कुणाची अकारण प्रशंसा (खोटी स्तुती) करणे, त्याचे लांगुलचालन करणे हे अनैतिकतेचे लक्षण आहे. तसेच हा खोटे बोलण्याचा एक प्रकार आहे. आणि ज्या व्यक्तीचे अशा प्रकारे लांगुलचालन केले जाते त्याच्यासाठी देखील चांगली गोष्ट नाही. विनाकारण प्रशंसा करणारा तीन प्रकारचे गुन्हे करतो. एक तर तो ज्याची प्रशंसा करत आहे तो तसा माणूस नसतो, दुसरे हे की तोंडाने जरी तो विनाकारण प्रशंसा करीत असला तरी तो आपल्या मनामध्ये त्याला प्रामाणिक समजत नाही, हा दांभिकपणा आहे. तिसरे हे की काही क्षुल्लक फायद्यासाठी वरिष्ठ अधिकारी इत्यादींची खुशामत करण्याने तो स्वतःदेखील तुच्छपणाचा कळस गाठतो. आणि ज्या लोकांची तो खुशामत करतो त्यांनाही इतरांच्या नजरेत तुच्छ करतो. पवित्र कुरआनात ज्यू आणि दांभिक लोकांविषयी असे म्हटले आहे-
“जे लोक आपल्या कर्मांवर खूश होतात आणि जो (पराक्रम) त्यांनी केला नाही त्याचा जल्लोश करतात, त्यांच्याविषयी असे मुळीच विचार करू नका की ते शिक्षेपासून बचावले जातील.” (प. कुरआन, ३:१९)
एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची भलतीच प्रशंसा करत असताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्यास सांगितले की, “तुम्ही त्या व्यक्तीला बरबाद करून टाकाल.”
आणखीन एका प्रसंगी दुसऱ्या एका व्यक्तीविषयी कुणीतरी अशीच स्तुती करत असताना प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांनी सांगितले की, “जर तुम्हाला कुणाची प्रशंसा करायचीच असेल तर असे म्हणत जा की, माझा असा विचार आहे की अमुक व्यक्ती चांगली व्यक्ती आहे.”
जर कुणाची विनाकारण स्तुती केली जात असेल तर ती ऐकून हे लोक अहंकारी होतात, तसेच अशा प्रकारे गुणगान करण्याने ते घमेंडी होतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की “कुणी दुसऱ्या लोकांचे त्यांच्यादेखत गुणगान करत असताना तुम्ही पाहिले तर त्याच्या तोंडावर धूळ फेका.”
- संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment