लातुरात बुद्धीवादी, पुरोगामी चळवळीतील नागरिकांचे पत्रकारपरिषदेत आवाहन
लोकसभा 2024 ची निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. गेल्या 10 वर्षात जातीयवादी प्रवृत्तींनी थैमान घातले आहे. लोकशाही व संविधानात्मक संस्था ज्यात नियोजन आयोग, निवडणूक आयोग, विश्वविद्यालय आयोग (यु.जी.सी.), रिझर्व बँक, सीबीआय, ईडी ईत्यादींचा दुरूपयोग व काही संस्था मोडीत काढल्या आहेत. भाजप, आर.एस.एस. सरकार संविधान बदलाची भाषा वारंवार करीत आहे. या पक्षाचा ईतिहास संविधान बदलण्याच्या बाजूने राहिलेला आहे. हे लक्षात घेतल्यास देशातील संविधान आणि लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. तेंव्हा संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आपण ’इंडिया’ महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रक व पत्रकार परिषद घेऊन लातूर शहरातील बुद्धीवादी नागरिकांनी जनतेला आवाहन केले आहे. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ. सोमनाथ रोडे, माजी न्यायाधीश आर. वाय. शेख, माधव बावगे, नरसिंग घोडके, पी. जी. भिसे, अॅड. उदय गवारे, डॉ.असद पठाण, बरकत काझी, प्रा. अर्जुन जाधव, उमाकांत धावारे यांची उपस्थिती होती. यावेळी बुद्धीवादी नागरिकांनी काढलेल्या पत्रकात शेकडो नागरिकांची नावे आहेत.
हुकुमशाही स्वतः प्रस्थापित होण्यासाठी लोकशाही मार्गानेच सत्तेवर येत असते. हिटलर देखील लोकशाही मार्गाने सत्तेवर आला होता. अशा प्रकारे लोकांना विश्वासात घेऊन त्याने लोकांचा विश्वासघात केला. हा मुद्दा मतदारांनी गांभिर्याने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाला धोका निर्माण केला आहे. त्यामुळे लातूर शहरातील बुद्धीवादी, पुरोगामी चळवळीतील नागरिकांनी मतदारांमध्ये जागृती करण्याचे अभियान सुरु केले आहे. यावेळी नागरिकांनी भूमिका व्यक्त करताना म्हटले की, राजकीय व्यासपीठावर आम्ही कधी आलो नाही, परंतू, आज देशाची परिस्थिती बिकट आहे. म्हणून रस्त्यावर आलो असून आम्ही सर्व बुद्धीजिवींनी ’इंडीया आघाडी’ला पाठींबा दिला आहे, असे नमुद करुन डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. उलट लोकशाही आणि संविधानाला धोका कसा निर्माण होईल, असे निर्णय घेतले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करीत असल्याचे ते म्हणाले. उपस्थित सर्व बुद्धीवादी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन 29 एप्रिल रोजी केले.
Post a Comment