लातूर प्रतिनिधी
युथ विंग जमाअते इस्लामी हिंद ही संघटना युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 21 वर्षांपासून काम करत आहे. दरवर्षी रक्तदान शिबीरे, उद्योजकता विकास शिबीर, नोकरी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदविते. युवकांमध्ये नैतिक मुल्य रूजविण्याचेही काम युथ विंग करत आलेली आहे. युथ विंग देशभरात विविध नावाने कार्यरत आहे. मात्र आता युथ विंग एकाच नावाने देशभरात ओळखली जावी यासाठी या संघटनेचे नाव बदलून आता युथ मुव्हमेंट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात हे नाव युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र असे करण्यात आले असल्याची घोषणा जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेश उपाध्यक्ष जमीर काद्री यांनी लातूर येथे आयोजित कार्यक्रमात बुधवार, 29 मे रोजी खोरी गल्ली येथील मकर्ज इस्लामी येथे केली.
यावेळी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रफिक शेख, , सचिव मोहम्मद तहेसीन, उपसचिव इम्रान शेख, लातूर जिल्हाध्यक्ष शकील शेख, उस्मानाबाद शहराध्यक्ष सय्यद आसेफ व लातूर शहराध्यक्ष सय्यद अहमेद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास संबोधित करताना काद्री म्हणाले, युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संघटना आता समाजेवा, युवकांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या मध्ये आत्मविश्वास, जबाबदारीचे भान, कुशल नागरिक, अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम करेल. देशासाठी व समाजासाठी चांगला समाज निर्माण करणे हे युथ मुव्हमेंट महाराष्ट्राचे एक ध्येय असेल. आजचा युवक अनेक समस्यामध्ये गुरफटलेला आहे. यामधून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हानही ही संघटना पेलणार आहे. या युवकांना चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वासोबतच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक क्षेत्रात सक्षम करणे हे ही युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राचे ध्येय असेल. महाराष्ट्रात एकात्मता, शांतता, सामाजिक सौहार्द वाढीस लावण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील राहील, असे जमीर काद्री म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रफिक शेख म्हणाले, आजचे युवक मोठ्या प्रमाणात वाममार्गाला लागले आहेत. त्यांना या परिस्थितून बाहेर काढण्यासाठी संघटनेमार्फत 7 जून 2024 ते 14 जून 2024 पर्यंत राज्यस्तरावर ’ऑनलाईन जुवा हटाव, देश का युवा बचाव’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी सभा, बैठका घेऊन युवकांना जागृत करण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत कायदेशीर आणि सामाजिक बाबींवर सखोल मंथन होईल. यासाठी सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री यांना भेटून सर्व प्रकारच्या जुगारावर बंदी घालण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचेही रफिक शेख म्हणाले.
युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संघटना राज्यात आदर्श युवक घडविण्याचे कार्य करणार आहे. सर्व समाजघटकातील युवकांना घेऊन ही संघटना कार्य करणार असल्याने युवकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहनही रफीक शेख यांनी केले आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमास संबोधित केले. सुत्रसंचालन प्रदेश सचिव मोहम्मद तहेसीन यांनी केले.
Post a Comment