Halloween Costume ideas 2015
August 2021


आपल्या देशाने या आठवड्यात स्वातंत्र्याची 74 वर्षे पूर्ण करून पंचाहत्तर वर्षात प्रवेश केला आहे. मोठ्या जल्लोषात स्वतंत्रतादिवस साजरा करण्याची आमची परंपरा अबाधित असून, राष्ट्रीय उत्सवाच्या या उत्साहात आपण स्वातंत्र्याच्या मूळ उद्देशाचा आणि त्याच्या वर्तमान दशेबाबत विचार करतो का? हा मूळ प्रश्न आहे.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्हाला अखंड नव्वद वर्षे लागली. भारताचा स्वतंत्रता संग्राम हृदयद्रावक संघर्षाचा इतिहास आहे. पिढ्यान पिढ्या या संघर्षात कामी आल्या. अगणित लोकांच्या त्याग आणि बलिदानाचे फलित आहे हे स्वातंत्र्य! या संग्रमात त्यांना प्रचंड प्रताडना, मानहानी आणि वित्तहानी सहन करावी लागली. अनेक लोकांना मृत्युदंड, कारावास सहन करावा लागला, महिला विधवा झाल्या, मुले अनाथ झाली अगणिक आयुष्यांची होळी झाली. परंतु सर्वांचे एकमेव उद्देश होते, पारंतत्र्यातुन मुक्ती! स्वतंत्रता संग्रामाचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची अभूतपूर्व गाथा आहे.

तसे पाहता पारतंत्र्यात देखील आपण जगत होतो. उद्योग धंदे, व्यापार, प्रपंच सगळे काही सुरू होतेच मग स्वातंत्र्य मिळविण्याचा एवढा अट्टाहस का? एवढा प्रचंड संघर्ष कशासाठी? तर पारतंत्र्यात आम्हाला आचार-विचाराचे स्वातंत्र्य नव्हते. सर्व काही असून जर स्वातंत्र्य नसेल तर असे लाचारीचे जीवन काय कामाचे? 

माणूस स्वतंत्र जन्माला आला आणि स्वातंत्र्य हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वातंत्र्य कशाला म्हणतात ते प्राणी संग्राहलयाच्या सिंहाला विचारा. आमच्या पूर्वजांनी पारतंत्र्याची प्रताडना वर्षोनुवर्षे सहन केली आणि कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या भावी पिढींना गुलामीचा वारसा देण्यास तयार नव्हते. म्हणून त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला सर्वश्रेष्ठ उपहार आणि वारसा आहे. त्यामुळे त्याचे जतन करणे आपले आद्य कर्तव्य आहे.

स्वातंत्र्यता सेनानीनी एक अत्यंत सुंदर भारताचे स्वप्न पाहिले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित राष्ट्र त्यांना हवे होते. आमचे निर्णय आम्हालाच घेण्याचे स्वातंत्र्य असलेला सार्वभौम भारत. एका अशा कल्याणकारी राष्ट्राचे स्वप्न पाहिले, जेथे सर्वांसाठी सुखी आणि सुलभ जीवन असेल. सर्वांना किमान जीवनमान सुरक्षा आणि विकासाची समान संधी असेल इ. त्यांच्या या स्वप्नाचा परिपाक म्हणजे भारतीय राज्य घटना होय. 

74 व्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला आपण या उद्दिष्टांच्या प्राप्तीचे अवलोकन केल्यास निश्चितच आपल्या निराशा होईल. ब्रिटिशांच्या विरोधात ते परदेशी होते म्हणून विरोध नव्हता, तर त्यांच्या शोषणाच्या प्रवृत्तीला विरोध होता. त्या प्रवृत्तीच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य हवे होते. परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण वास्तविकरित्या शोषणाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकलो काय? देशात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थातिप झाले काय? आपण देशवासींयाना किमान जीवन आणि विकासाच्या समानसंधी देऊ शकलो काय? भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले काय? आणि देशात खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थिापित झाली काय? आणि आजमितीला भारतात लोकशाही किती प्रमाणात जिवंत आहे? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे निराशाजनकच मिळण्याची जास्त शक्यता आहे. 

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत किंवा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकारही नाही. ‘लोकशाही समाज’ स्थापन करण्यासाठी निवडणुका एक साधन आहे. लोकशाहीचे मूल्यांकन साधारणत: आठ निकषावर करता येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मानिरपेक्षता, प्रजासत्ताक व्यवस्था, समानतेचा अधिकार, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे विभाजन, सन्मानाने जगण्याचा अधिकार, खासगीपणाचा अधिकार आणि मतदानाचा अधिकार. 

या निकषावर आपल्या लोकशाहीचे मूल्यांकन केल्यास आपल्या पदरी निराशा पडेल. आपण स्वातंत्र्याची उद्दिष्ट्ये प्राप्त करू शकलो नाही ही शोकांतिका आहे. किंबहुना दिवसेंदिवस त्यापासून आपण लांबच जात आहोत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. अलीकडील सात वर्षात तर परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे निर्दशनास येते. स्वीडनच्या वी-डेम इन्स्टिट्यूटने जगभरातील लोकशाहीचा अभ्यास करून त्याचे मूल्यांकन केले. त्यांच्या 2020 च्या अहवालानुसार ‘उदार लोकशाही निर्देशांका’ मध्ये भारताला 179 देशाच्या यादीत 90वे स्थान देण्यात आले. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश असलेला भारताचा लोकशाही मूल्ये जोपासण्यात 90वा क्रमांत लागावा यातच सर्व काही आले. भारतापेक्षा चांगली स्थिती तर श्रीलंका आणि नेपाळची असल्याचा निष्कर्ष  या अहवालात नमूद आहे. या यादीत श्रीलंका 70व्या आणि नेपाळ 72 व्या स्थानावर आहे.

याचबरोबर ‘पत्रकारितेच्या स्वातंत्र्य’ च्या आंतरराष्ट्रीय निर्देशंकात भारत 142 व्या स्थानावर आहे. यावरून भारताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दुर्दशा लक्षात येते.

विदेशी संशोधन संस्थाच्या अहवालांना जरी बाजूला ठेवले तरी देशाच्या सद्यास्थितीचा आढावा घेतल्यास विशेषत: पॅगासेस हेरगिरी प्रकरण आणि देशातील प्रमुख वृत्तसंस्थेच्या कार्यालयावरील धाडसत्र भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीबद्दल सर्व काही सांगून जातात. 

पॅगासिस हेरगिरी प्रकरण आणि माध्यमाची गळचेपी निश्चितच लोकशाहीला साजणारे कृत्य नाहीत आणि जेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, खासगीकरणाच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्य निवडणुकांवर गदा येते तेंव्हा लोकशाही धोक्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळतात आणि एका अर्थाने ही हुकूमशाहीची सुरुवात असते. तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या चौर्याहात्तर वर्षानंतर आम्ही स्वातंत्र्याकडून पुन्हा एकाधिकारशाहीकडे तर जात नाही ना?

एकंदरित आपण आपल्या पूर्वजांनी मिळविलेल्या या अमुल्य स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास आपण कमी पडत आहोत म्हणून भारताच्या सर्व जबाबदार नागरिकांनी याविरूद्ध आवाज उठविणे व सरकारला आपल्याला स्वातंत्र्यामुळे मिळालेल्या मुल्यांचे रक्षण करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. 

- अर्शद शेख

9422222332



एक सरकार आपल्याच नागरिकांवर पाळत ठेवत असेल तर? आपल्याच मंत्र्यांचे संभाषण चोरून ऐकत असेल तर? आपल्याच मेहेरबानीवर उभ्या असलेल्या उद्योगपतीचे बोलणे चोरून ऐकणे.

पत्रकार, कार्यकर्ते यांचा माग काढणे. विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर लक्ष ठेवणे. 

पेट्रोल पंपांवर क्रिपी हसणाऱ्या माणसाचा फोटो इतके दिवस लावलेला होता. खरं तर अनेक वर्षे कोणत्या न कोणत्या कारणाने असा फोटो आदलून-बदलून तिथे लावलेला असतो. आताही तिथे फुकट लसीकरणाची जाहिरात असते. हा माणूस सांगत असतो, की तुमच्यावर माझी नजर आहे. या माणसाची विविध कारणाने संपूर्ण शहरात छायाचित्र असतात. कधी कोणी जिंकले म्हणून, कधी कोणाचा मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून! चानू मीराबाईने ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकले तरी या माणसाचा फोटो असतो, अर्थातच मीराबाईपेक्षा मोठा असतो. केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी मंत्र्यांचा समावेश झाला, महिला मंत्र्यांचा समावेश झाला, की अभिनंदनाचे बोर्डलागतात आणि त्या बोर्डवर या माणसाचा फोटो असतो. बस स्टॉपवर फोटो असतो. टीव्हीवर फोटो असतो. रेडिओवरून या माणसाचे शब्द ऐकवले जात असतात. अगदीच काही नाही तर ‘थँक यू’ लिहिलेले बोर्ड झळकलेले असतात. तुम्ही काहीही करा, पेट्रोल भरा, भाजी घ्या, गाडीवर जात असा, सिग्नलला थांबलेले असा, टीव्ही बघत असा, फेसबुकबघत असा, तीच भेदक नजर आणि तेच क्रिपी (भयावह) हास्य! संदेश एकच आहे, तुमच्यावर ‘नजर’ आहे! हेच ‘पेगसिस’ आहे! एव्हढं करूनही भागत नाही, मग सतत वाटत राहतं की सत्तेवरची पकड ढिली होत आहे की काय, त्यातून असुरक्षितता निर्माण होत जाते. अगदी जवळ वावरणारे लोकही शत्रू वाटू लागतात. विचार, मेंदू आणि मूलभूत कामांचा अभाव असला की सत्ता चालवण्यासाठी मग वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गिमीक्स करावी लागतात. ती गिमिक्स करूनही लोक दूर चाललेे आहेत, असे वाटले, की भीती वाटूलागते आणि त्यातून मग थेट 

पाळत ठेवण्याची कल्पना आकाराला येते. त्यातून परत त्याला राष्ट्रवादाची फोडणी ठरलेली आहेच. हे केवळ भरतामध्येच होत आहे असे नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी होत आहे. सौदी अरेबियामध्ये असणारे ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खाशोगी यांचाही फोन असाच ‘पेगसिस’ वापरून हॅककरण्यात आला आणि त्यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना ठार मारण्यात आले. दुबईची राजकन्या शेखा लतिफा हिलाही तिच्या मैत्रिणीच्या फोनमध्ये ‘पेगसिस’ टाकून भारतातील गोव्यात पकडण्यात आले आणि ओढत ओढत परत पाठवण्यात आले. या ‘कौतुकास्पद’ हिरोगिरीमध्ये भारताचे कमांडो सामील होते. फ्रान्समध्ये राफेल या विमानांचे गैरव्यवहाराचे प्रकरण बाहेर काढणाऱ्या ‘मिडीया पार्ट’ या न्यूज पोर्टलच्या संपादक आणि बातमीदाराचा फोन ‘पेगसिस’ वापरून हॅक करण्यात आला होता.

मार्चमध्ये संध्या रविशंकर तमीळनाडूतील एका बातमीदाराने ‘भारतातील स्वतंत्र माध्यम संस्था असलेल्या ‘द

वायर’च्या संपादकांना म्हणजे सिद्धार्थ वरदराजन यांना फोन केला आणि विचारले की ‘तुमच्याकडेआयफोन आहे का’, त्यांनी होकारार्थी उत्तर दिल्यानंतर ती लगेच त्यांना भेटायला आली. त्यांचे फोन बंद करून दुसऱ्या खोलीत ठेवायला लावले. त्यानंतर एका संरक्षित व्हिडिओ लिंकद्वारे तिने त्यांना साँड्रिन रिगॉद व फिनियास रुकेर्तया फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीज या माध्यमसंस्थेच्या संपादकांशी जोडून बोलणे करून दिले. त्यांनी सिद्धार्थ आणि दुसरे संपादक एम के वेणू यांना सांगितले की त्यांना असे वाटत आहे, की यांच्या मोबाईल फोनमध्ये ‘पेगसिस’ हे हॅक करणारे स्पायवेअर टाकलेले आहे. सिद्धार्थ आणि त्यांचे सहकारी पूर्वीपासूनच खबरदारी घेत होते. महत्त्वाच्या बातम्यांवर काम करताना व्हॉटसअ‍ॅप, सिग्नल किंवा फेसटाइम वापरत होते. मात्र त्यांना लक्षात आले की या सगळ्याचा काही उपयोग नाही, कारण हे सगळेच हॅक झाले आहे. कारण त्यांचा संपूर्ण फोनच हॅक करण्यात आला आहे. फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीज, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि जगभरातील 16 माध्यमसंस्थांनी एकत्र येऊन या सगळ्याचा छडा लावण्याचे ठरवले. यावर्षी मे महिन्यात सर्व पत्रकार पॅरिसमध्ये भेटले. ‘द वायर’तर्फे कबीर अगरवाल या बैठकीला उपस्थित होते. काही जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यामध्ये सहभागी झाले. यामध्ये इंग्लंडमधील ‘द गार्डियन’, अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’. फ्रान्समधील ‘ल मॉन्ड’ आशा अनेक माध्यम संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी सहकार्याने काम करायचे ठरवले. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेने त्यांना 50,000 क्रमांकांचा डेटाबेस पुरवला. यांपैकी जास्तीतजास्त क्रमांकांची ओळख पटवण्याचे काम या सगळ्या मध्यमसंस्थांच्या पत्रकारांना करायचे होते. त्यासाठी त्यांनी ट्रूकॉलर व कॉलअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सचा वापर केला. इंटरनेटचा वापर केला. वार्तांकनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. काहींना थेट फोन केले. मधील 300 हून अधिक भारतीय क्रमांकांची पडताळणी करण्यात आली.

अँड्रॉॅइड फोनमध्ये विस्तृत लॉग रेकॉडर्स ठेवले जात नाहीत. भारतीयांच्या यादीतील बऱ्याच जणांचे फोन अँड्रॉॅइड होते. अनेकांनी आपले फोन बदलले होते. अनेकांना फॉरेन्सिक तपासणीसाठी फोन देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. 21 फोन्स तपासणीसाठी उपलब्ध झाले. त्यांपैकी 7 फोन्समध्ये पेगसिस खरोखरीच घुसल्याचे पुरावे मिळाले, तर 3 फोन्समध्ये हॅकिंगचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सिद्धार्थ वरदराजन यांच्यासह वेणू आणि अन्य तीन पत्रकारांचे- सुशांत सिंग, परंजोय गुहा ठाकुरता, एसएनएम अब्दी यांचे फोन हॅक झाले होते. राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर, एसएआर गिलानी आणि बिलाल लोन या काश्मिरी कार्यकर्त्याचे फोनही हॅक झाले होते. फोन हॅक झालेल्या  लोकांमध्ये मानवी हक्कांंविषयी लिहिणारे पत्रकार, सुरक्षा दलातील अधिकारी, राजकीय व्यक्ती महत्त्वाचे पत्रकार यांचा समावेश होता. महिला पत्रकारांचा समावेश होता. प्रशांत किशोर यांना स्वत... सिद्धार्थ वरदराजन भेटले आणि त्यांच्या फोनची तपासणी करण्यात आले. त्यामध्ये पेगसिस सापडले आणि त्यांचा फोन हॅक करण्यात आल्याचे पुढे आले. जगभरातील फोनपैकी 37 फोनमध्ये पेगसिस शिरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील 10 भारतातील क्रमांक होते.

अ‍ॅम्नेस्टीच्या प्रयोगशाळेने यामध्ये तपासणी केली आणि ती तपासणी कॅनडा येथील ‘सिटिझन लॅब’ या स्वतंत्र प्रयोगशाळेला दाखवली. याच प्रयोगशाळेने 2019 मध्ये भारतातील अनेकांचे फोन हॅक झाल्याचे पुढे आणले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते आणि वकील यांचे फोन होते. एका व्यक्तीचे एकाहून अधिक फोन क्रमांक या यादीमध्ये आढळले याचा अर्थ, त्या व्यक्तीची पाळत ठेवण्यासाठी विचारपूर्वक निवड करण्यात आली होती. राहुल गांधी, जलशक्तीमंत्री प्रफुलसिंग पटेल सरन्यायाधीशांच्या कार्यालयातील महिला कर्मचारी व तिच्या नातेवाइकांचे दहा क्रमांक या यादीत होते.

‘एनएसओ’ ही इस्राईलमधील कंपनी आहे. इस्राईलच्या सेनेमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी एकत्र येऊन ही कंपनी तयार केली आहे. पेगसिस हे सेनेच्या (मिलिटरी) दर्जाचे फोन हॅक करणारे स्पायवेअर असल्याचे ‘एनएसओ’चे म्हणणे आहे. ‘पेगसिस’ची विक्री केवळ सरकारांनाच केली जाते असे

‘एनएसओ’चे म्हणणे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2017 मध्ये इस्राईलचा दौरा केला होता. भारतातील पत्रकार, राजकीय विरोधक, मंत्री, व्यावसायिक, मानवी हक्क कार्यकर्ते, सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला कर्मचारी यांच्याशी सरकारचा संबंध आहे. इतर कोणाचा संबंध असण्याचे कारण दिसत नाही. मोदी सरकारने ‘पेगसिस’ घेतल्याचे नाकारलेले नाही. किंबहुना सरकारला या विषयावर चर्चाच नको आहे. त्यासाठी संसद 10-11 दिवस बंद पडली तरी सरकारला चालत आहे. एवढा हा विषय मोदी सरकारला महत्त्वाचा आहे.

या डेटाबेसमध्ये 2016 सालापासून अनेक क्रमांक आहेत, मात्र भारतीय क्रमांक2017च्या मध्यानंतर दिसतात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान मोदी यांनी जुलै 2017 मध्येच इस्राईलचा दौरा केला होता. कॅनडाच्या ‘सिटिझन लॅब’चा असा दावा आहे. की भारतातील रॉ आणि आयबी दोन्ही गुप्तचर संस्था ‘पेगसिस’चा वापर करत असावेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या

अध्यक्षतेखाली असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे बजेट 2017-18 मध्ये एकदम 333 कोटी रुपयांचे झालेले दिसते. त्यापूर्वीच्या वर्षात ते 33 कोटी रुपये होते. फ्रेंच सरकारने पाळत ठेवण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारी यंत्रणेद्वारे केला गेला हे उघड करण्याची मागणी एनएसओ ग्रुपकडे केली. इस्राईल सरकार आता बदलले आहे. मोदी यांनी इस्राईलला भेटदिली तेव्हा बेंजामिन नेत्यानाहु पंतप्रधान होते. आता ते पंतप्रधान नाहीत. फ्रान्स सरकारने इस्राईल सरकारकडे विचारणा केल्यावर नव्या इस्राईल सरकारने ‘एनएसओ’ कंपनीवर धाडी टाकल्या आणि फ्रान्स सरकारला माहिती देण्याचे आश्वासन दिले. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रान्सला भेटदेऊन माहिती दिली. भारतात मात्र सरकार काहीच माहिती देत नाही. चर्चा करत नाही आणि आणि चौकशी करण्याबाबतही बोलत नाही. कारण भारतातील माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली हॅकिंग हे गुन्हा आहे. पेगसिसचा वापर केल्याचे सरकार मान्य करू शकत नाही. पश्चिम बंगाल सरकारने पेगसिस प्रकरणात चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन केला आहे. चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशीकुमार आणि आणखी दोन जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. हे सगळे प्रकरण इतके मोठे आहे, की तथाकथित मुख्य धारेतील माध्यमांना त्याची थोडी का होईना पण दखल घ्यावी लागली. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे सरकारला प्रश्न विचारले नाहीत. मराठी माध्यमांना हे सगळे समजण्याच्या पलीकडे आहे. कारण या प्रकरणानंतर हॅक या मुख्य विषयाला सोडून बाकी सगळ्या विषयांवर मराठी माध्यमांनी चर्वितचर्वण केले. फोनची सुरक्षितता यांसारखे ‘घिसे पिटे’ विषय ते चघळत बसले आहेत. आपण हेरगिरी करीत होतो, हे सरकार कधीही मान्य करणार नाही. कारण त्यामुळे अनेकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जाईल. मात्र मध्यमवर्गाचा विश्वास उडणार नाहीच. कारण देशासाठी असे करणे गरजेचे आहे, असे त्यांच्या मनात बिंबविण्यात आले आहे. पण त्या भेदक नजरेला वेसण घालण्याचे काम मात्र स्वतंत्र माध्यमांनी सुरू केले आहे, हे नक्की! 

- नितीन ब्रह्मे 

 (नितीन ब्रह्मे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये 15 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता केली असून, त्यांच्या पत्रकारितेची दिशा राजकारण, स्थानिक नागरी प्रश्न, पर्यावरण या क्षेत्रामध्ये शोधपत्रकारितेची आहे. अनेक सामाजिक प्रश्न समोर आणण्यामध्ये त्यांनी काम केले आहे. साभार : पुरोगामी जनगर्जना, पुणे)



(१) अलिफ लाऽऽम रा. ही त्या ग्रंथाची वचने आहेत जी विवेक व बोधपूर्ण आहेत. 

(२) लोकांकरिता ही एक अजब गोष्ट झाली काय की आम्ही खुद्द त्यांच्यातीलच एका माणसावर दिव्य प्रकटन (वह्य) पाठविले, की (गफलतीत पडलेल्या) लोकांना सावध करावे, आणि जे श्रद्धा ठेवतील त्यांना शुभवार्ता द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकत्र्याजवळ खराखुरा मानसन्मान व प्रतिष्ठा आहे? (यावर) इन्कार करणाऱ्यांनी म्हटले की ही व्यक्ती तर उघडपणे - जादूगार आहे.

(३) वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा पालनकर्ता तोच अल्लाह आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग राजसिंहासनावर विराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवीत आहे. कोणीही शिफारस करणारा नाही त्याच्या परवानगीशिवाय. हाच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती (इबादत) करा. मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही? 

(४) त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परतावयाचे आहे, हे अल्लाहचे पक्के वचन आहे. नि:संशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो, मग तोच दुसऱ्यांदा निर्माण करील, जेणेकरून ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी सत्कृत्ये केली त्यांना न्यायपूर्ण मोबदला द्यावा, आणि ज्यांनी इन्कार करण्याची पद्धत अवलंबिली त्यांनी उकळते पाणी प्यावे व दु:खदायक शिक्षा भोगावी, सत्याच्या त्या इन्कारापायी जे ते करीत राहिले.१०

(५) तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही त्यापासून वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. अल्लाहने हे सर्वकाही सत्याधिष्ठित निर्माण केलेले आहे. तो आपले संकेत उघड करून करून प्रस्तुत करीत आहे त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. 

(६) नि:संशय रात्र व दिवसाच्या आलटून पालटून येण्यात व त्या प्रत्येक वस्तूमध्ये जी अल्लाहने पृथ्वी व आकाशांत निर्माण केली आहे त्या लोकांकरिता संकेत आहेत जे (चुकीची दृष्टी व चालीपासून) दूर राहू इच्छितात.११



१) अज्ञानी लोक हे समजत होते की पैगंबर (स.) कुरआनच्या नावाने जी वाणी त्यांना ऐकवत आहे, ती केवळ भाषेची जादूगरी आहे. तसेच ती काव्यकल्पनेची भरारी आहे आणि ज्योतिषासारखे वरील जगाचे कथन आहे. यावर त्यांना चेतावनी दिली जात आहे की ज्याचे तुम्ही अनुमान करीत आहात, ते हे नाहीत. या तर तत्त्वदर्शी ग्रंथाच्या आयती आहेत. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष पुरविणार नसाल तर तत्त्वदर्शिता आणि ज्ञानापासून तुम्ही वंचित राहाल.

२) म्हणजे यात विचित्र असे काय आहे? माणसांना सचेत करण्यासाठी माणूस नियुक्त न करता देवदूत, जिन्न किंवा पशुंना नियुक्त केले असते? विचित्र हे आहे की  त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे किंवा त्यांच्या (वास्तविकतेपासून गाफील माणसांना) मार्गदर्शनाची काही व्यवस्था त्याने करावी? तसेच अल्लाहकडून मार्गदर्शन आले तर ज्यांनी त्याला स्वीकारले त्यांच्यासाठी मान सन्मान आणि सफलता असावी की त्या नाकारणाऱ्यांसाठी?

३) पैगंबर (स.) यांना जादूगार ते या अर्थाने म्हणत होते की जो कोणी कुरआन ऐकून आणि आपल्या प्रचाराने प्रभावित होऊन ईमानधारक बनत असे, तो जीवावर खेळण्यासाठी जगाशी संबंध तोडण्यास आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यास तयार होत असे. जादूगाराचा आरोप त्यांनी लावला खरा परंतु त्यांनी विचार केलाच नव्हता की तो आरोप चपखल बसतो की नाही? एक व्यक्ती माणसांच्या मनाला आणि बुद्धीला आपल्या उच्च्तम वक्तव्याने वशीभूत करतो म्हणून त्यावर जादूगार असण्याचा आरोप लावणे  अयोग्य  आहे. याऐवजी  त्यांनी  हा  विचार  केला  पाहिजे  की  या वक्तव्यांत पैगंबर मुहम्मद (स.) काय म्हणतात आणि कोणत्या उद्देशासाठी भाषण शक्तीचा वापर पैगंबर मुहम्मद (स.) करत आहेत. तसेच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उच्च्तम वक्तव्याने जो प्रभाव ईमानधारण करणाऱ्यांवर पडत आहे, तो कशाप्रकारचा प्रभाव आहे? तुम्ही पाहात आहात की पैगंबर मुहम्मद (स.) जी वाणी प्रस्तुत करीत आहे त्यात बुद्धिमत्ता आहे, विचार करण्याची एक संतुलित व्यवस्था आहे. तसेच उच्च्श्रेणीचे संतुलन आणि सत्याची अनिवार्यता आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या भाषणात अल्लाहच्या सृष्टीत सुधारणा करण्याच्या उद्देशाला सोडून इतर कोणताच उद्देश तुम्हाला सापडणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.) फक्त हाच एकमेव विचार करतात की लोकांनी चुकीच्या मार्गाला सोडून कल्याणकारी मार्गाचा स्वीकार करावा. त्यांच्या भाषणाचा प्रभाव ज्यांच्यावर पडला आहे, त्यांचे कल्याणच झाले आहे. आता तुम्ही स्वत: विचार करा काय जादूगार असेच सांगतात आणि त्यांच्या जादूचा असाच परिणाम होतो?

४) म्हणजे निर्माण करून ईश्वर (निर्माणकर्ता) निष्क्रिय बनला नाही तर आपल्या निर्माण केलेल्या सृष्टीच्या राजसिंहासनावर स्वयंभू विराजमान आहे. सर्व जगाचे प्रबंध आता ईश्वराच्याच हातात आहे. (पाहा सूरह ७, टीप ४०-४१)

५) म्हणजे जगाची व्यवस्था आणि प्रबंधामध्ये इतरांचे हस्तक्षेप तर दूरची गोष्ट आहे. एखाद्याला हासुद्धा अधिकार नाही की अल्लाहशी शिफारस करून त्याचा निर्णय बदलावा किंवा एखाद्याचे भाग्य उजळवावे किंवा नष्ट करावे. फार काही एखादा करू शकतो ते म्हणजे तो अल्लाहशी प्र्रार्थना करू शकतो. परंतु त्याची प्रार्थना स्वीकारणे अथवा अमान्य करणे सर्वस्वी अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे.

६) म्हणजे ही वास्तविकता आहे की सृष्टीचा पूर्णत: पालनहार अल्लाहच आहे तर त्याची अपेक्षा आहे की तुम्ही त्याचीच उपासना करावी. अरबीतील शब्द `रब' मध्ये तीन अर्थ सम्मीलीत आहेत. एक म्हणजे निर्माणकर्ता स्वामी, दुसरा पालनकर्ता आणि तिसरा अर्थ शासनकर्ता आहे. याचप्रमाणे `इबादत' या शब्दामध्ये तीन अर्थ सम्मीलीत आहेत. म्हणजे उपासना, गुलामी (दासता) आणि आज्ञापालन.

(१) एकमेव अल्लाह, पालनकर्ता आहे. याचा अर्थ होतो की मनुष्याने फक्त अल्लाहचेच कृतज्ञ बनून राहिले पाहिजे. अल्लाहशीच फक्त प्रार्थना करावी आणि त्याच्याच पुढे प्रेमाने आणि श्रद्धाशीलतेने झुकावे. उपासनेचा हा पहिला अर्थ आहे.

(२) एकमेव अल्लाह, निर्माणकर्ता स्वामी आणि मालक आहे. याचा अर्थ होतो की मनुष्याने अल्लाहचाच गुलाम आणि दास बनून राहावे. इबादत (उपासना) चा हा दुसरा अर्थ आहे.

(३) एकमेव अल्लाह शासनकर्ता आहे म्हणजे मनुष्याने त्याच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे. मनुष्याने स्वत:चा शासक बनू नये किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्या कुणाची प्रभुता (सार्वभौमत्व) स्वीकारू नये. इबादत (उपासना) चा हा तिसरा अर्थ आहे.

७) म्हणजे वास्तविकतेच्या या खुलाशानेसुद्धा तुमचे डोळे उघडणार नाहीत? काय तुम्ही याच गैरसमजुतीत पडून राहाल ज्यांच्या आधारावर तुमचे जीवनव्यवहार आतापर्यंत सत्याविरुद्ध आहेत?

८) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीचा हा दुसरा मूलभूत सिद्धान्त आहे. पहिला मूलभूत सिद्धान्त म्हणजे तुमचा `रब' (निर्माणकर्ता स्वामी, पालनकर्ता आणि शासनकर्ता) केवळ अल्लाह आहे. म्हणून त्याचीच उपासना, गुलामी आणि आज्ञापालन (इबादत) करा आणि दुसरा सिद्धान्त म्हणजे तुम्हाला या जगातून परत जाऊन आपल्या `रब' पुढे पूर्ण जीवनव्यवहाराचा हिशेब द्यावा लागणार आहे. 

९) हे वाक्य दावा आणि प्रमाण दोघांचा योग आहे. दावा आहे की अल्लाह दुसऱ्यांदा मनुष्याला जन्म देईल. याचे प्रमाण म्हणजे अल्लाहनेच मनुष्याला पहिल्यांदा निर्माण केले. जो मनुष्य स्वीकार करतो की अल्लाहने ब्रम्हांड निर्माण केले आहे तो मनुष्य हे असंभव कसे समजेल की अल्लाह या सृष्टीचे पुन: निर्माण करेल.

१०) ही ती आवश्यकता आहे ज्याच्या कारण अल्लाह मनुष्याला दुसऱ्यांदा जिवंत करील व जो तर्क दिला आहे त्यावरून हे सिद्ध होण्यास मदतच होते की या सृष्टीची पुनरावृत्ती संभव आहे आणि यास असंभव समजणे असत्य आहे. आता हे दाखविले जात आहे की सृष्टीची ही पुनरावृत्ती बुद्धी आणि न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. (ईमान, आज्ञापालन आणि उपासना पद्धतीचा स्वीकार करणारे आणि अवज्ञा करणारे, अस्वीकार करणारे दोन्ही याचे हकदार आहेत की त्यांना आपापल्या कृत्याचा पूर्ण मोबदला मिळावा) ही आवश्यकता वर्तमान जीवनात जर पूर्ण होत नसेल (प्रत्येकाला ज्ञात आहे की ही आवश्यकता येथे पूर्ण होत नाही) तर यास पूर्ण करण्यासाठी निश्चितरुपेण दुसऱ्यांदा जीवन अनिवार्य आहे. (तपशीलासाठी पाहा सूरह ७, टीप ३०, सूरह ११ टीप १०५)

११) परलोक विश्वासाचा हा तिसरा पुरावा (प्रमाण) आहे. सृष्टीत अल्लाहची जी कामे चहुकडे दिसतात ज्यांची मोठमोठी चिन्हे म्हणजे सूर्य, चंद्र, रात्रंदिवसाचे चक्र प्रत्येकासमोर आहेत. यावरून या गोष्टीचे स्पष्ट प्रमाण मिळते की या सृष्टीला निर्माण करणारा कोणी एखादा मुलगा (बाळ) नाही व त्याने या सृष्टीला खेळण्यासाठी बनविले नाही. बाळ खेळता खेळता खेळणीला जसे मन भरल्यानंतर तोडून टाकतो तशी ही सृष्टी खेळणी नाही की उबग आल्यावर तोडून फोडून टाकावी. येथे आपणास स्पष्ट दिसून येते की सृष्टीनिर्मात्याच्या प्रत्येक कामात सुव्यवस्था आहे, तत्त्वदर्शिता आहे आणि कणाकणाच्या निर्मितीत एक मोठा उद्देश आहे. म्हणून या तत्त्वदर्शितेची आणि निहित उद्देशांची चिन्हे सृष्टीत तुमच्यासमोर विद्यमान आहेत. यावरून तुम्ही ही आशा कशी ठेवू शकता की मनुष्याला त्याच्या निर्माणकर्त्या स्वामीने बुद्धी, नैतिक चेतना, स्वतंत्र दायित्व आणि उपयोगाचे अधिकार प्रदान केले आहेत तरी तो मनुष्याच्या जीवन व्यवहारांचा  हिशेब  कधीही  घेणार नाही!  तसेच  बुद्धीविवेकपूर्ण  आणि  नैतिक  दायित्वाच्या  आधारावर मोबदला आणि शिक्षेसाठीचा अधिकार अनिवार्यत: निर्माण होतो, त्यांना तो असाच व्यर्थ घालविल!

याविषयी एक महत्त्वपूर्ण विषय येथे विशद करण्यात आला आहे ज्यासाठी गंभिरतापूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सांगितले गेले, अल्लाह आपल्या निशाण्या स्पष्ट उघड करीत आहे त्या लोकांसाठी जे ज्ञानी आहेत. (जे बुद्धी ठेवतात) `आणि अल्लाहने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे चुकीच्या विचारांपासून आणि चुकीच्या वर्तणुकीपासून वाचू इच्छितात.' याचा अर्थ म्हणजे अल्लाहने अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीने जीवनाच्या प्रत्येक वस्तूत चोहोकडून निशाण्या ठेवल्या आहेत जे या प्रत्यक्ष वस्तूंमागे लपलेल्या तथ्याचा स्पष्ट उल्लेख करतात. परंतु या निशाण्या पाहून तथ्यांपर्यंत केवळ तेच लोक पोहचू शकतात ज्यांच्या जवळ खालील दोन गुण आहेत -

एक म्हणजे अज्ञानतापूर्ण पक्षपातापासून पवित्र होऊन म्हणजेच पूर्वग्रहदूषितपणा सोडून ज्ञानप्राप्तीच्या त्या साधनांना स्वीकारावे जे अल्लाहने त्यांना दिले आहेत.

दुसरे म्हणजे त्यांच्याजवळ स्वत: ही इच्छा प्रकट होणे आवश्यक आहे की दुराचारापासून परावृत्त व्हावे आणि सदाचाराचा त्यांनी स्वीकार करावा आणि जीवनाच्या सत्य मार्गावर चालण्यास तयार व्हावे.



अन्याय हा सुद्धा केला की, समाजाच्या आणखीन एका मोठ्या भागाला योग्य आणि उपयोगी कामापासून हटवून अशिष्ट, अपमानजनक आणि हानिकारक कामामध्ये लावून दिले आणि सभ्यतेच्या गतीला योग्य मार्गाशी वेगळे करून अशा मार्गाकडे वळवून दिले जे मानवांना भ्रष्टतेकडे घेऊन जाणारे आहेत. मग या बाबीचा अंत तिथेच झाला नाही. मानव संपत्तीला नष्ट करण्यासोबतच त्यांनी भौतिकसंपत्तीचा अयोग्य प्रकारे उपयोग केला. त्यांना महालांची, फुलवाडयांची, मनोरंजनाच्या स्थळांची, नाचघरांची आदीची गरज पडली, इथपर्यंत की मेल्यानंतर जमिनीवर या महाशयांना शेकडो एकर जमीन आणि अलिशान भावनांची गरज भासली. या प्रकारे ती जमीन, ते निर्मितीचे सामान, तो मानवी श्रम जो अनेक लोकांच्या राहण्याचा प्रबंध करण्यासाठी पुरेपूर होता. एकेका विलासी माणसाच्या आवास आणि स्थायी ठिकाणावर लावला गेला. त्यांना आभूषणांची, उत्तम वस्त्रे, उत्कृष्ट यंत्र, भांडी, शृंगार आणि साज सज्जतेचा वस्तू, शानदार सवारी आणि न जाणो कोणकोणत्या वस्तू ची गरज भासली. इथपर्यंत की या अत्याचारर्‍यांचे दरवाजे सुद्धा किमती पडद्या वीणा विवस्त्र समजले जात होते, त्यांच्या भिंती सुद्धा शेकडो आणि हजारो रुपयांच्या चित्रांनी सुसज्जित झाल्या शिवाय राहू शकत नव्हत्या, त्यांच्या खोल्यांची जमीन सुद्धा हजारो रुपयांची कालीन पांघरु इच्छित होती. त्यांच्या कुत्र्यांना देखील मखमली गाद्या आणि सोन्याच्या पट्ट्यांची गरज होती. या प्रकारे ती खूप अशी सामुग्री आणि प्रचुर मानवी श्रम जे हजारो लोकांचे शरीर झाकण्यासाठी आणि पोट भरण्याच्या कामी येऊ शकत होते, त्यास एक एका व्यक्तीच्या विलासिता आणिअय्याशितेवर लावून दिले गेले. हा सैतानी मार्गदर्शनाच्या एका भागाचा परिणाम होता. दुसऱ्या मार्गदर्शनाचे परिणाम या पेक्षा अधिक भयानक आहेत. हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात त्याच्या आपल्या गरजेपेक्षा जास्त जीवीकांची साधने असलेली असतील तर त्यांना तो एकत्रित करत चालला आणि मग अधिकजिविकेची साधने प्राप्त करण्यासाठी वापर करीत राहिला. हे तर स्पष्ट व चुकीचे आहे. विदित आहे की ईश्वराने जीवीकेची जी सामग्री पृथ्वीवर निर्माण केली आहे तिला सजीवांच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केले आहे. तुमच्याजवळ सुदैवाने आज जर अधिक सामग्री आलेली आहे तर तो दुसऱ्यांचा वाटा होता, जो तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. याला एकत्र करण्यास कुठे चालले आपल्या चौफेर बघा लोक, सामुग्रीतून आपला वाटा प्राप्त करण्यास अयोग्य दिसतील किंवा त्यास प्राप्त करण्यात असफल राहुल गेलेले असतील किंवा ज्यांनी आपल्या गरजेपेक्षा कमी मिळविलेआहे, समजून घ्या की हेच ते लोक आहेत त्यांचा वाटा तुमच्या पर्यंत पोहोचला आहे. ते प्राप्त करू शकले नाही तर तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. हे योग्य काम करण्याऐवजी तुम्ही त्या माणसांना आणखी अधिक आर्थिक संसाधन प्राप्त करण्यासाठी उपयोग कराल तर हे चुकीचे काम होईल. कारण कोणत्याही परिस्थितीत ती अतिरिक्त सामग्री जी तुम्हीमिळवाल तुमच्या गरजेपेक्षा आणखी जास्त होईल. मग यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहणे आणि आम्ही आपल्या वाढीव इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे यापेक्षा अधिक भ्रष्टतेचा मार्ग कोणता असू शकतो. जिविकेच्या वस्तू प्राप्त करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा वेळ,श्रम आणि योग्यतेचा जितका भाग आपल्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करता त्याचा व्यय तर उचित रूपात होत असतो. पण या मौलिक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंना या कामात लावण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आर्थिक पशु नव्हे तर धन निर्माण करण्याचे यंत्र बनत अहात. परंतु तुम्हाला वेळ, श्रम, मानसिक आणि शारीरिक शक्तीसाठी अर्थोपार्जनाशिवाय आणखीन चांगली कामे सुद्धा आहेत. बुद्धी आणि निसर्गाच्या प्रमाणानुसार हा सिद्धांत संपूर्ण चुकीचा आहे. जो सैतानाने आपल्या शिष्यांना शिकविला आहे. परंतु या सिद्धांताच्या आधारावर ज्या व्यापारीक पद्धती बनविल्या गेल्या आहेत त्यांचे परिणाम इतके भयानक आहेत की त्यांचा योग्य अंदाज करणे अत्यंत कठीण आहे. 

गरजेपेक्षा जास्त अर्थसाधनांना व अधिकाधिक संसाधनांनी ताब्यात आणण्यासाठी उपयोग करण्याचे दोन प्रकार आहेत. 

या साधनांना व्याजावर कर्ज दिले त्यांना व्यापारी आणि औद्योगिक कार्यामध्ये लावले जावे. या दोन्ही विधी जर निसर्गात एक दुसऱ्या पेक्षा वेगळे जरूर आहेत. परंतु दोन्हीचा संयुक्त रूपाने व्यवहरात असण्याचा स्वाभाविक परिणाम हा होत असतो की समाज दोन्ही वर्गामध्ये विभागला जातो.एक तो अल्प वर्ग जो आपल्या गरजांपेक्षा अधिक संसाधन बाळगतो आणि आपल्या साधनांना आणखी संसाधन प्राप्त करण्यासाठी लावून देतो दुसरा तो मोठा वर्ग जो आपल्या आवश्‍यकतेनुसार किंवा त्यापेक्षा कमी संसाधन ठेवत असतो किंवा काहीच ठेवत नाही या दोन्ही वर्गाचे हित फक्त एक दुसऱ्यांच्या विरुद्धच राहत नाही तर त्यांच्यात संघर्ष आणि वाद उभा राहात असतो. अशा प्रकारे मानवाची अर्थव्यवस्था निसर्गाने विनिमय आणि पारंपारिक देवान-घेवाणाला ज्याचा आधार वाढविला होता. तो एक प्रकारे पारस्परिक युद्धात स्थापित होऊन राहून जातो. मग हा संघर्ष इतका वाढत जातो की, श्रीमंत वर्ग संख्येत कमी आणि गरीब वर्ग अधिक होत जातो, कारण हा संघर्ष आहेच काही अशा प्रकारचा की जो जास्त श्रीमंत आहे तो आपल्या धनाच्या जोरावर कमी धनवान लोकांचे संसाधन सुद्धा ओढून घेतो आणि त्याला गरीब वर्गात लोटून देतो. याप्रकारे पृथ्वीचे आर्थिक संसाधन दिवसेंदिवस लोकसंख्येच्या कमीत कमी भागाजवळ जमा होते आणि दिवसेंदिवस लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग गरीब किंवा धनवानांचा आश्रित होत जातो.

प्रारंभी हे युद्ध आणि संघर्ष लहान प्रमाणावर सुरू होते. मग वाढत वाढत देश आणि राष्ट्रापर्यंत पसरते. इथ पर्यंत कि सर्व जगाला आपल्या सापळ्यात घेऊन सुद्धा त्याचे पोट भरत नाही. प्रकार हा आहे की जेव्हा एका देशाचा सार्वत्रिक कायदा हा होऊन जातो की ज्या लोकांजवळ आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल त्यांनी आपला अतिरिक्त माल लाभकारी कामांमध्ये लावावा आणि हा माल गरजेच्या सामग्री निर्माणावर खर्च व्हावा. तर त्यांच्या लावलेल्या पूर्ण रकमेचे लाभा सोबत परतणे या गोष्टीवर अवलंबून असते की जितक्या वस्तू देशात तयार झाल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व त्याच देशात विकत घेतल्या जाव्यात. परंतु व्यवहारतः असे होत नाही आणि वास्तवात हे होऊही शकत नाही. कारण गरजेपेक्षा कमी माल ठेवणाऱ्यांनाची क्रयशक्ती कमी असते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त धन ठेवणाऱ्यांना ही चिंता असते की, जितकी मिळकत व्हावी त्यातून एक भाग वाचवून लाभकारी कामात लावावा. यासाठी ते आपले सर्व धन खरेदीवर खर्च करत नाहीत. या प्रकारे अनिवार्य रुपाने तयार केलेल्या मालाचा एक भाग न विकता राहून जातो. याचा दुसरा अर्थ हा आहे की भांडवलदारांनी लावलेल्या रकमेचा एक भाग न गुंतविता राहून गेला आणि ही रक्कम देशाच्या उद्योगावर कर्ज म्हणून राहिली. ही केवळ एका चक्राची परिस्थिती आहे. तुम्ही अनुमान करू शकता की अशी जितकी चक्रे होतील त्यातून प्रत्येकात श्रीमंत वर्ग आपल्या प्राप्त आवकेचा एक भाग पुन्हा लाभकारी कामांमध्ये लावत जाईल, आणि जी रक्कम परत मिळण्यापासून राहिलेली आहे त्याचे प्रमाण प्रत्येक चक्रात वाढत जाईल. तसेच देशाच्या उद्योगावर अशा कर्जाचे ओझे दुप्पट, चौपट, हजारपट होत जाईल. ज्याला तो देश स्वतः कधीही फेडू शकत नाही. आज सर्वत्र हीच परिस्थिती आहे. या प्रकारे एका देशाला दिवाळखोरीचा जो धोका येऊन उभा राहतो त्यापासून वाचण्याचा उपाय याशिवाय काही नाही की जितका माल देशात विकण्याचा राहून जातो त्याला दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकावा. म्हणजे असे देश शोधावेत ज्यांच्याकडे हे देश आपल्या दिवाळखोरीला स्थलांतरित करून टाकतील. या प्रकारे हे युद्ध किंवा संघर्ष देशांच्या सीमा पार करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाय ठेवतात. आता हे स्पष्ट आहे की कोणी एक देश असा नाही की जो या सैतानी व्यवस्थेवर चालत असेल. जगाच्या सर्वच देशांची ही स्थिती आहे. ते स्वतः आपल्याला दिवाळखोरी पासून वाचविण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांत आपल्या दिवाळखोरीला एखाद्या दुसऱ्या देशा वर टाकून देण्यासाठी विवश झाले आहेत. या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धा सुरू होते आणि ती काही रूपामध्ये विभागली जाते.

1- प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय बाजारात आपला माल विकण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी लागवडीवर अधिकाधिक माल तयार करावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांचे वेतन खूप कमी ठेवले जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारात देशाच्या सामान्य जनतेला इतका कमी वाटा मिळतो की तिच्या मौलिक गरजाही पूर्ण होत नाहीत.

2- प्रत्येक देश आपल्या सीमेत आणि त्या क्षेत्रात जे त्याच्या प्रभावात असतात दुसऱ्या देशाचा माल येण्यावर प्रतिबंध लावतो. कच्च्या मालाच्या उत्पादनाची जितकी साधने त्याच्या अधिकारात आहेत त्यांच्यावरही पहारा बसवितो, कारण दुसरा त्यापासून लाभ घेऊ शकणार नाही. याने आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतो. याचा परिणाम युद्ध आहे.

3- जे देश या दिवाळखोरीच्या संकटाला आपल्या डोक्यावर येण्यापासून रोखू शकत नाहीत त्यांच्यावर लुटारू तुटून पडतात आणि फक्त आपल्या देशाचा उरलासुरला माल त्यांच्यात विकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर ज्या धनाला स्वतः आपल्या इथे लाभकारी कामांमध्ये लावण्याची आवश्यकता राहत नाही, त्यालाही या देशामध्ये नेऊन लावतात. याप्रकारे शेवटी त्या देशांमध्येही हीच समस्या निर्माण होऊन जाते जो प्रारंभी पैसा लावणाऱ्या देशांमध्ये निर्माण झाली होती. म्हणजे जितका पैसा तिथे लावला जातो तो सर्वच्या सर्व वसुली होऊ शकत नाही त्या पैशाने जितकी मिळकत होते तिचा एक मोठा भाग पुन्हा त्यापेक्षा अधिक लाभकारी कामांमध्ये लावून दिला जातो इथपर्यंत की त्या देशावर कर्जाचे ओझे इतके वाढत जाते की त्या देशात स्वतःस विकून दिले गेले तरी सुद्धा लावलेल्या एकूण रकमेची परतफेड होऊ शकत नाही.

(क्रमशः, भाग - २)

 -अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



आजच्या समाजाची स्थिती पाहता प्रश्न पडतो की आपण खरोखर मानव म्हणण्यास पात्र आहोत का? म्हणजे, जन्म मानवी शरीरात आणि विचार, कृती वन्य प्राण्यापेक्षाही वाईट. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अत्याचार, अंमली पदार्थांचे व्यसन, लोभ, अश्लीलता, अनादर, द्वेष, लबाडी, फसवणूक, स्वार्थ सातत्याने वाढत आहे, जे संपूर्ण मानवतेला पोकळ करत आहे. आपल्या समोर अनेकदा मानवतेला सुद्धा लाजवेल अशी घटना घडतात आणि आपण फक्त पाहत राहतो. लोकांमध्ये परोपकाराची भावना शून्य होत आहे. मानवता हा शब्द मानवापासून बनला आहे. मानवता हा एक गुण आहे जो इतरांच्या कल्याणाशी संबंधित आहे. यात एकमेकांबद्दल करुणा आणि प्रेमाच्या भावना आहेत. लोककल्याणाची इच्छा आपल्या जीवनाचे ध्येय असावे. मानवतेला समर्पित राहून नैतिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध रहावे, मानवी जीवनाची सार्थकता यातच आहे. मानवता ही मानवाची गुणवत्ता आहे ज्यांचे मूलभूत घटक सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, दया, त्याग, शुद्धता, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा आहेत.

दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी आपण जागतिक मानवतावादी दिन साजरा करतो. या विशेष दिवसाचा उद्देश जगभरातील असहाय नागरिकांच्या दुर्दशा बद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. संघर्षात असलेल्यांना मदत करण्यासाठी, आणि त्या मानवतावादी कामगारांसाठी आदर आणि समर्थन वाढवणे जे मदतीसाठी आपला जीव धोक्यात घालतात आणि कधीकधी प्राण सुद्धा गमावतात. युद्ध, गरिबी, भूक, रोग, अन्न समस्या, संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरातील कोट्यवधी लोक संकटात आहेत आणि त्यांना मानवतावादी मदतीची गरज आहे. मानवजातीला शरण जाणे हे मानवतेचे परम कर्तव्य आहे, म्हणूनच जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढे मदतीसाठी पुढे आले पाहिजे.

समाजात स्वार्थ शिगेला पोहोचला आहे आणि तिरस्कार सर्वत्र रुजलेला दिसतो. फक्त एक रुपयाचा सुद्धा फायदा का नसावा, पण भेसळ करणारे लोक समाजातील निष्पापांना स्लो पॉइझन देऊन (अन्नपदार्थांमध्ये घातक रसायनांचा वापर आणि जे खाण्यास योग्य नाही अशा अन्नाद्वारे) गंभीर आजारांनी ग्रस्त करून, त्यांना मृत्यू दिला जातो. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि शिफारशी द्वारे काम करून घेण्याचा प्रयत्न केला जातो, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे अधिकार काढून घेतले जातात आणि शब्द व कृतीत फरक जाणवतो. एखाद्या व्यक्तीची ओळख व स्थिती संपत्ती द्वारे निश्चित होते, लोकांना श्रीमंतांना मदत करायला आवडते, गरीबांना नाही, जेव्हा की गरीब गरजू आहेत. कमजोरांवर राग काढला जातो, प्रत्येकजण स्वतःच्या नजरेत सर्वोत्तम असतो तर इतरांच्या नजरेत का नाही? माणूस बऱ्याचदा इतरांमध्ये दोष शोधण्यात मग्न असतो, इतरांचे शेकडो दोष लगेच दिसतात, पण आपण स्वतःला गुणांनी परिपूर्ण समजतो. 

नेहमी वाईट घटना घडल्यानंतर आपण रॅली आणि प्रदर्शनाद्वारे आपला शोक व्यक्त करतो, पण या वाईट घटना घडूच नयेत यासाठी आपण कधी पुढाकार घेतो का? एक जबाबदारी म्हणून मी आणि माझे कुटुंब, पण यापुढे आपला समाज, आपला देश आणि मानवजातीच्या उन्नतीची अभिव्यक्ती विचारात घेतली आहे का? निरागस मुले इतरांच्या आनंदात आनंदी आणि इतरांच्या दुःखात दुःखी वाटतात, पण मोठे असून सुद्धा आपल्याला इतरांच्या सुख-दु:खात तीच भावना जाणवते का? अनेकदा आपल्या आजूबाजूला अवैध घटना घडतात, ज्यांना आपण आपल्या जागरूकतेने थांबू शकतो, पण आपण आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतो का? आधुनिकतेच्या अंध शर्यतीत प्रत्येकजण इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी धावत आहे ते सुद्धा फक्त देखाव्यासाठी, पण यात तो स्वतःचा आनंद आणि शांती गमावत आहे. स्टेटस सिम्बॉल च्या नावाखाली आपण माणुसकी पासून दूर चाललोय.

कायदे आणि नियम मानवजातीच्या कल्याणासाठी बनवले जातात जेणेकरून प्रणाली सुरळीत चालेल, परंतु नियमांचे उल्लंघन करण्यात, सुशिक्षित आणि निरक्षर सर्वच समाविष्ट आहेत. जर प्राण्यांना देखिल नियम शिकवले गेले, तर ते सुद्धा नियमांनुसार वागायला शिकतात पण विवेक बुद्धि असूनही माणूस स्वतः स्वार्थाने वागतो. समाजात सभ्य, भीतीने राहतात आणि बदमाश निर्भयपणे जगतात, चुका करूनही लढण्यासाठी सदैव तयार असतात, मौल्यवान वेळ वाया घालवतात, तरुणांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. कोरोना महामारीमध्येही मोठ्या संख्येने लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करतात, वाहतुकीचे नियम तसेच अनेक क्षेत्रात सरकारी नियम उघडपणे मोडले जातात, आजकाल प्रत्येकजण म्हणतो की जग खूप वाईट आहे पण जग तर आपल्या सर्वांना मिळूनच बनलेले आहे, पालक देखील म्हणतात की मुले खूप बिघडली आहेत, मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, फॅशन आणि नशेकडे आकर्षित होत आहेत पण पालक मुलांना योग्य वातावरण निर्माण करून देत आहेत का? पालक स्वतः अनेकदा मुलांसमोर अयोग्य वर्तन करतात, मुलांचा चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि ते इच्छितात की त्यांची मुले समाजाचे कर्तव्यनिष्ठ व दक्ष नागरिक व्हावी, पण हे विसरू नका की मुलांना त्यांचे पहिले धडे घरातूनच मिळतात आणि नंतर बाहेरून. पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा कितीही असली तरी जर माणुसकी नसेल तर माणूस म्हणता येणार नाही.

मुलांकडे पालकांची थोडीशीही निष्काळजीपणा मुलांसाठी तसेच संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरते. पालकांना प्रार्थना आहे की आयुष्यात तुम्ही तुमच्या मुलांना काही  देऊ किंवा नका देऊ पण चांगले संस्कार अवश्य द्या चांगले संस्कार शिष्टाचार चांगले आचरण, वर्तन शिकवतात, जीवनाच्या प्रत्येक समस्येशी लढायला आणि एक चांगला माणूस बनायला शिकवतात. तुम्ही दिलेले संस्कार मुलांचे संपूर्ण आयुष्य सुखी करतात. समाजात हजारो स्वार्थी लोकांनंतर एक परोपकारी दिसून येतो, जिथे एका व्यक्तीची मर्यादा संपते तिथे दुसऱ्या व्यक्तीची मर्यादा सुरू होते म्हणून आपली मर्यादा कधीही ओलांडू नका. कृपया प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी असहाय लोकांना मदत करू नका, चांगले काम करून विसरून जावे. जर आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत, तर आपले ध्येय मानवतेसह जगणे असावे. तुम्ही आयुष्यात चांगली कामे केल्याचे आनंद विकत घेऊ शकत नाही, ते तुमच्या सत्कर्मानेच मिळेल. वाईट कृत्ये करून माणूस आनंदी होऊ शकत नाही. वाईट कृतीत माणसाचे आयुष्य वाया घालवू नका, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान बाळगून माणुसकीने जगावे.

-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


सोशल मीडिया हे माध्यम आधुनिक काळातील एक फार प्रभावी माध्यम ठरले आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की प्रत्येकाला हे माध्यम हाताळणे एकदम सोपे आणि सूलभ झाले आहे. विशेष करून आजच्या काळात जे प्रींट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचा भला मोठा विभाग आपली जबाबदारी पार पाडण्याच्या बाबतीत अयशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत या माध्यमाचे महत्व अधीकच वाढून जाते.  आणि हेच कारण आहे की  आधुनिक काळात सोशल मीडिया हे माध्यम फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय देखील झाले आहे. सोशल मीडियाच्या विविध स्तरावर आज प्रत्येक जन व्यस्त असल्याचे आपणास दिसून येते. असे म्हटले जाते की भारतातील जवळपास सत्तर टक्के जनता ही सोशल मीडियाचा वापर करते आणि या माध्यमाची शौकीन असून सोशल मीडियाने फार प्रभावित असल्याचे आपण पाहतो आणि आपण स्वतः देखील या माध्यमाने प्रभावित असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. परंतु या माध्यमाचा वापर करीत असताना अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचं भान ठेवावा लागतो. कारण सोशल मीडियाला देखील काही मर्यादा असतात. कही नियम व अटी असतात. सोशल मीडियातील शिष्टाचार देखील डोळ्यांसमोर ठेवण्याची गरज आहे. वास्तविक पाहता ही एक मोठी देणगी आपल्याला लाभलेली आहे. इतर मंडळी जी माध्यमाचा वापर चूकीच्या मार्गासाठी, चूकीच्या गोष्टींचा प्रचार व प्रसार करण्यासाठी करीत आहेत. अशा परिस्थितीत जी सूज्ञ व बूध्दिजीवी मंडळी आहे त्यांची ही जबाबदारी आहे की सत्य आणि सकारात्मक विचार आणि गोष्टींना पुढे नेण्यासाठी तसेच एखाद्या समस्येवर खरा तोडगा काढण्यासाठी आवश्यक बाबी लोकांसमोर मांडण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्याची आज नितांत गरज आहे. या माध्यमाचा वापर एका नियोजनबद्ध पद्धतीने केला गेला पाहिजे. परंतु आज सोशल मीडिया मध्ये कही अशा प्रकारच्या क्लिप्स, अशा प्रकारचे विडियो असतात जे नकारात्मक दृष्टिकोनाला खतपाणी घालतात. गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देतात. विध्वंसात्मक कृत्यांना प्रोत्साहन देतात. तसेच व्यसनाधीनता व नग्नतेचं समर्थन करतात किंवा काही घटना व विडिओ तर असे असतात की जे मनुष्याच्या मनाला विचलित करतात. अशा प्रकारच्या क्लिप्स आणि विडियोला बरीच मंडळी फॉरवर्ड करीत असतात. यातील बर्याच प्रमाणात क्लिप्स आणि विडियो हे खोटे आणि असत्य असतात. जुने असतात. त्यामध्ये कुठलीही सत्यता नसते. वस्तुस्थितीशी त्यांचा काहीएक संबंध नसतो. त्यांना एडीट केले जाते. फोटोशॉप आणि इतर पध्दतीने त्यामध्ये अशा प्रकारे मिक्सिंग केली जाते आणि तोडून मोडून सादर केले जाते की जनू ती घटना नुकतीच घडली आहे. नंतर त्याला हेडींग आणि कॅप्शन देऊन प्रसारीत केले जाते. ज्यामुळे लोकांच्या मनात तिरस्काराच्या भावनेची वाढ होते. नकारात्मक संदेशाचा प्रसार केला जातो. जूलुम आणि अत्याचाराचे हिडीस प्रदर्शन होते आणि बरीच मंडळी अशा प्रकारच्या सामग्रीला मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करीत असतात व असे समजले जाते की ते फार मोठं धार्मिक आणि नैतिक कर्तव्य पार पाडत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे काही संघटना आणि काही ग्रूप असे आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षपात पसरवण्याचे काम करीत आहे. आणि वातावरणाला तापवण्याचा व वातावरणात ढवळाढवळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. काही लोकं आणि काही शक्तींचे हे एक प्रकारचे नियोजनबद्ध षडयंत्र असते आणि विशेषकरून आज जी आपल्या देशाची अवस्था आहे की काही समाज विघातक शक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय सलोखा संपवून जातीय द्वेष पसरवून आपापसात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यास मदत मिळू शकेल. अशा या काळोखमय वातावरणात आपल्याला या सर्व कट- कारस्थानाला ओळखण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांच्या या कारस्थानाला बळी पडून त्यांच्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतो. परीणाम स्वरूप त्या समाजविघातक शक्ती त्यांच्या उद्देशात सफल होतात. या दृष्टीकोनातून फार गंभीर पणे विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक मूद्यांवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कोणत्या मूद्यांवर प्रतिक्रिया द्यायची, किती प्रमाणात द्यायची, कोणत्या भाषेत द्यायची हा एक शिष्टाचार असतो संभाषण करण्याचा. सबळ पूराव्यानीशी,  शांतचित्ताने आणि सुमधुर वाणीने सदर क्लिप्स किंवा विडियो आणि घटनेवर प्रतिसाद व प्रतिक्रिया दिली पाहिजे. जर आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचे, कोणावर कटाक्ष जरी करायचा असल्यास किंवा शासनाच्या एखाद्या धोरणास आपल्याला विरोध करायचा असल्यास तसेच सरकारला एखादी सूचना करायची असले तरी त्याला एक शिष्टाचार असला पाहिजे. अशा वेळी सुद्धा इतमामाने व सन्मानाने बोलले पाहिजे. अशा काही समाजविघातक घटना घडविल्या जातात आणि नंतर त्या तेल मिठ लावून प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केल्या जातात अशा वेळी एकदम भावनेच्या आहारी जाऊन त्यात उडी घेऊन त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची काहीच गरज नाही. यातून स्वतः ला अलिप्त ठेवण्याची फार गरज आहे. ही आपल्यासाठी एक अग्नी परीक्षा सूध्दा आहे. सोशल मीडियावर आज ही संस्कृती बघायला मिळते की आपल्यापैकी बरेचजण आशा संभाषणांना, अशा भाषणांना, अशा प्रवचनांना, मग ती राजकीय असो किंवा अराजकीय त्यांना फॉरवर्ड करण्यात मोठी आवड दाखवितात . अशी भाषणे जी वास्तविकते पासून मैलो दूर असतात. भडकाऊ भाषणं, घोषणाबाजी करून व्यक्त केलेल्या भाषणांना, निराधार गोष्टींना, निराधार आश्वासनांना, निराधार वक्तव्यांना मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जाते व अशा साहित्य आणि सामग्रीला फॉरवर्ड करून फॉरवर्ड करणारा आपल्या शहाणपणाचा टेंभा मिरवित स्वतः ला फार समाधानी समजत असतो. आणि तो हे समजत असतो की त्याने जे काही केले ते योग्यच होते. वास्तविक पाहता सोशल मीडियाच्या शिष्टाचारात हे बसत नाही की कुठल्याही घटनेची सत्यता पडताळून न पाहता तिला फॉरवर्ड केले जावे. कोणतीही गोष्ट किंवा घटना पूढे फॉरवर्ड करण्या आधी त्याची सत्यता पडताळून बघीतली पाहिजे. ती तथ्यावर आधारित आहे की नाही हे तपासून बघितल्यावरच ती पूढे फॉरवर्ड करावी. आता सोशल मीडियामध्ये ही जी छानबीन करण्याची पद्धत आहे ती फार किचकट आणि क्लिष्ट आहे. पहिले तर लोकांची ही मानसिकताच नाही राहायली छानबीन करण्याची. त्यामुळे त्यांना आलेल्या घटना व विडियोंना तात्काळ फॉरवर्ड करण्यातच धन्यता मानली जाते व अशा क्लिप्स आणि विडियो की ज्यांचा संबंध आपल्या शहराशी, आपल्या जिल्ह्याशी किंवा आपल्या राज्य आणि राष्ट्राशी देखील नसतो ताबडतोब प्रसारीत केल्या जातात. त्यांना अशा प्रकारे एडीट केले जाते की जनू ती घटना नुकतीच व आपल्या शेजारीच घडली. अशा प्रकारांना वेळीच ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी आजकाल व्हेरीफिकेशनची व शहानिशा करून घेण्याची जी साधनं आहेत त्यांची पण खूप मदत घेतली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे की एखादी गोष्ट त्यांच्या जवळ आल्यावर तिची सत्यता तपासल्या शिवाय व शाहनिशा करून घेतल्या शिवाय ती पूढे पाठवू नये. दूसरी गोष्ट ही पण आहे की काही अशा घटना घडतात की ज्यामध्ये एका व्यक्तीवर अन्याय व अत्याचार होत असतो आणि तो अत्याचार सहन करीत असतो व हिंसात्मक घटना घडत असते अशा प्रकारच्या क्लिप्स किंवा विडियोला बातमीच्या उद्देशाने किंवा लोकांना सजग करण्यापर्यंत तर ठीक आहे परंतु त्याचा जास्त प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या लोकांचा उद्देश पूर्ण होईल की ज्यांनी सदर घटना घडवून त्याचा विडियो बनविला व व्हायरल केला. कारण त्यांचा प्रयत्नच हा असतो की तुमच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी व तुम्ही नैराश्याला बळी पडावे.   त्यामुळे अशा प्रसंगी फार सावधानता बाळगण्याची नित्तांत गरज आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना त्यातील शिष्टाचार डोळ्यासमोर ठेवूनच करायला पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेच्या मनात भीती व नैराश्याने ग्रस्त होऊ नये. प्रत्येक गोष्ट ही सत्याच्या कसोटीवर पारखूनच पूढे फॉरवर्ड करावी अन्यथा तिला तिथेच तिचा प्रचार व प्रसार थांबविला पाहिजे व सदर घटना डिलीट करून टाकावी.

-सलीम पठाण, अंबड, जि. जालना



अखेर १५ ऑगस्ट २०२१च्या रात्री बंडखोरांनी अमेरिकेच्या पाठिंब्याने कठपुतली सरकारचा पराभव करून काबूलचा ताबा घेतला, तेव्हा अफगाणिस्तानात ब्रिटिश आणि सोव्हिएत आक्रमकांच्या पराभवाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. अमेरिकेच्या आदेशांनुसार विचलित झालेले कठपुतली अध्यक्ष अशरफ घानी यांनी अफगाणिस्तानातून शेजारच्या ताजिकिस्तानला पलायन केले. घानी बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानवरील अमेरिकेचा २० वर्षांचा ताबा संपुष्टात आला. ब्रिटनसारख्या पाश्चिमात्य साम्राज्यवादी देशांनी त्यांचा निषेध केला असला आणि त्यांची वैधता स्वीकारण्यास नकार दिला असला, तरी बंडखोर देशाची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. तथापि, चीन, इराण, पाकिस्तान आणि रशियासमर्थित अफगाणी बंडखोरांना आपल्या पूर्वीच्या राजवटीपेक्षा कितीतरी अधिक आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले नवीन सरकार स्थापन करण्याची खात्री आहे. पाश्चिमात्य मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी इस्लामोफोबियाला चालना देण्यासाठी कोणताही विश्वासार्ह पुरावा किंवा जमिनीवरील उपस्थितीशिवाय त्याच्या ताब्यात असलेल्या भागात कथित बंडखोरांद्वारे अत्याचाराच्या कथा पसरविल्या. बंडखोरांशी झालेल्या करारानुसार ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा अमेरिकेचा निर्णय साम्राज्यवादी युद्धखोरांसाठी सर्वात मोठा अपमान ठरला. कोरिया, व्हिएतनाम, एल साल्वाडोर, कांगो, इराक आणि सीरियानंतर अफगाणिस्तानने अमेरिकेच्या साम्राज्यवादावर आणखी एक लाजिरवाणे लेबल लावले, जे दुसऱ्या महायुद्धापासून जागतिक वर्चस्वाचा क्रूरपणे शोध घेत आहे. वॉटसन इन्स्टिट्यूट, इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स, ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि द फ्रेडरिक एस. पार्डी सेंटर फॉर द स्टडी ऑफ द लॉन्ग रेंज फ्युचर, बोस्टन युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त अभ्यासात असे दिसून आले आहे की अफगाणिस्तान युद्धात सुमारे २,३८,००० ते २,४१,००० लोक मृत्युमुखी पडले आहेत. या २० वर्षांत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अंदाजे ७१,३४४ नागरिक ठार झाले आहेत. या कारवाईत सुमारे २,४४२ अमेरिकी सैनिक आणि १,१४४ नाटो किंवा मित्रराष्ट्रांचे सैनिक ठार झाले आहेत, तर ६६,००० ते ६९,००० अफगाण सरकारी सैन्य आणि मिलिशिया सैनिकांचाही कारवाईत मृत्यू झाला आहे. बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांनी ८४,१९१ सैनिक गमावले आणि त्यापैकी ३३,००० सैनिक पाकिस्तानी प्रदेशात मारले गेले. ऑक्टोबर २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या साम्राज्यवादी राजवटीने बंडखोरांविरुद्ध सुरू केलेल्या अफगाण युद्धात अमेरिकेने आतापर्यंत २.२६ ट्रिलियन डॉलर्स खर्च केले आहेत, असे या अभ्यासात दिसून आले आहे. प्रतिगामी फॅसिस्ट मिस्टर बुश यांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वापर करून एका परदेशी देशावर हल्ला चढवला आणि "स्वातंत्र्य" देण्याच्या अमेरिकन साम्राज्यवादी क्लिचचा वापर करून त्यावर कब्जा केला. त्यांचे उत्तराधिकारी बराक ओबामा- बिडेन यांचे माजी बॉस- यांनीच अफगाण युद्धाला उच्च पातळीवर नेले आणि अफगाण लोकांच्या हाती अमेरिकेचा घृणास्पद पराभव वाढविला. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या निर्णयाचे ऐकून माजी राष्ट्राध्यक्ष बुश अतिशय दुःखी झाले. आठ वर्षांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत निरपराध अफगाण आणि इराकी लोकांच्या रक्तावर जगल्यानंतर बुश यांनी हे सर्व शांतपणे म्हटले आहे. त्या हजारो नागरिकांना स्वत: ठार मारण्यास अमेरिका आणि त्याचे मित्र देश जबाबदार आहेत ही वस्तुस्थिती बुश यांनी सोयीस्करपणे लपविली. ग्वांतानामो बे छळ केंद्र बुश यांच्या नेतृत्वाखालील युद्धकैद्यांच्या बर्बर छळाची भयानक कहाणी सांगते. हमीद करझाई किंवा घानी यांच्यासारख्या कठपुतलींचा वापर करून भविष्यातील अफगाणिस्तान बांधण्याची मोठी चर्चा आता साम्राज्यवादी महासत्तेची खिल्ली उडवते. एकेकाळी सीआयएच्या निधीतून मुजाहिदीनमधून कायापालट झालेला आणि नंतर अमेरिकेच्या साम्राज्यवादाने सत्तेवरून हटविलेले बंडखोर आता घानी यांच्या कठपुतली राजवटीच्या मानेवर श्वास घेत आहे. १९७० च्या दशकापासून अफगाणिस्तानच्या इतिहासाने हे सिद्ध केले आहे की कोणतीही खुनी राजवट देशावर दडपशाहीने राज्य करू शकत नाही कारण अफगाण जनता त्यांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत तडजोड करत नाही. राजा जहीर शाह, मोहम्मद दाऊद खान, नूर मुहम्मद ताराकी, हाफिजुल्ला अमीन, बब्रेक करमल, मोहम्मद नजीबुल्लाह, अहमद शाह मसूद, अब्दुल रशीद दोस्तम, गुलबुद्दीन हिकमतयार, मुल्ला ओमर, हमीद करझाई, अशरफ घानी यांसारखे हुकूमशहा पदच्युत झाले होते. अफगाणिस्तानच्या राजकारणातून असे रक्तपिपासू हुकूमशहा नष्ट होऊ शकतात का आणि एक नवीन युग सुरू होऊ शकते का, हे पाहणे आवश्यक आहे. मुक्त आणि चांगल्या अफगाणिस्तानसाठी जनतेने सरंजामशाहीविरोधी, साम्राज्यवादविरोधी, पुरोगामी आणि लोकशाही शक्तीने एकत्र आणि संघटित येणे गरजेचे आहे. हा मुक्तीसाठी एक नवीन संघर्ष आहे. खरे प्रजासत्ताक आणि वास्तविक लोकशाही स्थापित करण्यासाठी जनतेनेही लढा दिला पाहिजे जो आपली राजकीय इच्छाशक्ती प्रकट करेल आणि आधुनिक, समृद्ध आणि स्वतंत्र अफगाणिस्तान तयार करण्यासाठी त्यांचे आर्थिक कल्याण करेल.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


भारतीय घटना सर्व भारतीयांना धर्म, जात, जन्मस्थळ निरपेक्ष असे स्वातंत्र्य, न्याय आणि समता प्रदान करते. सैद्धांतिक पातळीवर हे खरे असेल, पण वास्तव अनुभव विशेषत: मुस्लिमांच्याबाबतीत वेगळा येतो. आजवरच्या सरकारांनी वेळोवेळी मुस्लिम आरक्षणाचा पाठपुरावा नक्की केला; पण पुरेसा तपशील दिलेला नाही, म्हणून ते न्यायालयांनी फेटाळले.

उच्च न्यायालयाने या आरक्षणाची बाजू उचलून धरली असली तरी, ते प्रत्यक्षात यावे म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. मुस्लिम आरक्षणाची मागणी नवी नाही. पण राजकीय नेतृत्वाकडून होत असलेल्या त्यांच्या विश्वासघाताची कहाणी जुनी आहे.

२४ जानेवारी १९४७ रोजी घटना समितीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क सल्लागार समिती नेमली. समितीने ८ ऑगस्ट रोजी मुस्लिमांसाठी कायदा मंडळ, सार्वजनिक सेवांत आरक्षण देण्याची शिफारस केली.

पहिला घात

अल्पसंख्यकांच्या हक्क रक्षणासाठी प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्यासही समितीने सुचविले. एकमताने या सूचना स्वीकारण्यात आल्या.

घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी अल्पसंख्याकांना आश्वासन देताना म्हटले की, ‘भारतात सर्व अल्पसंख्याकांना रास्त आणि न्याय्य वागणूक मिळेल, त्यांच्याविषयी कोणताही भेदभाव केला जाणार नाही.’

दुर्दैवाने लगेच म्हणजे २५ मे १९४९ ला या आश्वासनाचा भंग झाला. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा ठराव फेटाळला जाऊन संबंधित भाग वगळण्यात आला. हा पहिला विश्वासघात होता. हिंदू धर्मातील अनुसूचित जातींसाठी राष्ट्रपतींनी १९५० मघ्ये वटहुकूम काढला. (बौद्ध आणि शीख नंतर समाविष्ट करण्यात आले.) त्या जातीतील मुस्लिम सदस्य मात्र वगळण्यात आले. धार्मिक अंगाने केला गेलेला हा अन्यायच होता.

जसजसा काळ पुढे गेला, तसतसे भारतातील मुस्लिम नागरिक शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आघाडीवर मागास होत गेले. सर्व क्षेत्रात मुस्लिम मागे पडत आहेत, असे लागोपाठच्या जनगणनांनी दाखवून दिले. दरम्यान, सरकारने नेमलेल्या न्या. राजेंद्र सच्चर समितीने १७ नोव्हेंबर २००६ रोजी आपला अहवाल सादर केला.

अनेक क्षेत्रात मुस्लिमांची स्थिती अनुसूचित जातीतील लोकांच्यापेक्षा वाईट असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समितीने काढला होता. मुस्लिमांची स्थितीगती तपासण्यासाठी  यावेळी न्या. रंगनाथ मिश्र यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक आयोग नेमण्यात आला.

या आयोगाचा अहवाल डिसेंबर २००९ मध्ये कोणत्याही कृती अहवालाशिवाय लोकसभेत मांडण्यात आला. मिश्रा आयोगाने न्या. सच्चर समितीच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रीय पातळीवरच्या या दोन अहवालांनंतरही काही जुजबी गोष्टी वगळता काही झाले नाही.

सहा महिन्याचे आरक्षण

दोन राष्ट्रीय अहवाल आणि राज्यनिहाय तपशील हाताशी असताना, महाराष्ट्र सरकारने २००९च्या निवडणुकीपूर्वी मेहमूद उर रहमान समिती नेमली. २१ ऑक्टोबर २०१३ रोजी समितीने अहवाल सादर केला. मुस्लिमांना ८ टक्के आरक्षण द्यावे, असे समितीने सुचवले.

अखेर निवडणुकीच्या थोडे आधी ९ जुलै २०१४ रोजी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारा वटहुकूम काढण्यात आला. विधिमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादीला बहुमत असूनही याचे कायद्यात रूपांतर केले गेले नाही.

मराठा समाजाला आरक्षण देणारा वटहुकूमही त्याचवेळी काढण्यात आला. दोन्ही वटहुकुमांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मराठा आरक्षण बेकायदा ठरवले गेले, पण मुस्लिम आरक्षण उचलून धरले गेले. वटहुकुमाचे आयुष्य ६ महिनेच असल्याने मुस्लिमांना आरक्षणाची फळे मिळू शकली नाहीत.

वटहुकूम कालबाह्य झाल्यावर भाजप- सेनेच्या सरकारने वटहुकुमाला मुदतवाढ दिली नाही. या सरकारने कायदा केला, पण तो न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून. त्याचवेळी न्यायालयाने फेटाळूनही मराठा समाजाच्या बाजूने कायदा झाला.

आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा फेटाळला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री आणि सत्तारूढ आघाडीतील अन्य पक्षांचे नेते अलीकडेच पंतप्रधानांना भेटले. मात्र दुर्दैवाने या नेत्यांकडून मुस्लिम समाजाविषयी अजून चकार शब्द उच्चारला गेलेला नाही.

१५ टक्के लोकसंख्या मागास ठेवून एखादा देश प्रगती करू शकतो का, हा एक प्रश्न आहे आणि मुस्लिमांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे का, हा दुसरा! देशाच्या अल्पसंख्याक समाजाला विश्वास देणे ही आता राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. विद्यमान सरकारने मुस्लिमांना न्याय देण्याची, आरक्षण देण्याची संधी गमावली, तर तो आणखी एक विश्वासघात ठरेल.

न्यायोचित प्रतिनिधित्व

मुस्लिम समाजाच्या खऱ्या प्रश्नाकडे आजही गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. खरे मुद्दे सोडून इतर सर्व निरर्थक मुद्यांचा किस पाडला जातो. भविष्यात हे चित्र बदलले पाहिजे. मुस्लिम समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये न्यायोचित प्रतिनिधित्व मिळायला हवे. या समाजाच्या विकासाकरिता, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.

न्या. सच्चर, न्या. रंगनाथन मिश्रा व मेहमूद-उर-रेहमान समितीने मुस्लिम समाजाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या अहवालांतून मुस्लिम समाज शिक्षणामध्ये अनुसूचित जातीपेक्षाही मागासला असल्याचे सिद्ध होते. त्यामुळेच सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

संपूर्ण राज्यात केवळ तीन आयपीएस अधिकारी आहे. मंत्री, निर्वाचित खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, आयएएस अधिकारी एकही नाही. उच्च न्यायालयात अवघे तीन मुस्लिम न्यायमूर्ती आहेत. यावरून मुस्लिम समाजाची अवस्था स्पष्ट होते.

परिणामी, मुस्लिम समाजाला संसद, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था, नियोजन विभाग इत्यादी प्रत्येक क्षेत्रात योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. अन्यथा, मुस्लिम समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत १४ टक्के आरक्षण लागू करावे. एवढे आरक्षण देणे शक्य नसेल तर, केवळ १० टक्के आरक्षण द्यावे.

- फिरदोस मिर्ज़ा

(लेखक विधिज्ञ असून नागपूर हायकोर्टात वकिली करतात.)

(साभार : डेक्कन क्वेस्ट मराठी) 



आर्थिक परिभाषित आणि शास्त्रीय बाबी वेगळे करुन सरळ सरळ पद्धतीने पाहिले तर मानवाची आर्थिक समस्या आम्हाला ही दृष्टीस येते की, सभ्यतेच्या विकासाचा वेग कायम ठेवत. कशाप्रकारे सर्वच लोकापर्यंत जीवनाच्या आवश्यक वस्तू पोहोचविण्याचा प्रबंध व्हावा आणि कशाप्रकारे समाजात प्रत्येक व्यक्तीला आपले सामर्थ्य आणि योग्यतेनुसार प्रगती करणे, आपल्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करणे आणि आपल्या पूर्णतेला प्राप्त होईपर्यंतचा कालावधी उपलब्ध राहावा. प्राचीन काळात मनुष्याची आर्थिक समस्या जवळजवळ तितकीच सोपी होती, जितकी की जनावरांसाठी सोपी आहे. अल्लाहच्या या धर्तीवर जीवनाच्या अगणित वस्तू पसरलेल्या आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी जीविकेची जितकी गरज आहे ती सुद्धा पूरक प्रमाणात अस्तित्वात आहे. प्रत्येक जण आपली जिविका शोधण्यासाठी निघतो आणि तिला जिविकेच्या खजिन्यामधून प्राप्त करून घेतो. कुणाला ना त्याची किंमत चुकवावी लागते आणि त्याची रोजी कोणा दुसऱ्या प्राण्याच्या ताब्यात आहे. जवळ जवळ हीच व्यवस्था मानवाची सुद्धा होती. प्राकृतिक जीविका ती जरी फळाच्या रूपात असो अथवा शिकारीच्या प्राण्याच्या रूपात, प्राप्त करून घेतले जात होते. प्राकृतिक उत्पादनातून अंग झाकण्याचा प्रबंध करून घेतला आणि जमिनीत जिथे ही अवकाश पाहिला डोके लपवायला आणि पडून राहण्यास जागा बनवून घेतली. परंतु ईश्वराने मानवाला यासाठी निर्माण केले नव्हते की, तो अधिक काळापर्यंत याच स्थितीत राहावा. त्याने मानवामध्ये अशी प्राकृतिक प्रेरणा ठेवली होती की तो एकाकी जीवन सोडून सामूहिक जीवनाचा स्विकार करू लागला आणि आपल्या कामगिरीने आपल्यासाठी त्या साधना पेक्षा चांगले साधन निर्माण करावे जे प्रकृतीने उपलब्ध केले होते. स्त्री आणि पुरुषांमध्ये सततसंबंधाची स्वभाविक इच्छा, मानवी अपत्यांचे अधिक वेळेपर्यंत आई-वडिलांच्या पालन-पोषणाचे गरजवंत राहाणे, आपल्या वंशासंबंधी मानवाची खोलवर आवड आणि रक्तातील नात्यांशी प्रेम, या वस्तू आहेत ज्या मानवाला सामाजिकजीवन अंगी कारण्यास विवश करण्यासाठी स्वंय प्रकृतीनेच त्याच्यात ठेवून दिल्या होत्या. अशाप्रकारे मनुष्याचे आपोआप उपजनाच्या उत्पादनावर न थांबणे आणि शेती वाढीने आपल्यासाठी धान्य निर्माण करणे, पानांनी शरीर झाकणावर न थांबता, आपल्यासाठी वस्त्र तयार करणे, आपल्या गरजांसाठी यंत्राचा आविष्कार करणे, गुहा आणि भट्ट्यामध्ये राहण्यास राजी न होणे आणि आपल्यासाठी स्वतः घर बनविणे इत्यादी या सर्वांची प्रेरणा प्रकृतीनेच त्याच्या ठेवली होती. याचा सुद्धा अनिवार्य परिणाम हाच होता की हळूहळू तो सभ्य व्हावा. अंततः मनुष्य सभ्य आणि सुसंस्कृत झाला त्याच्या प्रकृतीची हीच मागणी आणि सृष्टीची हीच इच्छा होती.

अशा प्रकारे विभिन्न व्यवसायांचे निर्माण होणे, क्रय-विक्रय, वस्तूंच्या मूल्यांचे निर्धारण, मूल्यांच्या मापदंडाच्या स्वरूपावरून रुपयांचे चलन, आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि आयात निर्यातीपर्यंत बाब पोहोचणे, उत्पादनाची नवीन साधने आणि यंत्रांचे वापरात येणे, मिळकतीचे अधिकार आणि वारसा हक अस्तित्व येणे हे सर्व स्वभाविक रूपाने झाले.मग नागरिकता आणि सभ्यतेच्या विकासासोबत हे आवश्यक होते की विभिन्न मनुष्यांच्या शक्तींचे आणि योग्यतेच्याआत जे अंतर प्रकृतीने ठेवले आहे, त्याच कारणामुळे काही लोकांना आपल्या मुळ गरजेपेक्षा अधिक कमावण्याची संधी मिळावी, काहींना आपल्या गरजेपुरते आणि काहींनी त्यापेक्षा कमी कमवावे.

काही लोकांना वारसाहक्कद्वारे जीवनाची सुरुवात करायला चांगली संसाधने उपलब्ध व्हावीत. काही कमी साधना सोबत आणि काहींनी विना साधनांच्या साह्याने जीवन क्षेत्रात पाय ठेवावा. प्राकृतिक कारणाने प्रत्येक लोकवस्तीत असे लोक अस्तित्वात राहावे जे अर्थार्जनाच्या कामात भाग घेण्याची आणि विनिमय कार्यात सहभागी होण्यास पूर्णपणे असमर्थ असावेत. जसे मुले, वृद्ध, आजारी आणि अपंग इत्यादी. काही लोक सेवा घेणारे आणि काही लोक सेवा करणारे असावेत आणि अशा प्रकारे मुक्त कला कौशल्य, व्यापार, कृषी आणि नोकरी तसेच मजुरीची अवस्था सुद्धा निर्माण व्हावी.

हे सर्व सुद्धा स्वंय मानवी समतेचे स्वाभाविक प्रतीक आणि प्राकृतिक भाग आहेत. या बाबींची निर्मिती होणे देखील आपल्या जागी काही गुन्हा किंवा वाईट नाही की यांच्या ऊन्मुलनाची चिंता केली जावी. सभ्यतेच्या बिघाडाच्या दुसऱ्या कारणाने जे बिघाड निर्माण करतात, त्यांच्या मौलिक कारणांना न जाणता खूप लोक घाबरून उठतात. ते कधी वैयक्तिक मिळकतीला, कधी पैशांना, कधी मशीनला, कधी मनुष्याच्या स्वभाविक समानतेला आणि कधी स्वंय सभ्यतेलाच दोष देऊ लागतात. परंतु वास्तवात रोगाचे हे निर्धारण आणि हा इलाजच चुकीचा आहे. मानव स्वभावाच्या फळ स्वरुप जो विकास होतो आणि यामुळे स्वभाविकरुपाने ज्या परिस्थिती निर्माण होतात. त्यांना थांबविण्याचा प्रत्येक प्रयत्न नादानी आहे. त्याचा परिणाम सुधारा ऐवजी सर्वनाशाची संभावना अधिक आहे. मनुष्याची वास्तविक आर्थिक समस्या हि नाही कि सभ्यतेच्या विकासाला कशाप्रकारे रोखले जावे आणि तिच्या स्वभाविक प्रतीकांना कशाप्रकारे बदलविले जावे. वास्तविक समस्या ही आहे की सभ्यतेच्या विकासाच्या स्वाभाविक गती कायम ठेवत सामाजिक अत्याचार व अन्यायाला कशाप्रकारे थांबवावे आणि निसर्गाचा हा उद्देश आहे की, प्रत्येक प्राण्याला त्याची जीविका पोहोचावी आणि त्या अडचणींना कशाप्रकारे दूर केले जावे. ज्यांच्यामुळे कित्येक लोकांची शक्ती आणि योग्यता संसाधनाचा अभाव असल्या कारणामुळे नष्ट होते.

अर्थव्यवस्थेच्या बिघाडाची कारणे

  आता आपणास पाहायला हवे की आर्थिक बिघाडाची मूळ कारणे कोणती आहेत आणि कोणत्या प्रकार चे आहेत. अर्थव्यवस्थेच्या बिघडण्याचा प्रारंभ आहे अमर्याद स्वार्थी वृत्ती मग दुसरा प्रकार वैयक्तिक र्‍हास आणि विकृत व्यवस्थेच्या सहयोगाने ही गोष्ट वाढते आणि पसरते. इथपर्यंत की संपूर्ण अर्थव्यवस्थेला बिघडवून जीवनाच्या उर्वरित भागांमध्ये ही आपले विष पसरवून टाकते. व्यक्तिगत मिळकत आणि काही लोकांचे काही लोकांपेक्षा उत्तम आर्थिक स्थितीत असणे या दोन्ही गोष्टी स्वाभाविक आहेत, आणि त्यांच्यात आपल्या जागी कोणती खराबी नाही. जर मनुष्याच्या सर्व नैतिक गुणांना संतुलित रुपात संधी मिळाली असता आणि बाह्य रूपानेहि असे सरकार अस्तित्वात असते ज्याने आपल्या शक्ती ते न्यायाची स्थापना केली असती तर त्यामुळे कोणतीही खराबी निर्माण झाली नसती.परंतु ज्या कारणांनी या बिघडाना जन्म दिला, ते म्हणजे स्वभावतः ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, ते स्वार्थपरता, संकीर्णता, अदूरदर्शिता, लोभ, कंजुषी, बेइमानी आणि आपल्या इच्छांच्या पुजेत मग्न राहिले.

    सैतानाने त्यांची समजूत घातली की तुमच्या वास्तविक आवश्यकतेपेक्षा अधिक जीवनाचे संसाधन जे तुम्हाला मिळतात आणि जे तुमच्या मिळकतीत आहेत, त्यांचे योग्य आणि उचित उपयोग फक्त दोनच आहेत. एक हे की यांना आपल्या सुख सुविधा, मनोरंजन आणि ऐशोआरामा मध्ये लावा आणि दुसरे हे की यांच्या आणखी अधिक संसाधनावर कब्जा करण्यासाठी उपयोग करा आणि झालेच तर त्यांच्याच मदतीने मानवांचे देव, भगवान बनवून बसा.

  पहिल्या शैतानी मार्गदर्शनाचा परिणाम हा झाला की भांडवलदारांनी समाजाच्या त्या लोकांचा अधिकार मानण्यास विरोध केला जे संपत्तीच्या वाटपात हिस्सा मिळण्यापासून वंचित राहतात किंवा आपल्या मूलभूत आवश्यकता पेक्षा कमी हिस्सा मिळवतात. त्यांनी याला वैध समजले की त्या लोकांना उपासमार आणि दयनीय अवस्थेत सोडून दिले जावे. ते आपल्या संकीर्ण दृष्टीच्या कारणामुळे हे पाहू शकले नाहीत. या वागणुकीने समाजाचे बरेचसे लोक अपराधाच्या मार्गावर चालू लागतात, अज्ञान आणि नैतिक पतनाची शिकार होतात. शारीरिक अशक्तपणा आणि रोगामध्ये ग्रस्त होतात. त्यांची शारीरिक शक्ती न विकसित होऊ शकते न मानव सभ्यतेच्या विकासात आपले योगदान देऊ शकतात. त्यामुळे समस्त समाजाला सामूहिक हानी पोहोचते.

ज्याचे भांडवलदार सुद्धा एक अंग आहेत. यावरच फक्त नाही तर या संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवा मध्ये लावले जाऊ शकले असते. भांडवलदारांनी आपल्या वास्तविक आवश्यकता पेक्षा पुढे जाऊन अगणित आवश्यकताची अभिवृद्धी केली. जेंव्हा की त्या मानवांच्या योग्यतांना, सभ्यतांना आणि संस्कृतींना चांगल्या चांगल्या सेवांमध्ये लावले जाऊ शकले असते. आपल्या स्वतःच्या वाढलेल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी मानवाने वापर करण्यास प्रारंभ केला. त्यांच्यासाठी व्याभीचार एक आवश्यकता बनली. त्यांच्यासाठी व्यभिचारिणी स्त्रिया आणि निर्लज्ज व्यक्तींचे एक सैन्य तयार झाले, त्यांच्यासाठी संगीताचीही आवश्यकता भासू लागली, यासाठी गायकांचा, नर्तक नर्तिकांचा, नृत्यांगनाचा, वादक आणि वाद्ययंत्र तयार करणार्‍यांचा एक गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी नाना प्रकारच्या मनोरंजनाची सुद्धा आवश्यकता होती. ज्यांच्यासाठी कथनकरांचा, चित्रकारांचा, विदूषककांचा, सोंगाड्याचा, अभिनेत्यांचा, अभिनेत्रींचा तसेच अनेक फाजील धंदेवाईकाचा आणखी एक खूप मोठा गट निर्माण केला गेला. त्यांच्यासाठी शिकार सुद्धा आवश्यक होती, ज्यांच्या साठी अनेक लोकांना चांगल्या कामावर लावण्याऐवजी त्यांना जंगलांमध्ये जनावरांना हाकण्यात लावून दिले. त्यांच्यासाठी आनंदरस आणि आत्मविस्मृतीही एक गरज होती. यासाठी अनेक माणसे, दारू, कोकेन, अफिम आणि दुसरे मादक पदार्थ निर्माण करण्यावर लावले गेले, सारांश हा की सैतानाच्या या बांधवांनी एवढ्यावरच दया केली नाही तर निर्दयतेने समाजाच्या एका मोठ्या भागाला नैतिक, शारीरिक आणि अध्यात्मिक भ्रष्टतेत ग्रस्त होण्यासाठी सोडून दिले.

(क्रमशः)

(भाग - १)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232


...या कारणांमुळे माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांनी स्व. राजीव गांधी यांचे नांव खेलरत्न पुरस्काराला दिले. ज्याचे खापर गांधी परीवारावर फोडले जाते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या क्रिडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' या पुरस्काराचे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असे केले. यावरुन समाज माध्यमांमध्ये दोन्ही बाजूंनी टिकाटिपण्णी झाली. खेलरत्न पुरस्काराला खेळाडूचे नाव असायला हवे याबद्दल एकमत दिसून आले. तर दुसरीकडे हाच न्याय क्रिकेट स्टेडीयमला जिवंतपणी स्वतःचे नाव देताना मोदींनी स्वतःला लागू केला नाही म्हणून टिका झाली. पण मुळात राजीव गांधींचे नांव खेलरत्न पुरस्काराला का दिले? याबाबतची माहिती काँग्रेस कडून आजच्या पिढीला देणे गरजेचे होते. मात्र सुस्त अजगराप्रमाणे पक्षाच्या पदांवर सरंजामदारीची अंडी उबवत बसलेल्या भेकड पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे याबाबत चकार शब्द काढला नाही. आणि लोकांच्या मागणीखातर पुरस्काराचे नाव बदलले या लबाडीखाली मोदी त्यांचा खोटा पैसा नेहमीप्रमाणे चालवून गेले.

मग राजीव गांधींचे नाव खेलरत्न पुरस्काराला देण्यामागे काय कारण होते?

तर, स्व. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर राजीव गांधी भारतीय राजकारणाच्या पटलावर सक्रीय झाले. त्यावेळेस स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्याचवेळी भारतात एशियाड गेम्सच्या स्पर्धा तब्बल ३० वर्षांनंतर भरवल्या जाणार होत्या. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतावरचा दारिद्री देशाचा शिक्का पुसायची संधी आयती चालून होती. इंदिरा गांधींनी या संधीचे सोने करण्याची जबाबदारी राजीव गांधी यांचेवर सोपवली.

राजीव गांधीनी दिल्लीत स्टेडीयम उभारुन एशियाड गेम्सच्या स्पर्धा पार पाडल्या. देशात कलर टि.व्ही. आणून स्पर्धेचे प्रक्षेपण देशभरात केले. जगभरातून भारतातील एशियाड गेम्सचे कौतुक झाले. हे सगळं करत असताना राजीव गांधींनी भारताकडे ठोस क्रिडा धोरण नसल्याचे लक्षात घेतले आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पश्चात अचानक जबाबदारी शिरावर येऊन पंतप्रधान झाल्यावर भारताचे ठोस क्रिडा धोरण ठरवताना १९८६ साली स्पेशल एरीया गेम्स प्रोग्रॅम भरवण्यात आले. टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आदिवासी भागातील चपळ युवांना शोधून यामध्ये सहभागी करण्यात आले. या युवांना दिल्लीत सरकारी खर्चाने अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या. यातूनच लिंबा राव हा आदिवासी मुलगा देशाचा धनुर्धर बनला. 

नैऋत्यपूर्व भारतातून या कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिभावान खेळाडू उभारी घेत असताना राजीव गांधी पराभूत झाले. राजीवजींच्या पश्चात पंतप्रधान झालेल्या व्ही.पी. सिंगांनी राजीवजींच्या क्रिडा धोरणाला वायफळ खर्च म्हणत बासनात गुंडाळले. पुढे दुर्दैवाने १९९१ मध्ये राजीवजी शहीद झाले, आणि त्यांनी आखलेल्या क्रिडा धोरणाचा सन्मान म्हणून पंतप्रधान नरसिंह राव यांनी खेलरत्न पुरस्काराला राजीवजींचे नाव दिले. ज्याला सज्जन काँग्रेसी नेते विरोध करु शकले नाहीत. 

खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधींचे नाव देण्याचे श्रेय नरसिंहरावांना जाते. तर देशाच्या क्रिडा धोरणांवरुन नेहरु आणि काँग्रेसच्या नावाने बोंबा मारणारे शेठ, तसेच राज्यपाल कोश्यारी व इतर भाजपेयी हे व्ही.पी.सिंगांचे आधुनिक वंशज मानायला हवेत कारण जे व्ही.पीं. सिंगानी देशाच्या क्रिडा धोरणांबाबत केलं त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन शेठ पुरस्कृत भाजपनी क्रिडा क्षेत्राचे बजेट कपात करुन केलंय!

- अफसर खान

संपादक, महाराष्ट्र मीडिया नेटवर्क


अज्ञातनायक

आठ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर झालेल्या त्या ऐतिहासिक सभेनंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मान्यवर नेत्यांच्या अटका सुरू झाल्या. महात्मा गांधी, नेहरू, मौलाना आज़ाद, असफ अली, सरदार पटेल, पट्टाभी इत्यादी नेत्यांना अटक करून स्पेशल ट्रेनने पुणे व पुढे अहमदनगरला रवाना करण्यात आलं. 

त्यादिवशी झालेली जाहीर सभा अनेक कारणामुळे ऐतिहासिक ठरली होती. युसूफ मेहरअली यांनी सुचवलेली #QuitIndia ही घोषणा क्रांतिकारी ठरली. या घोषणेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मेहेरअली यांनी एक पुस्तिका काढली होती, जी सभेच्या ठिकाणी वितरीत करण्यात आली. नंतर ही पुस्तिका जप्त झाली हा भाग अलाहिदा. 

गवालिया टँक मैदानातून अनेक घोषणा त्या दिवशी दिल्या गेल्या. त्याची परिणामकारकता इतकी होती की देशभरातून अनेकजण 'चले जाव' चळवळीला येऊन सामील झाले. मुंबईत क्रांतीचं लोणचं पसरलं. वृद्ध, तरुण आणि बालबच्चेच नव्हे तर महिलादेखील या चळवळीत सरसावल्या.

बैरिस्टर असफ अली यांच्या बेगम अरुणा वेळीच भूमिगत झाल्याने ब्रिटिश सरकारच्या हाती आल्या नाहीत. त्यांनी बाहेर राहून महिलांचं संघटन बांधलं. या संघटनेत अनेक मान्यवर स्त्रिया होत्या. ज्यात प्रामुख्याने नाव घेता येईल अशा दोन बहिणी; एक आमिना तय्यबजी तर दुसरी सकीना लुकमानी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या दोन्ही काँग्रेसचे संस्थापक सदस्य बदरुद्दीन #तय्यबजी यांच्या कन्या होत.

अरुणा असफ अली भूमिगत राहून देशभर सक्रिय होत्या. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांना ठिक-ठिकाणाहून अनेक स्त्रियांनी लागेल ती मदत पुरवली. सकीना #लुकमानी त्यापैकी एक. 

चले जाव घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी आमिना तय्यबजी यांना अटक करण्यात आली. अनेक महिलांसोबत पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. 

अटक केलेल्या स्त्रियांची संख्या इतकी होती की त्यांना ठेवण्यासाठी बराकी पुरत नव्हत्या. अशावेळी कापडी शेल्टर उभारून त्यात महिलांना ठेवण्यात आलं होतं. अटक केलेल्या स्त्रियांमध्ये काही क्रांतिकारक होत्या तर काही अतिसामान्य महिला. सार्वजनिक कार्यासाठी त्यांनी घराच्या उंबरठा ओलांडला होता, अशा महिलांना संघटित करण्याचे काम तय्यबजी कुटुंबातील महिलांनी केलं होतं. त्यापैकी सकीना व आमिना. 

आमिना एक व्यवहार कुशल महिला होती. बडोदा संस्थानचे न्यायाधीश श्रीयुत अब्बास तय्यबजी यांच्या त्या बेगम. घरंदाज असलेली ही महिला क्रांतिकारी व चळवळी होती. #स्वदेशी चळवळीमध्ये त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे.  परकीय वस्तूंचा बहिष्कार करणे व चरखा चालवण्यासाठी अनेक महिलांना त्यांनी प्रवृत्त केलं होतं. #येरवडा तुरुंगात देखील त्यांनी हे काम सुरू ठेवलं. अटक केलेल्या स्त्रियांसाठी चरखा चालवणे, कढाई व हस्तकला शिकवण्याचे काम त्यांनी केलं. शिवाय सर्वांना मानसिक आधार देखील दिला.

चले जाव चळवळीत स्त्री क्रांतिकारकांचे कार्य बेदखल राहिलेले आहे. अनेक स्त्रिया अशा होत्या ज्यांच्यामुळे मान्यवर नेते तुरुंगात असतानादेखील दीर्घकाळ १९४२चा लढा चालू राहू शकला. अरुणा असफ अली यांनी लिहिलेल्या आपल्या स्मृतीमध्ये या चळवळीत कार्य करणाऱ्या काही निवडक महिलांचा उल्लेख आलेला आहे. 

-कलीम अजीम, पुणे

(लेखकाच्या फेसबुक वॉल वरून)



मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करणारे १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक नुकतेच लोकसभेत पारित झाले. केंद्राने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारित होता. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानेही याच मुद्द्यावर भर दिला. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यात अडचण निर्माण झाली. संविधानाच्या कलम ३४२ अ आणि ३६६ (२६) क मधील सुधारणांना संसदेत मान्यता मिळाल्यामुळे राज्यांना ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार मिळतील. अशा प्रकारे राज्य सरकारे स्वेच्छेने कोणत्याही जातीला ओबीसी आरक्षण यादीत ठेवू शकतात. मंडल आयोगाची शिफारस लागू झाल्यानंतर ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्या गेल्या तीन दशकांपासून आवाज उठवत आहेत. यात गुजरातमधील पाटीदार, राजस्थानमधील गुज्जर, हरियाणातील जाट आणि महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील मराठा समुदायासारख्या प्रभावशाली समुदायांच्या चळवळीचा समावेश आहे. यावर्षी मे मध्ये ओबीसी आरक्षण प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी यादी तयार करण्याच्या राज्यांच्या अधिकारांना स्थगिती दिली होती. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी संविधानातील १०२ व्या दुरुस्तीद्वारे २०१८ मध्ये कलम ३४२ ए आणण्यात आले होते. राज्यघटनेत तीन प्रकारचे आरक्षण आहे. केंद्रीय स्तरावर अनुसूचित जातींना १५ टक्के, अनुसूचित जमातींना ७.५ टक्के आणि इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या कक्षेत फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध येतात. मागास मुस्लिम आणि मागास ख्रिश्चन या कक्षेच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनेक राज्यांमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण अनेक भागांमध्ये विभागले गेले आहे. केरळ (१० ते १२ टक्के), कर्नाटक व आंध्र प्रदेश (ओबीसी आरक्षणाचे चार भाग करण्यात आले आहेत. यामध्ये तीन भागांत मुस्लिम जातींचा समावेश आहे. एक भाग ख्रिश्चन पंथाचा अवलंब करणाऱ्या दलितांसाठी आहे) आणि पश्चिम बंगालमध्ये २७ टक्क्यांपैकी काही मुस्लिम जातींची स्वतंत्र श्रेणी तयार करून त्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. परंतु या राज्यांमध्ये तो धर्माच्या आधारावर नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीच्या आधारे आहे. धर्माच्या आधारे कोटा वेगळा केल्याने मागासलेल्या मुस्लिमांना फारसा फायदा होणार नाही. १९९३ मधील मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार देशातील इतर ५४ टक्के मागासवर्गीयांपैकी ८.३३ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. ५४ टक्के इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. मागासवर्गीय मुस्लिमांना कोटा निश्चित न करताही ओबीसींमध्ये सुमारे ३ टक्के हिस्सा मिळत आहे. कोटा निश्चित झाल्यानंतर त्यांना केवळ एक टक्काच फायदा होईल. सर्व मुस्लिमांचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश झाला तर मागासवर्गीय मुस्लिमांना आता जेवढा वाटा मिळत आहे तेवढाही मिळणार नाही. रंगनाथ मिश्रा आयोगाने अनुसूचित जातींमध्ये मागास मुस्लिमांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे, ज्याच्या समकक्ष हिंदू जाती अनुसूचित जातींमध्ये आहेत. सुरुवातीला केवळ हिंदू दलित अनुसूचित जातीत येत असत. १९५५ मध्ये शीखांचाही त्यात समावेश करण्यात आला आणि १९९० मध्ये बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी नवबौद्ध हा शब्द जोडला गेला. त्या काळातच या विषयावर मुस्लिमांमध्ये जागरूकता निर्माण झाली होती. ज्यांचे पूर्वज एकेकाळी दलित होते, असे अनेक मुस्लिम अनुसूचित जातींमध्ये स्वत:ला सामावून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यावर केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करावे लागेल, पण ते उत्तर दाखल करणे टाळत आहे. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा यांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की मुस्लिम आणि ख्रिश्चनांना धर्माच्या आधारे आरक्षणापासून वंचित ठेवणे हे संविधानातील नागरिकांना दिलेल्या समानतेच्या अधिकाराच्या विरोधात आहे. ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या दलितांनाही घटनेत सुधारणा न करता अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींवरही अनुसूचित जाती आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. आयोगाच्या शिफारशी अंमलात आल्या तर मुस्लिमांच्या विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. अनुसूचित जातींना पुरविल्या जाणाऱ्या सर्व सुविधा गरीब घटकांतील मुस्लिमांनाही उपलब्ध होतील आणि अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या देशभरातील लोकसभा आणि विधानसभांच्या जागा लढविण्याचा मार्गही मोकळा होईल. १२७ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल. मात्र, जोपर्यंत आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केली जात नाही तोपर्यंत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कायद्याअंतर्गत मुस्लिम आणि मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करणारे दुरुस्ती विधेयक मांडण्याची मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो.:८९७६५३३४०४)



कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 


ये पहला सबक था किताबे हुदा का

के मखलूक सारी है कुन्बा खुदा का

एक काळ होता जेव्हा मुस्लिम हे जागतिक महासत्तेच्या ठिकाणी होते. औद्योगिक क्रांतीनंतर त्यांचे हे स्थान ब्रिटिशांनी हरवून घेतले. कालांतराने अमेरिकन्स त्यांच्या जागी आले आणि सुपर पॉवर झाले. आज त्यांच्या स्थानाला चीन धक्के देत आहे. या घटनाचक्राच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम उम्माहच्या पतनाची कारण मिमांसा करून त्यावर काही उपाय सुचविता येतील का हा या आठवड्याचा चर्चेचा विषय आहे. 

इस्लामला पृथ्वीवर का आणले गेले

मिटाया कैसरो किसरा के इस्तब्दाद को जिसने 

वो क्या था जोरे हैदर, फकरे बुज़र, सिद्दीके सलमानी

या पृथ्वीवर अवतरित झालेले पहिले जोडपे म्हणजे अ‍ॅडम आणि ईव्ह यांच्यापासून आजतागायत सात अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्येचा विस्तार झालेला आहे. हजारो वर्षांच्या कालखंडात मानवाने अनेक चढउतार पाहिले, अनेक चांगली कामं केली, अनेक वाईट कामं केली, पुण्य केले, पाप केले, जेव्हा-जेव्हा पाप जास्त झाले, माणूस पथभ्रष्ट झाला, नेकीपासून लांब गेला, त्या-त्या वेळी ईश्वराने त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी पैगंबर पाठविले. ज्यांची संख्या 1 लाख 24 हजार मानली जाते. शेवटी मानवाने एवढी प्रगती केली की पुढे प्रेषित पाठविण्याची गरज उरली नाही. म्हणून ईश्वराने शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यानंतर प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केला. परंतु हा सिलसिला बंद करण्यापूर्वी त्यांच्यापासून ते प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जीवन जगण्याची एक आचारसंहिता ईश्वराने ठरवून दिली. प्रेषित सल्ल. यांनी ती अरबस्थानामध्ये प्रत्यक्षात लागू केली आणि शेवटच्या हजच्या समापनाच्या दिवशी अराफातच्या मैदानातील टेकडीवर उभे राहून शेवटचे संबोधन करताना सांगितले की, ’’इस्लामचा हा जो संदेश मी तुम्हाला दिलेला आहे आज पूर्ण झाला. आज जे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे हे कर्तव्य आहे की, जे या ठिकाणी हजर नाहीत त्यांच्यापर्यंत हा संदेश जसाचा तसा पोहोचवावा.’’ येणेप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेल्या एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाने प्रेषितांचा तो आदेश शिरसावंद्य मानला व जगात विखुरले गेले. भारतातही केरळच्या समुद्रकिनारी मलबार येथे सन 51 हिजरी मध्ये सहाबा रजि. यांचा एक काफिला हजरत तमीम अन्सारी रजि. यांच्या नेतृत्वाखाली आला व त्यांनी इस्लामचा संदेश केरळमधील लोकांपर्यंत पोहोचविला. राजा चिरामन पेरूमल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तो स्विकारला. आजही त्यांच्या काळात मालिक बिन दिनार यांनी बांधलेली चिरामन जामा मस्जिद आबाद आहे.

थोडक्यात इस्लामला पृथ्वीवर आणण्याचे एकमेव कारण होते मानवकल्याण. म्हणून मुस्लिमांचे ही जगण्याचे एकमेव कारण मानवकल्याणच आहे. नैतिकतेचा आदेश देणे आणि अनैतिक कामांपासून रोखणे हेच इस्लामचे म्हणजेच पर्यायाने मुसलमानांचे प्राथमिक कर्तव्य आहे, यालाच कुरआनच्या भाषेत अम्रबिल मारूफ व नही अनिल मुनकर असे म्हणतात. (संदर्भ : सुरे आलेइम्रानः110)   

आजच्या मुस्लिमांची अवस्था

परंतु इस्लाम स्थापनेच्या 1442 वर्षानंतर मुस्लिमांची अवस्था काय आहे? याचा आपण जेव्हा मागोवा घेतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, इस्लाम आहे तसाच आहे मात्र मुसलमानांतील बहुसंख्य लोक हे इस्लामच्या शिकवणीपासून लांब गेलेले आहेत. दूरची गोष्ट सोडा भारतीय मुस्लिम समाजाची काय अवस्था आहे हे पहा. मुस्लिम सदृश्य नाव असलेल्या मात्र इस्लामची सर्व गुणवैशिष्ट्य हरवलेला हा समाज म्हणजे फक्त 20 कोटी लोकांची गर्दी बणून राहिला आहे. काही हजार, फारतर काही लाख लोक इस्लामी चारित्र्याचे आहेत असे म्हणता येईल. बाकी 20 कोटी लोक इस्लामचा इबादतींपुरता भाग घेऊन त्यातच संतुष्ट राहून बाकी इस्लामचा त्यांनी व्यवहारातून त्याग केलेला आहे. मानवतेचे कल्याण तर सोडा आज मुस्लिमांना स्वतःचेच कल्याण करता येत नाही. आपसात प्रचंड तंटे आहेत, बहुसंख्य मुस्लिम संधी मिळेल तिथे भ्रष्ट आचरण करतात, अन्याय व अत्याचार करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, गटातटात विखुरलेले आहेत, त्यांना भारतात सत्तेत स्थान नाही, त्यांच्या हातात सत्ता असती तर त्यांनी भारताची अवस्था ही पाकिस्तानसारखी करून टाकली असती यात शंका नाही. त्यांचे आपसातील हितसंबंधही चांगले नाहीत. मसलकी (स्कूल ऑफ थॉट) कलह एवढा मोठ्या प्रमाणात आहे की, अफगानिस्तानसारखी खुली आर्म पॉलिसी असती तर यांनी  अफगानिस्तान आणि पाकिस्तानसारखा आपसात हिंसाचार केला असता, यातही शंका नाही. त्यांची सामाजिक अवस्थाही फारशी चांगली नाही. जवळ-जवळ प्रत्येक लग्नात इस्लामी निकाह संहितेच्या विरूद्ध जावून वरपक्ष, वधूपक्षाकडून जमेल तेवढी लूट करतो. व्यसनाधिनता कमी जरी असली तरी ती आहे. प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये मुस्लिमांचा सहभाग दखलपात्र असा आहे. याच स्थितीला पाहून इ्नबालनी म्हटले होते की, 

रह गई रस्मे अजां रूहे बिलाली न रही

फलसफा रह गया तलकीने गजाली न रही

इस्लाम धर्मच नव्हे एक जीवन व्यवस्था

मुस्लिम असे म्हणताना थकत नाहीत की इस्लाम फक्त धर्मच नाही तर एक जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था आहे पण त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर उत्कृष्टता तर सोडा ती सरासरी दर्जाची सुद्धा नसल्याचे दिसून येते. मग बिगर मुस्लिमांनी का बरे त्यांच्या या तथाकथित (अल्लाह क्षमा करो) सर्वोत्कृष्ट जीवन पद्धतीच्या दाव्यावर विश्वास ठेवावा? दूसरी महत्त्वाची बाब अशी की, सामाजिक शिष्टाचार हा इस्लामी जीवन पद्धतीचा पाया आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या जीवनातून तोच गायब आहे. मग बिगर मुस्लिमांनी त्यांच्या उत्कृष्टतेच्या दाव्यावर का विश्वास ठेवावा? पहा ! इस्लामी जीवन शैलीचा त्याग केल्याने आपण आपली तर हानी करूनच घेत आहोत उलट आपल्या वागण्याने आपणच आपल्याच दाव्याला सुरूंग लावत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही. यापेक्षा दुर्दैव ते कोणते? 

केवळ इस्लाम महान आहे व इस्लामी जीवनशैली परिपूर्ण आहे म्हणून भागणार नाही. इस्लामचा उदोउदो केल्याने काहीच बदलणार नाही. उलट आपण खोटारडे आहोत हे सिद्ध होईल. नुकतीच ईदुल अजहा झाली किती लोकांना या ईदचा मूळ गाभा माहित आहे? ईदुल अजहाला बकरी ईद म्हणणारे हे अज्ञानी लोक या ईदवर पशुबळी दिला जातो, असा आरोप करणाऱ्यांना नीट उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांना हे म्हणता आले नाही की पशुबळी आणि कुर्बानी याच्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करता आलेला नाही? म्हणून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सदस्याला इस्लाम आणि इस्लामी जीवनशैलीकडे केवळ भावनाशील होवून पाहून जमणार नाही तर त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रयत्न करावे लागतील. 

कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 

मुस्लिम आपले जन्मजात कर्तव्य विसरले आणि त्याची त्यांना ईश्वरीय शिक्षा मिळत आहे. सत्तेत असो की नसोत, बहुसंख्य असो की अल्पसंख्यांक असोत ते सर्व क्षेत्रात अयशस्वी होत आहेत नव्हे पराजित होत आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक एकत्रितरित्या हा निर्णय करणार नाहीत की, व्यवहार्यरित्या आपल्यामधील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या प्रवृत्तींची (जाणीवपूर्वक) जोपासना करू व इस्लामचा संदेश इतरांपर्यत पोहोचवू तोपर्यंत समाजसुधारणेचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल.

त्यांच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली व त्यांनी इस्लामच्या मानवतेचा संदेश व्यापक प्रमाणात आपल्या वर्तणुकीतून देशबांधवांना दिला तरच बहुसंख्य हिंदू बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवतील नसता फाळणीला जबाबदार नसूनही आजच्या मुस्लिम पीढिला ज्या तिरस्काराचा सामना करावा लागत आहे तो पुढेही करावा लागेल, यात शंका नाही.

ही झाली भारतीय मुस्लिमांची अवस्था. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांची अवस्था काय आहे हे पाहू. जगात एकूण 56 मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हणावे असे एकही राष्ट्र नाही. आज त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वैयक्तिक वर्तणूक ही बिगर इस्लामीच आहे. जोपर्यंत ती इस्लामी होणार नाही तोपर्यंत ते यशस्वी होणार नाहीत व दुसऱ्यांना संदेश देण्याचा तर प्रश्नच उत्पन्न होणार नाही. 

बिगर इस्लामी वर्तणुकीमागची कारणे

हो मुबारक तुम्हे बातील की परस्तीश लेकीन

हक का खुर्शीद जरा देर सही चमकेगा

इस्लामी वर्तणुकीपासून लांब जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुस्लिमांवर झालेला पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होय. कारण या जीवनशैलीमध्ये माणसाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही इच्छापूर्तींची कशाही मार्गाने पूर्ती करण्याची मूभा आहे. माणूस प्रवृत्तीनेच आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीकडे प्राधान्याने पाहत असतो. इस्लामी जीवनशैलीमध्ये हलाल, हरामची कैद असल्यामुळे व पाश्चात्य जीवनशैलीमध्ये ती नसल्यामुळे ज्यांची श्रद्धा कमकुवत आहे असे लोक इस्लामी जीवनशैलीपासून दूर गेलेले आहेत. 

दुसरे कारण मुस्लिाम समाजातील एका मोठ्या गटाने इस्लामी आदेशांची प्रत्यक्षात जवळ-जवळ अवहेलना केलेली आहे. मुस्लिमांमध्येही पुरोहितवाद वाढलेला आहे. केवळ 4 टक्के मुस्लिम मदरशात जातात म्हणून त्यांच्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हेच 4 टक्के तरूण धर्माचा अभ्यास करतात आणि समाजाचे धार्मिक नेतृत्व करतात. प्रत्येक मस्जिदीवर त्यांचे वर्चस्व असते आणि सामान्य लोक त्यांचेच ऐकतात. भारतीय मदरशातून शिकवला जाणारा इस्लाम हा परिपूर्ण नाही हे खेदाने म्हणावे लागते. या 4 टक्क्यांमधील अर्धेअधिक मुलं केवळ कुरआन मुखोद्गत करून बाहेर पडतात व जे आलीम, मुफ्ती होतात त्यांचा अभ्यासही कालबाह्य झालेल्या पारंपारिक पद्धतीने करवून घेतला जातो म्हणून त्यांच्यात आधुनिक सामाजिक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होत नाही. मदरश्यातून बाहेर पडल्यानंतर हे विद्यार्थी दैनंदिन आणि जनाजाची नमाज पढविणे तसेच लग्न लावण्यापुरते मर्यादित होऊन राहिले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम समाजात प्रचंड बिगर इस्लामी रूढी-परंपरा रूजलेल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध हे मदरश्यातून निर्माण झालेले नेतृत्व चळवळ उभी करू शकत नाहीत. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याचे फक्त वाचन करून व करवून घेऊन हे धार्मिक नेतृत्व संतुष्ट आहे. नमाजमध्ये इमाम काय पठण करत आहे? काय दुआ मागत आहे? हे नमाजींना माहितच नाही आणि ते समजून सांगण्याची इमामांना गरजही वाटत नाही. कुरआन कळत नाही म्हणून जीवन वळत नाही. कलमा आणि इबादती गळ्याखाली उतरत नाहीत. हृदयापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून त्या आचरणात येत नाहीत. मुस्लिम जनता ही न कळणाऱ्या भाषेत इबादतीकरून संतुष्ट झाल्यामुळे, त्या इबादतींचा खोलवर परिणाम न झाल्यामुळे, भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहते आणि इस्लामी जीवनशैलीपासून लांब जाते. त्यामुळे त्यांना इस्लामी आचरण करण्याचे व तिचा संदेश इतरांना देण्याचे कर्तव्य पार पाडता येत नाही. 

मुस्लिम ही इतरांप्रमाणे सतत भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मानवतेची मोठी हानी होत आहे. यातून एक अशी विचित्र कोंडी निर्माण झालेली आहे की, मुस्लिम मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींना उत्तेजन जरी देत नसले तरी ईश्वराला अपेक्षित असा विरोधही करतांना दिसत नाहीत. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय  मुस्लिम समुदाय हा ईश्वरीय सैन्य आहे जे की, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट गोष्टी आजूबाजूला घडत असतांना हे सैन्य जर मूक दर्शक बणून त्याकडे कानाडोळा करत असेल तर या लष्कराला निलंबित करणे हाच एक मार्ग उरतो. म्हणून मुस्लिम उम्मा ही ईश्वराकडून निलंबित केलेली गेलेली उम्मा आहे. निलंबित अधिकारी जसे तिरस्कारास पात्र असतात तसेच मुस्लिमही तिरस्काराला पात्र झालेले आहेत. म्हणून सर्वत्र त्यांचा तिरस्कार केला जातोय. या तिरस्कारातून सुटका करून घ्यावयाची झाल्यास काय करावे लागेल? याची चर्चा खालीलप्रमाणे -

उपाय

1. इस्लामच्या दृष्टीने मृतप्राय झालेल्या या उम्माहमध्ये पुन्हा जीव फुंकावयाचा झाल्यास सर्वप्रथम त्यांना कुरआन समजून वाचण्याचे आंदोलन सुरू करावे लागेल. हे सहजशक्य आहे. फक्त त्याची जाणीव समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. नियोजनपूर्वक जनजागृती केल्यास कुरआन समजून वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि एकदाका बहुतेक मुस्लिमांनी कुरआन समजून घेतला तर ईश्वराला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपोआपच त्यांना कळेल. मग आपोआपच त्यांच्या मनात वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार व चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होईल. कारण वाईट गोष्टी करणाऱ्यांनासुद्धा शेवटी चांगल्याच गोष्टी आवडतात. कुठल्याही चोराला वाटत नाही की आपली मुले चोर व्हावीत. तद्वतच कुरआन समजून वाचल्यावर वाईट मुस्लिम माणसाला सुद्धा वाटणार नाही की, आपली मुलं वाईट व्हावीत. त्याच्या मनातसुद्धा पश्चातापाची भावना निर्माण होईल व त्याचे परिमार्जन करण्यासाठी तो पेटून उठेल व मुल्ला-मौलवींपेक्षा जास्त तीव्रतेने इस्लामी जीवनशैली प्रमाणे वागू लागेल. कुरआन समजून घेण्याची व्यक्तीगत पातळीवर सुरू झालेली ही मोहीम  बघता-बघता सामाजिक होईल. कारण निलंबित जरी असला तरी शेवटी तो ईश्वरीय फोर्समधील शिपाई आहे. एकदा का त्यानं चांगलं वागण्याचा निश्चय केला व कुरआनला कवटाळले की त्याचा मार्ग आपोआप सुखर होईल. ईश्वरीय मदत वेगाने त्याच्याकडे आकर्षित होईल व अम्र बिल मआरूफ व नही अनिल मुनकर या मिशनचा मार्ग सुकर होईल आणि मुस्लिम उम्माह गतवैभवाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही. 

सदाचाराने वागा असा सल्ला, मॉबलिंचिंग करू नका असा सल्ला देण्याइतपतसोपा आहे पण त्याची अमलबजावणी करण्याच्या मार्गात इतक्या अडचणी आहेत. इतक्या की ईश्वरी मदतीशिवाय सदाचारी समाजाची स्थापना होणे शक्य नाही. उदाहरणार्थ 10 बाय 10 च्या खोलीमध्ये अंगार फुलवून त्यात मधोमध एका परातीमध्ये बर्फ ठेवण्यासारखे आहे. बर्फ हा सदाचार असून अंगार हा दुराचार आहे. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. ईश्वरीय मदतीशिवाय बर्फ हा मोठ्या प्रमाणात खोलीत पसरलेल्या विस्तवाला थंड करू शकणार नाही. तसेच प्रचंड संख्येत पसरलेल्या दुराचाऱ्यांच्यामध्ये परातभर मुस्लिमांनी एकदा का सदाचाराचा निश्चय केला तर ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर मुठभर मुसलमानांची मोठ्या लष्कराच्या तुलनेत कशी मदत करतो याचे दाखले जंगे बदर पासून ते अफगानिस्तानच्या ताज्या परिस्थितीपर्यंत विखुरलेले आहेत. प्रश्न फक्त विश्वासाचा आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’मुस्लिम समाजाला कुरआन समजून इस्लामी जीवनशैली प्रमाणे जीवन जगण्याचा व इस्लामचा संदेश इतर लोकांना देण्याची समज व शक्ती देओ’’ (आमीन) 

- एम.आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget