Halloween Costume ideas 2015
August 2024


पावसाळा आला की सर्वत्र तारांबळ उडते. एक तर मुलांच्या शाळा सुरू होतात, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतात, वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पर्यटकांच्या सहली निघतात. या सर्वात केंद्रस्थानी असतो पाऊस. उन्हाळा भर सुट्ट्यांचा आनंद घेणारे विद्यार्थी पावसाळ्यात आपल्या वह्या-पुस्तकांबरोबरच छत्र्या आणि रेनकोटच्या बाजारांची शोभा बनतात. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या तयारीसाठी कृषी केंद्रे आणि शेत-अवजारांची दुकाने गजबजून जातात; कारण पहिला पाऊसच पेरणीच्या तयारीची सूचना देत असतो. आषाढी एकादशी आणि मृग नक्षत्राच्या सरी वारकऱ्यांच्या पायी जाणाऱ्या दिंड्यांना भिजवून त्यांचा आनंद द्विगुणित करत असतो. दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा ओंढा वाहत नदी-नाल्यांचे पात्र भरायला वेळ लागत नाही आणि त्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पाणथळ्यांच्या दिशेने गर्दी जमवत असतात. 

या पावसाच्या आनंदात आणि उल्हासात लोक हे अगदी विसरून जातात की या सुखद पावसाळ्यापूर्वी एक कडक उन्हाळा आपण असा अनुभवलाय की एखाद्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे वांधे तर कधी बिना आंघोळीचा एखादा दिवस आपण घालवलाय. पावसाळ्यात जेव्हा या दिवसांची आठवण होते तेव्हा ’गेले ते दिवस’ म्हणून आपण सुटकेचा श्वास घेतो. मात्र तेच दिवस परत पुढच्या उन्हाळ्यात येतील आणि आपल्याला आज पडणाऱ्या पावसाचे व्यवस्थापन करावे हा विचार फार कमी लोकांच्या मनात येतो. यासाठी योग्य विचार आणि चिरकाल तोडगा काढण्यासाठी शाश्वत जल व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली.

शाश्वत जल व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक समता सुनिश्चित करत, वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंपत्तीचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करणे. शाश्वत जल व्यवस्थापन करण्यासाठी पहिला पैलू म्हणजे जलसंवर्धन; यामध्ये आपण कार्यक्षम पद्धतींद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून आणि वापर कमी करून पाण्याचे संवर्धन म्हणजे बचत करू शकतो. दुसरा पैलू वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकतो ज्यामध्ये आपण पिण्यायोग्य वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करून साठवून ठेवतो. पाण्याचा पुनर्वापर हा तिसरा पैलू आहे. कृषी किंवा औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणखी एक पैलू म्हणजे पाणलोट व्यवस्थापन. यात नैसर्गिक जलचक्र आणि वेगवेगळ्या अधिवासांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्संचयन केल्यास पाण्याचे व्यवस्थापन होते. पाणी आणि उर्जेचा वापर यांच्यातील परस्परावलंबन सुद्धा जल व्यवस्थापनात मदत करू शकते. कृषी जल व्यवस्थापन हा पैलूही उल्लेखनीय आहे; कार्यक्षम सिंचन प्रणाली आणि पद्धतींची अंमलबजावणी केल्यास फायदेशीर ठरेल. जल-कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि पद्धतींसह शहरांची रचना करून देखील शाश्वत जल व्यवस्थापनास हातभार लागेल. विविध जल धोरणे आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम यात उपयोगी ठरतील. जलशिक्षण आणि जागरूकता; वापरकर्त्यांना पाणी टंचाई आणि संवर्धनाबद्दल वेळीच जागरूक केले जावे. जल तंत्रज्ञान आणि नवकल्पना हाही एक पैलू होऊ शकतो ज्यामध्ये शाश्वत जल व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे आणि लागू करणे जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची बचत होईल. शाश्वत जल व्यवस्थापन केल्यास जीवन अधिक सुखकर होईल यात शंका नाही. याशिवाय अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल, आर्थिक पाठिंबा, परिसंस्थांचे संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम कमी होतील, सामाजिक समता आणि न्याय यांना प्रोत्साहन मिळेल. शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो ज्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, वारकरी आणि पर्यटक तितक्याच उल्हासात पावसाळ्याची सुरूवात करतील.

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. : 7507153106



मधमाशी दिसायला अगदी  लहान असते पण तिची कामे फार मोठी असतात. आपण तिच्या कामाचे विचार केले तर आपल्याला तिची योग्यता आश्चर्यचकित करते. तिचे खास काम मध तयार करणे होय, जे खूप गोड असते, आणि ज्यामध्ये औषधी चे गुण असतात. चला तर मग चिंतन करूया. आणि मध बनवण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या प्रक्रियेमध्ये बहुतेक माशा असतात, ज्यामध्ये राणीमाशीला सर्वाधिक स्थान असते. ती पूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. असे समजा की ती इतर माशांची नेता आणि मार्गदर्शक असते. राणीमाशी इतर कामगार माशांपेक्षा वेगळी असते. तिचा शरीर इतर माशांपेक्षा मोठा असतो. इतर माशा राणीमाशीसाठी अन्न तयार करण्याचे काम (आतील पान 7 वर)

करतात. त्याशिवाय, विविध माशांच्या वेगवेगळे काम असतात, जो राणीमाशीने त्यांना दिलेली असतात. राणीमाशीचे खरे कार्य हे आहे की ती तीन आठवड्यांमध्ये सुमारे 11 ते 12 हजार अंडे घालते. या अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम इतर माशांचा एक गट करतो. आणि एक समूह तो असतो, जो अंड्यांमधून  - बाहेर पडलेल्या बाळांची देखभाल आणि प्रशिक्षण करतो. काही माशा पोळा बनवतात, तर काही संरक्षणाची कामे करतात. रक्षक माशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पोळयात येऊ देत नाहीत. काही माशांचा समूह तो असतो जो सैनिकाची भूमिका बजावतो. त्याचे काम शत्रूंशी सामना करणे असते आणि पोळयाचे  रक्षण करणे हेसुद्धा त्याच गटाची जबाबदारी असते. काही माशा रस ओढून आणतात, काही मध आणि मोमचा पोळा बनवण्याचे काम करतात.

या माशांमध्ये नकाशा बनवण्याची क्षमता असते, जशी गूगल मॅपमध्ये असते. या माशा सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या चुंबकीय ताकतचे  वापर करून कठीण नकाशा बनवू शकतात. आणि आपल्या पोळयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करतात. एखादी दुसरी माशी राणीमाशी बनण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला मारले जाते. या माशा स्वच्छ असतात, स्वच्छ वस्तूंपासून अन्न बनवतात, अस्वच्छ वस्तूंवर बसत नाहीत, आणि कोणालाही हानी पोहोचवत नाहीत.

एक हदीस आहे ज्यामध्ये मानवाचे  उदाहरण मधमाशी सारखे दिले आहे. हदीस हे आहे की,      ‘माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे, जी पवित्र वस्तू खाते आणि पवित्र वस्तू उत्पन्न करते. ती जेथे बसते तेथे ती ना तोडते, ना बिघडवते (मुस्नद अहमद)’.

खरोखरच, माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे जे माणूस स्वच्छता आणि पवित्रता पसंत करतो, मेहनती  असतो, आणि स्वतःचा मार्ग शोधतो. अल्लाहने दिलेल्या बुद्धीचा वापर करून, आपले ध्येय गाठतो, मग ते या जगाचे ध्येय असो किंवा परलोकाचे.

तो माणूस नफा देणारा असतो, लोकांच्या भल्यासाठी कार्य करीत असतो, आणि लोकांना नफा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो, अगदी त्या मधमाशीप्रमाणे जी मेहनत करून रस ओढून आणते. तो संघटनेत राहतो, संघटनेशी जोडलेला राहतो, एकटे भरकटत नाही, आपल्या प्रमुखांच्या(अमीर) आज्ञेचे पालन करतो. 

जर  संघटनेच्या संरचनेत काही त्रुटी दिसली तर तो ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी त्रुटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला योग्य मार्गावर आणतो. जर कोणी शत्रू संघटनेच्या संरचनेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपला शत्रू समजून त्याचा नाश करतो.

खरोखर, एका माणसाची आणि खऱ्या व्यक्तीची अशी गुणधर्म असावी की तो प्रमुखाचे आज्ञा पालन करतो, कारण प्रमुखाचे आज्ञापालन हे रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन आहे, आणि रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन करणे हे अल्लाहचे आज्ञापालन आहे.

आणि जो कोणी अल्लाहचे आज्ञा पालन करतो, तो खरेच या जगात आणि परलोकात यशस्वी होतो, कारण जीवनाचा खरा उद्देश अल्लाहचे आज्ञा पालन आहे, त्याची बंदगी आहे, त्याच्यासमोर नतमस्तक होणे आहे, त्याच्याशी प्रेम करणे आहे, त्याच्याशी मागणे आहे, त्याच्यासाठी जगणे आहे, आणि त्याच्यासाठीच मरणे आहे.

ज्याप्रमाणे मधमाशी मध बनवण्याचे कार्य करते, फुलांचा रस ओढते, ज्यामध्ये उपजिविका आहे आणि औषध देखील आहे, तसाच एक माणूसही लोकांची भूक आणि तहान मिटवण्याचे कार्य करतो,लोकांच्या दुःखांची वेदना कमी करणारा बनतो.

अगदी त्याचप्रमाणे एक नेक व्यक्ती आणि इमानवंत बंधू, कुरआनावर विचार करतो व बुद्धीचा वापर करतो, कानांनी ऐकतो, कुरआणाच्या गोष्टी समजुन घेतो,  ज्यामुळे त्याला सत्य प्राप्त होते, कुरआन ऐकून, समजून, बुद्धीचा वापर करून, कुरआनावर विचार करुन आणि अल्लाहशी  जवळीक साधून. त्याला अल्लाह मिळतो, तो अल्लाहशी प्रेम करतो, त्यांचे जीवन पवित्र होते. तो लोकांना भल्याचा आदेश देतो आणि वाईटापासून दूर ठेवतो. एक शिस्तबद्ध जीवन जगतो आणि खोटे आणि वाईट कामांपासून दूर राहतो.

पवित्र कुरआनमध्ये आहे की,’’  आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव.व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघते जे लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील संकेत आहे त्या लोकांकरिता जे गांभिर्याने विचार करतात.(दिव्य कुरआन सुरह: अन नहल: आयत:68,69)

मधमाशीला ही बुद्धी कोणी दिली? स्पष्टच आहे की तिच्या निर्माणकर्ता ने दिली. ही मधमाशी, बुद्धीचा योग्य वापर करून, अल्लाहच्या आज्ञेनुसार लाभदायक काम करते. 

अखिल मानवजाती साठी यात खूप मोठा धडा आहे. मानवाला पाहिजे की त्याने या छोट्या मधमाशीपासून धडा घ्यावा, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करावे, आपल्या क्षमतांचे ओळख करून घ्यावे, आणि त्यांचा अधिकाधिक चांगला वापर करून घ्यावा. एक नीतिमान आणि पवित्र जीवन जगावे, अल्लाहचा दास बनून राहावे, आणि त्याचीच आज्ञा पाळावी. जसे, अल्लाहचे दास बनून मधमाशी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करते आणि एक पवित्र जीवन जगते. तुमच्या पैकी श्रेष्ठ तो आहे जो लोकांना फायदा पोहचवत असतो. (हदिस) 


- आसिफ खान, धामणगाव बढे

9405932295


मृत्यूपासून शिक्षेची सुरूवात


मृत्यूनंतर कयामतचा दिवस येईपर्यंतच्या काळाला बरज़ख़ी जीवन म्हणतात. मुस्लिम समाजात मृतदेह कबरमध्ये दफन करतात म्हणून या जीवनाला ’कबर की जिन्दगी’ असेही म्हणतात. या जीवनात नास्तिक, अनेकेश्वरवादी व इतर पापी लोक दु:ख भोगतात, तर एकमेव ईश्वर, अल्लाहवर श्रध्दा ठेवणाऱ्या सदाचारी लोकांना दिलासा मिळतो. हे मात्र नक्की की मृत्यू ते कयामत या काळात सुख किंवा दुःख यांपैकी कोणत्याही एका परिस्थितीतून प्रत्येक माणसाला जावेच लागते. मग मृत व्यक्ती दफन केला गेला असो, जाळला गेला असो किंवा ते प्राण्यांचे अन्न बनलेले असो. मृत व्यक्तीची अवस्था सांसारिक जीवनातील लोकांना दिसत नाही. आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी म्हटले आहे की, 

मला ही भीती वाटते की तुम्ही तुमच्या मृतांना दफन करणे थांबवाल, अन्यथा मी अल्लाहकडे प्रार्थना केली असती की मी ऐकत असलेल्या कबरीतील यातनांचा आवाज तुम्हालाही ऐकू यावा. (हदीस संग्रह मुस्लिम - 7213 खपीं.. 2867 - इस्लाम 360 )बरज़ख़ी जीवनात मिळणारी शिक्षा जिन्न आणि मानवांपासून लपवून ठेवली गेली आहे. त्यांना ती अजिबात दिसत नाही, पण त्यांच्याशिवाय इतर प्राण्यांना त्याची थोडीफार जाणीव होत असते. जर ती परिस्थिती उघड केली गेली आणि लोकांनी मृतांचे रडणे, ओरडणे ऐकले तर त्यांना मृत्यूची इतकी भीती वाटेल की ते कुणाच्याही अंत्यसंस्काराला जाऊ शकणार नाहीत, कोणतेही काम करू शकणार नाहीत आणि जगाची व्यवस्था विस्कळीत होईल. कबरमध्ये मिळणाऱ्या यातना अल्लाहच्या अदृश्य व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे, अल्लाहुम्-म इन्नी अऊज़ुबि-क मिन् अज़ाबिल्-कब्-रि हे अल्लाह! कबरीच्या यातनापासून मी तुझा आश्रय घेतो.( हदीस संग्रह - बुख़ारी 1377 - इस्लाम 360 )

याशिवाय शिक्षेकडे नेणाऱ्या सर्व कृती टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. कबरीच्या शिक्षेस कारणीभूत ठरणारे काही गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत. अल्लाहच्या अस्तित्वात, गुण सामर्थ्यात, हक्क व अधिकारात कुणाला सामील करणे, दांभिकपणा, ढोंगीपणा करणे, अल्लाहचे कायदे बदलणे, लघवीच्या थेंबापासून स्वतःचे रक्षण न करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याच्या बद्दलच्या वाईट गोष्टी दुसर्यास सांगणे, लावालावी करणे, खोटे बोलणे, कुरआन शिकल्यानंतर त्याकडे लक्ष न देणे, अनिवार्य नमाज़ झोपेत घालविणे, व्याज खाणे, व्यभिचार करणे, लोकांना चांगले शिकवणे पण स्वतःला विसरणे, रमजानमधील उपवास विनाकारण तोडणे, पुरुषांनी घोट्याच्या खालपर्यंत असलेले कपडे घालणे, एखाद्या प्राण्याला कैद करून त्याचा छळ करणे व कर्ज न फेडणे इत्यादी. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पाहा,

इस्लाम सवाल व जवाब

अज़ाबे कब्र के तफ्सिली असबाब.


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ पुरुषांचाच नव्हे तर स्त्रियांचाही मोठा संघर्ष होता. समाजाच्या बंधनांना आणि रूढींना आव्हान देत, अनेक स्त्रिया या लढ्यात सहभागी झाल्या आणि त्यांनी देशासाठी मोठे बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार केला तर भारतातील महिला स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील १८५७ च्या उठावात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताच्या लढ्यात महिलांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. अनेक धाडसी महिलांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून मिरवणुका काढल्या आणि व्याख्याने आणि निदर्शने केली. या महिलांमध्ये प्रचंड धाडस आणि प्रखर देशभक्ती होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्त्रियांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. भारतातील स्त्रियांनी केलेल्या बलिदानाला भारतीय इतिहासाच्या इतिहासात प्राथमिक स्थान आहे. त्यांनी खर्‍या आत्म्याने आणि निःसंकोच शौर्याने लढा दिला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वेदना, शोषण आणि दुःखांचा सामना केला.

१८५७ च्या सैनिक बंडात, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आणि झाशीची राणी यांसारख्या स्त्रियांनी आपले शौर्य आणि पराक्रम दाखवून ब्रिटिश सैन्याला कडवी लढाई दिली. सामाजिक सुधारकांनी शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह सारख्या मुद्द्यांवर लढा दिला. यात रमाबाई, ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांचा समावेश होता.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसोबतच स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढू लागला. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या स्त्रियांनी भाषणे, निषेध मोर्चे आणि बहिष्कार चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसक सत्याग्रहात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा सहभाग हा चळवळीचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली पैलू होता. स्त्रियांच्या स्वातंत्र्य युद्धातील कामगिरीकडे सतत दुर्लक्ष झाले आहे.

अनेक महिला काँग्रेस पदाधिकाऱ्या बनल्या आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी रणनीती तयार करण्यात आणि अंमलात आणण्यात सहभागी झाल्या. महिलांनी समाज सुधारणे आणि शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यासारख्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था आणि आंदोलने सुरू केली. अनेक महिलांनी स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारण्यासाठी दान केले. काही महिलांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला आणि ब्रिटिश सरकारविरोधात लढा दिला.

स्त्रियांच्या सहभागाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी गती मिळाली. या लढ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर, महिलांना समान अधिकार आणि संधी मिळण्यासाठी लढण्यास प्रेरणा मिळाली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचे योगदान अमूल्य होते. त्यांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोठी भूमिका बजावली. आजही, त्यांची प्रेरणादायी कथा आपल्याला समानता आणि न्यायासाठी लढण्यास प्रेरित करते. राणी लक्ष्मीभाई देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. १८१७ च्या सुरुवातीला भीमाबाई होळकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिल्यापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग सुरू झाला. मादाम भिकाजी कामा, १८५७ च्या उठावानंतर आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समाजवादी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्रातील अनेक गांधीवादी महिलांचे योगदान आहे. डॉ. अॅनी बेझंट यांचेही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्वाचे आहे. स्वातंत्र्यासाठी व्यापक, सर्वसमावेशक आणि शाश्वत चळवळ उभारण्यात या महिलांचे योगदान मोलाचे होते. स्वराज्यासाठीच्या चळवळीत जशा अहिंसक सत्याग्रहात हजारो स्त्रिया सामील झाल्या, तशा अनेक स्त्रिया सशस्त्र क्रांतिकारक बनल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांना सहभागी करुन गांधींनी स्त्रीयांना नागरीक म्हणून आपले कर्तव्ये पार पाडण्याची संधी दिली. बेगम साफिया अब्दुल वाजिद यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनासाठी अलाहाबाद विद्यापीठातली आपली प्राध्यापकीची नोकरी सोडली, मादाम भिकाजी कामा यांनी देशाबाहेर भारताला स्वातंत्र्य मिळावे, या विचारांचा प्रसार केला. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं सर्वांत मोठं आंदोलन म्हणून ‘चले जाव’ची नोंद होते. या आंदोलनात असंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर अनेक सुधारणावादी चळवळी सुरु झाल्या. स्त्रियांच्या दर्जात सुधारणा घडविण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी मोठे आणि  महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचे बलिदान आहे. त्यात वेगवेगळया धर्माचे, समाजातील व्यक्तींचा सहभाग आहे. देशातल्या अनेक राज्यांतील नेत्यांच्या योगदानानं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. हे आपल्याला माहिती आहे. मात्र यासगळ्या लढ्यात महिलांच्या संघर्षाकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही. त्यांच्या योगदानाची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही. 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्याचा उल्लेखही आहे. त्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. मात्र आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. याचा विचार आपण करायला हवा. त्या महिला शूर आणि निडर होत्या. मात्र यासगळ्यात आपल्याला त्यांच्या त्या संघर्षाचा विसर पडला की काय असे वाटते, आपण त्यांच्या त्या योगदानाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. ज्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या योगदानाची नोंद आपण घ्यायला हवी. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही महिलांच्या योगदानाच्या उल्लेखाअभावी अपूर्ण आहे. असे आपल्याला वाटते. हे मानसीनं म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं आपण त्या महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा.

चले जाव आंदोलनाच्या नायिका म्हणून अरुणा असफ अलींकडे पाहिलं जातं. भूमीगत राहून स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या अरुणाबाईंच्या क्रांतीच्या निर्धाराला स्वत: महात्मा गांधीही बदलू शकले नाहीत. मात्र, गांधींची भेट घेण्यासाठी अरुणाबाईंनी केलेलं अद्वितीय धाडस इतिहासात नोंदवलं गेलंय. अरुणाबाई विचारानं समाजवादी. चले जाव आंदोलनातील त्यांचे समाजवादी साथी एक एक करून गजाआड होत होते. त्यात जयप्रकाश नारायण यांना गुन्हा मान्य करण्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपवल्याची बातमी फुटली. संपूर्ण देश हादरला. यावेळी अरुणाबाईंची तर सरकारला खाऊ की गिळू अशी अवस्था झाली होती. पायाला भिंगरी लावून अरुणाबाई तरुणांना चळवळीत आणण्यासाठी फिरत होत्या. हे सर्व भूमीगत कार्य असल्यानं त्यांची तब्येतही ढासळत जात होती. अरुणाबाईंच्या तब्येतीच काळजी वाटत असल्याचं म्हणत गांधीजींनी त्यांना भेटण्यास बोलावले. या भेटीची जबाबदारी ग. प्र. प्रधान यांच्यावर होती. पुण्याच्या पारसी सॅनिटोरियमच्या मागील बाजूस गांधीजींच्या निवासाची कुटी होती. सॅनिटोरियमचा भाग असल्यानं तिथं फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा घेत अरुणाबाई तिथं पोहोचल्या.

अरुणाबाई वेशांतर करून तिथं पोहोचल्या होत्या. पारशी महिलेचं वेशांतर अरुणाबाईंनी केलं होतं. गांधींना त्यांची ओळख पटावी म्हणून अरुणाबाईंनी गांधींना भेटल्यावर ‘कापडिया’ हा सांकेतिक शब्द उचारण्याचं ठरलं होतं. अरुणाबाईंना पाहताच गांधींनी त्यांना घातपाती चळवळ बंद करून पोलिसांच्या स्वाधीन होण्याची विनंती केली. मात्र, त्यावर अरुणाबाई म्हणाल्या, “मी तुमचा अत्यंत आदर करते. पण आपले विचार जुळणारे नाहीत. मी क्रांतीवादी आहे आणि क्रांतीवादी म्हणूनच काम करणार. आपल्याला शक्य असल्यास मला आशीर्वाद द्यावा.”  आपले रस्ते वेगळे आहेत, हे सांगण्याचे धाडस अरुणाबाईंमध्ये होतं आणि गांधींनी भेटीसाठी बोलावलंय म्हटल्यावर जीवावर बेतणार असल्याचं कळूनही त्यांना भेटण्यासाठी जाण्याचं धाडसही त्यांच्यात होतं. अरुणा असफअली मात्र अखेरपर्यंत इंग्रजांच्या हातात सापडल्या नाहीत. त्यांना पकडून देणाऱ्यास पाच हजारांचं बक्षीस इंग्रजांनी जाहीर केलं होतं. युसुफ मेहरअलींनी अरुणाबाईंबद्दल म्हटलं होतं की, ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनंतर अरुणाताई याच स्वातंत्र्ययुद्धाच्या नायिका होत्या.’

- डॉ. सुनील दादा पाटील

कवितासागर फिचर्स, जयसिंगपूर जि.कोल्हापूर, मो.-9975873569



पवित्र कुरआनात असे म्हटले गेले आहे की एक दिवस जेव्हा सर्व मानवजाती अल्लाहसमक्ष उभी केली जाईल आणि ज्यांनी कुणाला लुबाडून त्याचा माल खाल्ला असेल त्याचा हिशोब घेतला जाईल. जर तुम्ही कर्जदारांना माफ केले असेल, नेकी केली असेल, तर अल्लाहजवळ तुम्हाला याचा पुरेपूर मोबदला मिळेल.

अज्ञानकाळात व्याज घेण्याची एक पद्धत अशी होती की शेतकरी पुढच्या वर्षी जे पीक घेईल त्यावर कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सावकाराकडून कर्ज धेत होते. पण जेव्हा घेतलेले कर्ज फेडण्याइतके शेतीचे उत्पन्न निघाले नाही तर सावकार त्यांना पुढच्या वर्षीचे पीक येईपर्यंत कर्जफेडीची मुदत वाढवून द्यायचे. पण आधी जे ठरले होते त्यापेक्षा अधिक उत्पन्न त्यांना सावकारांना द्यावे लागे. एका वर्षासाठी जर त्यांनी १० माप अन्नधान्य किंवा इतर जे कोणते पीक असेल तेवढे द्यायचे ठरवले गेले होते तर मुदतवाढीमुळे त्यांना पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट माल द्यावा लागत होता. त्या वर्षीही शेतीउत्पन्न बरोबर आले नाही तर पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वर्षांत चार पटीने जास्त द्यावे लागत होते. जितके कर्ज घेतले गेले असेल त्याच्या कित्येक पटीने कर्जाची परतफेड करावी लागत होती. अल्लाहने पवित्र कुरआनद्वारे तंबी दिली की, “श्रद्धावंत लोकहो, दुप्पट-चौपट चक्रवाढ पद्धतीने व्याज खाऊ नका. अल्लाहचे भय बाळगा, तरच तुम्हाला यशप्राप्ती होईल.” (पवित्र कुरआन, ३:१३०)

या आयतीत हेही सांगितले गेले आहे की व्याज घेणाऱ्यावना नरकाची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी व्याज घेणाऱ्यांना म्हटले होते की “मी पाहतो की रक्ताच्या एका नदीत एक माणूस पोहत आहे आणि दुसरा माणूस त्या नदीच्या काठावर हातात दगड घेऊन उभा आहे. रक्ताच्या नदीत पोहणारा माणूस जेव्हा थकून किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा काठावर उभा असलेला दुसरा माणूस आपल्या हातातील दगड पोहणाऱ्या माणसाच्या तोंडाचा नेम धरत त्याला मारतो. श्वास घेम्यासाठी त्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडात दगड मारतो. पोहणारा तो दगड गिळून पुन्हा त्याच रक्तात गुरफटून जातो. रक्ताच्या नदीत पोहणारा हा माणूस व्याजाचा धंदा करतो हे अल्लाहचे दूत (फरिश्ते) जिब्रईल (अ.) यांनी म्हटले आहे.” (सहीह बुखारी)

लोक मेहनत-मजुरी करून आपल्या रक्त व घामाने जी कमाई करतात, व्याज खाणारा सहजतेने काही कष्ट सहन न करता त्याच्या कमाईवर कब्जा करतो. म्हणजे असा माणूस इतर माणसांच्या रक्तात पोहत असतो. जे इतरांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होतात त्यांनाही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सहाय्य करण्यास रोखले आहे. व्याज घेणारे, व्याज देणारे, व्याजाच्या व्यवहारावर साक्ष असणारे आणि व्याजावर आधारित देवाणघेवाण करण्यासाठी कागदपत्रे लिहिणारे या सर्वांचा धिःक्कार केला गेला आहे.

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(९७) ज्याला अल्लाहने बोधित केले तोच मार्गदर्शन मिळविणारा आहे आणि ज्याला तो मार्गभ्रष्ट करील त्याच्याशिवाय अशा लोकांसाठी तुला कोणीच समर्थक व साहाय्यक मिळू शकत नाही. या लोकांना आम्ही पुनरुत्थानाच्या (कयामतच्या) दिवशी तोंडघशी फरफटत आणू. आंधळे, मुके आणि बहिरे, यांचे ठिकाण जहन्नम आहे. जेव्हा जेव्हा तिची आग मंद पडू लागेल आम्ही तिला आणखीन प्रदीप्त करू. 

(९८) हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटले, ‘‘आम्ही जेव्हा केवळ हाडे व माती बनून जाऊ तेव्हा नव्याने आम्हाला निर्माण करून उभे केले जाईल काय?’’ 

(९९) काय त्यांना हे उमगले नाही की ज्या अल्लाहने आकाशांना व जमिनीला निर्माण केले तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे सामर्थ्य अवश्य राखतो? त्याने (मृत्युपश्चात) यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचे येणे निश्चित आहे, पण अत्याचार्‍यांचा हट्ट आहे की ते त्याचा इन्कारच करतील. 

(१००) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘जर एखादे वेळी माझ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीने त्यांना जरूर रोखून ठेवले असते, खरोखरच मनुष्य मोठा संकुचित मनाचा आहे.३९


३९) मक्केचे अनेकेश्वरवादी ज्या मानसिक कारणांनी मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाचा इन्कार करीत असत, यापैकी एक महत्त्वाचे कारण असे की तसे न केल्याने त्यांना पैगंबर (स.) यांचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागत होते. परंतु आपल्या एखाद्या समकालीन अथवा समवर्गीयाचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात माणूस मुश्किलीनेच तयार होत असतो. यासाठीच फरमाविले जात आहे की, कोणाचेही वास्तविक श्रेष्ठत्व मान्य करण्यात हृदये दु:खी व्हावीत या अवस्थेला ज्यांची कृपणता पोहचली आहे अशा लोकांना जर एखाद्या वेळी अल्लाहने आपल्या कृपेच्या खजिन्याच्या किल्ल्या सुपुर्द केल्या असत्या तर त्यांनी कुणाला फुटकी कवडीदेखील दिली नसती



"परम दयाळू व परम कृपाळू अल्लाहच्या नावाने", कुरआनची सुरुवात ज्या आयतीने केली आहे ती जवळजवळ सर्व अध्यायांच्या सुरुवातीलाच ईश्वरी दयेचे महत्त्व अधोरेखित करते. करुणा  आणि सहानुभूती ही तत्त्वे कुरआन आणि सुन्नतने निर्धारित केलेल्या आमच्या श्रद्धेचा आधार म्हणून उभी आहेत. "परम दयाळू" आणि "परम कृपाळू" ही अल्लाहची वैशिष्ट्ये आहेत. हे आवाहन केवळ एक वाक्य नाही तर श्रद्धावंतांना आत्मसात करणे बंधनकारक असलेल्या करुणेच्या आंतरिक मूल्याची आठवण करून देणारे आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, "दयाळू लोकांवर सर्व दयाळू लोक दया करतात. पृथ्वीवरील लोकांवर दया करा आणि आकाशातील ईश्वर तुमच्यावर दया करेल". ही हदीस ईशदया आणि मानवी करुणा यांच्यात परस्पर आणि सहजीवी संबंध प्रस्थापित करते आणि मुस्लिमांसाठी नैतिक, परस्परावलंबी संबंध निर्माण करते.

करुणेचे नैतिक दायित्व येथे संपत नाही, तर गरिबांना मदत करणे आणि अनाथांचे रक्षण करणे यासारख्या सामाजिक निर्देशांपर्यंतही ते विस्तारते. दुर्बल लोकांबद्दल करुणा आणि दया नसेल तर कर्मकांड आणि प्रार्थना निष्फळ ठरतात.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक आदर्श घालून दिला. मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, त्यांनी ही मूल्ये आत्मसात करावीत, आत्मपरीक्षण करावे आणि त्यांच्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि इस्लामचे खरे मर्म जगासमोर दाखवावे. मुस्लिमांवर त्यांच्या धर्माचे दूत म्हणून काम करण्याची जबाबदारी आहे.

मुस्लिमांना सर्वोच्च नैतिक मानकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उठण्याची शिकवण द्या. आपण हे ओळखले पाहिजे की आपल्या कृती आणि वर्तनातूनच तपासणी केली जाते आणि बऱ्याचदा अविश्वासी लोकांच्या मनातील धारणांना आकार दिला जातो. करुणा आणि सहानुभूतीच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनातूनच आपण इस्लामबद्दलच्या नकारात्मक रूढी आणि गैरसमजांचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकतो.

आज आपण ज्या समाजात टिकून आहोत, त्या समाजात इस्लामोफोबिया अनेकदा गैरसमज आणि इस्लामच्या मूलभूत तत्त्वांच्या आकलनाच्या अभावामुळे वाढतो. या गैरसमजांचे निराकरण करणे महत्वाचे आहे, कारण ते केवळ सुधारत नाही तर करुणा आणि सहानुभूतीमध्ये रुजलेल्या इस्लामी शिकवणुकीचे खरे सार देखील दर्शविते. इस्लाम हिंसेचे समर्थन करतो आणि त्याला प्रोत्साहन देतो या खोट्या-कथनाचा प्रतिकार करून केवळ प्रत्येक आत्म्याचे महत्त्वच नव्हे, तर त्याचे जतन करण्याची नैतिक जबाबदारीही या कुरआनद्वारे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली आहे.

इस्लामोफोबियाची घटना बऱ्याचदा इस्लामी शिकवणुकीच्या निवडक आणि विषम चित्रणातून उद्भवते, विशेषत: त्याच्या खऱ्या सिद्धान्तांशी अपरिचित असलेल्या लोकांकडून. कुरआन मुस्लिमांना आंतरधर्मीय चर्चेत सहभागी होण्याचा आणि समजूतदारपणाची पावले तयार करण्याची सूचना देते. कुरआनमध्ये इतर धर्मांच्या अनुयायांशी आदरपूर्वक आणि रचनात्मक संबंध ठेवण्याचा, परस्पर आदर निर्माण करण्याचा आणि इस्लामबद्दलच्या मिथकांचे खंडन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

आपल्या परस्पर संवादात आणि सामाजिक योगदानात या मूल्यांचे सातत्याने प्रदर्शन करून, मुस्लिम इस्लामोफोबियाच्या पायाला प्रभावीपणे आव्हान देऊ शकतात आणि नष्ट करू शकतात. कुरआन आणि हदीस या आपल्या नियमावलीत नमूद केलेला नैतिक आधार, जन्माला आलेल्या गैरसमजुतींना एक सशक्त प्रतिकथन म्हणून काम करतो. या कृतींद्वारे, मुस्लिम इस्लामची खरी ठिणगी भडकवू शकतात, अविश्वासी लोकांमध्ये अधिक अचूक समज वाढवू शकतात आणि अधिक सामंजस्यपूर्ण जागतिक समाजाला हातभार लावू शकतात.

अल्लाहचे शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) त्यांचे जीवन, त्यांची शिकवण, जसे की "तो श्रद्धावंत नाही ज्याचे पोट भरते आणि शेजारी उपाशी राहतो", इतरांची काळजी घेण्याच्या नैतिक कर्तव्यावर जोर देते, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा पार्श्वभूमीचे असोत. सहानुभूतीच्या सखोल भावनेने प्रेरित असलेली प्रेषित मुहम्मद (स.) यांची कृती आपल्याला शिकवते की खरी ताकद इतरांची काळजी घेण्यातच आहे.

कृतीवर विश्वास ठेवून, करुणा आणि सहानुभूतीने मानवतेची सेवा करून, आपण खऱ्या अर्थाने आपल्या निर्मात्याचे दयाळू सार प्रतिबिंबित करू शकतो आणि समजूतदारपणा आणि शांततेचे जग तयार करू शकतो. आपण स्वतःला विचारले पाहिजे: आपण आपल्या दैनंदिन जीवनात करुणा आणि सहानुभूती या तत्त्वांसह चरित्र कसे तयार करू शकतो? व्यक्ती म्हणून आणि एक समुदाय म्हणून इस्लामचे खरे मर्म आपल्या कृतीतून मांडण्याचे आव्हान आपण कसे पेलू शकतो? 

याची उत्तरे आपल्यातच दडलेली आहेत!

- शाहजहान मगदुम


(१८६८-१९२७)



भारताच्या स्वराज्याचे समान ध्येय साध्य करण्यासाठी कितीही बलिदान देण्यास सदैव तयार असलेले हकीम अजमल खान यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८६८ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील हकीम अब्दुल गुलाम मोहम्मद खान हे एक प्रसिद्ध स्वदेशी वैद्यकीय व्यवसायी होते. 

अजमल खान अनेक विषय शिकले आणि वडिलांप्रमाणे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले. १९०६ पर्यंत ते स्वतःला वैद्यकीय व्यवसाय आणि सार्वजनिक सेवेत मर्यादित होते. ते मुस्लिम प्रतिनिधींपैकी एक होते, ज्यांनी एक ऑक्टोबर १९०६ रोजी शिमला येथे व्हाईसरॉय यांची भेट घेतली. नंतर ते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे उपाध्यक्ष झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात मतभेद निर्माण झाले तेव्हा १९१६ मध्ये लखनौ करारावर स्वाक्षरी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महात्मा गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते ज्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. १९१७ मध्ये, मुस्लिम लीग सोडल्यानंतर डिसेंबर १९१८ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दिल्ली अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.

त्यांनी खिलाफत, असहकार चळवळीच्या उद्घाटन समारंभात भाग घेतला, जिथे त्यांनी मानद पदव्यांचा त्याग केला. जसे “कैसर-ए-हिंद”, “हजीकुल-मुल्क”, ज्यांना ब्रिटीश सरकारने बहाल केले आणि त्यामुळे ते एक आदर्श बनले. ते खिलाफतच्या मुद्द्यावर जानेवारी 1920 मध्ये व्हाईसरॉयला भेटलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांनी 1921 मध्ये अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. जामिया मिलिया इस्लामिया (नॅशनल मुस्लिम युनिव्हर्सिटी) चे ते पहिले कुलपती बनले, जे राष्ट्रवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले होते. कुलपती म्हणून संस्थेला बळकटी देताना त्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीला बळ दिले. १० मार्च १९२२ रोजी महात्मा गांधींना अटक झाली तेव्हा अजमल खान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि सप्टेंबर १९२४ मध्ये त्यांच्या घरी हिंदू आणि मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली. त्यांनी वैद्यकीय डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून भारतीय जनतेची सेवा केली. डॉ अजमल खान हे कवीही होते. त्यांनी उर्दू आणि पर्शियन भाषांमध्ये कविता लिहिल्या, डॉ. झाकीर हुसेन यांनी हा काव्यसंग्रह १९२६ मध्ये “दिवान-शादिया” या शीर्षकाने आणला. 

हकीम अजमल खान यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९२५ मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी प्रचारासाठी अथक परिश्रम घेतले. २९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील जातीय सलोखा कायम होता.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम



असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्या भारतमातेला ब्रिटीशांसारख्या बलदंड अशा परकीयांच्या जोखडातून मुक्त केले. भारतीय उपखंडातील ब्रिटिश सरकारचा ‘युनियन जॅक’ खाली उतरविला गेला, आणि लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला, तो सुवर्णदिन होता...१५ ऑगस्ट १९४७. या दिवशी भारत हे स्वतंत्र राष्ट्र जगाच्या नकाशावर आले.  पुढे घटना समितीने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अर्थात राज्यघटना तयार केली व  भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे भारतीय राज्यघटनेने लिखित स्वरूपात सांगितले.      

राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व तऱ्हेच्या स्वातंत्र्याचा लाभ भारतीय जनतेला मिळावा, यासाठी भारतीय राज्यघटना पारित करण्यात आली. याचा लाभ गेल्या ७६ वर्षांत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील लक्षावधी भारतीय नागरिकांनी घेतला; आजही ते घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील, याची ग्वाही दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिली जाते. स्वातंत्र्याचे पाऊनशतक उलटून शतकाकडे वाटचाल सुरू असताना आसपासच्या घटना-घडामोडी पाहून अनेकांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजते. आपल्याला जे स्वातंत्र्य हवे होते ते हेच का?असाच जाहीर प्रश्न सद्यपरिस्थितीत अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि देशप्रेमींनी केला आहे.

लोकशाहीत ज्यांचा गजर केला जातो, त्या ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ या शब्दांचा व्यावहारिक इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. फ्रेंच तत्त्ववेत्यांनी ही अनमोल शब्दरत्ने लोकप्रिय केली व या शब्दरत्नांच्या गजरात मध्यमवर्ग सत्तेच्या दारापर्यंत पोहोचला, हे वास्तव आहे. तथापि आपण काय करीत आहोत, जे करीत आहोत, ते कोणासाठी व कशासाठी याचा विचार या शब्दांच्या प्रभावाखाली येणारा कधीच करीत नाही.

या त्रिसूत्रातला ‘स्वातंत्र्य’ हा शब्द सरंजामशाहीतला जुलूम व भरावा लागणारा सक्तीचा कर एवढ्यापुरता मर्यादित होता. या दोन दडपणांपासून मध्यमवर्गाला सुटका हवी होती. ‘दुसरा शब्द ‘समता’ ही समता जगातल्या सगळ्या लोकांसाठी नव्हती, तर उमरावांचा वर्ग आणि गर्भश्रीमंत व‌ धर्माधिकाऱ्यांचा वर्ग, या दोघांना जो मान व प्रतिष्ठा मिळत होती, तिच्यात मध्यमवर्गाला वाटा हवा होता. हा वाटा मिळताच तेथे समता येणार होती. आपल्यास मिळणारे हक्क गोरगरीबांना देण्यास मध्यमवर्ग तयार नव्हता. तिसरा ‘बंधुता’ या संज्ञेचा अर्थ  सर्व सामान्य धंदे करणाऱ्यांना उमराव व धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीतला मुक्त प्रवेश एवढाच फक्त होता. या संज्ञांचा अर्थ कधी काळी संपूर्णपणे विकृत बनेल व संसारी स्त्रिया आणि कामगार वर्गातील बाया सोडून सगळा प्रौढ पुरुषवर्ग या हक्कांवर आपला दावा सांगेल, अशी सुतराम कल्पना ते शब्द बनविणाऱ्यांना नव्हती. या हक्कांमध्ये आपणास वाटा नाही, हे संसारी स्त्रिया व कामगार स्त्रिया यांना मात्र अवगत होते.

इतिहासाच्या वाटचालीत या तीन तत्त्वांचे काय होते हेही पहाण्यासारखे आहे. कुवत आणि पॉवर या दोन बाबतीत लोक समपातळीत असतात, तेव्हा ती स्वतंत्र असतात हे खरे. परंतु ही समपातळी ढळली की, समानताही नाहीशी होते. नैसर्गिक गुण, शक्ती, कौशल्य यात व्यक्तिगणिक तफावत असते. ही तफावत जन्मतः असते. ही वैशिष्ट्ये मुक्तपणे वापरण्याची मुभा म्हणजे विषमतेला आमंत्रणच होय. प्रत्येक नव्या शोधाबरोबर सबळ अधिक बलवान, तर दुर्बल अधिक दुर्बल होत असतात. समतेचा तोल मुळातच डळमळीत असतो. समाज अधिक गुंतागुंतीचा बनला की, व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये घट येते. उत्क्रांतीची बेरीज ही त्याच वेळी स्वातंत्र्य व समतेची वजाबाकी असते. निवडणुकांचे निकाल पैशाच्या गाठोड्याच्या वजनावर ठरणार असतील, तर समान मताधिकाराच्या तत्त्वामध्ये काय शिल्लक राहिले ?

सगळ्या गोष्टींचे राजकारण केले जात आहे व गुंड शिरजोर अधिकाधिक बनत आहेत. तुरुंगाची भीती कुणालाच राहिलेली नाही, आपण किती ही गुन्हे केले तरी राजकीय आश्रय असला की, आपणास कुठलीही यंत्रणा आपल्यावर कारवाई करु शकत नाही, असा एक दंभ किंवा खात्री असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला आहे. राजकीय नेते सुध्दा बिनदिक्कतपणे तुरुंगवास भोगून बाहेर येतात. आणि त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन आपल्या तुरुंगवासाचे समर्थन करतात. इतकेच नव्हे तर राजकीय नेत्यांच्या बरोबर गुंडापुंडाची लाॅबी आपले नेते किंवा टोळीप्रमुख तुरुंगातून बाहेर आले की, त्यांच्या भव्यदिव्य मिरवणुकी काढतात, हे कशाचे लक्षण आहे, याबाबत विचारवंतांसह समाजपुरुष ही गप्प आहेत, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊनही भ्रष्टाचारी नेत्यांना सत्तेत सन्मानाने बसवले जाते, त्यातून सामान्य लोकांना कोणता संदेश जाईल किंवा जातोय, याबद्दल ही राज्यकर्ते हम करे सो या वृत्तीने वागतात, समाज सुध्दा या गोष्टींना प्रतिष्ठा देतोय, त्यामुळे 

देश ज्या दिव्यातून स्वतंत्र झाला, त्यांच्याबद्दलची जाणीव अस्पष्ट होत आहे, महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, घुसखोरी, भ्रष्ट यंत्रणेकडून होणारे वाढते आर्थिक घोटाळे , राजकारणातील बजबजपुरी व बेदीली, देशाची सार्वजनिक संपत्ती बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न, अर्थव्यवस्थेतील काळा पैशाचा वापर, आरक्षणाचा वाढलेला तिढा, यांसारख्या असंख्य प्रश्नांची मालिका पाहून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ते व्यर्थ गेले का, असा प्रश्न पडतो. इतकेच नव्हे तर पाऊण शतक ओलांडलेल्या भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय?, असा प्रश्न आ वासून समोर उभा रहातो, स्वतंत्र भारताच्या ७६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यांवर शिक्षित समाजाकडून विचारमंथन तर व्हायला पाहिजे, शिवाय सज्जनांची शक्ती संघटीत झाली पाहिजे,व कृतीशील विधायक विचार पुढे आला पाहिजे,असे वाटते.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



वरील शीर्षक हे आजघडीला किती सूचक, समर्पक व पूरक आहे - हे सहजी सप्रमाण व उघडपणे दिसून येते. राजकारणात उच्च व नीच या स्तरावर कार्य आधीही व्हायचे, पण मागील काही काळापासून राजकारणाच्या पटलावर जनसेवा हा प्रकार अगदी बोलण्यापुरता मर्यादित ठेवून नसती खटपट व कटकट यात जनतेसह राज्य व देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. याला मूळ कारण हे जनतेची पसंती/निवड आहे, जी निवडणुकीतून व्यक्त केली जाते आणि अकार्यक्षम व्यक्ती निवडून स्वतःच्या आयुष्याला स्वतःच शाप देण्याचे अर्थात उतरती कळा लावून घेण्याचे कार्य कथित सुजाण नागरिक करतात.

राजकारणीच नव्हे तर जनतेचाही स्वार्थ इतका पराकोटीला पोहोचला आहे की त्यांना राज्य किंवा राष्ट्राचा विचारही करावासा वाटत नाही. ही विभागाची राज्याची आणि राष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी की, आजघडीला आपल्या राष्ट्राच्या सुजाण नागरिकांना राष्ट्राचे अस्तित्व व प्रगतीचा अधिकार भार पेलवत नाही आणि “बोलाची कढी व बोलाचाच भात” अहोरात्र पंगतरूपाने कल्पनेत मांडून निव्वळ भूलथापा वाढणाऱ्यांच्या  मैफिलीत कथित सामान्य पण संधीसाधू  लोक अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, दुराचारी व धर्मांध व्यक्तीच्या मागे आपल्या आयुष्यासह राष्ट्राच्या भविष्याची राखरांगोळी करत आहेत.

अतिशयोक्ती करणं हा राजकारण्यांचा जुना खेळ व छंद, तर या बावळटपणाच्या घातकी खेळत डुंबून जाणे आणि त्यातच स्वतःचे मनोरंजन करून घेत राजकारण्यांचे कोडकौतुक करणाऱ्या जनतेने अनादी काळापासून अनादी कालपर्यंत स्वतःसाठी कल्या पाण्याच्या शिक्षेची अर्थात यातनामयी जीवनाची  तडजोड करूनच ठेवली आहे. जनतेने  काळात नकळतपणे स्वतःसाठी स्वतःच  निर्माण केलेल्या व वाढवून घेतलेल्या समस्यांच्या निराकारणाकरिता ते स्वतः जबाबदार घेऊन बिकट समस्यांचे परिमार्जन करणे हे स्वातंत्र्यासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पेराल ते उगवेल (म्हणजेच राजकारणी, गुंड, अधिकारी, इत्यादींना अती महत्त्व देऊन लोकशाहीचा पाया किलकिल्या करणाऱ्या जनतेच्या वागणुकीने) या म्हणीचा प्रत्यय जनतेने वेळोवेळी घेऊनही या बाबीची गांभीर्याने दखल घेतली नाही. पण आता आधुनिक प्रणालीच्या संगतीने या वास्तव लोकशाहीच्या तथ्यपूर्ण सत्य अर्थात वास्तवाला संघटित करून स्वतःची, स्वतःच्या विभागाची व राष्ट्राची प्रगती साधणे अत्यावश्यकच आहे.

राजकारणात पक्षांतर एवढे सहज व सोपे आहे की, त्यापेक्षा जास्त कठीण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी वाटते. या व अश्या अनेक कारणांमुळे राजकारणाचा स्तर फार जास्त खालावला आहे - ज्यामुळे नीतिमत्ता, नैतिकता, तत्व, जाहीरनामा, वचन, इत्यादी मूलभूत घटकांना औपचारिकतेपेक्षा जास्त महत्व उरलेच नाही आणि मागील कित्येक वर्षापासून तर सत्तेचा माज व उन्माद असा काही वाढला आहे की, ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांना तर दमडीची किंमत राहिली नाही. जनतेला पूर्वापार गुलामीगिरीची सवय जडल्याने त्यांनी राजकारण्यांना अति महत्व देत राजशाही जीवनाचा साज असलेले मुक्त जीवन देऊ केले, त्यामुळे जनसेवा व राष्ट्रसेवा ही राजकारण्यांची प्राथमिक कर्तव्ये खितपत पडली आणि राजकारणी वर्ग स्वार्थ, पक्षहित, पक्षपात, षडयंत्र, भ्रष्टाचार, दुराचारी, धर्मांधता, घराणेशाही या व्यापात अडकून गुन्हेगारीकडे वळत यातच आयुष्य व्यतीत करण्यास धन्यता मानून प्राधान्य देत वाटचाल करताहेत.

जनतेला त्यांच्या अस्तित्वाची व अधिकारांची आणि राजकारण्यांना (शैक्षणिक गुणवत्ता व पदाची पात्रता नसतानाही मिळत असलेल्या राजेशाही थाटाच्या कर्यकलापेक्षा मोलाचे असलेल्या) त्यांच्या कर्तव्याची अर्थात जनसेवा व राष्ट्रसेवेची जाणीव होणे फार जास्त आवश्यक आहे. त्याशिवाय ही बेबंदशाही अशीच चालू राहील आणि फार कमी काळात याचा उद्रेक होऊन सबंध राष्ट्राला भयानक व भयावह असे परिणाम भोगावे लागतील.

नेतृत्वाची अर्थात सत्तेची संधी मिळवऱ्याला त्याच्या जाहीरनाम्यापासून ते सत्तेच्या काळात न जमलेल्या यशाची कारणमीमांसा देणे तितकेच सोपे ठरते, जितके सोपे विरोधी पक्षाला जनतेने साथ दिली नाही म्हणून आलेले अप्याश! अर्थात सत्ताधारी असो की विरोधक, दोष तो जनतेचाच आणि कारण ही जनताच! दुधारी तलवार आणि अवसानघातकी पर्यायांपेक्षा बिकट संकटात जनतेला देशद्रोही तर त्याच जनतेला वेळप्रसंगी (निवडणूक, इत्यादी काळात) सर्वश्रेष्ठ देशप्रेमी ठरविणारे असेही बरेच कथित मुत्सद्दी आहेत, ज्यांना देशाची नाममात्र माहितीही उसने घेऊन स्वतःचे देशप्रेम व्यक्त करताना बाकी नऊ येतात.

यांनाही आम्ही अर्थात कथित जनता नानाविध बिरुदावली व मानसन्मान देऊन त्याचे जीवन सार्थकी तर स्वतःचे जीवन नाटकी ठरवितो.

या लेखातून कोण्या एका व्यक्तीला, समूहाला, पक्षाला, धर्माला, गटाला, समाजाला, वा तत्सम बाबीला उद्देशून काहीबाही लिहिणे किंवा टीका/उपहास/व्यंग करणे असा मुळीच उद्देश नाही. वर्तमान स्थितीचे वास्तव विश्लेषण करून जनजागृती करून लोकहित साध्य करण्याप्रती आपले योगदान देण्याचा उदात्त हेतू मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे, जे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक सबळ राष्ट्राचे परिपूर्ण उदाहरण आपले महान राष्ट्र आहे, ही जाणीव स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांना अभिमानाने अधोरेखित करणारी आहे.


- इकबाल सईद काझी

(विश्लेषण/लेखक)



यावर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारत आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीच्या आणि पारतंत्राच्या कचाट्यातून आपली सुटका व्हावी म्हणून भूमीपुत्र या नात्याने आपण हा दिवस अत्यंत उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतो. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या २०० वर्षांच्या काळात आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकलो, ज्यामुळे भारताला एक बलाढ्य राष्ट्र आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून चित्रित केले गेले. या किचकट प्रवासात आम्हाला कळले की आपला भूतकाळ अनेक राजकीय, सामाजिक-आर्थिक आणि धार्मिक अनिष्टांनी भरलेला आहे ज्यापासून आधुनिक भारत बऱ्याच अंशी मुक्त करण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षाच्या प्रारंभी आपण स्वत:ला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे की, ‘आज आपण खरोखरच स्वतंत्र, सुखी आणि मुक्त आहोत की कोणत्याही सामाजिक-आर्थिक, धार्मिक आणि/किंवा मानसिक कलंकांचे गुलाम आहोत’.

कोणत्याही परकीय शक्तींनी नव्हे तर आपल्याच कृतीने, विचारांनी आणि प्रतिक्रियांनी आपापल्या विवेकाच्या दरबारात आपल्याला एकच बोध मिळतो तो म्हणजे “आपण अजूनही गुलाम आहोत.” याला जबाबदार कोण? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर धर्म, जात, रंग, भाषा तसेच जन्मस्थळाच्या आधारे विखुरलेल्या आपल्या समाजात सध्या काही बदल पण अधिक सातत्य दिसून येते. अनेकदा आपण ग्रामीण आणि शहरी (विकासाच्या बाबतीत), उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय (खाण्यापिण्याच्या सवयी आणि ड्रेसिंग अर्थाने) तसेच उच्च आणि खालच्या जाती (सामाजिक बंध आणि राजकारणात) फरक करत असतो. जेव्हा हे मतभेद भेदभावात मिसळले जातात, तेव्हा या बाबी अधिक विदारक वळण घेतात. 

धार्मिक, आर्थिक आणि मानसिक दृष्टिकोनातून विचारस्वातंत्र्य राखण्यात आपण पुन्हा अपयशी ठरतो. काही धर्मांना पिकलेली फळे मिळतात तर काहींना त्यांच्या श्रद्धेच्या मूलभूत गोष्टींनाही योग्य ठरविण्यासाठी लिटमस टेस्ट पास करायला लावली जाते. त्याचप्रमाणे, काही विचारधारा लोकांवर प्रभावीपणे लादल्या जातात, तर काहींमध्ये अस्तित्वाचा आधार नसतो.

आपण विकासाच्या प्रगतीचे असंख्य टप्पे गाठले असले तरी अजूनही आपल्या अर्थव्यवस्थेत असहिष्णुता, असुरक्षितता, महागाई आणि बेरोजगारीच्या लाटा आपण पाहत आहोत. आजच्या स्वतंत्र भारतात आपल्या लोकशाहीत एकमेकांवर चिखलफेक करण्याबरोबरच दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि वृत्तवाहिन्यांवरील पाहुण्यांची तसेच अँकर्सची आक्रमकता ही नित्याची बाब बनली आहे. रस्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी होणारी छेडछाड, सामूहिक बलात्कार आणि छेडछाडीपासून महिलांचे रक्षण करण्यापासून आपण दूर आहोत. वैवाहिक मतभेद, गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे व्यसन आणि मद्यपान, जुगार, मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रतीक असलेल्या आपल्याच समाजात त्यांच्यासाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात आपण असमर्थ आहोत.

इतर धर्मांविषयी असहिष्णु होण्यात आपण प्रगती केली आहे.

चांगले पालक, प्रभावी शिक्षक, परोपकारी डॉक्टर, दूरदर्शी नोकरशहा आणि राजकारणी तसेच कष्टाळू शेतकरी आणि कार्यक्षम उद्योगपती बनण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे आपले कुटुंब, शाळा-महाविद्यालये तसेच इतर संस्थांवरून स्पष्ट होते. आमचे पालकत्व आणि अध्यापन सदोष आणि कुचकामी ठरत आहे, आपले डॉक्टर त्यांच्या रुग्णांबद्दल पुरेसे दयाळू नाहीत, आमचे नोकरशहा आणि राजकारणी कोणतीही स्पष्ट दृष्टी नसलेले अदूरदर्शी आहेत आणि आपले शेतकरी आणि उद्योगपती कष्ट आणि उत्पादकतेचा अभाव दिसून येतो.

आपल्या भविष्यात, आपण आत्मकेंद्रित मुलांची एक पिढी तयार करीत आहोत ज्यांच्यात मूलभूत नैतिक मूल्यांचा आणि नैतिक मानकांचा अभाव आहे आणि ते केवळ स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत. आपण आपल्या तरुण पिढीमध्ये अश्लीलता, नग्नता, भौतिकवादी दृष्टिकोन, व्यक्तिवाद, हॅकिंग, आक्रमकता, अधीरता, दुर्गुण आणि असहकार प्रवृत्तींना प्रोत्साहन देतो ज्यामुळे आपण केवळ आपले कुटुंब आणि समुदायच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान करतो. यामुळे भविष्यातील विकासाची कोणतीही क्षमता कमी होते आणि पुरोगामी व निरोगी राष्ट्र अचानक आजारी पडते.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला अशा प्रकारचे स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिले नव्हते जे आपल्याला स्वतंत्र परंतु असहिष्णू, आत्मकेंद्रित, आक्रमक, अदूरदर्शी, भ्रष्ट आणि भेदभावपूर्ण बनवेल जेणेकरून आपल्या देशवासियांचा मोठा हिस्सा या देशाच्या कानाकोपऱ्यात दारिद्र्यरेषेखाली आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतानाही आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाही.

आपल्या समाजाला खोलवर भ्रष्ट करणारी, आपली राज्यव्यवस्था बंद करणारी, आपली अर्थव्यवस्था मंदाववणाऱ्या आणि तेथील संस्था व व्यवस्था तसेच माणसे व भौतिक अकार्यक्षम व अनुत्पादक बनविणाऱ्या अशा सर्व प्रतिकूल प्रवृत्तींविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे आणि संघटित होणे ही काळाची गरज आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो. : ८९७६५३३४०४

भाषेचा गोडवा, तिचे महत्त्व, वापर, प्रसार, प्रचार या बाबी फक्त ती भाषा बोलण्याने साध्य होत नसतात तर त्या भाषेचे साहित्य यामध्ये खुप मोठी भूमिका बजावते. भाषेला जिवंत ठेवण्यामागे तिच्या साहित्याचा मोलाचा वाटा असतो. ती भाषा बोलणाऱ्यांची संस्कृती त्यांच्या लिखाणातून झळकते. एक प्रादेशिक भाषा असुनही इंग्रजी, ऊर्दू, हिंदी या भाषांप्रमाणेच मराठी भाषा वाड़मयाच्या दृष्टीने खुप प्रगत आणि प्राचीन आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आयोजित केले जाते. जवळपास सर्वच मराठी प्रकाशने आपल्या पुस्तकांचे प्रदर्शन या संमेलनात सादर करतात. लेखक आणि कवींसोबतच विविध अभिनेते, अभिनेत्री, राजकारणातील दिग्गज यासाठी आमंत्रित केले जातात. जगभरातील मराठी साहित्यिक, वाचक, रसिक प्रेक्षक या संमेलनाला आवर्जून भेट देतात. 

साहित्य संमेलनात राजकारण्यांचे काय काम? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा 1965 च्या मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे शब्द आठवतात ते म्हणाले होते,

राजकारणामध्ये पुष्कळ वेळा जे घडते त्याच्या मूळ प्रेरणा साहित्यातून निर्माण होत असतात. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाले तर संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निघाली. 

या अगोदरच्या म्हणजे 1964 च्या साहित्य संमेलनात याच विषयावर अध्यक्षपदी बोलताना वि. ना. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात, ’’राजकारण आणि साहित्य या परस्परांना कधीही न भेटणाऱ्या समांतर रेषा आहेत असे मानणे हे साहित्याच्या बाजूने अडाणीपणाचे आणि राजकारणाच्या बाजूने धूर्तपणाचे लक्षण आहे.’’

आजकालच्या राजकारण्यांमध्ये साहित्याची गोडी प्रत्यक्ष दिसत नसली तरी ही गोष्ट विसरता कामा नये की पुर्वीचे राजकारणी हे साहित्यिक पण होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, शिवराम महादेव परांजपे यांचे साहित्य राजकारणाभोवती फिरताना दिसते. शंकरराव देव, विनोबा भावे यांचे साहित्य महात्मा गांधींच्या प्रभावाखाली असलेले दिसते. राजकारणाचा साहित्यावर असा प्रभाव पडलेला दिसत असताना साहित्यिकांचा राजकारणाशी अथवा राजकारण्यांचा साहित्यिकांशी संबंध असणे काही वावगे ठरणार नाही. मात्र साहित्य आणि साहित्य संमेलन यांचा वापर करून चुकीचे राजकारण करणे हे धोकादायक आहे.

या वर्षीचे म्हणजे 2024 चे संमेलन हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे संमेलन इचलकरंजी किंवा दिल्ली या दोन ठिकाणी ठेवण्यासाठी बराच वाद झाला. शेवटी हे दिल्ली येथे आयोजित करण्याचे नुकतेच ठरले. यापुर्वी 1954 साली एकदा दिल्ली येथे हे संमेलन आयोजित केले होते. आतापर्यंत एकुण 23 वेळा संमेलन महाराष्ट्राबाहेर आयोजित केले गेले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानात सर्व धर्मीय, सर्व पंथीय मराठी साहित्याचे दर्शन होते. इस्लामला सोप्या पद्धतीने मराठी भाषेत सादर करण्यासाठी इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट गेले 35 वर्षांपासुन अशा संमेलनामध्ये पवित्र कुरआनचे मराठी भाषांतर, पैगंबरांच्या शिकवणी, पैगंबर चरित्र व इस्लामच्या विविध पैलूंवर साहित्य प्रदर्शन करत आहे, साहित्य प्रेमींबरोबर संवाद करत आहे, मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान यामधून होत आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी वाचकांसाठी एक उत्सव म्हणून हे संमेलन लाभणार आहे, त्याचा पुरेपूर फायदा प्रकाशने, साहित्यिक आणि वाचक घेतील हीच अपेक्षा.

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. : 7507153106


एखाद्याच्या मृत्यूची बातमी देताना अमुक व्यक्तीचा ’इन्तिकाल हो गया है’ असे म्हटले जाते. इन्तिकाल म्हणजे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. मृत्यूनंतर माणूस एका जगातून दुसऱ्या जगात स्थानांतरित होतो, म्हणून ’इन्तिकाल हुवा’ असे म्हणतात. ’फना हुवा’ म्हणजे नष्ट झाला असे म्हणत नाही. मृत्यू म्हणजे सांसारिक जीवनाचा शेवट आणि मरणोत्तर जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूनंतरही जीवनाचे सातत्य कायम राहते आणि त्याचे फक्त स्वरूप बदलते. मृत्यू म्हणजे भक्ताचे आपल्या निर्मात्या अल्लाहकडे परत जाणे होय, म्हणूनच कुणी मरण पावल्यावर ‘इन्ना लिल्लाही व इन्ना इलयही राज़िऊन’ म्हणण्याची प्रथा आहे. अर्थात ’’निसंशय आपण अल्लाहचेच आहोत आणि अल्लाहकडेच परत जाणारे आहोत’’. मृत्यूनंतर माणूस ज्या जगात प्रवेश करतो त्याला ’आलमे बरजख’ म्हणजे मृत्यू ते कयामत या दरम्यानचे जग म्हणतात. मृत्यू होताना आत्मा हा फक्त शरीरापासून वेगळा होतो. नष्ट होत नाही. शरीरापासून विभक्त झाल्यानंतरही आत्मा संपूर्ण व्यक्तिमत्त्वासह जगतो. ते व्यक्तिमत्त्व जे सांसारिक जीवनातील योग्य किंवा अयोग्य दृष्टिकोनातून आणि चांगल्या-वाईट आचरणातून बनलेले असते. मृत्यूनंतरही आत्मा हा चेतना, भावना, निरीक्षणे आणि अनुभवांच्या अवस्थेतून जात असतो. चांगला माणूस मृत्यूनंतर कयामतच्या दिवसापर्यंत ईश्वराचा पाहुणा म्हणून राहतो आणि दुष्ट माणूस अटकेत असलेल्या आरोपीप्रमाणे कैदेत राहतो. आदरणीय अब्दुल्लाह इब्ने उमर (र) यांनी वर्णन केले आहे की अल्लाहचे पैगंबर (स) म्हणाले, जेव्हा तुमच्यापैकी एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याला सकाळी आणि संध्याकाळी त्याचे स्थान दाखवले जाते. जर तो स्वर्गातील लोकांपैकी एक असेल तर त्याला त्याचे तेथील स्थान दाखवले जाते आणि जर तो नरकवासीयांपैकी असेल तर तेथील त्याचे स्थान दाखवले जाते. मग त्याला म्हटले जाते, कयामतच्या दिवशी हे तुझे स्थान राहणार आहे. (हदीस संग्रह बुखारी:1379- इस्लाम 360 )

या हदीसमध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर माणूस अजिबात संपत नाही तर त्याचा आत्मा त्याच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांसह बाकी राहतो. सकाळ-संध्याकाळ त्याला त्याचे खरे निवासस्थान दाखवले जाते. स्वर्गाचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्गवासीयांना किती आनंद होईल याची कल्पना करणे आपल्यासाठी अवघड आहे. त्याचप्रमाणे नरक पाहिल्यानंतर नरकवासीयांची जी अवस्था होईल, जो पश्चात्ताप होईल, जे दु:ख त्यांना भोगावे लागतील, त्याचीही आपण कल्पना करू शकत नाही. 

यावरून हे ज्ञात होते की मृत्यूनंतर माणूस अजिबात नष्ट होत नाही. तर फक्त त्याच्या वर्तमान शरीरापासून त्याचा आत्मा काढून घेतला जातो. माणसाचे व्यक्तिमत्व मृत्यूनंतरही कायम राहते आणि त्याला सुख-दुःखही जाणवते. कयामतच्या दिवशी याच आत्म्याला शरीर देऊन अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल आणि सांसारिक जीवनातील कर्मांची पडताळणी करून बक्षीस किंवा शिक्षा दिली जाईल. 

 ..................... क्रमशः 


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


लालसा, कंजूसपणा आणि अन्यायाला एकत्रित करणे म्हणजे व्याजाचा व्यवहार करणे, व्याजाद्वारे कमवणे. व्याज यालाच उपजीविकेचे साधन बनवणे. व्याज घेण्याचे उद्दिष्ट हे असते की सगळी संपत्ती त्याच्याकडेच एकवटावी. अशी व्यक्ती कर्ज घेणारा जर कोण गरीब असेल तर त्याला काहीही सवलत देत नाही. तसे सार्वजनिक कल्याणकारी कार्यक्रमात सहभाग घेत नाही. याकरिता की त्याच्याकडे जमा असलेल्या संपत्तीत काही कमी होऊ नये. तो तर खऱ्या अर्थाने व्याजावर व्याज आकारतो. चक्रवाढ वाजाद्वारे लोकांना त्यांनी कष्ट करून कमवलेल्या संपत्तीपासून त्यांना वंचित ठेवू इच्छितो. ही विकृती त्याच्या मानसिकतेचा एक भाग बनते.

आणि म्हणूनच अल्लाहने असे म्हटले आहे की तुम्ही कुणावर अन्याय करू नये की तुमच्यावर कुणी अन्याय करता कामा नये. (पवित्र कुरआन, सूरह बकरा-३८)

याचा अर्थ असा की जर तुम्ही कुणाला कर्ज दिले असेल आणि तुम्ही त्या कर्जापेक्षा अधिक काही त्या अर्जदाराकडून घेतले तर हा तुमच्याकडून केला गेलेला अन्याय आहे आणि जेवढे कर्ज तुम्ही दिले असेल तेवढे तुम्हाला परत मिळाले नाही तर हा तुमच्यावर होणारा अन्याय आहे.

अरबांमध्ये ही विकृती (व्याज घेण्याची) ज्यू धर्मियांमुळे पसरली होती. तेच धनसंपत्तीचे मालक होते आणि अरब शेतकरी आणइ मजूर त्यांच्याकडून व्याजावर कर्ज घेत होते.

पवित्र कुरआनात म्हटले गेले आहे की, “जेलोक व्याज खातात ते लोक कयामतच्या दिवशी जणू सैतानाच्या स्पर्शाने वेड लागल्याप्रमाणे उभे राहतील. याचे कारण हे की ते व्याजाची तुलना व्यापाराशी करतात.” (पवित्र कुरआन, २ – २७५)

या जगात व्याज खाणाऱ्यांची स्थिती आणि त्यांचे चारित्र्य असे होते की ते रात्रंदिवस इतरांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याच्या आणि आपल्या संपत्तीत वाढ करण्याच्याच चिंतेत मशगुल राहतात. त्यांना कोणत्याच परोपकारी कार्यांचा विचार येत नाही. म्हणून ते कयामतच्या दिवशीही असेच कशात तरी गुरफटल्यासारखे उठणार आहेत.

अल्लाहने व्याज घेणाऱ्यांना कृतघ्न म्हटले आहे. याचे कारण अल्लाहने जर कुणाला साधनसंपत्ती दिली तर त्यांनी तिच्यातून इतर गोरगरीब, वंचित लोकांच्या भल्यासाठी खर्च केली असती, पण तसे न करता ते उलट गरिबांना लूटतात आणि अन्याय-अत्याचाराद्वारे त्यांच्याकडे असलेले थोडेफार पैसे लुबाडतात.

ज्यू धर्मियांच्या पावलांवर पाऊल ठेवत अरबांमध्येदेखील काही श्रीमंत लोक उदयास आले होते आणि व्याजाचा व्यवहार करत होते. जसे ह. अब्बास बिन अब्दुल मुतल्लिब आणि बनू अमरो बिन उमैर. जेव्हा हे लोक आणि ज्यांना त्यांनी कर्ज दिले होते दोघेही मुस्लिम झाले तेव्हा कर्ज देणाऱ्यांनी कर्ज घेणाऱ्यांकडे कर्ज परत मागितले तेव्हा अल्लाहने त्यांना सांगितले की हे श्रद्ध लोकहो, आणि जे व्याज बाकी राहिले ते सोडून द्या जर तुम्ही खरे ईमानधारक असाल तर, नसता अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी युद्धास तयार राहा. (पवित्र कुरआन, २-२७९)

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(९२) अथवा तू आकाशाचे तुकडे-तुकडे करून आमच्यावर कोसळवावेस जसा की तुझा दावा  आहे. अथवा अल्लाह आणि दूतांना आमच्या समक्ष समोरासमोर आणावे. 

(९३) अथवा तुझ्यासाठी सोन्याचे एक घर बनवावे. अथवा तू आकाशावर चढून जावे आणि तुझ्या चढण्यावरदेखील आम्ही विश्वास करणार नाही जोपर्यंत तू आमच्यावर एक असा लेख उतरवून आणत नाहीस ज्यास आम्ही वाचावे,’’ हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘पवित्र आहे माझा पालनकर्ता काय एक संदेश आणणार्‍या मानवाशिवाय मी अन्य काही आहे?’’

(९४) लोकांसमोर जेव्हा कधी मार्गदर्शन आले तेव्हा त्याला मान्य करण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीने रोखले नाही परंतु त्यांच्या याच कथनाने की, ‘‘काय अल्लाहने मानवाला पैगंबर बनवून पाठविले?’’

(९५) यांना सांगा, जर भूतलावर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते. 

(९६) हे पैगंबर (स.)! यांना सांगून टाका, माझ्या व तुमच्या दरम्यान केवळ एक अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. तो आपल्या दासांच्या स्थितीची खबर राखणारा आहे आणि सर्व काही पाहत आहे. 



२०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यातील सध्याची परिस्थिती रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या विद्यमान उराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात सामना होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध ८१ वर्षांचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर देश परत घेण्याची शपथ घेणारे ट्रम्प ७७ वर्षांचे असून त्यांचे प्रतिस्पर्धी कमला हॅरीस या ५९ वर्षांच्या आहेत आणि सिनेटमधील बहुमताचे नेते चक शूमर (वय ७२ वर्षे) यांसारख्या इतर प्रमुख अमेरिकी राजकारण्यांचा विचार केल्यास अमेरिकन राजकीय नेत्यांचे वय हा चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने डेमोक्रॅटिक पक्षात दुसऱ्या महायुद्धानंतर तरुण राजकीय उच्चभ्रूंना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश देण्याची परंपरा होती. जॉन एफ केनेडी, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे तिघेही वयाच्या चाळीशीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. १९६० च्या दशकात जन्मलेले ओबामा २००८ च्या निवडणुकीत ४७ वर्षांचे होते. आर्थिक संकट, मध्यपूर्वेतील दोन युद्धे आणि रिपब्लिकन पक्ष याबद्दल अमेरिकन मतदारांचा तीव्र असंतोष लक्षात घेता त्यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर घवघवीत यश मिळविले.

२०१६ आणि २०२४ या दोन्ही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षात काही तरुण स्पर्धक उदयास आले, पण त्यांना ट्रम्प यांच्याशी स्पर्धा करता आली नाही. चीनविरोधी असलेले फेडरल सिनेटर टेड क्रूझ आणि मार्को रुबिओ अजूनही “पुरेसे लोकप्रिय” मानले जात नाहीत. विवेक रामास्वामी या ३८ वर्षीय भारतीय-अमेरिकन उद्योगपतीला पुरेसा अनुभव नाही. ट्रम्प यांनी प्रचंड दडपून टाकलेले फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसॅन्टिस यांनी त्यांच्याशी फारकत घेण्याचे धाडस केले नाही. माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी हे आस्थापना गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि ‘ट्रम्पविरोधी’ भूमिका घेतात, त्यांना जिंकण्याची संधी नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या तरुण राजकारण्यांची झालेली घसरण ही अमेरिकन राजकारणाच्या ध्रुवीकरणाशी आणि प्राथमिक व्यवस्थेच्या रचनेशीही निगडित आहे. दोन्ही पक्षांमधील जोरदार मतभेद आणि जनमताच्या फेरफारात तळरेषा नसल्यामुळे दोन्ही बाजूंचे आधार मतदार एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहतात आणि त्यांना पराभूत होणे परवडणारे नाही, असे वाटू लागले आहे. पक्षाचे सदस्य आणि मतदार या दोघांनाही पुरेसा प्रभाव आणि प्रतीकात्मकता असलेल्या उमेदवारांची गरज आहे.

अमेरिकेत व्यापक राजकीय पातळीवर जुन्या आणि नव्या पिढ्यांमध्ये सत्तांतरासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक निवडणुकीत तरुणांचे गट कॉंग्रेसचे सदस्य, राज्यपाल आणि राज्याचे आमदार म्हणून निवडले जातात. राजकारणातील महत्त्वाकांक्षी श्रीमंत नवोदितांमध्ये अनेक तरुण चेहरेही आहेत.

अमेरिकेतील नवीन पिढीमध्ये अधिक वांशिक विविधता, वैविध्यपूर्ण मूल्ये, महिला प्रतिनिधित्वात वाढ आणि स्थलांतरितांचे लक्षणीय प्रमाण आहे. हे बदल एकूणच डेमोक्रॅटिक पक्षाला आपला मतदारआधार वाढविण्यात अनुकूल आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला अधिक वांशिक अल्पसंख्याक आणि महिलांना सक्रियपणे शोधण्यास आणि आकर्षित करण्यास भाग पाडतात. १९७० नंतरच्या आणि १९८० नंतरच्या पिढ्यांचे अध्यक्ष, एक महिला राष्ट्राध्यक्ष आणि दुसरा वांशिक अल्पसंख्याक अध्यक्ष होण्याची शक्यता भविष्यात वाढेल. आज तरुणांमध्ये अधिक एकमत झाल्यास ध्रुवीकरण कमी होऊ शकते. 

युक्रेनच्या मदतीला इस्रायलच्या पाठिंब्याशी जोडणारा कायदा नुकताच मंजूर झाला असून त्याचे वर्णन “पक्षांमधील दुर्मिळ सहकार्य” असे करण्यात आले आहे. या ध्रुवीकरणाची अनेक कारणे आहेत, ज्यात लोकप्रतिनिधी आणि पक्षांवर विशेष व्याजाच्या पैशाचा प्रभाव आणि समाजातील वाढती आर्थिक विषमता यांचा समावेश आहे. आज पिढीगत दृष्टिकोनातील बदलांमुळे ध्रुवीकरणाची सध्याची पातळी कमी होण्याची क्षमता आहे.

गेल्या ५० वर्षांत अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरणात झपाट्याने झालेली वाढ ही वेगवेगळ्या पिढ्यांचे राजकारणाविषयीचे धोरण यामुळेच झाली आहे. पण तरुण पिढीचा राजकीय सत्तेत उदय झाल्यास ध्रुवीकरणाशी निगडित खोल सामाजिक विभागणी पुसली जाऊ शकते. या तरुण पिढीतील सदस्यांमध्ये राजकीय विचारांवर एकमत होणे आणि गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यावरून कॅम्पसमधील निदर्शनांसारख्या घटनांमुळे ध्रुवीकरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या राजकारणातील हा महत्त्वाचा बदल असेल.

सप्टेंबर २०२२ मधील सीबीएस न्यूजच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की अमेरिकन लोक राजकारणात तरुणांच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त करतात. ४७ टक्के लोकांनी म्हटले आहे की, अधिक तरुण पदावर राहिल्यास राजकारण चांगले होईल. शिवाय, नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या रॉयटर्स/इप्सोसच्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की दहापैकी नऊ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी ७५ वर्षांच्या कटऑफचे समर्थन करतात.

‘हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’मधील ‘सेंटर फॉर पब्लिक लीडरशिप’चे संस्थापक आणि विद्यमान संचालक डेव्हिड गर्जेन यांनी “हार्ट्स टच विथ फायर : हाऊ ग्रेट लीडर्स आर मेड” या त्यांच्या नवीन पुस्तकात, नेते कसे बनवले जातात आणि अनेक प्रकारचे नेते - विद्यार्थी, अध्यक्ष आणि कार्यकर्ते - जे देशाचे नेतृत्व करू शकतात याबद्दल चर्चा केली आहे. ते म्हणतात की “तरुण पिढीला येणाऱ्या गोष्टींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने - त्यांना प्रशिक्षण देणे आणि आघाडी करणे या दृष्टीने जुन्या पिढीने वास्तविक, महत्त्वपूर्ण आधार देणे महत्वाचे आहे. तरुण पिढीने हा कार्यक्रम चालवायला हवा; त्यांनी संस्था चालवायला हव्यात. आणि त्यात अध्यक्षपदाचाही समावेश आहे. पण जुन्या पिढ्या शहाणपण आणू शकतात; ते अनुभव टेबलवर आणू शकतात. तरुण पिढीला बदल घडवायचा आहे. आपल्याला काही तरुण नेतृत्वाची गरज आहे. जगातील सर्वांत गुंतागुंतीची संस्था असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे वयाच्या ७०-८० वर्षांच्या व्यक्तीकडे सोपविणे चूक आहे.”

‘युथ विदाऊट रिप्रेझेंटेशन’ या आपल्या नव्या पुस्तकात डॅनियल स्टॉकमेर आणि अक्सेल सुंडस्ट्रोम यांनी संसद आणि कॅबिनेटमध्ये तरुण प्रौढांच्या कमी प्रतिनिधित्वाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते तरुण प्रौढ - ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील - निर्णयकर्त्यांमध्ये दुर्मिळ असतात. जागतिक स्तरावर १८ ते ३५ वयोगटातील लोकांना लोकसंख्येतील त्यांच्या वाट्याच्या तुलनेत (मतदारांचा वाटा आमदारांपेक्षा तिप्पट मोठा आहे).

न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, “आमदारांचे म्हातारपण ही समस्या आहे. आपल्याकडे तरुणांची जगातील सर्वात मोठी पिढी आहे. त्यामुळे त्यापेक्षा कित्येक दशकांवर असलेल्या आणि त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत नसलेल्या वयोगटाकडून निर्णय घेतले जात असतील तर ती एक गंभीर लोकशाही कमतरता आहे. संसद ही अशी जागा आहे जिथे नवीन दृष्टिकोन असलेले तरुण असायला हवेत. आणि मला वाटते की आपल्या राजकीय व्यवस्थेने त्यांना सामावून घेतले पाहिजे.”

निर्णय प्रक्रियेत तरुण प्रौढांचे कमी प्रतिनिधित्व याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांच्यासाठी महत्वाचे मुद्दे अजेंड्याबाहेर पडतात आणि त्यांची सापेक्ष अनुपस्थिती अलिप्ततेच्या दुष्टचक्रास कारणीभूत ठरू शकते, ज्यात कमी मतदान आणि तरुणांमधील राजकीय स्वारस्य देखील समाविष्ट आहे.

जुन्या उमेदवारांच्या तुलनेत तरुण उमेदवार निवडणूक प्रक्रियेत यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. याचे अंशतः कारण असे आहे की त्यांना बर्याचदा अशा शर्यतींमध्ये नामांकित केले जाते जिथे त्यांना जिंकण्याची शक्यता कमी असते किंवा पक्षाच्या यादीत कमी प्लेसमेंटसाठी नियुक्त केले जाते. पण हे तोटे अनेक पक्षांना लागू पडत असले, तरी त्यात भिन्नताही आहे. युवा उमेदवारांसाठी मोठा अडथळा म्हणजे त्यांचा अनुभवाचा अभाव. परंतु, सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी निवडप्रक्रिया असल्याने संसदीय उलाढालीसाठी अनेकदा फारसा वाव नसतो. शिवाय, जगभरातील अनेक विधानसभांमध्ये ज्येष्ठतेची संस्कृती आहे, ज्यात तरुणांची दखल घेतली जात नाही.

एका सर्वेक्षणानुसार, जगभरातील अनेक देश केवळ २१, २५ किंवा ३० वर्षांवरील लोकांनाच निवडणूक लढवण्याची परवानगी देतात (उदाहरणार्थ अमेरिकन सिनेटमध्ये उमेदवार किमान ३० वर्षे असणे आवश्यक आहे). या नियमांमुळे तरुणांना कायदेशीर अडथळा तर येतोच, शिवाय राजकारण कोणासाठी आहे, याचेही संकेत मिळतात. स्कॅंडिनेव्हियासह त्यांच्या निवडणूक प्रणालीत आनुपातिक प्रतिनिधित्व असलेले देश तरुण प्रौढांचा जास्त वाटा निवडतात. तरुण नेत्यांचा कल कॅबिनेटला तरुण बनवण्याकडे असतो. तरुण संसद तरुण मंत्रिमंडळाला चालना देते - आणि कॅबिनेट सदस्य खासदार म्हणून निवडले गेले पाहिजेत की नाही याची पर्वा न करता हे घडते.

टर्म लिमिट हा सत्ताधाऱ्यांचा फायदा मोडून काढण्यासाठी आणि तरुणांना उमेदवारीचा दावा करण्याची संधी देण्याचा एक मार्ग असू शकतो. वयाच्या १८ व्या वर्षी निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट घातल्यास तरुणांना पुढाकार घेणे शक्य होईल आणि राजकारणात आपले स्वागत आहे, असा संदेश जाईल. संघटनात्मक पातळीवर राजकीय पक्षांनी ज्येष्ठतेची (त्याचबरोबर काही देशांतील घराणेशाहीची) संस्कृती मोडून काढण्याचे काम केले पाहिजे - गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास हा एक कार्यक्षम पर्याय ठरू शकतो.

सध्याच्या जगात जिथे रशिया-युक्रेन संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष, गटराजकारण आणि महासत्ता स्पर्धा वाढत आहे आणि जिथे “वियोग” आणि “भिंती आणि अडथळे बांधणे” प्रचलित आहे, तेथे एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. २०२४ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजेत्याची रणनीती आणि धोरणांबाबत निवड केल्यास जग अधिक संघर्ष आणि व्यापक शीतयुद्धाच्या दिशेने वाटचाल करीत आहे की युद्धविराम आणि संयमाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत. अमेरिकेच्या भावी पिढ्यांना दिलेली मशाल ही पुढचा मार्ग प्रज्वलित करणारी असेल की जगात पावडर केग पेटवणारी असेल, हे या निवडीवरून ठरते. त्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच होणार नाही तर जगभरातील शांतता आणि स्थैर्यावर होणार आहे.


- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


(१८९०-१९२६)



मोहम्मद उमर सुभानी, ज्यांना महात्मा गांधींनी “महान देशभक्त” म्हणून गौरवले होते, त्यांचा जन्म १८९० मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील यूसुफ सुभानी हे प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांनी लहान वयातच त्यांच्या वडिलांकडून व्यवसायाचे सिद्धान्त शिकून घेतले आणि व्यवसायात चांगली कौशल्ये मिळवली. त्या काळात त्यांना “कापूस राजा” म्हणून ओळखले जायचे. 

आपला व्यवसाय चालवत असताना, त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आस्था दाखवली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आणि शांततेच्या मागे सक्रियपणे उपक्रम आयोजित केले ज्यासाठी गांधीजींनी त्यांचे “स्टेज मॅनेजर’ म्हणून कौतुक केले. 

अ‍ॅनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली “होम रुल मूव्हमेंट”मध्ये मोहम्मद सुभानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जेव्हा जेव्हा कोणत्याही आंदोलनाची हाक दिली तेव्हा त्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सर्व खर्च स्वतःच्या स्रोतातून उचलला. ही बाब ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

१९२१ मध्ये त्यांनी खिलाफत आणि असहकार चळवळीत सक्रिय भूमिका बजावली. या प्रसंगी, त्यांनी परदेशी वस्तू जाळताना आपले सर्व महागड्या कपड्यांना आग लावली आणि त्यामुळे ते आपल्या देशवाशियांकरिता अनुकरणीय ठरले. त्यांनी गांधीजींना टिळक स्वराज्य निधीसाठी कोरे धनादेश देऊ केले. निधी उभारणी कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या सहकारी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या. 

त्यांनी एक लाख रुपयांच्या उदार देणगीसह त्यांचा “सुभानी व्हिला” हा बंगला खिलाफत कमिटीला भेट म्हणून दिला. 

ते इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उपक्रमांना वित्तपुरवठा करत असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांच्या व्यवसायावर निर्बंध लादले. या दबावाला न घाबरता, ते सर्व उपक्रम आणि बैठकांमध्ये भाग घेत पुढे गेले. ब्रिटीशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांचा व्यवसाय नष्ट झाला तेव्हाही ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि खिलाफत समितीच्या कार्यात कार्यरत राहिले. 

अखेरीस, “अंगोरा फंड”साठी देणग्या गोळा करताना त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. फेब्रुवारी १९२२ मध्ये त्यांचे तीन कोटी चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे ते आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आणि ते मानसिकदृष्ट्या खचले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आर्थिक बळ देणे हा मोठा सन्मान वाटणाऱ्या माणसाला “नाही” म्हणणे सहन होत नव्हते. 

आर्थिक आणि मानसिक नैराश्येतून बाहेर पडू न शकल्याने त्यांनी ६ जुलै १९२६ रोजी आत्महत्या केली.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम



भारत हा कृषीप्रधान देश आहे, आजही या देशातील ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती  आणि पशुपालन हा आहे, मात्र यंदा राज्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना महापुर आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागले आहे. संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपीकांचे तर मोठे नुकसान झाले आहे. शिवाय भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू,या सारख्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरवर्षी विक्रमी उत्पादन देणाऱ्या कांदा व लसूण या पिकांची ही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत.आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो, शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.मात्र यंदा प्रचंड पावसामुळे रब्बी पिकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पशुधन,पक्षी व मानवी जीवनावरही त्याचा दुष्परिणाम झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एक दोन वर्षे झाली की महाभयंकर नैसर्गिक आपत्तीला बळीराजाला तोंड द्यावे लागते आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश, हतबल व निराश होऊ लागला आहे. शेतकरी आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसली पाहिजे.

कोसळणाऱ्या प्रचंड पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीला कोणीही थोपवू शकत नाही, हे वास्तव आहे. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे अल्प कालावधीत शेतकऱ्यांच्या पीकांचे होत्याचे नव्हते करून जाते. यंदा पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. फळबागां उध्वस्त झाल्या. पशूधन गतप्राण झाले. काही शेतकऱ्यांच्या घरादारांचे नुकसान झाले. काही दुर्दैवी शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. संपूर्ण महाराष्ट्राला यांचा जोराचा फटका बसला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई याला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी तापमानात झालेली वाढ, अती प्रमाणात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहायला हवे...

नैसर्गिक आपत्तीशी सामुदायिकपणे, परस्पर सहकार्य व समन्वयाने सामना करावा लागतो. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी, फळबागांचे नुकसान, पशूधनाची दूरावस्था पाहता ही नैसर्गिक आपत्ती सहनशीलतेच्या पलिकडची आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दुबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. 

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित व योग्य पंचनामे व्हावेत...

राज्यातील महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित, योग्य व वास्तव पंचनामे करायला हवेत. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी , तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करतांना कामचुकारपणा व भेदभाव तसेच आर्थिक बेव्यवहार करतात. त्यांची मिलीभगत असल्याने वास्तवतेप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते, गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही. तरी सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित व योग्य ते सर्वेक्षण व्हावे आणि कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यात अडथळा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

शासनाने प्रांतभेद करू नये...

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब व योग्य ते आर्थिक सहाय्य करावे, हे करताना शासनाने प्रांतभेद करू नये. राज्यात ज्या ज्या प्रांतात शेतकऱ्यांच्या पिकांची, फळबागांची, व पशूधनाची नासाडी, दूरावस्था व नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाने आर्थिक साहाय्य व्हावे, अन्यथा राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या भागात तसेच ठराविक शेतकऱ्यांना झुकते माप दिले जाते, असे होऊ नये.

आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे....

शासनाने शेतकऱ्यांना तटपूंजी मदत करून त्याची मानसिकता खचू देऊ नये. त्यांच्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला त्याला मिळू द्यावा. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी प्रवृत्ती प्रत्येक आपत्तीच्या वेळी दिसून येते, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखात शेतकरी खचला जात असताना सुध्दा त्याच्या कडे चिरीमिरी अर्थात आर्थिक स्वरूपात मागणी केली जाते, अशांवर लक्ष ठेवून त्यावर कडक कारवाई करावी, आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा या अस्मानी संकटातून बाहेर पडून ताठ मनाने उभा राहिला पाहिजे, यासाठी मायबाप सरकारने मोठ्या दिलदार मनाने मदत केली पाहिजे.

शासकीय मदत शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा देणारी ठरेल...

यंदाच्या वर्षी अतीवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक,व मानसिक नुकसान झाले आहे. शेतकरी पुर्णपणे खचला आहे, अशा वेळी शासनाची मदत ही शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे.तरी विनाविलंब मदत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

केंद्र सरकारच्या आपत्तीग्रस्त निधीची मागणी करून तात्काळ पाठपुरावा करावा....

केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तात्काळ निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा,  केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त निधीची मागणी केल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुरेपूर भरपाई करून देऊ शकते.

शेतकऱ्यांच्या वीजेच्या बिलात व इतर करात सूट देण्यात यावी....

यंदाच्या अतीवृष्टीमुळे शेतकरी आत्मविश्वास गमावून बसला आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या वीजेची बीले माफ करावीत. तसेच इतर महसुली कर ही माफ करण्यात यावेत.

अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मायबाप सरकारने धावून जावून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक आहे.सरकारमध्ये व विरोधी पक्षात शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेल्या संकटाची जाणीव सध्याच्या राजकारण्यांना असणे स्वाभाविक आहे, तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



नोबेल शांतता पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे जेव्हा देशाच्या दीर्घकालीन पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि तिच्या राजवटीच्या विरोधात व्यापक उठाव करून परदेशात पळून गेला. ‘गरिबातील गरीबांसाठी बँकर’ म्हणून ओळखले जाणारे आणि हकालपट्टी केलेल्या शेख हसीनाचे दीर्घकाळ टीका करणारे, युनूस नवीन निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करतील. मंगळवारी उशिरा झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थी आंदोलनाचे नेते, लष्करी प्रमुख, नागरी समाजाचे सदस्य आणि व्यावसायिक नेते यांचा समावेश होता. यूनुस यांनी शेख हसीना वाजेद यांच्या राजीनाम्याला देशाचा ‘दुसरा मुक्तिदिन’ म्हटले आहे. ज्या मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानची फाळणी करून यशस्वीपणे बांग्लादेशाची निर्मिती केली, त्यांची मुलगी शेख हसीना वाजेद बांग्ला मुक्ती नंतर काही वर्षांनी म्हणजे १९९६ ला बांग्लादेशाचा कार्यभार आपल्या हाती घेतला. नंतर ५ वर्षांनी पुन्हा सत्तेत येऊन सुमारे १५ वर्षे आणखीन सत्तेत राहिल्या. जगातल्या या भागातील अत्यंत गरीब देशाच्या जनतेला वेठीस धरून त्यांनी देशाच्या एकंदरित साऱ्याच संस्थांवर ताबा घेतला. एक प्रकारे त्या हुकूमशाह झाल्या. विरोधी पक्ष जेलमध्ये, निवडणुकीत कोणत्याच पक्षाने भाग घेतला नसला तरी त्यांनी निवडणुका जिंकल्याच्या आवेशात लोकशाही मार्गातून सत्तेवर आल्याचे जगभर प्रचार केला. दक्षिण आशियातील सर्वांत शक्तिशाली सत्ताधाऱ्याची वेळ आली अर्थात वेळ संपली. त्यांनी आपल्या देशातून पलायन केले. त्या जगभर आश्रयाच्या शोधात आहेत. अखंड बांग्लादेश ज्याचे घर होते त्यांना आज राहायला घर भेटेना, अशी त्यांची अवस्था झाली. याला कारणीभूत कोण? त्या स्वतःच, इतर कोणी नाही. निवडणुकीत बांग्ला जनतेची फसवणूक, प्रक्रियेपासून सर्व विरोधी पक्षांना दूर सारून सत्ता, शासन-प्रशासन इतर स्रोतांवर नवनवीन युक्त्या. स्वातंत्र्यसैनिकांसाठी शासकीय व इतर नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण. हे सर्व करत असताना राजकीय नेते स्तब्ध होऊन पाहत असतील, पण एक वर्ग होता जो या सर्व घडामोडींवर विचार-अध्ययन करत होता आणि तो वर्ग म्हणजे ढाका विद्यापीठातील विद्यार्थीवर्ग. त्यांनी टरवले की आता या अनियंत्रित सत्तागृहाला आव्हान द्यायचे आणि बाकी जे काही बांग्लादेशात घडले ते आता इतिहास आहे. ते रस्त्यावर आले आणि पाहता पाहता तिथल्या गणपरिषद हसीनांचा बंगला, जातीय संसद इत्यादींवर ताबा मिळवला. २० वर्षे सत्तेत राहून एका हुकूमशाहप्रमाणे हसीना यांना एका लहानशा हेलिकॉप्टरमध्ये बसून तिथल्या लष्कराच्या सौजन्याने आपल्या देशातून पलायन करावे लागले. बांग्लादेशी विद्यार्थ्यांना नेमके काय हवे होते. आरक्षण कोणती मोठी समस्या नव्हती. त्यांचे समाधान झाले असते. आर्थिकदृष्ट्या बांग्लादेश सध्या गरीब देश राहिला नाही. काही प्रमाणात सभोवतालच्या देशांच्या तुलनेत त्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. पण आर्थिक प्रगतीच एका राज्यकर्त्याला त्याच्या लोकप्रियतेसाठी पुरेशी नसते. त्याचबरोबर एका शासनकर्त्याला लोकशाहीची मूल्ये आपल्या देशात, जनसमूहात जोपासावी, रुजवावी लागतात. तसेच नागरी स्वातंत्र्याची दारे साऱ्या जनतेला खुली आणि मोकळी करून देणे देखील अत्यंत गरजेचे असते. शेख हसीना यांच्या कारकीर्दित बांग्लादेशाने आर्थिक प्रगतीचा उच्चांक गाठला होता. या सत्यतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वस्त्रोद्योगामध्ये तो देश भारत, पाकिस्तानसारख्या देशांच्या पुढे होता, आतादेखील असेल. बांग्लादेशाने जगातील सर्वांत गरीब देश असल्याचा इतर राष्ट्रांनी लावलेला कलंक पुसून टाकला. एवढी एकच कामगिरी त्या देशाला अभिमान वाटण्यास पुरेशी आहे.

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार बांगलादेशातील २५ दशलक्ष (अडीस कोटी) गरीबांना गरीबीबाहेर काढले होते. सध्याचे काळजीवाहू पंतप्रधान नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद यूनुस यांनी लघुकर्जांची योजना (Micro-Finance) बांग्लादेशात साकारली आणि जगभर त्याचा परिचय करून दिला. या योजनेद्वारेच लक्षावधी गोरगरीब लोकांना रोजगार मिळेल अशा मुहम्मद यूनुस यांच्याविरुद्धच शेख हसीना यांनी गुन्हा दाखल केला. याचा अर्थ काय तर बांग्लादेशात जे काही भले होत असेल त्याच्यामध्ये दुसरा कुणी भागीदार होता कामा नये. याचबरोबर निवडणुकामध्ये घोटाळे, विरोधी पक्षांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर करणे, नागरी हक्काधिकारांचे हनन या सर्व गोष्टींकडे तिथल्या नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्यांना आनंदाने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणे हवे होते. आर्थिक विकासावर त्यांनी स्वातंत्र्योत्सवाला प्राधान्य दिले आणि शेख हसीना यांना हे कळलेच नाही. परिणामी तरुण पिढीने त्यांना नाकारले. त्यांना सत्तात्यागास भाग पाडले. त्यामुळे त्यांना आपल्याच देशातून पलायन करावे लागले.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो. : 9820121207

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget