Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग १७)

अन्नासोबत सावली देणारी वृक्षलता


जगात कित्येक प्रकारच्या वनस्पती आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण करताना विविध नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतींचा वापर केला आहे. उत्क्रांतीनुसार, फळा-फुलांच्या आधारावर किंवा उपयोग आणि वापरावरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यांचा आकार, खोडाचा प्रकार आणि आयुष्यमानवर आधारित वनस्पतींचे गवत (Herb), झुडपे (Shrub) आणि वृक्ष (Tree) असे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. याव्यतिरिक्त वेलवर्गीय (Climbers) वनस्पतीचा एक आणखी प्रकार यांमध्ये आढळतो. गवत हा कठीण खोड नसलेल्या, हिरव्या आणि लवचिक खोडांच्या वनस्पतींचा प्रकार आहे ज्यांना कमी शाखा असतात. त्या आकाराने लहान, कमी आयुष्यमानाचे असतात. मसाले, भाज्या आणि बहुतेक औषधी वनस्पती याच प्रकारात मोडतात. मोहरी, तुळस, गहू, उडीद ही काही उदाहरणे या प्रकारच्या वनस्पतींचे देता येतील. झुडपे हे गवतापेक्षा आकाराने आणि उंचीने थोडे मोठे असतात. त्यांच्या शाखा जमिनीच्या तळापासून निघतात त्यामुळे त्यांना झुडूपाचा आकार येतो. यांचे खोड जाड असते पण तेवढे कठीण नसते. या प्रकारातील झाडे हे काही वर्षे जगतात. सूर्यफूल, गुलाब, लिंबू हे या गटातील सदस्य आहेत. वृक्षांचे खोड मात्र कठीण लाकडाचे असते. त्यांच्या शाखा या जमिनीपासून उंचीवर आणि एका मुख्य खोडापासून निघतात. या प्रकारचे झाडे खूप फायदेशीर असतात. जमिनीची धूप रोखणे, हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड संतुलित ठेवणे, लाकडी वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल पुरवणे इत्यादी कार्य वृक्ष करतात. यांची उंची, खोडाचा घेर, संपूर्ण आकार आणि आयुष्यमानावरून या झाडांना 'वृक्ष' या वर्गात मोडले जाते. वृक्षांचे आयुष्य हे गवत आणि झुडुपांपेक्षा जास्त असते. आंबा, कडूलिंब, पिंपळ ही काही वृक्षे आपल्या सभोवताली आढळतात.

इतर प्रकारच्या तुलनेत वृक्षांपासून माणूस जास्तीत जास्त फायदा घेत असतो. या बाबतीत लिहिताना कवी मधुकर आरकडे म्हणतात,

"नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरू,

फुला फळांचा ज्यावरी नाही आला रे बहरू,

क्षणभर विसावेल वाटसरू सावलीत,

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत"

यावरून वृक्ष हे सावलीसाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पतीचा प्रकार असल्याचे समजते.

याशिवाय लता किंवा वेली या थोड्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्यांची कांडे लांब, कमी जाडीचे आणि लवचिक असल्याने त्यांना जमिनीवर सरळ उभे राहता येत नाही. वेली दुसऱ्या झाडांचा किंवा अजैविक घटकांचा आधार घेऊन जमिनीपासून प्रकाशाच्या दिशेने वाढत असतात. त्यांचे आयुष्यमान कमी असते. आधारासाठी त्यांना तणावा (Tendril) नावाचा विशेष अवयव असतो. पान किंवा खोडाचे रूपांतर हे तणाव्यामध्ये होत असते. या प्रकारच्या वनस्पतींचे स्वतःचे खोड एवढे सक्षम नसले तरी दुसऱ्याच्या मदतीने या वेली खूप कमी काळात एवढ्या पसरतात की त्यांचा लतामंडप तयार होतो. सावलीसाठी विशेष या वेलींचा उपयोग जरी केला गेला नसला तरी त्यांच्या पानांचा आकार फार मोठा आणि घेरदार असतो आणि म्हणूनच कुरआनमध्ये आदरणीय पैगंबर यूनुस (अलै.) यांच्या सत्यकथेत यासंबंधी अध्याय 'अस्-सॉफ्फात'च्या १४६ व्या आयतीमध्ये  उल्लेख आलेला आहे,

"सरतेशेवटी आम्ही त्यांना अत्यंत दुर्दशेत एका खडकाळ जमिनीवर फेकून दिले आणि त्यावर एक वृक्षलता उगविली."

यामध्ये त्या वृक्षलतेच्या नावाचा उल्लेख नाही पण भाष्यकारांनी भाष्य करताना ही वेल कद्दु किंवा भोपळ्याची असल्याचे अधोरेखित केले आहे.

मौलाना अबुल आला मौदुदी आपल्या तफ्हीमूल कुरआन या ग्रंथात लिहितात,

"मूळ शब्द आहेत 'शजरतम्-मिंय्-यक़्तिनिन'. अरबी भाषेतील यक्तीन म्हणजे खोडावर उभे न राहणारे भोपळा, टरबूज, काकडी इ. वेलीच्या रूपात पसरणारे झाड. तथापि, हजरत यूनुस (अलै.) यांच्यावर चमत्कारिकरीत्या पानांसह अशी एक वेल निर्माण झाली होती जी सावली पण देत होती आणि तिची फळे त्यांना एकाच वेळी अन्न आणि पाणी देत होती."

माशाच्या पोटातून आदरणीय पैगंबर यूनुस (अलै) जेव्हा मुर्छित अवस्थेत उन्हात फेकले गेले तेव्हा त्यांच्यासाठी या वेलीचा लतामंडप बनवून सावलीचा बंदोबस्त केला गेला जेणेकरून त्यांची रक्षा व्हावी आणि परत आपल्या समुदायात जाऊन समुदायाच्या लोकांसमवेत अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करावी. अशा प्रकारे विविध प्रसंगी विविध वनस्पतींचा उल्लेख कुरआनमध्ये आढळतो.            

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget