न्यायाच्या तेजस्वी घटना
हजरत अली बिन अबी तालिब रजि. वर्णन करतात की, हजरत दानियाल अ. यांचे आई-वडील हयात नव्हते. ते अनाथ होते. एका महिलेने त्यांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले. त्यावेळी बनी इस्रायलमध्ये एक राजा होता, ज्याचे दोन न्यायाधीश होते. ती बाई खूप सुंदर आणि देखणी होती. ती नियमीत राजाच्या सेवेत यायची आणि त्याला सल्ले द्यायची.
राजाच्या दरबारात दोन काझी (न्यायाधीश) होते. दोन्ही न्यायाधीश वेळोवेळी राजाच्या सेवेत या महिलेचे येणे-जाणे पाहत असत. दोघांच्याही मनात त्या महीलेविषयी प्रेम जागृत झाले. एकदा त्यांनी आपली आंतरिक इच्छा या स्त्रीसमोर व्यक्त केली. आम्हा दोघांचेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला खात्री आहे की, तू आमच्या प्रेमाचा स्वीकार करशील. या कुलीन महिलेने साफ नकार दिला. त्यांना खडे बोल सुनावले. दोन्ही न्यायाधिशांनी तिला खोट्या प्रेमात फसवण्याचा, वेगवेगळ्या मार्गाने तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती स्त्री कोणत्याही प्रकारे त्यांच्या हाती आली नाही.
ही सुंदर स्त्री कोणत्याही किंमतीत आपल्या हाती येऊ शकत नाही हे पाहून त्या दोघा न्यायाधीशांनी संतापून राजाकडे तक्रार केली की, जी स्त्री तुझ्याकडे येऊन तुला सल्ले देते, तिने व्यभिचार सारखे मोठे पाप केले आहे! जेव्हा राजाने आपल्या न्यायाधीशांची साक्ष ऐकली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला, तो मोठ्या विचारात पडला, कारण त्याला या बाईच्या खानदानीपणाची आणि शालीनतेची पूर्ण खात्री होती. पण न्यायाधीशांची साक्ष नाकारताही येत नव्हती.
राजाला दोन न्यायाधीशांची साक्ष मिळाल्यानंतर अधिक तपासाची गरज पण भासली नाही. राजाने, दोघांची साक्ष मान्य केली. त्या स्त्रीला तीन दिवसांचा अवधी दिला आणि त्यानंतर तिला दगडमार करून ठार करण्याचा आदेश दिला. शहरात घोषणा झाली की, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला अमुक दिवशी दगडमार करून मारण्यात येईल. लोकांनी ते पाहायला यावे. राजाने या महिलेला दगडमार करण्याचा आदेश दिला होता, परंतु तो आतून खूप काळजीत होता. ती स्त्री व्याभिचारिया आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने त्याच्या एका विश्वासू मंत्र्याला विचारले,”दगडमार होण्यापासून त्या स्त्रीला वाचवता येईल का?” मंत्री म्हणाला,”शहरात तिच्यावर दगडफेक करून ठार मारण्याची घोषणा झाली आहे. दोन न्यायाधीशांच्या साक्षीच्या आधारे दगडफेक करण्याचा निर्णय देण्यात आला आहे, अशा परिस्थितीत या दगडमार करण्याचा निर्णय मागे घेता येणार नाही.”
तिसरा दिवस, महिलेला दगडमार करण्याचा दिवस होता. मंत्री घरातून बाहेर आला तेव्हा त्याला काही मुले खेळताना दिसली. त्यात हजरत दानियाल अ. हे ही होते. (तो अनाथ मुलगा ज्याला त्या स्त्रीने दत्तक घेतले होते.) तो मंत्री उभे राहून मुलांना खेळताना पाहत होता. हजरत दानियाल अ. यांनी मुलांना एकत्र केले आणि म्हणाले,”मुलांनो! आपण एक खेळ खेळूया” यात दानीयाल अ. राजा झाले. एका मुलाला कुलीन स्त्रीचे पात्र समजावून सांगितले आणि दोन मुलांना न्यायाधीशांची भूमिका दिली आणि म्हणाले, ‘तुम्ही दोघे माझ्या कोर्टात या महिलेविरुद्ध साक्ष द्या.’
ते स्वतः मातीचा ढीग गोळा करून त्यावर बसले आणि हातात एक लाकडी तलवार ठेवली. न्यायालयाचा देखावा निर्माण केला. समोर स्त्रीच्या वेशात आलेला मुलगा उभा होता. हजरत दानियाल अ. यांनी इतर मुलांना एका न्यायाधीशाचा हात धरून त्याला दूरवर नेण्यास सांगितले. ते निघून गेल्यावर त्यांनी दुसऱ्या न्यायाधीशाला विचारले,”मला खरे सांग, नाहीतर मी तुला मृत्यदंड देईन, या स्त्रीने व्यभिचार केला? तू साक्ष देतोस?”
न्यायाधीश म्हणला, “मी साक्ष देतो की, या महिलेने व्यभिचार केला आहे.”
हजरत दानियाल अ. “कधी?”
न्यायाधीशाने उत्तर दिले, “अमक्या दिवशी.”
हजरत दानियाल अ. “तिने कोणत्या पुरुषासोबत व्यभिचार केला आहे?”
न्यायाधीश, “अमूक-अमुक आणि तत्सम.”
हजरत दानियाल अ. “कोणत्या ठिकाणी?”
न्यायाधीश, “अमक्या ठिकाणी?”
हजरत दानियाल अ. मुलांना म्हणाले, “या न्यायाधीशाला घेऊन जा आणि दुसऱ्या न्यायाधीशाला घेऊन या.”
मुलांनी आदेशाचे पालन केले.
हजरत दानियाल अ. यांनी पहिल्या न्यायाधीशाला जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न दुसऱ्या न्यायाधीशालाही विचारले. दुसऱ्या न्यायाधीशाची उत्तरे पहिल्या न्यायाधीशापेक्षा वेगळी होती.
हजरत दानियाल अ. म्हणाले, “खरे गुन्हेगार तर हे न्यायाधीश आहेत!”
राजाचा विश्वासू मंत्री जो हे सगळं दृश्य पाहत होता, वेळ वाया न घालवता राजाच्या सेवेत पोहोचला आणि त्याला लहान मुलांचा तो खेळ सांगितला. राजाचे डोळे उघडले. त्याने मुलांच्या खेळाप्रमाणे कृती केली. त्याला दोन्ही न्यायाधीशांचे कथन वेगळे असल्याचे आढळून आले. राजाने दोन्ही न्यायाधीशांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि त्या पवित्र स्त्रीला आदरपूर्वक तिच्या घरी पाठवले.
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. ६४)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment