पवित्र कुरआन मानवजातीला एकमेव ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याची आणि फक्त त्याचीच भक्ती करण्याची आज्ञा देतो. याबरोबर ईश-आज्ञेविरुद्ध जगणाऱ्या लोकांना या सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही शिक्षेची चेतावणी देतो. मरणोत्तर जीवनातील परिणाम माणसासमोर असेल तर ईश-आज्ञेनुसार जगणे सोपे जाते. पवित्र कुरआनने एकेश्वरत्व आणि मरणोत्तर जीवनाचे वेगवेगळे पुरावे दिले आहेत. जे माणसाला धार्मिक जीवन जगण्यास प्रवृत्त करतात. मरणोत्तर जीवनात कयामत म्हणजे न्यायाच्या दिवशी परिस्थिती किती गंभीर असेल याकडे पवित्र कुरआन वारंवार लक्ष वेधतो. त्या दिवशी कुणीही कुणालाही मदत करू शकणार नाही. आईवडीलांना आपल्या मुलांची चिंता नसेल आणि मुलेही आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकणार नाहीत कारण त्या दिवशी प्रत्येकाला फक्त स्वतःच्या मुक्तीची चिंता असेल. त्या परिस्थितीचे वर्णन करताना कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की,
या’अय्युहन्नासुत्-तकू रब्बकुम् वख्शव् यव्-मल्-ला यज्जी वालिदुन अंव्-वलदिही, वला मव्-लूदुन हुव जाजिन अंव्-वालिदिही शयअन, इन्न वअ्-दल्लाहि हक्कुन फला तगुर्रन्नकुमुल्-हयातुद्-दुन्या, वला यगुर्रन्नकुम् बिल्लाहिल्-गरूर.
अनुवाद :- लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा आणि त्या दिवसाचे भय राखा ज्या दिवशी कोणताही बाप कोणत्याही प्रकारे आपल्या मुलाच्या कामी येणार नाही, ना कोणता मुलगा आपल्या बापाच्या कामी येईल, अल्लाहचे वचन पक्के आहे, यात मुळीच शंका नाही, तेव्हा या सांसारिक जीवनाने तुम्हाला धोक्यात टाकू नये, आणि तो मोठा धोकेबाज अल्लाहच्या बाबतीत तुमची फसवणूक अजिबात करता कामा नये. ( 31 लुक्मान : 33 )
जगात सर्वात जवळचे नाते हे आईवडील आणि मुलांचे असते, पण कयामतच्या दिवशी परिस्थिती इतकी गंभीर असेल की मुलाला शिक्षा झाली तर बाप पुढे येऊन म्हणणार नाही की त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मला द्या. वडील संकटात सापडल्यास पुत्राला हे सांगण्याचे धाडस होणार नाही की त्यांच्याऐवजी मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत इतर नातेवाईक, मित्रमंडळी व नेत्यांकडून काय अपेक्षा उरते? म्हणून, अज्ञानी आहे तो जो दुसऱ्यांच्या सांसारिक फायद्यासाठी पाप आणि चूकीचा मार्ग स्वीकारतो आणि आपले नशीब खराब करतो. आई-वडिलांची सेवा करणे हे निश्चितच मुलांचे कर्तव्य आहे पण त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांना अनुसरून चुकीच्या मार्गावर चालत जाणे योग्य नाही.
सांसारिक जीवनाच्या बाबतीत लोकांचे बरेच गैरसमज आहेत. कुणाला वाटते की जगणे व मरणे हे फक्त या जगापुरतेच आहे, त्यानंतर दुसरे जीवन नाही, म्हणून जे काही प्राप्त करायचे आहे ते इथेच करा. कुणी आपली संपत्ती, शक्ती व सुखसमृद्धीच्या नशेत आपला मृत्यू विसरतो. त्याला वाटते की आपल्या संपत्तीचा ऱ्हास होणार नाही किंवा तो कधीही सत्तेपासून पाय उतार होणार नाही. काही लोक आध्यात्म व नैतिकतेला विसरून केवळ भौतिक लाभ आणि सुखालाच आपले ध्येय बनवतात. परिणामी माणुसकीचा दर्जा कितीही घसरला तरीही ’राहणीमान’ उंचावण्याखेरीज ते इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देत नाहीत. यांसारख्या अनेक गैरसमजूतींचा समावेश या आयतीमध्ये उल्लेखित सांसारिक जीवनातील धोक्यात होतो.फसवणूक करणारा मोठा धोकेबाज म्हणजे कोण? तो सैतान असू शकतो जो सतत मनात वाईट विचार पेरत असतो. वाईट मार्गाला लावणाऱ्या व्यक्ती किंवा समूहही असू शकतात. कधी खुद्द माणसाचा जीव मोठा धोकेबाज ठरतो जो ईश-आज्ञेविरुध्द आपल्या मागण्या पूर्ण करवतो. याशिवाय लोकांच्या गैरसमजुतींची वेगवेगळी कारणे असतात. जीवनाची दिशा योग्य मार्गापासून चुकीच्या दिशेने जो वळवतो तोच माणसासाठी धोकेबाज ठरतो. एकमेव ईश्वर, अल्लाहच्या बाबतीत ’फसवणूक’ हा शब्दही खूप व्यापक आहे. ज्यात फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. कुणाला हा विचार पटतो की ईश्वर अजिबात अस्तित्वात नाही. कुणाची समजूत अशी आहे की हे जग ईश्वरानेच निर्माण केले पण आता जगाच्या भल्या-वाईट गोष्टींशी त्याला काही देणे घेणे नाही. काहींची अशीही दिशाभूल केली जाते की काही जन ईश्वराला प्रिय आहेत. त्यांच्याशी तुम्ही जवळीक साधा मग तुम्हाला हवं ते करा, तुमची मुक्ती निश्चित आहे. कुणाचा असा गैरसमज होतो की ईश्वर खूप दयाळू आहे, क्षमाशील आहे, आपण कितीही पाप केले तरीही तो दयावंत आपल्याला क्षमा करेल. अशा वेळी क्षमाशील, दयावंत हे ईश-गुण माणसाच्या लक्षात राहतात पण ईश्वर न्यायी सुध्दा आहे हे माणूस विसरतो. येथेच माणसाची वैचारिक फसवणूक होते. याशिवाय जगात गुन्हेगारांची पकड न होणे ही ईश्वराने माणसाला दिलेली ढीलही असू शकते. तरीही कधी कधी अशी काठी पडते ज्याला आवाज नसतो आणि ती इतरांना दिसतही नाही. हेही होऊ शकते की एखाद्याला या जगात कोणतीही शिक्षा होणार नाही पण कयामतच्या दिवशी त्याला सर्व पापांची शिक्षा एकत्रित भोगावी लागेल. त्यामुळे सर्व प्रकारचे धोके आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याची काळजी घेणे आणि सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनाचा योग्य दृष्टिकोन बाळगणे हे अत्यावश्यक आहे. माणूस जितक्या फसव्या आणि चुकीच्या विचारात अडकतो त्यांचे विश्लेषण केल्यास शेवटी हेच दिसून येते की सर्व प्रकारचे पाप, अपराध, गैरव्यवहार व अनैतिक वर्तनाच्या मुळाशी अनेक गैरसमज काम करताना दिसतात. ज्यामध्ये ईश्वराचे अस्तित्व आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांशी संबंधित अनेक गैरसमज प्रामुख्याने आहेत. ते दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराने अवतरित केलेला ग्रंथ पवित्र कुरआन आणि त्यानुसार असलेले पैगंबरांचे जीवन चरित्र यांचा सखोल अभ्यास करणे होय.
................ क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment