हजरत खतीजतूल कुब्रा यांचा जन्म इस.वी.555 मध्ये झाला. बालपणापासूनच त्या फार नम्र व शालीन होत्या. जेव्हा त्या मोठ्या झाल्या तेव्हा त्यांचे लग्न अबूहाला हिंद विनाश तमीमी सोबत झाले. त्यांच्या पासून त्यांना दोन मुले झाली. एकाचे नाव हाला, जो इस्लामपूर्व काळातच मरण पावला. दुसऱ्याचं नाव हिंद.काही रिवायती मध्ये आहे की त्यांना प्रेषितांची(सल्ल.)सोबत लाभली आणि तेही सहाबी ठरले. अबूहालाच्या मृत्यूनंतर खातिजा (रजी.) यांचा दुसरा विवाह अतीक बीन आबिद मुखजरोमी सोबत झाले. त्यांच्या पासून एक मुलगी झाली जिचं नाव हिंद होते. काही दिवसानंतर आतीक बीन आबीदही मृत्युमुखी गेले. त्यांच्या तिसरा विवाह प्रेषित मुहम्मद(सल्ल.) यांच्यासोबत झाला. प्रेषित (सल्ल) यांच्या अगोदर हजरत खतीजांना(रजी.)कुरेशच्या मोठमोठ्या सरदारांनी लग्नाची मागणी घातली होती, परंतु त्यांनी त्या सर्व मागण्या रद्द केल्या. कारण एका पाठोपाठ एक आलेल्या दुखाःमुळे त्यांचं मन खचल होतं. इकडे त्यांच्या वडिलांची दुसरी कोणी संतती नसल्यामुळे आणि वृद्धापणामुळे आपले सर्व व्यापार आपल्या कर्तबगार मुलीला देऊन जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी आपल्या व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे सांभाळले होते. त्यांचा व्यापार शाम (सीरिया) आणि यमन देशात पसरलेला होता. त्यांच्या हुशारी आणि चांगुलपणामुळे त्यांच्या व्यापारात दिवसेंदिवस त्यांना यश प्राप्त होत होते. त्यांनी आपला एक ग्रुप तयार केला होता. ज्यामध्ये यहुदी, ईसाई आणि त्यांचे दास होते. त्यांना त्यांच्या व्यापाराला सांभाळण्यासाठी एका इमानदार व्यक्तीचा शोध होता. ज्यांच्यासोबत ते आपल्या या दासांना पाठवून दुसऱ्या देशात व्यापार करू शकेल. हा तो काळ होता जेव्हा प्रेषित(सल्ल.) यांची चर्चा चोहीकडे कडे पसरलेली होती की ते फार नम्र आणि इमानदार व्यक्ती आहेत. त्यांना तेव्हा लोक ’अमीन’ असे म्हणत. अमीन म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. प्रेषित (सल्ल.) यांची प्रसिद्धी खतीजा (रजी.) पर्यंत पोहोचली. तेव्हा त्यांनी प्रेषित (सल्ल.) यांना निरोप पाठविला की तुम्ही माझ्या व्यापाराचा माल घेऊन शामला जा मी तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त मोबदला देईन. प्रेषीत (सल्ल.) यांनी हे कबूल केले व त्यांचा माल घेऊन शामला निघाले. प्रेषित (सल्ल.) यांच्या चांगुलपणामुळे संपूर्ण माल दुप्पट किमतीत संपला. प्रवासादरम्यान प्रेषित (सल्ल.) यांनी आपल्या सोबत असलेल्या लोकांसोबत असा सदव्यवहार केला की ते सर्व प्रेषितांना(सल्ल.) फार पसंत करू लागले, जेव्हा त्यांचा ग्रुप परत आला तर त्यांच्या नोकरांनी प्रवासातील प्रत्येक गोष्ट हजरत खतिजा(रजी.)यांना सांगितली त्या फार आनंदी झाल्या आणि त्यांनी एका मोलकरीण द्वारे प्रेषितांना(सल्ल.)विवाहासाठी निवेदन पाठविले. प्रेषितांनी(सल्ल.) ते स्वीकार केले. त्यावेळेस प्रेषितांचे(सल्ल.)वय 25 वर्षे व हजरत खातिजा(रजी.)यांचे वय 40 वर्षे होते. दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर प्रेषित (सल्ल.)हे अल्लाहच्या उपासनेत तल्लीन राहू लागले. ते मक्केच्या पर्वतांमध्ये उपासना करू लागले. दहा वर्षानंतर एक दिवस हिरा नावाच्या पर्वतामधील गुहेत अल्लाहच्या आदेशाने प्रेषित (सल्ल.) यांना इस्लामचा संदेश जिब्राईल अलै. यांनी आणून दिला आणि त्यांना इस्लामचे प्रेषित घोषित केले.
यामुळे प्रेषितांची(सल्ल.) प्रकृती बिघडली ते घाबरले घरी गेले आणि म्हणू लागले, माझ्यावर कपडा टाका, माझ्यावर कपडा टाका. खतीजाने(रजी.)आज्ञेचे पालन केले आणि विचारले, तुम्ही कुठे होता मी माणसांना पण पाठविले होते आपल्या शोधात. तद्नंतर प्रेषितांनी सर्व घटना सविस्तर त्यांना सांगितली. हजरत खातिजा(रजी.)म्हणाल्या, आपण खरे बोलता, गरिबांचे कैवारी आहात, चांगले मेजबान आहात, लोकांसोबत सदवर्तन करता, अमानतदार आहात आणि दुःखीतांची मदत करता, तर परमेश्वर तुम्हाला एकटा सोडणार नाही. त्यांना सोबत घेऊन त्या आपल्या चुलत भाऊ वरका बीन नौफल कडे घेऊन गेल्या. जे मूर्ती पूजा सोडून ख्रिश्चन झाले होते. तौरात इंजील आणि जबुरचे विद्वान होते. हजरत खतीजा (रजी.) यांनी संपूर्ण घटना त्यांच्यासमोर मांडली हे ऐकून वरका म्हणाले, हा तोच दूत आहे जो प्रेषित मुसा (अलै.) यांच्यावर अवतरला होता. जर मी त्यावेळेपर्यंत जिवंत राहू शकलो असतो जेव्हा तुम्हाला तुमचाच समुदाय देशाबाहेर काढणार आहेत तेव्हा मी तुमची मदत केली असती. तेव्हा प्रेषित(सल्ल.) आश्चर्याने म्हणाले, काय माझे लोक मला इथून हाकलून लावणार. तर वरका म्हणाले,हो. जे काही तुमच्यावर अवतरीत झाले आहे जेव्हा- जेव्हा ते कुणावरही अवतरीत झाले सगळा समाज त्यांच्या विरोधात होतो. परंतु यानंतर लवकरच वरकाचे निधन झाले. हजरत खतीजा यांना कळून चुकले की ईश्वराने मुहम्मद(सल्ल.)यांना प्रेषितत्व बहाल केले आहे. म्हणून त्यांनी वेळ न गमावता त्वरित इस्लाम धर्म स्वीकारला व स्त्रियांमध्ये सर्वात प्रथम इस्लाम स्वीकारणारी पहिल्या महिला ठरल्या. हजरत खतीजा (रजी.) ईस्लाम धर्म स्वीकारून फार आनंदी होत्या त्यांनीआपले संपूर्ण धन संपत्ती गरिबांमध्ये खर्च करण्यात सुरुवात केली.
मक्कावासी प्रेषितांना(सल्ल.)आणि त्यांच्या अनुयायांना फार त्रास देऊ लागले. जर एखाद्याने वाईट शब्द बोलले तर प्रेषित(सल्ल.)नाराज होऊन घरी येत असत आणि हजरत खतीजा(रजी.) यांना सर्व घटना सांगत. तेव्हा खतिजा (रजि.) म्हणायच्या, प्रेषित सल्ल., जरा सांगा आत्तापर्यंत एक तरी प्रेषित असे आले की ज्यांना लोकांनी त्रास दिला नाही.त्यांचे हे बोल एकूण प्रेषितांचे दुःखी मन थोडे हलके व्हायचे, तर अशा कठीण प्रसंगातही हजरत खतिजा(रजी.)प्रेषितांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहत असत. जोपर्यंत त्या जिवंत होत्या प्रेषितांनी(सल्ल.)दुसरे लग्न केले नाही. हजरत खतीजा(रजी.)मुलांचे पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीने करायच्या आणि प्रेषितांची(सल्ल.)सेवाही त्या फार मन लावून करत.
- परवीन खान
पुसद
Post a Comment