(६ मे : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा स्मृतीदिन विशे्ष)
२ एप्रिल १८९४ रोजी अवघ्या २० व्या वर्षी या दूरदृष्टी लाभलेल्या राजानं करवीर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि फक्त २८ वर्षे राज्य केले. या अवघ्या २८ वर्षात हा शाहूराजा केवळ कोल्हापूरचा राजा राहिला नाही, तर तो अखिल महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट झाला. बहुजन समाजाला विशेषत: दीनदलित जनतेला तो आपला तारणहार वाटला.
शाहू महाराज गादीवर आले त्या वेळी बहुसंख्य प्रजा कमालीची खचून आणि भरडून गेली होती. हे राजर्षी शाहू महाराजांनी पुरेपूर ओळखले. या खचलेल्या, पिचलेल्या प्रजेच्या विकासासाठी आपली राजसत्ता वापरण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या सर्वांगिण विकासाच्या वाटा खुल्या केल्या.
प्रथम त्यांनी खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांमध्ये प्रचंड दैन्यावस्थेत जीवन कंठणाऱ्या बहुजन समाजाला प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.पुढे माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या आकांक्षा देखील पुऱ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अठरापगड जातींचे लोक हाताशी धरून व उत्तेजन देऊन निरनिराळ्या जातींच्या व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृहांची स्थापना केली. शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर शहर हे ‘वसतीगृहाची जननी’ म्हणून आजही ओळखले जाते.
अज्ञान, अंधश्रद्धा, आणि अस्पृश्यता या तीन व्याधी मुळातून उपटून काढल्याशिवाय आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, हे ओळखून शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक कार्याचा धुमधडाका सुरू केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचा आज जो वटवृक्ष झाल्याचे दिसते आहे,त्यामागचे कर्मवीरांचे प्रेरणास्थान हे राजर्षी शाहू छत्रपती महाराज हेच होत.
शाहू महाराजांना जातीभेद बिलकूल मान्य नव्हता. अनेक जातींची मुले आपापली जात विसरून एकत्र गुण्यागोविंदाने शिक्षण घेतांना दिसावीत, हे त्यांचे स्वप्न होते. मात्र एका विशिष्ट परीस्थितीत त्यांना नाईलाजाने जातवार वसतीगृहे काढावी लागली.
कालप्रवाहास जबरदस्त धक्का देऊन नवमहाराष्ट्र घडविणाऱ्या महापुरूषांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे कार्य गौरवास्पद आहे.त्यांचे मानवतावादी धोरण पाहून कुर्मी क्षत्रिय अधिवेशनात त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. (Raja=King, Rishi=Learned holy man= RAJARSHI) राजाचा थोरपणा आणि ऋषीची ऋजुता शाहू महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने आढळून येते. यामुळेच या थोर ऋषितुल्य राजाने सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न आपल्या उरी धरून ते सत्य करून दाखवले. शाहू महाराजांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून उभ्या महाराष्ट्राला ज्ञानाच्या प्रकाशाने न्हाऊ घातले. करवीर नगरीमध्ये राजर्षी शाहू नावाचा ज्ञानाचा सूर्य उदयास आला आणि हळूहळू अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊ लागला. अर्थात राजर्षी शाहू महाराजांच्या या प्रचंड शैक्षणिक कार्याने त्यांचे नाव भारताच्या इतिहासात चिरंतन राहिले. ऋषीची ऋजुता मनी बाळगून राजाच्या शौर्याने समाज क्रांती घडवून आणणारे राजर्षी शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे खरेखुरे शिल्पकार होते. माणसावर केवळ माणूस म्हणून प्रेम करणारे, दुःखीतांच्या दर्शनाने मेणबत्तीसारखे पाघळणारे, दीनदलितांवरील अन्याय अत्याचार पाहून पेटून उठणारे वंचितांची विवंचना न्याहाळून घायाळ होणारे, समाजाच्या तळागाळातील माणसाला आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे राजर्षी शाहू महाराज समाजाला कलाटणी देणारे महापुरुष ठरले. आजही या देशातील सरकार शाहू विचारांची कास धरल्याशिवाय लोकाभिमुख कामगिरी करू शकत नाही, ही वास्तवता राजकीय विश्लेषक व अभ्यासक मान्य करतात, यातच राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे मोठेपण दिसून येते.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून सा.करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment