Halloween Costume ideas 2015

बेगम हजरत महल (१८३०-१८७९)


बेगम हजरत महल, १८५७ च्या बंडातील एक प्रमुख महिला नायक, यांचा जन्म १८३० मध्ये उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला. तिचे नाव मुहम्मदी खानम आहे. तिचे वडील फैजाबादचे गुलाम हुसेन. तिच्या कोवळ्या वयातच तिने साहित्यात चांगली प्रतिभा दाखवली. तिचा विवाह अवधचा नवाब वाजिद अली शाह यांच्याशी झाला होता. त्यांना मिर्झा बिर्जीस कदीर बहादूर हा मुलगा झाला.

१३ फेब्रुवारी १८५६ रोजी ब्रिटिश सैन्याने वाजिद अली शाह यांना कैद केले. त्यांनी त्यांना १३ मार्च रोजी कलकत्त्याला पाठवले आणि अवधवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. यामुळे लोक आणि स्थानिक राज्यकर्ते नाराज झाले. त्यांनी बेगम हजरत महल यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव केला. दि. ३१ मे १८५७ रोजी अवधची राजधानी लखनौच्या चवनी भागात स्थानिक राज्यकर्ते आणि लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले. त्यांनी ब्रिटिश सैन्याला धडा शिकवला आणि लखनौमधील त्यांची सत्ता नष्ट केली.

नंतर बेगम हजरत महल यांनी ७ जुलै, १८५७ रोजी त्यांचा मुलगा बिरजीस कदीर याला अवधचा नवाब म्हणून घोषित केले. राजाची आई म्हणून, त्यांनी १,८०,००० सैन्य एकत्र केले आणि प्रचंड पैसा खर्च करून लखनौ किल्ल्याचे नूतनीकरण केले. बेगम हजरत महल यांनी राज्याच्या सुशासनासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली ज्यामध्ये मुम्मू खान, महाराजा बालकृष्ण, बाबू पूर्ण चंद, मुन्शी गुलाम हजरत, मोहम्मद इब्राहिम खान, राजा मानसिंग, यांसारख्या सदस्यांची नियुक्ती केली. राजा देसीबक्ष सिंह, राजा बेनी प्रसाद आणि इतर. शराफ उद-दौला यांची मुख्यमंत्री म्हणून आणि राजा जेल लाल सिंग यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बेगम हजरत महल यांनी आपल्या मुलाच्या वतीने सुमारे दहा महिने राज्य केले आणि लोकांमध्ये आणि स्थानिक राज्यकर्त्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा देऊन ब्रिटिश सैन्याला आव्हान दिले. हजरत महल यांनी ३१ डिसेंबर, १८५८ रोजी एक ऐतिहासिक विधान जारी केले आणि १ नोव्हेंबर १८५८ रोजी राणी व्हिक्टोरियाने जारी केलेल्या घोषणेला आव्हान दिले.

परंतु, जेव्हा पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे मुख्य केंद्र असलेली दिल्ली ताब्यात घेण्यात आली, तेव्हा ब्रिटिश सैन्याने मार्च १८५९ मध्ये लखनौला वेढा घातला आणि हल्ला केला. कंपनीचे सैन्य आणि बेगमच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. जेव्हा पराभव अपरिहार्य झाला तेव्हा बेगम हजरत महल नानासाहेब पेशवे आणि इतरांसारख्या सह-क्रांतिकारक नेत्यांसह नेपाळच्या जंगलात आश्रय घेतला.

बेगम यांना लखनौला परत आणण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड पैसा आणि विलासी सुविधा देऊ केल्या. परंतु बेगम हजरत महल यांनी त्यांना नकार दिला आणि स्वतंत्र अवध राज्याशिवाय दुसरे काहीही त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले. बेगम हजरत महल आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडत होत्या. ७ एप्रिल १८७९ रोजी तिचे नेपाळमधील काटमांडू येथे निधन झाले. १९८४ मध्ये भारत सरकारने तिच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget