एवढी गफलत का...कशासाठी?
सहावर्षात 234 जणांचा गेला बळी : डोंगरी इमारत दुर्घटनेत 14 ठार तर 9 जखमी
मुंबईच्या चंदेरी दुनियेत वावरताना येथील प्रशासन, नागरिक भानावर आहेत का नाही, असा प्रश्न वारंवार पडतो. दर पावसाळ्यात नितनियमाने इमारती कोसळून शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडणाऱ्या घटनांवरून येथील नागरिकांची गफलत दिसून येते. अनधिकृत इमारती, मुलभूत सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची गफलत अशा घटनांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे दोष फक्त कोणा एकावर जात नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर जातो. त्यात महत्त्वाची भूमिका असते ते बिल्डर आणि महापालिकेची. गेल्या सहा वर्षात म्हणजेच 2013 ते 2018 या कालावधीत इमारत कोसळण्याच्या तब्बल 2 हजार 704 दुर्घटना झाल्या त्यात 234 बळी गेले असून 840 जखमी झाल्याची माहिती शकील शेख यांना माहितीअधिकारात महापालिकेने दिली आहे.
गेल्या पंधरवाड्यात मुंबई येथील मलाड परिसरात इमारत दुर्घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला.तर कित्येक जखमी झाले. आणि आता डोंगरी भागातील चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.
या घटनांत जेवढी महापालिका दोषी आहे तेवढीच या इमारतीचे मालक अन् राहत असलेले लोक. मात्र लोक पोटापाण्यासाठी मुंबईत येवून राहिलेले असतात आणि ते येथील बिल्डर्स किंवा घरमालकांच्या जाळ्यात अडकतात. लोकांना पोटापाण्याची सोय करण्यात दिवस अन् रात्र कशी जाते याचे भानही राहत नाही. त्यातच कितीही अडचणी आल्यातरी या मायावी नगरीत राहणे लोक भाग्याचे समजतात. म्हणूनच वर्षानुवर्षे मुदत संपलेल्या इमारती उभ्या असतात. कधी कधी झुलत असतात, इमारत हळू हळू आपला एक-एक भाग सोडत असते. तिचे वय संपत आलेले असते मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असते. महापालिकाही प्रत्येक इमारतीचे ऑडिट इमाने इतबारे करते का नाही यात शंका आहे. त्यामुळेच अशा इमारती ढासळत आहेत. निष्पाप जीवांचा बळी गेल्याने महापालिकेच्या गलथान कारभारावर सर्वच स्तरांतून सध्या टीका ही केली जात आहे.
ढिगाऱ्याखालून मंगळवार, 16 जुलैच्या रात्रीपर्यंत 9 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दुपारी दोन वाजता एका 15 ते 16 वर्षांच्या मुलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. याचदरम्यान ढिगाऱ्याखाली दोन वर्षांची एक लहान मुलगी अडकल्याचे दिसले. तिचीही सुटका केली. इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरू केला आहे.
मृतांची नावे : साबिया निसार शेख (वय 25), अब्दुल सत्तार कालू शेख (वय 55), मुजमिल मन्सूर सलमानी ( वय 15), सायरा रेहान शेख (वय 25), जावेद इस्माईल (34), अरहान शेहजाद (40), कश्यप अमिरजान (13), सना सलमानी (25), झुबेर मन्सूर सलमानी (20), इब्राहिम (दीड वर्ष) , अरबाज (7), शहजाद (8), यामिन मन्सूरी (54). अल्लाह यांची मग्फीरत करो आमीन. तर जखमींमध्ये फिरोज नाझिर सलमानी (वय 45), आयशा शेख (3), सलमा अब्दुल सत्तार शेख (55), अब्दुल रेहमान (3), नावेद सलमानी (35), इम्रान हुसेन कलवानिया (30), जाविद (30), जीनत (25), अलमा मोहम्मद रशिद इद्रिशी (28). आदींचा समावेश आहे. पालिका, म्हाडाने जबाबदारी झटकली
दुर्घटनाग्रस्त इमारत कोणाच्या अखत्यारीत आहे, यावरून महापालिका आणि म्हाडात वाद निर्माण झाला आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तर दुर्घटनाग्रस्त कौसरबाई इमारत ही म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असून ती कोसळलेली नाही, तर या इमारतीच्या मागील अनधिकृतरीत्या बांधलेला भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्टीकरण म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. बचाव व मदतकार्यानंतर दुर्घटनेची चौकशी व अन्य आवश्यक बाबींवर निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल.
- बशीर शेख