Halloween Costume ideas 2015

"हायपरटेन्शन" ‘सायलेंट किलर’च्या भूमिकेत


हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हा जगभरात सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्राणघातक आजारांच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक, एन्युरिझम, हृदय अपयश, मूत्रपिंड समस्या, डोळ्यांच्या समस्या, चयापचय समस्या, स्मृतिभ्रंश, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणतात कारण सहसा त्याची लक्षणे दिसत नाहीत आणि अचानक शरीरात आघात होतो. उच्चरक्तदाबाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्थिती लवकर ओळखण्यासाठी, निरोगी भविष्यासाठी आणि उच्च रक्तदाबाच्या प्रभावी व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १७ मे रोजी जगभरात “जागतिक उच्च रक्तदाब दिन” पाळला जातो. सामान्य बीपी म्हणजे रक्तदाब १२०/८० किंवा त्याहून कमी असतो. हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब) तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब सामान्यपेक्षा जास्त (१४०/९० किंवा जास्त) असतो, ही सुरवात असते, परंतु उपचार न केल्यास ते गंभीर होऊ शकते. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा जास्त दाब सहन करावा लागतो. उच्च रक्तदाब माहित करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रक्तदाब (बीपी) तपासणे.

डब्ल्यूएचओ ने उच्च रक्तदाब बाबत काही प्रमुख तथ्ये दर्शविली आहेत, जगभरात ३०-७९ वयोगटातील अंदाजे १.२८ अब्ज प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, त्यापैकी बहुसंख्य (दोन तृतीयांश) कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे ४६% प्रौढांना ही समस्या असल्याची माहिती नसते. उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांपैकी अर्ध्याहून कमी (४२%) चे निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या ५ पैकी फक्त १ प्रौढ (२१%) ची ही स्थिती नियंत्रणात असते. उच्च रक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे दरवर्षी ७५ लाख मृत्यू होतात, जे जागतिक स्तरावरील मृत्यूच्या अंदाजे ३० टक्के आहेत.

हायपरटेन्शनच्या जागतिक प्रभावाच्या स्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात असे म्हटले आहे की, उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या निम्म्या लोकांचाही रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर २०४० पर्यंत भारतात किमान ४६ लाख अकाली मृत्यू टाळता येतील. केवळ ३७ टक्के भारतीयांना उच्च रक्तदाबाचे निदान होते आणि त्यापैकी केवळ ३० टक्केच उपचार घेतात. अहवालात म्हटले आहे की, सध्या देशात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या केवळ १५ टक्के लोकांची स्थिती नियंत्रणात आहे. खरेतर, देशात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक (५२ टक्के) मृत्यू उच्च रक्तदाबामुळे होऊ शकतात. जर्नल ऑफ हायपरटेन्शनच्या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबाची समस्या भारतात सर्वाधिक आहे, सुमारे ३० टक्के भारतीय या आजाराने ग्रस्त आहेत. 

आपल्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक लोक अशा चुकीच्या अन्नपदार्थांचे सेवन करत आहेत जे प्राण्यांनाही खाण्यास योग्य नाहीत. तेलकट, मसालेदार, खारट, मैदा, गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्या शरीरात मंद विषासारखे कार्य करतात आणि आपल्याला घातक रोगाने आजारी करून मृत्यूकडे ढकलतात. आधुनिकता आणि दिखाऊपणा माणसाच्या विनाशाचे कारण बनले आहे, आधुनिकता फक्त आपल्या विचारात असावी, भौतिक सुख हेच सर्वस्व नाही हे माणूस समजतच नाही. भौतिक सुख सोयींवर अवलंबित्वामुळे मनुष्य मानसिक व शारीरिक दृष्ट्या बऱ्याच प्रमाणात कमकुवत झाले आहे. त्यामुळे माणसाची तग धरण्याची क्षमता, विचारशक्ती कमी झाली आहे आणि तणाव, चिडचिड, गैरवर्तन, स्वार्थीपणा सतत वाढत आहे. त्यामुळे सामाजिक समस्या, गुन्हे, विकासात अडथडा झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर अतिशय वाईट होत आहे. वाढलेले वय, आनुवंशिकता, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे, जास्त मीठयुक्त आहार, जास्त धूम्रपान, मद्यपान यासारख्या परिस्थितीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत साधनसंपन्न सुविधा यंत्रणा असलेली शहरी लोकसंख्येला आजारांचा जास्त भार सहन करावा लागतो, कारण शहरात विकासाच्या नावाखाली शरीरे दुबळी झाली आहेत. प्रदूषण, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसनाधीनता, निद्रानाश, भेसळ, व्यायामाचा अभाव, यांत्रिक साधनांवर अवलंबून राहणे म्हणजेच आधुनिक जीवनशैली यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक रूपाने आजारी आहोत. आता हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात हा वयावर अवलंबून नसून लहान मुलांपासून ते कोणालाही कधीही होऊ शकतो. दूषित वातावरण इतके वाढले आहे की गर्भवती महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळांमध्ये देखील अपंगत्व आणि जीवघेणे आजार वाढले आहेत.  आरोग्याशी संबंधित वाढत्या समस्यांच्या मुळाशी लोकांमध्ये विशेष जागरूकता नाही. रोगांचे प्रमाण सातत्याने का वाढत आहे, यासाठी समाजात व देशात मोठ्या प्रमाणावर इतिहास घडवणारी जनजागृती आणि कठोर नियम व कायदे निर्माण करण्याची खूपच गरज आहे. आरोग्याशी तडजोड होईल असा कोणताही उपक्रम देशात होता कामा नये, ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे आणि सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची नैतिकता जनतेची आहे.

उच्चरक्तदाब रोखण्यासाठी औषधोपचार आणि आधुनिक जीवनशैलीतील बदलांसोबतच हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे अधिक खा, सतत जास्त वेळ बसणे टाळा, शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय व्हा जसे - चालणे, धावणे, पोहणे, नृत्य किंवा वजन उचलणे यासारख्या शक्ती वाढवणाऱ्या क्रियाकलापांचा दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. आपले वजन संतुलित ठेवा, तणाव कमी करा आणि नियमितपणे रक्तदाब तपासा, जर काही समस्या असेल तर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या, काळजी घ्या. सकारात्मक विचार, सकस छंद, पौष्टिक आहार, व्यसनमुक्ती, स्वच्छता, रोजचा व्यायाम या सवयी आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात. आजच्या युगातील समस्येचे सर्वात मोठे मूळ खोटे देखावे आणि लोकांकडून मोठ्या अपेक्षा हे आहे, ज्यामुळे मानवी विचार कमकुवत आहेत. जर आपण अशा निरर्थक गोष्टींपासून दूर राहिलो तर आपण भावनिकदृष्ट्या मजबूत होऊ, जे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. निःस्वार्थ परोपकार, समाजसेवा, निसर्गप्रेम आणि प्राणी प्रेम, देश आणि समाजाप्रती नैतिक जबाबदाऱ्या पार पाडणे यातून मानसिक शांती आणि आंतरिक समाधान मिळते, की आपण माणूस म्हणून जगत आहोत, जे आजच्या काळात खूपच गरजेचे आहे, तणावमुक्त जीवन जगण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. 


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- ०८२३७४ १७०४१


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget