Halloween Costume ideas 2015

आम्ही शांततेची विनंती केली हीच आमची चूक!


जागतिक महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली होती (१८४५) जेव्हा जगातल्या बऱ्याच देशांना जागतिक युद्धाचा तडाखा बसला होता. म्हणून त्यांनी एकत्र येऊन या जगाला मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केली. आज या घटनेला जवळपास ८० वर्षे होत आली आहेत. ज्या उद्दिष्टासाठी ह्या संघाची स्थापना झाली ते कितपत साध्य झाले आणि खरेच या संघाद्वारे विनाशाकडे जाणारी मानवता आज सुखरुप आहे का, खरेच मानवतेला वाचवण्याचे उद्दिष्ट की काही राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठी ही संघटना अस्तित्वात आली की गरीब राष्ट्रांना प्रगत आणि शक्तिशाली देशांच्या दडपणाखाली ठेवण्यासाठी बड्या राष्ट्रांनी मोजक्या देशांना भांडवलदारी अर्थव्यवस्था जगभर रुजविण्यासाठी या संस्थेचे गठण केले होते, ज्यामुळे जगाला आज जसा गरिबीने वेढा घातला आहे, त्याची कल्पनादेखील कधी केली नसावी. कारण एकच या संघटनेची स्थापना असो की प्रगत देशांकडील विविध संस्था, सर्वांचे ध्येय एकच पैसा कमवायचा. आणि युद्ध पैसा कमवण्याचे असे साधन आहे ज्याला तोड नाही. आज आपण पाहत आहोत की हे जग विविध आव्हानांना सामोरे जात आहे. ही आव्हाने जाणूनबुजून उभी केली गेली आहेत. जगात संपत्तीची लूट करणे हे एकमेव धोरण राबवण्यासाठी. यूक्रेनमध्ये जवळपास दोन वर्षांपासून रशियाचे युद्ध चालू आहे, पण सारे युरोपियन आणि अमेरिका मिळून हे युद्ध थांबवत नाहीत. त्यांना चिंता या युद्धात किती माणसांचा रक्तपात होतो याची नाही तर या युद्धात शस्त्रसामुग्री पुरवल्याने किती संपत्ती लाटली जाऊ शकते याकडे जास्त आहे. अशीच परिस्थिती मध्य आशियामध्ये इस्रायल आणि गाजामधील युद्धाची आहे. या युद्धात आजवर ३८ हजार लोक मारले गेले तर लाखभर जखमी झालेत. जगातून सर्वत्र यास इस्रायलकडून होणारा नरसंहार म्हटले जात आहे. युद्ध थांबवण्यासाठी बऱ्याच संस्था पुढे आल्या, संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता देण्यात आली. युद्धबंदीचा ठराव संमत झाला. साऊथ आफ्रिकेने ह्या प्रकरणाला जागतिक गुह्नेगारी न्यायालयात नेले. तेथून इस्रायलविरुद्ध निकाल (अंतरिम) दिला. नेतन्याहू आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले, पण पुढे काहीच झाले नाही. तसेच इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी इस्रायलला रक्तपात बंद करावा अशी “विनंती” केली, पण विनंतीने जगात कोणाला न्याय मिळाल्याचा इतिहास नाही. ह्याच यूनोने पॅलेस्टिनींना आपल्या मायभूमीतून बाहेर करून ते राष्ट्र इस्रायलच्या हवाली केले तेव्हापासून आजपर्यंत पॅलेस्टिनींना आपल्या देशात गुलाम बनवून राहण्यास जगाच्या साऱ्या राष्ट्रांनी इस्रायलच्या बाजूने मदत केली. म्हणे जागतिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभे राहणाऱ्या मानवतेला वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. आज पॅलेस्टाईन विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे, संयुक्त राष्ट्राकडे इतके बळ आहे का की त्याने इस्रायलला युद्धापासून रोखावे. रफाहमध्ये, जिथे गाजामधील नागरिक एका कॅम्पमध्ये आश्रय घेत होते, इस्रायलने हल्ला केला आणि त्या लोकांना जाळून मारले. कुणी इस्रायलला या रक्तपाताची तशीच शिक्षा द्यायला तयार आहे? खरी गोष्ट ही की जोवर हा नरसंहार चालू राहील तोपर्यंत नेतन्याहू सत्तेत असतील, पण तिकडे अमेरिकी अध्यक्षांना याचा फटका बसेल. पॅलेस्टाईनमध्ये युद्धविराम झाल्यावर नेतन्याहूंची सत्ता जाईल. त्यांच्यावर अरब राष्ट्रीय नेत्यांचाच दबाव नाही तर स्वतः आपल्याच देशात त्यांच्याविरुद्ध उठाव होण्याची चिन्हे आहेत. पॅलेस्टाईनमधील लोक जगाच्या शांतताप्रिय मानवदावादी राष्ट्रांना, संस्थांना विचारतात की “आमची एकच चूक झाली, आम्ही शांततेची, युद्धबंदीची मागणी करतो. तेही तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही इस्रायलवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काही क्षणात एकत्र आला होता, आणि निषेध केला होता. आज तुम्ही कुठे आहात. न्यायाची व्याख्या बदलली, की तुम्ही बदललात? आमच्या लहान बाळांची, माता-बहिनींची, वयोवृद्धांच्या हत्येची, त्यांच्या रक्तपाताची तुम्हाला लाजदेखील वाटत नाही. मृतांचा ढिगारा दिवसेंदिवस वाढत जातो. तुम्ही त्याकडे डोळेझाक करता? कुणाची भीती वाटते आणि कशाचीतरी लाज वाटते का? अफगाणिस्तानात वर्षभरात जेवढे मारले गेले होते तितके गेल्या काही महिन्यांत मारले गेले याची गणना कोणत्या आंतरराष्ट्रीय शांततेसाठी लढणाऱ्या संघटनांनी केली आहे का? झालंय तरी काय जगभरातील मानवजातीला?”

एवढेच नाही तर आज जगाच्या कित्येक देशांत धोकादायक ठिकाणे बनली आहेत, गाजा आणि यूक्रेनच नाही तर सबंध युरोप युद्धाच्या विळख्यात आहे. अमेरिकी परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी यूक्रेनला ‘नाटो’मध्ये प्रवेश देण्याची मागणी करताच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली. जसे गेली दोन महायुद्धे युरोपपर्यंतच सीमित नव्हती तर सर्व जगाला त्याचा फटका बसला होता. ही त्या काळची गोष्ट. आज जर तिसरे महायुद्ध झालेच तर देशादेशांत हे युद्ध सुरू होईल. पोलंडने अण्वस्त्रे तैनात करण्याचा सल्ला युरोपला दिला आहे. तसे झाल्यास जगातले सर्व अण्वस्त्रधारी देश तसे करतील आणि म्हणून तुर्कीने जगाला असा सल्ला दिला आहे की आता एका नवीन आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थेची गरज आहे. संयुक्त राष्ट्र हे ह्या आव्हानाला सामोरे जाण्यास असमर्थ आहे.

पण खरी गोष्ट ही की जगभर ह्या युद्धाच्या हालचाली कशासाठी? राजकीय हित साधण्यासाठी की जगभरातील संपत्ती बाळगण्यासाठी? हा निर्णय जोपर्यंत जगातील नेतेमंडळी घेत नाहीत तोपर्यंत साऱ्या पोकळ गोष्टी!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: 9820121207

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget