Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजाला भेडसावणारी समस्या


अलिकडे मुस्लिम समाजामध्ये मुलं कमी तर मुली जास्त शिकण्याची पद्धत रूढ झालेली आहे. मुस्लिम तरूण दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ऑटोरिक्षा चालविणे किंवा तत्सम छोटे-मोठे काम करून घराला आर्थिक आधार देण्यासाठी विवश होत आहेत. त्याच वेळेस घरातील मुलींमध्ये उच्च शिक्षण घेण्याची हौस वाढत आहे. आपण तर नाही शिकू शकलो किमान आपल्या बहिणींनी तरी उच्चशिक्षण घ्यावे, यासाठी हे भाऊ आपल्या कष्टाची कमाई बहिणींच्या उच्चशिक्षणावर खर्च करत आहेत. मुस्लिम मुली बहुतकरून हिजाबमध्ये विद्यापीठात जात असल्यामुळे आई-वडिलांनाही त्या सुरक्षित आहेत, असा विश्वास वाटतो. मुलींनीसुद्धा शिकण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविलेला आहे. आज कोणतेही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात मुस्लिम मुली जॉब करतांना दिसत नाहीत. अशा मुलींची लग्नही चांगल्या घरात व लवकर होत आहेत. म्हणून समाजामध्ये मुलींना शिकविण्याची चढाओढच सुरू झालेली आहे. मागील काही वर्षापर्यंत शिक्षिका आणि डॉक्टर या दोनच व्यवसायामध्ये काम करणाऱ्या मुलींबद्दल समाजामध्ये स्विकार्हता होती. मात्र अलिकडे स्टेनोग्राफर, कॉल सेंटर, अभियंता, डाटा ऑपरेटर सारख्या अन्य क्षेत्रामध्येही मुस्लिम मुली मोठ्या प्रमाणात काम करत असून, समाजाने त्यांनाही स्विकार केलेले आहे. किंबहुना अशाच व्यावसायिक मुलींना लग्नासाठी लवकर मागणी येते व त्यांच्याकडून फारशी आर्थिक अपेक्षा न करता त्यांची लग्नेही होतात. घरेलू मुलींना मागणी कमी असून, त्यांच्या लग्नामध्ये मुलाकडची मंडळी मोठ्या आर्थिक लाभाची सुप्त अपेक्षा मनात ठेवूनच बोलणी करतात, असा अनुभव पुण्याचे राहणारे व फैज मॅरेज ब्युरो चालविणारे इंतेखाब फराश यांच्याशी बोलतांना आला. 

हा अनुभव जॉब न करणाऱ्या मुलींच्या पालकांनाही येत असल्यामुळे ते आपल्या इतर मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुस्लिम लोक आपल्या मुलींच्या लग्नावर लाखो रूपये खर्च करतात. तोच खर्च त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणावर केला. त्यांना आधुनिक शिक्षण दिले तर त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. मग त्यांच्या लग्नामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. अवाजवी खर्च करावा लागणार नाही. वर पक्षाच्या अवास्तव मागण्या मान्य कराव्या लागणार नाहीत. उलट वर पक्षाचे लोकच आम्हाला काही नको फक्त   तुमची मुलगी द्या अशा विनवण्या करतील, असा पक्का समज मुस्लिम समाजामध्ये एव्हाना रूढ झालेला आहे. विशेष म्हणजे मुस्लिम महिलांनासुद्धा हा विचार पटलेला आहे. वर्तमान पत्रातून किंवा समाज माध्यमांवरून ज्या महिला आपले मत व्यक्त करतात त्यांचा सूरही याच विचाराच्या समर्थनार्थ असतो. एमपीएससीमध्ये एखादी मुलगी फौजदार किंवा अन्य एखाद्या पदावर निवडली गेली किंवा निखत जरीन सारखी बॉक्सर झाली तर समाजाकडून होणाऱ्या तिच्या कौतुकाचे प्रतिबिंब समाजमाध्यमांवर ठळकपणे उमटलेले दिसते. अलिकडे युपीएससीमध्येही यशस्वी होण्यात मुस्लिम मुलींचा टक्का वाढला आहे. कुठल्याही विद्यापीठात मुस्लिम तरूणांपेक्षा मुस्लिम तरूणींचीच संख्या जास्त असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता एकंदरित समाज मुलींना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. महागाई एवढी वाढलेली आहे, अशा परिस्थितीत फक्त पतीने कमावलेल्या पैशातून या काळात गरजा भागविणे केवळ अशक्य आहे म्हणून पत्नीनेही कुटुंबाला हातभार लावला तर त्यात चुकीचे काय आहे? हा विचार इतर समाजाबरोबर मुस्लिम समाजामध्येही रूढ झालेला आहे.

मुस्लिम समाजाचा हा विचार गैरइस्लामी असून, मुलींच्या मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून जॉब करण्यामुळे समाजामध्ये अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत आहेत. मुलींच्या शिक्षणासंबंधी देशात अवलंबलेली आधुनिक शिक्षण व्यवस्था ही विदेशी असून, तिचा स्विकार करतांना मुस्लिम समाजाला एका मुलभूत तत्वाचा विसर पडलेला आहे. ते तत्व म्हणजे शरियतने अर्थार्जनाची जबाबदारी पुरूषावर टाकलेली आहे स्त्रीवर नाही. स्त्रीवर अर्थार्जनापेक्षाही जास्त महत्त्वाची जबाबदारी (वंशवृद्धी आणि त्यांचे प्रशिक्षण) टाकलेली असल्यामुळे त्यांना एक रूपयासुद्धा कमावण्याची गरज नाही. स्त्रीला आर्थिकदृष्ट्या पुरूषावर अवलंबित करण्यामागे ईश्वराने स्त्रीवर अन्याय केलेला नसून, तिला तर हा विशेषाधिकार बहाल केलेला आहे. तिने आपले काम एकाग्रचित्तपणे करून समाजाला आणि देशाला उत्कृष्ट नागरिकांचा अखंड पुरवठा करावा, हे त्यातून अपेक्षित आहे. मानवतेची यापेक्षा दुसरी मोठी सेवा असूच शकत नाही. मात्र मुस्लिम पुरूषांना आपल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे ते स्त्रीकडून अर्थार्जनाची अपेक्षा करत आहेत. हा विचार अतिशय धोकादायक आहे. तो कसा? हे आपण पाहू.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या देशात महिलांना नोकरी करण्यासाठी सुरक्षित वातावरण आहे का? कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिलाचे रक्षण होऊ शकते काय? त्यांना सन्मानाने नोकरी करता येत आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा प्रवृत्तीची माणसं प्रत्येक क्षेत्रात विपुल प्रमाणात आहेत. हे सर्व माहित असतांना आपण आपल्या प्राणप्रिय असलेल्या मुली, बहिणी आणि सुनांना चार पैसे मिळतात म्हणून अशा असुरक्षित वातावरणात नोकरी करण्याची परवानगी देणे किंवा त्यांना प्रोत्साहित करणे कितपत योग्य आहे?

ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण राहतो त्यामध्ये महिलांच्या स्थानासंबंधी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात, मानवी संस्कृतीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि जटील समस्या दोन आहेत. या समस्यांचे समाधान कोणता समाज कसा करतो यावरच त्या समाजाचे कल्याण आणि प्रगती अवलंबून आहे. या दोन्हीही समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत जगातले अनेक बुद्धीवादी लोक प्रयत्नशील आणि व्यथित राहिलेले आहेत. पहिली समस्या ही आहे की, सामुहिक जीवनामध्ये स्त्री आणि पुरूषांमधील संबंध कशा प्रकारे स्थापन केले जावेत? कारण हेच संबंध पुढे चालून संस्कृतीची आधारशिला आहे आणि या संबंधां (आधारशिले) मध्ये जरासा जरी बाक आला तरी तो समाजाला  नष्ट करण्यासाठी पुरेसा असतो. 

खश्ते अव्वल गर नहेद मेमार कज

ता सुरैय्या मी रवद दीवार कज

या फारसी शेरचा अर्थ असा आहे की, जर एखाद्या भींतीचा पायाच वाकडा पडला तर भींत आकाशापर्यंत जरी उंच नेली तरी ती वाकडीच होणार. आणि दूसरी समस्या व्यक्ती आणि समाजामधील संबंध स्थापित करण्याची आहे. हे संबंध संतुलित नसतील तर शेकडो वर्षांपर्यंत मानवतेला याचे वाईट परिणाम सहन करावे लागतात. (संदर्भ : परदा, पान क्र.7). 

मौलाना पुढे म्हणतात, हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, शोरूम तुम्हाला कोणतीच जागा अशी दिसणार नाही ज्या ठिकाणी सुंदर स्त्री या उद्देशाने नेमलेली नसेल की पुरूष तिच्याकडे आकर्षित होऊन आपल्या व्यवसायाकडे येतील. आज समाज स्वतःचे संरक्षण त्याच स्थितीत करू शकतो की तो स्वतःमध्ये नैतिक शक्ती निर्माण करेल आणि वासनेला आपल्यावर स्वार होऊ देणार नाही. मात्र भांडवलशाही व्यवस्था अशा मजबूत पायावर उभी आहे की, ती एकटी नाही तिच्यासोबत एक जबदरस्त सैतानी लष्कर लिटरेचर, दृकश्राव्य माध्यमे आहेत जे समाजाला नैतिकतेकडे येऊच देत नाहीत. त्याच्या अनैतिक इच्छा, आकांक्षांना प्रोत्साहित करून समाजाला ध्वस्त आणि पराभूत करत आहेत. भांडवलशाही व्यवस्था एवढी कमालीची खुनी व्यवस्था आहे की, समाज स्वतःच्याच मर्जीने मरण्यासाठी तयार होतो. (संदर्भ : परदा, पान क्र.54).

मित्रानों! मुस्लिम समाजाची खरी शक्ती आर्थिक नाही तर नैतिक आहे. चार पैशांच्या प्राप्तीसाठी नीती मुल्यांचा बळी ज्यांना द्यायचा आहे त्यांनी खुशाल आपल्या मुलींना व्यावसायिक शिक्षण द्यावे व स्वार्थी,लिंगपिसाट, मुल्य हरवून बसलेल्या कार्पोरेट किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकऱ्या लावाव्यात. मुस्लिम समाजामध्ये जी नैतिक मुल्य इबादती व परदा पद्धतीमुळे खोलपर्यंत रूजलेली आहेत, नोकरीनिमित्त महिलांना घराबाहेर पाठवून ती ही जर पणाला लावली जात असतील तर समाजाच्या हातात काय उरणार आहे, याचा गंभीरपणे समाजाने विचार करावा. नैतिक मुल्यांच्या जपणुकीमुळे एखादवेळ गरीबी परवडेल पण अनैतिकता घेऊन येत असेल तर संपन्नता कोणत्याही समाजाला (लाँग टर्ममध्ये) परवडणारी नाही. हे मुस्लिमांनी नीट लक्षात घ्यावे. मुस्लिम समाजाचा डोलाराच नैतिकतेच्या पायावर उभे आहे. त्याचसाठी दिवसातून पाचवेळा नमाज अदा करण्याची सक्ती, रमजानचे कठीण रोजे ठेवण्याची सक्ती, कष्टाने कमाविलेल्या पैशांतून जकात देण्याची सक्ती शरियतने केलेली आहे. या इबादतीमधून अदृश्यपणे समाजाचे नैतिक प्रशिक्षण होत असते. मुलींना असुरक्षित वातावरणात नोकरीसाठी पाठवायला सुरूवात केली तर या सर्व इबादती कॉम्प्रमाईज होतील. कोणाला रूचेल ना रूचेल मात्र सत्य हेच आहे की, आर्थिकदृष्ट्या संपन्न महिला या आपल्या कुटुंबाची पुरेशी काळजी घेण्यास समर्थ नसतात. बाहेर नोकरी करून, दिवसभर राबून पुन्हा कुटुंबाची जबाबदारी शक्तीशाली पुरूषही पेलू शकणार नाही तर त्याची अपेक्षा महिलांकडून करणे हे महिलांवर अत्याचार आहे. गृहसौख्याला संकटात टाकून व्यावसायिक महिला तयार तर होतीलही पण त्यातून साध्य काय होणार? पुरूषाला लग्न करण्याचे जे कारण सांगितले आहे ते खालीलप्रमाणे आहे, 

’’आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली, निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (सूरह अर्रूम 30: आयत नं. 21).

अर्थात पतीला पत्नीकडून संतुष्टी प्राप्त व्हावी यासाठी ईश्वराने पुरूषाला लग्न करण्याची परवानगी दिलेली आहे. अशात महिला जर व्यावसायिक असतील तर दोघेही थकून भागून रात्री घरी येतील. अशात कोण कोणाला संतुष्टी देऊ शकेल? मग अशा लोकांना संतुष्टी विवाहबाह्य संबंधातून, दारू आणि ड्रग्समधून शोधावी लागते. 

निकाह महाग झाल्यामुळे तसेच घरेलू हिंसाचार वाढल्यामुळे सुद्धा पालक आपल्या मुलींना व्यावसायिक शिक्षणाकडे पाठवत आहेत. वास्तविक पाहता शरियतने निकाहच्या प्रक्रियेतील सर्व खर्च वर पक्षावर टाकलेला आहे. एक रूपयाचा खर्चही वधू पक्षाकडे नाही. जे काही होत आहे ती शुद्ध भारतीय परंपरा आहे त्याचा इस्लामशी काही संबंध नाही आणि हा प्रश्न जनजागृती करून सोडविता येण्यासारखा आहे. किंबहुना त्याची प्रक्रिया सुरूही झालेली आहे. आज अनेक मुस्लिम तरूण असे आहेत जे नगदी महेर अदा करून एक रूपयाचाही खर्च वधू पित्याला न होऊ देता निकाह करत आहेत. अनेक ठिकाणी चहा, शरबत किंवा शिर्खुम्यावर निकाह होत आहेत. लग्नात खर्च होत आहे म्हणून आपल्या मुलींना आधुनिक शिक्षण देऊन नोकरी करण्यासाठी परवानगी देणे हे काही या प्रश्नाचे समाधान नाही. 

कौटुंबिक व्यवस्थेचे पतन

व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या नंतर सहाजिकच महिलांच्या मनामध्ये जॉब करण्याची इच्छा निर्माण होते. अशा परिस्थितीत महिलांना मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी घराबाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित केल्यास त्याचा पहिला दुष्परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतो. या कारणामुळे कुटुंब व्यवस्था एक तर उध्वस्त होते किंवा कमकुवत होते. सतत घराबाहेर राहिल्यामुळे स्त्री- पुरूष दोहोंचेही भावविश्व उध्वस्त होते ते वेगळेच. या उलट निकाह झाल्यानंतर पत्नी घरात राहिल्यामुळे कुटुंब मजबूत बनते. कारण यात कामाची सरळ-सरळ दोन भागात विभागणी झालेली असते. अर्थार्जनाचे घराबाहेरील काम पुरूष प्रवृत्तीस अनुकूल असल्यामुळे व ते काम सुलभपणे करू शकतो. घरातील जबाबदारी महिला प्रवृत्तीस अनुकूल असल्यामुळे ती जबाबदारी पत्नी सुलभपणे पार पाडू शकते. या व्यवस्थेतूनच संंतती जन्माला येते व एक कुटुंब आकार घेते. मुलं झाल्याबरोबर पती-पत्नी दोघांच्याही जीवनात अमुलाग्र असे बदल घडतात. दोघांमध्ये भावनिक जवळीकता अधिक वाढते. त्यातूनच आदर्श समाजाचा पाया रचला जातो. पती आणि पत्नी दोघेही कामानिमित्त रोजच घराबाहेर राहत असतील तर कुटुंब व्यवस्थेचा आधारच निखळून पडतो. परस्परांविषयी निर्माण होणारा स्नेह, दया, करूणा, सहकार्य, त्याग या सर्व भावना लोप पावतात व त्या जागी एक लिंगपिसाट आणि स्वार्थी समाज तयार होतो. 

लक्षात ठेवा मित्रानों ! भविष्यातील चांगल्या पिढ्यांची इमारत चांगल्या चारित्र्याच्या तरूणांच्या बळावरच उभी राहते व असे तरूण चांगल्या कुटुंबातूनच येतात व चांगले कुटुंब एक पूर्णवेळ गृहिणीच उभे करू शकते. याचा असा अर्थ मुळीच नाही की सर्व कामकाजी महिलांची घर उध्वस्त होतात व त्या आदर्श कुटुंब निर्माण करू शकत नाहीत. पण अशा महिला अभावानेच आढळतात. त्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच असते. त्या अधिक सक्षम व कार्यक्षम असतात. म्हणूनच हे कठीण कार्य करू शकतात. बाकीच्या महिलांचे तडजोडीतच आयुष्य संपते.

कोणाला पटो किंवा न पटो महिलांची जबाबदारी घर सांभाळण्याची आहे. परंतु समाजामध्ये अनेक महिला अशा असतात विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नसते. अशा परिस्थितीत त्यांनी काय करावे? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, सरकारने त्यांच्या स्त्री सुलभ स्वभावास अनुकूल असे क्षेत्र निवडून ते महिलांसाठी पूर्णतः आरक्षित करावेत व त्या ठिकाणी अशा गरजू महिलांना सामावून घ्यावे. ते क्षेत्र, नो मेन्स लँड असावे. ज्यामुळे त्या आपल्या कामाच्या ठिकाणीही निःसंकोचपणे काम करू शकतील. याशिवाय, ज्या महिला अपवादात्मकरित्या सक्षम, तिक्ष्ण बुद्धीमत्तेच्या असतील त्यांनी त्यांच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडावे. परंतु त्या क्षेत्रात त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे भरारी घेतांना कुठलीही अडचण येणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी. एकंदरित, हीच आदर्श परिस्थिती आहे.


- एम. आय. शेख

लातूर


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget