ह. अबू मूसा अशअरी म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “एखाद्या वयस्कर मुस्लिमाचा तसेच कुरआनच्या अशा विद्वानाचा सन्मान करणे ज्याने पवित्र कुरआनात फेरबदल केलेला नसेल, यांचा सन्मान करणे म्हणजे अल्लाहचा सन्मान करण्यासारखे आहे. त्याचबरोबर न्याय्य सत्ताधीशाचा आदर करणेदेखील अल्लाहचा सन्मान करण्यासारखे आहे.” (अबू दाऊद, अल बैहकी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “अल्लाह शपथ! ती व्यक्ती मुस्लिम नाही, अल्लाह शपथ, ती व्यक्ती मुस्लिम नाही, अल्लाह शपथ ती व्यक्ती मुस्लिम नाही, ज्याच्या कारस्थानांपासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.” (अबू शुरैह (र.), बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की, “अल्लाह अशा माणसावर दया करत नाही जो लोकांशी दयेचा व्यवहार करत नाही.” (ह. जरीर बिन अब्दुल्लाह (र.), बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, “ज्या माणसाच्या मनात तिळमात्र जरी अहंकार असेल तो स्वर्गात जाणार नाही.” एका व्यक्तीने विचारले, हे अल्लाहचे प्रेषित, जर कुणी चांगली वस्त्रं परिधान करत असेल तर? (हाही अहंकारच का?) प्रेषित (स.) म्हणाले, “अल्लाह सुंदर आहे आणि सौंदर्य पसंत करतो. अहंकार तर हा आहे की माणसाने अल्लाहला नाकारावे आणि लोकांना तुच्छ व हीन समजावे.” (ह. इब्ने मसऊद, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की, “माणूस आपल्या मित्राच्या स्वभावधर्माशी निगडित असतो. म्हणून त्याने याचे भान ठेवूनच कुणाशी मैत्री करावी (की तो कोणत्या स्वभावाचा आहे)” (ह. अबू हुरैरा, मोअत्ता, इमाम मालिक)
ह. अबू दरदा म्हणतात की प्रेषितांना असे म्हणताना ऐकले आहे की, “मला दुर्बल लोकांमध्ये शोधा, कारण दुर्बल लोकांमुळेच तुमची मदत केली जाते आणि तुम्हाला उपजीविका दिली जाते.” (अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “ज्या श्रद्धावंताने एखाद्या उपाशी श्रद्धावंताला जेवू घातले त्याला अल्लाह कयामतच्या वेळी स्वर्गाचा आहार खायला देईल. आणि ज्या श्रद्धावंताने तहानलेल्या मुस्लिमाला पाणी प्यायला दिले त्याला अल्लाह स्वर्गातले पेय प्यायला देईल. आणि ज्या मुस्लिमाने एखाद्या विवस्त्र मुस्लिमाला वस्त्रे घालायला दिली त्याला अल्लाह स्वर्गाची वस्त्रे देईल.” (अबू सईद खुदरी (र.), तिर्मिजी)
ह. अब्दुल्लाह बिन अमरो बिन आस (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की, “जर कुणी नाहक एखादा पक्षी किंवा पशूची हत्या केली तर अल्लाह त्या सजीवाची हत्या करण्यासाठडी त्याला जाब विचारील.” लोकांनी विचारले की अशा पशू-पक्ष्यांचे काय अधिकार आहेत? प्रेषित (स.) म्हणाले, “त्याला जुबह करा. रीतसर त्याला कापून त्याचे सेवन करा, त्याचे मुंडके छाटून रस्त्यावर फेकून देऊ नये.” (अहमद, निसई, दारमी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment