लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे असून, चार टप्पे संपले आहेत. या चार टप्प्यात एनडीए आणि इंडिया आघाडीत रस्सीखेच दिसून आली. किंबहुना इंडिया आघाडीचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळेच की काय सत्ताधारी पार्टीने विकासाला सोडून धार्मिक ध्रुवीकरण आणि उद्योगपतींना आपले टार्गेट केले आहे.
सच्चर अहवालानुसार मागासवर्गीय समाजापेक्षाही मुस्लिमांची आर्थिक अवस्था बिकट असल्याचा निष्कर्ष काढलेला असतानाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच त्यांचा पक्ष व त्यामधील अतिहुशार नेते मुस्लिमांची भीती दाखवून हिंदूंची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीयेत.
भारत हा अनेकतेत एकता असलेला देश आहे. येथे अनेक धर्म, जाती, पंथ स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळानंतरही गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. मात्र मताच्या फायद्यापोटी राजकीय पुढाऱ्यांनी देशाच्या एकात्मतेला तडा दिला आहे. त्यांनी देशातील जनतेला विकासातून समृद्धीकडे घेऊन जाण्याऐवजी द्वेषातून विनाशाकडेे घेऊन जाण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे. खरं तर राजकीय पक्षांनी देशाची वाटचाल विकासातून समृद्धीकडे केली पाहिजे होती. मात्र हे करता न आल्याने धर्म, जाती व पंथांच्या नावावर तेढ निर्माण -(पान 7 वर)
करून त्यांना एकमेकांची भीती दाखवून खोटा अजेंडा रेटत राजकीय पोळी भाजली आहे. गेल्या 10 वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात बहुसंख्यांक समाजाला अल्पसंख्यांक समाजाची भीती दाखवून अल्पसंख्यांकांचे सर्वार्थाने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळेच की काय अल्पसंख्यांक समाज भाजपापासून नैसर्गिकरित्या लांब गेला. मात्र या निवडणुकीत मुस्लिम समाज आपले राजकीय व सामाजिक दायित्व समजत देशात एकात्मता, बंधुता, समता, न्याय टिकविण्यासाठी पूर्णपणे बहुसंख्यांकातील मोठ्या गटासोबत इंडिया आघाडीच्या बाजूने गेल्याचे दिसून येत आहे. शिवाय, देशातील बहुसंख्यांक समाजालाही हे कळून चुकले आहे की, भाजपाने चुकीच्या मार्गाने प्रवास सुरू केला आहे, त्याची साथ सोडली पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशातील सर्व समाजघटक इंडिया आघाडीकडे आशेने बघत त्यांना सत्तेवर बसविण्याचे स्वप्न पाहत आहे. ईव्हीएममध्ये काही का होईना ते न पाहता मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडला.
प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी ज्या भागात जो धार्मिक समाज मोठ्या संख्यंने राहतो तिथे त्या प्रकारचे धार्मिक धु्रवीकरण होईल अशी भाषणे दिली आहेत, देत आहेत. प्रारंभी विकासावर बोलले. मात्र देशातील जनतेला भाजपने विकास किती आणि कसा केला आहे आणि तो कशा प्रकारे सुरू आहे ते कळून चुकले. त्याचा परिणाम दिसेनासा झाल्याने सरळ भाजपाची भाषणे धार्मिक ध्रुवीकरणावर आली आणि ती मुस्लिम समाजावर येवून ठेपली. त्यांच्या आरक्षणावर, त्यांना घुसपैठी म्हणण्यावर, त्यांच्या लोकसंख्येवर आणि शेवटी आता ईद मिलन भेटीवर येवून थांबलीत. एखादी व्यक्ती विचाराने चांगली आहे मात्र ती उपाशी पोटी जरी असली तरी ती अशांतता माजवत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात विषारी आणि द्वेषी विचार जर भरले गेले तर तो उपाशीपोटी तर सोडाच पोटभरलेले असतानाही तो दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही. याचे जीवंत उदाहरण आपण अल्पसंख्यांकांच्या झालेल्या मॉबलिंचिंग आणि भाजप नेत्यांकडून मुस्लिमांचे होत असलेले खच्चीकरण या माध्यमातून समजते.
गेली दहा वर्षे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेचा यथेच्च उपभोग घेताहेत. विरोधकांची जिरवूनच नव्हे तर त्यांचे पक्ष फोडूनही मनिषा पूर्ण झाली नाही. मजल तर इतकी गेली की विरोधकांमधील थोडीही लोकाभिमुख छवी असलेल्या नेत्याला शासकीय संस्थांचा गैरवापर करून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जनतेला मनाचा नेता निवडण्यासाठी नेताच उरू नये. त्यामुळे ही निवडणूक जनता लढवित आहे, नेते नाहीत असाच सूर नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून उमटत आहे. तसेच ज्या उद्योगपतींनी देशाच्या उभारणीत आणि भाजपाच्या उभारणीत मोठा हातभार लावला त्यांच्यावरच प्रधानमंत्र्यांनी टिका सुरू केली आहे. अजून तीन टप्प्यांतील निवडणुका बाकी आहेत. 20 मे, 25 मे आणि 1 जून या तीन तारखांना 23 राज्यातील 163 जागांवर मतदान होणार आहे. या तीन टप्प्यातील राहिलेल्या निवडणुकांच्या प्रचारावेळी मतदारांची मने आपल्याकडे खेचून घेण्यासाठी काय-काय बोलले जाईल आणि कोणकोणते शब्द वापरले जातील, याचा अंदाज बांधता येणार नाही. तरीपण अपेक्षा करूयात की कुठल्याही अनपेक्षित घटना न घडता तीन टप्पयातील निवडणुका सुरळीत पार पडतील. 4 जूनचा दिवसच ठरवेल की जनता जिंकेल की मोदी जिंकतील.
- बशीर शेख
Post a Comment