Halloween Costume ideas 2015

पुण्याचा अपघात; दोघांचा मृत्यू आणि व्यवस्थेचे धिंडवडे


मुंबईमध्ये होर्डिंग पडल्याने त्याखाली 16 जणांचा चेंगरून मृत्यू झाल्याची बातमी विस्मरणात जाण्याच्या आधीच मागच्या आठवड्यात पुण्यात मस्तीत घडवून आणल्या गेलेल्या अपघातामध्ये दोघांच्या करूण अंताची बातमी येवून ठेपली. या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्हीमध्ये प्रशासकीय व्यवस्थेचे धिंदवडे निघालेले आहे. मुंबईत लावलेला होर्डिंग सगळ्यांना दिसत होता. तो विनापरवानगी लावण्यात आलेला होता. सरकारमान्य आकाराच्या 9 पट मोठा होता तरी सर्व गप्प होते. हे मुंबईतील प्रशासकीय व्यवस्थेचे पाप होते. पुण्यातील अपघात 17 वर्षे 8 महिन्याच्या वेदांत अग्रवाल या तरूणाने केला. या घटनेनंतर पुण्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. वेदांत हा विशाल अग्रवाल, (मालक ब्रह्म रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर) या बड्या कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे. 12 वीची परीक्षा संपल्यानंतर वेदांतने आपल्या मित्रांबरोबर पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका पबमध्ये परीक्षेचा क्षीण घालविण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. त्या ठिकाणी त्यांनी 90 मिनीटात 80 हजार रुपयांची दारू ढोसली. ऑनलाईन पेमेंट केले आणि बापाने नुकत्याच घेतलेल्या पोर्शे कंपनीच्या दोन कोटी रूपये किंमतीच्या कारमध्ये ड्रायव्हरला हटवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून ताशी 200 किलोमीटर वेगाने गाडी चालविली आणि स्कूटवर जाणार्या 24 वर्षीय इंजिनिअर अनिश अवधीया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोष्ठा दोघांना एवढी जबरदस्त धडक दिली की दोघांचाही मृत्यू झाला. या गाडीचे पुण्यात रजिस्ट्रेशन झालेले नव्हते. याचा अर्थ वाटसरूंनी वेदांतला डायव्हिंग सीटवरून ओढून पोलिसांच्या स्वाधीन केले नसते तर वेदांत कधीच पोलिसांच्या हाती लागला नसता. अपघात ड्रायव्हरच्या नावावर खपवला गेला असता हे सांगण्याची कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. वेदांतला पोलिस स्टेशनमध्ये मिळालेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटचे सुरस किस्से एव्हाना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने पोलिसांनी आता कुठे कडक भूमिका घेतली आणि या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यात विशाल अग्रवाल यांचा सुद्धा समावेश आहे. 

या घटनेचे विश्लेषण

या घटनेची दखल घेऊन आघाडीच्या अनेक वर्तमानपत्रांनी संपादकीय लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात अनेक व्हिडीओज युट्यूबवर आले आणि प्रश्न विचारू लागले. सर्वांनी पोलिस, न्याय आणि आरटीओ विभागावर मनसोक्त शाब्दीक प्रहार केले. भ्रष्ट व्यवस्थेवर टिका केली. परंतु, एकानेही अशा अपघातांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविलेली नाही. कारण तशी योजनाच कोणाकडे उपलब्ध नाही. ती फक्त इस्लामकडे उपलब्ध आहे ती कशी? हे आपण पाहूया. 

या घटनेचे इस्लामी दृष्टिकोणातून विश्लेषण

मुंबईचा होर्डिंग अपघात असो की पुण्याचा पोर्शेकारद्वारे झालेला अपघात असो ह्या घटना सिंगलआऊट करून पाहता येण्यासारख्या नाहीत. कारण ह्या काही एकदोन घटना नाहीत. तर मुंबईमध्ये होर्डिंग तुटण्यापासून रेल्वेचे पूल  कोसळण्यापर्यंतच्या अनेक घटना झालेल्या आहेत आणि भविष्यात होणार आहेत. केवळ भ्रष्ट व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडून अशा घटना थांबणार नाहीत. पुण्याचा अपघात सुद्धा बेदरकार प्रवृत्तीनी केलेला एकुलता एक अपघात नसून सलमानखान पासून संजीव नंदा पर्यंत मस्तीत केलेल्या अशा अपघाताची एक न संपणारी शृंखलाच आपल्या देशात आहे. या घटना करणाऱ्या लोकांना किंवा प्रशासनाला दोष देऊन यावर उपाय करता येणार नाही. या घटना घडविण्यामागे जी प्रवृत्ती लपलेली आहे तिच्यावर उपाय करावे लागतील. ते कसे ते आपण पाहूया.

अलिकडे जेवढ्या वेगाने संपत्ती निर्मितीची नवनवीन साधने निर्माण झालेली आहेत आणि जेवढ्या गतीने संपत्ती निर्माण होत आहेत इतिहासात एवढ्या प्रमाणात आणि गतीने कधीच संपत्ती निर्माण झालेली नव्हती. मात्र या ठिकाणी एक गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाही ती म्हणजे संपत्तीच्या निर्मितीबरोबर समाजाची नैतिक अधोगती वाढत आहे. याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे. हा फक्त अपघाताचा विषय नाही तर काहीही करून पैसा कमावण्याचा, नशा करण्याचा, आर्थिक विषमतेचा, असंतुलित विकासाचा, पाल्यावर संस्कार करण्याचा आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षावर नैतिक बंधने लादण्याचा विषय आहे. भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची नैतिक बंधने लादण्याला विरोध आहे. या ठिकाणी असिमित  स्पर्धा करून कुठल्याही परिस्थितीत संपत्ती गोळा करण्याला मान्यता आहे. म्हणूनच या व्यवस्थेमध्ये मद्य तयार करणारे, विक्री करणारे आणि पिणारे. या सगळ्यांनाच समाजमान्यता आहे. सरकारलाही यात काही वाईट वाटत नाही. उलट सरकार अनैतिक धंद्यांवर कर लावून त्यांच्याकडून महसूल गोळा करण्यातच समाधानी आहे. म्हणूनच बार, पब, लॉटरी ,(खरे तर जुगाराचे अड्डे), डान्सबार इत्यादींवर सरकार कर लादते. या सर्वातून समाजाची किती हानी होते याशी सरकारचे काही देणेघेणे नाही. 

प्रसिद्ध इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात,  सामाजिक व्यवस्थेची सुत्रे जेव्हा अभद्र लोकांच्या हाती एकवटतात  तेव्हा समाज ईश्वर विरोधी मार्गावर चालू लागतो. यामुळे व्यक्ती आणि समुह दोघांनाही चुकीच्या मार्गावर चालणे इतके सोपवे होऊन जाते की, त्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना स्वतःला काही शक्ती लावावी लागत नाही. व्यवस्था त्यांना वाममार्गावर चालण्यासाठी स्वतः मदत करत असते. हां मात्र ! नैतिक मार्गावर चालण्यासाठी कोणी आपली सर्वशक्ती जरी लावत असेल तरी वाममार्गाला लागलेल्या लोकांचा रेटा इतका प्रचंड असतो की नैतिक लोाकंच्या शक्तीचा विरोध तो इतक्या जोरदार पदधतीने मोडून काढतात की असे नैतिक लोक मैलोगणिक मागेे ढकलले जातात. संदर्भ : इस्लामी निजामे जिंदगी और उसके बुनियादी तसव्वुरात. (पेज नं. 1470

जेव्हा मानवतेचा वास्तविक सार नैतिकता असते तेव्हा हे मान्य केले पाहिजे की मानवी जीवनाच्या निर्मिती आणि विनाशाचा निर्णय नैतिक आधारावरच घेतला जावू शकतो. आणि नैतिक नियमानुसारच मनुष्य जातीचे उदय आणि पतन ठरत असते. माणसाला इतर जीवांपासून वेगळे करणारे वैशिष्ट्य म्हणजे त्याला नीति आणि अनीति, चांगले-वाईट याच्यातील फरक समजतो. इतर जीवांना तो समाजत नाही. म्हशीला कळत नाही नैतिक काय आहे अनैतिक काय आहे. अशा परिस्थितीत मानव जर जनावरांसारखा वागायला लागला तर असे अपघात होतच राहणार. त्यांना रोखण्याची क्षमता सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नाही. कारण ज्या दर्जाची नैतिकता अशा अपराधांना रोखण्यासाठी लागते त्याचा लवलेशसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांमध्ये नाही. मुख्य गोष्ट जी माणसाला खाली खेचते किंवा वर आणते आणि समाजाचे भविष्य घडविण्यात किंवा नष्ट करण्यात सर्वात मोठी भूमिका निभावते ती म्हणजे नैतिक शक्ती होय. हीच शक्ती भारतीय समाज हरवून बसलेला आहे. दुःख या गोष्टीचे आहे की, यामध्ये कुरआनसारखा दिव्य ग्रंथ ज्यांच्याकडे आहे तो मुस्लिम समाजही यात सामील आहे. 

आपला देश एक असा अजब देश आहे की तो जगात एकीकडे संपत्तीच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आहे तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक गरीब लोक आपल्याच देशात राहतात. चमकदार, टोलेजंग इमारतींना खेटूनच लाखोंची झोपडपट्टी असल्याचे चित्र कोणत्याही महानगरात पहावयास मिळते. ही प्रचंड विषमता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि याची परवा सरकारसह कोणालाच नाही. ज्या समाजात श्रीमंतांना गरीबांची परवा नसते तो समाज प्रगती करू शकत नाही. आपल्या देशात हीच दुर्दैवाची बाब आहे. विशेष म्हणजे राजे रजवाडे, नवाब आणि संस्थानिकांच्या काळात सुद्धा देशात जेवढी विषमता नव्हती तेवढी आज लोकशाहीत आहे. 

आपल्या बहुसंख्य नागरिक आणि राजकीय लोकांची समज सुद्धा एवढ्या शालेय स्तराची आहे की, ही गोष्ट आर्थिकदृष्ट्या लाजीरवाणी आहे तीचा सुद्धा त्यांना उपलब्धी म्हणून मिरवण्यामध्ये काही वावगे वाटत नाही. याचे ताजे उदाहरण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाद्वारे केला जाणारा प्रचार आहे. ते अतिशय अभिमानाने सरकार 80 कोटी लोकांना दर महिन्याला 5 किलो धान्य मोफत देते. म्हणून प्रचार करत आहे. या गोष्टीची लाज पक्षालाही वाटत नाही आणि जनतेलाही वाटत नाही की गेल्या 76 वर्षाच्या लोकशाहीमध्ये सर्व सरकारांनी मिळून 80 कोटी लोकांना एवढेही आत्मनिर्भर केले नाही की, त्यांना स्वतःचे धान्य सन्मानाने स्वतः विकत घेता यावे. मोफत धान्य घेणार्यांच्या आत्मसन्मानाचे काय? हा प्रश्न कोणी विचारत नाही यातच सर्वकाही आले. 

देशाच्या अर्ध्या म्हणजे 70 कोटी लोकसंख्येकडे राष्ट्रीय संपत्तीचा केवळ 13 टक्के वाटा आहे. जो की इतिहासातील आजपावेतो सर्वात निच्चांक आहे. 1820 साली देशाच्या तत्कालीन लोकसंख्येच्या 70 टक्के लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा 16 टक्के वाटा होता. (संदर्भ : लुकास काऊन्सेलेट एएल 2022, वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2022. तसेच वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब युएनडीपी पान क्र. 197).

आपल्या देशात अब्जावधी मुल्याची संपत्ती निर्माण होते. मात्र ती 20 ते 22 किंवा फार तर शे-दोनशे लोकांच्या हातातच गोळा होते. हे चित्र भयावह आणि भविष्यात वर्गकलहाला आमंत्रण देणारे ठरेल, यात शंका नाही. अशा अमाप संपत्तीचा काही फायदा जर गरीबी निर्मुलनासाठी होत नसेल तर अशा वांझोट्या आर्थिक प्रगतीला देशाची सर्वांगीण प्रगती समजणे मुर्खपणाचे लक्षण आहे. हे नैसर्गिकरित्या होत नाही तर भांडवलशाहीमध्ये ठरवून केले जाते. ठरवून अशी विषमता निर्माण केली जाते. समाजामध्ये मजुरांचा एक समुह कायम अस्तित्वात राहायला हवा ज्यामुळे कारखानदारी चालू रहावी. या हेतूने काही विशिष्ट समाजघटकांना भांडवलशाही व्यवस्थेत ठरवून मागे ठेवले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी शाळा आणि रूग्णालये मुद्दामहून बकाल करून ठेवली जातात. त्यामुळे गरीब अधिकच गरीब होत जातो. भांडवलशाहीचा हा पैलू फक्त लोकशाही विरोधीच नसून अमानवीय सुद्धा आहे. या उलट इस्लामची अशी मान्यता आहे की, श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही मुलांना आयुष्याची सुरूवात एकाच बेसलाईनवरून करण्याची समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पुढे आपापले अंगभूत गुण आणि अवगुणामुळे कोणी श्रीमंत होईल कोणी गरीब राहील ती गोष्ट अलाहिदा. या शिवाय इस्लामने संपत्ती कमाविण्यावर हराम आणि हलालची अट घातलेली आहे. या व्यवस्थेमध्ये मनाला येईल त्या प्रमाणे येईल तो व्यवसाय करून संपत्ती कमावता येत नाही. सिनेमा, दारू, अश्लील साहित्य, बीअरबार, पॉर्न, डान्सबार, कसीनो आणि यासारखेच अन्य समाजविघातक व्यवसाय करता येत नाहीत. त्यामुळे समाजात आर्थिक पावित्र्याचे वातावरण प्रस्थापित होते. या उलट भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आधारच व्याज असतो. जो की, गरीबांचे शोषण आणि श्रीमंतांचे पोषण करत असतो. यात हराम व्यवसायांना प्रोत्साहित केले जाते आणि कृषी सारखे पवित्र क्षेत्र इतके दुर्लक्षित ठेवले जाते की, हजारो शेतकर्यांच्या आत्महत्यांमुळे सुद्धा गेंड्याच्या कातडीची सरकारांना आणि श्रीमंत लोकांना पाझर फुटत नाही. 

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,  मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरून जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादा (रोजी-रोटी)चा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा. कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल(संदर्भ : सूरह जुमा 62, आयत नं.10).

मुंबईचा होर्डिंग अपघात असो की, पुण्याचा पोर्शे कारचा अपघात, यासंबंधी व्यक्त होताना सर्वांनी संबंधितांवर कठोर कारवाईची शिफारस केलेली आहे. परंतु, कठोर कारवाई करून समाजातून गुन्हेगारी नष्ट होत नाही हे सिद्ध झालेले तत्व आहे. शिक्षा ही शेवटचा उपाय असते. गुन्हे होवू नये साठी सामुहिक तयारी नैतिकतेच्या पायावर समाजाने करावयाची असते. त्यानंतर सरकारने त्या नैतिक रचनेचे संरक्षण करायचे असते. एवढे करूनही जर एखादी व्यक्ती ऐकत नसते आणि गुन्हे करते तेव्हा कुठे शेवटचा उपाय म्हणून कठोर शिक्षा व ती ही सार्वजनिक ठिकाणी केली पाहिजे, असा इस्लामचा सिद्धांत आहे. इस्लाम विषयी मीडियाच्या दुष्प्रचाराला बळी न पडता स्वतः इस्लामचा अभ्यास केल्यास वाचकांच्या लक्षात येईल की, आदर्श समाज नैतिकतेशिवाय उभा राहू शकत नाही. अशा घटना रोखण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या अहवालात म्हटलेले आहे की, 2060 पर्यंत जगातील 70 टक्के लोक इस्लाम धर्मावलंबी असतील. 34  टक्के ख्रिश्चन, 27 टक्के हिंदू तर ज्यू 15 टक्के बाकी इतर असतील. म्हणून भविष्यात घडणार्या अशा घटनांकडे केवळ एक घटना म्हणून न पाहता त्याकडे इस्लामघ्या व्यापक दृष्टीने पाहून योग्य उपाय योजना केली तरच अशा घटना रोखल्या जावू शकतात आणि अन्यथा नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे लक्षात असू द्या.


- एम. आय. शेख

लातूर


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget