यूनोच्या सर्वसाधारण सभेत पॅलेस्टाईनला पूर्णपणे सदस्यत्व देण्यासाठीचा ठराव २/३ बहुमताने संमत झाला. या ठरावाच्या बाजूने १४३ तर विरोधात ९ मते पडली. या ठरावानुसार पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांत मताच्या अधिकाराबरोबरच काही अधिकचे अधिकार आणि सवलती प्राप्त झाल्या आहेत. पॅलेस्टाईनला हे यश प्राप्त होणे म्हणजे अमेरिका आणि इस्रायलच्या मान-सन्मानाचे अपयश आहे. या ठरावावर मतदानाआधी यूनोमधील पॅलेस्टाईनचे प्रतिनिधी रियाज मन्सूर यांनी आपल्या भावूक भाषणात म्हटले आहे की “मी आपल्याला हे आश्वासन देऊ इच्छितो की आपण ज्यांनी या ठरावाच्या बाजूने मत दिले आहे, अशा अंधकाराच्या वेळी आपण जे पॅलेस्टाईनच्या बाजूने जसे उभे राहिलात त्यावर आपणास येणाऱ्या काळात अभिमान वाटेल.” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या ठरावावर पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे.
या संघर्षाची सुरुवात २०११ साली झाली होती. ज्या वेळेस असा ठराव आणण्यासाठी यूनोच्या सुरक्षा समितीमधील १५ सदस्यांपैकी ९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता. म्हणून त्या वेळी हा ठराव पारित होऊ शकला नव्हता. या वेळी १२ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. ब्रिटन आणि स्वित्झरलँड यांनी प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. पण अमेरिकी व्हेटोने या ठरावास निकामी केले. इस्रायलवर दबाव वाढत चालला आहे. तिकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला दोषी ठरवले आहे.
भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने जे मतदान केले आहे त्यामुळे सारे जग अचंबित झाले आहे. त्यांना अशी आशा होती की जरी इस्रायलच्या बाजूने मतदान केले नाही तरी तटस्थ राहिले असते तरी बरे झाले असते. सध्या इस्रायली पंतप्रधान अडचणीत आहेत. त्यांना कधीही अटक करण्याचे आदेश आहेत. त्यांच्याबरोबरच ज्या ज्या लोकांनी पॅलेस्टाईन नरसंहारात भाग घेतला आहे त्यांनासुद्धा अटक केली जाऊ शकते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नेतन्याहू यांच्या कार्यालयात या विषयावर चर्चा होत आहे. नेतन्याहू एकीकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावाखाली आहेत तर दुसरीकडे त्यांना आपल्याच देशातील विरोधाचा सामना करावा लागत आहे. युद्धबंदी लागू करण्याबरोबरच देशात मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा दबाव वाढत चालला आहे.
सध्या इस्रायलमध्ये एका व्हिडिओची खूप चर्चा आहे. हमासने जारी केलेल्या एका व्हिडोओमध्ये एक इस्रायली युद्धकैदी आपल्या यातना मांडतो. “मला बाँबवर्षावाचा धोका आहे,” असे म्हणत तो रडू लागतो. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे इस्रायलच नव्हे तर जगातील इतर देशांमधील ज्यू धर्मिय नेतन्याहू यांचा विरोध करत आहेत. अशाच प्रकारचा दुसरा व्हिडिओसुद्धा एका इस्रायली युद्धकैद्याने जारी केला आहे.
जेव्हा साऱ्या जगात गाजामधील लोकांचा नरसंहार केला जात असताना जगभरातील राष्ट्रे आणि इतर नागरिक नेतन्याहू यांचा विरोध करत आहेत. अशा वेळी संयुक्त राष्ट्रांमधील पॅलेस्टाईनच्या बाजूने मिळालेला पाठिंबा इस्रायलला आणखीनच दुःखदायक ठरतो. याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलच्या प्रतिनिधीने जे वक्तव्य या ठरावावर केले त्यावरून लावला जाऊ शकतो. त्याने ठराव संमत झाल्यावर भाष्य करताना असे सांगितले की “संयुक्त राष्ट्र आता दहशतवादी राष्ट्रांचे स्वागत करताना दिसत आहे.” तो पुढे म्हणतो की “संयुक्त राष्ट्रांची स्थापना खऱ्या अर्थाने या उद्दिष्टासाठी केली गेली होती की नाझी लोकांनी जे अत्याचार केले होते त्याची पुनरावृत्ती कधीही होऊ नये, पण जे काही घडले आहे अगदी त्याच्या उलट आहे. संयुक्त राष्ट्र पॅलेस्टिनी दहशतवादी राष्ट्राच्या स्थापनेला पुढे नेत आहे ज्याचे नेतृत्व आपल्या काळातील हिटलर करत आहे.“
त्यांचा हा दावा खरा असता तर भारतासारख्या देशाने त्या ठरावास पाठिंबा दिला नसता. अमेरिका व्हेटोचा उपयोग करून या ठरावाला संयुक्त राष्ट्रांत मांडायला दिला नसता. या अगोदर २७ ऑक्टोबरला सर्वसाधारण सभेत गाजामध्ये मानवी आधारावर युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला गेला होता तेव्हा १२० राष्ट्रांनी या ठरावाच्या बाजूने आपला कौल दिला होता, तर फक्त १४ राष्ट्रांनी विरोध केला होता आणि ४५ राष्ट्रांनी आपली अनुपस्थिती नोंदवली होती. ही संख्या आता २५ वर आली आहे. एक प्रश्न त्या महाशयांना- इस्रायलचे यूनोमधील प्रतिनिधींना – वाचारावासा वाटतो की इस्रायलच्या स्थापनेत दहशतवादाची कोणती भूमिका होती की फक्त शांततेच्या मार्गाने स्थापना झाली होती? एका अरब देशाचे ज्याचे अस्तित्व शेकडो वर्षांचे होते, त्या देशाला त्या वेळी ब्रिटीश राजवटीने, जे त्यांच्या अधीन होते, एक ठराव संमत करुन इस्रायल राष्ट्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि जगातल्या साऱ्या राष्ट्रांनी अमेरिका आणि ब्रिटीश राजवटीची लाचारी सरत त्या राष्ट्राच्या स्थापनेच्या बाजूने कौल दिला. तो देश आणि त्याचे नागरिक रातोरात आपल्या मायभूमीला मुकले. कुठे जावे त्याचा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांच्या मदतीला कुणी पुढे येत नव्हते.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment