न्यायाच्या तेजस्वी घटना
मोसुल हे इराकमधील प्रसिद्ध शहर आहे. तेथून एक व्यापारी आपली काही गुरे घेऊन अलेप्पोला निघाला. त्या वेळी सीरिया आणि इराकच्या सीमा वेगवेगळ्या झालेल्या नव्हत्या. इतिहासकारांच्या मते, अलेप्पो हे जगातील सर्वांत जुन्या शहरांपैकी एक आहे आणि आज ते सीरियामधे आहे. त्या काळी येथे गुरांचा मोठा बाजार भरत असे. व्यापाऱ्याकडे असलेली गुरे लवकरच विकली गेली आणि तो मोसूलकडे निघाला. एक डाकू सतत व्यापाऱ्यावर पाळत ठेवून होता. व्यापाऱ्याकडे खूप मोठी रक्कम आहे, हे त्याला माहीत होते.
वाटेत एका निर्जन ठिकाणी एका झाडाखाली व्यापारी विसावा घेण्यासाठी थांबला. डाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेवर खंजीर लावून म्हणाला, “तुझ्याजवळ जे काही आहे ते काढ आणि माझ्या स्वाधीन कर.”
व्यापाऱ्याने आजूबाजूला पाहिले, निर्जन ठिकाणी त्याच्या मदतीला कोण येणार? त्याने शांतपणे आपली सर्व मालमत्ता डाकूच्या स्वाधीन केली. संपत्ती घेऊन डाकू त्याला मारायला उठला.
व्यापारी म्हणाला, “तू माझी सर्व संपत्ती घेतली आहेस, मला लहान मुलं आहेत. माझ्यावर दया कर, मला मारू नकोस.”
पण दरोडेखोराने त्याच्या विनवणीकडे लक्ष दिले नाही आणि व्यापाऱ्यावर खंजिराने वार करायला सुरुवात केली. आजूबाजूला कोणीही नव्हते. अचानक व्यापाऱ्याची नजर झाडावर पडली. त्याला झाडावर दोन कबुतरे बसलेली दिसली.
व्यापाऱ्याने कबुतरांना उद्देशून म्हटले, “कबुतरांनो! साक्ष द्या. या डाकूने माझी हत्या केली.”
डाकूला त्याचे शेवटचे शब्द गमतीदार वाटले. त्याने व्यापाऱ्याच्या शेवटच्या शब्दांची पुनरावृत्ती सुरू केली, “कबुतरांनो! साक्ष द्या...” “कबुतरांनो! साक्ष द्या...”
वाटेतही दरोडेखोर व्यापाऱ्याचे मृत्युपूर्वीचे शब्द उच्चारत राहिला. त्याच्यासाठी हे एका मरणासन्न व्यापाऱ्याने सांगितलेल्या विनोदासारखे होते. दरम्यान, या व्यापाऱ्याचे कुटुंबीय त्याच्या येण्याची वाट पाहत होते. त्याची काही खबर नाही म्हणून; त्याचा मोठा मुलगा वडिलांच्या शोधात अलेप्पोला गेला. तिथे त्याला सांगण्यात आले की त्याचा बाप अलेप्पोलला आला होता, त्याने आपली गुरेढोरे विकली, त्याला पैसेही मिळाले.
तो परत मोसुलला जाण्यासाठी निघाला. काही दिवसांनी अलेप्पोपासून काही अंतरावर असलेल्या रानात त्याचा मृतदेह सापडला. एका अज्ञात व्यक्तीने खंजीर खुपसून त्याची हत्या केली आणि सर्व पैसे घेऊन पळून गेला. त्याला स्मशानभूमीत पुरण्यात आले.
व्यापाऱ्याच्या मुलाने, मारेकऱ्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी त्याने पोलीस अधिकारी, राज्यकर्ते, व्यापाऱ्याचे मित्र अशा अनेकांच्या भेटी घेतल्या त्या सर्वांनीही मारेकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मारेकऱ्याचा शोध लागला नाही. तो निराश होऊन मोसुलला परतला.
अनेक वर्षे निघून गेली. व्यापाऱ्याचे नातेवाईक आणि मित्र यांना हळूहळू या घटनेचा विसर पडला. परंतु ज्याने त्या व्यापाऱ्याला मारले होते, जेव्हा जेव्हा त्याला कबुतरांची जोडी दिसायची तेव्हा त्याला मरणासन्न व्यापाऱ्याचे शब्द आठवायचे... “कबुतरांनो! साक्ष द्या.”
एकदा मारेकऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम होता. तो खूप श्रीमंत व्यक्ती होता, त्यामुळे शहरातील उच्च अधिकाऱ्यांसह अनेक लोक जेवणाला आले होते. नानाविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. मारेकऱ्याने मोठ्या पातेल्याचे झाकण उचलले, पातेल्यात दोन मोठी भाजलेली कबुतरे होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या डोळ्यांसमोर ते दृष्य उभे राहिले, झाडावर दोन कबुतरे बसलेली आहेत, हा एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेत आहे आणि तो मरतांना कबुतरांना उद्देशून सांगत आहे- “काबुतरांनो! साक्ष द्या.” आणि मग तो अनैच्छिकपणे मोठ्याने हसला. लोक त्याच्याकडे बघू लागले. त्याने कबुतरांकडे बोट दाखवले आणि पुन्हा हसला. आपण कुठे आहोत हे तो विसरला.
एका अदृश्य शक्तीने त्याच्या तोंडून वदविले. तो हत्येची घटना लोकांना सांगू लागला. त्याचा प्रत्येक भाग तपशीलवार सांगितला. त्याची जीभ काही थांबत नव्हती. त्याची कहाणी ऐकून लोक थक्क झाले. त्याने स्वतःच आपले रहस्य उघड करताच माझ्याकडून काय चूक झाली हे त्याच्या लक्षात आले. ज्या घटनेला लोक वर्षानुवर्षे विसरले होते आणि या खटल्याच्या फायलीही बंद झाल्या होत्या, ती त्याने स्वत:च सार्वजनिक केली, पण आता उपयोग नव्हता, कारण बाण सुटले होते.
काही तासांत ही घटना संपूर्ण अलेप्पोमध्ये सर्वांच्याच जिभेवर होती आणि अलेप्पोच्या गव्हर्नरलाही याची माहिती देण्यात आली. त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस प्रमुखांनी रीतसर गुन्हा दाखल केला. या मेजवानीत सहभागी झालेल्या लोकांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी आपापले म्हणणे मांडले. आरोपीला बोलावून साक्षीदारांसमक्ष त्याचा जबाब घेण्यात आला. त्याच्याकडे कबुली देण्याशिवाय पर्याय नव्हता. न्यायाधीशांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली.
अलेप्पोचा शासक म्हणाला: “आम्ही साक्ष दिली.”
अलेप्पोचे काझी म्हणाले: “आम्हीही साक्ष दिली.”
पोलीस प्रमुख म्हणाले, “आम्हीही साक्ष दिली.”
लोक म्हणाले: “आम्हीही साक्ष दिली आहे.”
फाशीच्या एक दिवस आधी, दोषीला त्याची पत्नी भेटायला आली. तिने विचारले की, “एवढी वर्षे तू तुझा गुन्हा झाकून ठेवला, मग आता का सार्वजनिक केला.”
त्याने उत्तर दिले, “मी या घटनेचा कधीही उल्लेख न करण्याची शपथ घेतली होती, पण एका जबरदस्त शक्तीने मला बोलण्यास भाग पाडले. मी बोलत नव्हतो, माझी जीभ आपोआप चालत होती.”
दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याच्या फाशीचे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले. मारेकरी सांगत होता, “माझ्या जिभेतून शब्द निघत नव्हते; उलट ते कबुतरांच्या जिभेतून आले. जे मेजवानीच्या दिवशी माझ्यासमोर पडले होते.”
आता जल्लादने दोरी ओढली. लोकांनी एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या वेळी लोकांना अचानक दोन कबुतरे दिसली, कोणतीही हालचाल न करता मारेकऱ्याच्या डोक्यावर बसलेली! सर्व लोक परत ओरडले... “या कबुतरांनीही साक्ष दिली.”
जगाच्या कोर्टाने निःसंशयपणे हात टेकले होते. त्याला मारेकऱ्याचा माग काढता आला नाही. मारेकरी बराच काळ फरार होता. पण अल्लाहचा दरबार खुन्याच्या घातात होता. त्याचे रहस्य अखेर उघड झाले आणि निष्पाप व्यापाऱ्याला अखेर न्याय मिळाला.
( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनहरे फैसलें’, पान क्र. १०३)
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment