि कुपोषणाचे दुष्टचक्र देखील तयार करते, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना प्रभावित करते. अन्नजन्य रोगांच्या आर्थिक भारावर जागतिक बँकेच्या २०१९ च्या अहवालात सूचित केले आहे की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अन्नजन्य रोगाशी संबंधित एकूण उत्पादकता नुकसान अंदाजे ७८,८९,७९,५२,००,००० रुपये प्रति वर्ष होते, आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोगांच्या उपचारांवर वार्षिक खर्च अंदाजे १२,४२,९१,०५,००,००० रुपये होता.

एक गोष्ट निश्चित आहे, मूलभूत गरजांची जागा इतर सुख-सोयी कधीही घेऊ शकत नाहीत. प्रत्येकजण आपल्या आजूबाजूला सरकारी नियमांची पायमल्ली होताना पाहतो पण विरोध करण्याची हिंमत करत नाही. शुद्ध प्राणवायू, स्वच्छ पाणी, सकस अन्न या प्रत्येक मानव, प्राणी, पक्षी आणि वन्यजीव यांच्या गरजा आहेत. झाडांनी जंगले आहेत, जंगले समृद्ध तर वन्यजीवांचे अधिवास संरक्षित आहेत, पाण्याचे स्त्रोत समृद्ध आहेत, ऋतुचक्र संतुलित राहते. शेतात पिके फुलतात, निसर्गात अन्नसाखळी सुरळीत चालते. ओझोनचा थर संरक्षित राहतो, मानवाची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, माणसांपासून ते सर्व प्रकारच्या पशु-पक्ष्यांना शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळते. नैसर्गिक आपत्ती कमी होवून जीव आणि मालमत्तेची हानी वाचते. वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष थांबतो. सरकारने जंगले समृद्ध करण्यासाठी, प्रदूषण आणि भेसळीला आळा घालण्यासाठी आणखी कठोर कायदे केले पाहिजेत आणि त्या नियमांचे पूर्णपणे पालन करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. 


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041



महंमद बख्त खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सुलतानपूर येथे झाला. त्यांनी कमांडर-इन-चीफची जबाबदारी स्वीकारून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरूद्ध १८५७ च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील नायक आणि नायिकांना सक्षम नेतृत्व प्रदान केले.

ब्रिटिश सैन्यात त्यांना सुमारे ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता रोहिलखंडमध्ये खान बहादूर खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात त्यांनी ब्रिटिश सेनापतींचा पराभव केला. पुढे त्यांनी बरेली येथील ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना ताब्यात घेतला आणि आपल्या सैन्यासह दिल्ली गाठली.

मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांनी सरसेनापती म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी सैन्यात सुसूत्रता आणली. त्यांनी ‘ग्रेटर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिल’ची स्थापना करून लोकशाही सुधारणांना सुरुवात केली आणि विशेष घटनात्मक धोरण तयार केले. स्वतंत्र राजवटीवर वैयक्तिक मतभेद आणि स्वार्थाचा प्रभाव असू नये, असे त्यांना वाटे.

अशा प्रकारे मुहम्मद बख्त खान यांनी आपल्या कार्यात उत्कृष्ट राज्यकर्तेपणाचे प्रदर्शन केले. इंग्रजांना दिल्लीतून हाकलून देणे पुरेसे नव्हते; त्यांना भारतातील जवळपासच्या राज्यांतूनही संपवायचे होते.

मुहम्मद बख्त खान आपल्या कार्यात व्यस्त होते, राजघराण्यातील ईर्ष्यावान सदस्यांनी आणि स्वार्थी व्यापाऱ्यांनी बादशहा जफर यांची दिशाभूल केली. परिस्थिती समजून घेताच बख्त खान यांनी स्वेच्छेने सेनापतीपदाचा त्याग केला.

नंतर त्यांनी स्वत:च्या सैन्यासह ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध अनेक लढायांचे नेतृत्व केले. शेवटी जेव्हा दिल्लीचा पराभव अटळ झाला तेव्हा बख्त खान यांनी बादशहाला अवध संस्थानाच्या लखनौला जाण्याचे आमंत्रण दिले. परंतु सम्राटाने त्यांच्या सल्ल्याला प्रतिसाद दिला नाही कारण तो त्याच्या सभोवतालच्या धूर्त लोकांच्या प्रभावाखाली होता.

त्यानंतर बख्त खान दिल्ली सोडून अवधला पोहोचले. बेगम हजरत महल सोबत त्यांनी ब्रिटीश सैन्याशी लढा दिला. पण, लखनौ ताब्यात घेतल्यावर ते बेगम हजरत महलसह नेपाळच्या टेकड्यांवर परतले. तेथूनच मुहम्मद बख्त खान यांनी ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढण्याचे प्रयत्न सुरू केले, परंतु नेपाळचे शासक जंग बहादूर यांच्या असहकारामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांविरुद्ध बंड करून विविध लढाया यशस्वीपणे लढणारे मुहम्मद बख्त खान १३ मे १८५९ रोजी शेवटपर्यंत लढताना मरण पावले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


‘अबराहा’ हा इथियोपिया देशाचा कैसर कालीन गवर्नर होता. तो फार गर्विष्ठ आणि हेकेखोर होता. त्याने ‘येमेन’वर विजय मिळवला. येमेनवर विजयप्राप्तीनंतर त्याचा अहंकार अधिकच वाढला. अरबचे लोक दरवर्षी काबागृहाला जातात आणि हज्ज करतात. त्याची अशी इच्छा होती की, त्या लोकांनी सनाआमध्ये येऊन हज्ज करावे. त्यासाठी त्याने सनाआ या शहरामध्ये इ. स. ५७० मध्ये एक प्रार्थनगृह बांधले आणि अरबांना आवाहन केले की मक्केला जाऊन काबागृहाचे हज्ज करण्याऐवजी सनाआमध्ये येऊन या इमारतीत हज्ज करावे. एका धर्माविरुद्ध उचललेले हे टोकाचे पाऊल होते.

अरब लोक एकेश्वरवादी होते. शिवाय पवित्र काबागृह हे त्यांचा जीव की प्राण होता. त्यामुळे अरबांनी त्याचा कडाडून विरोध केला. ‘कनाना’ टोळीतील एक माणूस रागाच्या भरात येमेनला गेला. अबराहाने बांधलेल्या प्रार्थनागृहात शौचास बसला आणि त्याला अपवित्र केले. ही घटना ऐकल्यावर अबराहाला खूप राग आला. अपादमस्तक अहंकारात बुडालेला असल्याने त्याने संयम गमावला आणि पवित्र काबागृहाचा नाश करण्यासाठी हत्तींच्या सैन्यासह मक्केवर चढाई केली. त्याला आपल्या सैन्यावर खूप गर्व होता. माझ्या सैन्याचा कोणीच मुकाबला करू शकत नाही, या अविर्भावात तो वावरात असे. त्याच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर हत्तींचा समावेश होता.

त्याच्या सैन्याच्या पुढील पथकाने अब्दुल मुत्तलीबच्या दोनशे ते चारशे उंटांसह मक्केतील लोकांचे सर्व उंट आणि इतर गुरेढोरे हाकलून नेली. त्या काळी अब्दुल मुत्तलिब पवित्र काबागृहाची देखभाल करायचे.

या घटनेने अब्दुल मुत्तलिब यांना खूप दुःख झाले. ते अबराहाशी बोलायला त्याच्या सैन्यात गेले. जेव्हा अबराहाला कळले की, कुरैशचा सरदार त्याला भेटायला आला आहे, तेव्हा त्याने अब्दुल मुत्तलिबला आपल्या तंबूत बोलावले. अब्दुल मुत्तलिब अतिशय देखणा माणूस होता. त्याची ललाट प्रकाशमान होती. अबराहा, अब्दुल मुत्तलिब जवळ आला आणि विचारले, “सरदार! तुमचा इथे भेट देण्याचा उद्देश काय आहे?” अब्दुल मुत्तलिब यांनी उत्तर दिले की, “आमचे उंट आणि बकऱ्या इ. जे तुमच्या सैनिकांनी हाकलून इकडे आणले आहेत, तुम्ही ही सर्व गुरे आमच्या स्वाधीन करा.” हे ऐकून अबराहा म्हणाला, “हे सरदार! मला वाटले होते की तू खूप धाडसी आणि अद्भुत माणूस आहेस. पण तू मला, तुझ्या उंटांबद्दल विचारून माझ्या नजरेत तुझी प्रतिष्ठा कमी केलीस. उंट आणि शेळीचे वास्तव तरी काय आहे? तुझ्या काबागृहाची तोडफोड करून उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलो आहे. तू त्याबद्दल बोलला नाहीस.”

अब्दुल मुत्तलिब म्हणाले, “माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की पवित्र काबागृह हे माझे घर नाही, ते तर ईश्वराचे घर आहे. तो स्वतः त्याचे घर वाचवेल. मला माझे उंट हवे आहेत?” हे ऐकून अबराहा गर्वाने म्हणाला, “हे मक्केचे सरदार! ऐका! मी काबाची, वीट न् वीट पाडून टाकीन आणि त्याचे नाव आणि निशाण पृथ्वीवरून पुसून टाकीन. कारण मक्केच्या लोकांनी माझ्या प्रार्थनागृहाचा अपमान केला आहे,  मी बदला घेण्यासाठी काबागहाचा नाश करीन. मला वाटते की हे करणे आवश्यक आहे.”

या संभाषणानंतर अबराहाने सर्व गुरेढोरे परत सोडण्याचे आदेश दिले. अब्दुल मुत्तलिब सर्व उंट आणि बकऱ्या बरोबर घेऊन त्यांच्या घरी गेले आणि मक्केच्या लोकांना म्हणाले, “तुमची संपत्ती, गुरेढोरे घ्या आणि मक्केतून निघून जा. डोंगराच्या माथ्यावर चढून, दरडींमध्ये लपून आश्रय घ्या.” नंतर ते स्वतः आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन काबागृहामध्ये गेले. दरवाजाची कडी धरली. अत्यंत पोटतिडकीने रडत रडत अल्लाह दरबारी प्रार्थना करू लागले. ‘हे अल्लाह! खरंच, प्रत्येक जण स्वतःच्या घराचे रक्षण करतो. म्हणून आपल्या घराचे रक्षण कर. आपल्या अनुयायांना मदत कर.’’

ही दुआ करून अब्दुल मुत्तलिब, आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन पर्वताच्या शिखरावर चढले आणि ईश्वराच्या सामर्थ्याचा गौरव करू लागले.

सकाळी जेव्हा अबराहा आपले सैन्य व हत्तींसह काबागृहावर आक्रमण करण्यासाठी निघाला आणि “मगमस” या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याचा ‘महमूद’ नामक हत्ती एकदम खाली बसला. कितीही प्रयत्न केले तरी हत्ती काबागृहाच्या दिशेने पुढे जात नव्हता. त्याला उलट दिशेला नेले तर चालायला लागायचा आणि काबागृहाकडे फिरविले की खाली बसायचा. त्याच स्थितीत ईश्वराचा क्रोध प्रकट झाला. लहान पक्ष्यांचे थवे आपल्या चोचीत आणि पंज्यांमध्ये तीन-तीन खडे घेऊन समुद्राच्या दिशेने पवित्र काबागृहाकडे येऊ लागले. त्यांना ‘अबाबिल’ म्हटले जाते. अबाबिलच्या या शूर सैन्याने अबराहाच्या सैन्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली की अबराहाचे सैन्य आणि त्याच्या हत्तींची दाणादाण उडाली.

वरून सोडलेला खडा सैन्य आणि हत्तीच्या शरीरातून पार होत होता. अबराहाच्या सैन्यातील एकही माणूस जिवंत राहिला नाही. अबराहा आणि त्याच्या हत्तींसह ते सर्व जण अशा प्रकारे मरून गेले की त्यांचे शरीर जमिनीवर विखुरले गेले. ‘सत्य आहे, पृथ्वी आणि आकाशांचे लष्कर अल्लाहच्याच अधिकारांत आहेत आणि तो जबरदस्त व बुद्धिमान आहे.’

पवित्र कुरआनच्या सूरह फीलमध्ये या घटनेचा उल्लेख आलेला आहे. तो असा आहे, “तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी काय केले? काय त्याने त्यांची युक्ती फोल ठरविली नाही? आणि त्यांच्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाठविले जे त्यांच्यावर खड्यांचा मारा करीत होते. मग त्यांची अशी दशा करून टाकली जसा (जनावरांनी) खाल्लेला भुसा. (चघळलेल्या पेंढ्यासारखे केले.)

जेव्हा अबराहा आणि त्याच्या सैन्याचा अंत झाला तेव्हा अब्दुल मुत्तलिब डोंगरावरून खाली आले आणि ईश्वराचे आभार मानले. त्यांच्या या प्रतिष्ठेची चर्चा दूरदूर पसरली. सगळीकडे त्यांचे कौतुक होऊ लागले. संपूर्ण अरब जगतात या घटनेला प्रसिद्धी मिळाली. सर्व अरब लोक त्यांचा अधिकच आदर-सन्मान करू लागले. ही घटना इतकी अद्भुत होती की अरब लोक या वर्षाला हत्तींचे वर्ष म्हणू लागले. या वर्षाला यामुळेही महत्त्व प्राप्त झाले की घटनेच्या पन्नास दिवसानंतर पवित्र प्रेषित मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


मुंबई
 

महाराष्ट्रातील जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू शक्ती दलाचे प्रमुख सिमरन गुप्ता यांनी ख्वाजा मोईन अजमेरी यांच्याबद्दल उद्धटपणे केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे. कारवाईबरोबरच, सरकारनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

मौलाना फलाही म्हणाले की, मुस्लिमांच्या आदरणीय व्यक्तींबद्दल अपमानास्पद भाषणे व टिप्पण्या हे देशात रोजचेच काम झाले आहे. या सरकारच्या काळात, देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष अशा प्रकारे जोपासला गेला आहे की आपल्या पवित्र व्यक्तिमत्त्वांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि अपमानास्पद शब्द ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने किंवा ती नाममात्र होत असल्याने देशात अशा घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी अजमेरमधील हिंदू शक्ती दल नावाच्या जहाल संघटनेचा प्रमुख सिमरन गुप्ता याने बेतालपणाच्या सर्व मर्यादा मोडून मोईनुद्दीन अजमेरी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून आपला द्वेष व्यक्त करत, अजमेरची दर्गा आणि तेथील मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. अशा घृणास्पद व अपमानास्पद वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो व पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो की समाजात धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या अशा जहाल संघटने विरुद्ध एफआय नोंदवावा आणि कडक कारवाई करावी.

पुणे एपीसीआरचे स्थानिक अधिकारी अन्वर बागबान, जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे जनसंपर्क कार्यकारी शोएब असीम आणि इतरांनी या द्वेषपूर्ण विधानाविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार केली  परंतु पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती अभय ठिपसे म्हणाले की, पुणे पोलिसांनी एफआयआर न नोंदवणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी एफआयआर नोंदवावा व दाखवून द्यावे की राज्यात द्वेषयुक्त भाषण किंवा विधाने खपवून घेतली जाणार नाहीत.


लोकशाही सामाजिक-राजकीय प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे लोकसहभाग निश्चित केला जातो. हे राजकीय पक्ष विचार, आचार-विचार आणि कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवतात, ज्याला ‘राजकीय विचारधारा’ म्हणून ओळखले जाते. विचारधारा एक हेतू देते ज्यासाठी एखादा पक्ष कार्य करतो आणि त्याच विचारधारेची पूर्तता करण्यासाठी वैध राजकीय सत्तेचे ध्येय ठेवतो. ही राजकीय विचारसरणी मतदारांच्या दृष्टीने त्यांचा जनाधार वाढवते आणि त्या आधारे विविध राजकीय पक्ष आपली विचारधारा अंमलात आणण्याच्या उद्देशाने सत्तेसाठी स्पर्धा करतात. जगभरातील लोकशाही समाजात राजकीय विचारसरणीचे ढोबळमानाने मध्यमार्गी, डावे आणि उजवे विचारधारा असे वर्गीकरण केले जाते.

मध्यमार्गी ते राष्ट्रवादी राजकीय पक्षांपर्यंत अनेक राजकीय स्पेक्ट्रम भारतात पाहायला मिळाले आहेत. बहु-विचारधारा, बहुप्रादेशिक, बहु-लोकसाम्राज्यवादविरोधी लढ्याचे नेतृत्व करणारा भारतातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची प्रशंसनीय राजकीय विचारधारा स्वातंत्र्यलढ्यातील राजकीय मूल्यांमधून निर्माण झालेल्या विचारांवर आधारित होती.

अनेक नेते आणि त्यांचे पक्ष गेल्या काही दशकांपासून वैचारिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात भरभराटीस आले आहेत जिथे तत्त्वे आणि तात्त्विक बांधिलकी नेहमीच सत्तेशी जोडली गेली आहे. गेल्या चार वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी बहुधा हे युग संपल्याचे सांगत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्तेची छोटीशी खेळी एन्जॉय केली असली, तरी निवडणूक आणि राजकीयदृष्ट्या ते आता अधोगतीच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यानंतर दोन व्यवहारी राजकीय संस्थांचा अंत होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जवळपास पूर्णपणे एकराज्यीय पक्ष आहेत, याला काहीच फरक पडत नाही, कारण गेल्या २५ वर्षांत दिल्लीतील सत्ताधारी आघाडीत या दोघांपैकी एकाला नेहमीच भागीदार म्हणून ठेवण्यात आले आहे.

“सेक्युलर मत” हा मुस्लिम मतांचा समानार्थी शब्द बनला. यामुळे उत्तर प्रदेशात सपा आणि बसप, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डावे आणि तृणमूल काँग्रेस आणि शेवटी काँग्रेस आणि आसाममध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफसारख्या नव्या मुस्लिम शक्तींमध्येही स्थानिक संघर्ष सुरू झाला.

दरम्यान, भाजप आपले उत्पादन अधिक धारदार, चांगल्या प्रकारे परिभाषित आणि बिनधास्तपणे हिंदू राष्ट्रवादी बनवत होता. ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेमुळे मुस्लिमांनी आपल्याला मतदान केले नाही, हे माहीत असले, तरी ते त्यांना त्रास देणार नाहीत, हा कच्चा, नवा आत्मविश्वासही अधोरेखित झाला. यामुळे राष्ट्रीय राजकारणात एकतर्फीपणा निर्माण झाला असला, तरी अनेक राज्यांमध्ये अजूनही स्थानिक/प्रादेशिक शक्तींना पराभूत करण्यात भाजपला अपयश आले आहे.

केरळ आणि तामिळनाडू वगळता इतर बहुतेक राज्यांमध्ये हे आव्हान एका नेत्याकडून किंवा एका कौटुंबिक पक्षाकडून आले. यामध्ये आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, बिहार, ओडिशा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. यातील अनेक पक्षांना आता पुनर्विचाराची गरज आहे. कुटुंबं तुटू शकतात, पुतण्या काकांना फसवू शकतात, एजन्सींचा वापर करून निष्ठावंतांना एकतर प्रलोभन दिलं जाऊ शकतं किंवा त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं.

कॉंग्रेसला आपली ताकद पुन्हा उभी करता आली आणि आधुनिक विचारसरणी विकसित करता आली, तर आपण पुन्हा स्पष्ट द्विपक्षीय, द्विध्रुवीय राजकारणाकडे वाटचाल करू शकू. खरे तर अनेक खोट्या गोष्टींवर आधारलेली सांप्रदायिक विचारधारा लोकविरोधी होऊन काही प्रमाणात आत्मविध्वंस करत राहते. हे आपण मागील दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाहिले आहेच. कुठलीही निश्चित विचारधारा किंवा बांधिलकी नसलेल्या सर्वच पक्षांनी सर्वच निवडणुकांमध्ये आपला जनाधार गमावला आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होत चालली आहे.

कोणत्याही विरोधकांचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर जातीय द्वेषाच्या लालसेचे प्रबळ विचारसरणीत रूपांतर झाल्याने देशातील लोकांच्या उपजीविकेवर कसा परिणाम झाला आहे, हे उघड करण्यासाठी लोकाभिमुख धोरणांसाठी लढण्याची दृढ वैचारिक बांधिलकी असणे आवश्यक आहे. बहुसंख्याकांविरुद्ध अल्पसंख्याकांना आळा घातला तरच सर्व मुद्दे सहन केले जाऊ शकतात, हे जनपातळीवर पटवून देण्यात आणि सांप्रदायिकीकरण करण्यात भाजपला यश आले आहे.

द्वेषाची विचारधारा हेच घडवून आणू शकते. लोकांच्या उपजीविकेचा मोठ्या प्रमाणावर नाश होत असल्याने ही विचारधारा फार काळ टिकू शकत नाही, परंतु सातत्याने अधिकाधिक वाढली आहे आणि वैचारिक बांधिलकी नसलेल्या इतर पक्षांचा नाश होईपर्यंत ती करत राहील. ते दिवस गेले जेव्हा मोठ्या प्रचाराची आश्वासने देणे आणि निवडणुकीनंतर गायब होणे हे सत्ताविरोधी शक्ती म्हणून पर्यायी मार्गाने निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे ठरणार आहे. एक सांप्रदायिक विचारधारा उदयास येत आहे आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल वैचारिक बांधिलकी आणि वर्गप्रश्नांवर लोकांना संघटित करूनच लढता येते.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.: ८९७६५३३४०४



18 व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशात एकूण 7 टप्प्यामध्ये होणारी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात होत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक 83 दिवस चालणार आहे. त्यामुळे मतदार राजाला आणि प्रशासनालाही जागे राहण्याची गरज आहे. 

राजकीय पक्षांसाठी निवडणुकीचा हंगाम परीक्षेचा असून, मतदार राजासाठी मात्र पाच वर्षाचे भविष्य ठरविणारा आहे. सध्या देशात आणि राज्यात राजकीय पक्षांनी नैतिकता वेशिवर टांगल्याने मतदारांची गोची झाली आहे. भ्रष्टाचारी कोण आणि शाहू कोण हे जनतेला ठरवायचे आहे. न्याय, समता, बंधूता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूल्य जपणाऱ्या पक्षाच्या हातात देशाचा कारभार द्यावा लागणार आहे. आज महागाई, बेरोजगारी, मॉबलिंचिंग, जातीभेदाने देशात मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले-आहेत, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, जे धर्मांधतेला खतपाणी देतात, जे अराजक माजवितात अशा राजकीय नेते, उमेदवारांपासून लोकसभा स्वच्छ ठेवणे ही सुजान जनतेची जबाबदारी आहे. जगात भारत अनेकतेत एकता असणारा एकमेव देश, सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने देशाची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क अदा करा. निवडणूक पारदर्शक पार पाडणे जेवढी प्रशासनाची जबाबदारी आहे त्याहून अधिक नागरिकांची आहे.

- बशीर शेख, उपसंपादक



जिंदा रहेना है तो हालात से डरना कैसा 

जंग लाजिम हो तो लष्कर नहीं देखे जाते 

जराईल आणि पॅलेस्टिन यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रमजान हा इबादतीचा महिना आहे म्हणून रमजानच्या अगोदर युद्ध बंदी व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना हमासने यशस्वी होऊ दिले नाही. हमासचे म्हणणे आहे की, अत्याचारांविरूद्ध युद्ध ही सुद्धा इस्लामी इबादतच आहे. बदरचे युद्ध सुद्धा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वात रमजानमध्येच लढले गेले होते. म्हणून रमजान महिन्याच्या निमित्ताने बदरच्या युद्धासंबंधी माहिती घेणे अनाठायी होणार नाही.  

इस्लाम हा समतावादी धर्म असल्या कारणाने पृथ्वीवर जेथे कोठेही त्याच्या नावाचा उच्चार केला जातो तेथे प्रस्थापितांमधून त्याचा विरोध सुरू होतो तर सामान्य जनतेतून त्याचे स्वागत केले जाते. गार-ए-हिरामधून प्रेषित्व बहाल झाल्यावर हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांनी इस्लामची घोषणा करताच ज्या मक्का शहरामध्ये त्यांना अमीन (विश्वासपात्र) आणि सादीक (खरा) म्हणून ओळखले जात होते त्याच शहरात त्यांचा विरोध सुरू झाला. हा विरोध शोषित समाजाकडून नव्हे तर प्रस्थापितांकडून झाला. 

मक्का ही त्यावेळी अरबास्थानाची आर्थिक राजधानी होती. तेथील काबागृहामध्ये 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक मुर्ती ही अनेक कबिल्यांची कुलदैवत होती. त्या काळातील टोळ्यांवर आधारित समाजरचनेमध्ये कुलदैवतला अनन्यसाधारण महत्व होते. प्रत्येक टोळीमध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत होत्या त्या मक्केमधून येऊन आपल्या कुलदैवतेसोबत साजऱ्या केल्या जात होत्या. वर्षातील 360 दिवस अखंडपणे विविध टोळया मक्का शहरात येत आणि बकरे, ऊंट व पूजेचे इतर साहित्य खरेदी करत. तेथे काही दिवस मुक्काम करत आणि परत जात. त्यामुळे मक्का शहरात चारही बाजूंनी पैशाचा ओघ सातत्याने येत होता. 360 दिवसांचा हा अखंड रतीब तर राहिलेले पाच दिवस हजचा उत्सव, त्यात तर लोकांच्या उत्साहाला उधान येई व पैशांच्या राशी मक्का शहराच्या व्यापाऱ्यांसमोर पडत. थोडक्यात मक्का हे अरबस्थानाचे एकमेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र झाले होते. त्यामुळे साहजिकच तेथे राहणारे सर्व कबिले खासकरून ’कुरैश’ कबिला सर्वार्थाने संपन्न झालेला होता. स्पष्ट आहे जेव्हा प्रेषितांनी 360 मुर्त्यांना नाकारून एका ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला तेव्हा त्या सर्व कबिल्यांचा डोळ्यासमोर  त्यांचा आर्थिक मृत्यू दिसायला लागला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा संदेश याच कारणाने त्यांनी नाकारला. त्यांना स्वतः आपल्या हाताने आपल्या अर्थव्यवस्थेची मान आवळने शक्य झाली नाही. त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा विरोध सुरू केला. मात्र त्याचवेळेस त्याच शहरातील प्रस्थापितांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या शोषित लोकांना प्रेषित सल्ल. यांचा संदेश आवडला व तो त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारला देखील. मुठभर शोषितांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची साथ देण्यास सुरूवात केली तेव्हा प्रस्थापितांना ही गोष्ट रूचली असती तरच नवल. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या गरीबांना त्रास देण्यात सुरूवात केली. इतका त्रास की त्यांना मक्का शहरात राहणे अशक्य झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना तत्कालीन शेजारील राष्ट्र हबश (इथोपिया)मध्ये हिजरत (स्थलांतर) करण्याचा आदेश दिला. सातत्याने 13 वर्षे प्रयत्न करूनही मक्का शहरातील प्रस्थापितांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. याउलट मक्का शहराच्या आजूबाजूच्या इलाख्यामध्ये मात्र इस्लामचा स्विकार करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. कारण ते लोक मक्काच्या रहिवाशांसारखे संपन्न नव्हते. विशेषतः म्नक्यापासून जवळ असलेल्या मदिना शहरातील लोकांना प्रेषितांचा संदेश खूप भावला. मक्का पेक्षा मदिनामध्ये इस्लामचा स्विकार करण्याची संख्या वाढत गेली. मदिनातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत (प्रेषितांच्या हातात हात देऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे) करत. याला बैत-ए-उ्नबा असे म्हटले जाते. एकूण तीन वेळा बैत-ए-उ्नबा झाल्या. तिसरी बैत-ए-उ्नबा प्रेषित्वाच्या बाराव्या वर्षी झाली. झाले असे की, मदिनाच्या 75 सन्माननीय व्यक्तींचे एक शिष्टमंडळ हजसाठी आले होते. हज झाल्यानंतर त्या शिष्टमंडळाने एका रात्री प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत केली व मदिनाला येण्याचे निमंत्रण देऊन सर्वार्थाने साथ देण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर थोड्याच दिवसात अल्लाहच्या आदेशाने स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे हिजरत केली. प्रेषितांच्या आगमनाने मदिनाचे एकूण वातावरणच ढवळून निघाले. त्या वातावरणाचे वर्णन ’शोधन’चे माजी संपादक आणि प्रेषितांचे चरित्रकार सय्यद इफ्तखार अहेमद यांनी खालीलप्रमाणे केलेले आहे. ’’प्रेषितांनी आणलेला धर्म स्विकारणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःविरूद्ध जाणे आणि सर्व लोकसमुहांनी स्वतः अंगीकारलेल्या वृत्ती, प्रवृत्ती, उद्दिष्टे अशा सर्व गोष्टींना तिलांजली देऊन नव्या संकल्पना, नवी विचारधारा, जीवनाचा नवा अर्थ, ईश्वराच्या एकत्वाची संकल्पना स्विकारावी लागणार होती. लोक सहजासहजी हे करण्यास तयार नव्हते.’’(संदर्भ : मुहम्मद सल्ल. नवयुगाचे प्रणेते पान क्र. 289-290). 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या यशस्वी हिजरती व त्यांना मदिना शहरात मिळालेल्या आश्रयामुळे मक्कावासियांचा नुसता जळफळाट झाला. यावर कडी तेव्हा झाली जेव्हा मदिनेहून औस या प्रतिष्ठित कबिल्याचे सरदार सअद बिन मआज रजि. उमराह (काबागृहाच्या दर्शना) साठी मक्का शहरात आले व आपले स्नेही उमैय्या यांचेकडे थांबले. एका दिवशी ते दोघे उमराह करण्यासाठी काबागृहाकडे निघाले असता कुरैशचा सरदार अबु जहल त्यांना भेटला आणि उमय्या यांना विचारले की, ’’तुमच्या बरोबर हे गृहस्थ कोण?’’ उमैय्या यांनी सआद बिन मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे जातात ते?’’ तेव्हा अबु जहलचे डोळे उघडले व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मदिना शहरात हिजरत करण्यामागचा अर्थ त्याला समजला. मक्का शहराचा जवळ-जवळ सर्व व्यापार यमन आणि सीरियाशी होत होता व व्यापारी काफिले मदिनालगतच्या मार्गानेच जात होते. हजरत सआद रजि. यांनी तो मार्गच तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे कुरैश हादरले व सर्व व्यापाऱ्यांची तातडीने एक बैठक बोलाविण्यात आली व या विषयावर विचार करण्यात आला. शेवटी असे ठरले की, मदिना शहरामध्ये राहणारा एक सरदार ज्याचे नाव अब्दुल्लाह बिन उबई होते व ज्याची मदिना शहराचा प्रमुख म्हणून निवड जवळ-जवळ निश्चित झाली होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. मदिना शहरात आल्यामुळे त्याचे प्रमुखपद आपोआपच रद्द झाले होते. प्रेषित सल्ल. यांचा अघोषितपणे मदिनाच्या बहुसंख्य लोकांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकार केला होता. म्हणून अब्दुल्ला बिन उबई चिडून होता. याची माहिती मक्कावासियांना होती. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहून प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली व त्यासाठी आवश्यक ती मदद देण्यासाठी तयार असल्याचे पत्रामध्ये नमूद केले. ही गोष्ट जेव्हा प्रेषित सल्ल. यांना समजली तेव्हा त्यांनी अब्दुल्ला बिन उबईची भेट घेऊन त्याची समजूत काढली व त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की आमच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या नादात त्याला स्वतःच्या नातेवाईकांशीच संघर्ष करावा लागेल व त्यात सर्वांची अतोनात हानी होईल. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्याने दोन पत्रे मिळूनही अब्दुल्ला बिन उबई गप्प बसला. तो काही करत नाहीये हे लक्षात आल्यावर मक्कावासियांनी मदिनावासियांच्या खोडी काढण्यास सुरूवात केली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या बकऱ्या आणि उंट चोरण्याचा सपाटा लावला. काहीही करून एक मोठी शक्ती बनण्यापूर्वी प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांना नामोहरम करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यांना स्वतःच्या लष्करी शक्तीचा फार अभिमान होता. 

दरम्यान, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना शहरात येताच तेथील अनेक कबिल्यांशी विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन कबिल्यांशी वाटाघाटी करून मदिना शहर सुरक्षित करून घेतले होते. इतिहासामध्ये याला (मिसाके मदीना) ’मदिना करार’ म्हणतात. मक्कावासियांचे आक्रमण मदिनावर होणार याची खुनगाठ बांधून त्यांनी सर्व कबिल्यांची एकजूट केली होती. त्यानंतर त्यांनी कुरैशच्या कुरापतींचे उत्तर कसे द्यावे? यासाठीची योजना आखण्यास सुरूवात केली. त्यांनी मदिना शहरातील सर्व कबिल्यांची बैठक घेऊन मक्कावासियांच्या संभावित आक्रमणाविरूद्ध कशी रणनिती आखावी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मदिना वासियांनी विशेषतः अन्सार लोकांनी प्रेषित सल्ल. यांना सर्वाधिकार देऊन निर्णय घेण्याची विनंती केली व त्यांच्या निर्णयावर जीव ओवाळून टाकण्याचा निश्चय व्यक्त केला.

प्रेषित सल्ल. नेहमी सावध राहत. लवकरच त्यांना एक बातमी समजली की अबु सुफियानच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यापारी काफला, व्यापार करून, साधन संपत्ती घेऊन, सीरियाकडून म्नका शहराकडे येत आहे. त्या काफिल्यासोबत 40-50 पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक नाहीत. तेव्हा मदिनातील बहुतेक लोकांना वाटत होते की, प्रेषित सल्ल. यांनी या काफिल्याला लूटण्याची परवानगी द्यावी. काफिल्याचा प्रमुख अबु सुफियान स्वतः एक अत्यंत हुशार सरदार होता. त्यालाही या गोष्टीचा अंदाज आला होता म्हणून त्याने मदिना शहराजवळ येण्याअगोदरच एक उंटस्वार मक्का येथे पाठवून लष्करी मदद मागीतली होती. अबु सुफियानचा निरोप मिळाल्याबरोबर कुरेशचे लोक चौताळले व त्यांनी एक हजार लोकांचे लष्कर घेऊन मदिनाकडे कूच केले.

- प्रत्यक्ष युद्ध -

इकडे अल्लाहने प्रेषित सल्ल. यांना सूचना केली की, दोन पैकी कुठल्याही एकाशी सामना केल्यास त्यांची निश्चितपणे मदद केली जाईल. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी मदिन्यातील सर्व सरदारांची बैठक बोलाविली व त्यांच्यासमोर परिस्थिती विशद केली. काही लोकांचा विचार होता की, काफिल्याला लुटावे. कारण त्यांच्याकडे लोक कमी आणि संपत्ती जास्त आहे. परंतु, प्रेषित सल्ल. यांना मक्काकडून येणाऱ्या लष्कराशी दोन हात करण्याची इच्छा झाली. कारण जोपर्यंत मक्कावासियांचा निर्णायक पराभव केला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यातली खुमखुमी कमी होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणून पुरेशी तयारी नसतांनासुद्धा अल्लाहच्या भरोश्यावर त्यांनी मक्काकडून येणाऱ्या कुरैशच्या लष्काराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. प्रेषित सल्ल. यांच्या या निर्णयाचे मुठभर युवक सोडले तर सर्वांनी समर्थन केले. जेव्हा युद्धाची जुळवाजुळव केली गेली तेव्हा 300 पेक्षा थोडे जास्त लोक उपलब्ध झाले. ज्यांच्यापैकी फक्त दोन, तीन लोकांकडे घोडे होते. 70 लोकांकडे उंट होते, हत्यारसुद्धा पुरेशे नव्हते. फक्त 60 लोकांकडे चिलखत होते. अशाही परिस्थितीत या 313 लोकांनी आपले शीर हातावरून घेऊन एक हजार लोकांच्या कुरैशच्या बलाढ्य लष्कराशी युद्ध करण्याची तयारी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर विश्वास ठेऊन दर्शविली. 

या 313 लोकांना घेऊन 17 रमजान 2 हिजरी, (13 मार्च 624) मंगळवारी प्रेषित सल्ल. यांनी मक्काकडे कूच केले. शत्रूला मदिना शहरापासून 200 किलोमीटर दूर बदरच्या ठिकाणी थोपवून युद्ध करण्याची प्रेषितांची इच्छा होती. त्याप्रमाणे बदर या गावाजवळ उंच टेकडीवर इस्लामी लष्कराने पाडाव टाकला. पाडाव टाकताच पावसाला सुरूवात झाली. लष्कराने तात्काळ श्रमदान करून तात्पुरता खड्डा (हौद) बांधून पाणी गोळा केले. इकडे कुरैशचे लष्कर टेकडीखाली येवून ठेपले. पावसामुळे टेकडीचा वरचा भाग पाण्याने अधिक घट्ट झाला होता तर खाली पायथ्याशी चिखल झाला होता. प्रेषितांनी प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी अल्लाहशी दुआ केली आणि युद्धाला तोंड फुटले. या 313 च्या लष्कराने परिस्थितीचा लाभ उठवत हजार लोकांच्या कुरेशच्या लष्कराची दानादान उडविली. या युद्धामध्ये मुस्लिमांचे 14 यौद्धे शहीद झाले तर कुरैशचे 70 यौद्धे मारले गेले. 

मुस्लिम सैनिकांनी कुरेशच्या अनेक लोकांना युद्धबंदी बनविले व पुढे हजरत अबुबकर रजि. यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी कुरेशकडून काही रक्कम घेऊन युद्धकैद्यांना सोडून दिले. बदरचे युद्ध प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांसाठी प्रेरणादायी युद्ध ठरले आहे. आजही आपण अनेक मुस्लिम तरूणांच्या मोटारबाईकवर 313 चा अंक लिहिलेला पाहिलेला असेल. अनेक कवी आणि शायर लोकांनी या 313 लष्कराचे गुणगाण गायलेले आहे. विषम परिस्थितील हे युद्ध जिंकल्याचे दोन परिणाम झाले. एक तर मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढला दोन कुरेशच नव्हे तर समग्र अरबस्थानामध्ये मुस्लिमांच्या लष्करी ताकदीचा धाक बसला. बदरच्या युद्धामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, युद्ध हे साधन सामुग्री किंवा सैनिकांच्या संख्या बळावर नव्हे तर धैर्य, साहस आणि अल्लाहवरील दृढ विश्वासाच्या साह्याने जिंकता येते. आज बलाढ्य इजराईल समोर हमास सारखा छोटासा गट याच बदरच्या युद्धाच्या प्रेरणेतून खंबीरपणे लढत आहे. जसजसे दिवस जात आहेत तसतसे इजराईलचेही अतोनात नुकसान होत आहे. शक्यता हीच आहे की, या युद्धानंतर इन्शाअल्लाह पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळेल.


जमात-ए-इस्लामी हिंदकडून घटनेचा निषेध : आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, देशाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रकार


नवी दिल्ली (शोधन सेवा)

गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात परदेशी विद्यार्थ्यांवर 16 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याचा जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रोफेसर सलीम इंजिनियर यांनी निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या निवेदनात जमातचे उपाध्यक्ष म्हणाले, गुजरात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी रात्री झालेल्या धक्कादायक घटनेचा जमात तीव्र शब्दात निषेध करते, ज्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या गटावर नमाज पठण करताना क्रूरपणे हल्ला करण्यात आला. पाच विद्यार्थी जखमी झाले त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. नमाजाच्या वेळी काही बाहेरच्या लोकांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले, त्यानंतर दगडफेक आणि तोडफोड केली. 

पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्यानेे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय, गुन्हेगारांना विद्यापीठ कॅम्पसमध्ये जाळपोळ करताना पोलिसांनी रोखले कसे नाही.. पोलिसांच्या निष्क्रियतेचीही चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांना कायद्याची भीती का नाही, हे कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांच्या निष्क्रियतेवरून दिसून येते.

प्राध्यापक सलीम म्हणाले, हे निंदनीय कृत्य, ज्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर धार्मिक कृत्यांसाठी हल्ले केले गेले, हे आपल्या देशाने स्वीकारलेल्या सहिष्णुता आणि बहुलवादाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. अशा घटनांमुळे केवळ निष्पाप विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येत नाही तर बदनामीही होते. या हिंसाचारातील गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून दंडित करावे शिवाय, यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना जबाबदार धरून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही सलीम इंजिनियर यांनी केली. गुजरात पोलिसांनी या संदर्भात आपले प्रयत्न गतीमान करणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे, त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा धर्म विचारात न घेता, या घटनेकडे एकाकीपणाने पाहिले जाऊ नये. वर्षानुवर्षे विकसित झालेल्या द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या वातावरणाचा हा परिणाम आहे. भारतातील मुस्लीम समाजाच्या विरोधात मुस्लिमांवरील लक्ष्यित हिंसाचार सामान्य झाला आहे. जोपर्यंत या द्वेषाच्या वातावरणाला संवैधानिक मार्गाने रोखले जात नाही; तोपर्यंत आपण अशा जातीय घटनांच्या मुळाशी जाण्यास सक्षम होणार नाही. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेची मूल्ये जोपासणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी असल्याचे सलीम इंजिनियर म्हणाले.



नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील तरतुदींच्या अधिसूचनेमुळे देश पुन्हा एकदा नागरिकत्व नाकारण्याच्या वेदनेत आणि भीतीत सापडला आहे. दिलासा एवढाच की सेक्युलर विचारसरणीच्या लोकांमध्ये आंदोलनाची आणि कायदेशीर कारवाईची मागणीची चेतना जागृत झाली आहे. सर्वोच्च न्यायालय घटनाबाह्य कायद्यात हस्तक्षेप करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने सीएएबाबत चिंता व्यक्त केली आहे, हा या नागरिकत्व विभाजन आणि नाकारण्याऱ्या कायद्याची जागतिक स्तरावरही चर्चा झाल्याचा पुरावा आहे. सीएए ही एक ’धर्मादाय’ कृती आहे जी तीन देशांतील मुस्लिम वगळता इतर सहा धार्मिक गटांच्या लोकांना नागरिकत्व प्रदान करते, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला असला तरी नागरिकत्वाचा निकष म्हणून धर्माचा प्रवेश होण्याच्या धोक्याबाबत त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. तीन देशांची निवड करण्यामागचे कारण नेमके सांगता येत नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांच्या बरोबरीने अर्थ लावताना मुस्लिमांना नागरिकत्व नाकारण्याचे कोणतेही उत्तर नाही.

न्यूरेम्बर्ग कायदे - भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होण्यापूर्वी इटली आणि जर्मनीला भेट देऊन फॅसिझम आणि नाझीवादाने समाजात आपली मुळं कशी पसरवली, याचा त्यावेळच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी अभ्यास केला. डॉ. बी. एस. मुंजे यांच्यासारख्या नेत्यांनी इटलीत तळ ठोकून सशस्त्र गटांची माहिती घेतली. हिटलर आणि मुसोलिनी हे हिंदुत्ववादी विचारवंतांचे सर्वकालीन आदर्श आहेत.

गृहमंत्र्यांच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे जर्मनीतील न्यूरेम्बर्ग कायद्यांशी साम्य आहे, हा योगायोग नाही. १९३५ मध्ये लागू करण्यात आलेल्या या कायद्यांमुळे ज्यू समाजाला नागरिकत्वापासून पूर्णपणे वगळण्यात आले. मतदानाचा अधिकारही हिरावून घेण्यात आला आहे. ज्यूंना जर्मन रक्ताच्या लोकांशी लग्न करण्यासही मनाई करण्यात आली होती. तसेच ज्यू कुटुंबांमध्ये ४५ वर्षांखालील जर्मन महिलांना कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ जर्मन रक्त असलेल्यांनाच रीच नागरिक होण्यास पात्र असल्याचे जाहीर करणाऱ्या या कायद्याने बाकीच्यांना नागरिकत्वाच्या अधिकारांशिवाय देशात राहण्याची मुभा दिली. ज्यू कोण याची व्याख्या स्पष्ट करणारा पुरवणी आदेशही देण्यात आला. नंतर एक आदेश जारी करण्यात आला ज्यात रोमन आणि कृष्णवर्णीय या इंडो-आर्यन वांशिक समूहाला नागरिकत्वापासून वगळण्यात आले. यावरून गोळवलकरांनी जर्मनीतील हिंदुत्ववादी देशात अल्पसंख्याकांचे हक्क काय असतील, याचे मॉडेल स्वीकारले, हे स्पष्ट होते. ‘अल्पसंख्याकांना विशेष अधिकार नाहीत, नागरी हक्कही नाहीत’, असे गुरुजींनी स्पष्टपणे नमूद केले आहे. गृहमंत्री जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणतात, तेव्हा तो न्यूरेम्बर्ग कायद्याची प्रत आहे.

बर्मा नागरिकत्व कायदा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचे म्यानमारमधील बौद्ध अतिरेकी गटांशी खोल संबंध आहेत, हे लपून राहिलेले नाही. भारतातील विविध हिंदुत्ववादी नेत्यांनी आशिन विराट या दहशतवादी नेत्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत, ज्याला ‘टाइम’ नियतकालिकाने ‘बुद्धिस्ट टेरर’चा चेहरा म्हणून संबोधले आहे. म्यानमारचे लष्करप्रमुख आणि बौद्ध अतिरेकी नेत्यांनी आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकशाही संघर्ष’ दडपण्यासाठी हातमिळवणी केली आणि तेथे लष्करी राजवट सुरू केली.

म्यानमारमध्ये आज दिसणाऱ्या रोहिंग्या अत्याचाराचे मूळ लष्करी राजवटीने १९८२ मध्ये आणलेल्या नागरिकत्व कायद्यात (बर्मा नागरिकत्व कायदा-१९८२) दडलेले आहे.

१८२४ मध्ये इंग्रजांनी आक्रमण केले तेव्हा या कायद्याने देशात असलेल्यांना नागरिकत्व दिले आणि त्यानंतर रोहिंग्या आले, असा सरकारचा दावा होता. त्यानंतर विविध प्रकारचे नागरिकत्व कार्ड आले. माणसं विभागली गेली आणि विस्थापित झाली. रोहिंग्या मुस्लिमच नव्हे, तर ख्रिश्चन आदिवासी समाजालाही यातून वगळण्यात आले. आज म्यानमार पूर्णपणे अस्वस्थ आहे. देश फुटीरतावादाच्या विळख्यात सापडला आहे.

राष्ट्र राज्य कायदा - “देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तान अस्तित्वात आला. भारताला पाकिस्तानकडून सातत्याने धमक्या येत आहेत. बेजबाबदार अणुशक्तीच्या उंबरठ्यावर भारत हा पीडित देश आहे. मुस्लिमांना हाकलून दिले पाहिजे.” ही संघ परिवाराची कल्पना आहे. सावरकर, गोळवलकर आणि हेडगेवार यांनी हा युक्तिवाद मांडला. झायोनिस्टांच्या बाबतीतही असेच आहे. “छळलेल्या ज्यूंसाठी एकच देश आहे. पॅलेस्टिनी त्यांच्या शांततापूर्ण अस्तित्वाला धोका आहे. हमाससारख्या गटांकडून आमच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. इराणही संकटमोचक आहे.” ही पीडित विचारसरणी सियोनिझम आणि हिंदुत्व यांना एकत्र आणते.

सीएए हे धार्मिक राज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे आणि धर्माला नागरिकत्वाच्या व्याख्येत आणणे हा दीर्घकालीन योजनेचा भाग आहे, हे स्पष्ट करण्यासाठी इस्रायलने २०१८ मध्ये आणलेल्या कायद्याचा अभ्यास करणे पुरेसे आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि इस्रायलमधील कायदा, ज्याला “नेशन स्टेट लॉ” (बेसिक लॉ) म्हणून ओळखले जाते, त्यात खूप साम्य आहे. इस्रायलच्या नेसेट या संसदेने १९ जुलै २०१८ रोजी हा कायदा संमत केला होता. लोकसंख्येच्या २० टक्के असलेल्या अरब मुस्लिम आणि ख्रिश्चनांना पूर्णपणे राष्ट्रविहीन बनविणे हा या कायद्याचा उद्देश होता. या कायद्याला विभाजनकारी आणि धार्मिक राष्ट्रवादाचा आधार बनवणाऱ्या तीन तरतुदी आहेत.

१. राष्ट्रीय स्वयंनिर्णय केवळ ज्यूंसाठी आहे. पितृभूमी ही झायोनिस्ट विचारसरणी आणि हिंदुत्वात समानपणे आढळणारी राष्ट्र-राज्याची संकल्पना आहे. इस्रायलच्या बाबतीत “प्रॉमिस्ड लँड” हा धार्मिक शब्दही वापरला जातो. विशेष म्हणजे नेशन स्टेट लॉ हा अर्ज थेट राबवत नाही. त्याऐवजी आत्मनिर्णयाचा अधिकार केवळ ज्यूंपुरताच मर्यादित होता.

भारतात प्रथमच नागरिकत्वाच्या व्याख्येत धर्माचा शिरकाव झाल्याने आणि नागरिकांची यादी तयार करण्यात येणार असल्याची घोषणा झाल्याने काहींचे नागरिकत्व सुरक्षित झाले आहे तर काहींचे नागरिकत्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इस्राएलचा कायदा हे कोणत्याही आवरणाशिवाय करतो.  राष्ट्र कसे असावे आणि राज्याचे प्राधान्य क्रम काय असावे हे ठरविण्यात ज्यू नसलेल्यांची कोणतीही भूमिका नाही, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.  हा कायदा नागरिकांना ज्यू आणि बिगर ज्यू अशी विभागणी करतो. यामुळे सर्व बिगर यहुदी दुय्यम दर्जाचे नागरिक झाले.

२. या कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे हिब्रू ही अधिकृत भाषा असेल. अरबी ही देखील एक विशेष भाषा असेल. हिब्रू आणि अरबी ही ७० वर्षे अधिकृत भाषा होती. सरकारी खटल्यांमध्ये या दोन्ही भाषांचा वापर करण्यात आला. या कायद्यामुळे ती प्रथा संपुष्टात आली. सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांना एकत्र आणले तरच राष्ट्र-राज्य महान होते. हिब्रू भाषेला अधिकृत भाषा बनवून इस्रायलने आधुनिक राष्ट्र होण्याची क्षमता गमावली आहे.

३. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्र-राज्य कायदा पॅलेस्टाईनमधील ज्यूंच्या स्थलांतराला कायदेशीर मान्यता देतो. या कायद्यानुसार ज्यू वसाहत संकुलांच्या बांधकामामुळे राष्ट्रीय मूल्य वाढेल.

नेशन स्टेट कायद्याने अरब किंवा ख्रिश्चनांचे नाव न घेता त्यांना नागरी स्वातंत्र्यातून काढून टाकले. भारतातील नागरिकत्व कायद्यात मुस्लिम नाही. गृहमंत्र्यांच्या कालगणनेवरून मात्र हे सर्व स्पष्ट झाले. आधी सीएए, मग एनपीआर आणि शेवटी एनआरसी!


- शाहजहान मगदूम


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget