शेख बिखारी साहेबांनी ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करणे हा एकमेव उद्देश असलेल्या जनरल डलहौसी यांच्या ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’ला विरोध केला. स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रीय राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध लढा दिला. त्यांचा जन्म १८१९ मध्ये बिहारच्या रांची जिल्ह्यातील बुड्मू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुपटे नामक गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शेख बुलंद होते.
मूळ गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिखारी लष्करात सैनिक म्हणून रुजू झाले. पुढे ते औडाघर प्रांताचा शासक ठाकूर विश्वनाथ शादेव यांच्या निमंत्रणावरून गेले आणि लवकरच ते प्रांताचे दिवाण बनले.
इंग्रजांकडून ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’चा धोका निर्माण झाला असून तो अटळ आहे, हे त्यांना जाणवले. इंग्रजांच्या विस्तारवादी कारवायांमुळे अधीर झालेल्या राज्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी त्यांनी अमानत अली अन्सारी, करामत अली अन्सारी आणि शेख होरे अन्सारी यांसारखे विशेष दूत विविध प्रांतांत पाठवले.
धोरणात्मक पाऊल उचलत व ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचे राम विजयसिंग व नादिर अली खान यांच्या सहकार्याने १८५७ मध्ये हजारीबाग जिल्ह्यातील रामगड येथील इंग्रजांच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला करून लढाई जिंकली.
या विजयाने उत्साहित होऊन त्यांनी आपल्या सैन्यासह संथाल परगण्यात प्रवेश केला आणि भानुका येथे इंग्रज सैन्याचा पराभव केला. या लढाईत काही इंग्रज अधिकारी मारले गेले. ठाकूर विश्वनाध यांनी विजयाचा जल्लोष केला.
दानापूर येथे कंपनीचे सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असल्याची माहिती मिळताच शेख बिखारी आणि तिकोंठा उमराव सिंग आपल्या सैन्यासह रामगड येथे पोहोचले. भयंकर लढाई सुरू झाली. प्रचंड शस्त्रधारी ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी स्वदेशी सैनिकांकडे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा कमी असला तरी त्यांनी लढाईत बाण आणि दगडांचा वापर केला.
अखेर इंग्रज राज्यकर्त्यांची झोप उडवणाऱ्या रणनीतीकार बिखारी यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांची नजर पडली. त्यांनी स्वदेशी सैन्यातील काही लोभी व्यक्तींना आमिष दाखवून बिखारीचे गुप्त ठिकाण शोधून काढले. कमांडर एमसी डोनाल्ड मोठ्या तुकडीसह तेथे प्रत्यक्ष गेले आणि त्यांनी ६ जानेवारी १८५८ रोजी बिखारी आणि उमराव सिंग यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांनी कोणताही खटला न चालवता दोघांना झाडाला फासावर लटकवले.
त्या संदर्भात एमसी डोनाल्ड म्हणाले - ‘बंडखोरांमध्ये बिखारी हा सर्वांत धोकादायक आणि कुख्यात बंडखोर आहे.’
यावरून शेख बिखारी साहेबांनी इंग्रज अधिकाऱ्यांना किती घाबरवले हे दिसून येते.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment