मौलवी सय्यद अल्लाउद्दीन हे आध्यात्मिक नेते होते. ते दक्षिण भारतातील सर्वांत बलाढ्य संस्थानांपैकी एक असलेल्या निजाम संस्थानातील लोकांना ब्रिटिशांच्या वर्चस्वाविरुद्ध बंड करण्यास उद्युक्त करायचे. ब्रिटीश सरकारविरुद्धच्या थेट लढ्यात ते आघाडीवर होते.
मौलवी सय्यद अल्लाउद्दीन हे मूळचे हैदराबादचे रहिवासी होते, पूर्वीच्या निजाम संस्थानाची राजधानी. १८५७ मध्ये भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाल्यानंतर अल्लाउद्दीन यांनी आपल्या बंडखोर कारवाया तीव्र केल्या.
निजाम संस्थानाचा भाग असलेल्या औरंगाबादमध्ये बंडखोरी झाली आणि निजाम सरकारने सुरुवातीच्या काळात अटक केली. त्या क्रांतिकारक कार्यात भाग घेणारे बंडखोर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अटकेतून सुटले आणि हैदराबादला आले. त्यांना निजाम राज्याच्या पोलिसांनी अटक करून तुरुंगात ठेवले होते.
अटक केलेल्या बंडखोरांची सुटका करण्याची विनंती निजामाने फेटाळल्याने निजाम राज्यातील लोक आणि प्रमुख नागरिक संतप्त झाले. ते १७ जुलै १८५७ रोजी मक्का मस्जिदमध्ये भेटले आणि हैदराबादमधील ब्रिटीश रेसिडेन्सीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
दुपारी ४ नंतर मौलवी अल्लाउद्दीन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे लोक आले आणि दुसरे क्रांतिकारी नेते पठाण तुर्रेबाज खान यांनी ब्रिटीश वर्चस्वाचे प्रतीक असलेल्या ब्रिटीश रेसिडेन्सीवर हल्ला करण्यासाठी युद्धाच्या नादात सुलतान बाजारच्या पुढे कूच केले.
निजाम नवाब हा इंग्रजांचा मित्र असल्याने इंग्रज अधिकाऱ्यांना नजीकच्या हल्ल्याची माहिती दिली. इंग्रज आणि निजामाच्या सैन्य धोरणात्मकपणे पुढे सरसावले आणि अतिरिक्त सैन्यासह हल्लेखोरांचा सामना केला. रात्रभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. शत्रू सैन्याचा वरचष्मा होताच बंडखोरांनी माघार घेतली.
इंग्रजांच्या आणि निजामाच्या संतप्त सैन्याने हैद्राबादच्या जनतेला वेठीस धरले. मौलवी अल्लाउद्दीन यांच्या शिरावर चार हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
मौलवी भूमिगत झाले. पीर मोहम्मद नावाच्या आपल्या जवळच्या मित्राकडे दीड वर्ष आश्रय घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या भूमीवर आणि लोकांवर इंग्रजांचे वर्चस्व संपवण्यासाठी सय्यद भिक्कू, सय्यद लाल आणि मोहम्मद अली यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांशी सल्लामसलत सुरू केली.
अखेरीस ब्रिटिश सैन्याने त्यांना अटक करून २८ जून १८५९ रोजी अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये पाठवले. २५ वर्षे कैदी म्हणून दुःखद जीवन व्यतीत केल्यानंतर, मौलवी सय्यद अल्लाउद्दीन यांचे १८८४ मध्ये निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment