Halloween Costume ideas 2015

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा!

असं सार्थ वर्णन कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्र राज्याचं केलं आहे, ते महाराष्ट्र राज्य खरंच मंगल आणि पवित्र राहिले आहे का?, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या इतकी नीच व खालची पातळी इथल्या राजकारण्यांनी कधीच गाठली नव्हती, आजच्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय व सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील ढासळलेली परिस्थिती पाहून महाराष्ट्रवासीयांचे मन काळवंडून गेले आहे.

वास्तविक महाराष्ट्र राज्याने यशस्वीपणे हीरक महोत्सवी वाटचाल पूर्ण करून अमृत महोत्सवाकडे झेप घेतली आहे. हे वास्तव स्विकारून महाराष्ट्र राज्याने या चौसष्ठ वर्षात केलेल्या गौरवशाली वाटचालीचा निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद व अभिमान वाटत होता व आहे. तथापि इथल्या तत्वशून्य राजकारण्यांनी मराठी माणसाच्या या अस्मितेवरच घाला घातला आहे. आजच्या तत्वशून्य व दळभद्री राजकारण्यांनी महाराष्ट्र राज्याची जणू रयाच घालवली आहे. सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारणारे हे राजकारणी पाहिले की, सेनापती बापट, कॉ. डांगे, साने गुरुजी, आचार्य अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साथी एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील, शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील यांसारख्या धुरींणांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्वकष्टाने व उदात्त विचारआचाराने उभा केलेला हाच का तो महाराष्ट्र,असा प्रश्न पडतो.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश नवमहाराष्ट्राचे शिल्पकार नामदार यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून पंतप्रधान पंडित नेहरूंच्या गळी उतरवून आणला, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते, त्यांच्यावर टिकेची झोड उठवली गेली होती, तथापि आजच्या इतकी शिवराळ भाषा आणि बेछूट आरोप शिवाय खालच्या पातळीवर जाऊन केलेले राजकारण तेंव्हा ही पहायला मिळाले नव्हते, विरोधक सुध्दा आपली पातळी सोडून गलीच्छ भाषा वापरत नसत. राजकीय पातळीवर महाराष्ट्राची ही उदात्त संस्कृती आज नामशेष झाली आहे की काय, असा ही प्रश्न पडला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कडवा विरोध पत्करून आपले राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा वापरून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचे ध्येय साध्य केले, त्यासाठी प्रसंगी स्वकीयांचा रोष ओढवून घेतला. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीने प्रचंड रान उठविले असतांनाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी त्यांनी जो संस्कार मराठी माणसाच्या मनामनात पेरला आहे, तो निश्चितच अढळ आणि चैतन्यदायी होता व आहे, यशवंतराव चव्हाणांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी हिरीरीने काम केले आहे.मात्र गेल्या दहा वर्षांत राजकीय वातावरण कमालीचे बदलले आणि यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला जणू काही दृष्ट लागली की काय, असे वाटू लागले आहे.

वास्तविक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 64 वर्षें झाली, अर्थात हा काळ अल्प वाटत असला तरी, मानवी आयुष्यातील तीन पिढ्या या काळात झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्थापनेच्या काळातील पिढी आणि आत्ताची पिढी पाहिली की, महाराष्ट्राने केलेल्या गौरवशाली प्रगतीचा आलेख चटकन् डोळ्यासमोर उभा राहतो, आणि महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा पाहून छाती अभिमानाने फुलून जाते.

रयतेचा, जाणता राजा कसा असावा या आदर्शाची शिकवण राष्ट्राला देणारे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, देशात स्त्रियांसाठी व शूद्रांना शिक्षणाची बंद असलेली कवाडे उघडून अविद्येने केलेले अनर्थ नष्ट करणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जातीपातीच्या भिंती तोडून दिनदलितांसाठी आपल्या राज्यात आरक्षणाचा क्रांतीकारी निर्णय घेऊन समतेचा कृतीशील संदेश देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, अष्टपैलू,न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजनीतिज्ञ, आणि समाजसुधारक, दलितांना त्यांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचून त्यांना आत्मसन्मान मिळवून देणारे थोर नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ब्रिटीशांना ठणकावून सांगणारे आणि स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसला लोकाभिमुख करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, देशाला सत्य आणि अहिंसा या विचाराने स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी चले जाव चळवळीचा शंख याच महाराष्ट्राच्या सेवाग्राम आश्रमाच्या कुटीतून पुकारला, कर्ते समाजसुधारक आणि दलितांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी अखंड आयुष्य वेचणारे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, बहुजनांना ज्ञानाची गंगोत्री त्यांच्या घरादारात पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, यासारख्या अनेक महामानवांनी हा महाराष्ट्र अत्यंत उदात्त आणि उन्नत विचारांने आणि कृतीने भक्कमपणे उभा केला आहे. विविध विचारप्रवाहाने महाराष्ट्र भूमी फुलली असली तरी सर्वसमावेशकता महाराष्ट्रातील मराठी माणसाने नेहमीच जपली आहे.

सुधारक आणि सुधारणांची महाराष्ट्र ही जननी आहे. आनंदवन, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीचा अधिकार, गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक चळवळी सर्वप्रथम याच भूमीत जन्माला आल्या. समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या जोखडातून मुक्त करणारे परिवर्तनवादी दलित व ग्रामीण साहित्य देखील पहिल्यांदा महाराष्ट्र भूमीतच प्रवाहित झाले. संगीत रंगभूमीचे शिल्पकार आण्णासाहेब किर्लोस्कर यांनी पारशी आणि मराठी नाट्यसंस्कृतीच्या एकत्रिकरणाची किमया 18 व्या शतकात केली,ती या महाराष्ट्राच्या भूमीतूनच. लोकशाही समाजव्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असणारी पंचायतराज व्यवस्था सर्वप्रथम महाराष्ट्राने साकार केली. आज देशभरात राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेची सुरुवात सर्वात आधी सुरू केली ती महाराष्ट्राने. उद्योग क्षेत्रात ही महाराष्ट्र राज्याने देशात नेहमीच आघाडी घेतली आहे. 

विकासाच्या वाटेवर चालत असताना महाराष्ट्राला अजूनही मोठ्या आव्हानांशी सामना करावा लागतो आहे.शालेय आणि उच्च शिक्षण या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, शिवाय तेथून बाहेर पडल्यावर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, तसेच शिकल्यामुळे या मुलांना शेती करणे कमीपणाचे वाटते, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे शहराकडे धाव घेतात, शहरातील या वाढत्या घूसखोरीमुळे शहरांत मोठ्या प्रमाणात बकालपणा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या विचारधारेचा पूर्ण फज्जा उडाला आहे. त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.अभियांत्रिकी महाविद्यालयात निम्म्या जागांसाठी विद्यार्थी मिळत नाहीत,अशी वस्तुस्थिती आहे. जे उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत, त्यांना योग्य रोजगार मिळत नाही, या पीढीचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारखानदारीमुळे वायु प्रदुषण आणि जलप्रदुषण वाढत असल्याने  रोगराई निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना पुरेशा सेवा देण्यासाठी ही अधिक व जलद काम होणे गरजेचे आहे.

आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांची आणि संकटांची मालिकाच राज्यासमोर उभी आहे. अर्थात संकटसमयी महाराष्ट्र कधीच मागे हटलेला नाही. कोरोना सारख्या अस्मानी संकटात ही महाराष्ट्र राज्य डगमगले नाही. कोरोनापासून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी राज्यातील प्रशासनासह सर्व घटकांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. तरीही अशा आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राने अधिक सक्षम,व सावध असणे आवश्यक आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून उपाययोजना तयार ठेवणे गरजेचे आहे.

अलीकडे हिजाब, मशिदी वरील भोंगे, हनुमान चालीसा पठण यांसारख्या धार्मिक व सामाजिक वातावरण कलुशीत करणाऱ्या घटनांमुळे यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छतासूर्य संत गाडगेबाबा यांचा महाराष्ट्र जातीयवादी विचाराने भरडला जातो आहे की काय,अशी भीतीही वाटते आहे ,मात्र राज्याने अशा बाबतीत ठोस निर्णय घेऊन ही जातीयवादी विषवल्ली मुळासकट उपटून टाकली पाहिजे. 

एकुणच भविष्याविषयी वाटणारी असुरक्षितता, अनिश्चितता व अस्वस्थ वर्तमान बदलण्यासाठी संयमाने तोंड देऊन आपण सारे मिळून अशा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांना नेस्तनाबूत करू या! सुरक्षित आणि निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संकल्प करू या!


- डॉ. सुनिल कुमार सरनाईक

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget