माणूस आपल्या जीवनप्रवासात चूकीच्या मार्गांवर का भटकत फिरतो? त्याला सन्मार्गाची वाट का सापडत नाही? कारण या सृष्टीबद्दल त्याच्या संकल्पना स्पष्ट नाहीत. आपल्या निर्मात्याबद्दल त्याच्या श्रद्धा खऱ्या नाहीत आणि स्वतःच्या जीवनाबद्दलही तो योग्य दृष्टिकोन ठेवत नाही. काही लोकांना असे वाटते की या सृष्टीचा कुणीही निर्माता नाही. सृष्टीची ही व्यवस्था, यातील जीवन आणि जे काही इथे आहे ते निव्वळ योगायोगानेच अस्तित्वात आल्याचे त्यांना वाटते. अशा माणसांना सृष्टीच्या रचनेत कोणतेही कौशल्य दिसत नाही आणि त्याच्या नियोजनातही कोणतेही चातुर्य, हिकमत दिसत नाही.
जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांच्यामध्येही जगभरात वेगवेगळ्या समजुती व श्रद्धाभाव आढळतात. काही लोक हा विचार बाळगतात की सृष्टीच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या व्यवस्थापनात एकापेक्षा जास्त अस्तित्वांचा सहभाग आहे. त्यांना वाटते की निर्माता वेगळा आहे आणि संचालक वेगळा आहे. काही लोक ज्ञानदेवता म्हणून एकाची उपासना करतात आणि सुखकर्ता व दुःखहर्ता म्हणून दुसऱ्याला पूज्य समजतात. काही लोकांमध्ये सुर्यदेवता आणि जलदेवता यांना वेगवेगळे ईश्वर मानले जाते आणि एक देव वाऱ्यांचा तर दुसरा देव ढगांचा असल्याचे सांगितले जाते. अल्लाहच्या हजारो पैगंबरांनी लोकांच्या खोट्या श्रद्धा व चूकीच्या समजुती दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लोकांना ईश्वराचे अस्तित्व आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांशी संबंधित योग्य शिकवण देण्यासाठी जीवनभर आपले सर्वस्व पणाला लावले, त्या सर्व पैगंबरांच्या शृंखलेतील अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) हे आहेत. ज्यांनी मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहचा अंतिम ग्रंथ पवित्र कुरआन आणि त्यानुसार आपले जीवनचरित्र जगासमोर ठेवले, ज्यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाची खरी शिकवण आणि संपूर्ण जीवनव्यवस्थेचा सन्मार्ग आहे. ईश्वराचे अस्तित्व आणि त्याच्या गुण-वैशिष्ट्यांशी संबंधित योग्य दृष्टीकोन व श्रद्धा ठेवण्यावर कुरआनमध्ये सर्वाधिक जोर देण्यात आला आहे. पवित्र कुरआन हा ग्रंथ नास्तिक व बहुदेववाद्यांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देतो आणि त्यांना भटकंतीच्या मार्गांपासून दूर करून सन्मार्ग दाखवतो. एक गोष्ट नीटपणे समजून घेतली पाहिजे की अल्लाहने लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी जी पैगंबरीय शृंखला चालवली ती अल्लाहची सर्वात मोठी कृपा आहे. अन्यथा, अल्लाहचे ईशत्व त्याच्या स्वतःच्या जोरावर प्रस्थापित आहे, ते कुणी स्वीकारो अथवा न स्वीकारो, त्यामुळे अल्लाहच्या महानतेत व वैभवात काहीही फरक पडत नाही. तथापि, ईश्वराला नाकारून किंवा अनेकेश्वराची श्रद्धा ठेवून माणूस आपल्याच विनाशाची व्यवस्था करतो.
नास्तिक व बहुदेववादी माणसाचा जीवनप्रवास चुकीच्या दिशेने असतो. परिणामी माणूस आपल्या सांसारिक जीवनातही मनःशांती हरवतो आणि कधीही न संपणाऱ्या मरणोत्तर जीवनातही संकटात सापडतो. यातून मानवजातीला वाचवण्यासाठी पवित्र कुरआन वारंवार सावध करतो. हा ग्रंथ अशा संकेतांकडे माणसाचे लक्ष वेधतो जे ईश्वराचे अस्तित्व आणि त्याच्या एकत्वाचे पुरावे देतात. याबरोबर त्या ईश-कृपांकडेही लक्ष वेधतो, ज्या कृपा माणसाच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. पवित्र कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की,
या’अय्युहन्नासुज्-कुरू निअ्-म-तल्लाही अलय्-कुम्, हल् मिन् खालिकीन गय्-रुल्लाही यर्-जुकु-कुम्-मिनस्-समाइ वल्-अर्जि, ला इला-ह इल्ला हु-व, फअन्-ना तुअ्-फकू-न
अनुवाद :- लोकहो! तुम्हांवर असलेल्या अल्लाहच्या कृपांची आठवण ठेवा, अल्लाहशिवाय कुणी निर्माता आहे का? जो तुम्हाला आकाशातून आणि जमीनीतून उपजीविका प्रदान करतो? अल्लाहशिवाय कुणीही उपास्य नाही, मग तुम्ही कुठे भरकटत आहात? ( 35 फातिर् : 3 ) या आयतीमध्ये त्या कृपांकडे लक्ष वेधले गेले आहे ज्यांचा लाभ माणसाला क्षणोक्षणी होत आहे. इतकेच नव्हे तर त्या कृपांमुळेच संपूर्ण मानवजात जिवंत आहे. त्या सर्व कृपांपैकी फक्त ’पाऊस’ या कृपेचा विचार करा, जो सर्व सजीवांच्या उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आकाशातून बरसणारा पाऊस जमीनीत शोषला जातो आणि त्यामुळे सर्वांच्या रोजीरोटीची व्यवस्था होते. या पर्जन्य व्यवस्थेचा विचार केला तर त्यामध्ये अल्लाहने नेमलेले अनेक घटक काम करताना दिसतात. पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले ते सर्व घटक आणि ती प्रक्रिया संपूर्णपणे त्या एकाच ईश्वराच्या अधिकारात व नियंत्रणात आहे, जो सर्वांचा निर्माता आहे. बहुदेववाद्यांच्या काल्पनिक देवतांची त्यात कोणतीच भूमिका नाही. पावसासाठी सुर्य, जल, वायू व इतर आवश्यक असलेले घटक वेगवेगळ्या देवांच्या हाती असते तर पर्जन्य व्यवस्थेची कल्पनाही करणे शक्य झाले नसते. या आयतीमध्ये म्हटले गेले आहे की ज्याने तुम्हाला निर्माण केले तोच आकाश आणि जमीनीतून तुमच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करतो. तोच तुमचा एकमेव ईश्वर आहे, त्याच्याशिवाय अन्य कुणीही ईश्वर नाही. तोच तुमचा एकमेव पालनकर्ता, स्वामी आहे. त्याच्या कृपांकडे बघा आणि विचार करा की तुमच्यावर कृपा करणाऱ्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे? आणि काय असायला हवा? लोकहो! आपल्या निर्मात्याचे उपकार विसरू नका आणि खाल्ल्या मिठाला जागा. एकमेव ईश्वर, अल्लाहशिवाय इतर कुणाचीही भक्ती, आज्ञापालन व उपासना करू नका. ईश्वराच्या अस्तित्वात व गुण वैशिष्ट्यात कुणाला सहभागी समजणे आणि त्याच्या हक्कात व अधिकारात कुणाला सामील करणे हे महापाप व घोर अन्याय आहे. हे महापाप कधीही माफ केले जाणार नाही, असे खुद्द विश्व निर्मात्यानेच जाहीर केले आहे. याला अपवाद फक्त ते लोक आहेत ज्यांना मृत्यूपुर्वी आपल्या धारणेबद्दल पश्चात्ताप झाला आणि त्यांनी मरण्यापूर्वी क्षमायाचना करून एकेश्वरत्व स्विकारले.
लोकहो! ईश्वराच्या कृपांची जाणीव ठेवा आणि हे सत्य विसरू नका की तुमच्याकडे जे काही आहे, ते फक्त एकमेव ईश्वर, अल्लाहने दिलेले आहे. दुसऱ्या शब्दांत, या आयतीमध्ये म्हटले गेले आहे की जो कुणी अल्लाहशिवाय इतर कुणाची उपासना, भक्ती व आज्ञापालन करतो, कठीण परिस्थितीत खऱ्या ईश्वरासमोर याचना करतो पण कृपा प्राप्त झाल्यावर अल्लाह व्यतिरिक्त इतर कोणाची तरी देणगी मानतो आणि अल्लाहशिवाय इतर कुणाचे आभार मानत त्याच्यासमोर नतमस्तक होतो, असा माणूस महाकृतघ्न आहे.
..... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment