आर्थिक स्थैर्य नसेल तर धार्मिक जाणीवा क्षीण पडतात. भारतीय मुस्लिमांच्या बाबतीत नेमके हेच घडलेले आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत देत मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या डबघाईला येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे या समाजाची धार्मिक जाणीवा क्षीण झालेल्या आहेत. जिलहिज्जाचा महिना इब्राहिम अलै. सलाम यांच्या स्मृतींना उजाळा देणारा महिना असल्यामुळे क्षीण झालेल्या धार्मिक जाणीवांना पुन्हा तीक्ष्ण कशा बनवता येतील याचा विचार करण्यासाठीचा हा महिना एक संधी आहे, म्हणूनच या आठवड्यात इब्राहिमी मिशनवर लिहिण्याचा मानस आहे.
फाळणीची शिक्षा ज्यांना द्यावयास पाहिजे होती ते तर पाकिस्तानला निघून गेले त्यांना ती देता येत नव्हती म्हणून, ’वडाचं तेल वांग्यावर’ या या तत्वानुसार त्यांचे समधर्मीय म्हणून विश्वासाने भारतात राहिलेल्या मुस्लिमांना ती देण्यात आली. पावलो पावली त्यांच्याशी अघोषित भेदभाव नेकेला गेला. सावरकरांच्या पितृभू आणि पुण्यभूच्या सिद्धांतांचे तंतोतंत पालन करत सर्वपक्षीय सरकारांनी सर्वच क्षेत्रात मुस्लिमांना डावलण्याचे काम केले. आरक्षणासाठी सर्वाधिक पात्र असतांनासुद्धा मुस्लिमांना आरक्षणापासून वंचित ठेवले गेले. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की, मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली. अमाप कष्ट करून कसेबसे स्वतःला वाचविणे हेच भारतीय मुस्लिमांचे जीवन जगण्याचे एकमेव लक्ष्य बनले. अशा परिस्थितीत धार्मिक जाणीवा क्षीण झाल्या नसल्यातरच नवल ठरले असते. अशा विपरित परिस्थितीतसुद्धा या लढवय्या समाजाने धार्मिक जमातींच्या सहाय्याने एवढे मात्र (चांगले) काम केले की, मुस्लिम म्हणून त्यांनी आपली ओळख वाचविली. खरे पहाता हे फार मोठे आव्हान होते पण ते पेलण्यात मुस्लिम समाजाला यश प्राप्त झाले आहे. आज भारतीय मुस्लिम समाजाचा मोठा भाग इस्लामच्या मूळ शिकवणीशी एकरूप झालेला आहे. परंतु ही एकरूपता फक्त इबादतींशीच संलग्न आहे. मूल जन्मल्याबरोबर त्याच्या कानात अजान देणे, त्याचा अकीका करणे, मुलांची सुंता करणे, त्यांना कुरआन पठण शिकविणे, नमाज शिकविणे, इतर प्रार्थना शिकविणे, 8 ते 10 वर्षे होताच त्यांना रोजा ठेवण्यास प्रेरित करणे इत्यादी विधी हा समाज नेमाने करत आलेला आहे. आणि या विधी तो नेमाने आपल्या पुढील पिढींना इमाने इतबारे पासऑन करत आहे. मात्र या विधींनाच पूर्ण इस्लाम समजण्याची चूक या समाजाने केली आहे.
खरा इस्लाम या विधींच्या पुढे आहे. याची जाणीवच त्यांना नाही. कारण इब्राहिमी मिशनची पुसटशी कल्पनादेखील त्यांना दिली गेलेली नाही. परिणामी, शतकानुशतके नास्तीकता आणि अज्ञानाच्या आधारे ज्ञान आणि सभ्यतेच्या विकासातून निर्माण झालेल्या समस्या त्यांना समजून घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे कालौघात जे सामाजिक बदल देशात झालेत त्यांना एक मुस्लिम म्हणून कसे तोंड द्यावे, हे त्यांना कळत नाही. हे समजून घेणे हीच आजच्या काळाची मुख्य गरज आहे. बदलत असलेल्या परिस्थितीचे संपूर्ण मुल्यमापन करणे आणि इस्लामच्या तत्वानुसार त्यावर व्यवहार्य तोडगा काढणे आणि तो समाजासमोर मांडणे हे काम इब्राहीमी मिशन नीट समजून घेतल्याशिवाय करता येणे शक्य नाही.
इब्राहिमी मिशन
इब्राहिमी मिशनचा मूळ सिद्धांत असा आहे की, जगाच्या पाठीवर इस्लाम हा एकमेव असा धर्म आहे ज्याला खर्या अर्थाने सनातनी धर्म म्हणता येऊ शकेल. कारण कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, जगाची सुरूवात एक स्त्री आणि एका पुरूषासून झालेली आहे. सर्वप्रथम आदम (अॅडम) अलै. यांची निर्मिती ईश्वराने मातीपासून केली. त्यानंतर त्याच्यात जीव ओतला. त्याच्यापासून त्याची पत्नी बनविली आणि दोघांनाही पृथ्वीवर पाठविले. यासंदर्भात कुरआनच्या खालील आयातींचे वाचकांनी अवलोकन केल्यास त्यांच्या लक्षात येईल की, ईश्वर एकच आहे आणि त्याला मान्य असलेला धर्म इस्लाम हा सुद्धा एकच आहे.
आम्ही मानवाला कुजलेल्या मातीच्या सुक्या गार्यापासून निर्माण केले (संदर्भ : सूरह हिज्र 15: आयत नं. 26) यानंतर ईश्वराने सर्व जीवांना आदमला वंदन करण्याचा आदेश दिला. तेव्हा सर्वांनी वंदन केले. मात्र इबलिस (सैतान)ने इन्कार केला. एवढेच नव्हे तर त्याने ईश्वरापुढे निवेदन केले की, तू ने मला अग्नीपासून बनविले आहे. याला मातीपासून. म्हणून मी श्रेष्ठ आहे. मी याला वंदन करणार नाही. त्यावर ईश्वर नाराज झाला आणि सैतानाचा धिक्कार केला. तेव्हा त्याने आदम आणि हव्वा (इव्ह) अलै. यांना ईश्वराच्या मार्गापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची ईश्वराकडेच परवानगी मागितली. जी की त्याला मिळाली. तेव्हा ईश्वराने आदम आणि हव्वा अलै. यांना खालील शब्दात केले.
यावर आम्ही आदमला सांगितले की, पहा, हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वैरी आहे, असे होता कामा नये की याने तुम्हाला स्वर्गामधून हुसकावून द्यावे आणि तुम्ही संकटात पडावे. (संदर्भ : सूरह तॉहा 20: आयत नं. 117). थोडक्यात या जगात सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, निती आणि अनिती यामधील संघर्ष आदम अलै. यांच्या मुलांपासून सुरू झालेला आहे तो आजतागायत सुरू आहे. याची सुरूवात आदम अलै. यांच्या दोन मुलांपासून झाली, ज्यात एकाने दुसर्याची हत्या केली होती. जगाचा जसा जसा विकास होत गेला, तसा तसा शुद्ध स्वरूपात आदम आणि हव्वा अलै. यांनी आणलेल्या एकेश्वरवादी इस्लामची शिकवण क्षीण पडत गेली. जेव्हा आदम आणि हव्वा अलै. यांच्या संततीची संख्या वाढली आणि ते उपजीविकेसाठी पृथ्वीवर संधी मिळेल तिकडे पसरू लागले तेव्हा हिंस्र श्वापदांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी व त्यांची शिकार करून उपजीविका भागविण्यासाठी त्यानां संघटित राहणे गरजेचे झाले. या संघटित जीवनशैलीचे परिवर्तन पुढे टोळ्यांमध्ये झाले. कालांतराने प्रत्येक टोळीला आत्मीक समाधानासाठी भक्तीची गरज पडू लागली. कारण ईशभक्तीशिवाय मनुष्य शांतपणे जीवन जगूच शकत नाही. शिक्षण नसल्यामुळे मग लोकांचा कल त्या गोष्टींना ईश्वर मानन्याकडे झुकू लागला जे त्यांना चमत्कारिक भासत होत्या. याचेच रूपांतर पुढे मूर्तीपुजेमध्ये झाले. लोक लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती बनवून पूजा करू लागले. अशामुळे ते एका ईश्वराच्या भक्तीपासून विचलित झाले व त्यामुळे धार्मिक अस्मिता वेगळ्या असल्यामुळे त्यांच्यात भांडण तंटे होऊ लागले. एवढेच नव्हे तर याच विषयावर पुढे आपसात युद्ध होऊ लागली.
इब्राहिम अलै. हे जगातील एकमेव असे प्रेषित आहेत ज्यांना जगातील तीन प्राचीन धर्माची प्रेषित म्हणून मान्यता आहे. कुरआनमध्ये सूरह इब्राहिम नावाचा एक अध्याय आहे. ज्यात एकूण 52 आयाती आहेत. हा अध्याय इब्राहिम अलै. यांच्याशी संबंधित आहे. याशिवाय, कुरआनमध्ये त्यांचा संदर्भ 63 ठिकाणी आलेला आहे. ते 169 वर्षे जगले आणि सुरूवातीचे आयुष्य अत्यंत कठीण अवस्थेत गेले. त्यांनी एकेश्वरवादाची शिकवण दिली. ज्याचा स्विकार ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांनी केला. कालौघात ज्यू आणि ख्रिश्चन यांनी एकेश्वरवादाच्या या सिद्धांताला तिलांजली दिली. जबूर आणि बायबल या धार्मिक ग्रंथामध्ये आपल्या मनाप्रमाणे फेरफार केले. त्यांचा चुकीचा अर्थ लावून लोकांना सांगितला. तेव्हा एप्रिल 571 मध्ये मक्का या शहरात अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला. 40 वर्षानंतर त्यांना गार-ए- हिरा (गुहे) मध्ये दिव्य ज्ञान प्राप्त झाले. ईश्वराचे दूत जिब्राईल (गॅब्रीयल) अलै. यांच्या मार्फतीने ईश्वरीय अध्याय त्यांच्यावर नाझील (अवतरित) होवू लागला. 23 वर्षात संपूर्ण कुरआन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाले. याच कालावधीत प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांचे सहाबा रजि. (सोबती) यांनी अत्यंत कठीण श्रम करून विपरित परिस्थितीतून एकेश्वरवादाची पुनःश्च मुहूर्तमेढ रोवली. काबागृहात अस्तित्वात असलेल्या 360 मूर्त्या नष्ट केल्या. आणि मदीना या शहरात शुद्ध एकेश्वरावादावर आधारित इस्लामी रियासतीची स्थापना केली. त्यांच्यानंतर चार पवित्र खलीफांनी शुद्ध इस्लामी लोकशाही खिलाफत पद्धतीने शासन करून जगाला खरी लोकशाही काय असते, याचा परिचय करून दिला. या चारही खलीफांच्या शासन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केल्यास शासक हा आई प्रमाणे असतो, हे लक्षात येते. आई जसे आपल्या मुलांची काळजी घेते तशीच काळजी खलीफा आपल्या प्रजेची घेतो आणि आई ज्याप्रमाणे मूल चुकत असेल तर शिक्षा देते त्याचप्रमाणे खलीफा, नागरिक चूकत असतील तर त्यांना शिक्षा देतो. परंतु, नागरिक चुकणार नाहीत. याची संपूर्ण व्यवस्था शरियतच्या आदेशाप्रमाणे आपल्या गव्हर्नसच्या माध्यमातून खलीफा करतो. नागरिकांच्या पोषणाची, शिक्षणाची, संरक्षणाची, रोजगाराची आणि न्यायाची स्थापना खलीफा आपल्याला मिळालेल्या शासकीय अधिकारातून करतो. चांगले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचे काम खलीफा करतो. एवढे सर्व करून देखील जर कोणी गुन्हे करत असेल तर त्याला जबर शिक्षेची तरतूद देखील खलीफा करतो. खलीफा हा धार्मिक आणि राजकीय प्रमुख असतो. परंतु तो कायद्यापेक्षा श्रेष्ठ असत नाही. त्याच्यावरही नागरिक खटला भरू शकतात.
एकंदरित ईश्वर एक आहे आणि इस्लामी जीवनशैली हीच मानवासाठी एकमेव उपयोगी अशी जीवनशैली आहे. हा इब्राहिमी मिशनचा एकमेव संदेश आहे. पण सध्या चंगळवाद आणि उपभोक्तावादाच्या जाळ्यात मुस्लिम समाज असा गुरफटलेला आहे की त्यांच्यातील मोठ्या जनसंख्येला इब्राहिमी मिशन चा विसर पडलेला आहे. इब्राहीम अलै. नंतर त्यांच्या मिशनला शुद्ध स्वरूपात पुनर्स्थापित करण्याचे मोठे काम प्रेषित मुहम्मद सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते ते परत कालौघात मागे पडू लागले आहे. आता कोणी प्रेषित येणार नाही फक्त कयामत येईल ती येई पर्यंत इब्राहीम मिशनला पुढे नेण्याची जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे म्हणून अल्लाह पाक कडे प्रार्थना करतो की या मिशन ला पुढे नेण्याची इच्छा शक्ती, क्षमता आणि साहस आम्हा सर्वांना प्रदान कर (आमीन)
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment