अनुभव तसा जुना आहे. पण काल्पनिक वगैरे नाही. सुमारे साठच्या दशकातला असावा. आम्हां भावंडाना नुकतीच चहा पिण्याची आजीकडून अनुमती मिळाली होती. मातीच्या भांड्यात (कोकणात ‘सानक’ असे म्हणतात) गुळाचा चहा आणि त्यांत पोहे भिजवून आम्हांला नाष्ट्यात देण्यांत येत असत. ज्याला पोहे नको हवे असतील त्यांस मोठा बटर दिला जायचा. (बटर म्हणजे मस्का नव्हे) ‘बटर’ हा शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याचा कोकणातला अर्थ फार वेगळा आहे. मऊ पाव भट्टीत टाकून त्यांस कुरकुरीत केले जाते. हा प्रकार आज महाराष्ट्रभर सर्वत्र बेकरी व्यवसायिक पुरवित आहेत. असो.
कुटूंबातील वरिष्ठ मंडळी जेव्हां कपात चहा घ्यायची तेव्हा आई-चुलती यांची चहा प्यायची पद्धत फार वेगळी असायची! एका तळव्यावर गूळ आणि दुसऱया हातांत बशीत ओतलेला कोरा चहा असायचा. चवीनुसार गुळ जिभेवर घ्यायचे आणि चहाचा आस्वाद घ्यायचा. त्याकाळी साखर खूप महाग असायची. म्हणून कुटूंबातील सर्व सदस्य हातावरचा चहा हा असा प्यायचे. त्यामुळे गुळाचा वापर प्रमाणात व्हायचा! हा त्यामागचा हेतू असावा. शिवाय साखरेचा चहा फक्त पाहुण्यांना दिला जायचा. आम्हां बच्चा कंपनीला ‘तसा’ चहा पिण्यास अजून परवानगी दिली गेली नव्हती. कारण डचमळलेल्या बशीमुळे तळाहातवर गरमागरम चहा ओतला जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, ज्यामुळे हात जळण्याची शक्यता होती. शिवाय बशी फुटण्याची शक्यता होतीच. आपण केव्हा मोठे होऊ आणि आजीकडून आपल्याला हातावरचा चहा प्यायची परवानगी मिळू शकेल? तरीही आजीच्या नकळत आम्हीं बच्चे कंपनी आई-चुलतीच्या हातावरचा चहा चोरून प्यायचोच. एकत्र कुटुंबातील हा गमतीशीर प्रकार खूप काही सांगून जातो.
तो काळ राशनिंगचा होता. तांदुळ शेतकरी घेत नसत. गहू खायची प्रथा नव्हती. शहरी लोकांचे चपाती हे अन्न असायचे. आम्ही ग्रामिण भागातील शेतकरी कुटूंबातले लोक.आई-चुलती, पुढे आत्या-बहिणी हातवरची तांदळाची भाकर लाकडी चुलीवर भाजून द्यायच्या. गरमागरम फुगलेल्या भाकरित साजूक तूप आणि थोडी साखर पेरली जायची, हे त्याकाळचे रात्रीचे चवदार जेवण असायचे.
अलीकडच्या काळात शहरात जागोजागी चायच्या आधुनिक वातानुकूलित टपऱ्या दिसतात. ज्यामध्ये ग्रीन टी, यलो टी, जिंजर टी, मसाला टी, दालचिनी, इलायची चाय, सुलेमानी चाय...अशी अनेक प्रकारची चाय लोक आवडीने पितात. हायवेवरील ढाब्यावर तर असे चायचा चुस्का घेणारे रसिक अनेक दिसतात. आज हातावरची भाकर आणि गावरान कोंबड्याचे फलक सुद्धा सर्वत्र लावलेले दिसतात. आम्हीं ग्रामीण भागातले कोकणी लोक झिंग्याचा चटपटा हलदोनी त्यावेळी आवडीने खायचो. ओन्ली व्हेज सोडल्यास कोकणातला रहिवासी लगतच्या समुद्र किनारी तसेच भरतीला थेट खाजणात जाऊन ताजी मच्छी घेऊन येणारच. काही वर्षांपूर्वी गावांत एक गंमतीदार मराठी पोस्टर पाहिला... येथे ‘सुखी’ मच्छी भेटेल ते वाचून हसू आवरे ना. ओशाळलेल्या त्या दुकानदारास समजवून सांगीतले. तेव्हां त्याने ‘सुखी’ ऐवजी ‘सुकी’ असे लिहिले. ‘भेटेल’ हा शब्द सुद्धा हटवून ‘मिळेल’ असे लिहिले. कोकणा बाहेरचे काही तथाकथीत विद्वान इथल्या स्थानिकांमध्ये दोष शोधत असतात. जेथून ते इकडे आलेत ‘तिकडे’ त्यांना कुणी विचारेनासे झाले, म्हणून इकडे आले... टीका-टोमण्यांशिवाय त्यांचे दिवस जाईनात. त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम.
“परवाह ना कर
चाहे सारा जमाना
खिलाफ हो
चल उस रास्ते पर
जो सच्चा हो और साफ हो”
हातावरचा चहा म्हणजे तळ हातावर घेतलेला गुळाचा खडा आणि दुसऱ्या तळहाती बशीत असलेला कोरा चहा, ह्याचे संतुलन त्यावेळेस मोठया मंडळींना मस्त जमायचे. पुढे चहाचे हे असले प्रकार येतील, हे स्वप्नातही सुचले नव्हते. कोरोना मुळे अनेकांना झाड, वृक्षांची ओळख होऊ लागली. प्राणवायू मध्ये वायू असो वा नसो प्राण असणे आवश्यक झाले. आयुर्वेद हा शब्द त्याची माहिती लागलीच लोक गुगल करू लागले. नाक आणि घसा यावरील रामबाण औषधे मार्केट मध्ये येऊ लागली.
तात्पर्य हेच की निसर्गाच्या विरुद्ध जो जगण्याचा प्रयत्न करतो त्याला कोरोना नंतर जाग आली असावी.
ग्रामजीवन म्हणजे काय? ते प्रत्यक्ष जाणून घ्यायला हवे. मग कळेल झाड शासनाने लावायचे का कुठल्या तरी संस्थेने लावावे... त्यापेक्षा स्वतः प्रत्येक स्थानिकाने मॉन्सून सुरू होण्याआधी चार झाडे आपण का लावू नये? असा प्रश्न स्वतःला विचारलेला बरा. गावांकडची माणसे पूर्वी जशी जगायची त्यांत कधिच दिखावा नव्हता आणि आजही नाही.
एकदां एमएसईबी खात्याचे अधिकारी सर्वेक्षणार्थ गावी आले होते योगायोगाने त्यांची भेट एसटी स्टॅंडवरच झाली. स्थानिक नागरिक म्हणून मी त्यांना विचारता झालो की “पंचक्रोशीत विजेचे लोडशेडिंग आलंय, त्याचे वेळापत्रक पेपरात छापून आले आहे, मग पुढे काय? त्याचा तपशील दिलेला नाही. वीजेवरील लोडशेडिंग केव्हां संपणार?”
अगदी निराकार चेहऱ्याने साहेब उत्तरले... “...काही नाही, या पुढे विजधारकांना लोडशेडिंगची सवय होईल.”
त्यांचे ते उत्तर तंतोतंत खरे ठरले. आजही कोकणात विजेची अघोषित लोडशेडिंग कायम सुरू आहे. आतां त्याची खरंच सवय झाली आहे. २६ जानेवारी असो, १५ ऑगस्ट असो किंवा १ मे महाराष्ट्र दिन-कामगार दिवस असो...लाईट मध्येच केव्हां गुल होईल, सांगणे कठीण आहे! “लाईन फॉल्टी आहे” असे गोड उत्तर कायम दिले जाते. लोकांना त्याची आता बऱ्यापैकी सवय झाली आहे!
काटकसरीने कसे जगावे आणि तब्येत ठठणीत कशी राहते त्याचे प्रत्यक्ष अनुभव स्थानिक घेत आहेत. गुळ जास्त संपू नये म्हणून तळ हातावर मोजकाच गुळाचा खडा घेणारी आम्ही माणसं, आजही काटकसरीने जगत आहोत...इथल्या अनेक तरुणांनी टुरिजम म्हणजेच पर्यटकांसाठी म्हणून विविध उद्योग सुरु केले आहेत. नोकरी मागण्या पेक्षा स्वरोजगार झालेले जास्त बरे. तरीही शासकीय यंत्रणेकडे डोळे लावून बसलेत सारे... कोकणात येणाऱ्या पर्यटकानां आकर्षित करतील असे उत्तम रस्ते, अखंडित वीज पुरवठा आणि स्वछ पाणी यांची सांगड कशी व्हायची, आणि केव्हा? त्याची वाट पाहत आहेत... धागे किसी और के हाथ मे हैं, नाचना तो पडेगा.
- इकबाल शर्फ मुकादम
दापोली
Post a Comment