Halloween Costume ideas 2015

राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या निधनानंतर...?


इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी तबरीझ येथे इराणचे ६३ वर्षीय राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि ६० वर्षीय परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहिया यांचा गेल्या रविवारी (१९ मे) हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी मुदतपुर्व निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. इराणी सरकारच्या ३ शाखांच्या प्रमुखांनी २८ जून रोजी अध्यक्षांची निवडणूक घेण्याला अनुमती दिली आहे. राजधानी तेहरानमध्ये अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला इराणच्या कार्यकारी शाखेचे प्रमुख मोहम्मद मोखबर, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ आणि न्यायपालिका प्रमुख घोलाम-होसेन मोहसेनी-इजेई उपस्थित होते. इराणच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. इराणच्या राज्यघटनेनुसार इराणला आता ५० दिवसांच्या आत निवडणुका घेऊन नवा राष्ट्राध्यक्ष निवडावा लागणार आहे.

इब्राहिम रईसी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६० रोजी मशहाद येथे झाला. हे शहर इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मानले जाते. याच शहरात शिया इस्लामचे इमाम अली रझा यांची दरगाह आहे. इथे इराणची एक समृद्ध सामाजिक संस्थाही आहे. रईसी यांचे वडील मौलवी होते, त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्या वेळी ते पाच वर्षांचे होते. इब्राहिम रईसी नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी परीधान करत होते. सैय्यद असण्याचे आणि पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असल्याचे प्रतीक मानले जाते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्यांनी कोम शहरातील धर्मशिक्षण देणार्‍या संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थी जीवनात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेले इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्याविरोधात निदर्शने केली होती. १९७९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वातील इस्लामी क्रांतीमध्ये शहा रेझा पहलवींना सत्तेवरून बेदखल टाकण्यात आले होते.

इस्लामिक क्रांतीनंतर रईसी यांनी न्यायपालिकेत काम करण्यास सुरुवात केली आणि अनेक शहरांमध्ये वकील म्हणून काम केले. हे करत असताना त्यांना इराणच्या प्रजासत्ताकाचे संस्थापक आणि १९८१ मध्ये इराणचे अध्यक्ष झालेल्या अयातुल्ला खोमेनींकडून प्रशिक्षण मिळत होते. वयाच्या २५ व्या वर्षी रायसी इराण सरकारचे दुसर्‍या क्रमांकाचे वकील झाले. त्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि ’डेथ कमिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुप्त समितीमध्ये (ट्रायब्युनल) १९८८ साली त्यांचा समावेश झाला. आपल्या राजकीय कारवायांसाठी आधीपासूनच तुरुंगात असलेल्या हजारो राजकीय कैद्यांवर या ट्रायब्युनलच्या मार्फत पुन्हा खटला चालवला जात असे. या राजकीय कैद्यांपैकी बहुतेक जण इराणमधील डाव्या विचारसरणीच्या आणि विरोधी पक्ष असणार्‍या मुजाहिदीन-ए-खल्का किंवा ‘पीपल्स मुजाहिदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण’चे सदस्य होते. या ट्रायब्युनलने एकूण किती राजकीय कैद्यांना मृत्यूदंड दिला, याबद्दल माहिती नाही. यात जवळपास पाच हजार स्त्री-पुरुषांचा समावेश असल्याचे मानवाधिकार संघटनांकडून सांगण्यात येत आहे. १९८८ मधली एक ध्वनीफित पाच वर्षांपूर्वी समोर आली. यात इब्राहिम रईसी, न्यायालयाचे इतर सदस्य आणि तत्कालीन दुसर्‍या क्रमांकाचे धार्मिक नेते अयातुल्ला हुसैन अली मोतांजेरी यांच्यात संभाषण होते. राजकीय कैद्यांना फाशी देण्याची घटना हा ’इराणच्या इतिहासातला सगळ्यांत मोठा गुन्हा’ असल्याचे मोतांजेरी म्हणत असल्याचे या ध्वनीफितीमध्ये ऐकू येत होते. यानंतर वर्षभरातच अयातुल्ला खोमेनींचे उत्तराधिकारी म्हणून मोतांजेरी यांची करण्यात आलेली नेमणूक रद्द झाली. यानंतरही रईसी इराणच्या प्रॉसिक्युटर पदावर कायम राहिले. इतकेच नाही तर यानंतर ते स्टेट इंस्पेक्टरेट ऑर्गनाझेशनचे प्रमुख आणि न्यायपालिकेतले पहिले उपप्रमुख बनले. २०१४ साली त्यांची इराणचे प्रॉसिक्युटर जनरल (सरकारचे प्रमुख वकील) या पदावर नियुक्ती झाली. यानंतर २ वर्षांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी रईसी यांची इराणच्या सर्वात महत्त्वाच्या आणि समृद्ध धार्मिक संस्थापैकी एक असणार्‍या अस्तन-कुद्स-ए-रजावीचे संरक्षक म्हणून नेमणूक केली. ही संस्था मशहद शहराक शिया मुस्लिमांच्या मशिदी आणि त्यांच्याशी संबंधित असणार्‍या इतर संस्थांची जबाबदारी सांभाळते.

२०१९ मध्ये रईसी यांना अयातुल्ल्ा अली खोमेनी यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदी नेमले. यानंतर काही आठवड्यातच रईसी यांनी पुढचा सर्वोच्च धार्मिक नेता निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या ८८ मौलवींच्या समितीचे उपाध्यक्ष बनवले. न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून रईसी यांनी काही धोरणात्मक सुधारणा केल्या. रईसींच्या काळात विरोधी मतांच्या बऱ्याच नागरिकांना गुप्तहेर ठरवून शिक्षा देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करणे चालू ठेवले. २०२१ च्या निवडणुकीत रईसी यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरताना ’इराणला गरिबी, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अपमानाच्या वागणुकीतून मुक्त करणारा स्वतंत्र उमेदवार’ अशी आपली प्रतिमा बनवली.

- शाहजहान मगदुम 

कार्यकारी संपादक


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget