महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा 21 मे तर बारावीचा 28 मे रोजी निकाल जाहीर केला. बारावीमध्ये राज्यात 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी पास झाले. 94 हजार 284 विद्यार्थी यामध्ये नापास झाले. तर दहावी बोर्ड परीक्षेत 15 लाख 19 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी पास झाले. तर 64 हजार 885 विद्यार्थी यामध्ये नापास झाले. कोणी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळविले, कोणी काठावर पास झाले, कोणी हलाकीचे जीवन जगत परीक्षा यशस्वी केली, कोणी दोन्ही हात नसताना पायाने पेपर लिहून पास झाले. तर कोणी वडिलांचे छत्र हरवले असतानाही अगोदर पेपर दिला नंतर अंत्यसंस्काराला गेले. निकालादिवशी ते ही पास झाले. कठीण परिश्रम, सुख, दुःख, अडी-अडचणींवर मात करीत लाखो विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविले. तर कोणी यामध्ये अपयशी ठरले. जे यशस्वी झाले त्यांचेही अभिनंदन आणि जे यामध्ये नापास झाले त्यांचेही अभिनंदन.
मित्रानों! अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आयुष्य फार मोठे आहे आणि त्याच्या यशस्वी होण्याची व्याख्या ही फार छोटी आहे. ज्याने मनुष्याला या पृथ्वीवर जन्माला घातले त्या ईश्वराचा मनुष्य निर्मितीचा उद्देश आणि त्याने सांगितलेला यशस्वीतेचा मार्ग यावर जो चालतो तोच खरा यशस्वी होतो.
मित्रानों! दहावी, बारावी परीक्षेत यशस्वी होणे ही जेवढी महत्त्वाची गोष्ट आहे तेवढीच या वयात सद्वर्तनी, नैतिकता आणि ईश्वरी मार्गदर्शन अंगी बाळगण्याची सवय लावून घेणे अति महत्त्वाचे. वयाचा टप्पा जस-जसा वाढत जातो तस-तसे मनुष्याच्या आयुष्यात अनेकानेक -(उर्वरित पान 7 वर)
समस्या ठाण मांडून समोर येतात. अशा वेळी व्यावसायिक शिक्षणापेक्षा नैतिक शिक्षण हे माणसाला समस्यांच्या गर्तेतून अलगदपणे बाहेर काढते.
प्रत्येक जीवाचे पृथ्वीतलावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनुष्य तर बुद्धीमान प्राणी आहे. त्यामुळे मनुष्याला ऐहिक आणि पारलौकिक जीवनात पास होणे गरजेचे आहे. दहावी, बारावी व तत्सम कोणतीही परीक्षा ही त्या क्षेत्रात यशस्वीतेकडे घेऊन जाते. तशीच परीक्षा ही मानवी जीवाचीही घेतली जाणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम ईश्वराने मनुष्यासाठी तयार करून दिला आहे. तो मनुष्याला वाचून आत्मसात करून आचरणात आणणे अनिवार्य आहे. सध्या तो शुद्ध स्वरूपात कुरआनमध्ये उपलब्ध आहे.
आज मनुष्याची वाटचाल भौतिकतेकडे आणि अनैतिकतेकडे अधिक दिसून येत आहे. स्मार्ट फोन सहज उपलब्ध झाल्यामुळे बालमनावरही त्याचे विपरित परिणाम झाले आहेत आणि होत आहेत. दहावी, बारावीतील किंबहुना त्यापेक्षाही कमी वर्गातील अनेक मुलं-मुली वाममार्गाकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. पालकांतच ईशभय नसल्याने ते पाल्यापर्यंत ईशभयाची जाणीव झिरपत नाही. त्यामुळे ईश्वरीय मार्गापासून संपूर्ण समाजच मैलोगणिक लांब जात असल्याचे चित्र आहे.
जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेत नापास झालेत त्यांनी खचून जावू नये. दहावी, बारावीत पुन्हा उत्तीर्ण होण्याची संधी आपणास ऑ्नटोबर महिन्यात मिळणारच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेतील अपयशाची चिंता सोडून आपल्या मनावर ईशभय, नैतिकतेने जगण्याची अनिवार्यता अंगी बाळगण्याचा ध्यास घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक अंतर्गत ऊर्जा निर्माण होईल जी परीक्षेच्या अपयशामुळे खचू देणार नाही. कारण प्रत्यक्ष जीवनात ईश्वर जो परीक्षा घेणार आहे त्याच्यात यशस्वी होणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण नक्कीच सहाय्यभूत ठरते परंतु, जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणच आवश्यक असते असे नाही मात्र नैतिकता अत्यावश्यक असते. नैतिकतेशिवाय मिळालेले शिक्षण माणसाला अतिघातक करून टाकते.
कुरआनमध्ये अनेक ठिकाणी म्हटलेले आहे की, ईश्वर यश-अपयश देवूनही आपली परीक्षा घेत असतो. त्यात पास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्तीर्ण आहे जो ईश्वरीय मार्गदर्शन आणि नैतिकतेच्या कसोटीवर खरा उतरतो. दहावी, बारावीतील सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. ईश्वर आपणास सद्बुद्धी देओ आणि आपली पुढील वाटचाल सत्यमार्गावर होवो. आमीन.
- बशीर शेख
Post a Comment