Halloween Costume ideas 2015

ई-पुस्तकांमध्ये सहज प्रवेश, पण वाचनाचा आनंद छापील पुस्तकांतून


जागतिक ज्ञान, आंतरिक शांती, सक्षम मार्गदर्शन, वेळेचा सदुपयोग, प्रेरणा, प्रोत्साहन, मदतनीस, समस्यांचे निराकरण, नवीन चेतना, नावीन्य, जागरूकता, अद्यावतता, उत्तम साथीदार, यश, गुरू, सल्लागार अशा अनेक मौल्यवान गुणांचे सार म्हणजे पुस्तके. आजच्या आधुनिक युगात, यांत्रिक संसाधनांमुळे आपल्याला जगभराशी जुळणे सोपे झाले आहे. सर्वत्र माहितीचा महापूर आला आहे. पुस्तके हे ज्ञानाचे मुख्य स्त्रोत आहेत असे म्हणतात, जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकांचा सहवास आवश्यक आहे. पुस्तके मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत निःस्वार्थ साथीदार बनून यशाचा मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. पुस्तकांशी मैत्री करणारा माणूस नेहमी आनंदी आणि ज्ञानी बनून राहतो, ज्यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात. इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तकं फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत, आपल्याला पाहिजे तेव्हा आणि कुठेही आपण ई-पुस्तके वाचू आणि संग्रहित करू शकतो.

पुस्तकांचे महत्त्व समजून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी जगभरात “जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन” साजरा केला जातो. या वर्षी २०२४ ची थीम आहे “रीड योर वे”, जी वाचनाची आवड वाढवण्यासाठी निवड आणि आनंदाच्या महत्त्वावर भर देते. आयुष्यात पुस्तकांचे स्थान अतुलनीय आहे, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. ज्याला पुस्तकांचे महत्त्व कळले आहे तो आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. पुस्तकांच्या मदतीने आपण जगाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम स्थान प्राप्त करू शकतो.

सतत पुस्तके वाचण्याची सवय माणसाच्या जीवनाचा विकास करते. वाचनाने मेंदू तल्लख होऊन स्वविचार करत काही नवीन ज्ञान शोधण्याची शक्ती आपल्याला मिळते. वाचन सुरू ठेवल्याने आपण हुशार बनतो. लेखन कौशल्य, भाषा कौशल्ये सुधारतात, लक्ष केंद्रित आणि एकाग्रता वाढते, आपण जीवनात अंधारातून प्रकाशाकडे जातो, आपण आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतो, नवीन माहिती आणि ज्ञान मिळवू शकतो, वाचनामुळे तणाव कमी होतो, आपण नेहमी सजग आणि सतर्क राहतो आणि वाचनामुळे आपल्याला चांगली झोप लागते. स्मृतिभ्रंशापासून बऱ्याच प्रमाणात आपण दूर राहतो. 

डिजिटलायझेशनमुळे, प्रत्येकजण त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पुस्तके ऑनलाइन वाचू शकतो, ऑनलाइनद्वारे आपण जगाशी नेहमीच जोडलेले राहतो. वाचकांच्या आवडीनुसार जगभरातील विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक प्रकाशक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, ईबुक विक्रेते, सरकारी पोर्टल व इतर त्यांच्या वेबसाइटवर डिजिटल स्वरूपात पुस्तके अपलोड करतात, जेणेकरून ई-पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचू शकतील. आता तर वाचनाचा वेळ वाचवण्यासाठी सुद्धा डिजिटल मार्केटमध्ये ऑडिओ बुक्सही उपलब्ध आहेत. 

ई-पुस्तके अगदी सहज उपलब्ध आहेत, पण ती छापील कागदी पुस्तकांची जागा घेऊ शकत नाहीत. बरेच लोक ऑनलाइन पुस्तके डाउनलोड करतात, परंतु फार कमी लोक ती पूर्णपणे वाचतात. ही ई-पुस्तके आपल्याला कागदी पुस्तकांप्रमाणे वाचण्यास प्रवृत्त करत नाहीत, जेव्हाकी ह्या बऱ्याचदा त्रासदायक वाटतात. कागदी पुस्तकांच्या विपरीत, ई-पुस्तकांमध्ये आसक्ती किंवा प्रेरणा नसलेली दिसते, आपण स्वतःला त्यांच्याशी भावनिकरित्या जोडू शकत नाही. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कागदी पुस्तके मुख्य सहायक असतात. ई-पुस्तकांमध्ये, आपण बहुतेक मर्यादित माहिती वाचतो आणि नंतर पुष्कळदा ती विसरतो. तर कागदी पुस्तकात वाचताना आपण विषयाच्या खोलात जाऊन समस्येवर उपाय शोधतो, संपूर्ण पुस्तक वाचतो, त्यामुळे पुस्तकातील संपूर्ण ज्ञान आपल्या नेहमी लक्षात राहते आणि पुस्तकाचा देखील उद्देश हाच आहे की त्याच्या ज्ञानाचा संपूर्ण लाभ वाचकांपर्यंत पोहोचावा.   तर बहुतेक वाचक ई-पुस्तकांमध्ये केवळ उपयुक्त माहिती शोधतात, तांत्रिक बिघाड ही देखील एक समस्या आहे आणि त्याही मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यातून ई-कचरा पर्यावरणासाठी धोकादायक पातळी पर्यंत पोहोचला आहे.

ज्याला वाचाता येत, तो गरीब असला तरी तो कुठेही पुस्तके वाचू शकतो, सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन तिथली पुस्तके वाचू शकतो. परंतु ई-पुस्तके वाचण्यासाठी विशेष यांत्रिक संसाधने आणि कौशल्ये आवश्यक आहेत, ज्यासाठी आर्थिक खर्च आणि थोडेफार प्रशिक्षण आवश्यक आहे, जसे:- संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वीज, इंटरनेट आणि तांत्रिक प्रशिक्षण. तर कागदी पुस्तकांमध्ये या गोष्टी आवश्यक नाहीत. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना पेपर बुकच्या माध्यमातून शिकवणे सोपे जाते, तर ई-बुक्स द्वारे शिकवण्यासाठी प्रोजेक्टरचा खर्च उचलावा लागतो. 

पुस्तकांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन करताना लक्ष, मन आणि डोळे पुस्तकावर केंद्रित करावे लागतात. परंतु इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्याने काही काळानंतर तणाव, डोकेदुखी, दृष्टीदोष सारख्या समस्या जाणवू लागतात, कारण संगणकाची स्क्रीन दृष्टीवर परिणाम करते. ई-पुस्तकांची सहज उपलब्धता, वेळेची बचत आणि सहज साठवणूक असूनही, पुस्तकांमध्ये असलेले संपूर्ण ज्ञान वाचकांनी आत्मसात करणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश कागदी पुस्तकांच्या तुलनेत ई-पुस्तकांमध्ये पूर्णता दिसून येत नाही. ई-पुस्तक वाचन हे गंभीर काळात किंवा अल्प कालावधीसाठी वरदान आहे, परंतु दीर्घकाळापर्यंत ते शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण करू शकतात. यांत्रिक उपकरणांच्या सतत वाढत्या वापरामुळे आपण त्या साधनांवर अवलंबित झालेले आहोत, आता आपल्याला आपल्या प्रियजनांचे मोबाईल नंबरही आठवत नाहीत. ह्या मुळे आपली विचारशक्ती- स्मरणशक्ती क्षीण होत आहे, आधुनिकतेचा हा खूप मोठा दोष आहे. आजपर्यंत, कोणत्याही संशोधनात किंवा सर्वेक्षणात छापील पुस्तके वाचल्यामुळे कोणत्याही समस्या किंवा हानी झाल्याचे दिसले नाही, परंतु कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या समोर आल्या आहेत.

ई-पुस्तके आणि छापील पुस्तके यातील निवड हा शेवटी आपला वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जेव्हा आपण जागतिक स्तरावर वाचकांची पसंती पाहतो, तेव्हा जगभरातील वाचकांच्या हृदयात छापील पुस्तकांसाठी विशेष स्थान दिसून येते, जेव्हा की ई-पुस्तकांचे वेगळे फायदे आहेत. आता वाचकांनी या दोघांच्या संभाव्य गुण-दोषांची जाणीव ठेवावी आणि आपल्या मागणीनुसार समतोल साधावा, जे आपल्या वैयक्तिक गरजा आणि वाचनाच्या आवडीनिवडींसाठी उत्तम आहे.


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget