Halloween Costume ideas 2015

नाते रमजानचे क़ुरआनशी


रमजान, इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना, ज्या महिन्यात जगभरातील मुस्लिम पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. ते खाण्या-पिण्यापासून दूर राहतात. संपूर्ण महिना सत्कार्य सद्वर्तन व सुसहवासात घालवतात. आपल्या शरीराबरोबरच आत्म्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. साऱ्या मुस्लिम जगतात फार मोठे बदल या महिन्यात पाहायला मिळते. आध्यात्मिकतेकडे कल वाढलेला दिसतो. रमजानवर माहितीचे अनेक खंड उपलब्ध आहेत. पवित्र क़ुरआन व हदीस म्हणजेच पैगंबर वचन या आशीर्वादित महिन्याबद्दल काय म्हणते ते अधोरेखित करण्याचा या लेखचा उद्देश आहे. 

मुस्लिम उपवास का करतात?

अल्लाह (ईश्वर) क़ुरआनमध्ये म्हणतो : हे श्रद्धाधारकांनो! तुमच्यावरती उपवास अनिवार्य केले आहे जसे तुमच्या पूर्वींच्या लोकांवरती अनिवार्य होते, जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल. (क़ुरआन,अल-बकारा:183) 

या श्लोकात पवित्र क़ुरआन हे स्पष्ट करते की सर्व मुस्लिमांसाठी उपवास अनिवार्य आहे. उपवासाची ही पद्धत फक्त तुमच्याकरिताच नाही तर तुमच्या पूर्वी जितके मानवी समूह या पृथ्वीतलावर होऊन गेले, प्रत्येक मानवी समूहात हा उपवास होता. याचाच परिणाम आपण आजही पाहतो की विश्वातील जवळपास सर्व धर्मांत उपवासाची पद्धत आहे. त्यात कालानुरूप काही बदल व परिवर्तनही घडलेले आहेत. क़ुरआन त्या मूळ उपवासाची आठवण या रमजान महिन्यात करून देतो.

या उपवासाकरिता पवित्र क़ुरआनमध्ये सियाम असा शब्द आला आहे. याचा अर्थ थांबणे, रोखणे व दूर राहणे असा होतो. उर्दू भाषेत यालाच रोजा असे म्हणतात. रोजाची व्याख्या अशी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी दोन तासांपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे, न पिणे व पती-पत्नीत समागम न होणे म्हणजे रोजा. आपल्याकडे उपवास किंवा रोजा म्हटल्यानंतर फक्त काहीही न खाणे अथवा न पिणे इतकाच छोटासा अर्थ घेतला जातो. हा रोजा व उपवास फक्त शरीरातील एक अवयव पोटाचा झाला. या ठिकाणी रोजा म्हणजे फक्त पोटाचा नसून, शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे. डोळ्याने वाईट पाहू नये हा डोळ्याचा रोजा, मन व बुद्धीत मलीन विचार आणू नये हा मन व बुद्धीचा रोजा. खोटे बोलू नये, निंदा नालस्ती, तिरस्कार करू नये हा जिभेचा रोजा. निंदानालस्ती, चहाडखोरी, खोटेपणा ऐकू नये हा कानाचा रोजा. हातापायांना दुर्गुणांपासून दूर ठेवणे हा हातापायांचा रोजा. एकंदरीत रोजा हा शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे. पैगंबर मुहम्मद(स.) यांनी त्यांच्या काळात निंदा करणाऱ्या व ऐकणाऱ्या व्यक्तींचा रोजा तुटला म्हणून रमजान महिन्यानंतर पुन्हा एकदा ते धारण करण्यास सांगितले. 

आज समाजात लोक सर्रासपणे खोटे बोलतात. निंदा, चहाडखोरी, तिरस्कार करतात. मनात मलीन विचार आणतात. परस्त्रीला वासनेच्या दृष्टीने पाहतात. या सर्व दुर्गुणांवर जालीम उपाय जर कोणता असेल तर रोजा आहे. या रोजाचा मुख्य उद्देश पवित्र क़ुरआनने स्पष्ट करताना म्हटले आहे की, यामुळे तुमच्या ईशपरायणता निर्माण व्हावी. ईशपरायणता म्हणजे साऱ्या सृष्टीचा निर्माता, पालनहार त्याच्याविषयी आपल्या मनातील भीती व प्रेम. त्याच्या प्रेमापोटी सत्कार्य करत रहावे व भीतीपोटी दुष्कृत्यांपासून दूर राहावे. यालाच ईशपरायनता म्हटले आहे. ही ईशपरायणता प्राप्त करण्यासाठीच रमजान महिन्यात रोजी ठेवणे अनिवार्य आहे. 

...पण उपवास करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर. 

(क़ुरआन,अल-बक़रा:184) 

मन शुद्धी बरोबरच शरीरशुद्धीकरिताही रोजाचे महत्त्व कमी नाही. आज विज्ञान आणि वैद्यकशास्त्राने वर्षातून एक महिना उपवास करण्याचे आरोग्य आमच्या दृष्टीने असंख्य फायद्यांची पुष्टी केली आहे. पोट साफ करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. त्याशिवाय मेंदूसाठी अनेक आरोग्य फायदे आहेत. 

रशियन शास्त्रज्ञ यूरी निकोलाइएव व टेक्सास येथील डॉ. ऐलन कॉट यांच्यानुसार पूर्ण महिन्याचे रोजे पाळल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते, पोटात विषाक्त तत्त्वे असतील तर त्यांचा निचरा होतो, प्रतिकार शक्तीत वाढ होते, बौद्धिक शक्तीचाही विकास होतो. डॉक्टर सांगतात की, सर्वसामान्य दिवसांत आहारामुळे आमाशय निरंतर सक्रीय असते, परंतु रोजा ठेवला असताना त्याला आराम मिळतो. काही लोकांचं असंही म्हणणे आहे की, रोजामुळे अशक्तपणा येतो. हा गैरसमज आहे. पाणी कमी प्याल्यामुळे असे होत असले तरीही रोजा सोडल्यानंतर भरपूर पाणी प्याले, तर सगळं काही सामान्य होऊन जातं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले की, पूर्ण रमजान महिन्यात रोजे ठेवल्याने माणसाचा आहार पूर्णपणे संतुलित होऊन जातो. जॉर्डनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात निष्पन्न झालं की, रमजान महिन्यात दारू व धुम्रपानसारखी व्यसने सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे उपक्रम आता आशिया व आफ्रिकेत प्रामुख्याने राबवण्याचा प्रघात आहे.  

पवित्र कुरआन रमजानमध्ये प्रकट झाले:

रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. (अल-बकारा 2:185) 

पवित्र महिन्याचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे पवित्र क़ुरआन या महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) वर अवतरित झाले. रमजान इतर अकरा महिन्यासारखाच एक महिना आहे. या महिन्याला इतके मोठे श्रेष्ठत्व प्राप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात साऱ्या सृष्टीच्या पालनकर्त्याकडून विश्वातील सकल मानवजातीकरिता त्यांच्या कल्याणाचा, सफलतेचा मार्ग दाखविणारा वैश्विक ईशग्रंथ पवित्र क़ुरआन याच महिन्यात अवतरीत झाला. रमजानचे हे महात्म्य केवळ आणि केवळ पवित्र क़ुरआनमुळेच आहे. पवित्र क़ुरआन जीवन कसे जगावे याचे दैवी मार्गदर्शन असलेला हा ग्रंथ मानवजातीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. मानव या ईश्वरी ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वीतलावरील मानवाची उत्पत्ती, पहिले मानवी जोडपे, मानवी इतिहास, ईश्वरी आज्ञेनुसार जीवन जगणारा यशस्वी समूह. अवज्ञा करणारा अयशस्वी समूह. यशस्वीतेचा योग्य मार्ग, नियोजित वेळेनुसार भविष्यात होणारा प्रलय, प्रलयादिवशी विश्वातील प्रत्येक मानवाच्या प्रत्येक कर्माचा होणारा हिशोब, ईश आज्ञेनुसार जीवन जगून नेहमीकरिता आनंदी राहणारा समूह व नेहमीकरिता दुःख व ग्लानीत खिचपत पडून राहणारा समूह या सर्वांचे वर्णन पवित्र क़ुरआनमध्ये आढळते. याशिवाय मानवाचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन तसेच भूगोल, विज्ञान, इतिहास व खगोलशास्त्र या सर्व ज्ञानशाखांवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे. वरील सर्व विषयाव्यतिरिक्त पवित्र क़ुरआनच्या मूळ शिकवणी पुढीलप्रमाणे आहेत.

1. विश्वबंधुत्व: 

लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. (क़ुरआन, सूरह अल हुजरात:13) 

पवित्र क़ुरआन हे स्पष्ट करते की विश्वातील सर्व मानव आपापसात बंधू व भगिनी आहेत. ह. आदम व ह. हव्वा (अ.) हे विश्वातील पहिले मानवी जोडपे आहे. आज विश्वात जितके मानव आहेत आणि पुढे येतील त्या सर्वांचे मूळ हे मानवी जोडपे आहे. सकल मानवजातीचे मूळ आजोबा आणि आजी हे मानवी जोडपे आहे. आज विज्ञानाने ही सिद्ध केले आहे की कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा रक्त दुसऱ्या जाती-धर्माच्या व्यक्तीला चालतो. मानवी समूह भाषा, संस्कृती व राष्ट्राच्या नावाने आज विभाजित होऊन मानव मानवाचा तिरस्कार करीत आहे. पवित्र क़ुरआन हे आठवण करून देतो की, हे मानवा तुमचे आपापसात रक्ताचे नाते आहे. विश्वातील सकल मानव एकमेकांचे बांधव आहेत. विश्वबंधुत्व ही क़ुरआनची मूळ शिकवण आहे. 

2. एकेश्वरत्व:

साऱ्या सृष्टीचा निर्माता, रचयिता, शासक, पालक,मालक, धनी व स्वामी हा फक्त एक आणि एकच ईश्वर आहे. ही मूळ एकेश्वरत्वाची संकल्पना क़ुरआन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे एका शाळेचे दोन मुख्याध्यापक, एका राज्याचे दोन मुख्यमंत्री व एका देशाचे दोन प्रधानमंत्री असू शकत नाहीत, तद्वतच एवढ्या मोठ्या सृष्टीचे एकापेक्षा जास्त ईश्वर कसे असू शकतील? सद्सतविवेक बुद्धीला पटणारी ही बाब नव्हे. ईश्वर एकच आहे. त्याला जाणलं पाहिजे. त्याचं मानलं पाहिजे. यातच आपले कल्याण आहे, ही भावना क़ुरआन स्पष्ट करतो. पवित्र क़ुरआन एका ईश्वराचा परिचय करताना म्हणतो, अल्लाह एक आहे. तो स्वयंभू आहे. ती कोणाचीही संतती नाही आणि त्याचीही कोणी संतती नाही. त्यासमान कोणीही नाही (क़ुरआन, सूरह इख़लिस 1-7)

संत तुकोबारायांनीही आपल्या अभंगात म्हटले आहे, आपूला तो एकची देव करुनी घ्यावा, तेनेविना जीवा सुख नसे. 

3. प्रेषितत्त्व:

ईश्वराने पृथ्वीतलावर मानवाला निर्माण करून सोडून दिले नाही तर, मानवाने जीवन कसे जगावे याबाबतीत स्वतः आचरण करून मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी आपले दूत पाठवले. हेच दूत प्रेषित, संदेशवाहक किंवा पैगंबर म्हणून ओळखले जातात. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वचनानुसार मानवी समूहाच्या व्युत्पत्तीपासून ते आजतागायत जवळपास एक लाख चोवीस हजार संदेश वाहक विश्वातील प्रत्येक भागात येऊन गेले. प्रत्येकानी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला. या प्रेषित श्रृंखलेतील अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मानवाचे प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. याच प्रेषितांबद्दल पवित्र क़ुरआनमध्ये ईश्वर म्हणतो, हे पैगंबर मुहम्मद (स.) आम्ही तुम्हाला सर्व मानवजातीकरिता कृपा बनवून पाठविले आहे. आजही पैगंबर चरित्र व त्यांच्या शिकवणी सकल मानवांकरिता पूर्णपणे सुरक्षित व उपलब्ध आहेत. 

4. मरणोत्तर जीवन:

ही पवित्र क़ुरआनच्या मूळ शिकवणीपैकी एक महत्त्वाची श्रद्धा आहे. मानवी जीवन दोन भागात विभाजित केलेले आहे. एक इहलोकीय जीवन व दुसरे परलोकीय जीवन. इहलोकीय जीवन अशाश्वत आहे. परलोकीय जीवन शाश्वत आहे. इहलोकीय जीवन कर्म करण्यासाठी आहे आणि परलोकीय जीवन कर्माच्या मोबदल्या करिता आहे. इहलोकीय जीवनात केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माचा जाब परलोकीय जीवनात द्यावा लागेल व त्याचे फळही भोगावे लागेल. एकंदरीत मरणोत्तर जीवनाची ही संकल्पना मानवात उत्तरदायित्वाची भावना रुजविते. प्रत्येक कर्म करताना मनुष्य विचार करतो की मला कोणी पाहो अथवा न पाहो, माझा निर्माता तरी पाहत आहे आणि उद्या त्याच्याशी गाठ आहे. ही भावना मानवाला सत्कृत्य करण्यासाठी परावृत्त करते व दुष्कर्मापासून दूर ठेवते.

याच विश्वासाला संत तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात,  तुका म्हणे काळी लावीयेले माप, जमा करी पाप पुण्याची.वरील चार श्रद्धा अंगीकारून जीवन जगणारा व्यक्ती इहलोकीय व परलोकीय दोन्ही जीवनात पूर्णपणे यशस्वी होतो अशी ग्वाही पवित्र क़ुरआन देतो. 

पवित्र क़ुरआनची वैशिष्ट्ये

पवित्र क़ुरआन सकल मानवजातीच्या कल्यानाचा मैग्नाकार्टा आहे. पृथ्वी, सूर्य, चंद्र, हवा, पाणी, प्रकाश, अन्न, वृक्ष, सृष्टी जसे सर्वांर्करिता आहेत तसेच पवित्र क़ुरआनही सर्वांकरिता आहे. साऱ्या सृष्टीचा निर्माता अल्लाह ईश्वर तसाच क़ुरआनचाही निर्माताही तोच. विश्वातील प्रत्येक मानवाचा त्यावर अधिकार आहे. प्रत्येकाने त्याला जाणले व मानले पाहिजे. हा प्रत्येकांचा हक्क आहे. 

क़ुरआनची वैशिष्ट्ये:

क़ुरआनची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे हा विश्वातील अंतिम व सुरक्षित ईश्वरी ग्रंथ आहे. याअगोदर अनेक ईशग्रंथ अवतरित झाले. काळानुरूप त्यात परिवर्तन झाले किंवा घडवण्यात आले. मूळ रूपात मूळ शिकवणी सुरक्षित राहिल्या नाहीत. पवित्र कुरआनचा इतिहास चौदाशे पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ते अवतरीत झाले. एवढा मोठा कालावधी लोटूनही, आजही हा पूर्णपणे सुरक्षित आहे. यात काना, मात्रा, वेलांटीचाही फरक आढळणार नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत हा पूर्णपणे सुरक्षित राहील याची शाश्वती स्वतः याचा निर्माता अल्लाह ईश्वराने दिलेली आहे. 

याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा सकल मानवजातीकरिता आहे. यात मानव केंद्रस्थानी आहे. लोकांनो लोकहो असे संबोधन वारंवार आलेले आहे. सकल मानव जातीला उद्देशून पवित्र क़ुरआनमध्ये सृष्टिनिर्माता बोलतो.

साऱ्या विश्वात सर्वांत जास्त पठण केला जाणारा हा एकमेव ईशग्रंथ आहे. मुस्लिम बांधव सहसा दररोज याचे वाचन करतात. रमजानच्या महिन्यात पूर्णपणे वेळ काढून वाचन करत असतात. याशिवाय दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत असताना त्यात पवित्र क़ुरआनचे वाचन अनिवार्य आहे.

हा जिवंत भाषेतील जिवंत ग्रंथ आहे. विश्वातील अनेक देशात अरबी भाषा बोलली व वापरली जाते. पवित्र क़ुरआन मूळ अरबी भाषेत आहे. आपल्या भारत देशातील विविध मदरशात व घरोघरी मुस्लिम बांधव ही भाषा शिकत असतात. 

पूर्णपणे मुखोद्गत केला जाणारा हा विश्वातील एकमेव ग्रंथ आहे. पवित्र क़ुरआनचे एकूण 30 खंड, 114 अध्याय व 6236 श्लोक आहेत. एवढा मोठा ग्रंथ पूर्णपणे मुखोद्गत केला जातो. मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीला हाफीज़ क़ुरआन म्हणतात. साऱ्या विश्वात हा ग्रंथ मुखोद्गत करणारे लाखोंच्या संख्येने आहेत.

मानवी समूहाला आवाहन करणारा हा ग्रंथ आहे. अल्लाह या ग्रंथात आवाहन करत म्हणतो की, तुम्ही या ग्रंथातील कृतीसारखी एक किंवा दोन श्लोक बनवून दाखवा? आज पर्यंत कोणीही अशी कृती बनवू शकली नाही.

आपल्या इलोकीय व परलोकीय जीवनाची सफलता दाखवणारी एवढी महान कृती पवित्र क़ुरआनच्या स्वरूपात मिळाल्याबद्दल त्या सृष्टीनिर्मात्याचे आभार व्यक्त करण्यासाठी विश्वातील सर्व मुस्लिम बांधव या रमजानच्या महिन्यात रोजे धारण करतात. सृष्टी निर्मात्याचे आभार व्यक्त करण्याची ही सर्वोत्तम पद्धती आहे. पवित्र क़ुरआन जसे सर्वांकरिता आहे, तेव्हा प्रत्येक मानवाने याबाबतीत विचार केला पाहिजे की, मी कमीत कमी एकदा तरी त्याचे वाचन करावे. माझ्या निर्मात्याने माझ्यासाठी काय उपदेश दिला आहे, हे जाणण्याची उत्सुकताही प्रत्येकात हवी.

आज विश्वातील प्रत्येक भाषेत पवित्र क़ुरआनचे भाषांतर उपलब्ध आहे. मी वाचकांना अतिशय नम्रपणे, अंतर्मनाने विनंती करतो की, कृपया - कृपया थोडा वेळ काढून आपल्या भाषेत या ग्रंथाचे वाचन करावे. उद्या आपल्या निर्मात्यासमोर प्रत्येकाला हजर व्हायचे आहे. आज ही संधी आपणाकडे आहे आपण या संधीचे सोनं करून घ्यावे. पुन्हा विनंती.


- अब्दुल मुजीब, उदगीर

9421378600


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget