पवित्र कुरआनने अनेक ठिकाणी एकमेव ईश्वर, अल्लाहच्या अफाट शक्ती व असीम सामर्थ्याचे वर्णन केले आहे. याशिवाय निर्मितीतून ज्या ज्या शक्ती ईश्वराच्या अस्तित्वात सामील असल्याचे सांगितले जाते, ज्यांना ईश्वराच्या हक्कांत व अधिकारांत सहभागी समजले जाते, ईश्वराच्या गुण-सामर्थ्यात ज्यांना समतुल्य मानले जाते, ते सर्व दुर्बल व लाचार निर्मिती असल्याचे या ग्रंथाने सिध्द केले आहे. याबरोबर मानवी गरजांच्या संदर्भात अल्लाहच्या त्या असंख्य कृपांचा उल्लेख यामध्ये आहे, ज्यांचा लाभ घेतल्याशिवाय जगण्याला पर्याय नाही. माणूस पुर्णपणे विश्व निर्मात्याच्या कृपांवर अवलंबून आहे, तरीही तो बेभानपणे जगतो, बेजबाबदारीने वागतो, म्हणून त्याच्या आचार-विचारांवर हा ग्रंथ टीका करतो. एकीकडे जीवनातील टप्प्याटप्प्यावर माणूस आपल्या निर्मात्यासमोर लाचार व गरजू म्हणून उभा आहे आणि दुसरीकडे त्याची मनमानी व बंडखोरी आहे. जणू काही त्याला आपल्या कृपाळू व क्षमाशील निर्मात्याची गरजच नाही. लोकांच्या या बेपर्वाईकडे लक्ष वेधताना आणि माणसांना त्यांची जागा दाखवताना विश्व निर्मात्याने म्हटले आहे की, ’या’अय्युहन्नासु अन्तुमुल्-फुकरा’उ इलल्लाहि, वल्लाहु हुवल्-गनिय्युल्-हमीदू.’
अनुवाद :- लोकहो! तुम्हीच अल्लाहचे गरजवंत आहात, आणि अल्लाह तर गरजमुक्त व सदैव स्तुत्य आहे. ( 35 फातिर् - 15 )
या आयतीमध्ये अल्लाहने मानवजातीला जोरदार चेतावणी देत संबोधित केले आहे की, लोकहो! कान उघडा आणि नीट ऐका. आदरणीय पैगंबरांनी जे मार्गदर्शनपर ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचविले, शिक्षण व संस्कारांची जी मांडणी केली आणि तुम्हाला जागे करण्यासाठी जे रात्रंदिवस एक केले, ते यासाठी मुळीच नाही की तुमच्या श्रद्धा आणि विश्वास ठेवण्यावर ईश्वराचे काही काम अडलेले आहे. ईश्वराला तुमची गरज नाही. उलट तुम्हालाच या जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही त्याची गरज आहे. तो तर ’गनी’ आहे, म्हणजे साऱ्या विश्वांचा ’धनी’ असल्यामुळे तो गरजमुक्त आहे. कोणत्याही गैरसमजुतीत राहू नका. काय वाटते तुम्हाला? जर तुम्ही त्याला ईश्वर म्हणून स्वीकारले नाही तर त्याचे ईशत्व चालणार नाही का? आणि तुम्ही त्याचे गुणगान केले नाही तर त्याचे वैभव कमी होणार आहे का? मुळीच नाही. वास्तविक पाहता तो ’हमीद’ आहे, म्हणजे स्वयं सदासर्वदा स्तुत्य आहे. जगात जे काही वैभव, सौंदर्य दिसून येते, ज्या ज्या सामर्थ्यांची व शक्तींची जाणीव होते, त्या सर्वांचा मूळ स्त्रोत अल्लाह आहे. कोणी त्याची स्तुती करो अथवा न करो, त्याचे सृजनात्मक व रचनात्मक कार्य, हेच त्याच्या स्तुतीचे बोलके चित्र आहे, म्हणूनच प्रत्येक स्तुती, प्रशंसा फक्त त्याच्यासाठीच आहे. खरे पाहता तुम्हाला ईश्वराची गरज आहे. जर त्याने तुमच्या जगण्याची साधने रोखून धरली तर तुमचे जीवन उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्याने ठरवले तर तो तुम्हां सर्वांचा नाश करू शकतो आणि तुमच्या जागी दुसरी निर्मिती उभारू शकतो आणि हे करणे त्याच्यासाठी अजिबात अवघड नाही. तुम्ही एवढा अधर्मीपणा दाखवत असताना आणि कृतघ्नतेने वागत असतानाही ईश्वर तुम्हाला संधी देत आहे. ही तर केवळ त्याची कृपा आणि उपकार आहेत तुमच्यावर. या संधीचा लाभ घ्या, हेच तुमच्या भल्याचे आहे. अन्यथा लक्षात ठेवा की तुमच्या अवज्ञेमुळे अल्लाह किंवा त्याच्या पैगंबरांना कोणतीही हानी पोहोचणार नाही, नाश तुमचाच होईल. तुम्हाला त्याच्या आज्ञापालनाचा जो आदेश दिला गेला आणि फक्त त्याचीच भक्ती, उपासना करण्यासाठी जे प्रेरित केले जात आहे, ते फक्त यासाठी की त्यावरच तुमच्या सांसारिक आणि मरणोत्तर जीवनाचे यश अवलंबून आहे.
....... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment