न्यायाच्या तेजस्वी घटना
काही लोक एका व्यक्तीला धरून काझीच्या (न्यायाधीश) दरबारात दाखल झाले.
काझीने त्यांच्याकडे पाहून विचारले, “हे काय? या माणसाला असे धरून का आणले?”
ते लोक म्हणाले, “ह्या व्यक्तीवर आमचे कर्ज आहे. आम्ही कर्ज फेडण्यास सांगत आहोत, परंतु हा टाळाटाळ करत आहे. कर्ज फेडत नाहीये!”
न्यायमूर्तींनी कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
कर्जदार म्हणाला, “पालनकर्ता, न्यायाधिशांचे भले करो. ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे एक इमारत आहे, जी मी भाड्याने दिली आहे. थोड्याच दिवसांत मला भाडे मिळणार आहे. हे भाडे मिळेपर्यंत मला मुदत द्यावी. भाडे मिळाले की मी सर्वांचे कर्ज परत करीन.”
न्यायमूर्तींनी कर्जदाराला पकडून आणणाऱ्यांना विचारले की, “ते मुदत देण्यास तयार आहेत का?”
ते सर्व एका सुरात म्हणाले, “अल्लाहची शपथ! आमच्या माहितीनुसार, त्याच्याकडे कोणतीही इमारत किंवा मालमत्ता नाही. तो फक्त त्याच्यावर आलेले संकट टाळण्यासाठी खोटे बोलत आहे. तो गरीब आणि दरिद्री असून पूर्णपणे दिवाळखोर झालेला आहे.”
त्या लोकांचे म्हणणे ऐकून न्यायाधीश त्या गरीब माणसाकडे वळले आणि म्हणाले, “तुमची मुक्तता करण्यात येत आहे. आता तुम्ही जाऊ शकता. निर्णय तुमच्या बाजूने आहे, तुम्हला कर्ज फेडण्याची गरज नाही.”
हा निर्णय ऐकून ‘त्या’ लोकांना धक्काच बसला. ते म्हणाले, “हा कसला बरं न्याय! याला न्याय म्हणता येणार नाही.”
न्यायाधीश म्हणाले, “तुम्ही स्वतः कर्जदाराबद्दल साक्ष दिली आहे की त्याच्याकडे कोणतीच इमारत नाही, उलट, तो गरीब आणि दरिद्री आहे, तो दिवाळखोर झालेला आहे. तेव्हा हे स्पष्ट आहे, कोणी दिवाळखोर झाल्यावर कर्जाची रक्कम कुठून भरणार?”
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 158)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment