5 जून पर्यावरण दिन निमित्ताने…
“झाडे लावा झाडे जगवा”, “आज काय उन आहे…!” दररोज आपण आपल्या मित्राकडून असे ऐकत असतो. दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे. अनेक लोकं हे जास्त तापमानामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं कळणार की जगाचं तापमान नेहमीपेक्षा जास्त पटीने आता वाढत चाललेला आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे जगाची लोकसंख्या आणि पर्यावरणातील दुराभावाची भावना यामुळे लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नगररचना होत आहे आणि या नगररचनेच्या कार्यामुळे वृक्षतोड होत आहे.
वृक्षतोड कोणत्याही प्रकारची असो लहान-मोठी तिचे पुनर्भरण कधीच केले जात नाही, त्यामुळे हजारो एकर जमीन ही पूर्ण वृक्ष तोडून खाली करण्यात येते. परंतु त्याच्यासोबत जेवढे वृक्ष तोडले तेवढे वृक्ष लावले जात नाहीत. त्यामुळे पृथ्वीला ज्या सुखरूप वातावरणाची आवश्यकता होती, ती आता या आधुनिकीकरणामुळे ढासळलेली आहे. मनुष्य फक्त आपला विचार करत आहे. त्याला कोणत्याच प्रकारचे पर्यावरणाचे भान राहिलेला नाही. आज पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसतो. पर्यावरणाचा ऱ्हास तर होतच आहे सोबत या कृतीचा सुद्धा त्रास होत आहे आणि त्याचा परिणाम मुख्य जीव, पशुपक्षी यांच्यावर होत आहे.
या पर्यावरणाच्या जागृतीबद्दल आजपासून साडेचौदाशे वर्षांपूर्वी पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, “झाड लावणाऱ्याला कयामतच्या दिवशी त्याचा योग्य मोबदला मिळेल.”
पैगंबरांनी पर्यावरणाबद्दल आणि त्याच्या संरक्षणाबद्दल आपल्या सोबतींना खूपच फायदेशीर गोष्टी सांगितल्या. पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात की “जर तुमच्या जवळ रोपटं असेल आणि तुम्हाला (कयामत) महाप्रलय येताना दिसत असेल तरी तुम्ही ते रोपटं जमिनीत लावून टाका.” या वचनामध्ये आपल्याला कळते की, कयामत जेव्हा येईल त्या वेळेस मनुष्याला कोणत्याच प्रकारचे भान राहणार नाही, तसेच खूप भयभीत होऊन अस्तव्यस्त होऊन जाईल.
अशा परिस्थितीतसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, “तुमच्या हातामध्ये झाड (रोपटं) असेल तर सर्वप्रथम तुम्ही ते झाड जमिनीत लावून टाका. तुम्ही हा विचार करू नका की हा याला कोणी पाणी टाकेल, याचं काय होईल? तुम्ही ते लावून टाका.” पैगंबर (स.) यांनी या वचनाद्वारे हे सांगितलेलं आहे की कोणत्याही क्षणी तुम्ही पर्यावरणाचे संरक्षण करा आणि झाडे लावा, त्यांना जगवा. पर्यावरणाचे जे नुकसान आहे ते दूर होऊ शकते.
आज आपण पाहतो की पर्यावरणाच्या असमतोलामुळे अनेक मोठी संकटे येत आहेत. ५३ किंवा ५४ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक विविध देशांमध्ये तापमान वाढलेले आहे. त्यामुळे मनुष्याची, प्राण्यांची पशूंची तसेच पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. म्हणून आजपासून साडे चौदाशे वर्षांपूर्वी पृथ्वीला संतुलित ठेवा, अशा प्रकारचे वचन पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मांडलेले आहे.
आजच्या घडीला त्यांच्या या वचनाची आणि त्यांनी केलेल्या कृतीची फार आवश्यकता आहे. कारण आज आपण याचे फळ भोगत आहोत. परंतु यापेक्षा अधिक आपल्या समोरील जी आपली पिढी आहे त्यांना या गोष्टीची भीती वाटेल की आपण आज अशा क्षणी जन्माला आलो जिथे पर्यावरण हा पूर्ण संपलेला आहे. आणि त्यामुळे त्या पिढीला याचे फळ भोगावे लागेल. म्हणूनच आत्ताच आपण सर्व मनुष्यांनी, संपूर्ण देशाने, संपूर्ण समाजाने या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे की पर्यावरणाचे संरक्षण आपणच करायला पाहिजे. यातच आपले आणि आपल्या पुढील पिढीचे भविष्य लपलेले आहे.
-सय्यद सलमान सर
9158949409
पुसद. जि. यवतमाळ
Post a Comment