(४६) आणि त्यांच्या हृदयावर असे आवरण घालतो की त्यांना काही समजत नाही, आणि त्यांचे श्रवणेंद्रिय बधिर करतो.२० आणि जेव्हा तुम्ही कुरआनमध्ये आपल्या एकमेव पालनकर्त्याचा उल्लेख करता तेव्हा ते तिरस्काराने तोंड फिरवितात.२१
२०) म्हणजे कुरआन जे आवाहन करीत आहे त्यासाठी माणसाच्या मनावर कुलपे लागावीत व त्याने कान बंद करावेत, हा परलोकावर ईमान न आणण्याचा स्वाभाविक परिणाम होय. कुरआनचे तर आवाहनच या आधारावर आहे की या जगात जीवनाच्या दर्शनी अंगाला पाहून फसू नका. सत्य व असत्याचे निर्णय या जगात नव्हे तर परलोकात होतील. पुण्य ते आहे ज्याचा इष्ट परिणाम परलोकात निघेल, मग या जगात त्यामुळे माणसाला कितीही त्रास का होत नाही. दुष्टाई ती आहे जिचा परिणाम परलोकात खचितच वाईट निघेल, मग या जगात ती कितीही रुचकर आणि उपयुक्त का असत नाही. आता जो इसम परलोकच मानत नाही तो कुरआनच्या सदरहू आवाहनाकडे कसे लक्ष देऊ शकतो बरे?
२१) म्हणजे तुम्ही एकमेव अल्लाहलाच केवळ स्वामी व मुखत्यार ठरविता व त्याचेच स्तुतिगान करता. ही गोष्ट त्यांना अत्यंत असह्य होते. ते म्हणतात, हा अजब माणूस आहे ज्याच्याजवळ परोक्षज्ञान आहे तर अल्लाहला, सामर्थ्य आहे तर अल्लाहचे, कृती आणि अखत्यार आहेत तर बस्स केवळ एक अल्लाहचेच? अहो, आमचे हे ठाणकाधिष्ठित (देवीदेवता), ज्याच्याकडून आम्हाला संतती प्राप्त होते, आजार्यांना रोगमुक्ती लाभते, व्यापार-धंदे चमकू लागतात, केलेले नवस पूर्ण होतात, यांनाही काही महत्त्व आहे की नाही?
Post a Comment