Halloween Costume ideas 2015

सत्ता आणि स्त्री


काही दिवसांपूर्वी, अ‍ॅनिमल नावाचा एक चित्रपट येवून गेला होता, त्यात एक शब्द, ’अल्फा मेल’ वापरण्यात आला होता. त्याचा अर्थ ’दबंग पुरूष’ असा होतो. त्या चित्रपटातील नायक, स्त्रीयांवर अत्याचार करणारा असतो. विशेष बाब म्हणजे भारतीयच नव्हे तर पाकिस्तानी दर्शकांनीसुद्धा हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. यावरून भारतीय उपखंडातील पुरूषांची स्त्रीयांकडे पाहण्याची दृष्टी किती विकृत आहे हे स्पष्ट होते. या चित्रपटात एक असे दृश्य आहे ज्यामध्ये नायक आपल्या प्रेमिकेला तिचे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याचे बूट जिभेने चाटण्याचे आदेश देतो. स्त्रीयांना दुय्यम दर्जा देणार्या विकृत अशा चित्रपटाचा विकृत असा नायक मुर्त स्वरूपात प्रज्ज्वल रेवण्णाच्या रूपात मागील आठवड्यात जनतेसमोर आला.

कर्नाटकच्या हासन लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेला हा अल्फा मेल, लिंगपिसाट व्यक्ती सध्या भारताबाहेर असून, त्याच्या कारणाम्यांनी अवघा देश ढवळून निघाला आहे. त्याच्या 2975 लैंगिककृत्य असलेल्या चित्रफिती समाज माध्यमांवरून जेव्हा लोकांसमोर आल्या तेव्हा सुरूवातीला कोणालाच विश्वास बसला नाही. लवकरच या सर्व चित्रफिती खऱ्या असल्याचे लोकांच्या लक्षात आले. 

अवघ्या 33 वर्ष वयाच्या या विकृत अल्फा मेलने कोणत्याच वर्गातली आणि कोणत्याच वयोगटील स्त्री सोडली नाही. त्याच्या कार्यक्षेत्रात येणार्या अनेक महिला पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पक्ष कार्यकर्त्या, घरकाम करणार्या स्त्रिया कोणालाच या नराधामाने सोडले नाही. एका चित्रीफितीत तर 60 ते 65 वर्षाची एक महिला अत्यंत दयनीय अवस्थेत गयावया करतांना स्पष्ट दिसत असल्याचे व तरीही तिच्यावर प्रज्वलने बलात्कार करत असल्याचा अत्यंत संतापजनक चित्र आढळून आलेले आहे. यातील अधिकांश महिलांना त्याने आपल्या सत्तेच्या बळावर अंकित केलेल्या असून, नाईलाजाने अनेक महिलांनी स्वतःला त्याच्या सुपूर्द केल्याचे त्यावर दाखल झालेल्या एफआयआरवरून दिसून येते. 

प्रज्वलचा ड्रायव्हर कार्तिक हा या सर्व चित्रफितींना सार्वजनिक करण्यामागे असल्याचा प्रथम दर्शनी लक्षात येत असून, या चित्रफिती असलेले पेनड्राईव्ह 16 एप्रिल 2024 म्हणजे हासनमधील निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर मोफत वाटण्यात आले. ज्यामुळे एकच गहजब उडाला. हे पेनड्राईव्ह मोफत वाटण्यामागे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचे म्हटले जाते. प्रज्वल असो, कार्तिक असो की तो काँग्रेसचा बडा नेता. या प्रकरणामुळे या कोणाचेच फारसे नुकसान झालेले नाही. यात नुकसान झालेले आहे ते त्या महिलांचे ज्यांचे स्पष्ट चेहरे त्या चित्रफितींमधून दिसतात. हासन लोकसभा मतदारसंघ आणि आसपासच्या क्षेत्रातील या महिलांनी आपली घरेदारे सोडून अज्ञातस्थळी प्रस्थान गेल्याचे दिसून येते. त्या परत येणे शक्य नाही. यातील किती महिला आत्महत्या करतील सांगता येत नाही. जेडीएसच्या सर्वच महिला कार्यकर्त्यांच्या घरातील लोक त्यांच्याकडे संशयाने पाहत आहेत वगैरे बातम्या प्रसारमाध्यमातून प्रकाशित झालेल्या आहेत.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या या सेक्स स्कँडलची निर्भया कांडासारखी दखल लोकसभेच्या रणधुमाळीत घेण्यात आलेली नाही. ही खेदजनक बाब आहे.

वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षापर्यंत 2 हजार 975 वेळा बळजबरीने संभोग करण्याचे वाईट किर्तीमान प्रज्वलने स्थापन केले आहे. ही बाब प्रत्येक जबाबदार नागरिकाने गांभीर्याने घेण्यासारखी आहे. भारतीय राजकारणात सत्ताधार्यांच्या नजरेत येण्यासाठी अनेक महिला कार्यकर्त्या आपल्या सौंदर्याचा वापर करतात. नको त्या तडजोडी करतात. हे उघड गुपीत आहे. कोणत्याही पक्षात असलेल्या महिल्या कार्यकर्त्यांवर सत्ताधार्यांची नजर असतेच, हे ही उघड गुपीत आहे. प्रज्वलच्या प्रकरणाचा आकार मोठा असल्यामुळे याचे गांभीर्य जरा जास्त आहे. परंतु भाजपामध्ये यापूर्वीही अनेक नेत्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केले आहे हे अनेकवेळा आढळून आलेले आहे. 

लैंगिक शोषणाच्या बाबतीत कोणताच पक्ष मागे नाही. काँग्रेस मध्येही नेहरू-एडविना माऊंट बॅटन यांच्यातील नाजूक संबंधापासून, नैना साहनी तंदूर कांड, व्हाया एन.डी. तिवारी यांनी राजभवनामध्ये केलेल्या लैंगिक चाळ्यापर्यंतच्या अनेक घटना उजेडात आलेल्या आहेत. न उजेडात आलेली प्रकरणे किती असतील याचा कोणीही अंदाजा करू शकत नाही. 

असे का घडते?

स्त्री ही शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे तिला शक्तीशाली पुरूष आवडतात. शक्तीशाली म्हणजे फक्त शारीरिक दृष्ट्याच नव्हेे तर सामाजिकदृष्ट्याही. प्रज्वल रेवण्णासारखे अल्फा मेल स्त्रीयांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा उचलतात. 

अल्लाहने जनावर आणि पक्षांमध्ये नरांना शक्तीबरोबर सौंदर्यही बहाल केलेले आहे. उदा. मोर हा लांडोरपेक्षा जास्त सुंदर व शक्तीशाली असतो. तुर्रेबाज कोंबडा हा कोंबडीपेक्षा जास्त सुंदर आणि शक्तीशाली असतो. मानवामध्ये मात्र या उलट स्थिती आहे. ईश्वराने स्त्रीला पुरूषांपेक्षा जास्त सौंदर्य बहाल केलेले आहे, मात्र तिची सर्वस्वी जबाबदारी पुरूषावर टाकलेली आहे. ती मुलगी असते तेव्हा तिची जबाबदारी वडिलांवर, ती पत्नी असते तेव्हा तिची जबाबदारी पतीवर, ती वृद्धावस्थेत असते तेव्हा तिची जबाबदारी तिच्या मुलांवर टाकलेली आहे. स्त्रीच्या या तिन्ही अवस्थांमध्ये काही कारणांमुळे जर जबाबदार पुरूष उपलब्ध नसेल तर तिची सर्व जबाबदारी शासनाची असेल, असे स्पष्ट निर्देश शरियतने दिलेले आहेत. स्त्रीचे हे परावलंबित्व अपमानास्पद बाब नसून तिला मिळालेली सवलत आहे, तो स्त्रीचा अधिकार आहे. हे समजण्यामध्ये श्रद्धावान मुस्लिम पुरूषांशिवाय प्रत्येकाने गफलत केलेली आहे. स्त्रीयांवर मानववंशाची निर्मिती आणि तिचा सांभाळ ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली असल्यामुळे तिला बाकीच्या सर्व जबाबदार्यांतून अल्लाहने मुक्त ठवलेले आहे. ही समजण्यासाठी अतिशय नाजूक बाब आहे. जी साधारणपणे पुरूषांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे पुरूष आपल्याला प्रदान केलेल्या शक्तीचा दुरूपयोग करून महिलांवर अत्याचार करत असतात. वास्तविक पाहता इस्लाममध्ये स्त्रीला एवढे महत्त्वाचे स्थान दिलेले आहे की, तिला वयाच्या कोणत्याच टप्प्यावर कमावण्यासाठी काम करण्याची गरजच नाही. इस्लाममध्ये स्त्रीयांना दिलेले हे अधिकार जे पुरूष नाकारतील ते प्राप्त करण्यासाठी मुस्लिम महिलांना संबंधित पुरूषांविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचाही अधिकार शरियतने दिलेला आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना धार्मिक तसेच भौतिक शिक्षण घेण्याचा पुरूषांएवढाच अधिकार देण्यात आलेला आहे. मात्र शिक्षणाच्या स्वरूपामध्ये थोडेसे अंतर जरूर ठेवलेले आहे. 

या संबंधी प्रसिद्ध इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी असे म्हणतात, शिक्षण आणि प्रशिक्षणाचा जिथपर्यंत संबंध आहे, इस्लाममध्ये स्त्री आणि पुरूषांमध्ये कुठलाच भेद केलेला नाही. मात्र दोघांमध्ये थोडासा अंतर जरूर केलेला आहे. इस्लामच्या दृष्टीने स्त्रीचे खरे शिक्षण आणि प्रशिक्षण ते आहे जे तिला एक उत्तम पत्नी, एक उत्तम आई आणि एक उत्तम गृहिणी बनवेल. तिचे कार्यक्षेत्र घर आहे. म्हणून तिला विशेष करून त्या विषयांचे शिक्षण दिले जाणे अपेक्षित आहे जे तिला तिच्या या क्षेत्रामध्ये जास्त फायदा पोहोचवू शकतील. सोबत तिला ते ज्ञान देणेसुद्धा आवश्यक आहे जे एका व्यक्तीला आदर्श व्यक्ती बनवू शकेल आणि तिच्यामध्ये आदर्श शिष्टाचार निर्माण करू शकेल. एवढेच नव्हे तर तिच्या व्यक्तीमत्त्वाला व्यापक बनविणारे असेल. असे शिक्षण प्राप्त करणे प्रत्येक मुस्लिम महिलेसाठी अनिवार्य आहे. याशिवाय, जर एखाद्या महिलेमध्ये अनन्यसाधारण बौद्धिक क्षमता असेल आणि या विषयां शिवाय ती इतर विषयांमध्येही प्राविण्य मिळवू इच्छित असेल तर इस्लाम तिच्या मार्गात अडथळा आणत नाही. अट फक्त एकच आहे की हे शिक्षण प्राप्त करत असतांना ती महिला इस्लामी शरियतने, महिलांसाठी आखून दिलेल्या सीमांच्या बाहेर जाणार नाही. (संदर्भ : परदा पान क्र.197.)

उंच इमारत आणि सुंदर स्त्री 

उंच इमारत आणि सुंदर स्त्री कायम धोक्यात असतात. सुंदर स्त्री जेव्हा सार्वजनिक ठिकाणी उघडपणे वावरेल तेव्हा कोणत्या पुरूषाला केव्हा तिच्या विषयी आकर्षण निर्माण होईल सांगता येत नाही. त्यात कोण अल्फा मेल असेल हे ही सांगता येत नाही. पुरूष हे शरिरानेच शक्तीशाली असतात असे नाही तर ते आक्रमक प्रवृत्तीचेसुद्धा असतात. आपल्याला आवडलेल्या स्त्रीला प्राप्त करण्यासाठी ते कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. आवडत्या स्त्रीला प्राप्त करण्यासाठी इतिहासात अनेक युद्ध झालेली आहेत. यासंबंधी हरियाणातील एक उदाहरण अनुराधा बाली आणि चंद्रमोहन बिष्णोई यांचे देता येईल. अनुराधा बाली ही एक अत्यंत सुंदर सरकारी वकील होती. आपल्या वाढदिवसानिमित्त नटून थटून मैत्रीणींबरोबर एका स्टार होटलमध्ये पार्टी करत होती. त्याच होटलमध्ये हरियाणाचे उपमुख्यमंत्री चंद्रमोहन बिष्णोई जेवण्यासाठी आले होते. त्यांची नजर अनुराधावर पडली. ती त्यांना इतकी आवडली की त्यांनी तिला प्राप्त करण्यासाठी स्वतःचे धर्मांतरण करून चाँद मोहम्मद हे नाव धारण केले व अनुराधाला फिजा बनवून तिला आपल्याशी लग्न करण्यास भाग पाडले. या दोघांच्या लव्ह स्टोरीचा अंत 2009 मध्ये झाला. फिजाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मोहाली येथील तिच्या घरात एका बेडवर सापडला. 

अशा कितीतरी अनुराधा अशा अल्फा मेल पुरूषांच्या वासनेस बळी पडून मृत्यू पावल्या असतील. याचा अंदाजसुद्धा करणे शक्य नाही. चंद्रमोहन बिष्णोई मात्र अजूनही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगत आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, अशा प्रकरणामध्ये अंतिम हानी स्त्रीचीच होते. हासनच्या घटनेमध्ये सुद्धा अंतिम हानी त्या शेकडो महिलांचीच होणार आहे ज्या प्रज्ज्वलच्या उज्ज्वल (?) कृत्यांना बळी पडलेल्या आहेत.  

समाज प्रतिगामी असो का पुरोगामी, मागास असो का आधुनिक दोन्हींमध्ये महिलांचे शोषण केले जाते. महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणार्या आणि न पेलणार्या कामाचा अतिरिक्त बोजा लादला जातो. पुन्हा-पुन्हा आई बनण्याच्या त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले जाते. समाजात महिलांचे नक्की स्थान ठरविताना इस्लामखेरीज सर्व मानवी सभ्यतांचा गोंधळ उडालेला असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणूनच प्रज्ज्वल रेवण्णासारखे अल्फा मेल स्त्रीयांची लिलया शिकार करतात. भारतीय राजकारणामध्ये महिलांच्या शोषणाच्या अधुनमधून घटना घडतच असतात. परंतु, प्रज्ज्वल रेवण्णाच्या प्रकरणानंतर आपल्या मुलींना राजकारणात पाठविण्याचा निर्णय तेच लोक घेऊ शकतील ज्यांना आपल्या मुलींच्या जीवाची व त्यांच्या शिलाची परवा नाही. अल्लाहच्या कृपेने घोर गरीबीत असतांनासुद्धा भारतीय मुस्लिम समाज आपल्या महिलांना राजकारणाच्या या दलदलित (अपवाद खेरीज करून) पाठवत नाही. एवढेच नव्हे तर ज्या मुस्लिम महिला राजकारणात आहेत त्यांच्याकडे सन्मानानेही पाहत नाही. प्रज्ज्वलच्या लैंगिक वासनेला बळी पडलेल्या महिलांच्या भविष्याचा जरा विचार करा आणि नंतरच आपल्या मुलींना राजकारणात पाठवायचे किंवा नाही हे ठरवा.


- एम. आय. शेख

लातूर


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget